२०२२-०७-२१

प्रकाश संशोधनालयाचे उद्घाटन

समकालीन विज्ञान आणि दैनंदिन जीवनातील; प्रकाशाचे विविधांगी वर्तन, त्याचे गुणधर्म आणि त्याच्या उपायोजनांच्या परस्परप्रतिसादक्षम प्रारूपांचे कायमस्वरूपी प्रदर्शन; ‘प्रकाश संशोधनालय’ या नावाने ’सुखनिवास पॅलेस, राजा रामण्णा प्रगत तंत्रज्ञानकेंद्र, इंदौर’ येथे ०८-०७-२०२२ रोजी सुरू करण्यात आलेले आहे. डॉ. अनिल काकोडकर, कुलगुरू होमी भाभा राष्ट्रीय संस्था आणि पूर्व-अध्यक्ष अणुऊर्जाआयोग, तसेच पूर्व-सचिव अणुऊर्जाविभाग, भारत सरकार यांचे हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले आहे.हे संशोधनालय, इंदौर येथील राजा रामण्णा प्रगत तंत्रज्ञानकेंद्राच्या आवारातील राज्यवारसा बांधकाम असलेल्या ’सुखनिवास पॅलेस’च्या इमारतीतील ६,५०० वर्गफूट क्षेत्रात वसवण्यात आलेले आहे. ४० हून अधिक प्रदर्शनीय वस्तू इथे भेट देणार्या दर्शकांकरता प्रदर्शित करण्यात आलेल्या आहेत. यात अणुभौतिकीतील तसेच अनेक औद्योगिक उपयोगाची; रुबी आणि इतर अनेक लेझर्स [१] ; प्रकाशतंतू जोडण्या; एकसमयावर्तनक प्रारण; सिर्काडिअन लय आणि इतर लेझर उपायोजने समाविष्ट आहेत.

डॉ. काकोडकर म्हणतात, “...... इथे सुखनिवास पॅलेसमध्ये ’प्रकाश संशोधनालय’ कार्यान्वित झालेले पाहून मी प्रसन्न आहे. राज्यवारसा इमारत आणि आधुनिक विज्ञानाचा हा संगम निश्चितच लक्षणीय आहे. विशेषतः युवा पिढीकरता ....”

राजा रामण्णा प्रगत तंत्रज्ञानकेंद्र हे इंदौरमधील, अणुऊर्जाविभागाचे एक संशोधन आणि विकास केंद्र आहे. कापत्या धारेचे तंत्र असलेल्या उत्तेजित प्रकाशप्रवर्धन (लेझर) आणि एकसमयावर्तनक या दोन कळीच्या प्रकाशस्रोतांच्या संशोधनात ते सक्रिय आहे. ’प्रकाश संशोधनालया’चा उद्देश, या ’दिप्तीमान विज्ञानक्षेत्रास’ भेट देणार्यांची उत्सुकता वाढवणे, जागरूकता निर्माण करणे आणि त्यांच्यात प्रेरणा निर्माण करण्याचा आहे.

[१] ’ LASER ’ – ’ लाईट ऍम्प्लिफिकेशन युजिंग स्टिम्युलेटेड एमिशन ऑफ लाईट ’ म्हणजेच ’ उत्तेजित प्रकाश उत्सर्जनाचा वापर करून केलेले प्रकाश प्रवर्धन ’ अथवा ’ उत्तेजित प्रकाशप्रवर्धन ’.

https://www.facebook.com/dae.connect/posts/pfbid02TQYcZgiG5ukcLPoD2FJ6AteQWGtTjcotWNHrfm3B511B9m7b7rgAJ5c6vec42dfal

२०२२-०७-०९

अनुवाद एक व्यवसाय-पर्याय

नित्यनियमाने दररोज प्रत्येकासच अनुवादांची गरज भासत असणार्‍या वर्तमान युगात, देशभरात अनुवाद प्रशिक्षणाकरता शाळा-महाविद्यालये नसावित ही चकित करून टाकणारी वस्तुस्थिती आहे. ही त्रुटी त्वरित दूर करून जनसामान्यांना अनुवाद प्रशिक्षणाची सोय लवकरात लवकर उपलब्ध व्हावी अशी इच्छा ठाण्यातील विद्याप्रसारक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांनी व्यक्त केली. विद्याप्रसारक मंडळाच्या, बांदोडकर (स्वायत्त- ऑटोनॉमस) महाविद्यालयात पदवी आणि पदव्यूत्तर अभ्यासक्रमांकरता, श्रेयगुण अभ्यासक्रम (क्रेडिट कोर्स) या स्वरूपात अनुवाद प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या विचारात, विद्याप्रसारक मंडळ आहे. त्या दृष्टीने श्रेयगुण अभ्यासक्रम निर्माण करण्याच्या दिशेने पहिले पाऊल म्हणून ’अनुवाद प्रशिक्षणा’च्या विविध आयामांच्या रूपरेषेची चर्चा करणारे एक व्याख्यान काल शुक्रवार दिनांक ०८-०७०२०२२ रोजी, ज्ञानद्विपातील पाणिनी सभागृहात आयोजित करण्यात आलेले होते. त्या व्याख्यानाचा हा संक्षिप्त आहवाल आहे.

’प्रामाणिकही आणि सुंदरही’ या पुस्तकाच्या लेखिका करुणा गोखले म्हणतात,

“अनुवाद म्हणजे भरतकाम केलेल्या कापडाची उलटी बाजू”
“अनुवाद म्हणजे दुधाची तहान ताकावर भागवणे”
“अनुवाद म्हणजे मूळ लेखनकृती वाचता येत नाही, याबद्दल मिळालेला दिलासा”
“अनुवाद हा तरूण स्त्रीसारखा असतो, सुंदर असेल तर प्रामाणिक नसतो, आणि प्रामाणिक असेल तर सुंदर नसतो.” 

म्हणून तर त्यांनी आपल्या पुस्तकाचे शीर्षक “प्रामाणिकही, सुंदरही” असे ठेवलेले आहे आणि हेच आहे ’अनुवाद कसा असावा?’ या प्रश्नाचे खरे उत्तर. मात्र तो तसा कशाप्रकारे करता येईल, होतकरू अनुवादकास त्याकरता कसे तयार करता येईल, कसे प्रशिक्षित करता येईल, हे सांगणारे हे व्याख्यान होते.


बांदोडकर महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापक असे सुमारे शंभर प्रेक्षक या कार्यक्रमास उपस्थित होते. तसेच माध्यमविद्या शाखेतील विद्यार्थीही या कार्यक्रमास उपस्थित होते. प्रेक्षकांचा प्रतिसाद उत्स्फूर्त आणि आश्वासक होता. अनुवाद आपल्या जीवनाचा कसा अविभाज्य भाग झालेला आहे आणि त्याकरता औपचारिक प्रशिक्षणाची कशी आवश्यकता आहे याची चर्चा या निमित्ताने या व्याख्यानात केली गेली.

व्याख्यानाचा सारांश आराखडा पुढील तपशीलाने व्यक्त होऊ शकेल.


१. रूपरेषा

२. अनुवादाची स्रोतभाषा

३. अनुवादाची लक्ष्यभाषा

४. अनुवादक

५. अनुवाद प्रशिक्षणाच्या कोणत्या सोयी उपलब्ध असाव्यात?

६. अनुवाद करावयाच्या साहित्याचे वर्गीकरण

७. अनुवाद प्रक्रिया

८. अनुवादाच्या गरजेची उदाहरणे
९.  संदर्भवाचन

अनुवाद अनुक्रमातील सर्व मुद्द्यांचा तपशीलाने विचार होण्याची आवश्यकताही व्याख्यानात व्यक्त करण्यात आली.

रूपरेषा

१. प्रत्यक्षातील अनुवादांच्या उदाहरणांनी अनुवादविषयक गरजा स्पष्ट करणे.

२. अनुवादकार आणि त्याने केलेली अनुवाद-उद्दिष्टांची तसेच अनुवादाची स्रोतभाषा आणि लक्ष्यभाषा 

   यांची केलेली निवड.

३. अनुवाद करण्यास लागणारी साधने. संगणक, शब्दकोश, अनुवादाची मूलतत्त्वे सांगणारे

   ग्रंथ. पर्यायी शब्दांचे शब्दसंग्रह आणि सामान्य वापरातील शब्दांचे सहजसोपे पर्याय 

   यांचेबाबतची चर्चा.

४. अनुवादकास आवश्यक असलेली अनुवादातील स्रोतभाषेच्या ज्ञानाची, त्यातील आकलनाची

   आवश्यक पात्रता.

५. अनुवादकास आवश्यक असलेली अनुवादातील लक्ष्य भाषेच्या ज्ञानाची, त्यातील अभिव्यक्तीची

   आवश्यक पात्रता.

६. लक्ष्य साहित्याचे वर्गीकरण आणि आनुषंगिक तपशील.

७. अनुवाद करायच्या नमुन्यांचे अनुवाद करण्याचे प्रात्यक्षिक.

८. अनुवाद प्रक्रिया.

अनुवादाची स्रोतभाषा

मुळात अनुवाद का हवा असतो? तर एखाद्या भाषेतला मूळ मजकूर कुणातरी भिन्नभाषिकाला, कशासाठीतरी हवा असतो. त्यामुळे हे उघडच असते की, गरजवंतास स्रोतभाषेचे ज्ञान तर असते, मात्र अर्थ समजून घेण्यास पुरेसे असत नाही. त्यामुळे स्वभाषेत तो अर्थ समजावून सांगणारा असा कुणीतरी हवा असतो किंवा त्याने सांगितलेला स्वभाषेतील अर्थ म्हणजेच ’अनुवाद’ उपलब्ध असावा लागतो. अनुवादकाला स्रोतभाषेचे सम्यक ज्ञान नसले तरीही चालते. त्याला हव्या त्या मजकूराचा संपूर्ण अर्थ कळला म्हणजे झाले. अनुवाद तर त्याला लक्ष्यभाषेतच करायचा असतो, जी बहुधा त्याची मातृभाषाच असते. किंबहुना अनुवादकाची ’लक्ष्यभाषा’ त्याची मातृभाषाच असणे खूप सोयीचे ठरत असते, कारण अनुवादकाची लक्ष्यभाषेतील अभिव्यक्ती सशक्त असावीच लागते.

अनुवादाची लक्ष्यभाषा

अनुवादकाची ’लक्ष्यभाषा’ त्याची मातृभाषा असणे चांगले. मूळ भाषेतील अर्थ, विवरण, रचनासौंदर्य, भाव आणि माहितीही पूर्ण समजून घेऊन ती लक्ष्यभाषेत यथासांग अभिव्यक्त करणे म्हणजे अनुवाद. अनुवाद करणे शास्त्रही आहे आणि कलाही. जो अनुवाद गरजवंताच्या गरजा पूर्ण करू शकतो तो शास्त्रार्थाने परिपूर्ण मानावा लागेल. मात्र ज्या अनुवादात मूळ भाषेतील रसरंजनाची माधुरी लक्ष्यभाषेत अवतरली आहे, तो अनुवाद कलेच्या दृष्टीनेही परिपूर्ण मानावा लागतो. त्या अर्थाने गरजवंतांची गरज भागवतो तो शास्त्रयुक्त अनुवाद ठरतो आणि रसिकांना रुचतो तोच खरा कलापूर्ण अनुवाद होय.

अनुवादक

अनुवादकास अनुवाद करावयाच्या मजकुराबाबतचे मूळ भाषेतील संपूर्ण आकलन होणे गरजेचे असते. त्याला स्रोतभाषेचे निदान तितपत ज्ञान असणे, ही किमान अर्हता ठरते. मात्र लक्ष्यभाषेत त्याला जर सशक्त अभिव्यक्ती नसेल तरीही तो उपयुक्त अनुवाद करण्यास अपात्रच ठरतो. त्यामुळे मूळ भाषेतील संपूर्ण आकलन आणि लक्ष्यभाषेत सशक्त अभिव्यक्ती करू शकणाराच अनुवादक होऊ शकतो. मात्र पर्यटनासारख्या तात्पुरत्या गरजांकरता आवश्यक असलेले अनुवाद त्या क्षेत्रातले लोक मूळ भाषेतील संपूर्ण आकलन आणि लक्ष्यभाषेत सशक्त अभिव्यक्ती नसूनही लीलया पूर्ण करतांना दिसून येतात. असे अनुवादक क्षेत्रज्ञ असतात. त्या त्या विशिष्ट क्षेत्रातील अनुवादच ते करू शकतात. बांधकाम, न्यायव्यवस्था, अर्थव्यवस्था ही क्षेत्रेही अशीच आहेत. त्याउलट पुस्तकांचे अनुवाद करणार्‍यास टिकावू साहित्याची पुनर्निर्मिती करावयाची असते. त्याला अधिकची पात्रता, अनुभव आणि व्यासंगही आवश्यक असतो.

अनुवाद प्रशिक्षणाच्या कोणत्या सोयी उपलब्ध असाव्यात?


१.       प्राथमिक अनुवाद प्रशिक्षण, अनुषंगिक अध्यापकवर्ग आणि शिक्षणव्यवस्था.

२.       स्रोतभाषा-लक्ष्यभाषा जोडीगणिक स्वीकृत पर्यायी शब्दांचा जालसंजीवित शब्दसंग्रह.

३.       स्वीकृत पर्यायी शब्दांचा शब्दसंग्रह वाढवत, पुनरीक्षण करून स्वीकारणारी व्यवस्था.

४.       स्रोतभाषा-लक्ष्यभाषा जोडीगणिक, अनुवाद पुनरीक्षक, संपादक, प्रकाशक इत्यादी.

५.       अनुवादशास्त्रविकासास वाहिलेले नियतकालिक, सहभागी अनुवादकांचा कायप्पा गट. 

अनुवाद करावयाच्या साहित्याचे वर्गीकरण

१. कथा, कादंबर्‍या, कविता, चरित्रे, प्रवासवर्णने, अनुभवकथने, नाटके, चित्रपट इत्यादी भाषाविषयक

   साहित्य;

२. अहवाल, जमाखर्च, निवेदने, नोंदी, लेखा परीक्षणे इत्यादी हिशेबात्मक साहित्य;

३. उपकरणाची वर्णने, यंत्रांची परिचयपत्रे, संयंत्रांच्या संचालन संहिता, वस्तूची जाहिरात पत्रके

   इत्यादी तांत्रिक साहित्य;

४. बांधकामातील वस्तूंच्या याद्या, अवजारांच्या याद्या, नोंदणी संदर्भातील कागदपत्रे, कामगारांची

   उपस्थिती पत्रके, वेतन वह्या इत्यादी प्रत्यक्ष घडामोडींच्या लिखित नोंदी;

५. न्यायव्यवहार, संविधान, कायदे, नियम, दंडसंहिता, खटल्यांची इतिवृत्ते आदी साहित्य;

६. महसुली व्यवहार, शासकीय नोंदी, जमीनजुमल्याचे व्यवहार, कर आकारणी, कर वसुली,

   अंदाजपत्रके, पणन-विपणन व्यवहार आणि एकूणच शासनव्यवहार साहित्य;

७. पर्यटन स्थळे, त्यांची वर्णने, तिकिटे, यात्रासंस्था, सहल नियोजने, कार्यक्रमांच्या सूची, प्रवासी

   वेळापत्रके, पर्यटन, स्थलदर्शन इत्यादींदरम्यान आवश्यक असलेल्या व्यवहारांची पत्रके, पुस्तके,

   कार्यक्रमपत्रिका, नियमपुस्तिका, दरपत्रिका इत्यादी साहित्य;

८. विज्ञान, तंत्रज्ञान, त्यांतील प्रगती, संशोधन, त्याचे अहवाल, विकास, भावी वाटचालींचे नियोजन,

   वृत्तांकने, वैज्ञानिकांची चरित्रे, असे सर्वच विज्ञानविषयक साहित्य;

९. नैतिक वर्तन, धर्म, प्रार्थनास्थळे, धर्मसभा, मेळे, मंदिरे, स्तोत्रे, आचारसंहिता इत्यादीबाबतचे

   धर्मविषयक साहित्य;

१०. आरोग्य, सार्वजनिक आरोग्य, आरोग्य व्यवस्था, आयुर्वेद, औषधनिर्मिती, शुश्रुषालये, उपचार

    संहिता, जीवनरक्षक प्रणाली, अपघातधक्क्यातून सावरणार्‍या प्रणाली, प्रतिबंधक तसेच

    आपत्कालीन उपचार व्यवस्था इत्यादींबाबतचे साहित्य.

अनुवाद प्रक्रिया

१. गरजवंत, हौशी अनुवादक, शासनयंत्रणा, व्यापारी आस्थापना इत्यादींच्या अनुवादाबाबतच्या

   अपेक्षा, आवश्यकता आणि गरजा जाणून घेणे.

२. आवश्यक अनुवाद कोण करू शकतील याचा अंदाज घेऊन पात्र व्यक्तीस अनुवादाकरता प्रोत्साहित

   करणे.

३. पात्र व्यक्तीने स्रोत भाषेतील मजकूर नीट समजून घेऊन, आपल्या द्वैभाषिक कौशल्यांचा पुरेपूर वापर करून लक्ष्य भाषेत अनुवाद करणे.

४. तज्ञ व्यक्तीने तो तपासून योग्य करणे, संपादन करणे.

५. केलेला अनुवाद गरजवंतापर्यंत, वेळेत पोहोचवणे.

६. चालू असलेल्या भाषण वा संभाषणाचा वाक्यावाक्यागणिक तत्काळ अनुवाद हवा असल्यास

   अनुवादकास सोबतच राहावे लागते. त्याला अनुवादाची विशेष योग्यता असणे गरजेचे असते.

७. कुशल अनुवादकास अनुवाद करतांना अनुभवणे. प्रात्यक्षिक.

८. संगणक पडद्यावर डाव्या-उजव्या खिडक्यांत स्रोत आणि लक्ष्य मजकूर ठेवून, जालसंजीवित

  अनुवाद करण्याची गतीमान पद्धत.

अनुवादाच्या गरजेची उदाहरणे

१. शासनसंबंधी यंत्रणांतील अर्ज निराळ्या भाषेत असल्याने गरजवंतास रकाने समजून घ्यायचे

   आहेत, अशा प्रकारची गरज. उदाहरणार्थ रेशनकार्डाकरताचा अर्ज, रेल्वे आरक्षणाकरताचा अर्ज,

   पोलिसात हरवल्या, चोरल्याची तक्रार देण्याकरताचा अर्ज.

२. पर्यटनासंबंधातील साहित्याचे ग्राहकानुकूल अनुवाद करण्याची गरज. उदाहरणार्थ महाराष्ट्रात

   गुजरातमधील पर्यटक यावेत म्हणून महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या मराठी पत्रकाचा

   गुजराती अनुवाद आवश्यक ठरतो.

३. मुलीला ’राष्ट्रीय आपत्ती’ विषयावर निबंध लिहायचा आहे. मजकूर विकिपेडियावर इंग्रजीत

   उपलब्ध आहे. त्याचा मराठीत अनुवाद करण्याची गरज.

४. महाराष्ट्र शासनाने इंजिनिअरिंगचे शिक्षण मराठीतूनही उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याने

   इंग्रजी पाठ्यपुस्तकांचा मराठीत अनुवाद करण्याची गरज.

५. कोल्हापूरचा गूळ व्यापारी ऑस्ट्रेलियात गूळ निर्यात करू चाहतो. त्याच्या गुळाची इंग्रजीत

   जाहिरात करण्याची गरज.

६.  कारखान्यात लागणार्‍या जपानी उपकरणाची माहिती जपानी भाषेतून मराठीत आणण्याची गरज.

संदर्भः

१. भाषांतर आणि भाषा, विलास सारंग, मौज प्रकाशन गृह, पहिली आवृत्ती १ फेब्रुवारी २०११, 
   मूल्यः १५०/-, एकूण पृष्ठेः १३४.

२. प्रामाणिकही सुंदरही, करुणा गोखले, राजहंस प्रकाशन, पहिली आवृत्ती ऑगस्ट २०१९,
   मूल्यः २००/-, एकूण पृष्ठेः १४१.

३. अनुवाद कसा असावा - अरुंधती दीक्षित https://anuvad-ranjan.blogspot.com/2021/02/blog-post_22.html


२०२२-०६-२६

पुस्तक परिचयः मोठी तिची सावली


माझ्या मते, लता मंगेशकर यांचे चरित्र लिहू शकेल अशी एकमेव व्यक्ती आहे मीना खडीकर, कारण दीदींसोबत सर्वाधिक काळ घालवलेल्या त्या सर्वात जवळच्या व्यक्ती आहेत. त्यांनीच ते लिहिलेही आहे. भारतरत्न, गानशारदा लतादीदींचे नितांतसुंदर शब्दचित्र त्यांनी उभे केले आहे. हाती धरल्यापासून खाली ठेववत नाही असे हे पुस्तक आहे. लताचे चरित्र, मीना यांचे निरूपण आणि प्रवीण जोशींसारखा शब्दप्रभू शब्दांकनाला, असा समसमा संयोग लाभल्याने पुस्तक खूपच सुरस झालेले आहे. शिवाय, परचुरे प्रकाशनाच्या इतमामाला शोभेलसे मुद्रण, तसेच पुस्तकाचा कागद, आकार आणि प्रकार सारेच देखणे आहे. हवेहवे असे आहे. लताच्या असंख्य मराठी चाहत्यांनी ते अवश्य वाचावे! लताविषयी प्रत्येकासच जाणून घ्याव्या वाटणार्‍या अपार गोष्टींबाबतचे कुतुहल नक्कीच शमेल अशी खात्री या पुस्तकाबाबत देता येईल.या पुस्तकाला गुरुदेव शंकर वासुदेव अभ्यंकर यांची सुरेख प्रस्तावना आहे. पुस्तकाची सम्यक ओळख कशी करून द्यावी याचा तो जणू वस्तुपाठच आहे. हे पुस्तक जेवढे सुंदर आहे तेवढीच ही प्रस्तावनाही सुंदर आहे. वाचनीय आहे.

कस्तुरी मृगाला क्वचितच याची जाणीव असते की, आपल्यापाशी कस्तुरी आहे. मात्र काही विरळ व्यक्ती अशी असतात, ज्यांना हे माहीत असते की, आपल्यापाशी काय आहे, ईश्वराने आपल्या पदरात काय बांधले आहे. त्या व्यक्ती असतातही लोकोत्तर आणि त्यांना सर्वकाळ हे माहीतही असते की आपण लोकोत्तर आहोत. त्या सर्वसामान्यांसारख्या वागत नाहीत आणि अलौकिक वागूनच, अलौकिक ख्याती प्राप्त करत असतात. लता मंगेशकरही त्यातीलच एक आहेत. नरेंद्र मोदीही त्यातलेच आहेत. बाबा रामदेवही त्यातलेच आहेत आणि योगी आदित्यनाथही त्यातलेच आहेत.

आसेतुहिमाचल पसरलेल्या आर्यावर्तातच नव्हे तर संपूर्ण अवनीतलावर ज्यांना सारेच ओळखत असतात, किमान त्यांचे गाणे ऐकल्यावर ज्यांची ओळख पटतेच पटते अशा आहेत लतादीदी. त्या सगळ्यांच्या ओळखीच्या गायिकेच्या, माणूस म्हणूनच्या जीवनात, दार किलकिले करून पाहण्याचे कुतुहल तर प्रत्येकातच असते. त्या कुतुहलपूर्तीस अंजाम देण्याकरताच जणू हे पुस्तक मीनाताईंनी लिहिले आहे. सुमारे दोनशे पानांच्या पुस्तकात हे सारे सामावणे खरे तर अवघडच आहे, मात्र ही साठा उत्तरांची कहाणी त्यांनी पाचा उत्तरांत लीलया सुफळ संपूर्ण केलेली आहे. मला आवडली आहे. तुम्हालाही आवडेल असा विश्वास वाटतो.

मीनाताई लिहितात, “आम्ही पाचही भावंडे लहानपणापासून संगीतक्षेत्र इतक्या जवळून पाहत आलो की, त्याबाहेर काही जग असते हे आम्हाला जणू ठाऊकच नव्हते. संगीत हेच आपले कार्यक्षेत्र आहे हे ठरूनच गेल्यासारखे होते. लहान मुले अंगणात खेळतात तसे आम्ही नाटक कंपनीच्या आवारात वाढलो. बाबांच्या जलशांत बागडलो. नंतर दीदीच्या रेकॉर्डिंगला जाऊन तिथलाही आनंद मनसोक्त लुटला. दीदीचा हात धरून आम्हीही सारेजण याच क्षेत्रात आलो, रमलो. घरात येणारी सून कोण असणार यावरही एकमत झाले होते. दामुअण्णा मालवणकरांची मुलगी. दामुअण्णा बाबांच्या बलवंत संगीत मंडळीत होते. बाबांचे मोठेपण त्यांनी जवळून पाहिलेले होते. आमच्या कुटुंबाची त्यांना जवळून माहिती होती. बाबांच्या अखेरच्या काळापर्यंत त्यांच्याशी एकनिष्ठ राहणारी जी मोलाची माणसे होती, त्यातलेच होते दामुअण्णा मालवणकर. स्वतः फार मोठे कलाकार. नाट्य आणि चित्रपट क्षेत्रांत त्यांचा लौकिक होता. स्थळाची माहिती काढायचा काही प्रश्नच नव्हता. वधूपरीक्षा वगैरे नावालाच.”

अशा प्रकारे निवडलेल्या या सुनेची मला मात्र एके दिवशी अवचितच ओळख झाली. मी एका गाण्याचा अनुवाद करत होतो. गाणे होते १९६३ सालच्या गृहस्थी सिनेमातले, ’जीवन ज्योत जले’. भारती मालवणकर आणि निरुपा रॉय यांच्यावर चित्रित झालेले हे गाणे ऐकायला नादमधुर आणि श्रवणीय तर आहेच मात्र पहायलाही नेत्रसुखद आहे. हे माझ्या आवडत्या गाण्यांतले एक आहे. https://anuvad-ranjan.blogspot.com/2021/11/blog-post_30.html. तर सांगायचा मुद्दा हा की, हृदयनाथ मंगेशकरांची जीवनसंगिनी त्या पाचही मंगेशकर भावंडांत कोंदणात हिरा दिसावा एवढी चपखल बसणारीच आहे.

मराठी मुलीने, आपल्या मराठी बहिणीचे अलौकिक चरित्र सांगतांना तिला ’दीदी’ अशी हाक हिंदीत का बरे मारावी! मीनाताई म्हणतात दीदी हा हिंदी शब्द, ’दादा’ या मराठी शब्दाचे स्त्रीरूप असावा. कर्त्या दादाने एकत्र कुटुंबाचा प्रतिपाळ करावा, तसाच दीदींनी मंगेशकर कुटुंबाचा प्रतिपाळ केला. त्यामुळे शुद्ध मराठमोठ्या घरादाराने ’दीदी’ या हिंदी शब्दास मराठी भाषेत सन्मान मिळवून दिला.

मीनाताई म्हणतात, “दीदीने ’आनंदघन’ या नावाने संगीतकार म्हणून बरंच काम केलेले आहे. या आनंदघन नावाचे रहस्य काय असे बरेचजण विचारतात. या नावामागे तिच्या भाचरंडांचे प्रेम आहे. आशाच्या मुलाचे नाव आनंद आहे. त्याच्यावर दीदीचा विशेष जीव. आनंदघन हे नाव त्याच्या नावावरून घेतले आहे. घरात आनंदचे खास लाड व्हायचे. त्याला आवडायचे म्हणून दीदी स्वतः कोथिंबिरीचे मटण करून खायला घालायची. पुढे भालजी पेंढारकरांनी ’योगेश’ हे नाव कवी म्हणून स्वीकारले ते माझ्या मुलाच्या नावावरून”.

संगीतकार म्हणून लतादीदींच्या कर्तबगारीच्या आठवणी सांगतांनाच, मीनाताईंनी पंडित दीनानाथ मंगेशकरांची एक आठवण अशी दिलेली आहे की, “परंपरेने चालत असलेल्या चालींत बाबांनी स्वतःच्या प्रतिभेने बदल केले होते. त्यांनी मानापमानातल्या गाण्यांच्या चाली बदलल्या होत्या तेव्हा किती गहजब उठला होता. पण नंतर त्याच चाली रूढ झाल्या. अधिक अर्थवाही म्हणून मान्यता पावल्या. याला कारण म्हणजे बाबांचा संगीतकार म्हणून असलेला वकूब. शब्दांची आणि सुरांची समज.” लताबद्दल त्या म्हणतात, “ती चित्रपटातला प्रसंग समजून घेते आणि केवळ एकच सूर धरून ठेवून हातात गाण्याचा कागद घेऊन ती संपूर्ण चाल सलग पूर्ण करते. ती चाल करते असे म्हणण्यापेक्षा तिला चाल स्फुरते. स्त्रियांना जात्यावर ओवी स्फुरावी तशी. पण तिच्या चाली सहज सुचलेल्या असल्या तरी सहज गाता मात्र येत नाहीत. त्या लोकप्रिय असल्या तरी उथळ नसतात. शब्दाची मोडतोड नाही, अकारण हेल नाहीत, कृत्रिमता तर नावालाही नाही. त्यांच्यामागे दीदीचे केवळ स्वरच नाही, तर संस्कारही उभे असतात, त्या संस्कारांतला बाळबोधपणा पेलणे फार अवघड. अस्सल मराठमोळी निरागसता जपणेही कठीणच.”

मराठा तितुका मेळवावा चित्रपटाविषयीची एक आठवण त्या अशी सांगतात की, “ अखेरचा हा तुला दंडवत या गाण्यात दीदीला दर्‍याखोर्‍यांमध्ये घुमणार्‍या आवाजाचा परिणाम हवा होता. तिने ’तुला दंडवत’ असे गायिले की पाठोपाठ तिच्याच आवाजाचे प्रतिध्वनी उमटावेत अशी कल्पना होती. पण असा परिणाम साध्य करण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान तेव्हा उपलब्ध नव्हते. मग तिने मला आणि उषाला तिच्या मागे थोड्याथोड्या अंतरावर गायला उभे केले. तिने ’तुला दंडवत’ असे गायिले की आम्हीही ते शब्द तिच्या पाठोपाठ तालात गायचो. आजही ती रेकॉर्ड ऐकतांना तो तिचाच प्रतिध्वनी वाटतो. आम्ही आहोतच दीदीचे प्रतिध्वनी.”

मीनाताई सांगतात, “दीदी नेमक्या शब्दांत योग्य भाव व्यक्त करणारी लेखिका आहे. तिच्या लेखनात काव्यदृष्टी असते तसाच तार्किक परखडपणाही असतो. तिला अतिशय समृद्ध आणि डौलदार मराठी अवगत आहे. तिचे वाचनही साक्षेपी आहे. नव्याजुन्या अनेक लेखकांची पुस्तके तिने रसज्ञपणे वाचलेली आहेत. त्यातले संदर्भ तिच्या जिभेवर असतात. संतकवींपासून आधुनिक कवी आणि वेगवेगळे शायर यांच्या रचनाही तिला मुखोद्गद आहेत. दीदी मराठीबरोबरच इतरही अनेक भाषा मातृभाषेच्या सफाईने बोलू शकते. त्यातल्या सौंदर्यस्थळांची तिला उत्तम जाण आहे. बांगला भाषेचे तिला पहिल्यापासूनच आकर्षण आहे. रविंद्रनाथ टागोर, शरदबाबू, विवेकानंद तिने मुळातून अभ्यासले आहेत. मामा वरेरकरांनी केलेला शरदबाबूंच्या साहित्याचा अनुवादही तिने वाचलेला आहे. बंगालची भाषाच नव्हे तर बांगला जीवनशैलीही तिला आकर्षित करते.”

भालजी पेंढारकर यांनी १९५२ साली निर्मिलेल्या ’छत्रपती शिवाजी’ चित्रपटातील ’आज शिवाजी राजा झाला’ गाणे चित्रित करतांना लतादीदी.

लता दीनानाथ मंगेशकर

जन्मः २८ सप्टेंबर १९२९ इंदौर, मृत्यूः ६ फेब्रुवारी २०२२, मुंबई.

संदर्भः

मोठी तिची सावली, मीना मंगेशकर-खडीकर, शब्दांकनः प्रवीण जोशी, परचुरे प्रकाशन मंदिर, तिसरी आवृत्तीः २८ सप्टेंबर २०२०, रु.२०४/-, एकूण पृष्ठे-२३१.

२०२२-०६-१३

हिंदू साम्राज्य दिवस

हिंदू साम्राज्य दिवस [१]
नरेंद्र गोळे २०२२०५१९ 

संघ प्रार्थनेचा मराठी अनुवाद [२]

नमू मायभूमी तुला प्रीय माते, सुखी मी करावे तुला हिंदुभूमे ।
शिवे पुण्यभूमे तुझ्याकारणे गे, पडो देह माझा नमू मायभू हे ॥१॥ 

प्रभो शक्तिशाली, मुले हिन्दुभूची, असू सिद्ध आम्ही तुझ्या अर्चनेसी ।
तुझ्या कार्यि आहोत बांधील आम्ही, कृपा राहु दे कार्य ते साधण्यासी ॥२॥ 

न हारू जगाला अशी शक्ति दे तू, जगा नम्रता ये, असे शील दे तू ।
असे मार्ग काट्याकुट्यांचा कसाही, जरी ऐकलेला, भला, घेतला मी ॥३॥ 

समुत्कर्ष होवो, नको श्रेय त्याचे, अशा जाणिवेने स्फुरो वीरवृत्ती ।
न हो क्षीण, ऐसीच दे ध्येयनिष्ठा, सदा जागती राहु दे अंतरी ती ॥४॥ 

विजेती असो संहता कार्यशक्ती, सदा धर्म राखावया सिद्ध हो जी ।
महा वैभवी राष्ट्र नेण्यास तू हे, असू दे कृपा खूप सामर्थ्यदा ती ॥५॥

ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी, शनिवार [३], ६ जून १६७४ रोजी, शिवाजी राजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. शिवाजी महाराजांनी त्या दिवसापासूनच ’राज्याभिषेक शक’ सुरू केला. राज्याभिषेकाचा दिवस ’राज्याभिषेक शका’चा पहिला दिवस होता. १९७४ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शिवाजी राजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा ३००-वा वर्धापन दिन भारतभर साजरा केला. बहुधा तेव्हापासूनच, संघ हा उत्सव सार्वत्रिकरीत्या साजरा करत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना २७ सप्टेंबर इ. स. १९२५ विजयादशमीचे दिवशी, डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार यांनी, त्यांच्या नागपूर येथील निवासस्थानी केली. अगदी स्थापनादिवसापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय नागपूर येथे आहे. संघटनेचा मूळ उद्देश हिंदूधर्मीयात सशक्त संघटन निर्माण करण्याचा आहे. काय आहे आपला हिंदू धर्म? एका शब्दात सांगायचे तर हिंदू धर्म म्हणजे ’सहिष्णुता’. परधर्म सहिष्णुता, परकर्म सहिष्णुता, परवर्म (वर्म म्हणजे उणीव) सहिष्णुता, परमर्म (मर्म म्हणजे गुपित, रहस्य) सहिष्णुता. त्यामुळे ज्याला अशी सहिष्णुता तत्त्वतः मान्य आहे तो तर हिंदूच ठरतो. ज्या व्यक्ती किंवा जे धर्म सहिष्णुता मानत नाहीत, ते हिंदू नाहीत. अशा ज्या लोकांना किंवा धर्मांना, आपल्याच मायभूमीची इतर लेकरे शत्रू भासतात, वस्तुतः तेच शत्रुत्व नाहीसे करण्याची गरज आहे. सहिष्णुता म्हणजे हिंदुत्व, जेव्हा सर्वव्यापी होईल तेव्हाच ’विश्व स्वधर्म सूर्यास’ पाहू शकेल. 

त्यामुळे, हिंदू समाजाचे एकत्रिकरण हे संघाचे मुख्य उद्दिष्ट आहे. भारतीय म्हणजे हिंदू ही संघाची व्यापक भूमिका आहे. हिंदू समाज हा पुरातन काळापासूनच अनेक वर्ण, जाती, पंथ यांत विभागला गेला आहे. प्रत्येक जात स्वतःला इतरांपेक्षा वेगळी समजते. मात्र कोणत्याही प्रकारचा वर्णद्वेष तसेच जातिभेदाला थारा नसलेल्या आणि सर्वच जातीपंथांमध्ये एकोपा असलेला हिंदू समाज असणे, हे संघाला अपेक्षित आहे. हे साध्य करताना अनिष्ट प्रथांचे उच्चाटन करून, इष्ट हिंदू परंपरांचे संवर्धन व्हावे, असे संघाचे धोरण आहे. भारतीयत्व, राष्ट्रीयत्व, हिंदुत्व या गोष्टींचा सर्वसामान्यांमध्ये अभिमान जागृत करणे आणि भारत देशाला परम वैभवाकडे नेणे हे आपले कर्तव्य आहे, असे संघकार्यकर्ते समजतात. काळाच्या ओघात विभाजित झालेल्या हिंदुस्थानचे एकत्रीकरण होऊन परत अखंड भारताची निर्मिती व्हावी अशीही संघाची मनीषा आहे. ’पृथिव्यां समुद्रपर्यंताया एकराळिति’ म्हणजे समुद्रापर्यंतच्या सर्व भूभागावर सहिष्णू हिंदूंचे एकछत्री साम्राज्य स्थापन व्हावे अशी कामना तर आपण सारे ’मंत्रपुष्पांजली’च्या माध्यमातून रोजच करत असतो.

या राष्ट्राला पुन्हा परम वैभवाप्रत घेऊन जाण्यासाठी संघाच्या विविध क्षेत्रात काम करणार्‍या संघटना आहेत. वनवासी क्षेत्रासाठी वनवासी कल्याण आश्रम, विद्यार्थी हितासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कामगारांकरता भारतीय मजदूर संघ, महिलांकरता राष्ट्र सेविका समिती, राजकारणाकरता पूर्वीचा जनसंघ, आत्ताचा भारतीय जनता पक्ष इत्यादी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दैनंदिन शाखाच संघाचा पाया आहेत. शाखांमध्ये स्वयंसेवक दैनंदिन हजेरी लावतात. सरसंघचालक हे या सर्व शाखांचे अप्रत्यक्षपणे नियमन करतात. साप्ताहिक सांघिके, विद्यार्थ्यांसाठी सांघिके अशा भेटीही आठवड्यातून एकदा होतच असतात. संघाचे प्रथमवर्ष, द्वितीयवर्ष, तृतीयवर्ष शिक्षा वर्ग अनुक्रमे प्रत्येक प्रांतात, प्रत्येक क्षेत्रात आणि सर्व भारताकरता नागपूर येथे होत असतात. संघातर्फे अनेक निवासी शिबिरेही आयोजित केली जातात. सध्या संपूर्ण भारतात लाखो शाखा लागतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात दरसाल सहा उत्सव साजरे केले जातात. वर्षप्रतिपदा, हिंदू साम्राज्य दिन, गुरुपौर्णिमा, रक्षाबंधन, विजयादशमी आणि मकर संक्रमण. हे सर्व उत्सव हिंदू तिथींनुसार साजरे केले जातात. चंद्र आणि सूर्याच्या विशिष्ट अवस्थांशी ते जोडलेले आहेत. यातील हिंदू साम्राज्य दिन वगळता इतर सर्व उत्सव पारंपारिक हिंदू उत्सव आहेत. ’हिंदू साम्राज्य दिन’ या उत्सवाचा अंतर्भाव मात्र काही वेगळा विचार करून करण्यात आलेला आहे.

संघाची स्थापना इंग्रजांच्या राज्यातच १९२५ साली करण्यात आलेली होती. शेकडो वर्षांच्या परदास्यातून हिंदू विजिगिषेला मरगळ आलेली होती. दरम्यान हिंदूंना ताठ मानेने जगता येईल, हिंदू म्हणवून घेण्यात अभिमान वाटेल असे राज्य स्थापन होणे गरजेचे आहे, हे केवळ शिवाजी महाराजांनीच जाणले होते. ते साम्राज्य असावे अशी भावनाही त्यापाठी होती आणि ते सिद्ध करण्याकरता शिवाजी महाराजांनी केलेले प्रयासही अपार यशस्वी ठरलेले होते. केवळ समुद्रपर्यंतच्या साम्राज्याचीच नव्हे, तर त्यांनी समुद्रमार्गे जगावर राज्य करण्याची उमेदही बाळगली होती. त्याकरता सेनासरखेल कान्होजी आंग्रे यांच्या अधिपत्याखाली नौदलाची स्थापना केली होती. अनेक सागरी किल्ले म्हणजे जंजिरे, शिवाजी महाराजांनी आपल्या अल्पशा कारकीर्दीतच निर्माण केले होते.

संघाने ’हिंदू साम्राज्य दिन’ समारोह साजरा करायचे का ठरवले हे सांगतांना, २०१० सालच्या ’हिंदू साम्राज्य दिन’ [४] समारोहाच्या भाषणात माननीय सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी, ’शिवसंभव’ नाटकातील एक प्रसंग सांगितला आहे. शिवाजीच्या वेळी डोहाळे लागलेले असतांना जिजामाता सांगतात, “मला वाटते आहे की, मी वाघावर स्वार व्हावे. मला दोन नाही तर अठरा हात असावेत. एकेका हातात एकेक अशी मी अठरा शस्त्रे धारण करावीत. पृथ्वीतलावर जिथे जिथे राक्षस असतील तिथे तिथे मी त्यांचा निःपात करावा. छत्रचामरादिसहित सिंहासनावर बसून मी स्वनामाचा जयघोष करवावा.” सामान्यतः हे ऐकून किती आनंद झाला असता, की आता होणारे बालक अशा विजिगिषू वृत्तीचेच असणार. मात्र तेव्हा त्यांच्या मैत्रिणी म्हणाल्या, “तू हा काय विचार करते आहेस? तुला माहीत नाही का की, एका राजाने असे केले होते, तेव्हा त्याचे किती हाल झाले? आपण हिंदू आहोत. सिंहासनावर कसे बसायचे? हे तर भिकेचे डोहाळे आहेत!” म्हणजे हिंदूंनी हाती शस्त्र घेऊन पराक्रमाची इच्छा करणे, हे त्यावेळी भिकेचे लक्षण मानले जात होते. हिंदूंना या मनस्थितीतून बाहेर काढण्याकरता, राज्याभिषेकप्रसंगीचा अपार आत्मविश्वास पुन्हा प्राप्त करवून देण्याकरता, संघाने ’हिंदू साम्राज्य दिन’ समारोह साजरा करायचे ठरवले. त्या अवस्थेचे आणि शिवरायांच्या प्रयासाचे सुंदर वर्णन त्यांचे गुरू समर्थ रामदासस्वामींनी केलेले आहे. ते म्हणतातः

तीर्थक्षेत्रे मोडिली।ब्राम्हणस्थाने भ्रष्ट झाली।
सकळ पृथ्वी आंदोळली। धर्म गेला ॥

देव धर्म गोब्राम्हणकरावया संरक्षण ।
हृदयस्थ झाला नारायण । प्रेरणा केली ॥

उदंड पंडित पुराणिक । कवीश्वर याज्ञिक वैदिक
धूर्त तार्किक सभानायक । तुमच्या ठायी ॥

या भू मंडळाचे ठायी। धर्मरक्षी ऐसा नाही।
महाराष्ट्र धर्म राहिला काही। तुम्हा कारणे ॥

आणिकही धर्मकृत्ये चालती । आश्रित होउन कित्येक राहती । 
धन्य धन्य तुमची कीर्ती । विश्वी विस्तारली ॥

कित्येक दुष्ट संहारिले । कित्येकासी धाक सुटले ।
कित्येकासी आश्रय जाहले । शिवकल्याण राजा ॥ 

याप्रमाणे प्रजेस निर्भय करणारा, अभिषिक्त हिंदू सम्राट, अर्वाचीन भारतात दुसरा कुणीही नाही. त्यांना राज्याभिषेक झाला त्याच दिवशी त्यांनी राज्याभिषेक शकही सुरू केला. म्हणून त्यांना ज्या दिवशी राज्याभिषेक झाला, त्या दिवसास हिंदू साम्राज्य स्थापनेचा दिवस मानून तो साजरा करावा असे संघाने ठरवले. त्यानिमित्ताने हिंदूंच्या संस्कृतीची, सहिष्णुतेची, ’वसुधैव कुटुंबकम्‌’ वृत्तीची आणि विजिगिषू परंपरेची चर्चा होते आणि ती करणार्‍यांवर हिंदुत्वाचे उत्तम संस्कारही होत असतात. सुसंस्कृत, सुसंघटित, शिस्तबद्ध, ऊर्जस्वल, वर्चस्वल, प्रगतीपथावर अग्रेसर असलेला पूर्ण विकसित हिंदू समाज निर्माण व्हावा हेच तर संघाचे ईप्सित आहे.

१९२७-च्या नागपुरातील मुसलमानांच्या दंग्यानंतर डॉक्टर हेडगेवार म्हणाले होते की, “आपापसातले सारे कृत्रिम व वरवरचे मतभेद पुसून टाकून, सारा हिंदू समाज एकत्वाच्या व प्रेमाच्या भावनेने, ’हिंदू जातीची गंगा, बिंदू आम्ही तिचे सांगा’ अशा भावनेने उभा राहिला, तर जगातील कोणतीच शक्ती हिंदूंकडे वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही!” [५]

हिंदूंमधे प्रबळ संघटना असावी, हिंदूंतली विघटना अवघी टळावी ।
हिंदूत्ववर्धन घडो म्हणुनी तदर्थ, तू संघ संघ जप मंत्र निजांतरात ॥ - वसंततिलका

संदर्भः

[१] भगवा ध्वज (गुरुपौर्णिमा) https://vskbihar.com/rss-guru-purnima/

[२] संघ प्रार्थनेचा मराठी अनुवाद  https://anuvad-ranjan.blogspot.com/2019/10/blog-post.html

[३] शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची शिवचरित कथनमाला, इंद्रायणी साहित्य, २ ऑक्टोंबर १९९७, रु.१६०/, एकूण पृष्ठे-४६८ पैकी पृ.४६०.

[४] राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संकेतस्थळावरील २०१० सालचे मोहन भागवत यांचे व्याख्यान https://www.rss.org/hindi/encyc/2017/6/7/hindu-samrajya-din-utsav-mohan-bhagwat.html (या ठिकाणी, नाटकाचे लेखक राम गणेश गडकरी आहेत असे म्हटलेले आहे. वस्तुतः हे नाटक वा.वा.खरे यांनी लिहिलेले आहे.)

[५] डॉ. हेडगेवार, ना.ह. (नाना) पालकर, भारतीय विचार साधना, पुणे, आवृत्ती-५, ऑक्टों.-२०००, रु.१२०/-, एकूण पृष्ठे-४४६ पैकी पृष्ठ क्र.१६६.