संदर्भः राणी नाइकीदेवी, अपराजिता, मेजर मोहिनी गर्गे-कुलकर्णी, मिहाना पब्लिकेशन्स, प्रथमावृत्ती १५ सप्टेंबर २०२४, किंमत रु.७५०/-, पृष्ठे ८३६, पृष्ठ-१४७
गोव्याचे कदंबराजे महामंडलेश्वर परमर्दीदेव (इसवीसन ११४७-४८) यांची मुलगी नाइकीदेवी हिचा विवाह, आन्हिलगडचे राजे, चालुक्य वंशातील अजयपाल यांचेसोबत झाला. इसवीसन ११७२ साली अजयपाल सिंहासनारूढ झाले. इसवीसन ११७५ साली घातपाताने त्यांचा मृत्यू ओढवला. त्यांना मूलराज नावाचा लहान मुलगा होता. त्यास गादीवर बसवून नाइकीदेवीने कारभार हाती घेतला. ११७८ साली ही परिस्थिती लक्षात घेऊन विजय मिळवण्यास सोपा देश पाहून महम्मद घोरीने मुलतानहून आन्हिलवाडा या चालुक्यांच्या श्रीमंत राजधानीकडे कूच केले. ऊंच नावाच्या गावी तो येऊन पोहोचला. माऊंट अबूजवळील सिरोही जिल्ह्यातील कायदरा येथून त्याने राणी नाइकीला निरोप पाठवला की, “तू तुझ्या राज्याची संपत्ती, स्त्रिया आणि तुझ्या मुलांसह स्वतःला माझ्या स्वाधीन कर, म्हणजे मी तुझ्या राज्यावर हल्ला करणार नाही. मोठा रक्तपात टळेल. स्त्रियांच्या हातात तलवार शोभत नाही. स्त्रिया तर जनानखान्याची शोभा असतात.”
इथे राणीने मोठा पवित्रा घेतला. घोरीला पुढे सरकू न देता माऊंट अबूच्या पहाडातच थोपवण्याकरता राणीने त्याचा प्रस्ताव बिनशर्त मान्य असल्याचे त्यास कळवले. घोरीला आनंद झाला. त्याला अशीच हुलकावणी देणे गरजेचे होते.
गुजरातचे हिंदू सैन्य आपणहून पुढे सरकत, सहानुभूतीदार अन्य हिंदू राजांची मदत घेत, अबू पहाडाच्या आजूबाजूने पुढेपर्यंत चालून गेले. तेथे राणीने त्या प्रसंगास अत्यंत धैर्याने तोंड दिले. छोट्या राजपुत्रास हिंदू सैन्यासमोर आणून सांगितले की, मी हा बालराजा तुमच्या ओटीत घालत आहे. तुम्ही याचे प्राणपणाने रक्षण करा. मग छोट्या मूलराजाला पाठीशी बांधून राणी सैन्यासह घोरीकडे जाण्याकरता झंझावातासारखी पुढे निघाली. अनेक मांडलिक राजांना तिने सोबत घेतले. घोरीच्या सैन्यास घेरले. पडलेल्या मुसळधार पावसाची मदत घेतली. गनिमी काव्याने शत्रूस त्रस्त केले. अंतिमतः घोरीचे सैन्य अक्षरशः कापून काढत राणीने रणसंग्राम जिंकला. घोरीच्या सैन्याची पार धूळधाण उडाली. पळता भुई थोडी झाली. घोरी ससैन्य माघारी फिरला. राणीच्या सैन्याने त्याचा पाठलाग करून त्यास राज्याच्या सीमेच्या पार पलीकडे हाकलून दिले. त्यानंतर मग घोरीने पुन्हा कधीही गुजरातवर हल्ला केला नाही.
ही आणि यांसारख्या चिरप्रेरणादायी कहाण्यांनी भरपूर असलेले ’अपराजिता’ हे पुस्तक सगळ्या देशाभिमानी लोकांनी अवश्य वाचावे आणि ’जया’चा खरा इतिहास जाणून घ्यावा!
महम्मद घोरीचा सपशेल पराभव
हिंदू सैन्या जयाचा, मुकुट गवसला, नाइकी जिंकली ती।
बोला होवो तियेचा, विजय, उजळु दे, हिंदू ऐक्याची नांदी॥धृ॥
गोव्याची राजकन्या, परिणत वधु ती, झालि चालुक्यराणी
दुर्दैवाने तियेच्या, अजय पति तिचा, घातपाती निमाला।
छोट्याशा मूलराजा, तखति बसवुनी, नाइकी राज्य हाके
जोखूनी या स्थितीला, सहज विजय तो, चिंतुनी घोरि आला॥१॥
पोहोचूनी ‘ऊंच’ गावी, लिहत तिजसि तो, ’राणि ये तू म्हणाला
शोभे स्त्री ती जनानी, तुज न खडग ते, शोभते, टाळ हिंसा’।
राणी ती स्वाभिमानी, हलकट रिपुला, ’थांब येते म्हणाली’
घोरी आनंदि झाला, नकळत थबके, वाट पाहे तियेची॥२॥
हिंदूंचे सैन्य सारे, जमवुन पुढती, ठेवि त्यांचे समोरी
छोट्या राजास राणी, विनवत सकला, याचि रक्षा करा रे।
राजे मैत्रीतलेही, जुळवत पुढती, वाट चाले अबूची
कावा मोठा गनीमी, करत करकचे, पाश चोहीकडूनी॥३॥
आबूच्या त्या पहाडी, उमजत सगळे, मार्ग राणीस होते
घोरीचे सैन्य मोठे, अलगद अडके, सापळा होत भूमी।
उंदीरा मांजरीशी, चिवडत दमवी, शत्रुसैन्यास राणी
केले ते ध्वस्त हेतू, रसद अडवली, केलि भू त्यास थोडी॥४॥
पाठीशी मूलराजा, अवचित पडत्या, पावसाच्या कृपेने
टाके छापे रिपूला, छळत छळत ती, नेई लोटीत पाठी।
हानी सोसे अती तो, कळत न तया, शत्रु येई कुठूनी
सोडूनी जिंकणे हे, अवजड सगळे, सैन्य पाठीच धावे॥५॥
राणीची झेप भारी, तळपत समरी, शत्रुला हाकले ती
हिंदू सैन्यास येई, नकळत विजयी, चेव देशाभिमानी।
घोरीला पाठि जाता, पुरत न भुमिही, प्राण कंठास येई
धक्का तो जीविताचा, धरत मग पुन्हा, घोरी आलाच नाही॥६॥
नरेंद्र गोळे २०२५०४०६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा