आज गांधी जयंती. बरोब्बर अठ्ठावीस
वर्षांपूर्वी म्हणजे १९८४ च्या महात्मा गांधी जयंतीस लिहिलेल्या, प्रो.मॅक्स
मुल्लर ह्यांच्या चरित्राच्या [१] प्रस्तावनेत विख्यात संस्कृत विद्वान श्रीधर
भास्कर वर्णेकर, लिहितात की, भारतीय धर्म आणि तत्त्वज्ञान यांच्या प्रभावामुळे
प्राचीन काळात येथील जनतेच्या शील-चारित्र्याचा स्तर किती उंचावला होता,
त्याबाबतचे काही परदेशी विद्वानांचे उद्गार मोठे स्फूर्तीप्रद आहेत. त्याकरता
त्यांनी पुढील दाखले दिलेले आहेत.
१.
इसवी सनाच्या दुसर्या शतकातील ग्रीक इतिहासकार एरियन
म्हणतात, “असत्य भाष्य करणारा भारतीय कोणीही कोठेही पाहिला नसेल.”
२.
स्ट्रेबो नावाचा दुसरा इतिहास लेखक म्हणतो, “भारतीय लोक इतके
चारित्र्यसंपन्न आहेत की, ते घराला कुलूप लावत नाहीत. त्यांच्या आर्थिक व्यवहारात
लिखापढी नसते.”
३.
चीनचा प्रसिद्ध प्रवासी पंडित ह्यू-फू-त्सु (युवान च्वांग
किंवा ह्यु-एन-त्संग म्हणून प्रसिद्ध असलेला) म्हणतो, “सत्यनिष्ठा आणि
निष्कपटीपणा याबाबतीत भारतीय लोक सर्वश्रेष्ठ आहेत. त्यांच्या राजकीय व्यवहारात
हेच गुणवैशिष्ट्य प्रकर्षाने जाणवते. ते अन्यायाने द्रव्याचा अपहार करीत नाहीत.”
४.
तेराव्या शतकात भारतामध्ये आलेला सयामचा प्रतिनिधी सुवे
म्हणतो, “हिंदु लोक अत्यंत
सरळ, विश्वासपात्र, सत्यनिष्ठ आणि न्यायप्रवण आहेत. ते शपथ कधीही मोडत नाहीत.
दुष्टपणा आणि फसवेगिरी यांचा लेशमात्र त्यांच्या ठिकाणी नाही.”
५.
याच सुमारास भारतात आलेला मार्को पोलो हा आपल्या
प्रवासवृत्तांतात म्हणतो, “ब्राम्हण लोकांसारखे सत्यनिष्ठ, विश्वासपात्र लोक जगात
कोठेही नाहीत. लाभासाठी आणि लोभापायी ते कधीही खोटेपणा करीत नाहीत.”
६.
प्राचीन काळातील सुसंस्कृत हिंदु समाजाच्या चारित्र्याचे
असे महिम्नस्तोत्र अबुल-फाजल-कमालुद्दिन समरकंदी, मिल, स्लीमन इत्यादी अनेक परदेशी
विद्वानांनी आणि प्रवाशांनी परोपरीने गायिलेले आहे.
७.
प्रसिद्ध संस्कृत विद्वान मॅक्स मुल्लर म्हणतात, “विद्येच्या
क्षेत्रात असा एकही विभाग नाही की ज्यामध्ये भारतीयांनी नवचैतन्य आणि नवतेज
निर्माण केलेले नाही. संस्कृत वाङमयाच्या प्रकाशाने जगातील सर्व धर्म व सर्व पुराणकथा यांना
एक आगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे. .... मानवाच्या इतिहासामध्ये वेदवाङमयाने जे
कल्याणकार्य केले आहे ते इतर कोणत्याही ग्रंथाने केलेले नाही. ... ज्या कोणाला
आपल्या बुद्धीचा विकास व्हावा असे वाटत असेल त्याने वेदाभ्यास अवश्य करावा.”
८.
डॉक्टर हसलर या अमेरिकन पंडिताने महाभारत प्रथमच वाचले
तेव्हा त्याच्या लोकोत्तर वैशिष्ट्याने मोहित होऊन त्याने लिहिले, “असा लोकोत्तर
ग्रंथ मी कोठेही पाहिला नाही. याच्या वाचनाने माझे हृदय जसे मोहित झाले तसे इतर
कोणत्याही ग्रंथाच्या वाचनाने कधी झाले नाही. आत्मचिंतनासाठी मी ग्रंथातील
हजारापेक्षा अधिक सूक्तरत्ने गोळा करून ठेवलेली आहेत. ... जगताच्या उत्पत्तीविषयी
या ग्रंथात प्रतिपादन केलेले सिद्धांत वाचून या ग्रंथाविषयीचा माझा आदर वृद्धिंगत
झाला.”
स्वतः रामाने रामायणात लक्ष्मणाजवळ
आपल्या मातृभूमीविषयी पुढील जगप्रसिद्ध उद्गार काढलेले आहेत. अपि स्वर्णमयि लंका न मे लक्ष्मण रोचते । जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसि ॥
म्हणजे जरी सुवर्णमय असली, तरी मला लंका आवडत
नाही. जन्मदात्री, मात्रुभू स्वर्गाहूनही महान वाटते.
मग आपण खरे आहोत तरी कसे, आपला देश आहे
तरी कसा? त्याचे वर्णन पुढील संस्कृत काव्यात यथातथ्यपणे केलेले आहे. [२]
शूरा वयं धीरा वयं वीरा वयं सुतराम्।
गुणशालिनो बलशालिनो नयगामिनो नितराम् ॥ ध्रु ॥
गुणशालिनो बलशालिनो नयगामिनो नितराम् ॥ ध्रु ॥
दृढमानसा
गतलालसा प्रियसाहसा सततम् ।
जनसेवका अतिभावुका शुभचिन्तका नियतम् ॥ १ ॥
जनसेवका अतिभावुका शुभचिन्तका नियतम् ॥ १ ॥
धनकामना
सुखवासना न च वन्चना हृदये ।
ऊर्जस्वला वर्चस्वला अतिनिश्चला विजये ॥ २ ॥
ऊर्जस्वला वर्चस्वला अतिनिश्चला विजये ॥ २ ॥
गतभीतयो
धृतनीतयो दृढशक्तयो निखिलाः ।
यामो वयं समराङ्गणं विजयार्थिनो बाला ॥ ३ ॥
यामो वयं समराङ्गणं विजयार्थिनो बाला ॥ ३ ॥
जगदीश
हे परमेश हे सकलेश हे भगवन् ।
जयमङ्गलं परमोज्ज्वलं नो देहि हे भगवन् ॥ ४ ॥
जयमङ्गलं परमोज्ज्वलं नो देहि हे भगवन् ॥ ४ ॥
आपण कसे आहोत? कसे असावे, ह्या
सत्प्रेरणेचा, आदर्शवत् उद्घोष ह्या कवितेत केलेला आहे. आपण आपल्या आदर्शवत्
सनातन समाजजीवनास पुन्हा साकार करू या! त्याकरता ही कविता नक्कीच प्रेरणादायक
ठरेल. खालील दुव्यावर श्राव्य आवृत्तीही अधोभारणास (डाऊनलोड करण्यास) उपलब्ध आहे.
अवश्य ऐका आणि आपल्या आदिम आकांक्षांचा पुनरुच्चार करा!
संदर्भः
१.
“भारतीय मनाचा माणूस: प्रो. मॅक्स मुल्लर”, तारा पंडित,
नवचैतन्य प्रकाशन, प्रथमावृत्ती जुलै २०००, मूल्यः रु.१५०/- फक्त.