प्रवासवर्णन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रवासवर्णन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२०१५-०३-१९

अंदमानी सहल

अंदमान द्विपसमूह भारताचे अविभाज्य अंग आहे. ही आपल्याकरता खरेच आनंदाची गोष्ट आहे. हिंदी महासागरास मिळालेले, हिंदी हे नामाभिधानही कदाचित, ह्याच आपल्या अस्तित्वाचे द्योतक असावे. मात्र, महासागरातील त्याच्या स्थानामुळे, अंदमान आणि निकोबार राज्यात, वर्षाचे बहुतांशी दिवस हवामान ढगाळ, वादळी आणि पावसाळी राहते. धूसर राहते. तापमान जरी मुंबईसारखेच असले तरी, हवामानातील महासमुद्री बेभरवसा, तिथे पुरेपूर भरून राहिलेला आहे. वर्षातले काही दिवसच तिथे वातावरण समेवर येते. निरभ्र वातावरण, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि स्थिरपद, स्वस्थ समुद्र; स्वर्गसदृश हवामान प्रदान करतो. हेच दिवस तिथे पर्यटनास अत्यंत योग्य असतात. अशा दिवसात ज्यांनी तिथे पर्यटन केले, ते त्याची अविस्मरणीय गोडी, विसरूच शकत नाहीत. म्हणूनच अंदमानात पर्यटनास जातांना हवामान पक्षकर असायला हवे ह्यात तिळमात्र संशय नाही. एरव्ही, पर्यटनाचे अनेक दिवस खराब हवामानामुळे गमवावे लागलेले पर्यटक तिथे काही कमी नाहीत! संदर्भः http://www.andaman.climatemps.com/ वरील तक्ता स्वतःहूनच सारी हवामान परिस्थिती स्पष्ट करतो.

ओले दिवस पर्यटनास योग्य समजायचे नसतील, तर फेब्रुवारी अखेर व मार्च महिन्याची सुरूवात हाच मुहूर्त सर्वोत्तम समजायला हवा. ह्याच दिवसात नितळ, ऊबदार, सूर्यप्रकाश आणि कमालीची दृश्यमानताही साथ देत असते. आम्हालाही ह्याच सुवर्णदिवसांत अंदमानात जाण्याची संधी मिळाली हे आमचे सुदैव!

बोरिवलीच्या प्रथमेश टूर्सतर्फेच्या ६ रात्री आणि ७ दिवसांच्या; २५ फेब्रुवारी २०१५ रोजी मुंबईत सुरू होऊन, ३ मार्च २०१५ रोजी मुंबईतच संपणार्‍या सहलीकरता, आम्ही नावे नोंदवली. सकाळी पावणे सहाच्या विमानाने निघून, चेन्नईमार्गे सकाळी साडेदहा वाजता आम्ही पोर्ट ब्लेअरला पोहोचलो. एन.के.इंटरनॅशनल ह्या फिनिक्स धक्क्यानजीकच्या हॉटेलात उतरलो. फिनिक्स धक्क्यावरूनच हॅवलॉक बेटाकरता बोटी सुटतात. नॉर्थ बे आणि रॉस बेटांकरता मात्र अबर्दिन धक्क्यावरून बोटी सुटतात. सुग्रास जेवण झाल्यानंतर दुपारी कॉर्बिन कोव्ह बीचला गेलो. तर संध्याकाळी सेल्युलर जेलमधल्या लाईट अँड साऊंड च्या १८०० च्या शोला. हा शो हिंदीत असतो. ह्यानंतरचा १९३० वाजताचा शो इंग्रजीत असतो. ह्याचे दर माणशी तिकीट ५० रुपये आहे.

कॉर्बिन कोव्ह बीच, बेटाच्या महासागराकडील दिशेला आहे. तिथे आम्ही शहाळ्याचे पाणी प्यायले. शंखशिंपली गोळा केली. फोटो काढले. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माणशी ३०० रुपये दराने चौघे जण स्पीडबोटीतून चक्कर मारून आलो. कॉर्बिन कोव्ह बीच वरून, खुल्या महासागरातील भूशिरावरच्या बेटाकडे आम्ही स्पीडबोटीने निघालो खरे, मात्र नावाड्याने आमची वेव्ह रायडर नावाची बोट, समुद्री लाटांवर अशी काही चढवली की, आपटाआपटीने आमची हाडे खिळखिळी झाली. कधी टोपी उडून गेली, तर कधी कॅमेरा हातातून निसटला! असे वाटत होते की बोट खालच्या दगडांवर आदळते आहे. फुटते की काय, असेही वाटून गेले. थोडे हळू चालव सांगायला तोल सावरायच्या आत, आम्ही बेटानजीक पोहोचलोही होतो. खुल्या सागरात असल्याने, बेटावर उतरायला मात्र मनाई आहे!

संध्याकाळ फारच लवकर होते. पाच वाजताच उजेड कमी होऊ लागलेला होता. साडेपाचच्या सुमारास आम्ही सेल्युलर जेलसमोर जाऊन पोहोचलो. काही फोटो काढले आणि लाईट अँड साऊंड शोला जाऊन बसलो. सात पंखी सेल्युलर जेलच्या मध्य मनोर्‍यानजीक असलेल्या वृक्षराजाच्या साक्षीने कथा गुंफली जाते. अवघड ठरणार्‍या राजकीय कैद्यांना विजनवासात ठेवण्यासाठी, अशा प्रकारच्या तुरूंगाची योजना करणार्‍या ब्रिटिशांच्या बुद्धिने मन स्तिमित होते. जगावर हुकूमत गाजवत असतांना देखील लोकशाहीने, कायद्याच्या राज्याने, प्रशासन चालवितो आहोत असे दाखविण्याच्या त्यांच्या अट्टाहासाखेरीज; ह्या सव्यापसव्याचे काय समर्थन असू शकते. एरव्ही जगातील जेत्यांनी जीतांना नाहीसे करणे; ह्या ’बळी तो कानपिळी’ थाटाच्या पाशवी प्रथेपासून, काळ्यापाण्याची शिक्षा तयार करण्याच्या, मानवी क्रूर प्रथेपर्यंत ते येते ना. शो लक्षात राहील असा, किंवा खूप प्रेरणादायी असा वाटला नाही. मात्र, त्या ठिकाणाच्या प्रखर क्रांतिकारकांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या भूमीने, देशाकरता जगण्याची दुर्दम्य जिज्ञासा मनात पुन्हा उजागर केली.

 दुसरा दिवस पोर्ट ब्लेअर शहरदर्शनाचा होता. सकाळच्या सत्रात आम्ही सेल्युलर जेल सविस्तर पाहिला. नंतर चॅथम आरायंत्रही विस्ताराने बघितले. दुपारच्या सत्रात १. पुरातत्त्व संग्रहालय (आंथ्रापॉलॉजिकल म्युझियम), २. मात्स्यिकी संग्रहालय (फिशरीज म्युझियम), ३. नौदलाचे समुद्री संग्रहालय -समुद्रिका- (नेव्हल मरीन म्युझियम), आणि ४. कुटिरोद्योग निर्मित वस्तूंचा विक्रयहाट -सागरिका- (कॉटेज इंडस्ट्रीज एंपोरियम); ह्या चार गोष्टी बघितल्या.

२६-०२-१९६६ रोजी मुंबई येथे वीर सावरकरांना देवाज्ञा झाली. त्यानंतर बरोब्बर ४९ वर्षांनी आम्ही पोर्ट ब्लेअर मधील त्यांच्या कोठडीत पोहोचलो होतो. ज्वलंत राष्ट्राभिमानाखातर काळ्या पाण्याची शिक्षा भोगणार्‍या दिवंगत नेत्यास आम्ही सुमनांजली वाहिली. त्यांच्या "माझे मृत्यूपत्र" ह्या कवितेचे अखेरचे कडवे सामुदायिकरीत्या म्हटले.

की घेतले व्रत न हे अम्हि अंधतेने ।
लब्धप्रकाश इतिहास निसर्गमाने ॥
जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे ।
बुद्ध्याच वाण धरले करी हे सतीचे ॥ - स्वातंत्र्यवीर सावरकर

शहिदांनी ज्याकरता प्राणार्पण केले, सावरकरांसारख्या राष्ट्रवीरांनी ज्याकरता अपार कष्ट सोसले, त्या राष्ट्राकरता, अर्थपूर्ण जीवन जगण्याचे आमचे दायित्व पुन्हा एकदा उजागर झाले! त्या कर्तव्यास आम्ही सदैव लक्षात ठेवू.

केवळ अंदमानातच आढळून येणारा पडौक वृक्ष, हा ह्या राज्याचा राज्यवृक्ष आहे. तो सुमारे १२० फूट उंच वाढतो. पानगळीचा पर्णसंभार बाळगतो. अशा वृक्षांचे उंचच-उंच जंगल तर नजरेचे पारणेच फेडते. तो अत्यंत भारदस्त दिसतो आणि उत्तम लाकडी वस्तुंकरताचे दर्जेदार लाकूड पुरवतो. पडौक लाकूड हे सागवानी लाकडापेक्षा जास्त सुदृढ असते. ह्या पडौकवनांतील वृक्षांचा वापर, बांधकामांकरता आणि बैठकीच्या सामानांकरता लागणार्‍या लाकडाच्या गरजा भागवण्याकरता, करता यावा, म्हणून १८८३ मध्ये ब्रिटिश सरकारने इथे एका आरा यंत्राची स्थापना केली होती . दुर्दैवाने दुसर्‍या महायुद्धात थेट ह्या ठिकाणी स्फोटके पडल्यामुळे यंत्राचे अपरिमित नुकसान झाले. मात्र पूर्व पाकिस्तान, लंका आणि बर्मामधून ब्रिटिशांनी इथे पुनरुत्थानाकरता आणलेल्या लोकांच्या लाकडाबाबतच्या अतिरिक्त गरजा भागविण्याकरता ह्या यंत्राची पुनर्स्थापना करण्यात आली. बिनीच्या अंदमानी पडौक वृक्षाची कटाई केवळ ह्या सरकारी आरा यंत्रावरच केली जाते. हे आरायंत्र चॅथम बेटावर आहे. हे बेट पोर्ट ब्लेअर शहराच्या उत्तरेला आहे. पोर्ट ब्लेअरशी ते केवळ चॅथम पुलानेच जोडलेले आहे. दुपारच्या जेवणापूर्वी आम्ही ह्या आरायंत्राला भेट दिली.

पहिल्या चित्रात प्रवेशद्वार आणि वन-उप-संरक्षकांचे कार्यालय दिसत आहे. खालच्या ओळीत आरायंत्रावर, तसेच मानवी कौशल्याने साधलेल्या लाकडी वस्तू दिसत आहेत.

पहिल्या चित्रात उभ्या दिसणार्‍या दोन बांबूंपैकी एकाचा काप मधल्या चित्रात दिसत आहे. मग दिसते आहे ती लाकडातून साकारलेली विश्वकर्म्याची मूर्ती.

त्यानंतरच्या चित्रात दिसते आहे आरायंत्राचे प्रारूप.

खालील पहिल्या चित्रात आरा यंत्राकरता, दातेरी आरीचा पट्टा उचलून नेला जात असलेला दिसत आहे. दुसर्‍या चित्रात कापले जाणारे पडौक वृक्षाचे लांबलचक खोड दिसते आहे.

त्या कामगाराच्या डाव्या हाताकडील खोडाच्या टोकास आरीचे पाते खोडात उभे घुसलेले स्पष्ट दिसत आहे. उजव्या बाजूस रुळांवरून सरकत पुढे जाणार्‍या खोडातून कापली गेलेली फळीही, त्या कामगाराच्या उजव्या बाजूस सुटी झालेली दिसते आहे.

तिसर्‍या दिवशी पोर्ट ब्लेअरपासून फिनिक्स धक्क्यावरून, कोस्टल क्रूझ बोटीने हॅवलॉक बेटावर गेलो. देशात सर्वोत्तम म्हणून, पर्यटन खात्याने गौरवलेल्या राधानगरी बीचवर गेलो. पुन्हा समुद्रस्नान केले आणि हॅवलॉक बेटावरच हॉटेल हॉलिडे इन्नमध्ये राहिलो. राधानगरी बीचवर, पैसे देऊन का होईना पण, कपडे बदलण्याची आणि प्रसाधनाची चांगली सोय आहे. हॅवलॉक बेटावरले आमचे वास्तव्य सगळ्यात आनंददायक होते. हॉटेलच्या परंपरागत कल्पनेलाच छेद देणारी सगळी व्यवस्था होती तिथे. खूप मज्जा आली. सर्व अत्याधुनिक सोयीसवलतींसह सुसज्ज पण झावळ्यांच्या झोपड्या वाटाव्यात अशा खोल्या.

हॉटेल हॉलिडे इन्न, हॅवलॉक

वेताच्या काड्यांना वाकवत वाकवत तयार केलेली मंचके, खुर्च्या, स्तंभ, छत्र्या इत्यादींमुळे जास्तच प्रसन्नतेचे वातावरण निर्माण होत होते. अंदमानातील वृक्षराजींत वेळूची बेटे आणि वेताच्या झुडुपांचा समावेश नक्कीच असणार! जागोजाग फळलेल्या नारळी सर्वदिस नारळांचा वर्षाव करत होत्या. सर्वत्र, इथे तिथे सुके नारळ आणि शहाळी पडलेली दिसत होती.

वेताच्या वस्तूंची रेलचेल

चौथ्या दिवशी सकाळी ८ वाजताच हॉटेल सोडून द्यायचे होते. म्हणून सगळे सामान गोळा करून स्वागतकक्षात रचून ठेवले. नास्ता केला आणि मग आम्ही निघालो एलिफंट बीच बघायला. इथे पहिल्यांदा आमच्यापैकी एका मुलीने (मुलगी कसली, लग्न झाले आहे आता तिचे!) सी-वॉक केले. आणि आम्ही सगळ्यांनी स्नॉर्केलिंगचा भरकस प्रयत्न केला. दोन जणांना स्नॉर्केलिंग करण्यात यश आले. इतरांनी त्याचा आनंद लुटला.

अंदमानी मासा!

अंदमानी समुद्रातून मासा वेचून आणतांना मी.

गळ्यापर्यंतच्या पाण्यात, नाकावर मुखवटा लावून नाकात पाणी शिरण्यापासून बचाव करायचा. डोळ्यांवर समुद्री गॉगल लावून, डोळ्यात पाणी शिरण्यापासून बचाव करायचा. तोंडात एका नळीचे कवळीच्या आकाराचे एक टोक धरून, दुसरे टोक पाण्याबाहेर तरंगवायचे. ह्या नळीतूनच तोंडाने श्वासोच्छवास करायचा. पाण्याच्या पृष्ठभागावर तरते राहून, आणि पाण्यात डोके खुपसून तळ न्याहाळायचा. अशी ही स्नॉर्केलिंगची संकल्पना असल्याचे मला कळले. मात्र ’मुख से साँस’ घेण्याचे मात्र, मला किंवा इतर बहुसंख्यांकांना जमू शकले नाही. पोहोणे येत असलेल्या एक दोघांनाच काय ते साधले. तळ अगदी स्वच्छपणे दिसू शकत असलेल्या -नितळ- पाण्यात डुंबण्याचे सुख मात्र सगळ्यांनाच खूप साधले. प्रसन्न वाटले. सुनामीमुळे पडलेल्या झाडांचे भग्नावशेष ह्या किनार्‍यावर विखुरलेले आहेत. त्यांच्या सोबतीने अनेकांची प्रकाशचित्र सत्रे झाली. इथे मात्र कपडे बदलण्याची आणि प्रसाधनाची कुठलीच सोय त्या दिवशी उपलब्ध झाली नाही. कारण असे सांगितले गेले की त्या व्यवस्थेची किल्ली जवळ बाळगणारी व्यक्तीच आज कामावर हजर नव्हती. असो.

पाचव्या दिवशी वंडूरमार्गे जॉली बॉय बेटावर जायचे होते. वंडूर बंदरावरच महात्मा गांधी राष्ट्रीय समुद्री उद्यानाचे प्रवेशद्वार आहे. ह्या बेटावर प्लास्टिकमुक्त वातावरण सांभाळले जाते. म्हणून बाटलीबंद पाणी नेण्यासही मनाई आहे. दर दोन माणसांगणिक, २०० रुपये अनामत भरून दोन लिटरची एक ओतीव प्लास्टिकची वॉटर बॅग दिली जाते. आपल्या बाटल्यांतील पाणी त्यांत ओतून घेऊन त्या बॅगाच बेटावर नेऊ दिल्या जातात. बाटलीबंद पाण्याच्या बाटल्या वंडूरलाच सोडून द्याव्या लागतात. इथे होणारी प्लॅस्टिकच्या पिशव्यांकरताची तपासणी एवढी इत्थंभूत असते की, सगळ्यांनाच आपापल्या सामांनांतून असंख्य प्लॅस्टिकच्या पिशव्या आढळून आल्याने टाकून द्याव्या लागल्या. अंदमानात विशेषतः पाण्यात डुंबायचे असल्याने प्रत्येक वस्तू प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून घेण्याच्या मोहापायी अक्षरशः हैराण व्हावे लागले. प्लॅस्टिकच्या पिशव्या टाकून द्याव्या लागल्या. आतील सामान उघडे पडले. स्त्रियांना तर हा फटका फारच अनावर झाला. अशा रीतीने आमचा प्लॅस्टिकविरहित प्रवास प्रत्येकी आठ-दहा माणसे नेणार्‍या छोट्या होड्यांतून जॉली बॉय बेटाकडे सुरू झाला. बेट सुरेखच होते. दृष्ट लागण्यासारखे. अंदमानात आल्यानंतर इथे आम्ही प्रथमच, काचेच्या तळाच्या नावांतून समुद्रतळ बघितला. त्याकरता प्रत्येकी ३०० रुपये घेऊन, एका बोटीतून आठ आठ जणांना नेऊन, तीन निरनिराळ्या ठिकाणी सागरतळ दाखवण्यात आला. कॅमेर्‍यांत बंदिस्त केला.

अंदमानी सागरतळातील जीवसृष्टी आणि ज्या काचेच्या तळाच्या होडीतून ती दिसली, ती होडी.

जॉली बॉय बेटावर आम्ही पॅक लंच नेलेले होते. किनार्‍यावरील तिवरांच्या जंगलात, तिवरांच्या झाडांच्या जमिनीनसमांतर फांद्यांवर, तर कुठे विशेष तयार केलेल्या बाकड्यांवर आणि कुटिरांत आम्ही स्वेच्छा-सहभोजनाचा लाभ घेतला. सहाव्या दिवशी नॉर्थ बे बेटावर समुद्रसंचार (सी-वॉक), मग ब्रिटिश प्रशासनाचे अंदमानातील मुख्यालय राहिलेल्या रॉस बेटावर विहारफेरी आणि पोर्ट ब्लेअरला परत, असे नियोजन होते. हा सगळा प्रवास आम्ही अबर्दीन धक्यावरून एम.व्ही.जया नावाच्या पन्नास आसनी बोटीतून केला. नॉर्थ बे आयलँडच्या किनार्‍याजवळच सी-लिंक कंपनीचे सी-वॉकर हे जहाज उभे आहे. पोर्ट ब्लेअर वरून समुद्र-संचार करू इच्छिणार्‍या पर्यटकांना ह्या जहाजावर आणतात. ह्याकरता समुद्र संचाराकरताचे रु.३,२००/- चे तिकीट वेगळ्याने घ्यावे लागते. स्कूबा डायव्हिंगकरता रु.३,५००/- चे तिकीट पडते. मात्र, ह्यात प्रत्येक स्कूबा डायव्हरसोबत एक स्वतंत्र पाणबुडा सोबत दिला जात असतो. स्कूबा डायव्हिंगकरता पोहोणे यावे लागते. पोर्ट ब्लेअर वरून येतांना, एका छोट्या स्वयंचलित होडीतून, जहाजालगत उभ्या असलेल्या दुसर्‍या होडीत आणि तिथून ह्या जहाजात आपण प्रवेश करतो.

इथेच कपडे बदलवण्याकरता चेंजिंग रूम, आपले व्यक्तिगत सामान ठेवण्याकरता लॉकर इत्यादी पुरवले जाईल असेही तिकीट देतांना सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र इथे चेंजिंग रूमच्या नावाखाली एक झापड असलेला आडोसा, आणि लॉकरच्या नावाखाली झाकणे असलेले अपुरे कप्पे एका रॅकमध्ये उपलब्ध आहेत. मात्र त्याला कडीकुलूप करावे अशी कोणतीही सोय नाही. समुद्र संचाराच्या कल्पनेने भारावलेले पर्यटक ह्याच तुटपुंज्या सेवांचा आनंद सुखाने घेत असतात. प्रशासकीय अधिकारी सुखासिन ठेवले जात असणार, त्यामुळे त्यांचीही फारशी अडचण होत नाही. तरीही, समुद्र-संचार कंपनीचे सर्व कर्मचारी आणि त्यांचा प्रत्यक्ष व्यवहार प्रामाणिक, सचोटीचा आणि विश्वास निर्माण करणारा आहे, ह्यात मुळीच संशय नाही.

जहाजाच्या मागच्या बाजूला, साधारण जहाजाच्याच आकाराच्या गोलाकार समुद्राला, तरत्या गोलकांच्या आधारे, तळापर्यंत लोंबणारे जाळे लावून बंदिस्त केलेले आहे. जहाजावरून एक लोखंडी शिडी तळापर्यंत उतरवलेली आहे. तिच्यावरून समुद्राकडे पाठ करून, नेसत्या कपड्यांनिशी आपण दोन चार पायर्‍या उतरून तळाकडे निघालो, म्हणजे गळ्यापर्यंत पाण्यात शिरल्यावर, ३२ किलो वजनाचे हवेशीर, म्हणजे पाठीमागच्या बाजूने दाबित हवेची नळी जोडलेली असते असे, शिरस्त्राण आपल्या डोक्यावर चढवले जाते. जहाजावर एक मोठ्ठा हवादाबक (काँप्रेसर) असून त्यातून दाबित हवा आणणार्‍या सुमारे एक सेंटिमीटर व्यासाच्या लांबलचक (पन्नास, शंभर मीटर लांबीच्या असाव्यात) नळ्या शिरस्त्राणास जोडलेल्या असतात. अगदी चष्मा घालूनही हे शिरस्त्राण चढवले जाते. कारण शिरस्त्राणाच्या आतील भाग कोरडाच राहत असतो, शिवाय चष्मा घातल्याने आपण नेहमीसारखेच स्वच्छ पाहूही शकत असतो. शिरस्त्राणाचे आकारमान असे असते की, त्याचे पाण्यातील वजन केवळ ७ किलोच भरते. मात्र, ह्या ७ किलोच्या अतिरिक्त वजनामुळेही आपण सागरतळाकडे लोटले जाऊ लागतो. अशावेळी, सोबत करत असलेला पाणबुडा आपल्याला शिडी सोडायची खूण करतो आणि ती सोडताच आपण त्याचा हात धरून झपाट्याने सागरतळाशी पोहोचतो. इथे सागरतळ साधारणपणे ५ मीटर म्हणजे सुमारे १५ फूट खोल असतो. अर्थात हवेची नळी कायमच हवादाबकाला जोडलेली राहून आपल्याला दाबित हवेचा पुरवठा करत राहते. शिरस्त्राणाच्या आतील हवेच्या दाबाने बाहेरचे पाणी शिरस्त्राणामध्ये शिरू शकत नाही. आपण बाहेरच्यासारखाच सुखाने श्वासोच्छवास करत राहतो.

समुद्रसंचार करणार्‍या आठदहा संचारकर्त्यांमागे तीन पाणबुडे सोबत असतात. आमचा गट आठ जणांचा होता. आमच्याच सोबत पर्यटन करणारे पाच जण आणि नवरा, बायको व त्यांचा सुमारे दहा वर्षांचा एक मुलगा असे इतर तिघे बंगाली भाषक, ह्यांचा हा गट होता. तळाशी पोहोचल्यावर संचार कर्त्यांची हातात हात देऊन एक माळ तयार केली जाते. त्या माळेच्या एका टोकास एक, तर दुसर्‍या टोकास दुसरा पाणबुडा हाती धरून मार्गदर्शन करत असतो. काय करायचे आहे ते खुणेनी समजावून सांगण्याचे त्यांचे कसब मला फारच अपूर्व भासले. आवडले. तिसरा पाणबुडा जलगच्च प्रकाशचित्रकाने (वॉटरटाईट कॅमेर्यापने) संचारकर्त्यांचे फोटो काढत असतो. आपण बाहेर येऊन कपडे बदलेपर्यंत, अशा प्रत्येकी १२ फोटोंची एक सी.डी.ही तयार करून आपल्या हाती देत असतात.

आत शिरण्यापूर्वी आम्हाला आठ जणांना एकत्र करून जहाजावरील एका ज्येष्ठ खलाशाने एक पाच मिनिटांचे व्याख्यान दिले. पाण्यात न विरघळणार्‍या शाईचा वापर करून, आठही जणांच्या उजव्या हाताच्या तळव्यामागे ए-८ असे इंग्रजीत लिहूनही ठेवण्यात आले. पाणबुड्यांना आमची ओळख पटावी म्हणून. आपण सुंदर आहे असे दाखविण्यासाठी करतो ती हस्तमुद्रा; ’मला जमते आहे. मी स्वस्थ आहे. आता समुद्रसंचार करू या’ असे सोबतच्या पाणबुड्यांना सांगण्याकरता वापरावी असे सांगण्यात आले. तसेच उजव्या हाताचा अंगठा वरच्या दिशेने दाखवल्यास; ’मला ताबडतोब बाहेर काढा. अस्वस्थ वाटते आहे.’ असा अर्थ सोबतच्या पाणबुड्यांना कळेल आणि ते तुम्हाला बाहेर तत्काळ काढतील. असेही सांगण्यात आले. मात्र ह्याव्यतिरिक्त इतर कुठल्याही हावभावांना आणि खुणांना समुद्रसंचारासंदर्भात काहीही अर्थ नाही, असे बजावून सांगण्यात आले.

खरे तर मी तासाभरापासून नंबर लागण्याची वाट पाहत होतो. लघवीची भावनाही होत होती. मात्र जहाजावर स्वच्छतागृहच नसल्याने, तशी सोय नव्हती. समुद्रात उतरल्यावर सहज विसर्जनाचा विचारही उद्भवला होताच. मात्र प्रत्यक्षात पाण्यात, समुद्रतळाशी पोहोचल्यावर आजूबाजूच्या वाढत्या दाबाच्या प्रभावाने ती भावनाही क्षीण होऊन, नामशेष झाली.

आता आमच्यासोबतच्या एका महिलेस, “फ्लोट होत आहेत” ह्या कारणास्तव बाहेर काढण्यात आले. त्यांचे म्हणणे असे होते की, ’मला चांगले जमते आहे’ ह्या अर्थाने त्यांनी उजव्या हाताचा अंगठा वर करून दाखवला. मात्र आधीच सांगितल्याप्रमाणे ही खूण चुकीची ठरल्याने त्यांना बाहेर काढले गेले. तरीही त्यांचे पूर्ण पैसे, सी-लिंकने संध्याकाळपर्यंत परत केलेले होते. इथे हे नमूद करावे लागेल की, सागरतळाशी अशा शिरस्त्राणासह वावरत असतांना, आपले पाण्यातले वजन कमी भरत असल्याने, चालण्याकरता हलकेच पाऊल उचलले तरी, उडी मारल्यासारखे शरीर वर उसळत असते. अशा परिस्थितीत जमिनीवर पावले रोवून ठेवणे, आणि ताठ, सरळ उभे राहणे अत्यंत जरूर ठरते. कारण ह्या उसळीचा आपल्याला अंदाज यायला जरासा वेळच लागतो. शिवाय आपण खाली वाकलो तर शिरस्त्राणात पाणी शिरून आपल्याला बुडण्याचा धोका संभवतो. एका पाणबुड्यास तीन-चार संचारकर्त्यांवर लक्ष ठेवायचे असल्याने आणि त्याचेवर त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असल्याने, अशा प्रकारे अस्थिर होणार्‍या व्यक्तीस बाहेर काढणे त्यांना क्रमप्राप्तच ठरत असणार.

पहिल्या संचारकर्त्यास हाताने धरून तळाशी गेलेला पाणबुडा खालीच थांबला. दुसर्‍या पाणबुड्याने मग एक एक करून इतर संचारकर्त्यांना खाली आणले. त्यांच्या हातात आधीच खाली उतरलेल्या संचारकर्त्याचा हात सुपूर्त करून तो इतरांना आणायला वर जात असे. तोपर्यंत तळाशी आलेले संचारकर्ते परस्परांचे हात हातात घेऊन समोरच्या दिशेने वाट चालण्याकरता सज्ज होऊन राहत. त्यांच्या माळेच्या एका टोकास पहिल्या पाणबुड्याने घट्ट धरून ठेवलेले होतेच. आता, डोक्यावर शिरस्त्राण, त्यास पाठीमागे जोडलेली हवेची नळी अशा एक एक करून आठही संचारकर्त्यांना दोन पाणबुड्यांच्या संचाने तळापर्यंत आणून सोडले होते. सगळ्यांची तोंडे समोरच्या बाजूला आणि पाठी जहाजाकडे होत्या. त्याच दिशेने सगळ्यांच्या हवेच्या नळ्याही जहाजावरील हवादाबकापर्यंत गेलेल्या होत्या. माळेच्या दोन्हीही टोकांना पाणबुडे होते. अशी मालिका मग एका विहीरसदृश खळग्याच्या कडेवरील पांढर्‍याशुभ्र बारीक वाळूच्या पाऊलवाटेवरून मार्ग चालू लागली.

खळग्यात एके ठिकाणी एक मोठासा खडक उभा होता. त्यावर गुलाबी रंगांची सजीव पोवळी लगडलेली होती. झुडूपांप्रमाणे डोलत होती. मग एका पाणबुड्याने आम्हा एकेकाला सुटे करून आमचा हात त्या पोवळ्यास लावून दिला. सगळ्यात अखेरच्या चित्रात तळाशी मध्यभागी असलेले तपकिरी पोवळे, आम्ही हात लावताच गर्द निळे, जांभळे दिसू लागले. लाजाळूसारखे मिटलेही. हाच प्रयोग मग आम्ही सुट्यासुट्याने आणि एकत्रितपणेही केला. दरम्यान तिसरा पाणबुडा खडकाच्या दुसर्‍या बाजूस जाऊन, जलगच्च प्रकाशचित्रकाने आमचे फोटो काढत होता. आजूबाजूला रंगीबेरंगी मासे स्वैर संचार करत होते. त्यांना हात लाऊन पाहण्याचे आमचे प्रयत्न मात्र असफल होत असत. एक म्हणजे ते अत्यंत चपळ असत. दुसरे म्हणजे पाण्यात खोल असल्याने आमच्या हालचाली अतिशय मंद होत. आणि तिसरे म्हणजे शिरस्त्राणाच्या काचेतून खोलीचा अदमास योग्यप्रकारे येतच नव्हता.

आता आम्हाला हा समुद्र संचार आवडू लागला होता. पण हे सगळे होतपर्यंत आम्हाला वेळेचे भानच राहिलेले नव्हते. सुमारे अर्धा तास तरी गेला असावा. मग जसे खाली आणले होते, तसेच एकेकाला वर नेण्याची प्रक्रिया सुरू झाली. एक पाणबुडा मालिकेचे एक टोक धरून तळाशी थांबला. दुसरा एकेकास शिडीपर्यंत नेऊन, शिडीवरून वरपर्यंत नेई. शिरस्त्राण पृष्ठभागाशी पोहोचताच जहाजावरील कर्मचारी ते काढून बाजूला करी, त्याची नळी काढून टाकी आणि ते बाजूला ठेवून देई. अवजड सामान गाडीत चढवून घ्यावे तसे ते दृश्य दिसे. बाहेर येणारा विजयी वीराच्या आविर्भावात असे. अद्भूत दर्शनाचा आनंद त्याच्या चेहर्‍यावर ओसंडून वाहत असे. तर आत उतरण्यास तयार असलेले लोक, आपल्या असंख्य प्रश्नांची उत्तरे त्यांना विचारत असतांना दिसत असत. अशा प्रकारे आमचा हा अद्भुतातला प्रवास सुखरूप पार पडला!

नॉर्थ बे बेटावरून पोर्ट ब्लेअरला परततांना रॉस बेटावर जेवण करायचे होते. जया बोटीतून आम्ही मार्ग आक्रमू लागलो. रॉस बेट, पोर्ट ब्लेअर शहरातून सारखेच दिसत राहते. सुरेख दिसते.

तिथे पोहोचल्यावर वरील पाटी वाचून मात्र धसकाच बसतो. अर्थात तिथे आलेल्या पर्यटकांच्या संख्येच्या तुलनेत, हे दंड वसूल करण्याकरता नेमलेले लोक, दहा टाक्केही नसल्याने किंवा पर्यटकांना उगाच त्रस्त करायचे नाही ह्या धोरणामुळे असेल, पण वरीलप्रमाणे दंडवसूली अजिबातच होत नसावी असे दिसले. बेट मात्र स्वच्छ सांभाळलेले दिसून येते. महासागरी नैसर्गिक सौंदर्याचे कोंदण तर त्याला लाभलेलेच आहे. त्यामुळे ते आवडतेही.

बेटावर अरुंधती राव नावाची एक खासगी मार्गदर्शक आहे. ती माफक दरात, शुल्क घेऊन, पर्यटकांचे प्रबोधन करत असते. मात्र तिची खासियत ही आहे की ती, खार, हरणे, ससे, मोर इत्यादिकांना त्यांच्या नावाने हाका मारते. ते लोक येतात. ती मग सोबत आणलेले ब्रेड त्यांना खायला देते. हे हरीण बदमाश आहे. लहान मुलांना मारेल. सांभाळा. ते हरीण आंधळे आहे. काही करणार नाही. अशा माहित्याही देत असते. प्रवासी तिच्या व्याख्यानांवर खूश असतात. त्या प्राण्यांसोबत आपापली प्रकाशचित्रे काढून घेत असतात. तेही सुखाने प्रकाशचित्रे काढू देत असतात.

अशा रीतीने रॉस बेटाची संस्मरणीय सफर, तासाभरात सुखाने संपन्न होते.

अरुंधती रावने ओढणीत बांधून घेतलेला जखमी ससा आणि तिने बोलावल्यावर धाऊन आलेली हरणे.

एम.व्ही.जया ह्या बोटीतून मग आमचा अंदमानातील अखेरचा समुद्रप्रवास, पोर्ट ब्लेअरच्या दिशेने सुरू झाला. संपूच नये असे वाटत असतांनाच संपलाही.

परतीचा प्रवास दुसरे दिवशी विमानाने चेन्नईकडे उड्डाण भरून सुरू झाला. प्रवासाला निघाल्यावर विमानातून भारतभूमीची प्रकाशचित्रे काढावी अशी इच्छा झाली खरी. पण कॅमेरा बंदिस्त करून चेक-इन लगेजमध्ये ठेवलेला होता आणि मोबाईल बंद केलेला होता. परतीच्या प्रवासात मात्र आठवणीने मोबाईल फ्लाईट मोडवर टाकून, विमानातून असंख्य प्रकाशचित्रे काढली. खाली दिसणार्‍या दृशांचा, ज्ञात भौगोलिक ठिकाणांशी संबंध जोडायचे प्रयत्न मात्र यशस्वी झाले नव्हते. घरी आल्यावर जेव्हा असे प्रयत्न वेगळ्याने केले तेव्हा, कृष्णानदीवरले येरलवाडी आणि शिरसवाडी धरण मात्र विमानातून काढलेल्या फोटोत, त्यांच्या आकारांवरून आणि परस्पर तुलनेतील त्यांच्या स्थानांवरून स्पष्ट ओळखू येत आहे.

Yeralwadi Dam on Krishna River on Google Map. And WP_20150303_138.jpg, 03 March 2015, 14:41:02, From GoAir’s G8-304 Chennai-Mumbai Flight-30F.

त्यानंतर संपूच नये असा वाटणारा अंदमानाचा प्रवास लवकरच पूर्णत्वास आला. मुंबई विमानतळावर त्याची सांगता झाली.
.

२०१४-११-१७

ओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी ४-ओंकारेश्वर


पुलावरून दिसणारे ओंकारेश्वर मंदिर आणि पुलाच्या उजवीकडील तेजाजी जाट ह्यांचा पुतळा

सकाळी उठलो. तयार झालो. मात्र पाहतो तर चालक अजून झोपेतच होता. त्याला आन्हिके आटपायला थोडासा अवधी दिला आणि मग पुलाकडे निघालो. आज काहीतरी विशेषच उत्सव असावा अशी गर्दी रस्त्यावर लागून राहिलेली दिसली. डोक्यावर मोठमोठाले ओझी घेऊन असंख्य स्त्री-पुरूष दर्शनाला निघालेले दिसत होते. काल ज्या पुलाजवळच्या वाहनतळापर्यंत आमचे वाहन गेले होते त्या ठिकाणाच्या सुमारे एक किलोमीटरभर आधीच पोलिसांनी गाडी रोखली. आमच्या परिक्रमामार्गावरील चालण्यात जातायेता मिळून दोन किलोमीटर भर तर पडलीच शिवाय वेळेचे गणितही चुकेल असे वाटू लागले.


गायत्री शक्तीपीठाची इमारत पुलापार अगदी समोरच आहे तर बाहेती धर्मशाळेची तिच्या उजवीकडे

मुळात ठरल्यानुसार सहा वाजता परिक्रमेस सुरूवात करून, अगदी सर्वात जास्त वेळेत म्हणजे साडेतीन तासातही आम्ही परिक्रमा करू शकलो असतो तर, अतिथीगृहात आठ ते दहा मिळणार असलेला कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्टही करू शकलो असतो. आता मात्र पुलाच्या सुरूवातीस आम्ही पोहोचेपर्यंतच सात वाजले होते. परिक्रमा करण्यास आम्हाला तीन तासही लागले असते तरी, आता कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट हुकणार हे नक्की होते. शिवाय अतिरिक्त गर्दीमुळे चालण्यासही काहीसा अधिकच वेळ लागत होता.


पुलापार गेल्यावर पुलाखालून उजवीकडे गेल्यास ओंकारेश्वर मंदिर लागते तर पुलाखालून डावीकडे गेल्यास लागतो गीता परिक्रमापथ


त्यातही अगदी पाण्यालगतचा मार्ग सोडून द्यायचा. परिक्रमा मार्ग किंचित वरून आहे.


परिक्रमामार्गावर कुठे कुठे पायर्‍या होत्या, कुठे कुठे नुसतेच काँक्रीटचे चढ-उतार

परिक्रमामार्गावर कुठे कुठे पायर्‍या होत्या, कुठे कुठे नुसतेच काँक्रीटचे चढ-उतार, तर कुठेकुठे वाट मातीतूनही चालत होती. मात्र उजव्या बाजूस गीतेचे श्लोक असलेले दगडी फलक दिसत राहत. त्यातल्या अध्याय व श्लोक ह्यांच्या संख्येवरून परिक्रमापथावरील आपली प्रगती लक्षात येत राही. जागोजाग नर्मदेची, शिवाची, मारुतीची मदिरे; एवढेच काय तर बौद्ध पॅगोडासारखी प्रार्थनास्थळेही दिसत होती. शिवाय मारुतीचे अग्रदूत असलेली माकडे, व्यवस्थित वानरभोजन मिळत असल्याने सर्वत्रच आढळून येत होती. काही पिल्ले तर अतिशयच लहान दिसत होती.


पॅगोडासारखी प्रार्थनास्थळेही दिसत होती. काही पिल्ले तर अतिशयच लहान दिसत होती.


स्थानिक प्रशासनाने अनधिकृत बांधकामे नुकतीच हटवली होती. त्यांच्या पुनर्स्थापनेची कामे आबालवृद्ध स्त्रीवर्गानेच हाती घेतलेली दिसून येत होती.


परिक्रमापथावर माळांची दुकाने आणि देवींच्या मूर्ती जागोजाग असत


धोत्र्याची आणि घंटेची फुलेही आपापल्या डौलदार झुडुपांवर फुललेली दिसत होती


स्थानिकांत कपाळावर ओंकार रेखण्याची शैली प्रचलित होती, तर भाविकांत सर्वसामान्य प्रथेनुरूप हातांत गंडेदोरे बांधणे खूपच लोकप्रिय असल्याचे दिसून येत होते.

मांधाता पर्वताच्या शिखरावर पोहोचलो तेव्हा त्याचा आकार ओंकारस्वरूप असल्याचे पुरावे दिसू लागले. वळणे ओळखीची वाटू लागली. तसेच नर्मदा आणि कावेरिका ह्यांच्या पैलतीरांवरील शिखरेही स्पष्टपणे दृष्टीस पडू लागली.


पथ चढत चढत मांधाता पर्वतावर, राजराजेश्वर मंदिरापाशी घेऊन गेला. तिथे कमळे फुलली होती.


शिखरावरील रस्ता सरळसोट आणि सपाट होता. वर सिद्धेश्वर मंदिराचे भग्नावशेष दिसून आले.


सिद्धेश्वर मंदिराचे भग्नावशेष आणि जनावरांना पाणी प्यायला असते तशी एकसंध दगडातली डोणी.


आता धरण दिसू लागले आणि परिक्रमापथ ओंकाराच्या शेपटीचे वळण घेत खाली उतरू लागला.


मग उंचावरून अमलेश्वरनजीकचा पूल दिसला, त्यानंतर आम्हीही उतरून त्याच्या पातळीवर आलो


अखेरीस गीतेतला अखेरचा श्लोक दिसला आणि अमलेश्वर पूल नजरेच्या टप्प्यात आला.


आता आमच्या अतिथिगृहाकडचा पूलही दिसू लागला होता आणि मग त्या पुलाचा चढ-उतार.

दहा वाजून गेले होते. कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्टही गेलेलाच होता. मात्र पायी परिक्रमा तीन तासात पूर्ण केल्याचे समाधान मोठे होते. त्याची तुलना ब्रेकफास्टशी होऊच शकत नव्हती. परत येऊन नाश्तानुमा जेवण केले. किंचित विश्रांती घेतली.

मग सुमारे दोन अडीच तासांच्या, इंदौरातील नखराळी ढाणीपर्यंतच्या प्रवासास निघालो. तिथे चहापान करून मग आम्ही बिजसेन माता आणि कस्तुरबाग्राम ह्या स्थलदर्शनाकरता पुन्हा विमानतळ रस्त्यावर निघालो. सुमारे अर्ध्या तासात आम्ही बिजसेन माता मंदिरात पोहोचलो. अक्षरशः जत्राच भरलेली होती. आम्हीही दर्शन घेतले. मात्र कस्तुरबाग्रामबद्दल असे कळले की ते शहराच्या पूर्वेला देवास रस्त्यावर आहे. दिवसभराच्या धावपळीमुळे आज जरा थकवाही जाणवत होता, शिवाय आम्हाला शहरात जेवण करून दक्षिणेला २० किलोमीटरवर असलेल्या नखराळी ढाणीपर्यंत परतीचा प्रवासही करायचा होता. त्यामुळे मग आम्ही शहरात एके ठिकाणी पुन्हा माहेश्वरी साडी खरेदी करून, गुरूकृपा रेस्टॉरंटमध्येच जेवण केले आणि परत फिरलो.

नंतरच्या दिवशी दुपारी अडीच वाजता आमची परतीची गाडी होती. म्हणून किमान दीड वाजेपर्यंत स्थानकावर पोहोचायचे ह्या हिशेबाने बारा साडेबारापर्यंत गुरूकृपा गाठायला हवे होते. त्यामुळे सकाळी नऊ वाजताच आम्ही नखराळी ढाणी सोडली. नऊ ते बारा, खजराणा भागातले गणेशमंदिर आणि शहरातले मध्यप्रदेश पर्य़टनविकास मंडळाचे मृगनयनी एम्पोरियम पाहण्याचे ठरवले.

हे गणेशमंदिर, विस्तीर्ण आवारात वसलेले आणि सुव्यवस्थित ठेवलेले सुरेख मंदिर आहे. मृगनयनी एम्पोरियमही सुरेखच आहे. सुती पिशव्या, पर्सेस, सतरंज्या, चादरी इत्यादी हातमागाच्या वस्तू तर दृष्ट लागण्याजोग्या होत्या. आम्ही माफक खरेदी केलीही. नंतर गुरूकृपाकडे कूच केले.


खजराणा भागातले गणेशमंदिरत्यात रेड्यावर स्वार झालेले शनिदेव 


गुरूकृपा रेस्टॉरंटमधले जेवण

वाटेत ५६-दुकान भागात मधुरम् नमकीन आणि स्वीटसच्या दुकानात इंदौरचे प्रसिद्ध नमकीन आणि तिळपट्टी खरेदी केली. खारी मुगडाळ सगळ्यात पसंत आली. तिळपट्टीही सुरेखच होती. मात्र शेव आणि तळलेली तिखट हरबरा डाळ भयानक तिखट निघाली. केवळ चार दाणे तोंडात टाकल्यावर असे वाटू लागले की, रोज फार तर चार चार दाणे तोंडात टाकून तहहयात किंवा डाळ संपेस्तोवर सावकाश खावी. गजक खरेदी आधीच गुरूकृपाशेजारच्या दुकानांतून करून ठेवलेली होती. गाडी वेळेवर सुटली. थोड्याच वेळात खिडकीतून मोर दिसले. काही अंतरावर हरीणही दिसले.


मृगनयनी एम्पोरियमचे प्रवेशद्वार, गाडीतून दिसलेले मोर

त्यानंतर मात्र दुतर्फा बाभुळबनच काय ते सर्वत्र दिसत राहिले. आमची ओंकारेश्वर सहल अपेक्षेहून अधिक आनंददायी अणि संस्मरणीय झाली होती. आम्ही निरोप घेतला खरा, पण केवळ पुनरागमनायच.

ओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी १-उज्जयिनी
ओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी २-इंदौर, महेश्वर
ओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी ३-मांडू, ओंकारेश्वर
ओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी ४-ओंकारेश्वर

ओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी ३-मांडू ओंकारेश्वर


रूपमती महालातील जलाशयातील वरच्या कमानींचे प्रतिबिंब. बाजबहाद्दुर महालातील पुष्करणी.

आजचा मुख्य स्थलदर्शनाचा कार्यक्रम मांडवगड उपाख्य मांडूचा होता. त्यामुळे आता नाश्ता करून आम्हाला निकडीने प्रवासास सुरूवात करायला हवी होती. तासा दीड तासातच आम्ही मांडूस पोहोचलो. किल्ल्याचे सर्वसारणतः तीन भाग पडतात. रेवाकुंड ह्या तिसर्‍या खंडापासून आम्ही सुरूवात केली.

प्रतिध्वनीस्थळावर उच्चारलेले शब्द त्यापासून सुयोग्य अंतरावर बांधलेल्या एका इमारतीद्वारे परिवर्तित होऊन प्रतिध्वनी ऐकू येतो. मी मोठ्याने हरहर म्हणालो. काही सेकंदातच आम्हाला तेच शब्द पुन्हा ऐकू आले. मी मोठ्याने महादेव म्हणालो. काही सेकंदातच आम्हाला तेच शब्द पुन्हा ऐकू आले. शेजारीच स्थानिक रानमेवे विकणारी एक मुलगी बसलेली होती. तिच्याकडे होत्या गोरखचिंचा. कच्च्या गोरखचिंचांचा गर सांधेदुखीवर उत्तम इलाज असल्याने आम्ही तो घेतला. मग आम्ही शाही परिसर उर्फ पहिल्या खंडात आलो. होशंगशहाचा मकबरा, जामी मशीद असलेला दुसरा खंड आम्ही वेळे-अभावी स्थलदर्शनातून वगळला.


प्रतिध्वनीस्थळ. आवळे, चिंचा, गोरख चिंचा आणि कवठे. शाही परिसर


जहाज महाल सुबक पुष्करणीचा कलात्मक फोटो

चारही बाजूंना विशाल जलाशय असल्याने महाल खरोखरीच तरंगत्या जहाजासारखा दिसतो. म्हणूनच ह्याचे नाव जहाज महाल पडले आहे. ह्या आणि बाजूच्या हिंडोला महालातील बांधकाम कमानींच्या वास्तुरचनेतून केलेले आहे. भिंतींतले जिने, पुष्करण्या, चबुतरे, छत्र्या आणि सज्जे ह्यांनी सुशोभित असलेल्या ह्या इमारती पाहता पाहता खूप लांबलचक अंतरे चालावी लागतात आणि पायही भरून येतात. मात्र पाहण्यासारखी ठिकाणे संपतच नाहीत. हौसेने हिंडून पाहावा असाच हा सर्व परिसर आहे. पुरातत्त्वखात्याने आपल्या नेहमीच्या शिरस्त्याने स्वच्छ, व्यवस्थित आणि शिस्तीत सांभाळला आहे.


जहाजमहालावरूनचा देखावा आणि डौलदार गोरखचिंचेचे झाड हीच तर मांडूची खरी वैशिष्ट्ये आहेत.

आता मात्र दुपारचा एक वाजून गेलेला होता. सूर्य आग ओकत होता आणि पोटात कावळेही कोकलू लागलेले होते. मांडुतून असंतुष्ट अंतःकरणाने नाईलाजानेच पाय बाहेर काढावा लागला. बर्‍यापैकी खानावळीत १२० रुपयांना थाळी मिळेल असे कळले. घेतली खरी पण तिखटजाळ भाजीचा घासही घशाखाली उतरेना. मग नेहमीचाच उपाय केला. दही मागितले. साखर मागितली. दही-साखरेच्या उतार्‍याने जेवण सुखरूप पार पडले. दही मात्र चांगले होते. ह्या संपूर्ण प्रवासातच सुरेख दही आणि हो, छाछही आवडेल असेच मिळाले. जेवण झाल्यावर ओंकारेश्वरापर्यंतचा सलग सुमारे तीन तासांचा प्रवास आता करायचा होता. पुढील आकर्षणही तसेच जबरी होते. ओंकारेश्वराचे.


आकर्षणही तसेच जबरी होते. ओंकारेश्वराचे.

ओंकारेश्वर धरणानंतर प्रवाहाच्या खालच्या बाजूला नर्मदा नदी एका कठीण खडकावर जाऊन दुभंगते. तिचे दोन प्रवाह होतात. पूर्वेला अमरकंटकच्या डोंगरात उगम पावून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाट चालणार्या नदीचा उत्तरेकडचा प्रवाह मग कावेरिका म्हणून ओळखला जाऊ लागतो, तर दक्षिणेकडील प्रवाहाचे नाव नर्मदाच राहते. हे प्रवाहही काही किलोमीटरचा स्वतंत्र प्रवास करून मग पुन्हा परस्परांस मिळतात. त्या ठिकाणाला कावेरिका आणि नर्मदेचा संगम म्हणून ओळखले जाते. दोन्ही प्रवाहांमधील जागेचे एका बेटात रूपांतर झाले आहे. ह्या बेटावर असलेल्या पर्वतास, ह्या जागेचा प्राचीन शासक मान्धाता ह्याचेच नाव मिळालेले आहे. हा पर्वत आकाशातून पाहिल्यास दक्षिणाभिमुख ओंकार आकारासारखा आहे. म्हणूनच ह्या ठिकाणाला, बेटाला आणि ज्योतिर्लिंगालाही ओंकार नावानेच संबोधले जाते.

आदी शंकराचार्यांनी सर्व भारताचे पदभ्रमण केले होते. एवढेच नव्हे तर प्रत्येक जागेची वैशिष्ट्ये उत्तम रीतीने नोंदवूनही ठेवलेली होती. ओंकारेश्वराबद्दल बारा ज्योतिर्लिंगांच्या स्तोत्रात ते लिहीतातः

कावेरिकानर्मदयोः पवित्रे समागमे सज्जनतारणाय ।
सदैव मांधातृपुरे वसंतं ओंकारमीशं शिवमेकमीडे ॥

म्हणजे कावेरिका आणि नर्मदा ह्यांच्या संगमावर, मांधाता पर्वतनगरीत, सज्जनांच्या परिरक्षणार्थ, सदा वास्तव्य करत असलेल्या शिवाने माझे रक्षण करावे.

मांधाता पर्वतावर चित्रात दिसणारा ओंकाराचा आकार म्हणजे प्रत्यक्षात बांधीव पायर्‍या पायर्‍यांच्या "गीता परिक्रमा मार्ग"च आहे. ह्या मार्गावर उजव्या बाजूस ६९७ गीतेचे श्लोक वालुकाश्माच्या फलकांत कोरून जागोजाग क्रमवार बसवलेले आहेत. नितांत सुंदर, अखंड वैविध्याने नटलेल्या, पर्वतीय चढ-उताराच्या, निसर्गाच्या सान्निध्यातून वाट चालणार्‍या ह्या परिक्रमामार्गावरून चालत जाणे खरोखरीच सुखावह वाटले. सात किलोमीटर लांबीचा हा मार्ग जणू मुक्तीचा मार्गच आहे. नैसर्गिक वैविध्यांची आणि वैशिष्ट्यांची कमाल पखरण असलेले भारतीय भूप्रदेश जर कुणी सूचीबद्ध करेल, तर त्यात ओंकारेश्वराचे स्थान निस्संशय वरचेच असेल. लोक ओंकारेश्वरास का जातात मला माहीत नाही. मला मात्र ह्या परिक्रमेचे फारच आकर्षण वाटले आणि आता कायमच ते माझी सोबत करत राहणार ह्यात मुळीच शंका नाही.

ओंकारेश्वरातील पहिली रात्र चांगली झोप झाल्यानंतर पहाटेसच जाग आली. झपाट्याने आन्हिके उरकून ज्योतिर्लिंग दर्शनाचा कार्यक्रम निश्चित केलेला होता. त्यानुसार इंडिकात बसून प्रस्थान केले. नर्मदेच्या दक्षिण तीरावर असलेल्या आमच्या अतिथीगृहातील कक्षातून मांधाता पर्वत सहजच पाहता येत होता. दोन्ही तीरांना जोडणारा पूल आणि त्यापाठचे ओंकारेश्वर धरणही स्पष्ट दिसत होते. मात्र ओंकारेश्वर गाव छोट्या छोट्या गल्लीबोळांतून वसलेले असल्याने, प्रत्यक्षात समोरच दिसलेल्या त्या पुलापर्यंत पोहोचण्यास गाडीने सुमारे दहा मिनिटे लागली. मांधाता पर्वतावर स्वयंचलित वाहने जाऊ शकत नसल्याचे कळून आले. मग पुलाच्या अलीकडील टोकाशी असलेल्या वाहनतळावर गाडी उभी करून, विनोबा एक्सप्रेसने पुलापलीकडे पोहोचलो. पूल उंचावर आहे. त्यामुळे पूल संपताच खाली उतरावे लागते. मग त्याच पुलाच्या खालच्या बाजूने उजवीकडे जाणारा सरळ रस्ता ओंकारेश्वर मंदिराकडे घेऊन जातो. तिथून आणखी सुमारे पाच-दहा मिनिटांतच आम्ही तिथे पोहोचलो.


मध्यप्रदेश पर्यटनविकासमंडळाचे अतिथीगृह व तिथून मांधाता पर्वतावर दिसणारी शिवमूर्ती.


अतिथीगृहातून दिसणारा मांधाता पर्वत रात्रीच्या प्रकाशात उजळलेले ओंकारेश्वर मंदिर

वरील पहिल्या प्रकाशचित्रात मांधाता पर्वत, त्यावर वरपर्यंत जाणारी पायर्‍या पायर्‍यांची वाट आणि शिखरावर आधीच सांगितल्याप्रमाणे दिसत असलेली पाठमोरी शिवमूर्ती दिसत आहेत. दुसर्‍या प्रकाशचित्रात पहिल्या प्रकाशचित्राच्या साधारणपणे उजवीकडचा भाग आहे, तोही रात्रीच्या प्रकाशांत उजळलेला. सर्वाधिक उजळलेला मंदिरकळस ओंकारेश्वर मंदिराचा आहे. डावीकडचा पूल आम्हाला जवळचा आहे. उजवीकडच्या पुलाच्या आमच्या बाजूस म्हणजे, दक्षिण तीरावर अमलेश्वराचे मंदिर आहे. मात्र हे मंदिर जुने आहे. खोलात आहे. फारसे उंचही नाही. त्यामुळे ओंकारेश्वर गावातून फारसे दिसतच नाही. ओंकार आणि अमलेश्वर मिळूनच हे ज्योतिर्लिंग पूर्ण होत असते. दुसर्‍या प्रकाशचित्रात अमलेश्वर पुलाच्या पाठीमागे, उजवीकडे ओंकारेश्वर धरण आहे. धरणानजीकच पण उत्तर तीरावर, ऊर्जाघर आहे.

ओंकारेश्वर मंदिरात काय नेऊ देतात, काय नाही हे नक्की माहीत नव्हते. म्हणून आम्ही कॅमेरा आणला नव्हता. केवळ मोबाईलच घेऊन आलेलो होतो. मंदिराबाहेर एका ठिकाणी टोकन घेऊन चपला उतरवल्या आणि रांगेत लागलो. पंडे पाठलाग करतच होते. त्यांना दाद न देता आम्ही मार्गस्थ राहिलो. पाचच मिनिटांत गाभार्‍यात पोहोचलो. तिथल्या एका पुजार्‍याने “वाका खाली, करा नमस्कार, ही घ्या बादली, करा अभिषेक” अशी दमदाटी करत आमच्या कडून अभिषेक करवून घेतला. शिवलिंगासमोर, काचेचे, कमरेइतक्या उंचीचे कुंपण घातलेले असल्याने शिवलिंगास कुणीही शिवू शकत नाही. कुंपणासच एक काचेचे नसराळे बसवलेले असून त्यातून यजमानांना जलाभिषेक करायला सांगितले जाते. काचेतून ते पाणी शिवलिंगावरच पडते आहे अशी खात्री करवून द्यायलाही ते विसरत नाहीत. बाहेर पडल्यावर मग आमच्या मागे लागले. आमच्या करवी अभिषेक केलात, आता एक हजार एक रुपये द्या. बधत नाही म्हटल्यावर: पाचशे एक द्या! निदान एक्कावन तरी!! पण मी कसलेला योद्धा होतो. आम्ही तसेच बाहेर पडलो. चपलांकरता मोजून दोन रुपये चपलाजोडीस घेऊन त्याने चपला परत केल्या. मला हे आवडले.


वाटेतली मकरारूढ नर्मदामैय्या दक्षिण तीरावरली जहाजागत दिसणारी इमारत


वाटेतली दुर्गेची मूर्ती; शिखरावरचे शिवालय, लेटे हनुमान मंदिर आणि ९० फुटी शिवप्रतिमा

मग पायी परिक्रमा करण्याबाबत माहिती काढली. कुणी म्हणत परिक्रमा दोन तासात होते. कुणी तीन तास सांगत तर कुणी साडेतीन सांगत होते. काल मांधाता पर्वताकडे पाहतांना आम्हाला पर्वतावर एक पायर्‍या पायर्‍यांची माळ वरपर्यंत जातांना दिसली होती. मग आम्ही विचार केला की तिनेच गेलो तर कदाचित तासाभरात परतही येऊ. काही जणांनी मग त्याचीही पुष्टी केली. आम्ही वरची वाट चालू लागलो.

हैदराबादच्या राजराजेश्वरी (पार्वती) प्रतिष्ठानातर्फे ही ९० फुटी शिवप्रतिमा उभारण्यात आलेली आहे. राजराजेश्वरीचे मंदिरही समोरच आहे. शिवप्रतिमेच्या उजव्या हाताला एक नर्मदेचे सुरेख मंदिर आहे. मांधाता पर्वताच्या शिखरावर पोहोचल्यावर दगडात गीतेचा श्लोक कोरलेला एक फलक दिसला. पुढे मग असे समजले की गीता परिक्रमा मार्गाचाच तो एक भाग आहे. इथे आम्हाला राजराजेश्वरी प्रतिष्ठानतर्फे वाटला जाणारा गरमा-गरम खिचडीचा प्रसादही मिळाला. तो प्रसाद वाटणार्‍याने थोडासा जमिनीवरही टाकला आणि काय आश्चर्य! पाहता पाहता अक्षरशः पाच, दहा, पंधरा, ... असंख्य छोटे छोटे पक्षी तिथे कुठूनसे उडत आले. खारी आल्या. चिमण्या आल्या. लालबुडे बुलबुल आले. दयाल आले. कितीतरी अनोळखी पक्षी आले आणि काही क्षणांतच तोही प्रसाद फन्ना झाला. आम्ही प्रसादच सेवन करत होतो. हात मोकळे करून कॅमेरे सज्ज करायच्या आतच, जागा जणू मोकळी झालेली होती. दोनचार पक्षी काय ते चित्रात गवसले.


राजराजेश्वरी मंदिर, प्रसाद खाणारे पक्षी, शेजारचे नर्मदा मंदिर आणि त्यातील मूर्ती

अशा रीतीने आम्ही मांधाता पर्वतशिखर तर गाठलेच होते. आता अमलेश्वर दर्शनही करणे आवश्यक होते. पण आम्ही तर नाश्ताही केलेला नव्हता. आम्ही अतिथीगृहात परतलो. नाश्तानुमा जेवण केले. थोडीशीच विश्रांतीही घेतली आणि अमलेश्वर दर्शनार्थ तिथे जाऊन पोहोचलो. तिथे दर्शनाला गर्दी दिसली. बारा वाजेपर्यंत भोग चढविले जात असल्याची सूचनाही लागलेली दिसली. आता काय करावे. तेवढ्यात हजार रुपयात नर्मदा-कावेरिका-नर्मदा अशी परिक्रमा नावेतून करवून आणतो असे सांगत एक माणूस आला. मी नदीच्या तीराकडे निघालो. तसा आणखी एक माणूस १०० माणशी दराने दहा माणसांच्या नावेतून तशीच परिक्रमा करवतो म्हणू लागला. परिक्रमेस साधारणपणे किती वेळ लागेल असे विचारल्यावर सुमारे एक तास म्हणाला. आम्ही कबूल झालो. नावेपाशी पोहोचलो तर आमच्याआधीच तिघे जण तिच्याशेजारी उभे असलेले दिसले. जितेंद्र, त्याची मामी आणि तिची मुलगी असे ते नातेवाईकच होते. जितेंद्रला नर्मदा-कावेरिका संगमात स्नान करायचे होते. आता आम्ही पाचजण झालेलो होतो. पण बराच वेळ झाला तरी परिक्रमेकरता कोणीच नवे माणूस येत नव्हते. शेवटी नाववाला असे म्हणू लागला की तुम्ही पाचजण मिळून आठशे रुपये देत असाल तर मी नाव न्यायला तयार आहे. आम्ही तयार झालो. नाव निघाली.


नावेतून दिसणारे ओंकारेश्वर मंदिर सकाळीच आम्ही ज्या मार्गाने गेलो होतो ती वाट


परिक्रमा करणार्‍यांना लाईफ जॅकेट घालावे लागे. रिकाम्या बंद बिसलरी बाटल्या पोत्यात भरून ..


संगम. डावीकडची नर्मदा. उजवीकडची कावेरिका. कावेरीकेचा प्रवाह जबरी होता. खळखळाटही खूप.


कावेरिकेत दूरवर उभारलेली आमची नाव, संगमातील स्नानानंतर आम्ही तिच्यात जाऊन बसलो.

संगमात जितेंद्रने आणि मी स्नान केले. ती मुले बसली आहेत त्या खडकाच्या आश्रयाने डुबकीही घेतली. पंधरा वीस मिनिटांतच आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. एकतर कावेरीकेचा जबरी प्रवाह आणि दुसरे म्हणजे आता आम्ही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात होतो.


नाव थांबवली, किनार्‍याला नेऊन बांधली आम्ही पाय-उतार होऊन किनार्‍यावरून पुढे गेलो

आता नावाड्याव्यतिरिक्त दोन सशक्त साहाय्यक आमच्या सोबत होते. उंच बांबूच्या रेट्याने ते नाव किनार्‍यापासून दूर राखण्याचे काम, आलटून पालटून करत होते. एके ठिकाणी मग कावेरिका खूपच अरुंद पन्हळीतून वाहू लागते. तिथे मध्य धारेचा वेग अफाट दिसत होता. त्यापूर्वीच काही अंतरावर नावाड्याने नाव थांबवली, किनार्‍याला नेऊन बांधली.


नाविकांची प्रवाहाविरुद्धची लढाई आणि पायी अडथळा पार करणारे आम्ही

आम्हा पाचही प्रवाशांना उतरायला सांगितले. वर असेही सांगितले की बर्‍याच अंतरावर दूर, जिथे कावेरिकेचा अरुंद पन्हळीतला प्रवास सुरू होत होता, त्याच्या पारपर्यंत चालत या. तिथे आम्ही नाव घेऊन जात आहोत. मग त्या तिघांनी नाव गतीमान असलेल्या अरुंद प्रवाहाच्या मध्यधारेत घातली. धारेच्या गतीने नाव हेंदकळतांना दिसत होती. वारंवार त्वरेने दिशा बदलतांना दिसत होती. तिघेही जण शर्थीने ती पुन्हा धारेत लावत होते. आम्ही किनार्‍यावर चालत चालत पुढे निघालो होतो.


वाटेतले मुळातील माती वाहून गेलेले वृक्ष आणि पुन्हा नावेत बसलेले आम्ही


कावेरिकेच्या उत्तर तीरावरील जैन सिद्धकूट मंदिराचे प्रवेशद्वार आणि दक्षिण तीरावरला गाय-बगळा


मग दिसू लागले ओंकारेश्वर ऊर्जाघर आणि ओंकारेश्वर धरण


डाव्या कोपर्‍यात अमलेश्वरनजीकचा पूल दिसू लागला, थोड्याच वेळात तो नजरेच्या टप्प्यात आला


उजवीकडच्या दगडी भिंतींची उंची घटत जाऊन मग ओंकारेश्वर दिसू लागले


अमलेश्वर मंदिर

जितेंद्र आणि कंपनी ओंकारेश्वराच्या तीरावर उतरली. आम्ही, ते मंदिर सकाळीच पाहून झालेले असल्याने आता परिक्रमा पूर्ण करून अमलेश्वरच्या तीरावर नावेतून उतरलो. धक्क्यापासूनही अमलेश्वरचे मंदिर दिसत नाही. किनार्‍यावरून वर चढत आम्ही मंदिरात पोहोचलो तेव्हा दुपारचे दोन वाजून गेलेले होते आणि गर्दीही ओसरलेली होती. निवांत दर्शन घेऊन आम्ही अतिथीगृहात परतलो. आम्ही ओंकारेश्वरला जाणीवपूर्वक दोन दिवसांचा मुक्काम ठेवलेला होता. एक दिवस अजून हाताशी होता. आम्ही सकाळीच उठून जमल्यास पायी “गीता-परिक्रमा” करण्याचा निश्चय केला. चालकास सकाळी सहा वाजताच तयार राहण्यास सांगून समाधानाने झोपी गेलो.

सकाळी उठलो. तयार झालो. मात्र पाहतो तर चालक अजून झोपेतच होता. त्याला आन्हिके आटपायला थोडासा अवधी दिला आणि मग पुलाकडे निघालो. आज काहीतरी विशेषच उत्सव असावा अशी गर्दी रस्त्यावर लागून राहिलेली दिसली. डोक्यावर मोठमोठाले ओझी घेऊन असंख्य स्त्री-पुरूष दर्शनाला निघालेले दिसत होते. काल ज्या पुलाजवळच्या वाहनतळापर्यंत आमचे वाहन गेले होते त्या ठिकाणाच्या सुमारे एक किलोमीटरभर आधीच पोलिसांनी गाडी रोखली. आमच्या परिक्रमामार्गावरील चालण्यात जातायेता मिळून दोन किलोमीटर भर तर पडलीच शिवाय वेळेचे गणितही चुकेल असे वाटू लागले.


ओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी १-उज्जयिनी 
ओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी २-इंदौर, महेश्वर 
ओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी ३-मांडू, ओंकारेश्वर 
ओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी ४-ओंकारेश्वर