लेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
लेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२०२३-०४-१४

डॉ. वासुदेव नारायण बेडेकर

 डॉ. वासुदेव नारायण बेडेकर 
(जन्मः २०-०२-१९१७, मृत्यूः १४-०४-२००४) 


ठाण्याच्या विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक असलेले डॉक्टर बेडेकर हे ठाणे शहराचे एक भूषण आहेत. त्यांच्याच प्रेरणेने ठाणे भारत सहकारी बॅंकेचीही स्थापना झाली. ठाण्यातील विद्याप्रसारक मंडळ, म्हणजे डॉक्टरांनी लावलेला एक ज्ञानदीपच होय.

विद्याप्रसारक मंडळाचे बोधवाक्यही
प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः
असेच आहे. ब्रम्हपुराणात व्यासांना वंदन करतांना आलेल्या पुढील श्लोकातून ते घेतले आहे. 


मूळ संस्कृत श्लोकः

नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र ।
येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः ॥ - उपजाति, ब्रम्हपुराण-२४६.११ 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२००४०८

उत्फुल्ल पद्मासम नेत्रवंता प्रदिप्तबुद्धा नमस्कार व्यासा ।
स्वये जये चेतविला दिवाची तुला पुरा भारत ज्ञात व्हाया ॥ - उपेंद्रवज्रा, ब्रम्हपुराण-२४६.११ 

डॉक्टर साहेबांच्या स्मृतीदिनी त्यांच्या स्मरणार्थ रचलेले हे शब्दचित्र.

विद्याप्रसारक मंडळः एक ज्ञानदीप (भुजंगप्रयात)

कसे स्वास्थ्य आरोग्य येथे असावे । कळण्यास तू वैद्य झालास कष्टे ॥
मिळावे कसे ज्ञान जो प्रार्थि त्याला । प्रशाला तुवा स्थापिली हे कराया ॥ १ ॥

असो स्वास्थ्य वा शिक्षणाची व्यवस्था ।
स्वतः कष्ट घेऊन केली उभी ती ॥
अवस्था सुधारार्थ जी सिद्ध केली । खरे स्वास्थ्य दे, ज्ञान दे, पुष्टि दे ती ॥ २ ॥

व्यवस्थापनाची पुढे जाण आली ।
समाजास दे ज्ञान ती सोय केली ॥
समाजात संस्थापुनी त्या व्यवस्था । समाजास जे लागले ते दिलेही ॥ ३ ॥

महाभारताच्या जयाच्या कथेला । रचोनी जसा लावला दीप व्यासे ॥
प्रसारार्थ विद्येचिये, मंडळासी । तुवा स्थापुनी रे दिवा लावलासी ॥ ४ ॥

समाजा जसे लागले जे तसे त्या ।
मिळो सर्व काळी, असे साधले त्वा ॥
तुझे कार्य नेती पुढे शिष्य तेही । नमू वासुदेवा, नमू मंडळाही ॥ ५ ॥ 

२०१७ हे वर्ष त्यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. १९३५ साली डॉ. वासुदेव नारायण बेडेकर यांनी ठाणे येथे विद्या प्रसारक मंडळाची स्थापना केली. प्रज्वलितः ज्ञानमयः प्रदीपः हे बोधवाक्य घेऊन त्यांनी आयुष्यभर विद्याप्रसाराचे कार्य केले.

अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या मनुष्याच्या तीन प्राथमिक आणि जीवनावश्यक गरजा. अर्थशास्त्रीय नियमाप्रमाणे कोणत्याही गरजा भागवण्यासाठी प्रयत्नांची गरज असते. प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने प्रयत्न करीत आपल्या कुटुंबाच्या गरजांचे समाधान करण्याचे प्रयत्न करते. पण हे सर्व प्रयत्न कौटुंबिक पातळीपुरते मर्यादित असतात. ठाणेकरंच्या नशिबाने ह्या सर्व गरजा सामाजिक पातळीवर भागवण्यासाठी सहा सात दशके स्वतःस समर्पित करणारे डॉ. वा. ना. बेडेकर, त्यांना लाभले.

कोणत्याही गरजांची पुर्ती करण्यासाठी शारीरीक आरोग्य आणि मानसिक सुदृढता असावी लागते आणि ह्या दोन गोष्टी प्राप्त झाल्यावर नोकरी किंवा व्यवसाय ह्याद्वारे अर्थाजन करावे लागते. डॉक्टरांना ह्या गोष्टीची अचूक जाण असल्याने त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य, समाजाचे आरोग्यरक्षण, शिक्षण आणि नोकरी-व्यवसाय ह्यासाठी खर्च केले.

वैद्यकीय पेशा स्वीकारल्याने निरोगी समाज निर्माण करणेही अंगभूत जबाबदारी त्यांनी स्वीकारली तथापि वैद्यकीय व्यवसाय डॉक्टरांनी धंदा म्हणून नव्हे तर धर्म म्हणून जोपासला. सध्याच्या काळात लोप पावलेली फॅमिली डॉक्टर ही संकल्पना त्यांनी आयुष्यभर राबवली, याची साक्ष अनेक ठाणेकर देतील.

वैद्यकीय क्षेत्राबरोबर डॉक्टरांनी ठाण्याच्या शैक्षणिक विकासासाठी अविरत प्रयत्न केले. अर्धशतकाहून अधिक काळ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्षपद संभाळताना डॉक्टरांनी, गोठ्यातील शाळेचे पूर्व प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण, मराठी तसेच इंग्रजी माध्यमातुन शिक्षण उपलब्ध असणार्‍या जनमान्य संस्थेत रुपांतर केले. चिखलातून कमळ उमल्याप्रमाणे ठाणा खाडीच्या दलदलीतून ज्ञानद्वीप निर्माण होण्यामागची खरी प्रेरणा डॉक्टरांचीच होती. पाचशे विद्यार्थी संख्येने सुरू झालेले स्थान, आज पंधरा हजारांवर विद्यार्थ्यांना कला, वाणिज्य, विज्ञान, विधी, तंत्रज्ञान, व्यवस्थापन, ग्रंथालय विज्ञान इत्यादी विविध विद्याशाखांचे पदवी व पदव्यूत्तर पातळीवरचे ज्ञानदान करत आहे. केवळ ठाण्यातीलच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातील हे एक आघाडीचे ज्ञानसंकूल बनले आहे. ही किमया डॉक्टरांच्या दूरदृष्टीची आणि अविरत कष्टांची आहे.

सहकारक्षेत्र आणि विषेषतः सहकारी बँकांबद्दल एकूण जनसामान्यात अविश्वासाचे वातावरण असणार्‍या काळात ठाण्यात आणखी एक सहकारी बँक स्थापन करणे म्हणजे काहींच्या मते वेडेपणाच होता, पण विशिष्ठ उद्दीष्टांनी प्रेरीत झालेली वेडी माणसे असल्याशिवाय समाजाची प्रगती होत नसते. अत्यल्प भांडवल आणि ठेवी ह्यांच्या पायावर सुरू झालेली ठाणे भारत सहकारी बँक उण्यापुर्‍या पंचवीसवर्षात एक आघाडीची बँक झाली आहे. ह्या बँकेने अनेकांना रोजगारप्राप्त करून देताना त्यांच्यातील उद्यमशीलतेला अर्थाची जोड दिली आहे.

डॉ वा. ना. बेडेकर हे नाव शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असून त्यांचे या क्षेत्रातील झालेले कार्य पाहता त्यांना शिक्षणमहर्षी असे म्हटले तर वावगे ठरू नये. त्यांनी विद्याप्रसारक मंडळाची अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळत व अनेक निष्ठावंतांच्या सहकार्यामुळे हिमालयाएवढे उत्तुंग कार्य केले. त्यांचा पेशा हा डॉक्टरी असल्यामुळे जसे त्यांनी अनेक अपत्यांना जन्माला आणले. त्याप्रमाणे मराठी व इंग्लिश माध्मय शाळा, कला, वाणिज्यविज्ञान महाविद्यालये, तंत्रनिकेतन, व्यवस्थापन विभाग ही सगळी त्यांची अपत्ये आहेत.

१९७४ साली व्यवस्थापन विभाग स्थापन झाला. १९९९-२००० या शैक्षणिक वर्षात पदव्युत्तर कोर्स (पीजी डी बी एम) सुरू केला. तेव्हापासून व्यवस्थापन विभागाने कात टाकली. आज ही संस्था अखिल भारतीय तंत्रशिक्षण मंडळ या संस्थेकडून मान्यता मिळालेली संस्था म्हणून दिमाखदारपणे उभी आहे. या सगळ्यांमागे डॉक्टरांची प्रबळ इच्छाशक्ती कारणीभूत आहे. ते स्वतः गमतीने म्हणायचे, मीसुध्दा व्यवस्थापन कोर्स करण्याचा विचार करीत आहे. पुढे विद्या प्रसारक मंडळाच्या कार्यकारिणीने व्यवस्थापन विभागाला त्यांचे नाव देण्याचे ठरविले व त्याचे नामकरण डॉ. वा. ना. बेडेकर संशोधन व व्यवस्थापन अभ्यास संस्था असे ठेवले.

डॉक्टर त्यांच्या वयाचा विचार न करता कष्ट करत असत. तरुण मंडळींना लाज वाटावी एवढे अथक परिश्रम त्यांनी व्यवस्थापन विभागाच्या जडण-घडणीत घेतले. इमारतीसाठी निधी उभा व्हावा म्हणून त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, सोव्हिनीअरसाठी जाहिराती मिळविणे यासाठी त्यांनी वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन केले. प्रसंगी त्यांनी त्यांचा ओळखीच्या व्यक्तीकडे जाऊन निधी संकलनासाठी मदत केली. एवढेच नव्हे तर त्यांनी स्वतः एक्याऐंशीव्या (८१) वाढदिवसासाठी मिळालेली ८१,०००/- रुपयांची थैलीसुध्दा व्यवस्थापनाच्या इमारतनिधीसाठी दान केली. यावरून त्यांचा मनाचा मोठेपणा व संस्थेशी त्यांची असलेली आपुलकी लक्षात येते.

विद्या प्रसारक मंडळाचे वर्तमान संचालक डॉ. विजय बेडेकर हे विद्या प्रसारक मंडळाच्या सगळ्या संस्थांना आपल्या बरोबर घेऊन मोठी झेप घेत आहेत. विद्या प्रसारक मंडळाच्या महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यंदाच्या सर्वच उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला आहे. विद्या प्रसारक मंडळाच्या या महाविद्यालयाबाबतच्या सर्वच उद्दिष्टांना भविष्यात देदिप्यमान सुयश लाभो हीच ह्यानिमित्ताने हार्दिक शुभकामना!


२०२१-०३-१७

अंतराळ शास्त्रज्ञ डॉ. कल्पना चावला

अंतराळ शास्त्रज्ञ डॉ. कल्पना चावला
(जन्मः १७ मार्च १९६२, मृत्यूः १ फेब्रुवारी २००३) 

कोलंबिया अवकाशयान दुर्घटनेतवयाच्या अवघ्या चाळिसाव्या वर्षीच तिचे अपघाती निधन झाले.

स्वप्नांतून यशांत उतरण्याचा मार्ग अस्तित्वात असतो. तुम्हाला तो दिसावा अशी दृष्टी लाभो, त्यावर मार्ग क्रमण्याचे साहस लाभो आणि त्याचा पाठपुरावा करण्याचे सातत्यही लाभो.” - डॉ. कल्पना चावला [१].

कल्पना चावला जाऊनही आता सुमारे दोन दशके होत आली, तरी आजही जगभरातील असंख्य युवा-युवतींची ती प्रेरणास्त्रोत बनून राहिलेली आहे. विशेषतः तरूण महिलांची. तिचा जन्म हरियाणा राज्यातील कर्नाल येथे १७ मार्च १९६२ रोजी, एका गरीब कुटुंबात झाला. तिचे वडील बनारसीलाल चावला हे पाकिस्तानातून फाळणीपश्चात भारतात यावे लागलेले हिंदू निर्वासित होते. आईचे नाव संयोगिता होते. उन्हाळ्याच्या दिवसांत ते सर्वच जण घराच्या छतावर झोपत असत. कल्पना आकाशातले तारे पाही. तिला तार्‍यांत जाऊन त्यांना हात लावावा वाटे. लहान असल्यापासूनच तिला अवकाशवेधाची स्पप्ने पडत असत. टागोर बाल निकेतन शाळेतून तिचे शालेय शिक्षण झाले.

भारतातीलफ्लाईंग क्लबअसलेल्या मोजक्या ठिकाणांतील एक गाव होतेकर्नाल’. तिथल्याफ्लाईंग क्लबपासून काही किलोमीटर अंतरावरच तिचे घर होते. तिचा भाऊ संजय तिथे विमानन प्रशिक्षणासाठी जात असे, तिला मात्र मुलगी असल्यामुळे वडिलांनी अशा प्रशिक्षणाची परवानगी दिली नाही. तिला छतावर जाऊन ती विमाने पाहत राहण्याचा छंदच जडला. शाळेत असतांना ती विमानांची चित्रे काढी तर महाविद्यालयात असतांना अभिकल्पन तंत्रज्ञानाच्या वर्गात विमानांचे नमुनेच तयार करत असे. दहावीत असतांनाच तिचा निश्चय झालेला होता की, आपण विमान उडवायचे. मंगळावरव्हायकिंगअवतरक उतरल्याचे फोटो पाहून तर तिला अवकाश भ्रमणाचे वेध लागले.

आकाशातील तार्‍यांत पोहोचण्याचे तिचे स्वप्न होते. पंजाब इंजिनिअरिंग कॉलेज, चंदिगढ येथून ती १९८२ साली, विमानन अभियांत्रिकीत (एरोनॉटिकल इंगिनिअरिंगमध्ये) बी.टेक झाली. मात्र तिथे प्रवेश मिळालेल्या सात मुलींपैकी फक्त कल्पनानेच विमानन अभियांत्रिकीत प्रवेश घेतलेला होता. असा विषय मुलींनी घेऊ नये अशीच तत्कालीन समाजाची धारणा होती. कल्पनाचा मात्र त्या विषयी जणू हट्टाग्रहच होता.

भारतातून त्याकाळी प्रत्यक्ष अवकाशात झेप घेणे शक्यच नव्हते. हे लक्षात आल्यावर, हर प्रयासे अमेरिकेत जाऊन, आपल्या उपजत बुद्धिमत्तेच्या आणि उत्साही स्वभावाच्या बळावर जगातील अत्यंत प्रगत देशात जाऊन, अत्यंत आधुनिकतम विषयात, अंतराळशास्त्रात तिने शास्त्रज्ञ म्हणून नाव कमावले. १९८३ साली व्यवसायाने विमानोड्डाण प्रशिक्षक आणि यानांच्या विजकीय प्रणालींचे लेखक असलेल्या जीन-पिअरे हॅरिसन यांचेशी तिचे लग्न झाले. तिचे आकाशातील तार्‍यांत जाण्याचे स्वप्नही सत्यात उतरले. त्याचीच ही स्फूर्तीप्रद कहाणी आहे [२].

१९८४ साली टेक्सास विद्यापीठ, अर्लिंग्टन, अमेरिका येथून अवकाश अभियांत्रिकीत ती एम.एस. झाली. १९८६ मध्ये तिने दुसरी एम.एस. पदवीही प्राप्त केली. मग कोलोरॅडो विद्यापीठ, बोल्डर, अमेरिका येथून अवकाश अभियांत्रिकीत पी.एच.डी. होऊन तिने १९८८ साली डॉक्टरेट मिळवली [३]. तिच्या शोधनिबंधाचा विषय होता, अस्थिर आवर्ती प्रवाहांच्या चालिकीचे संगणन आणि नियंत्रण (कॉम्प्युटेशन ऑफ डायनामिक्स अँड कंट्रोल ऑफ अनस्टेडी व्होर्टिकल फ्लोज).

’तिच्यापुढे कुणी आदर्श नव्हता. इंदिरेची ईर्ष्या, जे.आर.डीं.ची जिद्द, किरण बेदींचा कर्मवाद, एक एक प्रकाशकण वेचून तिनेच त्याचा ध्रुवतारा बनवला आणि त्याकडे पाहत ती पावले टाकत राहिली. एक नवी वाट निर्माण केली. मागच्यांसाठी आदर्श ठेवला. उल्केप्रमाणे ती क्षणार्धात अंतर्धान पावली. राख शरीराची होते. विचारांची, आदर्शांची राख करणारा अग्नी अजून जन्मलेलाच नाही. तिने असंख्यांच्या मनात प्रकाशाचे कण पेरले. ते रुजतील, फुलतील आणि त्या तारकापुंजातून तिचेच तेज फाकेल. तिने प्रत्यक्षात आणलेला संदेश अमर आहे. स्वप्नाकडून सत्याकडे जाणारी वाट खरोखरोखरीच अस्तित्वात आहे.’ – माधुरी शानभाग [४].

कल्पनाला विमानोड्डाण, पदभ्रमण, पदयात्रा आणि वाचनाची आवड होती. तिच्यापाशी एकल आणि बहुयांत्रिक, भुपृष्ठ आणि सागरी विमाने, वायूतरंगे (ग्लाईडर्स) विमानोड्डाण प्रशिक्षक असल्याबाबतची अनुज्ञा होती. त्यात विमानांकरताचा उपकरण दर्जाही समाविष्ट होता. हवाई कसरतींत आणि पुच्छचक्री (टेल-व्हिल) विमानांत तिला रस होता. अंतीमतः नासामध्ये रुजू होण्याचे तिचे स्वप्न साकार झाले.

अनुभवः १९८८ मध्ये कल्पनाने नासाच्या अमेस संशोधनकेंद्रात सशक्त-उचल संगणित द्रवचालिकी (पॉवर्ड लिफ्ट कॉम्प्युटेशनल फ्ल्युईड डायनॅमिक्स) विषयात कार्य सुरू केले. तिचे संशोधन, हॅरिअर सारख्या विमानांभोवती ’भू-प्रभावा’खाली अनुभवास येणार्‍या जटिल वायूप्रवाहाच्या अनुकारांवर केंद्रित होते. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर, तिने समांतर संगणकांवर प्रवाह-उकलक (फ्लो-सॉल्व्हर्स)  नकाशांकित करणार्‍या संशोधनास साहाय्य केले. सशक्त-उचल गणनाच्या आधारे प्रवाह-उकलकांच्या चाचण्या करण्याचे कार्य केले. १९९३ मध्ये, इतर हलत्या बहु-वस्तू समस्येच्या अनुकार विशेषज्ञ संशोधकांच्या सोबतीने, ’ओव्हरसेट मेथडस इन्कॉर्पोरेटेड’ या एका संशोधक संस्थेच्या स्थापनेत, कल्पना उपाध्यक्ष आणि संशोधक शास्त्रज्ञ म्हणून सहभागी झाली होती. विमानचालिकीय इष्टतमीकरण (एरोडायनॅमिक ऑप्टिमायझेशन) साध्य करण्याकरता प्रभावी तंत्रे विकसित करण्याची आणि ती सिद्ध करण्याची जबाबदारी तिच्यावर होती. कल्पना ज्या ज्या प्रकल्पांत सहभागी होती त्या प्रकल्पांचे निष्कर्ष परिषदांतून आणि नियतकालिकांतून वाचलेल्या शोधनिबंधांद्वारे व्यवस्थित दस्तबद्ध (डॉक्युमेंटेड) केलेले आहेत.

कल्पनाने १९९१ साली अमेरिकेचे नागरिकत्व पत्करले. मग तिने नासा ऍस्ट्रॉनॉट कॉर्प्समध्ये दाखल होण्याकरता अर्ज केला. मार्च १९९५ मध्ये ती त्यात रुजू झाली आणि १९९६ साली पहिल्या उड्डाणाकरता तिची निवडही झाली.

नासामधील अनुभवः डिसेंबर १९९४ मध्ये नासाने कल्पनाची नियुक्तीकरता निवड केली. मार्च १९९५ मध्ये कल्पना, जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये उमेदवार अंतरीक्षवीर म्हणून, अंतरिक्षवीरांच्या १५ व्या तुकडीत, रुजू झाली. एक वर्षाचे प्रशिक्षण आणि मूल्यांकन पूर्ण झाल्यावर कल्पना, अंतरिक्षवीर कार्यालय, वाहनबाह्य कार्यवाही (एक्स्ट्रा वेहिक्युलर ऍक्टिव्हिटी-ई.व्ही.ए.) आणि तत्संबंधी संगणक शाखांच्या तांत्रिक बाबींवर काम करण्यासाठी पथक-प्रतिनिधी (क्रू-रिप्रेझेंटेटिव्ह) म्हणून नियुक्त झाली. त्यानंतर यंत्रमानवी परिस्थिती जागरूकता दर्शक (रोबोटिक सिचुएशनल अवेअरनेस डिस्प्लेज) आणि अवकाशयान नियंत्रक कार्यप्रणाली चाचणी (स्पेसशटल कंट्रोल सॉफ्टवेअर टेस्टिंग) यांच्या विकसनाचे काम करण्याकरता मग तिची नियुक्ती, यानाच्या वीजकीय प्रणालीच्या समाकलन प्रयोगशाळेत (शटल एव्हिऑनिक्स इंटिग्रेशन लॅबोरेटरीमध्ये) करण्यात आली. नोव्हेंबर १९९६ मध्ये एस.टी.एस.-८७ मोहिमेकरताची मोहिम विशेषज्ञ आणि प्रमुख यंत्रमानव हस्तचालक (मिशन स्पेशॅलिस्ट अँड प्राईम रोबोटिक आर्म ऑपरेटर) म्हणून नेमण्यात आले. जानेवारी १९९८ मध्ये यान आणि स्थानक उड्डाण-पथक उपस्कराकरता पथक प्रतिनिधी (शटल अँड स्टेशन फ्लाईट क्रू इक्विपमेंट, क्रू रिप्रेझेंटेटिव्ह) म्हणून तिची नियुक्ती झाली. त्यानंतर तिने अंतरिक्षवीर कार्यालय पथक-प्रणाली आणि निवासयोग्यता अनुभागाचे नेतृत्व केले (लीड फॉर द ऍस्ट्रॉनॉट ऑफिसेस क्रू सिस्टिम्स अँड हॅबिटेबिलिटी सेक्शन). १९९७ मध्ये एस.टी.एस.-८७ मोहिमेसोबत आणि २००३ मध्ये एस.टी.एस.-१०७ मोहिमेसोबतही तिने अवकाश उड्डाण केले. एकूण ३० दिवस, १४ तास आणि ५४ मिनिटे ती अंतरिक्षात राहिली.

अवकाशयानाचा अनुभवः १९ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर १९९७ दरम्यान एस.टी.एस.-८७ या ’कोलंबिया’ मोहिमेचा पूर्ण अनुभव. हे अमेरिकेचे चौथे सूक्ष्मगुरूत्व कार्यकारी-भार उड्डाण (मायक्रोग्रॅव्हिटी पे-लोड फ्लाईट) होते. अंतरिक्षातील वजनहीन परिसराचा निरनिराळ्या भौतिक प्रक्रियांवर आणि सूर्याच्या बाह्य वातावरण थरांच्या निरीक्षणांवर कसा प्रभाव पडतो त्याचा अभ्यास करण्यासाठी अभिकल्पित प्रयोगांवर ते केंद्रित होते (फोकस्ड ऑन द एक्सपेरिमेंटस डिझाईन्ड टू स्टडी हाऊ द वेटलेसनेस एन्व्हिरॉनमेंट ऑफ स्पेस अफेक्टस व्हेरियस फिजिकल प्रोसेसेस अँड ऑन ऑब्झर्व्हेशन्स ऑफ द सन्स आऊटर ऍटमोस्फिहरिक लेअर्स). पथकातील दोन सदस्यांनी वाहनबाह्य कार्यवाहीही (अंतरिक्षचाल) केली. यात मानवी कृतीने ’स्पार्टन [५]’ उपग्रह पकडण्याचाही समावेश होता. भावी अवकाश स्थानक जुळणीकरताच्या वाहनबाह्य कार्यवाहीपात्र अवजारांची आणि पद्धतींची चाचणीही यावेळी करण्यात आली. एस.टी.एस.-८७ मोहिमेतील यानाने २५२ पृथ्वीप्रदक्षिणा ३७६ तास आणि ३४ मिनिटांत पूर्ण केल्या. याकरता त्याने एकूण ६५ लाख मैल अंतराचा प्रवास केला.

१६ जानेवारी ते १ फेब्रुवारी २००३ दरम्यानचे एस.टी.एस.-१०७कोलंबियाउड्डाण, विज्ञान आणि संशोधन मोहिमेस वाहिलेले होते. आळीपाळीने दिवसाचे २४ तास काम करून पथकाने यशस्वीरीत्या सुमारे ८० प्रयोग पूर्ण केले. १ फेब्रुवारी २००३ रोजी पृथ्वीवर उतरण्याच्या विहित वेळेच्या आधी १६ मिनिटे, अवकाशयानकोलंबियात्याच्या पथकासहित नष्ट झाले आणि मोहीम अवचितच संपुष्टात आली.

पारितोषिकेः मरणोत्तर काँग्रेशनल स्पेस मेडल ऑफ ऑनर, नासा स्पेस फ्लाईट मेडल आणि नासा डिस्टिंग्विश्ड सर्व्हिस मेडल.

कल्पनाच्या मृत्यूपश्चात २००३ साली, भारताच्या तत्कालीन पंतप्रधानांनी अशी घोषणा केली की, ’मेटसॅटही जी भारतीय हवामानशास्त्रीय उपग्रहांची मालिका आहे, ती यापुढे ’कल्पना’ या नावाने ओळखली जाईल. त्यानुसार १२ सप्टेंबर २००२ रोजी प्रक्षेपित केलेल्या मेटसॅट- या भारतीय उपग्रहाचे नाव ’कल्पना-१’ असे ठेवण्यात आले. २००४ साली कर्नाटक सरकारने तरूण महिला शास्त्रज्ञांना मान्यता देण्याकरता ’कल्पना चावला’ पारितोषिक देणे सुरू केले. नासाने आपल्या एक महासंगणकाचे नावच ’कल्पना चावला’ ठेवले. कल्पनाच्या स्मरणार्थ सुरू केलेल्या पारितोषिकांची, तिचे नाव दिलेल्या स्मारकांची सूची आजही मारुतीच्या शेपटाप्रमाणे वाढतच आहे. अर्लिंग्टन, अमेरिका येथील विद्यापीठाच्या एका हॉलचे नावहीकल्पना चावला हॉलअसे ठेवण्यात आले आहे.
उण्यापुर्या चाळीस वर्षांच्या तिच्या पृथ्वीवरील वास्तव्यात कल्पनाने उत्तुंग आकांक्षा कशा बाळगाव्यात, त्यांचा पाठपुरावा कसा करावा आणि मनोरथांना सत्यात कसे उतरवावे याचा आदर्श वस्तुपाठच घालून दिला आहे. कल्पना भारतीय आहे याचा आपल्याला अभिमान तर वाटलाच पाहिजे. ती मात्र भारतापुरती सीमित राहिली नाही. ती विश्वयात्री झालेली आहे.

कल्पना
शार्दूलविक्रीडित (अक्षरे-१९, यती-१२,७)

होती पाहत ती छतावरुनिया, रात्रींत तारे तयां
वाटे लावु बघून हात इतकी, साधी असे ’कल्पना’ ।
भाऊ संजय तो उडू शकतसे, छोट्या विमानांतुनी
होता काळ न तो असा कि तिजला, देउ शके संधि ती ॥ १ ॥

चित्रे काढत, स्वप्न रंगवित ती, आकाशी जाई जरी
कर्तृत्वे झळकून, मार्ग मिळता, नासात गेली खरी ।
उड्डाणे शिकली, विमानन पुरे, सारे तिने साधले
झाली डॉक्टर ती, खुशाल अवकाशा लक्षू ती लागली ॥ २ ॥

केले पूर्ण प्रशिक्षणास सगळ्या, लोकांसही भावली
चित्ताने स्थिर राहिली, चपळ ती, यानांत आनंदली ।
आकाशी उडली, खरेच अवकाशातून संचारली
लोकांना परि ’कल्पना’ न मिळता, आकाशि सामावली ॥ ३ ॥

नरेंद्र गोळे २०२१०२०६

संदर्भः

[१] डॉ. कल्पना चावला, लेखिका पृथ्वी मेहता  https://poc2.co.uk/2019/01/08/dr-kalpana-chawla-astronaut/  २५ जानेवारी २००३ रोजी ’कोलंबिया’ अवकाश यानातून कल्पनाने आपले प्राध्यापक, पंजाब अभियांत्रिकी महाविद्यालयातील वैमानिकी विभागाचे निवृत्त प्रमुख, डॉ. व्ही. एस. मल्होत्रा यांना पाठवलेल्या संदेशातील हे एक वाक्य आहे.

[२] रिमेबरिंग कल्पना चावला, द फर्स्ट इंडियन वूमन इन स्पेस. https://www.femina.in/celebs/international/life-and-journey-of-kalpana-chawla-36584.html

[३] अमेरिकन राष्ट्रीय वैमानिकी आणि अवकाश प्रशासन (नॅशनल एरॉनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन, नासा), मे-२००४. https://www.nasa.gov/sites/default/files/atoms/files/chawla_kalpana.pdf

[४] स्वप्नाकडून सत्याकडेः कल्पना चावलाची कहाणी, माधुरी शानभाग, मेहता पब्लिशिंग हाऊस, मार्च २००३, किंमत रु.८०/-

[५] खगोलशास्त्राकरताचे, यान-बिंदू स्वायत्त संशोधन अवजार (एस.पी.ए.आर.टी.ए.- शटल पॉईंट ऑटोनॉमस रिसर्च टूल फॉर ऍस्ट्रॉनॉमी). हा एक अंतरिक्षात वावरणारा मुक्त उपग्रहच असतो.

२०२१-०२-२०

विरक्तक धडक प्रक्रिया

विरक्तक म्हणजे अणू अंतर्गत विरक्त कण ज्याला इंग्रजीत न्यूट्रॉन म्हणतात. तसेच मराठीत विदलन म्हणजे इंग्रजीत फिजन. सर्वात अवजड अणूंवर विरक्तक धडकवल्यास घडून येणारी आण्विक प्रक्रिया म्हणजेच विदलन. मात्र विरक्तक धडक प्रक्रियांत, विरक्तकाच्या ऊर्जेवर तसेच लक्ष्य अणुच्या स्थिती व अवस्थेवर अवलंबून पुढील सहा निरनिराळ्या प्रक्रिया घडून येत असतात. अर्वाचीन साहित्यात वैज्ञानिक व्याख्या काव्यबद्ध करण्याचा हा प्रयास अनोखा तर आहेच, शिवाय अपार परितोषजनकही आहे. आपल्या वर्तमानात खंडित झालेल्या, पूर्वापारच्या सनातन सृजन परंपरेचा पाईक ठरणारा आहे.

१.     परस्पर स्वभावांतरण (ट्रान्सम्युटेशन),
२.     अनावरण आणि उचल (स्ट्रिपिंग अँड पिक-अप),
३.     विदलन (फिजन),
४.     विखंडन (स्पॅलेशन),
५.     विदारण (फ्रॅगमेंटेशन) आणि
६.     विखुरण (स्कॅटरिंग) 

या सहाही प्रक्रियांची वर्णने इथे काव्यात बांधण्याचा प्रयत्न केला आहे. काव्यात का? तर कमीत कमी शब्दांत सुबोध विवरण करण्याचा तोच एकमेव मार्ग आपल्या सांस्कृतिक परंपरेने आपल्याला दिलेला आहे. ’विदलन’ प्रक्रियेचे वर्णन ’मालिनी’ वृत्तात (अक्षरे-१५, यती-८, ७, लक्षणगीतः नमन नमन माना, वा यमाचा यमाचा) केलेले आहे. ते वगळता, इतर सर्व वर्णने ’शार्दूलविक्रीडित’ वृतात (अक्षरे-१९, यती-१२, ७, लक्षणगीतः मानावा समरा जनास समरा ताराप ताराप गा) केलेली आहेत.

जेव्हा घात विरक्तका धडकुनी केंद्रा अणूच्या घडे
तो र्‍हासा मग सोसतो निरनिराळ्या प्रक्रियांनी सहा ।
सार्‍या त्या धडका इथेच बघु या होती कधी कोणत्या
नावे ठेवत लोक ती ’विदलना’, व्याख्या न या जाणता ॥ १ ॥ - ६-विरक्तक-धडक-प्रक्रिया 

आपातीच विरक्तकास गिळुनी, मोठा अणू होतसे
होई अस्थिर तो मिळून सगळी, दोन्हींचि ऊर्जा तिथे ।
गाठाया स्थिरता त्यजून किरणे, होती ’स्वभावांतरे’
होई नष्ट मुळातला अणु, अणू ना पाहिलेला घडे ॥ २ ॥ - स्वभावांतरण 

जेव्हा कोन असा असे, न धडका होती, परी स्पर्शुनी
आपाती कण जाय, ओझरतची लक्ष्यास तो चाटुनी ।
तेव्हा तो विजकांस बाह्य ’उचली’, लक्ष्याचिया वेचुनी
या ऐशा घटना ’अनावरण’ या नावेच संबोधती ॥ ३ ॥ - अनावरण आणि उचल 

’विदलन’ घडवीते सारखे दोन खंड
विरजित कण दो वा तीन होतात मुक्त ।
सुटत बहुत ऊर्जा तीव्र या प्रक्रियेत
हर विदलनि ऊर्जा वीस कोटी विवोत ॥ ४ ॥ - विदलन 

विवो विजक वोल्ट, हे ऊर्जेचे एकक आहे. ही ऊर्जा ४.४५ x १०-२६ किलोवॉट-अवर म्हणजे विज एककांच्या समकक्ष असते.

विरजित कण- विरक्तक, न्यूट्रॉन         

जेव्हा कोन सुसंगती, धडकही हो थेट दोघांतली
होते पूर्ण ’विखंडना’ घडत ती ऊर्जांत स्थित्यंतरे ।
तेव्हा होत असे ’विदारण’, घडे दोन्ही कणांचा भुगा
आहे ही सगळ्यांत तीव्र घटना ऊर्जाहि सर्वाधिका ॥ ५ ॥ - विखंडन आणि विदारण 

सोसे घात विरक्तकास भिडता, जो तुल्यभारी अणू
तो तेव्हा सहसा स्वतःच ’विखुरे’, ऊर्जा तया देउनी ।
होते ही घटना असेल तुळती ऊर्जा अणूची यदा
आहे हे समजा ’विखूरण’, बसे धक्का अणूला तदा ॥ ६ ॥ - विखुरण


२०२०-०७-२१

वातावरणीय दाब

वातावरणीय दाब

लेखकः नरेंद्र गोळे २०२००७२१

वातावरण आपल्याला वेढून असते. पृथ्वी ही गोल आहे. मोठ्या चेंडूत लहान चेंडू अंतर्भूत असावा तशी वातावरणाच्या मोठ्या चेंडूत पृथ्वी कायमच राहत असते. पृथ्वीच्या पाठीवर कुठेही जमिनीपासून सुमारे १० किलोमीटर उंचीपर्यंत हे वातावरण म्हणजे वायूचे आवरण पसरलेले असते. सामान्यतः आपण ज्याला हवा म्हणतो ती हवा नत्रवायू (७९%) आणि प्राणवायू (२१%) ह्यांचे मिश्रण असते. आपल्या डोक्यावर सुमारे १० किलोमीटर उंचीपर्यंत जी हवा पसरलेली असते तिचे वजन आपल्या वजनाच्या सुमारे १५ पट असते. तरीही आपल्याला ते जाणवतही नाही कारण आपल्या शरीरातही त्याच दाबाने, तीच हवा आपण सतत श्वासोश्वासाद्वारे आतबाहेर करतच असतो.

हवेला वजन असते का? तर, हो. असते. पाण्याच्या एक हजारांश इतके कमी असते. पण असते जरूर. त्यामुळे एक एकक क्षेत्रावरील सुमारे १० किलोमीटर उंचीचा हवेचा स्तंभ तेवढ्याच क्षेत्रावरील जवळपास १० मीटर पाण्याच्या वजनाइतका भरेल. मग हे वजन एवढे आहे ह्याची प्रचिती आपल्याला कशी पाहता येईल?

आपण एक छोटासा प्रयोग करू या. एका छोट्या उभट पारदर्शक प्लास्टिकच्या भांड्यात पाणी भरून घेऊन, त्यावर आपण एक किंचित जाड पारदर्शक पण कुठेही न मुडपलेला असा प्लास्टिकचा कागद ठेवू. मग खाली डोके वर पाय पद्धतीने ते भांडे उलटे करू. कागद खाली असेल. भांडे वर. भांडे पाण्याने भरलेले असेल. मग खालून कागदाचा आधार आपण काढून घेऊ. तसे केल्यावर असे लक्षात येईल की पाणी त्या कागदावर उभे राहिले आहे. हे आश्चर्यकारकच आहे. का ते राहते असे. तर त्या कागदावर वरून असतो पाण्याचा दाब आणि खालून असतो हवेचा. पाण्याच्या पातळीवर हे दोन्हीही दाब जेव्हा परस्परास तोलून धरतात तेव्हा पाणी खाली पडत नाही.

चला तर मग पाहू या हा प्रयोग!


चलचित्रण श्रेयः सौ. संजीवनी गोळे 

चलचित्रण श्रेयः सौ. संजीवनी गोळे 

आता तुम्हीही हा प्रयोग करून पाहा. अतिशय सोपा आहे. मात्र काळजी ही घ्यायची आहे की, कागद व भांड्याची कडा, ह्यातून हवा भांड्यात शिरता कामा नये. आत जर हवा शिरली तर, त्याच ठिकाणातून पाणी बाहेर निघून जाईल आणि प्रयोग फसेल.

ह्यासाठी कागद साधारणतः ओव्हरहेड ट्रान्सपरन्सी असते तशा जाडीचा घ्यावा. कुठेही मुडपलेला नसावा. तो जर हाती धरला तर आपल्याच वजनाने कुठेही वाकू नये इतका कडक हवा.

जादूचे प्रयोग ते असतात जे जादुगार करू शकतो. इतर मात्र करू शकत नाहीत. ह्याउलट वैज्ञानिक प्रयोग ते असतात जे कुणीही करू शकतो. किंबहुना कुणालाही वर्णनाबरहुकूम करता येतात, त्या कृतींनाच वैज्ञानिक प्रयोग म्हणता येते. हे विज्ञान आहे. तेव्हा तुम्हालाही नक्कीच जमेल!

 वातावरण आपल्याला वेढून असते. त्याचा दाब असतो. ह्याची आपल्याला जाणीव करून देणे, हाच ह्या प्रयोगाचा उद्देश आहे. तुम्ही हा प्रयोग यशस्वीरीत्या करून पाहिलात म्हणजेच हा प्रयोग यशस्वी झाला आहे असे म्हणता येईल!

२०२०-०७-०१

राष्ट्रीय डॉक्टर दिवस

राष्ट्रीय डॉक्टर दिवस 
   
(जन्मः १ जुलै १८८२ रोजी बिहार येथे, मृत्यूः १ जुलै १९६२ रोजी) 

हा लेख सौ. संजीवनी गोळे ह्यांच्या फेसबुक वॉलवरून समायिक करून घेतलेला आहे.


आज १ जुलै. देशांतील डॉक्टरांप्रती तसेच आरोग्यसेवेतील सर्वच कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा तसेच त्यांना मान देण्याचा दिवस आहे. १९९१ पासून दरसाल १ जुलै हा दिवस डॉ. बिधान चंद्र रॉय यांच्या सन्मानार्थ ’राष्ट्रीय डॉक्टर दिवस’ म्हणून केंद्र सरकारद्वारा साजरा केला जातो. ह्या निमित्ताने संपूर्ण आरोग्य चिकित्सा सेवेतील व्यक्तींच्या कार्यावर प्रकाश टाकला जातो आणि त्यांचा सन्मान केला जातो. डॉ. बिधान चंद्र रॉय यांचा जन्म १ जुलै १८८२ रोजी बिहार येथे झाला. ते विख्यात डॉक्टर होतेच. पण त्याचबरोबर शिक्षक, समाजसेवक, कुशल राजकारणीही होते. ते एक स्वातंत्र्य सेनानी होते. त्यांनी FRCS (Fellowship of the Royal College of Surgeons) आणि MRCP (Magnetic resonance cholangiopancreatography) अशा दोन्ही पदव्या संपादन केल्या. त्यांनी त्यांचे जीवन लोकांच्या भल्यासाठी व्यतीत केले. सुदृढ आणि सशक्त समाजच स्वातंत्र्य मिळवू शकेल असे त्यांचे मत होते.

 शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी काही वर्षे कोलकत्ता मेडीकल कॉलेज, कॅम्पबेल मेडीकल कॉलेज, येथें प्राध्यापक म्हणून काम केले. त्यांनी जादवपूर टी. बी. हॉस्पिटल, चित्तरंजन सेवा सदन, कमला नेहरू हॉस्पिटल, चित्तरंजन कॅन्सर हॉस्पिटल आदींची स्थापना केली. चित्तरंजन सेवा सदन हे खास महिला आणि मुलांसाठीच होते. त्यांनी महिलांसाठी नर्सिंग प्रशिक्षणही सुरु केले. त्यांच्यासाठी वैद्यकी हा केवळ पेशा नव्हता तर सामाजिक कल्याण व उत्थानाचा सर्वात महत्त्वाचा मार्ग होता. स्वास्थ्यसेवा केवळ थोरामोठ्यांपर्यंतच नव्हे तर जनसामान्यांच्या आवाक्यात आणायचे त्यांचे उद्दिष्ट होते. कोलकात्यातील कित्येक मोठी शुश्रुषालये त्यांच्याच पुढाकाराने सुरू झाली. १९२८ मध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन (आय.एम.ए.) ची स्थापना झाली. त्यातही त्यांचा मोलाचा सहभाग होता. मोठमोठी पदे भूषवल्यानंतरही ते गरीब रुग्णांचा निःशुल्क इलाज करत असत. रुग्णांनाही असा विश्वास वाटे की, त्यांना रुग्णाकडे केवळ पाहूनच रोगाचे निदान होते. १९६१ साली आपल्या मृत्यूपूर्वीच आपली सर्व संपत्ती त्यांनी जनतेच्या नावे केली होती.

 ते पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री होते. पहिले मुख्यमंत्री प्रफुल्लचंद्र घोष हे होते. १९४८ पासून १४ वर्षे त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम पहिले. या काळात त्यांनी अनेक महत्वाची कामे केली. त्यांनी कित्येक संस्था, नगरे आणि विद्यापीठांची स्थापना केली. त्यांनी दुर्गापूर, कल्याणीनगर, विधाननगर, अशोकनगर, आणि हबरा ही पाच शहरे वसवली. त्यांना त्यांच्या उत्कृष्ट समाजसेवेसाठी ४ फेब्रुवारी १९६१ रोजी "भारतरत्न" या पुरस्काराने गौरवण्यात आले. १ जुलै १९६२ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

एरवीही सगळेच डॉक्टर्स, परिचारिका, रूग्णालयातील इतर मदतनीस दिवस रात्र काम करत असतात. सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तर त्यांना एखाद्या योद्ध्याप्रमाणे रूग्णांना बरं करण्यासाठी जणूकाही युद्धच लढावं लागतय. संपूर्ण अंगावर कवच घालून रूग्णसेवा करावी लागतीय. घरच्यांपासून दूर राहावं लागतय. हे संरक्षक कवच सलग ६ ते ७ तास अंगावर घालून रूग्णांची तपासणी करावी लागते. कितीही काळजी घेतली तरी संपर्कात आल्यामुळे काही डॉक्टरांना तसेच इतर मदतनीसांना कोरोना झाला आणि त्यातून ते सहिसलामत बाहेर आल्याची उदाहरणं आहेत.

सगळे प्रामाणिकपणे सेवा देत असतांना काही ठिकाणी मात्र गैरसमजामुळे किंवा अपवादात्मक एखाद्या डॉक्टरच्या चुकीमुळे उगाचच लोकांचा उद्रेक होऊन डॉक्टरांवर हल्ले होत आहेत. ह्याकरता गुन्हेगारांवर कठोर कारवाई करता यावी म्हणून केंद्र शासन वटहुकूम काढत आहे. तसेच केंद्र सरकारने कोरोना योद्ध्यांसाठी ५० लाखांचा विमा घोषित केलेला आहे.

अहोरात्र न थकता सेवा देणाऱ्या या मंडळींबद्दल आपण आज कृतज्ञता व्यक्त करूया आणि त्यांना सलाम करूया. डॉ. बिधान चंद्र रॉय ह्यांनाही ह्या निमित्ताने विनम्र अभिवादन!

२०२०-०६-२५

क्षणजीवी श्रीमंती


क्षणजीवी श्रीमंती
.
लेखकः नरेंद्र गोळे २०२००६२५
.
१ मार्च २०२० रोजी मुठभर शेंगदाणे कुंडीत पेरले. दोन दिवसांतच ते उमलून १५-२० रोपे उगवली. मग टाळेबंदी आली. ही रोपे टाळेबंदीतच मोठी झाली. आज सुमारे चार महिन्यांनंतर ती पाच फूट उंच झाली आहेत. जमिनीवर राहिली नाहीत तर त्याला जमिनीत शेंगाही लागणार नाहीत असे लोकांनी सांगितले. मी मात्र त्यांना वाढतील तसे वाढू दिले. सुमारे तीन महिन्यांची झाल्यावर ती चार फूट उंच होती. तेव्हा त्यांना बारीक बारीकपिवळी जर्द फुले लागायला सुरूवात झाली. जमिनीलगतच्या सुमारे फूटभर उंचीतच ही फुले लागत आहेत. त्यांचे आयुष्यही केवळ काही तासांचेच. संध्याकाळी ती सुकून जातात. मात्र डौल कमालीचा. रंग अफलातून. रूप... वर्णन काय करायचे फोटोच पाहा. मला मग रोज येणार्‍या नवीन फुलांचे फोटो काढायचा छंदच जडला. दररोज दोन दोनतीन तीन करतआजवर शेकडो फुले आली आहेत आणि त्यांचे हजारो फोटो माझ्याजवळ आनंदाचे निधान बनून राहिले आहेत. शेंगा येतील तेव्हा येतील. कदाचित येणारही नाहीत. मी मात्र फुलांच्या ह्या सौंदर्यानेह्या क्षणजीवी श्रीमंतीने खूश आहे. तुम्हालाही ती आवडतील असा विश्वास आहे.
.













































२०२०-०६-२२

यक्षाने मेघदूतास सांगितलेली गोष्ट


यक्षाने मेघदूतास सांगितलेली गोष्ट- पूर्वमेघ

संकलकः नरेंद्र गोळे २०२००६२२

कविकुलगुरू कालिदासाच्या मेघदूत ह्या महाकाव्यात मंदाक्रांता वृत्तातील एकूण ११८ श्लोक आहेत. त्यापैकी पूर्वमेघात ६४ आणि उत्तरमेघात ५४ श्लोक आहेत.

आज आषाढाचा पहिला दिवस. हा दिवस कालिदासाचा जन्मदिन मानला जातो.

त्याच्या मेघदूतातील श्लोकांचा सरळ अर्थच जर क्रमाक्रमाने लिहून काढला तर एक सुंदर कथाच तयार होते. रामगिरीवर यक्ष मेघाला सांगतो ती गोष्ट. त्याच्या जन्मदिनाच्या निमित्ताने ती गोष्टच का न सांगावी, असे वाटले. म्हणून ही इथे सादर करत आहे.
-------------------------------------------------
कुबेरः का रे बाबा आज उशीर का झाला?
यक्षः घरकामांत गुंतल्याने भानच राहिले नाही, महाराज! म्हणून उशीर झाला.
कुबेरः ज्या प्रेयसीच्या अर्दलीत असल्याने तुला आज उशीर झाला, त्या प्रेयसीला किमान वर्षभर दूरच केले पाहिजे. जा! आजपासून वर्षभर तुझी रामगिरीवर नियुक्ती केलेली आहे. तिकडे रुजू हो.
यक्षः जी, महाराज!
--------------------------------------------------
.


यक्षाने मेघदूतास 
सांगितलेली गोष्ट- पूर्वमेघ
.
झालं. अलकापुरीतून निष्कासित झालेला यक्ष रामगिरीवर येऊन पोहोचला. जनककन्येच्या स्नानोदकाने जेथले सरोवर पुनीत झाले आहे, अशा रामगिरीवरील गर्द छायेच्या वृक्षातळी राहू लागला.
.
अशाच विरहावस्थेत महिने गेले. खिन्न राहून राहून देह सुकला. हातातील कंकण ओघळू लागले. मग आषाढाच्या पहिल्याच दिवशी रामगिरीच्या शिखराशी प्रमत्त हत्तीसारखा धडका देतांना एक भव्यसा ढग दिसू लागला.
.
ढग पाहून एरव्हीही भावना उचंबळून येत असतात. इथे तर प्रेयसीपासून निग्रहाने दूर करण्यात आलेला यक्ष झुरत होता. त्याला भरून आले. त्याच्या लक्षात आले की, हा ढग तर तेथेच जाणार आहे. आपल्या प्रेयसीकडे. त्यामुळे तो सुखावला.
.
पुढे श्रावणात प्रियेला दिलासा मिळावा म्हणून निदान त्याच्या हाती कुशल कळवावे असा विचार त्याच्या मनात आला. तिला देण्याकरता कुड्याची फुले गोळा करून तो त्या मेघाचे स्वागत करू लागला.
.
धूमज्योति: सलिलमरुतां संनिपात: क्व मेघ:
संदेशार्था: क्व पटुकरणै: प्राणिभि: प्रापणीया: ।
इत्यौत्सुदक्यादपरिगणयन्गु्ह्यकस्तं ययाचे
कामार्ता हि प्रकृतिकृपणाश्चेतनाचेतनेषु ॥
.
      -
मेघदूत ५-१२८कविकुलगुरू महाकवी कालिदास, इसवीसनपूर्व ५५४ वर्षे
.
म्हणजे
.
पाणी, वारा, जलसहित ज्योती, घडे ज्या ढगाला ।
प्राण्यांद्वारे प्रेष्य हितगुजा, पाठवावे तया का ॥
औत्सुक्याने न गणुन मुळी, पाठवीले ढगा त्या ।
नाही तो जीवित, न उमजे मूढ कामातुरा त्या ॥
.
      - मराठी अनुवाद: नरेंद्र गोळे २०१५०५२३
.
मग त्याने चेतन अचेतन ह्यांतील फरकाकडे दुर्लक्ष करून त्यालाच प्रीतीचा दूत करण्याचा निर्णय घेतला. खूप तपशीलाने तिथवरचा मार्ग त्यास कथन केला. प्रिया ओळखावी कशी त्याचेही निरूपण केले आणि पाठवले त्यास प्रीतीचा संदेश घेऊन, हवेवर स्वार करून.
.
यक्ष ढगास म्हणतो, पुष्कर म्हणजे सरोवर. सरोवरांची पुनर्स्थापना करणार्‍या मेघांच्या थोर कुळात तू जन्माला आलेला आहेस. मी जाणतो की तू स्वतःच इच्छेचे प्रतीक आहेस. दैवाने प्रियेपासून दूरावलेला मी, तुझ्याकडे एकच मागणे मागतो. थोर आहेस. नाही म्हटलेस तरी चालेल. कारण असमर्थाकडे मागणी करून होकार मिळाला, तरीही त्यापेक्षा ते बरे असेल.
.
तू दुःखतप्तांचा कैवारी आहेस. कुबेराच्या अलका नगरीस जा. बाहेरील उद्यानात भालचंद्राची मूर्ती तुला तळपत असतांना दिसेल. तिथल्या भवनात जा. स्वामीकोपाने दुरावलेल्या माझ्या प्रियेस हा संदेश दे.
.
वार्‍यावर आरूढ झालेल्या तुला पांथस्थ पाहतील. माझी प्रियाही पाहील. तिचे विखुरलेले केस वार्‍यानेच उचलून तिला धीर दे. तू येतोस तेव्हा माझ्यासारखा प्रियेस सोडून कोण बरे झुरत असेल एरव्ही? अशी परवशता कुणासही न लाभो.
.
तुला सुरूवातीस हळुहळु नाद करणारा अनुकूल वारा लाभेल. डाव्या बाजूस, मिलनकाळ निकट पाहून बलाकमाला उडत असतील. आकाशातील ते दृश्य नयनरम्यच असेल.
.
१०
भावा, ह्या मार्गावरून अखेरीस तू तुझ्या वहिनीप्रत पोहोचशीलच. ती पतिव्रता दिवस मोजत, जीव जगवत असलेली तुला दिसेल. विरही स्त्रीचे कुसुमासम हृदय केवळ आशेनेच बांधून ठेवलेले आहे.
.
११
अवनीला सफल करणारी तुझी गर्जना ऐकून, कैलासाच्या पथावर उत्कंठेने राजहंसही तुझी सोबत करतील. मुखी कमळ घेऊन तेही मानसयात्रा करतील.
.
१२
निघतांना रामाच्या पदकमलांनी पावन झालेल्या ह्या रामगिरीला एकदा कवेत घेऊन तू निघ. त्यालाही तुझ्या भेटीने भरून येईल.
.
१३
आधी मी सांगतो तो मार्ग धर. नंतर जो संदेश तू नेणार आहेस तो ऐकून घे. दमशील तेव्हा तेव्हा डोंगरमाथ्यांवर विश्राम कर. थकवा वाटला तर वाटेवरील नद्यांचे पाणीही पी.
.
१४
तुला पाहून जणूकाय कुणीतरी हे गिरिशिखरच वाहून नेत आहे की काय, ह्या विचाराने स्तिमित होऊन सिद्ध नारी तुला कौतुकाने पाहतील. तू मात्र हे खाली दिसणारे सरस स्थान सोडून लगेचच उत्तरेकडे निघ. पर्वतशिखरांची टोके टाळून उत्तरेस लाग.
.
१५
असंख्य रत्ने समोर उमटावीत तसे इंद्रधनुष्य वारूळातून वर आलेले तुला दिसेल. त्यामुळे तुझा सरस निळा रंग आणखीनच शोभून दिसेल. मोरपिसाने श्रीकृष्ण शोभावा तसा तू शोभून दिसशील.
.
१६
पिकांचे भवितव्य तुझ्याच हाती असल्याचे जाणून शेतकर्‍यांच्या पत्नी भावविभोर होऊन तुझी वाट पाहत असतील. नांगरलेल्या मातीतून सुगंध स्फुरेल. मग पुन्हा तू उत्तरेस चालू लाग.
.
१७                                                              
वाटेतील वणवे शमवून तू येशील तेव्हा, तुझ्या अपेक्षेतच असलेला आम्रकूट पर्वत (पंचमढी) तुला शिरावर घेईल. केलेल्या उपकाराचा विसर अधमांनाही पडत नाही, मग त्याचेसारखा श्रेष्ठी ते विसरेल तरी कसा?
.
१८
त्याचे शिखर सर्वांगाने आम्रफळांनी बहरलेले असेल. त्यामुळे विहंगम दृश्य पाहणार्‍या देवादिकांना, मध्ये शामवर्ण असलेली अवनीची पर्वतशिखररूपी स्तने विस्ताराने तुलनेत उजळ दिसत असतील. त्यावर विखुरलेली तुझी छाया अवनीच्या वेणीसारखीच स्नेहल भासेल.
.
१९
क्षणभर तेथे विसावून वनचरांनी व्यापलेल्या कुंजावर वर्षाव करून पुढची वाट चाल. विंध्याद्रिच्या उंचसखल तळाशी गजांगशा शिळांतून वाहती रेवा तुला दिसेल.
.
२०
वन्य गजाच्या मदापरी गंध असलेले तिचे पाणी जांभुळवनांतून साचत साखळत वाट काढेल. अशा सर्व अडथळ्यांतून तुला वाहून नेतांना वार्‍यास किती अमाप ताकद लागत असेल! मात्र समर्थांचे सारेच महान असते. त्यांच्या पुढे असमर्थ अगदीच नगण्य होऊन राहतात.
.
२१
नदीतीरावर हिरवट पिवळ्या कदंब फुलांतील शुभ्र केसर सेवन करून गंधवती अवनीचा वास घेत पुढारणारी हरिणेच आनंदून तुला पुढचा मार्ग दाखवतील.
.
२२
मित्रा, तू जरी माझ्या कामाकरता सत्वर जाण्यास सिद्ध असशील तरीही, सुवासांतून, फुलाफुलांतून वेळ वाया जाईल. केकारव करून मोर सजल नेत्रांनी तुझे स्वागत करतील. तरीही प्रयत्नपूर्वक तू पुढील वाटचाल चालूच ठेव
.
२३
उद्यानांची कुंपणे केतकीच्या फुलांनी शुभ्र झालेली दिसू लागतील. वाटेवरील वृक्षावृक्षांवर कावळ्यादी पक्षांची घरटी तयार होऊ लागलेली असतील. माळव्यातील वने जांभळांनी रंगून जातील. तुझ्या सोबतीने राजहंस आपली परतण्याची वेळ ओळखतील.
.
२४
सर्व जगात माळव्याची राजधानी विदिशा विख्यात आहे. तिथे तुला विलासाचे साफल्य लाभेल. वेत्रवतीचे रसाळ नीर प्राशत असता, तिच्या पाण्यावरील तरंग तुला जणू भुवई उंचावणेच आहे असे भासेल.
.
२५
तिथे डोंगरावर जरा विसाव. तुझ्या सहवासाने कदंबपुष्पे पुलकित होतील. तेथील गुहा पूर्णरत वारांगनांच्या उत्कट प्रणयाने परिमळत असतील.
.
२६
विश्रांती घेऊन नदीकिनारीच्या उपवनांत ये. नवजलसिंचन करून जुईच्या कळ्यांना प्रसन्न कर. छाया देत असतांना माळिणींच्या सुखाची तजवीज कर.
.
२७
उत्तरेस निघालेल्यास वाटेवर नसला तरी, विशाल राजवाड्याचेही दर्शन घे. जिथे विजेच्या आघाताने चमकून भ्यायलेल्या स्त्रियांच्या कटाक्षांनी तुझे चित्त हरले नाही तर तुला मात्र दृष्टीच नाही म्हणावे लागेल.
.
२८
श्रुंगारातील स्त्रीचे पहिले बोल तिचे नेत्रविभ्रमच असतात. पक्षांच्या मालिकाच जिला कमरपट्ट्याप्रमाणे शोभत आहेत अशी, निर्विंध्या नदी, तिच्या जलांतून गिरक्या घेत तळाशी उतरत जाणार्‍या जलावर्ताद्वारे जणू तिच्या नाभीकडेच संकेत करत आहे. तुझ्यावर लुब्ध झालेल्या त्या निर्विंध्येचा तू आस्वाद घे.
.
२९
तू जाशील तेव्हा तिची धार आटून वेणीसारखी वाळलेली दिसेल. तीरावरल्या झाडांची शुष्क पाने तिला पांडुरकी करून टाकत असतील. तुझ्या वैभवाने पुन्हा सजल व्हायला ती आतूर आहे. ते साधेल असे तू करावेस.
.
३०
जेथल्या गावोगावच्या वृद्धांच्या तोंडी उदयनकथा सांगितल्या जातात, ती माळव्याची सधन नगरी अवंती तू पहा. स्वर्गस्थ जनांच्या सुकृताचे बळ घटल्यानेच जणू काय ते पृथ्वीवर अवतरले असावेत असे तिथले पौरजन तुला दिसतील.
.
३१
क्षिप्रेवरचा पहाटवारा, पक्षांची किलबिल, पहाटेस फुललेल्या कमळांचे गंध घेऊन येतो. स्त्रियांचा रत होण्याने आलेला शीण घालवतो. अंगांगास सौख्य देतो. जणूकाय त्यांचा प्रेमसखाच.
.
३२
तिथल्या बाजारांतील सुघटित मण्यांचे पाणिदार हार, दूरवर तेज पसरणारे पाचूसारखे तळपणारे हिरवे गवत, कोट्यावधी निरनिराळे शंख, शिंपले आणि पोवळी पाहून असे वाटते की, मग सागरात काय नुसते पाणीच राहिले आहे की काय?
.
३३
तिथल्या घरांतून विश्रांती घे. ती सुगंधी फुलांनी सुवासित असतात. गवाक्षांतील सुंदरींच्या केशपाशांना सुकविणार्‍या धूपांनी गंधित असतात. तिथे तुला पाहून दारात आनंदाने नाचणारे मोर असतील. ती घरे ललनांच्या पदरवाने रंगलेली असतील. छतावरील देखणी नृत्ये पाहून तर तुझा थकवा पार पळून जाईल.
.
३४
गंधवतीच्या पाण्यात स्नान करणार्‍या रमणींच्या रजोगंधाने आणि कमलसुवासांनी भारलेल्या उद्यानातील वार्‍यांनी पावन होत तू चंडीश्वराचे दर्शन घे. महादेवाच्या कंठागत तुझी नीलकांती पाहून ते तुझा सन्मान करतील.
.
३५
महाकाळास जाशील तेव्हा, इतर वेळी तेथे पोहोचल्यास सूर्यास्त होईपर्यंत थांबून राहा. शिवाच्या संध्यापूजेत गंभीर ताल श्लाघ्य समजला जातो. तेव्हा तू गरजशील तर तुझा डंका सफल होईल.
.
३६
नृत्य करीत असता कमरेवर मेखला रुमझुमणार्‍या, मणिरत्नांकित चवर्‍या वारून थकलेल्या गणिकांच्या हातांवर तुझ्या आगमनप्रसंगी आलेल्या तुषारांनी सुखावून, त्या आपल्या काळ्याभोर नेत्रांचे दीर्घ कटाक्ष तुजवर टाकतील.
.
३७
उंचावलेल्या बाहूंच्या मंडलांत जास्वंदीच्या फुलाप्रमाणे लाल रक्तिमा असलेल्या संध्यातेजात न्हालेल्या शिवांना तुझे आर्द्र चर्म नृत्यारंभी भेट दे. गौरी, ती भक्तलीला अनिमिष नेत्रांनी पाहतच राहील.
.
३८
तिथे रात्री रमणी आपापल्या घरी जाण्यास निघतील. राजमार्गावरही अंधकार असल्याने त्यांना वाटच दिसणार नाही. विजांच्या सुवर्णरेषांनी तू त्यांचे मार्ग उजळून टाक. मात्र तुझ्या त्या भयावह गर्जना करून त्यांना घाबरवू नकोस.
.
३९
तुझी सखी वीज, थकुन रात्री विसावेल. तेव्हा, ज्या सौधावर पारवे विसावा घेतात तेथे तूही धाव. सूर्योदय होताच तू जाग आणि मित्रकार्य हाती घे.
.
४०
रात्र दुजीसव काढून, प्रियकर पहाटे प्रियेचा रुसवा काढतो. अश्रू पुसतो. तसाच सूर्यही पुष्करणीतील कमळांचे दवही टिपतो. तेव्हा त्याचे आड तू आल्यास तो चिडेल.
.
४१
गंभीरेच्या शुद्ध पाण्यात केवळ छायारूपे शिरून त्यात तुझी रुचिर मूर्ती भरून टाक. कमळांप्रमाणे तिच्यावर तरणारे मासे हे तिचे कटाक्षच आहेत. तिच्या सवालांना उत्तर दे.
.
४२
तिच्या जलाचा सुनील शालू कटीतटाहून सरे
सावरता गर्दीत कराने, वेतलतांवर चिरे ।
वस्त्र ओढुनी तिथे थांबता, प्रयाण व्हावे कसे?
अंक अनावृत सोडुनि जाइल रसिक कोणता बरे ॥
.
मराठी अनुवादः कुसुमाग्रज
.
४३
तहान तृप्त होताच धरती गंधित श्वास सोडिल. तुझ्यासोबत वाहत देवगिरीला येणारे गार वारे काननांतील उंबरे पिकवतील. हत्ती आनंदित होऊन, सोंडेने उंबरांचे सेवन करतील.
.
४४
देवसेनेच्या रक्षणार्थ शंकराने निर्मिलेल्या सूर्याहूनही प्रखर तेजस्वी तेजाच्या स्वरूपात तिथे कार्तिकेय राहत असतो. स्वर्गगंगेच्या सलिली भिजल्या कामरूप पुष्पांचा तू त्यावर वर्षाव कर.
.
४५
तेथे शंकराच्या कपाळावरील चंद्राच्या दिप्तीने ज्याचे नील नेत्र चमकत आहेत अशा कार्तिकेयाच्या मयूराचे पीस, गौरी आपल्या पद्मासम कर्णावर धारण करते. त्या मयुरास, तू डोंगरकपारींतून आपली घनगंभीर गर्जना करून, आनंदाने नाचायला लाव.
.
४६
कार्तिकेयाची पूजा करून निघत असतांना, पावसाच्या भीतीने सिद्ध स्त्रिया तुला मार्ग करून देतील. तिथे तुला रन्तिदेवाच्या यज्ञाच्या कीर्तिची सरिताच भेटेल.
.
४७
त्या सरितेवर जलपानार्थ तू वाकशील तेव्हा तुला ती अरुंद भासेल. ते विहंगम दृश्य पाहून आकाशमार्गी म्हणतील की, हा जणू काय मोत्यांचा सरच आहे, ज्याचे मध्यभागी नीलमणी विराजमान आहे.
.
४८
ती ओलांडून, जरा विसावून, पुढे दशपूरच्या रम्य ललनांच्या भ्रुलतांचे विभ्रम पहा. तुला ते कुंदकळ्यांभोवती विहरणार्‍या भ्रमरांप्रमाणे भासतील.
.
४९
मग तू ब्रम्हावर्ती शिरून, जेथे सर्व भारत पराक्रमाने लढला ते कुरूक्षेत्र छायामात्रेण पाहा. तू कमळांवर जलधारा वर्षतोस, तसेच अर्जुनाने इथे नृपाळांवर शरवर्षाव केले होते.
.
५०
बंधुप्रेमाने रणक्षेत्र सोडलेल्या बलरामाने रेवतीच्या नयनांतील मदिरा सोडून, ज्या सरस्वती नदीचे पाणी प्यायले, ते पाणी रंगाने काळसर असले तरी तूही प्राशन कर, जेणे करून तू पावन होशील.
.
५१
तिथून तू कनखलला जा, जिथे पर्वतराजाच्या कुशीतून जन्हूकन्या जान्हवी म्हणजे गंगा अवतीर्ण होते. ह्याच गंगेच्या प्रपातांच्या पायर्‍यांवरून चढत सगरपुत्र स्वर्गात गेले. हीच गंगा उमेच्या भुवईरचनेस आपल्या फेसाळ लाटांनी जणू हसत असते आणि हीच गंगा शंकराचे कपाळीच्या चंद्रकोरीस स्पर्शून, त्याच्या बटांना धरत खाली कोसळत असते.
.
५२
देवांचा हत्ती पाणी पिण्यास वाकावा, तसा जेव्हा तू खाली झुकू लागशील तेव्हा, तुझी छाया तिच्या पाण्यात पडून जो रंग त्याला लाभतो त्यामुळे असे भासेल की, जणू यमुनाभेटीचाच प्रसंग ह्या ठिकाणी आला आहे की काय.
.
५३
तिचा उगमप्रदेश असलेल्या हिमालय पर्वतावर हरिणांना कस्तुरी गंध येतो. तिथे हिमशिखरांवर बसून विश्रांती घेतांना, शुभ्र नंदीच्या शिरी उकरलेला चिखल दिसावा तसा तू शोभून दिसशील.
.
५४
वणवा पेटून देवदारवन दाहक होते, त्यामुळे जळलेली त्वचा अतिशय जाच करते, अशा वेळी असंख्य जलधारांनी तू तो दाह शमव. दलितांचे दुःखनिवारण हेच तर साधूचे धन असते.
.
५५
चढून वर जाण्याकरता तू तो मार्ग सोडशील तर, पाय दुमडून जलद गतीने उडणारे शरभ तुला भिडतील. निष्कारण स्वतःची तारांबळ करून घेतील. जोराचा हिमवर्षाव करून त्यांना वनात पळवून लाव. कार्य करण्याचे प्रयास निष्फळ करणारे असेच हास्यास्पद ठरत असतात.
.
५६
तिथे शंकराची पावले स्पष्ट उमटलेली आहेत. योगी ज्याची पूजा करतात अशा पादुकांना तू प्रदक्षिणा घाल. श्रद्धेने असे केल्याने पापक्षालन होऊन, शाश्वतस्थान प्राप्त होते.
.
५७
रंध्रारंध्रांत वारा शिरून वेळू मुरलीसारखे वाजू लागतात. जणू काय किन्नरीच गोळा होऊन उमामहेश्वराची विजयगीते गात असाव्यात असे वाटते. त्याच वेळी गिरिकुहरांतून तुझी मृदंगासमान गर्जना होईल तेव्हा, हरचरणांशी संगीतवादनाचा जणू संचच परिपूर्ण होईल.
.
५८
हिमगिरीवरील दृश्यस्थाने पाहत पाहत, भृगुराज परशुरामाच्या पराक्रमाची साक्ष देणार्‍या, क्रौंच पक्षांचे थवे जेथून पार होतात त्या हंसद्वारी तू पोहोचशील. तिरपा होऊन तू त्यातून पार होशील तेव्हा, बळीस जिंकायला हरीच आपला शामल चरण उचलत आहे की काय असा भास होईल.
.
५९
वर गेल्यावर सुरांगनांचा जणू भव्य आरसाच आहे असा कैलास पर्वत तुला दिसेल. हाच पर्वत दशाननाने हलवला होता. तेथील शुभ्र कमळाप्रमाणे शोभणारी शिखरे पाहून असे भासते की, अंबरात जणू उमेश्वरच हसत आहे.
.
६०
काळ्या काजळापरी स्निग्ध असा तू जेव्हा त्या पर्वतावर जाशील, तेव्हा नुकताच हस्तिदंत कापलेला असावा अशी शुभ्रता तुझ्या समोर येईल. काळी कांबळ खांद्यावर घेतलेल्या बलभद्राप्रमाणेच ते दृश्य दिसेल.
.
६१
क्रीडाशैलावर सहलीकरता पार्वती तेथे येताच, हातातील सर्पकंकण सोडून, उमेचा हात हाती धरून जणू शिवशंकरच अवनीवर उतरत असतील. त्या पावलांचा स्पर्श व्हावा म्हणून घनरूप घेऊन तूच त्यांच्यासाठी निजदेहाची पायरी कर.
.
६२
तुझ्यातून जलधारा बरसू लागताच सुरांगनाही स्नान करू लागतील. ग्रीष्मातही जलतुषारांचे सौख्य अनुभवतील. मात्र त्यातून लवकर मोकळा न झाल्यास गर्जना करून त्यांना भीती दाखव.
.
६३
ज्यात स्वर्णकमळे निर्माण होतात त्या मानस सरोवराचे पाणी पी. ऐरावत त्यात स्नान करत असता त्यास सावली कर. कल्पतरूंची प्रावरणे फडफडव. अशा प्रकारच्या नाना सुखांचे आमिष तुला तेथे जाण्यात आहे.
.
६४
माझी अलकापुरी कैलासाच्या मांडीवरच तर वसलेली आहे. जणू काय गंगेचा ढळलेला शालूच भासते ती. मुग्ध कामिनीसारखी. वर्षाकाळी वेणीप्रमाणे डोक्यावर मेघमाला धारण करणारी रमणीच भासते अलका.

----------------------------------------------------------

उत्तरमेघ

संकलकः नरेंद्र गोळे २०२००६२२

तुझ्याप्रमाणेच गगनाला स्पर्शणारी नाना प्रकारची सदने इथे विराजतात, इंद्रधनुपरी चित्रे त्यांना भूषवत असतात, जलकणिकांपरी रत्ने असतात, विद्युल्लतेसम रम्य नारी राहतात, तुझ्या आवाजासारखाच मृदंग संगीताचा नादही इथे घुमत असतो.

कुंदाकुसुमांचे हार केसांत माळलेल्या, भांगात कदंबफुले ल्यालेल्या, कानावर शिरस मंजिरी धारण करणार्‍या इथल्या विलासिनी हाती कमळे बाळगतात. लोध्र परागांनी मुख रंगवतात.

इथे झाडावरील फुलांवर सदा भुंगे गुंजत असतात. कमळांभोवती हंसांचे थवे विहरत असतात. मोरपिसांनी सजलेले मोर केका देत असतात. रात्री तर अंधार न उरता केवळ चांदण्याची बहारच अनुभवास येत असते.

इथे अश्रू केवळ आनंदाचेच असतात. दाह केवळ मदनाचाच असतो. प्रणयी युगुलात विरह केवळ परस्परांतील रुसव्यानेच घडून येतो. इथल्या यक्षांचे वय कधीच तारुण्याहून निराळे नसते.

इथे असे प्रासाद असतात ज्यांचे तळ स्फटिकमण्यांनी सजलेले दिसतात. रात्री त्यावर नक्षत्रांच्या प्रतिबिंबांची फुले उमटतात. तुझ्या गरजण्याची आठवण करून देणारा गंभीर मृदंग वाजू लागताच, कल्पतरूची सुधा प्राशन करतात ज्यामुळे प्रीतीस गहरा रंग चढतो.

मंदाकिनीवरील वारे इथे गारवा देत असतात. नदीकिनारीच्या मंदारांची छाया सावली देते. सोनेरी वाळूत सोन्याचा मणी लपवून शोधायचा आणि त्याद्वारे अमरता प्राप्त करून घेण्याचा खेळ इथल्या बालिका खेळत असतात.

सैल निरी सोडिता सख्याने वसन रेशमी गळे
रूपगर्विता बावरती, ना काय करावे कळे
दिवे मालवाया उधळती गुलाल हातांतला
असती पण ते पुंज हिर्‍यांचे, प्रकाश ना मावळे! – मराठी अनुवाद कुसुमाग्रज

वार्‍याच्या रेट्याने प्रासादांत शिरून जलतुषारांनी तिथली चित्रे खराब करणारे तुझे आप्त, मग अपराधी भावनेने घाबरून बाहेर आलेले दिसत आहेत. धुरागत सर्वत्र विखुरलेले दिसत आहेत.

उत्तर रात्री गगन निवळतां नितळ शशीचे कर
द्रवुनि छतांतील चंद्रकांत, रस गळे मंचकावर
रमणांच्या विळख्यांतुनि झाल्या मुक्त तिथे अंगना
शीण रतीचा वारतील ते रत्नांचे पाझर! – मराठी अनुवाद कुसुमाग्रज

१०
यक्षांच्या वैभवशाली घरांत संपदा अचल वास्तव्य करते. सुरांगनांसह इथले यक्ष संगीतात कालक्रमण करतात. यक्षपतींचे जयगान जिथे किन्नर करत असतात अशा, नगरशीवेवर असलेल्या उपवनांत ते नेहमी विहार करतात.

११
सूर्य उगवताच तुला तेथील अभिसारिकांच्या रात्रीच्या कालक्रमणाची कथा, केसांतून ओघळलेल्या मंदार फुलांनी, पानांनी, सुवर्णकमलांनी, सुटुन राहिलेल्या कर्णफुलांनी आणि वक्षावरून मोकळ्या झालेल्या मोत्यांच्या झालरी व हारांनी विदीत होईलच.

१२
कुबेराचा मित्र शंकरच तेथे राहत असल्याने त्याला भिऊन मदन आपले धनुष्यच आत नाही. तरीही भुवईच्या विभ्रमांनी प्रेमी आपले लक्ष्य साधतातच. त्यामुळे त्याचे कार्य विनासायासच सफल होत असते.

१३
रंगीबेरंगी वस्त्रे, नयनांना नर्तन करायला लावणारी मद्ये, नानाविध लेणी, उमलती फुले व पल्लव, यक्ष स्त्री-पुरूषांच्या पायाला सजवायला आळते, हे सारे साहित्य मात्र एकटा कल्पवृक्षच पुरवत असतो.

१४
कुबेराच्या घराच्या उत्तरेस माझे घर त्यावरील इंद्रधनुषी रंगाच्या तोरणाने दुरूनच दिसू लागते. तिथे मंदाराचा वृक्ष माझ्या पत्नीने, मानलेल्या मुलासारखा जोपासलेला दिसून येईल. त्याचे मोहर, फुले, हाताला सहज यावीत अशा त्याच्या फांद्या वाकलेल्या आहेत.

१५
तिथे पाचूसारख्या शिळांचे घाट बांधलेली आमची पुष्करणी आहे. वैडुर्य मणीच जडवलेले आहेत असे भासणारे कोमल देठ असलेल्या सुवर्णकमळांनी ती फुललेली आहे. तिच्या पाण्यात अनेक हंस आनंदाने राहत असतात. तुला बघून ते म्हणतील की, कशाला उगाच मानस सरोवरी जाता? इथेच आहोत की आम्ही!

१६
तिच्या काठावर पिवळ्या कर्दळीच्या सुबक वर्तुळात निळा क्रीडाशैल उभारला आहे. लाडक्या सखेच्या नजरेसमोर तो सततच असतो. तुझी प्रिया सौदामिनी चमकून तुझी निळीसावळी तनू उजळून टाकते, ते पाहून मला तिचीच आठवण येते.

१७
अशोक आणि बकुळ वृक्षांना नवपल्लव फुटत असतात. लाल वेली त्यांना वेढून टाकतात. एक सखिला अर्धांगीनी करू चाहत असतो, तर दुसरा तिच्या मुखाने मदिरा प्राशन करू चाहत असतो. मला तर ते दोन्हीही हवे आहे.

१८
त्या दोन वृक्षांच्या मध्ये, पक्ष्यांकरता स्फटिकाचा सोनेरी पार बांधला आहे. हिर्‍यांनी, पाचूंनी तो मढवला आहे. संध्याकाळी त्यावर तुझा मित्र, मोर येत असतो. ज्याला माझी प्रिया ताल धरून नाच करायला लावते.

१९
ह्या खुणा लक्षात घेऊन तू आमचे घर शोधून काढ. त्याच्या दारापाशीच शंख, पद्म रेखलेले दिसतील. मात्र मी दूर असल्याने त्यात उत्साह असणार नाही. सूर्यास्त होताच तेथील कमळेही मिटून जातील.

२०
त्या क्रीडाशैलावर उतरण्यासाठी तू बालगजाप्रमाणे छोटा होऊन खाली ये. काजवे लुकलुकावेत तसे विजांचे मंद तेज पसरव आणि घरात पाहून तिची चाहूल घे.

२१
ती, पिकलेल्या तोंडल्यासारखे लाल ओठ असलेली, प्रसन्न दंतपंक्ती असलेली, हरिणीप्रमाणे मोठे डोळे असलेली, सिंहकटी, सघन नितंबांनी भारावलेली, स्तनभारांनी वाकलेली, सावळी युवती आहे. तिला पाहून, स्त्रीची विधात्याने घडवलेली प्रथम मूर्ती जणू हीच असावी असे भासते.

२२
विरहाने व्याकु झालेली माझा दुसरा प्राणच असलेली माझी पत्नी मितभाषिणी आहे. सहचर नसल्याने चक्रवाकी [१] प्रमाणे ती एकाकी जीवन जगत आहे. हिवाने कोळपलेली जणू पद्मिनीच भासत असेल ती.

२३
माझ्या पत्नीचे डोळे रडून रडून सुजलेले असतील. उष्णश्वसनाने ओठांवर काळिमा पसरला असेल. केस मोकळे सोलेले असतील. ओंजळीत मुख लपवून ती खिन्न बसलेली असेल. तू आड आल्यावर चंद्रमा काळवंडतो तशीच ती निस्तेज दिसेल.

२४
तू तिला पाहशील तेव्हा ती पूजा करत असेल किंवा विरहाने कृश झालेल्या अशा माझे चित्र कल्पून रंगवीत असेल अथवा पिंजर्‍यातील मैनेला विचारत असेल की, तू त्यांची आवडती होतीस. तुला ते आठवतात का?

२५
मळकट कपड्यांतच वीणा मांडीवर घेऊन माझ्यावर रचलेली गीते गाण्यास सिद्ध झालेली दिसेल. अश्रुंनी भिजलेल्या तारा मोठ्या प्रयासाने छेडत असता, तिला जणू स्वतःचीच रचना स्मरत नसावी असे भासेल.

२६
विरह जडला तेव्हापासून शापाचे किती दिवस पूर्ण झालेले आहेत आणि किती शिल्लक राहिलेत ह्याची, परडीतील फुले जमिनीवर रचून ती गणना करत असेल. माझ्या संगतीत असल्यासारखी किंवा कल्पनेतच तशी वावरत असलेली ती दिसेल. पतीविरहिणी स्त्रिया सामान्यतः अशाच रीतीने आपले मन रिझवत असतात, नाही का?

२७
दिवसा कामांत व्यग्र असल्याने तिला विरहाचा एवढा त्रास होत नसेल. रात्री मात्र दुःख गांजत असेल. माझी वार्ता कळवण्यासाठी, अर्धरात्री तू तिला खिडकीतून पाहशील तर ती जमिनीवरच लवंडलेली दिसेल.

२८
दुःखाने क्षीण होऊन, विरहव्यथेतच लवंडलेली असल्याने कुशीवरच पहुडलेली असेल. चंद्रकोरी प्रमाणे कृश दिसेल. एरव्ही माझ्यासोबत आनंदात जे तिचे क्ष जात असत, ते आता ती उष्ण अश्रुंतच घालवीत असेल.

२९
खिडकीच्या जाळीमागे अमृतमय चांदणे उमलत असतांना पूर्वप्रेमाने ती तिकडे जायला वळेल. डोळे दुःखाने पाणावल्याने लगेचच माघार घेईल. पावसाळ्यातल्या सूर्यफुलाप्रमाणे मिटतही नाही आणि उमलतही नाही अशी तिची अवस्था झालेली दिसेल.

३०
निश्वासांनी ओठ सुकून गेलेला असेल. तेलावाचून शुष्क झालेले केस चेहर्‍यावरून दूर सारत असेल. स्वप्नात तरी स्वामींची भेट व्हावी म्हणून तरी झोप यावी अशी इच्छा करत असेल. मात्र डोळ्यातील अश्रुंच्या पुराने तीही इच्छा फलद्रुप होत नसेल.

३१
विरह झाला त्या दिवशीच बांधून ठेवलेले केस शापाच्या अखेरीसच मी मोकळे सोडावेत अशी तिची अपेक्षा असेल. नखे वाढलेल्या हातांनी, एकच वेणीही, ती मागे सारत असेल.

३२
दुःखाने ती वाळली असेल. वियोगापायी आभूषणे उतरवून ठेवलेली असतील. वारंवार शय्येवर अंग टाकून देत असेल. तूही अश्रुंप्रमाणे जल वर्षशील. ओलावा असेल तर तिथे करुणा व्यक्त होतच असते.

३३
तिच्या हृदयातली गहिरी दुःखभावना मी जाणतो. खरे तर त्यातून माझ्यावरील प्रेमच व्यक्त होत असल्याने, हे भाग्यच म्हणायचे पण आता ते बोलायलाही नको वाटते. तू तिला डोळ्यांनी पाहशील तेव्हा तुला पटेल की, ह्यात मुळीच काही खोटे नाही.

३४
केस शुष्क असतील, हरिणीसारखे डोळे काजळाविहीन असतील. मदिरेविना भुवयांना विभ्रमांचा विसरच पडलेला असेल. तुझ्या आगमनाने शुभ वार्ता जाणवून, तिच्या धावणार्‍या तिच्या मीन अक्षांमुळे नेत्रकमळेच हलत आहेत, असा तुला भास होईल.

३५
अंक सखीचे नखक्षतांविण विरही ते बापुडे
मर्दन ज्यांचे या हाताने सुरतानंतर घडे ।
नव कदलीचे रसरसलेले कांड गौर गोमटे
वरी न रशना मोत्यांची, ते स्फुरतील डावीकडे ॥ - मराठी अनुवादः कुसुमाग्रज

३६
माझी कांता जर निद्राधीन असेल, तर घडीभर आवाज करू नकोस. तसाच उभा राहा. तिला कदाचित स्वप्नांत माझे दुर्लभ दर्शनही घडलेले असू शकेल. स्वप्नातही जर मिठी सुटली तर ती व्याकूळ होईल.

३७
वार्‍याच्या झुळुकीने तिला जागी कर. मालतीच्या कळ्या पहाटेच्या दवाने जाग्या व्हाव्यात तसे तिला तुषारांनी प्रफुल्लित होऊ दे. ती मानिनी चकित होऊन तुला बाहेर खिडकीत उभा असलेला पाहील. तिला निरखण्यास वीज लखलखवून आत पाहा आणि हळुहळु तिच्याशी बोलू लाग.

३८
तिला सांग की, मंगले मी तुझ्या नवर्‍याचा प्रिय सखा मेघ आहे. त्याचे शब्द हृदयी धरून मी इथवर आलेलो आहे. तुझा नवरा तुझी वेणी सोडवण्यास उत्सुक आहे. अधीर आहे. हे तिला कळव.

३९
हे ऐकताच ती, अशोकवनात सीतेने मारुतीकडे पाहावे त्याप्रमाणे, आतुरतेने वर पाहील. तुझे शब्द ऐकण्यास ती कानात प्राण आणून ऐकू लागेल. पतीच्या मित्राकडून कळणारी वार्ता, स्त्रीस नेहमीच अपुरी भासत असते.

४०
हे आयुष्यवंता, तिला माझे बोलणे ऐकून कृतार्थ व्हायचे असेल तर, तिला सांग की, तुझा पती रामगिरीवर राहत आहे. तो विचारतो आहे की, घरी तू खुशाल आहेस ना? आपत्काळी जवळच्या नातलगांना असेच तर विचारतात ना?

४१
दैववशात दूर राहावे लागते आहे. विरह दग्ध करतो आहे. अश्रुंचे सडे पडत आहेत. मनोमन तुझ्या तनुलतेची कल्पना करून सदेह तुला भेटावे असा मनाला छंदच जडत आहे.

४२
मैत्रिणींसमोर सांगता येऊ नये असे कुठलेही रहस्य नसतांनाही, उगाचच कानाशी येऊन, गालास स्पर्श करून, अधीरतेने तुला माझे व्यथित अंतर कळवावे, ते आता माझ्या नजरेच्या पल्ल्याबाहेर असलेला माझ्या मित्राकरवी करावे लागत आहे.

४३
लता तुझी कोमलता दावते, तर चंद्रमा मुखमंडल. मोरपिसारा पाहून मी म्हणतो की, हा तिचाच केशसंभार आहे जणू. जललहरींतून भ्रुनर्तन कळते, हरीणी तुझे नेत्र दर्शवतात. मात्र हाय, तुझी ती संपूर्ण कोमल आकृती मात्र काही केल्या प्रकट होत नाही.

४४
तू रुसलेली आहेस. असे चित्र मी कधी शिळेवर चितारण्यास बसतो. मी तुझ्या पायाशी याचना करतो. अशी कल्पनाच डोळ्यांतून अश्रुपातास सुरूवात करते. दिसेनासेच होते. अशा प्रकारे होऊ शकणारी आपली भेटही जणू नशीबास पाहवत नसावी!

४५
तू प्रियेसाठी अंतराळात भुजा पसरून असतोस तेव्हा ते पाहून, स्वप्नातही मी ती दिसताच तिला मिठी घालू पाहतो. तेव्हा स्थानिक देवतांचे जणू अश्रूच असावेत असे जलबिंदू ठिबकतात.

४६
देवदार वृक्षांचे कोंब खुडून अर्कस्त्राव गोळा करतात, त्याचा सुगंध वार्‍यासोबत वाहत इथवर येतो. ते थंडगार वारे तुलाच स्पर्शून आलेले असावेत म्हणून मी त्यांची गळाभेट घेत असतो.

४७
न संपणारी रात्र चुटकीसरशी कशी संपवावी किंवा सर्वकाळ होणारी तगमग कशी थांबवावी असा विचार करत असतो. पण मार्ग सुचत नाही. विरहवेदना काही खळत नाही.

४८
निग्रहाने मी जीव सांभाळत आहे. तूही मनातून भीती काढून टाक. कुणाला आयुष्यात केवळ सुखच मिळते किंवा केवळ दुःखच मिळत असते. चाक गोल फिरतांना धावही वरखाली होतच राहते.

४९
शाप संपेल. शेषशय्या सोडून विष्णू कार्यरत होईल. चातुर्मासात बंद डोळ्यांनी केलेल्या कामना समोर येतील. त्या सर्व आपण शरदाचे चांदणे पूर्ण बहरात असतांना उपभोगू.

५०
आठवते का तुला, एकदा तू गळ्यात हात घालून निजली होतीस. अचानकच जाग आली. डोळ्यातून अश्रू ओघळले. तुला खोदून खोदून विचारल्यावर लाजून सांगितलेस की, स्वप्नात मी तुमच्यासोबत निराळीच कामिनी बघितली होती!

५१
आठवणीची ही खूण ओळखून माझ्या क्षेमाविषयी शंका नसू दे. दुरावल्याने प्रीती कमी होते असे लोक बोलतील. ते बोलू देत. विरह न अनुभवताच ते तसे बोलत असतात. दुरावण्याने उलट प्रीती दृढच होत असते.

५२
अशा प्रकारे विरहव्याकुळ वहिनीला प्रथम आश्वस्त करून नंदीच्या पायांनी उकरले जाणारे ते शिखर तू जलदीने सोड. वेगाने वाहत पुन्हा इथे परत ये. तिच्या संकेतांसह तिचे कुशलही मला इथे येऊन सांग. पहाटेच्या कुंदफुलाप्रमाणे माझा जीव गळू पाहत आहे तो सावरून घे!

५३
तुझा मित्र सुखी व्हावा ह्याकरता तू हे करशील ना? अबोल राहून निदान तू नाही म्हणत नाही आहेस असेच मी मानतो. कोणतीही वल्गना न करता तू चातकांना जीवन देतोस. सुजन आपल्या कृतीनेच उत्तर देत असतात. हाच तर त्यांचा गौरव आहे.

५४
माझी ही प्रार्थना फारशी उचित नाही हे मी जाणतो, तरीही मनाला तुझी स्नेहभावना दिलासा देते आहे. वर्षावैभव मिळवून तू तुझ्या प्रियेसह –सौदामिनीसह- रत हो. तुझ्या नशीबी ही विरहवेदना मात्र कधीही येऊ नये!

कालिदासाची ही कल्पनाच बहारीची आहे. मात्र ज्या तपशीलांनी त्याने ती वर्णिली आहे, त्यामुळे त्याच्या माहितीचे कौतूक केल्यावाचून राहवत नाही.

संदर्भः

१.     मेघदूत, क्लाऊड मेसेंजर, डॉ.चिंतामणराव देशमूख, सरिता प्रकाशन, द्वितियावृत्ती १९७४, रु.२०/-, पृष्ठेः ९५.
२.     मेघदूत, कुसुमाग्रज, पॉप्यूलर प्रकाशन, प्रथमावृत्ती १९५६, रु.१०/-, पृष्ठेः ६८.
३.     कालिदास, वा.वि. मिराशी, साहित्य संस्कृती मंडळ, प्रथमावृत्ती १९३४, रु.१४०/-, पृष्ठेः २०६.



[१] चक्रवाक पक्षी नेहमी जोडीने राहतात. जोडीतील एक पक्षी मेल्यावर दुसरा पक्षी आणखी संगत धरत नाही. तो आपल्या जोडीदाराच्या आठवणींतच उर्वरित आयुष्य कंठतो. असा समज संस्कृत साहित्यात प्रचूर आहे.