यक्षाने
मेघदूतास सांगितलेली गोष्ट- पूर्वमेघ
संकलकः नरेंद्र गोळे २०२००६२२
कविकुलगुरू कालिदासाच्या मेघदूत ह्या महाकाव्यात
मंदाक्रांता वृत्तातील एकूण ११८ श्लोक आहेत. त्यापैकी पूर्वमेघात ६४ आणि
उत्तरमेघात ५४ श्लोक आहेत.
आज आषाढाचा पहिला दिवस. हा दिवस कालिदासाचा
जन्मदिन मानला जातो.
त्याच्या मेघदूतातील श्लोकांचा सरळ अर्थच जर
क्रमाक्रमाने लिहून काढला तर एक सुंदर कथाच तयार होते. रामगिरीवर यक्ष मेघाला
सांगतो ती गोष्ट. त्याच्या जन्मदिनाच्या निमित्ताने ती गोष्टच का न सांगावी, असे
वाटले. म्हणून ही इथे सादर करत आहे.
-------------------------------------------------
कुबेरः
का रे बाबा आज उशीर का झाला?
यक्षः
घरकामांत गुंतल्याने भानच राहिले नाही, महाराज! म्हणून उशीर झाला.
कुबेरः
ज्या प्रेयसीच्या अर्दलीत असल्याने तुला आज उशीर झाला, त्या प्रेयसीला किमान
वर्षभर दूरच केले पाहिजे. जा! आजपासून वर्षभर तुझी रामगिरीवर नियुक्ती केलेली आहे.
तिकडे रुजू हो.
यक्षः
जी, महाराज!
--------------------------------------------------
.
.
१
झालं.
अलकापुरीतून निष्कासित झालेला यक्ष रामगिरीवर येऊन पोहोचला. जनककन्येच्या
स्नानोदकाने जेथले सरोवर पुनीत झाले आहे, अशा रामगिरीवरील गर्द छायेच्या वृक्षातळी
राहू लागला.
.
२
अशाच
विरहावस्थेत महिने गेले. खिन्न राहून राहून देह सुकला. हातातील कंकण ओघळू लागले.
मग आषाढाच्या पहिल्याच दिवशी रामगिरीच्या शिखराशी प्रमत्त हत्तीसारखा धडका देतांना
एक भव्यसा ढग दिसू लागला.
.
३
ढग
पाहून एरव्हीही भावना उचंबळून येत असतात. इथे तर प्रेयसीपासून निग्रहाने दूर करण्यात
आलेला यक्ष झुरत होता. त्याला भरून आले. त्याच्या लक्षात आले की, हा ढग तर तेथेच
जाणार आहे. आपल्या प्रेयसीकडे. त्यामुळे तो सुखावला.
.
४
पुढे
श्रावणात प्रियेला दिलासा मिळावा म्हणून निदान त्याच्या हाती कुशल कळवावे असा
विचार त्याच्या मनात आला. तिला देण्याकरता कुड्याची फुले गोळा करून तो त्या मेघाचे
स्वागत करू लागला.
.
५
धूमज्योति:
सलिलमरुतां संनिपात: क्व मेघ:
संदेशार्था:
क्व पटुकरणै: प्राणिभि: प्रापणीया: ।
इत्यौत्सुदक्यादपरिगणयन्गु्ह्यकस्तं
ययाचे
कामार्ता
हि प्रकृतिकृपणाश्चेतनाचेतनेषु ॥
.
- मेघदूत ५-१२८, कविकुलगुरू महाकवी कालिदास, इसवीसनपूर्व ५५४ वर्षे
- मेघदूत ५-१२८, कविकुलगुरू महाकवी कालिदास, इसवीसनपूर्व ५५४ वर्षे
.
म्हणजे
.
पाणी, वारा, जलसहित ज्योती, घडे ज्या ढगाला ।
प्राण्यांद्वारे
प्रेष्य हितगुजा, पाठवावे
तया का ॥
औत्सुक्याने
न गणुन मुळी, पाठवीले
ढगा त्या ।
नाही
तो जीवित, न उमजे मूढ कामातुरा त्या ॥
.
- मराठी अनुवाद: नरेंद्र गोळे २०१५०५२३
.
मग
त्याने चेतन अचेतन ह्यांतील फरकाकडे दुर्लक्ष करून त्यालाच प्रीतीचा दूत करण्याचा
निर्णय घेतला. खूप तपशीलाने तिथवरचा मार्ग त्यास कथन केला. प्रिया ओळखावी कशी
त्याचेही निरूपण केले आणि पाठवले त्यास प्रीतीचा संदेश घेऊन, हवेवर स्वार करून.
.
६
यक्ष
ढगास म्हणतो, पुष्कर म्हणजे सरोवर. सरोवरांची पुनर्स्थापना करणार्या मेघांच्या
थोर कुळात तू जन्माला आलेला आहेस. मी जाणतो की तू स्वतःच इच्छेचे प्रतीक आहेस.
दैवाने प्रियेपासून दूरावलेला मी, तुझ्याकडे एकच मागणे मागतो. थोर आहेस. नाही
म्हटलेस तरी चालेल. कारण असमर्थाकडे मागणी करून होकार मिळाला, तरीही त्यापेक्षा ते
बरे असेल.
.
७
तू
दुःखतप्तांचा कैवारी आहेस. कुबेराच्या अलका नगरीस जा. बाहेरील उद्यानात
भालचंद्राची मूर्ती तुला तळपत असतांना दिसेल. तिथल्या भवनात जा. स्वामीकोपाने
दुरावलेल्या माझ्या प्रियेस हा संदेश दे.
.
८
वार्यावर
आरूढ झालेल्या तुला पांथस्थ पाहतील. माझी प्रियाही पाहील. तिचे विखुरलेले केस वार्यानेच
उचलून तिला धीर दे. तू येतोस तेव्हा माझ्यासारखा प्रियेस सोडून कोण बरे झुरत असेल
एरव्ही? अशी परवशता कुणासही न लाभो.
.
९
तुला
सुरूवातीस हळुहळु नाद करणारा अनुकूल वारा लाभेल. डाव्या बाजूस, मिलनकाळ निकट पाहून
बलाकमाला उडत असतील. आकाशातील ते दृश्य नयनरम्यच असेल.
.
१०
भावा,
ह्या मार्गावरून अखेरीस तू तुझ्या वहिनीप्रत पोहोचशीलच. ती पतिव्रता दिवस मोजत,
जीव जगवत असलेली तुला दिसेल. विरही स्त्रीचे कुसुमासम हृदय केवळ आशेनेच बांधून
ठेवलेले आहे.
.
११
अवनीला
सफल करणारी तुझी गर्जना ऐकून, कैलासाच्या पथावर उत्कंठेने राजहंसही तुझी सोबत
करतील. मुखी कमळ घेऊन तेही मानसयात्रा करतील.
.
१२
निघतांना
रामाच्या पदकमलांनी पावन झालेल्या ह्या रामगिरीला एकदा कवेत घेऊन तू निघ. त्यालाही
तुझ्या भेटीने भरून येईल.
.
१३
आधी
मी सांगतो तो मार्ग धर. नंतर जो संदेश तू नेणार आहेस तो ऐकून घे. दमशील तेव्हा
तेव्हा डोंगरमाथ्यांवर विश्राम कर. थकवा वाटला तर वाटेवरील नद्यांचे पाणीही पी.
.
१४
तुला
पाहून जणूकाय कुणीतरी हे गिरिशिखरच वाहून नेत आहे की काय, ह्या विचाराने स्तिमित
होऊन सिद्ध नारी तुला कौतुकाने पाहतील. तू मात्र हे खाली दिसणारे सरस स्थान सोडून
लगेचच उत्तरेकडे निघ. पर्वतशिखरांची टोके टाळून उत्तरेस लाग.
.
१५
असंख्य
रत्ने समोर उमटावीत तसे इंद्रधनुष्य वारूळातून वर आलेले तुला दिसेल. त्यामुळे तुझा
सरस निळा रंग आणखीनच शोभून दिसेल. मोरपिसाने श्रीकृष्ण शोभावा तसा तू शोभून
दिसशील.
.
१६
पिकांचे
भवितव्य तुझ्याच हाती असल्याचे जाणून शेतकर्यांच्या पत्नी भावविभोर होऊन तुझी वाट
पाहत असतील. नांगरलेल्या मातीतून सुगंध स्फुरेल. मग पुन्हा तू उत्तरेस चालू लाग.
.
१७
वाटेतील
वणवे शमवून तू येशील तेव्हा, तुझ्या अपेक्षेतच असलेला आम्रकूट पर्वत (पंचमढी) तुला
शिरावर घेईल. केलेल्या उपकाराचा विसर अधमांनाही पडत नाही, मग त्याचेसारखा श्रेष्ठी
ते विसरेल तरी कसा?
.
१८
त्याचे
शिखर सर्वांगाने आम्रफळांनी बहरलेले असेल. त्यामुळे विहंगम दृश्य पाहणार्या
देवादिकांना, मध्ये शामवर्ण असलेली अवनीची पर्वतशिखररूपी स्तने विस्ताराने तुलनेत
उजळ दिसत असतील. त्यावर विखुरलेली तुझी छाया अवनीच्या वेणीसारखीच स्नेहल भासेल.
.
१९
क्षणभर
तेथे विसावून वनचरांनी व्यापलेल्या कुंजावर वर्षाव करून पुढची वाट चाल. विंध्याद्रिच्या
उंचसखल तळाशी गजांगशा शिळांतून वाहती रेवा तुला दिसेल.
.
२०
वन्य
गजाच्या मदापरी गंध असलेले तिचे पाणी जांभुळवनांतून साचत साखळत वाट काढेल. अशा
सर्व अडथळ्यांतून तुला वाहून नेतांना वार्यास किती अमाप ताकद लागत असेल! मात्र
समर्थांचे सारेच महान असते. त्यांच्या पुढे असमर्थ अगदीच नगण्य होऊन राहतात.
.
२१
नदीतीरावर
हिरवट पिवळ्या कदंब फुलांतील शुभ्र केसर सेवन करून गंधवती अवनीचा वास घेत
पुढारणारी हरिणेच आनंदून तुला पुढचा मार्ग दाखवतील.
.
२२
मित्रा,
तू जरी माझ्या कामाकरता सत्वर जाण्यास सिद्ध असशील तरीही, सुवासांतून,
फुलाफुलांतून वेळ वाया जाईल. केकारव करून मोर सजल नेत्रांनी तुझे स्वागत करतील.
तरीही प्रयत्नपूर्वक तू पुढील वाटचाल चालूच ठेव
.
२३
उद्यानांची
कुंपणे केतकीच्या फुलांनी शुभ्र झालेली दिसू लागतील. वाटेवरील वृक्षावृक्षांवर
कावळ्यादी पक्षांची घरटी तयार होऊ लागलेली असतील. माळव्यातील वने जांभळांनी रंगून
जातील. तुझ्या सोबतीने राजहंस आपली परतण्याची वेळ ओळखतील.
.
२४
सर्व
जगात माळव्याची राजधानी विदिशा विख्यात आहे. तिथे तुला विलासाचे साफल्य लाभेल.
वेत्रवतीचे रसाळ नीर प्राशत असता, तिच्या पाण्यावरील तरंग तुला जणू भुवई उंचावणेच
आहे असे भासेल.
.
२५
तिथे
डोंगरावर जरा विसाव. तुझ्या सहवासाने कदंबपुष्पे पुलकित होतील. तेथील गुहा पूर्णरत
वारांगनांच्या उत्कट प्रणयाने परिमळत असतील.
.
२६
विश्रांती
घेऊन नदीकिनारीच्या उपवनांत ये. नवजलसिंचन करून जुईच्या कळ्यांना प्रसन्न कर. छाया
देत असतांना माळिणींच्या सुखाची तजवीज कर.
.
२७
उत्तरेस
निघालेल्यास वाटेवर नसला तरी, विशाल राजवाड्याचेही दर्शन घे. जिथे विजेच्या
आघाताने चमकून भ्यायलेल्या स्त्रियांच्या कटाक्षांनी तुझे चित्त हरले नाही तर तुला
मात्र दृष्टीच नाही म्हणावे लागेल.
.
२८
श्रुंगारातील
स्त्रीचे पहिले बोल तिचे नेत्रविभ्रमच असतात. पक्षांच्या मालिकाच जिला
कमरपट्ट्याप्रमाणे शोभत आहेत अशी, निर्विंध्या नदी, तिच्या जलांतून गिरक्या घेत
तळाशी उतरत जाणार्या जलावर्ताद्वारे जणू तिच्या नाभीकडेच संकेत करत आहे. तुझ्यावर
लुब्ध झालेल्या त्या निर्विंध्येचा तू आस्वाद घे.
.
२९
तू
जाशील तेव्हा तिची धार आटून वेणीसारखी वाळलेली दिसेल. तीरावरल्या झाडांची शुष्क
पाने तिला पांडुरकी करून टाकत असतील. तुझ्या वैभवाने पुन्हा सजल व्हायला ती आतूर
आहे. ते साधेल असे तू करावेस.
.
३०
जेथल्या
गावोगावच्या वृद्धांच्या तोंडी उदयनकथा सांगितल्या जातात, ती माळव्याची सधन नगरी
अवंती तू पहा. स्वर्गस्थ जनांच्या सुकृताचे बळ घटल्यानेच जणू काय ते पृथ्वीवर
अवतरले असावेत असे तिथले पौरजन तुला दिसतील.
.
३१
क्षिप्रेवरचा
पहाटवारा, पक्षांची किलबिल, पहाटेस फुललेल्या कमळांचे गंध घेऊन येतो. स्त्रियांचा
रत होण्याने आलेला शीण घालवतो. अंगांगास सौख्य देतो. जणूकाय त्यांचा प्रेमसखाच.
.
३२
तिथल्या
बाजारांतील सुघटित मण्यांचे पाणिदार हार, दूरवर तेज पसरणारे पाचूसारखे तळपणारे
हिरवे गवत, कोट्यावधी निरनिराळे शंख, शिंपले आणि पोवळी पाहून असे वाटते की, मग
सागरात काय नुसते पाणीच राहिले आहे की काय?
.
३३
तिथल्या
घरांतून विश्रांती घे. ती सुगंधी फुलांनी सुवासित असतात. गवाक्षांतील सुंदरींच्या
केशपाशांना सुकविणार्या धूपांनी गंधित असतात. तिथे तुला पाहून दारात आनंदाने
नाचणारे मोर असतील. ती घरे ललनांच्या पदरवाने रंगलेली असतील. छतावरील देखणी नृत्ये
पाहून तर तुझा थकवा पार पळून जाईल.
.
३४
गंधवतीच्या
पाण्यात स्नान करणार्या रमणींच्या रजोगंधाने आणि कमलसुवासांनी भारलेल्या
उद्यानातील वार्यांनी पावन होत तू चंडीश्वराचे दर्शन घे. महादेवाच्या कंठागत तुझी
नीलकांती पाहून ते तुझा सन्मान करतील.
.
३५
महाकाळास
जाशील तेव्हा, इतर वेळी तेथे पोहोचल्यास सूर्यास्त होईपर्यंत थांबून राहा.
शिवाच्या संध्यापूजेत गंभीर ताल श्लाघ्य समजला जातो. तेव्हा तू गरजशील तर तुझा
डंका सफल होईल.
.
३६
नृत्य
करीत असता कमरेवर मेखला रुमझुमणार्या, मणिरत्नांकित चवर्या वारून थकलेल्या गणिकांच्या
हातांवर तुझ्या आगमनप्रसंगी आलेल्या तुषारांनी सुखावून, त्या आपल्या काळ्याभोर
नेत्रांचे दीर्घ कटाक्ष तुजवर टाकतील.
.
३७
उंचावलेल्या
बाहूंच्या मंडलांत जास्वंदीच्या फुलाप्रमाणे लाल रक्तिमा असलेल्या संध्यातेजात न्हालेल्या
शिवांना तुझे आर्द्र चर्म नृत्यारंभी भेट दे. गौरी, ती भक्तलीला अनिमिष नेत्रांनी
पाहतच राहील.
.
३८
तिथे
रात्री रमणी आपापल्या घरी जाण्यास निघतील. राजमार्गावरही अंधकार असल्याने त्यांना
वाटच दिसणार नाही. विजांच्या सुवर्णरेषांनी तू त्यांचे मार्ग उजळून टाक. मात्र
तुझ्या त्या भयावह गर्जना करून त्यांना घाबरवू नकोस.
.
३९
तुझी
सखी वीज, थकुन रात्री विसावेल. तेव्हा, ज्या सौधावर पारवे विसावा घेतात तेथे तूही
धाव. सूर्योदय होताच तू जाग आणि मित्रकार्य हाती घे.
.
४०
रात्र
दुजीसव काढून, प्रियकर पहाटे प्रियेचा रुसवा काढतो. अश्रू पुसतो. तसाच सूर्यही
पुष्करणीतील कमळांचे दवही टिपतो. तेव्हा त्याचे आड तू आल्यास तो चिडेल.
.
४१
गंभीरेच्या
शुद्ध पाण्यात केवळ छायारूपे शिरून त्यात तुझी रुचिर मूर्ती भरून टाक.
कमळांप्रमाणे तिच्यावर तरणारे मासे हे तिचे कटाक्षच आहेत. तिच्या सवालांना उत्तर
दे.
.
४२
तिच्या
जलाचा सुनील शालू कटीतटाहून सरे
सावरता
गर्दीत कराने, वेतलतांवर चिरे ।
वस्त्र
ओढुनी तिथे थांबता, प्रयाण व्हावे कसे?
अंक
अनावृत सोडुनि जाइल रसिक कोणता बरे ॥
.
मराठी
अनुवादः कुसुमाग्रज
.
४३
तहान
तृप्त होताच धरती गंधित श्वास सोडिल. तुझ्यासोबत वाहत देवगिरीला येणारे गार वारे
काननांतील उंबरे पिकवतील. हत्ती आनंदित होऊन, सोंडेने उंबरांचे सेवन करतील.
.
४४
देवसेनेच्या
रक्षणार्थ शंकराने निर्मिलेल्या सूर्याहूनही प्रखर तेजस्वी तेजाच्या स्वरूपात तिथे
कार्तिकेय राहत असतो. स्वर्गगंगेच्या सलिली भिजल्या कामरूप पुष्पांचा तू त्यावर
वर्षाव कर.
.
४५
तेथे
शंकराच्या कपाळावरील चंद्राच्या दिप्तीने ज्याचे नील नेत्र चमकत आहेत अशा
कार्तिकेयाच्या मयूराचे पीस, गौरी आपल्या पद्मासम कर्णावर धारण करते. त्या मयुरास,
तू डोंगरकपारींतून आपली घनगंभीर गर्जना करून, आनंदाने नाचायला लाव.
.
४६
कार्तिकेयाची
पूजा करून निघत असतांना, पावसाच्या भीतीने सिद्ध स्त्रिया तुला मार्ग करून देतील.
तिथे तुला रन्तिदेवाच्या यज्ञाच्या कीर्तिची सरिताच भेटेल.
.
४७
त्या
सरितेवर जलपानार्थ तू वाकशील तेव्हा तुला ती अरुंद भासेल. ते विहंगम दृश्य पाहून
आकाशमार्गी म्हणतील की, हा जणू काय मोत्यांचा सरच आहे, ज्याचे मध्यभागी नीलमणी
विराजमान आहे.
.
४८
ती
ओलांडून, जरा विसावून, पुढे दशपूरच्या रम्य ललनांच्या भ्रुलतांचे विभ्रम पहा. तुला
ते कुंदकळ्यांभोवती विहरणार्या भ्रमरांप्रमाणे भासतील.
.
४९
मग
तू ब्रम्हावर्ती शिरून, जेथे सर्व भारत पराक्रमाने लढला ते कुरूक्षेत्र
छायामात्रेण पाहा. तू कमळांवर जलधारा वर्षतोस, तसेच अर्जुनाने इथे नृपाळांवर
शरवर्षाव केले होते.
.
५०
बंधुप्रेमाने
रणक्षेत्र सोडलेल्या बलरामाने रेवतीच्या नयनांतील मदिरा सोडून, ज्या सरस्वती नदीचे
पाणी प्यायले, ते पाणी रंगाने काळसर असले तरी तूही प्राशन कर, जेणे करून तू पावन
होशील.
.
५१
तिथून
तू कनखलला जा, जिथे पर्वतराजाच्या कुशीतून जन्हूकन्या जान्हवी म्हणजे गंगा अवतीर्ण
होते. ह्याच गंगेच्या प्रपातांच्या पायर्यांवरून चढत सगरपुत्र स्वर्गात गेले. हीच
गंगा उमेच्या भुवईरचनेस आपल्या फेसाळ लाटांनी जणू हसत असते आणि हीच गंगा शंकराचे
कपाळीच्या चंद्रकोरीस स्पर्शून, त्याच्या बटांना धरत खाली कोसळत असते.
.
५२
देवांचा
हत्ती पाणी पिण्यास वाकावा, तसा जेव्हा तू खाली झुकू लागशील तेव्हा, तुझी छाया
तिच्या पाण्यात पडून जो रंग त्याला लाभतो त्यामुळे असे भासेल की, जणू यमुनाभेटीचाच
प्रसंग ह्या ठिकाणी आला आहे की काय.
.
५३
तिचा
उगमप्रदेश असलेल्या हिमालय पर्वतावर हरिणांना कस्तुरी गंध येतो. तिथे हिमशिखरांवर
बसून विश्रांती घेतांना, शुभ्र नंदीच्या शिरी उकरलेला चिखल दिसावा तसा तू शोभून
दिसशील.
.
.
५४
वणवा
पेटून देवदारवन दाहक होते, त्यामुळे जळलेली त्वचा अतिशय जाच करते, अशा वेळी असंख्य
जलधारांनी तू तो दाह शमव. दलितांचे दुःखनिवारण हेच तर साधूचे धन असते.
.
५५
चढून
वर जाण्याकरता तू तो मार्ग सोडशील तर, पाय दुमडून जलद गतीने उडणारे शरभ तुला
भिडतील. निष्कारण स्वतःची तारांबळ करून घेतील. जोराचा हिमवर्षाव करून त्यांना वनात
पळवून लाव. कार्य करण्याचे प्रयास निष्फळ करणारे असेच हास्यास्पद ठरत असतात.
.
५६
तिथे
शंकराची पावले स्पष्ट उमटलेली आहेत. योगी ज्याची पूजा करतात अशा पादुकांना तू
प्रदक्षिणा घाल. श्रद्धेने असे केल्याने पापक्षालन होऊन, शाश्वतस्थान प्राप्त
होते.
.
५७
रंध्रारंध्रांत
वारा शिरून वेळू मुरलीसारखे वाजू लागतात. जणू काय किन्नरीच गोळा होऊन
उमामहेश्वराची विजयगीते गात असाव्यात असे वाटते. त्याच वेळी गिरिकुहरांतून तुझी
मृदंगासमान गर्जना होईल तेव्हा, हरचरणांशी संगीतवादनाचा जणू संचच परिपूर्ण होईल.
.
५८
हिमगिरीवरील
दृश्यस्थाने पाहत पाहत, भृगुराज परशुरामाच्या पराक्रमाची साक्ष देणार्या, क्रौंच
पक्षांचे थवे जेथून पार होतात त्या हंसद्वारी तू पोहोचशील. तिरपा होऊन तू त्यातून
पार होशील तेव्हा, बळीस जिंकायला हरीच आपला शामल चरण उचलत आहे की काय असा भास
होईल.
.
५९
वर
गेल्यावर सुरांगनांचा जणू भव्य आरसाच आहे असा कैलास पर्वत तुला दिसेल. हाच पर्वत
दशाननाने हलवला होता. तेथील शुभ्र कमळाप्रमाणे शोभणारी शिखरे पाहून असे भासते की,
अंबरात जणू उमेश्वरच हसत आहे.
.
६०
काळ्या
काजळापरी स्निग्ध असा तू जेव्हा त्या पर्वतावर जाशील, तेव्हा नुकताच हस्तिदंत
कापलेला असावा अशी शुभ्रता तुझ्या समोर येईल. काळी कांबळ खांद्यावर घेतलेल्या
बलभद्राप्रमाणेच ते दृश्य दिसेल.
.
६१
क्रीडाशैलावर
सहलीकरता पार्वती तेथे येताच, हातातील सर्पकंकण सोडून, उमेचा हात हाती धरून जणू
शिवशंकरच अवनीवर उतरत असतील. त्या पावलांचा स्पर्श व्हावा म्हणून घनरूप घेऊन तूच
त्यांच्यासाठी निजदेहाची पायरी कर.
.
६२
तुझ्यातून
जलधारा बरसू लागताच सुरांगनाही स्नान करू लागतील. ग्रीष्मातही जलतुषारांचे सौख्य
अनुभवतील. मात्र त्यातून लवकर मोकळा न झाल्यास गर्जना करून त्यांना भीती दाखव.
.
६३
ज्यात
स्वर्णकमळे निर्माण होतात त्या मानस सरोवराचे पाणी पी. ऐरावत त्यात स्नान करत असता
त्यास सावली कर. कल्पतरूंची प्रावरणे फडफडव. अशा प्रकारच्या नाना सुखांचे आमिष तुला
तेथे जाण्यात आहे.
.
६४
माझी
अलकापुरी कैलासाच्या मांडीवरच तर वसलेली आहे. जणू काय गंगेचा ढळलेला शालूच भासते
ती. मुग्ध कामिनीसारखी. वर्षाकाळी वेणीप्रमाणे डोक्यावर मेघमाला धारण करणारी रमणीच
भासते अलका.
उत्तरमेघ
संकलकः नरेंद्र गोळे २०२००६२२
संकलकः नरेंद्र गोळे २०२००६२२
१
तुझ्याप्रमाणेच
गगनाला स्पर्शणारी नाना प्रकारची सदने इथे विराजतात, इंद्रधनुपरी चित्रे त्यांना
भूषवत असतात, जलकणिकांपरी रत्ने असतात, विद्युल्लतेसम रम्य नारी राहतात, तुझ्या
आवाजासारखाच मृदंग संगीताचा नादही इथे घुमत असतो.
२
कुंदाकुसुमांचे हार केसांत माळलेल्या, भांगात कदंबफुले
ल्यालेल्या, कानावर शिरस मंजिरी धारण करणार्या इथल्या विलासिनी हाती कमळे
बाळगतात. लोध्र परागांनी मुख रंगवतात.
३
इथे झाडावरील फुलांवर सदा भुंगे गुंजत असतात. कमळांभोवती
हंसांचे थवे विहरत असतात. मोरपिसांनी सजलेले मोर केका देत असतात. रात्री तर अंधार
न उरता केवळ चांदण्याची बहारच अनुभवास येत असते.
४
इथे अश्रू केवळ आनंदाचेच असतात. दाह केवळ मदनाचाच असतो.
प्रणयी युगुलात विरह केवळ परस्परांतील रुसव्यानेच घडून येतो. इथल्या यक्षांचे वय कधीच
तारुण्याहून निराळे नसते.
५
इथे असे प्रासाद असतात ज्यांचे तळ स्फटिकमण्यांनी सजलेले दिसतात. रात्री त्यावर
नक्षत्रांच्या प्रतिबिंबांची फुले उमटतात. तुझ्या गरजण्याची आठवण करून देणारा
गंभीर मृदंग वाजू लागताच, कल्पतरूची सुधा प्राशन करतात ज्यामुळे प्रीतीस गहरा रंग
चढतो.
६
मंदाकिनीवरील वारे इथे गारवा देत असतात. नदीकिनारीच्या
मंदारांची छाया सावली देते. सोनेरी वाळूत सोन्याचा मणी लपवून शोधायचा आणि त्याद्वारे
अमरता प्राप्त करून घेण्याचा खेळ इथल्या बालिका खेळत असतात.
७
सैल निरी सोडिता सख्याने वसन रेशमी गळे
रूपगर्विता बावरती, ना काय करावे कळे
दिवे मालवाया उधळती गुलाल हातांतला
असती पण ते पुंज हिर्यांचे, प्रकाश ना मावळे!
– मराठी अनुवाद कुसुमाग्रज
८
वार्याच्या रेट्याने प्रासादांत शिरून जलतुषारांनी तिथली चित्रे
खराब करणारे तुझे आप्त, मग अपराधी भावनेने घाबरून बाहेर आलेले दिसत आहेत. धुरागत सर्वत्र
विखुरलेले दिसत आहेत.
९
उत्तर रात्री गगन निवळतां नितळ शशीचे कर
द्रवुनि छतांतील चंद्रकांत, रस गळे मंचकावर
रमणांच्या विळख्यांतुनि झाल्या मुक्त तिथे अंगना
शीण रतीचा वारतील ते रत्नांचे पाझर! – मराठी अनुवाद कुसुमाग्रज
१०
यक्षांच्या वैभवशाली घरांत संपदा अचल वास्तव्य करते. सुरांगनांसह
इथले यक्ष संगीतात कालक्रमण करतात. यक्षपतींचे जयगान जिथे किन्नर करत असतात अशा, नगरशीवेवर
असलेल्या उपवनांत ते नेहमी विहार करतात.
११
सूर्य उगवताच तुला तेथील अभिसारिकांच्या रात्रीच्या कालक्रमणाची
कथा, केसांतून ओघळलेल्या मंदार फुलांनी, पानांनी, सुवर्णकमलांनी, सुटुन राहिलेल्या
कर्णफुलांनी आणि वक्षावरून मोकळ्या झालेल्या मोत्यांच्या झालरी व हारांनी विदीत होईलच.
१२
कुबेराचा मित्र शंकरच तेथे राहत असल्याने त्याला भिऊन मदन आपले धनुष्यच
आणत नाही. तरीही भुवईच्या विभ्रमांनी प्रेमी आपले लक्ष्य साधतातच. त्यामुळे त्याचे
कार्य विनासायासच सफल होत असते.
१३
रंगीबेरंगी वस्त्रे, नयनांना नर्तन करायला लावणारी मद्ये,
नानाविध लेणी, उमलती फुले व पल्लव, यक्ष स्त्री-पुरूषांच्या पायाला सजवायला आळते,
हे सारे साहित्य मात्र एकटा कल्पवृक्षच पुरवत असतो.
१४
कुबेराच्या घराच्या उत्तरेस माझे घर त्यावरील इंद्रधनुषी
रंगाच्या तोरणाने दुरूनच दिसू लागते. तिथे मंदाराचा वृक्ष माझ्या पत्नीने, मानलेल्या
मुलासारखा जोपासलेला दिसून येईल. त्याचे मोहर, फुले, हाताला सहज यावीत अशा
त्याच्या फांद्या वाकलेल्या आहेत.
१५
तिथे पाचूसारख्या शिळांचे घाट बांधलेली आमची पुष्करणी आहे.
वैडुर्य मणीच जडवलेले आहेत असे भासणारे कोमल देठ असलेल्या सुवर्णकमळांनी ती
फुललेली आहे. तिच्या पाण्यात अनेक हंस आनंदाने राहत असतात. तुला बघून ते
म्हणतील की, कशाला उगाच मानस सरोवरी जाता? इथेच आहोत की आम्ही!
१६
तिच्या काठावर पिवळ्या कर्दळीच्या सुबक वर्तुळात निळा
क्रीडाशैल उभारला आहे. लाडक्या सखेच्या नजरेसमोर तो सततच असतो. तुझी प्रिया
सौदामिनी चमकून तुझी निळीसावळी तनू उजळून टाकते, ते पाहून मला तिचीच आठवण येते.
१७
अशोक आणि बकुळ वृक्षांना नवपल्लव फुटत असतात. लाल वेली
त्यांना वेढून टाकतात. एक सखिला अर्धांगीनी करू चाहत असतो, तर दुसरा तिच्या मुखाने
मदिरा प्राशन करू चाहत असतो. मला तर ते दोन्हीही हवे आहे.
१८
त्या दोन वृक्षांच्या मध्ये, पक्ष्यांकरता स्फटिकाचा
सोनेरी पार बांधला आहे. हिर्यांनी, पाचूंनी तो मढवला आहे. संध्याकाळी त्यावर तुझा
मित्र, मोर येत असतो. ज्याला माझी प्रिया ताल धरून नाच करायला लावते.
१९
ह्या खुणा लक्षात घेऊन तू आमचे घर शोधून काढ. त्याच्या
दारापाशीच शंख, पद्म रेखलेले दिसतील. मात्र मी दूर असल्याने त्यात उत्साह असणार
नाही. सूर्यास्त होताच तेथील कमळेही मिटून जातील.
२०
त्या क्रीडाशैलावर उतरण्यासाठी तू बालगजाप्रमाणे छोटा होऊन
खाली ये. काजवे लुकलुकावेत तसे विजांचे मंद तेज पसरव आणि घरात पाहून तिची चाहूल
घे.
२१
ती, पिकलेल्या तोंडल्यासारखे लाल ओठ असलेली, प्रसन्न
दंतपंक्ती असलेली, हरिणीप्रमाणे मोठे डोळे असलेली, सिंहकटी, सघन नितंबांनी
भारावलेली, स्तनभारांनी वाकलेली, सावळी युवती आहे. तिला पाहून, स्त्रीची
विधात्याने घडवलेली प्रथम मूर्ती जणू हीच असावी असे भासते.
२२
विरहाने व्याकुळ झालेली माझा दुसरा प्राणच असलेली माझी
पत्नी मितभाषिणी आहे. सहचर नसल्याने चक्रवाकी [१]
प्रमाणे ती एकाकी जीवन जगत आहे. हिवाने कोळपलेली जणू पद्मिनीच भासत असेल ती.
२३
माझ्या पत्नीचे डोळे रडून रडून सुजलेले असतील. उष्णश्वसनाने
ओठांवर काळिमा पसरला असेल. केस मोकळे सोडलेले असतील. ओंजळीत मुख लपवून ती खिन्न
बसलेली असेल. तू आड आल्यावर चंद्रमा काळवंडतो तशीच ती निस्तेज दिसेल.
२४
तू
तिला पाहशील तेव्हा ती पूजा करत असेल किंवा विरहाने कृश झालेल्या अशा माझे चित्र
कल्पून रंगवीत असेल अथवा पिंजर्यातील मैनेला विचारत असेल की, तू त्यांची आवडती
होतीस. तुला ते आठवतात का?
२५
मळकट
कपड्यांतच वीणा मांडीवर घेऊन माझ्यावर रचलेली गीते गाण्यास सिद्ध झालेली दिसेल.
अश्रुंनी भिजलेल्या तारा मोठ्या प्रयासाने छेडत असता, तिला जणू स्वतःचीच रचना
स्मरत नसावी असे भासेल.
२६
विरह
जडला तेव्हापासून शापाचे किती दिवस पूर्ण झालेले आहेत आणि किती शिल्लक राहिलेत
ह्याची, परडीतील फुले जमिनीवर रचून ती गणना करत असेल. माझ्या संगतीत असल्यासारखी
किंवा कल्पनेतच तशी वावरत असलेली ती दिसेल. पतीविरहिणी स्त्रिया सामान्यतः अशाच
रीतीने आपले मन रिझवत असतात, नाही का?
२७
दिवसा
कामांत व्यग्र असल्याने तिला विरहाचा एवढा त्रास होत नसेल. रात्री मात्र दुःख
गांजत असेल. माझी वार्ता कळवण्यासाठी, अर्धरात्री तू तिला खिडकीतून पाहशील तर ती
जमिनीवरच लवंडलेली दिसेल.
२८
दुःखाने
क्षीण होऊन, विरहव्यथेतच लवंडलेली असल्याने कुशीवरच पहुडलेली असेल. चंद्रकोरी
प्रमाणे कृश दिसेल. एरव्ही माझ्यासोबत आनंदात जे तिचे क्षण जात असत, ते आता ती उष्ण
अश्रुंतच घालवीत असेल.
२९
खिडकीच्या
जाळीमागे अमृतमय चांदणे उमलत असतांना पूर्वप्रेमाने ती तिकडे जायला वळेल. डोळे दुःखाने पाणावल्याने लगेचच माघार
घेईल. पावसाळ्यातल्या सूर्यफुलाप्रमाणे मिटतही नाही आणि उमलतही नाही अशी तिची
अवस्था झालेली दिसेल.
३०
निश्वासांनी
ओठ सुकून गेलेला असेल. तेलावाचून शुष्क झालेले केस चेहर्यावरून दूर सारत असेल. स्वप्नात
तरी स्वामींची भेट व्हावी म्हणून तरी झोप यावी अशी इच्छा करत असेल. मात्र
डोळ्यातील अश्रुंच्या पुराने तीही इच्छा फलद्रुप होत नसेल.
३१
विरह
झाला त्या दिवशीच बांधून ठेवलेले केस शापाच्या अखेरीसच मी मोकळे सोडावेत अशी तिची
अपेक्षा असेल. नखे वाढलेल्या हातांनी, एकच वेणीही, ती मागे सारत असेल.
३२
दुःखाने
ती वाळली असेल. वियोगापायी आभूषणे उतरवून ठेवलेली असतील. वारंवार शय्येवर अंग
टाकून देत असेल. तूही अश्रुंप्रमाणे जल वर्षशील. ओलावा असेल तर तिथे करुणा व्यक्त
होतच असते.
३३
तिच्या
हृदयातली गहिरी दुःखभावना मी जाणतो. खरे तर त्यातून माझ्यावरील प्रेमच व्यक्त होत
असल्याने, हे भाग्यच म्हणायचे पण आता ते बोलायलाही नको वाटते. तू तिला डोळ्यांनी
पाहशील तेव्हा तुला पटेल की, ह्यात मुळीच काही खोटे नाही.
३४
केस
शुष्क असतील, हरिणीसारखे डोळे काजळाविहीन असतील. मदिरेविना भुवयांना विभ्रमांचा
विसरच पडलेला असेल. तुझ्या आगमनाने शुभ वार्ता जाणवून, तिच्या धावणार्या तिच्या
मीन अक्षांमुळे नेत्रकमळेच हलत आहेत, असा तुला भास होईल.
३५
अंक
सखीचे नखक्षतांविण विरही ते बापुडे
मर्दन
ज्यांचे या हाताने सुरतानंतर घडे ।
नव
कदलीचे रसरसलेले कांड गौर गोमटे
वरी
न रशना मोत्यांची, ते स्फुरतील डावीकडे ॥ - मराठी अनुवादः कुसुमाग्रज
३६
माझी
कांता जर निद्राधीन असेल, तर घडीभर आवाज करू नकोस. तसाच उभा राहा. तिला कदाचित
स्वप्नांत माझे दुर्लभ दर्शनही घडलेले असू शकेल. स्वप्नातही जर मिठी सुटली तर ती
व्याकूळ होईल.
३७
वार्याच्या
झुळुकीने तिला जागी कर. मालतीच्या कळ्या पहाटेच्या दवाने जाग्या व्हाव्यात तसे
तिला तुषारांनी प्रफुल्लित होऊ दे. ती मानिनी चकित होऊन तुला बाहेर खिडकीत उभा
असलेला पाहील. तिला निरखण्यास वीज लखलखवून आत पाहा आणि हळुहळु तिच्याशी बोलू लाग.
३८
तिला
सांग की, मंगले मी तुझ्या नवर्याचा प्रिय सखा मेघ आहे. त्याचे शब्द हृदयी धरून मी
इथवर आलेलो आहे. तुझा नवरा तुझी वेणी सोडवण्यास उत्सुक आहे. अधीर आहे. हे तिला
कळव.
३९
हे
ऐकताच ती, अशोकवनात सीतेने मारुतीकडे पाहावे त्याप्रमाणे, आतुरतेने वर पाहील. तुझे
शब्द ऐकण्यास ती कानात प्राण आणून ऐकू लागेल. पतीच्या मित्राकडून कळणारी वार्ता,
स्त्रीस नेहमीच अपुरी भासत असते.
४०
हे
आयुष्यवंता, तिला माझे बोलणे ऐकून कृतार्थ व्हायचे असेल तर, तिला सांग की, तुझा
पती रामगिरीवर राहत आहे. तो विचारतो आहे की, घरी तू खुशाल आहेस ना? आपत्काळी
जवळच्या नातलगांना असेच तर विचारतात ना?
४१
दैववशात
दूर राहावे लागते आहे. विरह दग्ध करतो आहे. अश्रुंचे सडे पडत आहेत. मनोमन तुझ्या
तनुलतेची कल्पना करून सदेह तुला भेटावे असा मनाला छंदच जडत आहे.
४२
मैत्रिणींसमोर
सांगता येऊ नये असे कुठलेही रहस्य नसतांनाही, उगाचच कानाशी येऊन, गालास स्पर्श
करून, अधीरतेने तुला माझे व्यथित अंतर कळवावे, ते आता माझ्या नजरेच्या
पल्ल्याबाहेर असलेला माझ्या मित्राकरवी करावे लागत आहे.
४३
लता
तुझी कोमलता दावते, तर चंद्रमा मुखमंडल. मोरपिसारा पाहून मी म्हणतो की, हा तिचाच
केशसंभार आहे जणू. जललहरींतून भ्रुनर्तन कळते, हरीणी तुझे नेत्र दर्शवतात. मात्र
हाय, तुझी ती संपूर्ण कोमल आकृती मात्र काही केल्या प्रकट होत नाही.
४४
तू
रुसलेली आहेस. असे चित्र मी कधी शिळेवर चितारण्यास बसतो. मी तुझ्या पायाशी याचना
करतो. अशी कल्पनाच डोळ्यांतून अश्रुपातास सुरूवात करते. दिसेनासेच होते. अशा
प्रकारे होऊ शकणारी आपली भेटही जणू नशीबास पाहवत नसावी!
४५
तू
प्रियेसाठी अंतराळात भुजा पसरून असतोस तेव्हा ते पाहून, स्वप्नातही मी ती दिसताच
तिला मिठी घालू पाहतो. तेव्हा स्थानिक देवतांचे जणू अश्रूच असावेत असे जलबिंदू ठिबकतात.
४६
देवदार
वृक्षांचे कोंब खुडून अर्कस्त्राव गोळा करतात, त्याचा सुगंध वार्यासोबत वाहत इथवर
येतो. ते थंडगार वारे तुलाच स्पर्शून आलेले असावेत म्हणून मी त्यांची गळाभेट घेत
असतो.
४७
न
संपणारी रात्र चुटकीसरशी कशी संपवावी किंवा सर्वकाळ होणारी तगमग कशी थांबवावी असा
विचार करत असतो. पण मार्ग सुचत नाही. विरहवेदना काही खळत नाही.
४८
निग्रहाने
मी जीव सांभाळत आहे. तूही मनातून भीती काढून टाक. कुणाला आयुष्यात केवळ सुखच मिळते
किंवा केवळ दुःखच मिळत असते. चाक गोल फिरतांना धावही वरखाली होतच राहते.
४९
शाप
संपेल. शेषशय्या सोडून विष्णू कार्यरत होईल. चातुर्मासात बंद डोळ्यांनी केलेल्या
कामना समोर येतील. त्या सर्व आपण शरदाचे चांदणे पूर्ण बहरात असतांना उपभोगू.
५०
आठवते
का तुला, एकदा तू गळ्यात हात घालून निजली होतीस. अचानकच जाग आली. डोळ्यातून अश्रू
ओघळले. तुला खोदून खोदून विचारल्यावर लाजून सांगितलेस की, स्वप्नात मी तुमच्यासोबत
निराळीच कामिनी बघितली होती!
५१
आठवणीची
ही खूण ओळखून माझ्या क्षेमाविषयी शंका नसू दे. दुरावल्याने प्रीती कमी होते असे
लोक बोलतील. ते बोलू देत. विरह न अनुभवताच ते तसे बोलत असतात. दुरावण्याने उलट
प्रीती दृढच होत असते.
५२
अशा
प्रकारे विरहव्याकुळ वहिनीला प्रथम आश्वस्त करून नंदीच्या पायांनी उकरले जाणारे ते
शिखर तू जलदीने सोड. वेगाने वाहत पुन्हा इथे परत ये. तिच्या संकेतांसह तिचे कुशलही
मला इथे येऊन सांग. पहाटेच्या कुंदफुलाप्रमाणे माझा जीव गळू पाहत आहे तो सावरून
घे!
५३
तुझा
मित्र सुखी व्हावा ह्याकरता तू हे करशील ना? अबोल राहून निदान तू नाही म्हणत नाही
आहेस असेच मी मानतो. कोणतीही वल्गना न करता तू चातकांना जीवन देतोस. सुजन आपल्या
कृतीनेच उत्तर देत असतात. हाच तर त्यांचा गौरव आहे.
५४
माझी
ही प्रार्थना फारशी उचित नाही हे मी जाणतो, तरीही मनाला तुझी स्नेहभावना दिलासा
देते आहे. वर्षावैभव मिळवून तू तुझ्या प्रियेसह –सौदामिनीसह- रत हो. तुझ्या नशीबी
ही विरहवेदना मात्र कधीही येऊ नये!
कालिदासाची
ही कल्पनाच बहारीची आहे. मात्र ज्या तपशीलांनी त्याने ती वर्णिली आहे, त्यामुळे
त्याच्या माहितीचे कौतूक केल्यावाचून राहवत नाही.
संदर्भः
१. मेघदूत,
क्लाऊड मेसेंजर, डॉ.चिंतामणराव देशमूख, सरिता प्रकाशन, द्वितियावृत्ती १९७४,
रु.२०/-, पृष्ठेः ९५.
२. मेघदूत,
कुसुमाग्रज, पॉप्यूलर प्रकाशन, प्रथमावृत्ती १९५६, रु.१०/-, पृष्ठेः ६८.
३. कालिदास,
वा.वि. मिराशी, साहित्य संस्कृती मंडळ, प्रथमावृत्ती १९३४, रु.१४०/-, पृष्ठेः २०६.
[१] चक्रवाक पक्षी नेहमी जोडीने राहतात. जोडीतील एक पक्षी
मेल्यावर दुसरा पक्षी आणखी संगत धरत नाही. तो आपल्या जोडीदाराच्या आठवणींतच
उर्वरित आयुष्य कंठतो. असा समज संस्कृत साहित्यात प्रचूर आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा