20120101

पद्मविभूषण ई.श्रीधरन यांस मानाचा मुजरा!



पद्मविभूषण डॉ. ईलत्तुवलपीळ श्रीधरन व्यवस्थापकीय संचालक, दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन.

दिल्ली मेट्रोचे जणू बोधचिन्हच असलेल्या श्रीधरन यांचे व्यासपीठाच्या मंचावरले चित्र, त्यांच्या अवकाशप्राप्तीनंतर, हात जोडून त्यांना अभिवादन करत असतांनाचे, हे प्रकाशचित्र, दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या, कॉर्पोरेट कार्यालयात, म्हणजेच मेट्रो भवन येथे ३१-१२-२०११ रोजी काढलेले आहे.

भ्रष्टाचाराचा बोलबाला होत असलेल्या भारतात, शिष्टाचाराचे मूर्तिमंत प्रतीक बनून, विधिवत मिळालेले काम निष्ठापूर्वक करणारे अनेक लोक आजही आहेत. त्यांच्याच बळावर भारतीय समाज व्यवस्था घट्ट उभी आहे.

अशा व्यक्तींच्या कामांची नोंद घेऊन त्यांचा यथोचित सन्मान आपण करायला हवा. पद्मविभूषण डॉ. ईलत्तुवलपीळ श्रीधरन व्यवस्थापकीय संचालक, दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन हे अशा लोकांपैकीच एक आहेत. कालच त्यांनी आपल्या कार्यभाराची सूत्रे, आपल्या उत्तराधिकार्‍यास सुपूर्त केली. त्यानिमिताने, त्यांच्या कारकीर्दीचा घेतलेला हा एक आढावा. कोकण रेल्वेचे दैदिप्यमान काम ज्यांनी संकल्पिले, नियोजले आणि नियत कालावधीत यशस्वीरीत्या करून दाखवले त्या श्रीधरन यांना माझा मानाचा मुजरा!




आज वाशी स्टेशनकडे देशातल्या आदर्श स्टेशनचा नमुना म्हणून पाहिले जाते. गाड्या, फलाट, इमारत, रूळमार्ग पार करणारे दादरे, सगळेच एका छताखाली आणल्याने, स्टेशन आहे की विमानतळ असे वाटवणारे भारतातले पहिले रेल्वे स्टेशन आहे वाशी. भारतभरच्या स्टेशनांभोवतीच्या बकाल वस्तीचा येथे निकास करून, आंतरराष्ट्रीय माहिती-तंत्र-उद्यानाची निर्मिती स्टेशनाच्या वरच केल्याने सार्‍या परिसराचेच उद्धरण केलेले स्पष्टपणे जाणवते. कोकण रेल्वे प्रकल्पाला अशीच विकासाची दिव्य दृष्टी देणारे श्रीधरन आज कार्यनिवृत्त झालेले आहेत. त्यांच्याच उत्तम कार्यांची ही उजळणी.

श्रीधरन यांचा जन्म १२ जून १९३२ रोजी केरळातील पलक्कड जिल्ह्यातील करुकपुथूरमध्ये झाला. बसेल-ईव्हांजेलिकल-मिशन-उच्च-माध्यमिक शाळेतून त्यांनी शिक्षण घेतले. पलक्कडच्या व्हिक्टोरिया कॉलेजातून महाविद्यालयीन शिक्षण घेतले आणि मग काकीनाडा येथील गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमधून अभियांत्रिकी स्नातक झाले. कोझिकोडे येथील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये नागरी-अभियांत्रिकीतील व्याख्याता म्हणून काम केले. नंतर मुंबईच्या पोर्ट ट्रस्टमध्ये उमेदवारी केली. त्यानंतर ते भारतीय रेल्वेत रुजू झाले. दक्षिण रेल्वेत ते १९५४ च्या डिसेंबरमध्ये, सहाय्यक प्रशिक्षणार्थी अभियंता म्हणून रुजू झाले.

दक्षिण आणि दक्षिणपूर्व रेल्वेत त्यांनी सहाय्यक अभियंता, कार्यकारी अभियंता, प्रभागीय अभियंता आणि उपमुख्य अभियंता इत्यादी पदे भूषवली. जेव्हा ते नवे मार्ग निर्माण करण्याची जबाबदारी सांभाळत होते, तेव्हा क्विलॉन-एर्नाकुलम मिटरगेज आणि मँगलोर-हसन मार्गांची निर्मिती करण्यात आली. त्यादरम्यान अनेक पूल, बोगदे यांचे प्रकल्प यशस्वीरीत्या पार पडले. तसेच पालघाट, हुबळी आणि बेझवाडा प्रभागांची देखरेखही केली गेली.



१९६३ मध्ये भारताच्या रामेश्वरमला मुख्य भूमीशी जोडणारा तामिळनाडूतील पंबनम्‌ पूल वादळाने वाहून गेला. पंबनम्‌-पूलाचे वाहून गेलेले १२५ टप्पे, ४६ दिवसात पुन्हा उभे करण्याच्या त्यांच्या कामगिरीखातर रेल्वे मंत्रालयाने त्यांना पारितोषिक दिले. ते उपमुख्य अभियंता असतांना देशातील पहिली मेट्रो रेल्वे १९७० ते १९७५ या काळात कोलकाता येथे उभारण्यात आली. त्या कामाचे तेच प्रभारी होते. त्यांनीच ह्या कामाचा तपास, नियोजन आणि अभिकल्पन केले होते.

ऑक्टोंबर १९७९ ते नोव्हेंबर १९८० ते जहाज वाहतूक मंत्रालयाच्या कोचीन येथील जहाजबांधणी कारखान्याचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून प्रतिनियुक्तीवर होते. त्यांच्या कार्यकाळात या कारखान्याने उभारलेले पहिले जहाज “राणी पद्मिनी” चे जलावतरण करण्यात आलेले होते.

जुलै १९८७ मध्ये ते पश्चिम रेल्वेचे प्रमुख व्यवस्थापक झाले. जुलै १९८९ मध्ये रेल्वे महामंडळाचे अभियांत्रिकी सदस्य व म्हणूनच भारत सरकारचे पदसिद्ध सचीव झाले. १९९० मध्ये अवकाशप्राप्त करतांनाच ते प्रतिष्ठेच्या समजल्या गेलेल्या कोकण रेल्वेवर अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त केले गेले. कोकण रेल्वेचा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर ५ नोव्हेंबर १९९७ पासून ते दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त केले गेले.



कोकण रेल्वे आणि मग दिल्ली मेट्रो यांच्या उभारणीत अथक परिश्रम करून भारतीय सार्वजनिक वाहतूकीचे चित्रच त्यांनी बदलवून टाकले. त्यांच्या निष्ठापूर्वक केलेल्या कठोर परिश्रमाचे फळ म्हणून भारत सरकारने २००१ मध्ये त्यांचा “पद्मश्री” देऊन सन्मान केला. टाईम्स ऑफ इंडियाने त्यांना २००२ साली मॅन ऑफ द ईयर म्हणून निवडले. २००३ साली टाईम नियतकालिकाने त्यांची आशियातील एक पुढारी म्हणून निवड केली. २००५ मध्ये फ्रेंच सरकारनेही त्यांचा गौरव केला.

२००९ मध्ये त्यांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानातील भरीव कामगिरीच्या सन्मानार्थ त्यांना भारत सरकारने “पद्मविभूषण” देऊन गौरवले.

त्यांच्यासाठी त्यांच्या कार्यनिवृत्तीच्या निमित्ताने मी उत्तम आयुरारोग्य प्रार्थितो आणि त्यांच्या उत्तर आयुष्याकरता हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो.

श्रेयनिर्देशः प्रकाशचित्रे व मजकूर यांखातर संबंधित खाली दिलेल्या संस्थळांचे मनःपूर्वक आभार.

संदर्भः
१. http://india.gov.in/myindia/padmavibhushan_awards_list1.php?start=10
२. http://www.delhimetrorail.com/whatnew_details.aspx?id=NgRPa7TMhkQlld&rdct=d
३. http://en.wikipedia.org/wiki/E._Sreedharan

20111230

रुग्णोपयोगी साहित्य सेवा संस्था, रोहा

रोह्यातला महामार्ग. वेळ रात्रीची साडेबाराची. दिवस पावसाचे. धोधो पाऊस पडत असलेला. रोह्याच्या फायरब्रिगेडचा एक फायरमन, रस्त्यावरील एका वाहन दुर्घटनेत गंभीर जखमी होऊन, मांडीपर्यंतच्या पायावर प्लॅस्टर पडलेले. रुग्णास घेऊन घरी पोहोचले तेव्हाच, निकटवर्तीयांना उसंत घ्यायला वेळ मिळाला होता. ती वेळ ही होती. मग लक्षात आले की आता कमोड लागणार. धावाधाव सुरू झाली. कुणीतरी सांगितले की अशी एक संस्था आहे जी असे रुग्णोपयोगी साहित्य नाममात्र भाड्याने पुरवते. आगाशे काकांचे नाव घेतले गेले. मात्र एवढ्या रात्री, इतक्या कठीण परिस्थितीत, त्यांना कसे काय उठवावे? प्रश्नच होता!

रात्री साडेबारा वाजता दारावर ठकठक झाली. समोर रेनकोट टोपी मध्ये नखशिखांत गुरफटलेली, आणि संपूर्णपणे भिजलेली व्यक्ती दारात उभी. दार उघडावे की नाही? शेवटी आगाशेकाकांनी मनाचा हिय्या करून दार उघडले. काय काम आहे विचारले. त्यांना कमोड हवंय हे सांगितले गेले आणि ती व्यक्ती "देऊ शकाल काय?" म्हणून स्तब्ध झाली. खरेतर सामान इतरत्र ठेवलेले. किल्लीच केवळ त्यांचेकडे होती. पण काका तयार झाले. चला! ते म्हणाले. सामान होते तिथे पोहोचले. दरवाजा उघडून कमोड दिला. भाडे द्यायचे घ्यायचे काही गोष्टच निघाली नाही. समोरची व्यक्ती मानवी चांगुलपणाच्या दर्शनाने भारावलेली. तिने काकांना अक्षरशः दंडवत घातला! "काका तुम्ही धन्य आहात!"

काही दिवसांनंतर रुग्णोपयोगी साहित्य सेवा संस्थेच्या कार्यालयात दोन माणसे कमोड घेऊन परत आली. "काका कमोड परत आणलंय!"
काकांनी विचारले, "रुग्ण कसा आहे आता?"
"ते उत्तम चालायला लागले आहेत. आता भाडे सांगा किती झाले?"

दरदिवशी रु.५/- फक्त प्रमाणे हिशेब करून पैसे दिले, घेतले गेले. सोबतचा दुसरा माणूस काकांना विचारू लागला, काका तुम्हाला किती पगार देतात? काकांनी दारावरच्या फलकाकडे बोट दाखवले. त्यातल्या सेवा शब्दाकडे बोट करून ते म्हणाले, अहो, ही सेवा आहे. त्याचा पगार कसला. ज्यांनी कमोड नेला होता. त्यांना त्या सेवेचे मोल चांगलेच ठाऊक होते. ते म्हणाले, काका, कधीही, कसलीही गरज भासली तरी मला सांगा. मी तुमच्या मदतीला नक्कीच येऊन उभा राहीन!

सेवा खरीच. मात्र अशी सेवा, खरीखुरी व्यावसायिक सेवा संस्थाही देऊ शकेल की नाही सांगवत नाही. .

20111126

अमूल द टेस्ट ऑफ इंडिया





डॉ.वर्घिज कुरिअन हे “ऑपरेशन फ़्लड” ह्या जगातील सर्वात मोठ्या दुग्ध-विकास-कार्यक्रमाचे शिल्पकार आहेत. भारतातील दुग्ध-क्रांतीचे जनक आहेत. त्यांनीच भारताला जगातला सर्वात मोठा दुग्धोत्पादक देश बनवले. भारत देशाने त्यांना पद्मश्री (१९६५), पद्मभूषण (१९६६) आणि पद्मविभूषण (१९९९) या पदव्या देऊन गौरवान्वित केले आहे. तर सामाजिक नेतृत्वाकरता मेगॅसेसे (१९६३) आणि जागतिक-अन्न-पारितोषिक (१९८९) मिळवून ते जगभरातील सगळ्यांकरता लोकोत्तर ठरले आहेत. अमूल उद्योग समूहाचे ते अग्रणी आहेत.





आज त्यांचा ९० वा जन्मदिन. त्यांच्या अनन्यसाधारण कर्तुत्वास माझा सादर प्रणाम. त्यांना उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो हीच प्रार्थना!

२६ नोव्हेंबर १९२१ रोजी केरळामधील कालिकत येथे वर्घिज पुथेनपुरक्कल कुरिअन यांचा जन्म झाला. उच्च साक्षरतादर असलेल्या सिरिअन ख्रिश्चन समाजात ते वाढले. ख्रिश्चन मिशनरी शाळेत शिकले. टेनिस, बॅडमिंटन, क्रिकेट आणि बॉक्सिंग इत्यादी मैदानी खेळांत त्यांनी कॉलेजचे प्रतिनिधित्व केले. स्वभावाने नास्तिक. लष्करात भरती होण्याची त्यांची इच्छा होती. मात्र ते २१ वर्षांचे असतांना त्यांचे वडील गेले आणि आई त्यांना लढाईवर जाऊ देण्यास तयार नव्हती, म्हणून ते लष्करात दाखल होऊ शकले नाहीत. चेन्नईतील लॉयोला कॉलेजमधून ते १९४१ साली भौतिकशास्त्रात पदवीधर झाले. १९४४ साली चेन्नई विद्यापीठातून ७व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन अभियंत्रज्ञ झाले. १९४६ मध्ये जमशेदपूर येथील टिस्कोमधून त्यांनी अभियांत्रिकीतील एक विशेष अभ्यासक्रम पूर्ण केली. १९४८ मध्ये मिशिगन-स्टेट-युनिव्हर्सिटीतून त्यांनी अभियांत्रिकीतील “मास्टर्स इन सायन्स” ही पदयुत्तर पदवी प्राप्त केली. तिच्याकरता आण्विक अभियांत्रिकी आणि धात्विकी हे त्यांचे प्रमुख विषय होते. ही पदवी त्यांनी दुग्ध-विकास-अभियांत्रिकीतील विशेषज्ञतेसहित प्राप्त केलेली होती. मग त्यांनी राष्ट्रीय-दुग्धविकास-संशोधन-संस्था, बंगलोर येथून दुग्धविकास-अभियांत्रिकीतील विशेष प्रशिक्षण प्राप्त केले.


४ जानेवारी १९४६ रोजी काइरा जिल्ह्यातील समरखा येथे झालेल्या शेतकरी संमेलनाच्या फलस्वरूप, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सल्ल्यावरून मोरारजी देसाई यांनी, कुरियन यांना, बेभरवशाच्या दुध-व्यापार्‍यांविरुद्ध लढण्याकरता पाचारण केले. बॉम्बे-मिल्क-स्किम ह्या सरकारी संस्थेस मग काइरातले शेतकरी थेट दूध पुरवू लागले. १९५५ मध्ये “अमूल”चा उदय झाला. इथे दुग्धोत्पादन, संकलन आणि विक्री या सर्वांवर शेतकर्‍यांचेच पूर्ण नियंत्रण असे. यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळाले. १ कोटी शेतकरी आणि ८१,००० सहकारी संस्था यांच्या संगमातून घडलेल्या अमूलला, दरसाल २,४०० कोटी रुपये उत्पन्न मिळू लागले. जागतिक अधिकोषाने पुरवलेल्या केवळ २०० कोटी भांडवलावर एवढे उत्पन्न मिळू लागले. युरोपिअन किंवा अमेरिकन बाजारातल्या भावापेक्षा ४०% खर्चात दूध निर्माण होऊ लागले. अमूल पॅटर्न/ आणंद पॅटर्न म्हणून ह्याचा भरपूर बोलबाला झाला.

कुरिअन म्हणतातः

१. “लोकांवर दबाव आणून किंवा त्यांना केवळ दायित्व देऊन संशोधन साधता येत नाही. लोक आणि परिस्थिती यांच्या गुणवत्तेवरच हे सारे घडत असते. पुरेसे कुशल लोक स्वयं-कार्यान्वित परिस्थितीतून पुढे यावे लागतात, तेव्हाच कुठे संशोधन साधता येते!”

२. “मी मांजरीसारखा आहे. कसेही फेका. मी पायांवरच उभा राहेन.”

३. “आठ तास डेअरीकरता, आठ तास कुटुंबाकरता आणि आठ तास झोप.”

४. “माझे जीवनाचे तत्त्वज्ञान हे आहे की, जे कमी सुदैवी आहेत त्यांच्याकरता जे जे चांगले करणे शक्य असेल ते ते सर्व करा. मात्र, माझे स्वतःचे आयुष्य मी सामान्य माणसाप्रमाणे जगणेच पसंत करेन!”

कुरियन यांनी शेतकर्‍यांना काम देण्याऐवजी त्यांना संघटित केले. नोकरशहा, मंत्री, प्रस्थापित संस्था इत्यादींसोबत शेतकर्‍यांच्या हिताकरता लढा दिला. त्यांनी शेतकरी जणू देवच मानला. गुणवत्ता, पैशाचे पूर्ण मूल्यदान, सदोदित उपलब्धता आणि उत्तम सेवा यांचे आधारे त्यांनी अमूलला यशोशिखरावर चढवले. लोकच मग “अमूल द टेस्ट ऑफ इंडिया” म्हणू लागले. मानू लागले.

संदर्भः

१. http://www.amul.com/
२. http://www.slideshare.net/leo/milkman-of-india-varghese-kurien
३. http://www.iloveindia.com/indian-heroes/verghese-kurien.html
.

20111111

मेरी स्तोत्र

नव्यानेच सुरू झालेल्या ’ऐसी अक्षरे’ या संकेतस्थळावर, http://www.aisiakshare.com/node/173 या दुव्यावर “हजारो वर्षांपूर्वी लिहीलेल्या स्तोत्रांचा साठा करण्यापेक्षा मला महत्त्वाचे वाटतात ‘आजचे आदर्श’. आधुनिक ऋषि-मुनि आणि देव - आयझॅक न्यूटन, चार्ल्स डार्विन, मारी क्यूरी, महात्मा गांधी आणि अगदी सचिन तेंडूलकरसुद्धा! तर हा धागा आहे आजच्या काळाच्या आदर्शांबद्दल काही लिहीण्याचा. फक्त एकच अट आहे, हे लिखाण करायचं ते स्तोत्रांच्या स्वरूपातच. ” - ३_१४ विक्षिप्त अदिती (Tue, 08/11/2011 - 22:12) असे आवाहन दिसले! ७ नोव्हेंबर हा मेरी क्युरीचा जन्मदिन होता. म्हणून मी "मेरी स्तोत्र" लिहायला घेतले. तिच्या काही ठळक वैशिष्ट्यांचा समावेश करून तयार केलेले तेच हे "मेरी स्तोत्र". मेरीच्या लोकोत्तर गुणांना, ते उजागर करते!



मेरी क्युरी
(७ नोव्हें. १८६७, वॉर्सा, पोलंड-४ जुलै १९३४, सॅव्हॉय, फ्रान्स)

जन्मगाव वॉर्सा, मुळी वारसा न फारसा ।
तरीही उजळलीस तू, मेरी किरण-अर्जिता१ ॥ धृ ॥

उदय२ गोंधळात ना, म्हणून त्यजशी देश ना ।
कष्ट काढले जिथे ती, कर्मभूमी फ्रान्स ना ॥ १ ॥

रुचसी शिक्षकास३ तू, पियरेस कांक्षसीही तू ।
शोधवेड साधण्या, वरशीही लग्नगाठ तू ॥ २ ॥

’किरणे युरेनियमची४’ ती, विषय कठीण मानती ।
निवडसी तयास तू, तुला न वाटते क्षिती ॥ ३ ॥

“मी” म्हणत थंडी ये, नळात पाणी गोठते ।
उबेस कोळसा५ नसे, तरी ज्ञानभक्ती तेवते ॥ ४ ॥

प्रखर युरेनियमहुनी, जे द्रव्य किरण सोडते ।
शोधण्या तयास, सकल मूलद्रव्य६ हुडकते ॥ ५ ॥

गवसले असेही द्रव्य, किरण दिव्य सोडते ।
’पोलोनियम७’ म्हणून ती देशाभिमान दावते ॥ ६ ॥

पिचब्लेंड८मधून आगळे मग द्रव्य आढळे नवे ।
प्रारणे सशक्त, दिप्ती लक्षगुणित जाणवे ॥ ७ ॥

हे ’रेडियम९’ नवेच द्रव्य, दिप्ती दूर फाकते ।
टनात खनिज चाळता, लघुग्रॅम फक्त हाती ये ॥ ८ ॥

शोध लावला म्हणून, लाभले ’नोबेल१०’ही ।
शोधते कसे जनांस उपयुक्त ते ठरेल, ही ॥ ९ ॥

अकस्मात, चालता पियरेस देत धडक११ एक ।
वाहने उजाडले तिचे आयुष्य विरह देत ॥ १० ॥

आयरीन१२ गुणी खरीच, किरणोत्सार घडवते ।
ईव्ह धाकटी, पियानो, जन-रंजनास वाजवे ॥ ११ ॥

उपचार१३ दिप्तीचेही ती, शोधण्यास राबली ।
’नोबेल’ लाभले पुन्हा, दिगंत कीर्ती जाहली ॥ १२ ॥


१ अर्जिले किरणांस जिने ती, किरण-अर्जिता
२ वॉर्सा त्याकाळी रशियाच्या गुलामगिरीत कितपत असल्याने, देशात उदय होणे कठीण असे वाटून मेरी स्क्लोडोवस्का हिने पोलंड हा स्वदेश सोडला होता. ती चरितार्थ चालवण्याकरता तसेच शोधजिज्ञासा शमवण्याकरता फ्रान्समधे स्थलांतरित झाली होती.
३ पिअरे क्युरी या भौतिकशास्त्राच्या प्राध्यापकांना, मेरी तिच्या कष्टाळू आणि जिज्ञासूवृत्तीमुळे आवडू लागली. तिलाही ते आवडत असत. परस्परपूरक वैज्ञानिक काम करत राहिल्याने, पुढे त्यांच्यात प्रेम होऊन, मग त्यांचे लग्न झाले.
४ मेरीने युरेनियमची किरणे हा अवघड विषय अभ्यासाकरता निवडलेला होता.
५ मेरी क्युरीची गोष्ट हाडे गोठवणार्‍या थंडीत चौथ्या मजल्यावर कोळसा वाहून नेऊन ती ऊब मिळवत असे. तोही संपला की असतील नसतील ती कापडे गुंडाळून कुडकुडत बसावे लागे. तरीही तिची शिकण्याची जिद्द उणावली नाही.
६ अनेक मूलद्रव्यांची छाननी करून मेरीने किरणोत्सारी मूलद्रव्ये वेगळी काढली होती.
७ सर्वप्रथम ज्या किरणोत्सारी मूलद्रव्याचा शोध तिने लावला त्यास तिच्या मायदेशाच्या नावावरून त्यांनी ’पोलोनियम’ हे नाव दिले.
८ हे युरेनियमचे प्रख्यात असलेले खनिज आहे. युरेनियम काढून घेतलेल्या पिचब्लेंडमध्ये अथक परिश्रमानी शोध घेऊन मेरीने पोलोनियम हुडकून काढले.
९ पुढे पोलोनियमपेक्षाही अधिक सक्रियता पिचब्लेंडमध्ये आढळून आली. तेव्हा रेडियमचा शोध लागला.
१० पोलोनियम आणि रेडियमच्या शोधाखातर मेरी क्युरी आणि तिचे पती पिअरे क्युरी यांना १९०३ सालचे नोबेल पारितोषिक, नैसर्गिक किरणोत्सर्जनाचा शोध लावणार्‍या हेन्री बेक्वेरल यांचेसोबत विभागून मिळाले होते.
११ या अपघातात पियरे यांचा मृत्यू झाला.
१२ ही क्युरी दंपत्याची मोठी मुलगी. कृत्रिम किरणोत्सर्जनाचा शोध लावल्याखातर हिला १९३५ सालचे रसायनशास्त्राचे पारितोषिक मिळाले होते.
१३ मेरीने पियरे यांच्या पश्चात किरणोत्साराचे वैद्यकीय उपयोग आणि तत्संबंधित कायदे यांचा व्यासंगी अभ्यास केला होता. तिच्या ह्या कामाची पावती म्हणून किरणोत्साराच्या अभ्यासाखातर तिला १९११ सालचे रसायनशास्त्राचे पारितोषिक मिळाले होते.
.