उणापुरा वीस वर्षाचा तरूण, १९८० च्या आसपास, नागपूरहून चंद्रपूरला आणि मग आलापल्लीला रवाना झाला. वनखात्याचा अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यामुळे, रुजू होण्यासाठी. आलापल्ली नक्षलग्रस्त होती, ती त्याही पूर्वीपासून. पण आम्हाला मात्र ते माहितच नव्हतं. त्याला आलापल्ली फाट्यावर उतरवून एस.टी. पुढे निघून गेली. वेळ संध्याकाळी सातची असावी. सोबत जुन्या काळात असायची तशी पत्र्याची एक ट्रंक, एक होल्डाल (ह्या वस्तुला आता केवळ ऐतिहासिक अर्थच काय तो उरला आहे!), हँडबॅग वगैरे सामान होते. रस्त्यावर इतर कुणी चिटपाखरूही नाही. अंधार गुडूप झालेले. गाव तर दिसू शकेल अशा अंतरावरही नव्हते. मग त्याने काय करावे? सामान घेऊन जाणे एकट्याने शक्यच नव्हते. हातात नेता येईल ते सामान घेऊन तो गावात गेला. उरलेले सामान तिथेच रस्त्यावर. अर्थात नेणार तरी कोण म्हणा उचलून! मग क्वार्टर म्हणून मिळालेले घर रिकामे नसल्याने, तात्पुरत्या मिळालेल्या निवार्यात दिवाबत्तीची सोय करून उरलेले सामान आणले. दूर, दाट निबिडात, एकट्याने, रात्रीचा पोहोचून, निर्भीडपणे आपले बस्तान बसवणारा आमचा भाऊच होता. ह्याचा मला अभिमान आहे.
२०२५-०४-१२
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
सालोसाल वनखात्याच्या वार्षिक खेळस्पर्धा होत असतात. त्यांतून सातत्याने खेळून तो बक्षिसे मिळवत असे. पिलोफाईट पासून तर बॅटमिंटन, क्रिकेट सारखे; वैयक्तिक आणि सांघिक खेळ खेळून त्यात पारितोषिकेही नेहमीच जिंकत असे. अशा पदकांनी त्याच्या घराच्या भिंती सुशोभित आहेत. ह्याचा मला अभिमान आहे.
पुढे त्याचे हाताखाली सुमारे तीस-चाळीस लोक काम करत असत. त्यात दोन हत्तीही होते. त्या सगळ्यांचा पगार महिन्याच्या पहिल्या तारखेस करावा लागे. त्याकरताचे पैसे चंद्रपूरच्या अधिकोषातून काढून आणावे लागत. एकट्याने घेऊन येणे कमी धोक्याचे नव्हते. वनखात्याची जीप होती. मागितल्यास पोलीसही दिमतीला मिळत असत. पण मग पोलीस मागवल्यास ते लक्षवेधी ठरून, अधिकच असुरक्षित होत असे. मग काय करायचे? तर पैसे काढून घेऊन, स्वतःच्या हिंमतीवर, कुणाच्या लक्षात येणार नाही अशा प्रकारे, कापडी पिशवीत ठेवून, चंद्रपूर आलापल्ली प्रवास, दर महिना अखेरीस, एस.टी.च्या बसमधून यशस्वीरीत्या पार पाडणारा साहसी तरूण, आमचा भाऊच होता. ह्याचा मला अभिमान आहे.
मग रामदेवबाबा उदयास आले. आस्था वाहिनीचा उगम झाला. तो योगाबद्दलच्या; प्रथम आत्मियतेने, मग प्रेमाने आणि नंतर निदिध्यासाने; अक्षरशः वेडाच झाला. कुठल्याही परिस्थितीत सकाळी सहा ते सात योगासने करायची, लोकांना शिकवायची, एकटाच असला तरी संपूर्ण इतमामाने सगळे करायचे. परम पूजनीय जनार्दन स्वामींच्या योगप्रसाराच्या कामात मग त्याने सक्रिय सहभाग सुरू केला. आज तो गोपालनगरच्या योगकेंद्राचा संचालक आहे. असंख्य लोक त्याला उत्तम योगशिक्षक मानतात. तो आमचा भाऊ आहे ह्याचा मला अभिमान आहे.
सावित्रीने सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत मिळवले. ती कहाणी सर्वश्रुतच आहे. पण पत्नीचे प्राण मृत्यूच्या जबड्यातून सहिसलामत परत आणणारा आमचा भाऊच आहे, ह्याचा मला अभिमान आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, तेव्हा नुसते आमदारच होते. पण त्यांनी नागपूर सुधार प्रन्यासने लावलेल्या वाढीव विकासदरास घटवावे ह्याकरता, सी.एम. फार्म्युला वापरावा, म्हणून त्यांनी केलेले प्रयत्न यशस्वी झाले होते. त्याकरता त्यांचा गोपालनगरवासियांतर्फे सत्कार करण्यात आला. सत्कार करणारे होते आमचे बंधुराज! ह्याचा मला अभिमान आहे.
असे आहेत आमचे राजाभाऊ!
असे म्हणतात की उमेदीच्या वयात अपार कष्ट करावेत. म्हणजे आयुष्याला आकार मिळतो. हे ज्याने प्रत्यक्षात आणले तोही आमचा भाऊच आहे. त्या काळात त्याचा दिवस सकाळी सहालाच सुरू होई, आणि रात्री उशीरापर्यंत शिकवण्या करत संपत असे. जाणीवपूर्वक, अपार कष्ट करून, एक उत्तम शिक्षक म्हणून त्याने नागपुरात नावलौकिक मिळवला. ह्याचा मला अभिमान आहे.
महाराष्ट्राचे एक मंत्री अतिशय विद्याविभूषित होते. ते वैद्यकीय डॉक्टर होते. प्रशासकीय पदव्यांनी अलंकृत होते. व्यवस्थापकीय पदव्यांचे शिरपेचही त्यांच्या मुकुटात शोभत असत. त्यांच्या पदव्यांची यादी संपता संपत नसे. त्यांचे नाव डॉ. श्रीकांत जिचकार. त्यांच्या उमेदीच्या काळात, आम्हा सगळ्यांनाच त्यांचे खूप कौतूक वाटे. त्यांच्यासारख्या ढीगभर पदव्या कुणी कधी मिळवू शकेल असे आम्हाला कधीही वाटले नाही. पुढे तशाच अनेक पदव्या, आमच्या भावानेही संपादन केल्या. त्याच्या पदव्यांचे शेपूटही हनुमंताच्या शेपटीसारखे वाढतच आहे. त्यात अभियांत्रिकीची पदवी आहे. पदव्यूत्तर पदवी आहे. ऑपरेशन्स रिसर्चमधील पी.एच.डी. आहे. प्रशासकीय पदव्या आहेत. व्यवस्थापकीय पदव्या आहेत. ह्या सगळ्या पदव्यांत प्राप्त केलेल्या ज्ञानाचे वितरण करण्याचाच तर त्याचा व्यवसाय आहे. असाही आमचा एक भाऊ आहे. ह्याचा मला अभिमान आहे.
वर्कशॉप ऑन ऍप्टिट्यूड डेव्हलपमेंट म्हणजे ’वॅड’चे फॅड नागपूरकरांना नवे नाही. विशेषतः अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना. त्या फॅडाचा जनक आमचा भाऊ आहे. ह्याचाही मला अभिमान आहे.
कारकीर्द समुपदेशक, व्यवस्थापकीय सेवांकरताचा मार्गदर्शक, जीवनातील अवघड प्रश्नांकरताचा मार्गदर्शक अशा भूमिका तो नेहमीच बजावत असतो. असंख्य विद्यार्थी आणि त्यांचे पालकही त्याच्या सल्ल्यानेच अनेक निर्णय घेत असतात. नागपुरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयाचा तो आज प्राचार्य आहे. ह्याचाही मला अभिमान आहे.
आपल्या महाविद्यालयीन जीवनात, विद्यापीठातील नामांकित जलतरणपटू, बुद्धिबळपटू, व्हॉलीबॉलपटू असलेला आमचा भाऊ, आजही मित्रांच्या मोठ्या कोंडाळ्यातच वावरत असतो. ह्याचा मला अभिमान आहे.
असा आहे सुरेंद्रा!
आज ह्या दोघांचाही जन्मदिवस आहे. त्यांचे आयुष्य उत्तरोत्तर अधिक आरोग्यसंपन्न आणि समृद्ध होत जावे, लोकाभिमुख व्हावे, लोकहितकर व्हावे ह्याकरता उभयतांस हार्दिक शुभेच्छा आणि अनेकानेक आशीर्वादही!
अशा गुणवान, कर्तृत्ववान मुलांची आई म्हणजेच माझी आई. आमची आई अतिशय सहनशील. सोशिक. तिचा स्वभाव जणू काय हिंदूत्वाचे मर्मच आहे. हिंदू धर्माची मुख्य शिकवण काय असे मला कुणी विचारले तर मी बिनदिक्कतपणे सांगेन की; परधर्म सहिष्णुता, परकर्म सहिष्णुता आणि परवर्म सहिष्णुता! आईचे आचरण, शिकवण आणि स्वभावही सहिष्णुतेचा कणा असणारा. तिचे हस्ताक्षर सुवाच्य, सुघटित आणि सुंदर! असे म्हणतात की, ’न संतोषात परं सुखम्’. संतोष हा तिच्या जीवनाचा आधार आहे. असेल त्या परिस्थितीत संतोषाने, सहजपणे मार्ग शोधण्याचा तिच्या वर्तनातूनच; आम्हीही ते शिकलो तर बरे असे वाटत राहते. ह्याचाही मला खूप अभिमान आहे. ह्या निमित्ताने तिचेही हार्दिक अभिनंदन आणि तिला सादर प्रणाम!
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा