राजा भर्तृहरी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
राजा भर्तृहरी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२०१०-०२-११

राजा भर्तृहरी

 

भर्तृहरी गुहेतील राजा भर्तृहरीची प्रतिमा, उज्जयिनी

 

इसवीसनपूर्व ५५४ मध्ये महाराज गंधर्वसेन, उज्जयिनी नगरीत राज्य करत असत. त्यांना दोन राण्या होत्या. सुशीला नावाच्या राणीपासून त्यांना भर्तृहरी नावाचा मुलगा झाला. दुसर्‍या राणीपासून विक्रमादित्य नावाचा मुलगा झाला. हा राजा-विक्रमादित्य, पराक्रमी, शककर्ता होता. आपण काल-गणनेकरता जे विक्रमसंवत अनुसरत असतो त्या शकाचा कर्ता तोच आहे. राजा विक्रमादित्याचा नवरत्न दरबार होता. त्यातच कालिदास, अमरसिंह इत्यादींचाही समावेश होता. भर्तृहरीस, विक्रमादित्य आणि सुभटवीर्य हे दोन धाकटे भाऊ होते. त्यांच्या बहिणीचे नाव मैनावती होते. मैनावतीचा मुलगा गोपीचंद हा पुढे जाऊन नाथ पंथातील साधू झाला. उज्जयिनीमध्ये भर्तृहरी गुहेनजीकच गोपीचंदाची गुहादेखील आहे.

भर्तृहरी भविष्यात मोठा योगी होईल असे भविष्य वर्तवले गेले. राजपुत्र मोठा झाला. सर्व विद्यापारंगत झाला. कलानिपूण झाला. महाराज गंधर्वसेनांचा भर्तृहरी हा मोठा मुलगा असल्याने, त्यांच्या पश्चात, वयाच्या सोळाव्या वर्षी त्यास राज्याभिषेक झाला. भर्तृहरीला दोन राण्या होत्या. त्यानंतर त्याचा मगधदेशाची राजकन्या पद्माक्षी हिचेशी विवाह झाला. तिचे नाव पिंगला ठेवले. पिंगला अतिशय सुंदर होती. तिच्या प्रेमपाशांत भर्तृहरी बुडून गेला.

राजा भर्तृहरी रसिक कवी होता. थोर मुत्सद्दी होता. कुशल प्रशासक होता. मात्र राणी पिंगलेच्या प्रेमात बुडून गेल्याने तो देहभान विसरला. राज्यकारभारात त्याचे मन रमेना. त्याने राज्यकारभार विक्रमादित्यावर सोपवला आणि नवयौवनाच्या सर्व शृंगारसुखांचा मनःपूत आस्वाद घेऊ लागला. कलासक्त कवी आणि संस्कृत भाषा पंडित असल्याने, शृंगाराच्या रसास्वादावर त्या कालावधीत त्याने शंभर सुरेख कवने रचली. शृंगाराचे यथातथ्य आणि सुरस वर्णन करणार्‍या या काव्याचा प्रभाव, आजही सर्व भारतभर विद्यमान आहे. अनेक लेखन विवरणांतून भर्तृहरीच्या काव्याचे संदर्भ नेहमीच दिले जात असतात. संस्कृत वामयात, छंदशास्त्रावरील कविकुलगुरू महाकवी कालिदासाचा श्रुतबोधहा ग्रंथ विख्यात आहे. श्रुतबोधात वर्णिलेल्या वृत्तांत बांधलेल्या काव्याचे दाखले मात्र, भर्तृहरीच्या काव्यातूनच सहजगत्या उपलब्ध होत असतात. त्याच्या काव्याचा एक सरस दाखला खाली दिलेला आहे [१].

क्वचित्सुभ्रूभङ्गैः क्वचिदपि च लज्जापरिणतैः । क्वचिद् भीतित्रस्तैः क्वचिदपि च लीलाविलसितैः ॥

नवोढानामेभिर्वदनकमलैर्नेत्रचलितैः स्फुरन्नीलाब्जानां प्रकरपरिपूर्णा इव दिशः


- शिखरिणी, श्रुंगारशतक-, राजा भर्तृहरी, इ.स.पूर्व ५५४ वर्षे

 

म्हणजेः


कधी भ्रूभंगाने क्वचित कधि लाजून हसता । कधी भीतीयोगे क्वचित कधि लीलेत रमता ॥

कुमारींच्या सार्‍या नयन विभ्रमी चित्त हरता । असे वाटे सार्‍या उमलत दिशा नीलकमला ॥


- मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१४१०२३

 

राजा भर्तृहरी शूर होता. राजाला आपल्या शौर्याचा सार्थ अभिमान होता. एकदा तो उज्जयिनीच्या उत्तरेकडील तोरणमाळ पर्वतावर शिकारीला गेला होता. दिवस मावळतीला आला, तरीही शिकार गवसली नव्हती. निराश होऊन परतत असतांना, त्याला हरणांचा एक प्रचंड मोठा कळपच दृष्टीस पडला. हरिणींना मारण्यात त्याला स्वारस्य नव्हते. त्याने काळवीटाचा वेध घेतला. राजा त्याला घोड्यावर बांधून नेऊ पाहत होता. असंख्य हरिणींचे डोळे तडफडणार्‍या काळवीटावर खिळून राहिले होते. काळवीट असहाय्यतेने मरणास सामोरे जात होता. तिथेच काही अंतरावर गोरखनाथ साधना करत होते. त्यांनी ही घटना पाहिली. त्यांनी राजाला निष्कारण केलेल्या हत्येबाबत दूषण दिले. ते राजाला म्हणाले की, “राजा, तुला या काळवीटाचे प्राण घेण्याचा मुळीच अधिकार नाही. कारण त्याला जीवदान देण्याचे सामर्थ्य तुझ्यापाशी नाही.मग, गोरखनाथांनी आपल्या विद्येने त्याचे प्राण वाचविले. काळवीट उठून उभा राहिला आणि जंगलात पळून गेला. ही सर्व अद्भूत घटना पाहून, राजा त्यांच्या विद्येच्या प्रभावाने स्तिमित झाला. राजा त्यांचा शिष्य झाला. त्यांना आपले गुरू मानू लागला.

राजा असाच वरचेवर शिकारीला जात असे. अशावेळी, श्रुंगारसुखाच्या आस्वादाला सदैव आसुसलेली राणी पिंगला, सुरक्षादलप्रमुख असलेल्या महिपाल यासच जवळ करू लागली. राजाची शिकार, त्याची प्रेमासक्ती, इत्यादींमुळे राजाचे राज्यकारभाराकडे दुर्लक्ष होऊ लागले. त्या काळात उज्जयिनीस परकीय आक्रमणांचा धोका संभवत होता. विक्रमादित्याने भर्तृहरीला त्याची कल्पनाही दिली. मात्र श्रुंगाररसात आकंठ बुडालेल्या भर्तृहरीस ते रुचले नाही. त्याने विक्रमादित्यासच राज्याबाहेर घालवून दिले.

त्या दरम्यान, उज्जयिनीत एक जयंत नावाचा ब्राम्हण राहत असे. त्याने केलेल्या तपःसाधनेच्या फलस्वरूप, त्याला एक दिव्य फळ प्राप्त झाले होते. त्या फळाचे सेवन केले असता, सेवन करणारा मनुष्य अमर होणार होता. ब्राम्हणाने विचार केला की, मी अमर होऊन कुणाचे भले होणार? त्यापेक्षा राजा अमर झाला तर त्यामुळे प्रजेचे भले होईल. म्हणून राजदरबारात जाऊन त्याने ते फळ राजास अर्पण केले. राजाचे राणी पिंगलेवर अपार प्रेम होते. त्याला असे वाटे की, राणी पिंगला जर अशीच चिरतरूण राहिली, तरच आपल्याला खरा सुखोपभोग संभव आहे. म्हणून त्याने ते फळ राणी पिंगलेला दिले. राजाच्या अनुपस्थितीत राणीने असा विचार केला की, आपल्याला खरे सुख महिपालाकडूनच मिळत असते. तेव्हा तोच जर चिरतरूण राहिला तर आपल्याला खरे सुख दीर्घकाळ लाभू शकेल. म्हणून तिने ते फळ महिपालाला दिले. महिपालाचे लाखा नावाच्या एका राजनर्तिकेवर मन जडले होते. त्याने असा विचार केला की आपल्याला जर चिरसौख्य हवे असेल तर, राजनर्तकी चिरतरूण रहायला हवी. म्हणून त्याने ते फळ तिला दिले. राजनर्तिकेला असे वाटत होते की, एका राजनर्तिकेने चिरतरूण होऊन काय साधणार, त्यापेक्षा राजा चिरतरूण झाल्यास सार्‍याच प्रजेला दीर्घकाळ सुखात ठेवेल. म्हणून एक दिवस राजदरबारात येऊन ते दिव्य फळ तिने राजास अर्पण केले. राजाने ते दिव्य फळ ओळखले. फळाच्या प्रवासाची हकिकत त्याने शोधून काढली आणि तो सुन्न झाला. त्याला वाटत होते की राणी पिंगलेचे त्याच्यावर अपार प्रेम आहे. प्रत्यक्ष राजाची राणी असलेल्या पिंगलेने, महिपालावर प्रेम करावे या वास्तवाने, त्याला विरक्ती आली. ताबडतोब, म्हणजे वयाच्या सतराव्या वर्षी, त्याने विक्रमादित्यास पाचारण करून, राज्य त्याचे सुपूर्त केले आणि संसारत्याग करून तो चालता झाला.

राजाचे वैराग्य पराकोटीचे होते. गुरू गोरखनाथांपाशी त्याने संन्यास घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी त्याकरता आसक्तीचा संपूर्ण त्याग करणे आवश्यक असल्याचे सांगितले आणि त्याच्या वैराग्याची परीक्षा घेण्याकरता, त्याला राणी पिंगलेकडून भिक्षा मागून आणण्यास सांगितले. राजाने तेही केले. भिक्षा दे, माते पिंगले!अशी त्याने भिक्षा मागितली. राणीच्या अविरत विलापानेही तो मुळीच द्रवला नाही. योगचर्या पत्करण्याच्या त्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची, राणी पिंगलेची विनंती त्याने फेटाळून लावली. नंतर त्याने उज्जयिनी नगरीबाहेरील क्षिप्रा नदीच्या किनार्‍यावरील गुहेत बारा वर्षे तपश्चर्या केली. नाथपंथाच्या वैराग्य ऊर्फ बैरागीउपपंथाची त्याने स्थापना केली. पराकोटीच्या वैराग्याचे स्वतःचे अनुभवही, त्याने श्रुंगाराच्या अनुभवांप्रमाणेच काव्यात रचून ठेवले. ते काव्यही जनमानसात अजरामर झाले. त्या शंभर कवनांना वैराग्यशतक म्हणून ओळखले जाते. त्या सुरस काव्याची मोहिनी, भारतीय तत्त्वज्ञानावरील त्यानंतरच्या सर्वच रचनांवर पडलेली आहे. उदाहरणार्थ पुढील वर्णन पाहा. त्यातील कालाय तस्मै नमःहा शब्दसमूह तर मराठी, हिंदी आणि संस्कृत साहित्यातील वाक्प्रचारच बनून राहिला आहे.

सा रम्या नगरी महान्स नृपतिः सामन्तचक्रं च तत् ।

पार्श्वे तस्य च सा विदग्धपरिषत्ताश्चन्द्रबिम्बाननाः

उद्वृत्तः स च राजपुत्रनिवहस्ते बन्दिनस्ताः कथाः

सर्वं यस्य वशादगात्स्मृतिपथं कालाय तस्मै नमःशार्दुलविक्रीडित, वैराग्यशतक-३९

 

म्हणजेः


ती माया नगरी, महान नृपती, मंत्रीहि सारे तसे ।

ती विद्वानसभा, तशाच ललना तेथील चंद्रानना ॥

तो गर्वोन्नत राजपुत्र, सगळे ते भाट, त्यांच्या कथा

हे ज्याने स्मरणार्थ नीट रचिले, काळा नमस्कार त्या ॥ - मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१४१०२३

 

उत्तर आयुष्यात राजा, राजस्थानातील अलवार गावानजीक राहत असे. आजही तिथे राजा भर्तृहरीची समाधी आणि मंदिर आहे. तिथे पाण्याचे कायमच दुर्भिक्ष्य असे. आसपासच्या लोकांना राजास प्राप्त असलेल्या अद्भूत सिद्धी माहीत होत्या. त्यांनी त्यास, पाणी मिळवून देण्याची विनंती केली. आपल्या अलौकिक सिद्धीचा वापर करून राजाने पत्थरातून निर्झर उत्पन्न केले. राजस्थानातील लोककथांतून भर्तृहरीच्या असंख्य कहाण्या शतकानुशतके गायिल्या जात आहेत. उत्तर आयुष्यातील समृद्ध अनुभवांच्या आधारे, राजाने जगात कसे वागावे याचे सुरेख उद्बोधन शंभर कवितांत करून ठेवले आहे. या शंभर कवनांना नीतीशतक म्हटले जाते. नीतीशतकांतील काव्य, भारतीय संस्कृतीत एखाद्या चमचमत्या तेजस्वी तार्‍याप्रमाणे कायमच तळपत आलेले आहे. उदाहरणार्थ पुढील कवनात तर त्याच्या स्वतःच्या जीविताचे सारच जणू भर्तृहरीने काव्यात गुंफून ठेवले आहे. एवढेच नव्हे तर सामाजिकदृष्ट्या ते निंदनीय आहे असे सांगून, अशा वर्तनांचा धिक्कारही केला आहे.


भर्तृहरी मंदिर, अलवार

 

यां चिन्तयामि सततं मयि सा विरक्ता।

साप्यन्यमिच्छति जनं स जनोऽन्यसक्तः॥

अस्मत्कृते च परिशुष्यति काचिदन्या। 

धिक् तां च तं च मदनं च इमां च मां च॥


- वसंततिलका

 


नीतिशतक-२, राजा भर्तृहरी, इसवीसनपूर्व ५५४ वर्षे

 

म्हणजे:

 

मी जीस चिंतित असे, न रुचे तिला मी । जो आवडे तिज, तयास रुचे परस्त्री ॥

त्या स्त्रीस तो न रुचतो, मला वरे ती । धिक्‌ तीस, त्यास, मदनास, हिला, मलाही ॥


मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१४१०२३

राजाचे अनुभव अत्यंत समृद्ध होते. त्याची भाषा अतिशय श्रीमंत होती. अनुभवांचे सार काव्यबद्ध करून ठेवत असतांना त्याला भाषेची रंगत उमगली. त्याने संस्कृत भाषेच्या व्याकरणावर वाक्यपदीयया नावाचा अलौकिक ग्रंथ रचला. त्यातील स्फोटसिद्धांताने, त्यानंतरच्या संस्कृत भाषारचनांवरील सर्व ग्रंथांत मानाचे स्थान मिळवले आहे. तोंडातून फुटणार्‍या अविभाज्य उच्चारांचे वर्णअसे वर्णन करण्याची संकल्पना याच सिद्धांताचा भाग आहे.

राजा भर्तृहरी उज्जयिनीचा राजा असला तरीही, सर्व भारतभर तो लोककथांतून अजरामर झालेला आहे. दक्षिण भारतात भर्तृहरीकथांचे निरूपण केले जाते. उत्तर भारतात त्याच्या विचारांचा सन्मान केला जातो. त्याच्या उज्जयिनीत, लोकांच्या व्यवहारात त्याच्या शतक काव्यांची अमिट छाप पडलेली दिसून येते. तर त्याचे कर्तृत्वक्षेत्र असलेल्या राजस्थानात आजही, त्याच्या नावे यात्रा भरतात, मंदिरे घडविली जातात, आणि लोकगीतांच्या माध्यमातून त्याची शिकवण लोकमानसावर संस्कार करत असते. राजा भर्तृहरीच्या शतकत्रयीने, इतर संस्कृत साहित्यावर सखोल ठसा उमटवला आहे. शतकानुशतके जनमानसावर राज्य केले आहे. अनेक भारतीय भाषांतील वाक्प्रचार आणि म्हणी यांत शतक-त्रयींतील श्लोक अभिव्यक्त झालेले दिसून येतात. उदाहरणार्थ प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळेहे वाक्यही, वामन पंडितांनी मराठीत अनुवाद केलेल्या भर्तृहरीच्याच एका कवितेचा एक चरण आहे.

लभेत सिकतासु तैलमपि यत्नतः पीड्यन्पिबेच्च ।

मृगतृष्णिकासु सलिलं पिपासार्दितः॥

कदाचिदपि पर्यटन्शशविषाणमासादयेन्नतु ।

प्रतिनिविष्टमूर्खजनचित्तमाराधयेत् ॥  - नीतिशतक-५, राजा भर्तृहरी, इसवीसनपूर्व ५५४ वर्षे

 

प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलहि गळे ।

तृषार्ताची तृष्णा मृगजळ पिऊनीही वितळे ॥

सशाचेही लाधे विपिनी फिरता शृंगही जरी ।

परंतु मूर्खाचे हृदय धरवेना पळभरी ॥ - मराठी अनुवादः वामन पंडित, इ.स.१६८० ते १६९५

 

स्वतः राजा भर्तृहरी मात्र पूर्वसुरींच्या पुण्यप्रभावाने अतिशय प्रभावित झालेला होता. पतंजलि मुनींबाबत तर त्याला विशेष आदर वाटत असे. पुढील कवनातून तो यथार्थपणे अभिव्यक्त होतांना दिसतो.

 

योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्यच वैद्यकेन ।

योऽपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतंजलिं प्रांजलिरानितोऽस्मि ।। - राजा भर्तृहरी [२]

 

योगानि चित्ताचि पदानि वाणी, शुद्धी शरीराचिहि वैद्यकानी ।

केली जये त्याच पतंजलींना, या ओंजळी आणुन वंदितो मी ॥  - मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२६०४१०

 

योगाचे साहाय्याने चित्तशुद्धी, पाणिनीच्या सूत्रांवर “महाभाष्य” लिहून वाचाशुद्धी आणि चरक संहितेच्या पुनर्संस्करणाद्वारे वैद्यकाचे आधारे शरीरशुद्धी, यांची साधने उपलब्ध करून देणार्‍या पतंजली मुनींना, मी अंजलीबद्ध करतो. नमन करतो. अशाप्रकारे आपल्या “वाक्यपदीय” या ग्रंथात पतंजलि मुनींबाबत गौरवपर उद्गार काढणार्‍या राजा भर्तृहरीने, पुढे त्यांचाच वारसा चालवला. नाथसंप्रदायात योगसाधना करत असता, “वैराग्य ऊर्फ बैरागी पंथ” स्थापन केला [३]. “वाक्यपदीय” ग्रंथाची रचना करून वाचाशुद्धीचा वसा चालवला. तसेच पत्थरांतून निर्झर निर्माण करून शरीरशुद्धीची साधने सामान्यांना उपलब्ध करून दिली.

 

एवंगुणविशिष्ट राजा भर्तृहरीस सादर प्रणाम!

 

संदर्भः

 

१.      भर्तृहरीकृत सार्थ श्रुंगारशतक, वैराग्यशतक आणि नीतीशतक, वामन पंडितांनी केलेल्या मराठी पद्य अनुवादासहित; वरदा प्रकाशन, सप्टेंबर २००५, किंमत प्रत्येकी रु.२५/- फक्त.

२.      भारतीय मानसशास्त्र अथवा सार्थ आणि सविवरण पातंजल योगदर्शन, योगाचार्य कृष्णाजी केशव कोल्हटकर, आदित्य प्रतिष्ठान प्रकाशन, विरोप पत्ता (विद्युत्‌ निरोप = विरोप, ई-मेल ऍड्रेस) aparna.shankar@gmail.com, संकेतस्थळः http://www.adityapratishthan.org/, प्रथम आवृत्तीः १८-०२-२००४, प्रस्तुत तृतीय आवृत्ती: १४-०१-२००७, देणगी मूल्य केवळ रु.५००/-.

३.      राजा भर्तृहरी  https://nvgole.blogspot.com/2010/02/blog-post_11.html