योगसूत्रे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
योगसूत्रे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२००९-११-२८

पातंजल योगसूत्रे व भाष्ये: ४

समाधिननेन समस्तवासना ग्रन्थेर्विनाशोऽखिलकर्मनाशः |
अन्तर्बहि: सर्वत एव सर्वदा स्वरूपविस्फूर्तिरयत्नतः स्यात् || विवेक चूडामणि ३६४

या निर्विकल्प समाधीच्या योगाने, अंतःकरणांतील सर्व वासनारूप ग्रंथींचा नाश होतो आणि त्यापासून निर्माण होणार्‍या कर्माचा पूर्ण क्षय होतो. असे झाले म्हणजे, आत आणि बाहेर, दोन्ही प्रसंगी स्व-स्वरूपाचे स्फुरण सर्वदा प्रयत्न केल्यावाचून सहजपणे होऊ लागते.

॥ चतुर्थः कैवल्यपादः ॥

चवथा मोक्ष पाद सुरू होत आहे.

१. जन्मौषधिमन्त्रतपःसमाधिजाः सिद्धयः ।
विशिष्ट जन्म, दिव्य औषधी, भिन्न देवतांचे मंत्र, तपःसामर्थ्य आणि समाधी अशा पाचांपासून सिद्धी प्रकट होत असतात.
 
२. जात्यन्तरपरिणामः प्रकृत्यापूरात् ।
जीवांच्या सूक्ष्म देहाच्या आश्रयाने असलेला, एका जातीचा स्थूल देह जाऊन, दुसर्‍या जातीचा देह निर्माण होणे हा जात्यंतर परिणाम होय. हा जात्यंतर परिणाम त्या त्या विकृतींची पूर्णता प्रकृतीकडून केली जाते म्हणून घडून येत असतो.
 
३. निमित्तम् अप्रयोजकं प्रकृतीनां । वरणभेदस्तु ततः क्षेत्रिकवत् ।
क्षेत्रिक म्हणजे शेतकरी ज्याप्रमाणे आपल्या शेताला पाणी पोहोचण्याकरता, मध्यंतरींचे उंचवटे, धोंडे, इत्यादी प्रतिबंध असतील तेवढे दूर करतो - मग अधोमार्गाकडे वाहत जाण्याच्या प्रकृतीधर्मानुसार पाणी आपण होऊनच त्याच्या शेतात जाऊन पोहोचते. त्याचप्रमाणे प्रकृतीच्या परिणाम प्रवाहाला जे वरण म्हणजे जो प्रतिबंध असतो त्याचा भेद म्हणजे नाश धर्माधर्मादिकांमुळे होत असतो, ती निमित्ते प्रकृतीला प्रयोजक नसतात. (त्या निमित्तांनी प्रतिबंध तेवढे दूर होतात आणि प्रकृती आपल्या स्वभावानुसार जात्यंतर परिणाम घडवून आणते.)
 
४. निर्माणचित्तान्यस्मितामात्रात् ।
योग्याने भोगार्थ निर्माण केलेल्या भिन्न शरीरातील भिन्नपणे निर्माण झालेल्या चित्तांचा आपूर, त्या चित्तरूपी विकृतींची प्रकृती अशी जी योग्याच्या ठिकाणची अस्मिता तिच्यातूनच केवळ घडून येत असतो.
 
५. प्रवृत्तिभेदे प्रयोजकं चित्तम् एकम् अनेकेषाम् ।
योग्याने निर्माण केलेल्या अनेक शरीरांतील अनेक चित्तांच्या भिन्न भिन्न प्रवृत्तींना प्रयोजक म्हणजे प्रेरक असलेले चित्त एकच असते. (म्हणून त्या प्रेरक चित्ताच्या प्रेरणेला अनुसरून सर्व चित्तांचे व्यापार एकाच अभिप्रायानुसार चालतात आणि योग्यास अपेक्षित भोग घडतात.)

६. तत्र ध्यानजम् अनाशयम् ।
योग्याने निर्माण केलेल्या ह्या अनेक चित्तांस प्रेरक असलेले जे ध्यानज, म्हणजे ध्यानावस्थेमुळे सत्त्वगुणाने संपन्न झालेले मूळचे चित्त, ते अनाशय असते; म्हणजे इतर चित्तांद्वारा घडणार्‍या भोगरूप कर्मामुळे त्या ध्यानज चित्तावर विपाकास कारणीभूत होणारे कर्मसंस्कार घडत नाहीत असे ते असते.

७. कर्माशुक्लाकृष्णं योगिनः त्रिविधम् इतरेषाम् ।
काही कर्मांचे स्वरूप शुक्ल म्हणजे शुभ असते. इतर काही कर्मांचे स्वरूप कृष्ण म्हणजे अशुभ असते. तर काही कर्मे शुक्ल-कृष्ण म्हणजे शुभाशुभ अशी मिश्र स्वरूपाची असतात. योग्यांची कर्मे शुक्ल ही नसतात, कृष्ण ही नसतात आणि शुक्ल-कृष्ण ही नसतात. योगी जनांहून इतर प्राकृत जनांची कर्मे मात्र वरील तिन्ही प्रकारची असतात.
 
८. ततस्तद्विपाकानुगुणानाम् एवाभिव्यक्तिर्वासनानाम् ।
त्या कर्मांच्या योगाने जाती, आयुष्य आणि भोग असा जो विपाक निर्माण होतो त्याच्याशी जेवढ्या वासना अनुगुण असतील तेवढ्यांचीच अभिव्यक्ती होत असते. (म्हणजे तेवढ्या वासना प्रकट होतात आणि इतर वासना चित्तांत तशाच प्रसुप्त अवस्थेत राहतात.)

९. जातिदेशकालव्यवहितानाम् अप्यानन्तर्यं । स्मृतिसंस्कारयोः एकरूपत्वात् ।
सांप्रतच्या विपाकाला अनुगुण असलेल्या आणि व्यक्त होणार्‍या वासना आणि त्यांचे मूळचे संस्कार ह्या दोहोंच्या मध्ये अनेक देशांत आणि कालांत प्राप्त झालेल्या अनेक जन्मांचे व्यवधान असूनही नंतर त्या वासना प्रकट होतात. वासनांचे संस्कारच स्मृतीरूपाने उदित होत असतात, म्हणजे स्मृती आणि संस्कार ह्यांच्यात एकरूपता असते हे ते संस्कार स्मृतीरूपाने चित्तांत उदित होण्याला कारण असते.

१०. तासाम् अनादित्वं चाशिषो नित्यत्वात् ।
देहरूप जो मी त्याला मरण येऊ नये असे जे जीवमात्राला वाटत असते तोच महामोहरूपी आशी: होय. हा आशी: सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी नित्याचाच आहे म्हणजे तो अनादी आहे. इतर सर्व वासना त्याच्यावरच अवलंबून असल्याने त्याही अर्थात् त्याच्यासारख्या अनादी होत.

११. हेतुफलाश्रयालम्बनैः संगृहीतत्वाद् एषाम् अभावे तदभावः ।
अविद्यादी पाच क्लेश वासनांचे हेतू होत; जाती, आयुष्य आणि भोग ही त्या वासनांची फले होत; चित्त त्यांचे आश्रयस्थान होय आणि शब्दादिक विषय त्यांची आलंबने होत. ह्या चारांपासूनच वासनांचा संग्रह होत असतो म्हणून ह्या चारांचा अभाव होताच वासनांचाही अभाव सिद्ध होतो.
 
१२. अतीतानागतं स्वरूपतोऽस्त्यध्वभेदाद् धर्माणाम् ।
धर्माच्या ठिकाणी अतीत धर्म म्हणजे कार्य संपल्यामुळे जे उपशांत झाले आहेत असे धर्म, अनागत म्हणजे जे उद्बोधक सामग्री मिळताच व्यक्तावस्थेला येणार आहेत असे धर्म आणि उद्बोधक सामग्री मिळाल्यामुळे व्यक्त दशेस येऊन ज्यांची कार्ये चालू झाली आहेत ते वर्तमान धर्म, अशा रीतीचा अध्वभेद आहे, म्हणून मागील सूत्रांत सांगितलेल्या वासनांचा वर्तमान धर्माच्या दृष्टीने जरी अभाव असला तरी त्या अतीत व अनागत अशा अवस्थांत स्वरूपतः असतातच.

१३. ते व्यक्तसूक्ष्मा गुणात्मानः ।
वर्तमानावस्थेत असलेले धर्म व्यक्त होत आणि कार्य घडून आल्यामुळे शांत झालेले अतीत धर्म आणि उद्बोधक सामग्रीच्या अभावी ज्यांस व्यक्तावस्था प्राप्त  झालेली नाही ते अनागत धर्म, हे दोन्हीही सूक्ष्म धर्म होत. अशा प्रकारचे हे व्यक्त आणि सूक्ष्म धर्म, सत्त्व, रज आणि तम हे तीन गुण आहेत. आत्मा म्हणजे स्वरूप ज्यांचे, असे आहेत. म्हणजे हे सर्व धर्म तत्त्वतः केवळ गुणस्वरूपच आहेत.

१४. परिणामैकत्वाद् वस्तुतत्त्वम् ।
तिन्ही गुणांचा परिणाम एकच होत असल्यामुळे एकच वस्तुतत्त्व सिद्ध होते.

१५. वस्तुसाम्ये चित्तभेदात् तयोर्विभक्तः पन्थाः ।
वस्तू एकच असली तरी त्या वस्तूचे ग्रहण करणारी चित्ते भिन्न असल्याने ती वस्तू आणि ग्रहण करणारे चित्त ह्या दोहोंचा मार्ग भिन्न असतो. म्हणजे वस्तू आपल्या मार्गाने परिणाम पावत असते तर चित्त आपल्या स्वतंत्र मार्गाने परिणाम पावत असते. वस्तू आणि चित्त ह्यांचे परिणामप्रवाह अगदी स्वतंत्र असून ते आपापल्या स्वतंत्र मार्गांनी चाललेले असतात.

१६. न चैकचित्ततन्त्रं वस्तु तद् अप्रमाणकं तदा किं स्यात् ।
कोणत्याही वस्तूचे अस्तित्त्व एक-चित्ततंत्र नसते, म्हणजे कोणाही एका चित्तावर ते अवलंबून नसते. जर ते त्या वस्तूला पाहणार्‍याच्या चित्तावर अवलंबून असेल तर ते चित्त जेव्हा दुसर्‍या वस्तूची प्रतीती घेत असते तेव्हा ही पहिली वस्तू अप्रमाणक होणार की काय? म्हणजे प्रत्यक्षादी प्रमाणांनी ती इतरांस ज्ञात होणार नाही की काय? तशी ती अप्रमाणक होत असल्याचा अनुभव कधीच येत नाही. ह्यावरून ती एक-चित्ततंत्र नसते हे उघडच आहे.

१७. तदुपरागापेक्षत्वात् चित्तस्य वस्तु ज्ञाताज्ञातम् ।
इंद्रियद्वारा चित्ताने बाह्य विषयाकार धारण करणे म्हणजे बाह्य विषयाला व्यापणे हा चित्ताचा त्या विषयांशी होणारा उपराग होय. वस्तूचे ज्ञान होण्याला चित्ताचा त्या वस्तूशी असा उपराग होण्याची अपेक्षा असते. असा उपराग झाला म्हणजे ती वस्तू ज्ञात होते, म्हणजे तिचे ज्ञान आपणांस होते. जोपर्यंत असा उपराग झालेला नसतो तोपर्यंत ती वस्तू अज्ञात असते म्हणजे तिचे ज्ञान आपल्याला होत नाही.

१८. सदा ज्ञाताश्चित्तवृत्तयस्तत्प्रभोः पुरुषस्यापरिणामित्वात् ।
चित्ताचा प्रभू म्हणजे स्वामी, पुरूष होय. तो अपरिणामी आहे म्हणजे चित ज्याप्रमाणे निरंतर परिणाम पावत असते त्याप्रमाणे परिणाम पावणारा तो नाही म्हणून त्याला मात्र चित्ताच्या वृत्ती सदोदित ज्ञात असतात.
 
१९. न तत् स्वाभासंदृश्यत्वात् ।
चित्ताच्या ठिकाणी दृश्यत्व आहे म्हणजे ते दुसर्‍याकडून पाहिले जात असते. अशाप्रकारे जे दुसर्‍यास दृश्य असते ते स्वाभास म्हणजे स्वतःचे प्रकाशक असत नाही, म्हणून ते व त्याच्या वृत्ती त्याच्याहून अन्य असलेल्या अपरिणामी द्रष्ट्याला सर्वदा ज्ञात होत असतात.
 
२०. एकसमये चोभयानवधारणम् ।
आणि एकाच वेळी चित्त स्वतःला आणि बाह्य पदार्थाला अनुभवू शकत नाही, म्हणून ज्या अर्थी एकाच वेळी बाह्य पदार्थ आणि चित्ताच्या वृत्ती ज्ञात होत असतात त्या अर्थी बाह्य वस्तू चित्ताला ज्ञात होत असतात आणि चित्तवृत्ती अपरिणामी जो द्रष्टा त्याला ज्ञात होत असतात हे सिद्ध होते.
 
२१. चित्तान्तरदृश्ये बुद्धिबुद्धेरतिप्रसङ्गः स्मृतिसंकरश्च ।
चित्तवृत्तींना जे ज्ञान होत असते ते  अपरिणामी असलेल्या द्रष्ट्याला होत नसून ते चित्तांतरदृश्य म्हणजे निराळ्याच चित्ताला दृष्य म्हणजे ज्ञात होत असते असे मानले तर त्या निराळ्या चित्ताला म्हणजे बुद्धीला पाहणारे असे तिसरे चित्त मानावे लागेलच व मग तिसर्‍याला पाहणारे चौथे, चौथ्याला पाहणारे पाचवे, अशा प्रकारचा अतिप्रसंग प्राप्त होतो, इतकेच नव्हे, तर ह्या अनेक चित्तांतून उत्पन्न होणार्‍या स्मृतींचा संकर म्हणजे गोंधळही होईल पण असे तर कधीच घडत नाही म्हणून चित्तवृत्तींना जाणणारा अपरिणामी पुरूषच होय.
 
२२. चितेरप्रतिसंक्रमायास्तदाकारापत्तौ स्वबुद्धिसंवेदनम् ।
चित्ति म्हणजे चेतन पुरूष हा नेहमीच अप्रतिसंक्रम असा आहे. प्रतिसंक्रम म्हणजे दुसर्‍याकडे जाणे. द्रष्टा अप्रतिसंक्रम आहे म्हणजे बुद्धी जशी इंद्रियद्वारा विषयाकडे जाऊन त्याला व्यापते त्याप्रमाणे चेतन द्रष्टा अपरिणामी असल्यामुळे तो बुद्धी ज्ञात व्हावी म्हणून तिच्याकडे प्रतिसंक्रांत होत नाही तर आपल्या ठिकाणीच तो सुप्रतिष्ठित असतो. तत्त्वतः तो असा असूनही बुद्धी जेव्हा वृत्तीरूपाने परिणाम पावत असते तेव्हा तो अविद्येमुळे तिच्या आकाराला प्राप्त झाल्यासारखा होत असतो आणि अविद्यानाशानंतर मग मी असज्जडदु:खात्मक देहादिक नसून मी सच्चिदानंदरूप आत्मा आहे असे वृत्त्यात्मकविशेषज्ञानरूप स्वसंवेदन होते आणि साक्षिभास्य बुद्धीसंवेदनही होते.
 
२३. द्रष्टृदृश्योपरक्तं चित्तं सर्वार्थम् ।
चेतन पुरूष हा द्रष्टा आणि बाह्य जगातील पदार्थजात हे दृश्य ह्या दोहोंशी चित्त उपरक्त होत असते म्हणजे तदाकारतेला प्राप्त होत असते, ह्यामुळे ते सर्वार्थ असते म्हणजे द्रष्टा, दर्शन व दृश्य ह्या सर्व अर्थांचे ग्रहण अशा चित्ताच्या योगाने होऊ शकते.
 
२४. तदसंख्येयवासनाचित्रम् अपि परार्थं संहत्यकारित्वात् ।
अनेक जड पदार्थांच्या संहतीमुळे म्हणजे एकत्र येण्याने काही कार्यनिष्पत्ती होणे हे त्या पदार्थाचे संहत्यकारित्व होय. ज्यांच्या ठिकाणी असे संहत्यकारित्व दिसून येते ते जड पदार्थ दुसर्‍या कोणाच्या तरी भोगाकरता असतात ही त्यांची परार्थता होय. चित्त आपल्या ठिकाणी असलेल्या असंख्य वासनांमुळे जरी अनेक आकारांस प्राप्त होणारे असले तरी त्याच्या ठिकाणीही संहत्यकारित्व असल्यामुळे तेही पर म्हणजे चेतन द्रष्टा तदर्थच म्हणजे त्याच्याकरताच आहे.

चित्त पूर्ण अंतर्मुख झाले म्हणजे त्या चित्तात आत्म्याचा विशेषपणे साक्षात्कार कसा होतो हे वरील बावीस आणि तेवीस ह्या सूत्रांत स्पष्ट झाले. आता आत्म्याचे अशा प्रकारे विशेष दर्शन झाले म्हणजे चित्ताच्या ठिकाणी कोणत्या अवस्था प्रकट होत असतात त्याचे पुढील सूत्रांतून वर्णन केलेले असून शेवटच्या म्हणजे चौतिसाव्या सूत्रात कैवल्याचे स्वरूप सांगितलेले आहे.

२५. विशेषदर्शिन आत्मभावभावनाविनिवृत्तिः ।
मी पुरूष सत्-चित्-आनंदरूप असून चित्ताहून वेगळा आहे अशा प्रकारचे वृत्त्यात्मक अनुसंधान राखणे ही आत्मभावभावना होय. ज्याला वरील प्रकारचे आत्म्याचे विशेष दर्शन झालेले असते त्याच्या ठिकाणची आत्मभावना नाहीशी होते, म्हणजे तशा प्रकारची भावना न करताही त्याच्या ठिकाणी आत्मस्फुरण सहजपणे होऊ लागते.

२६. तदा विवेकनिम्नं कैवल्यप्राग्भारं चित्तम् ।
आत्म्याचे विशेष दर्शन झाल्यामुळे  आत्मभावभावना निवृत्त झाली असता त्या योग्याच्या चित्ताचा प्रवाह कैवल्यरूपी उंच प्रदेशाकडून विवेकरूपी निम्न म्हणजे सखल प्रदेशाकडे वाहत राहतो.

२७. तच्छिद्रेषु प्रत्ययान्तराणि संस्कारेभ्यः ।
आत्मसाक्षात्कार झालेल्या योग्याच्या चित्ताच्या सात्त्विकवृत्तीप्रवाहात मधून मधून खंड पडतो, हीच छिद्रे होत. ह्या छिद्ररूप अंतरालात मधून मधून पूर्वसंस्कारांमुळे भिन्न प्रत्ययही निर्माण होतात.

२८. हानम् एषां क्लेशवदुक्तम् ।
मागील सूत्रात सांगितलेले प्रत्यय आणि त्यांचे संस्कार चित्तांतून नाहीसे होणे हे त्यांचे हान होय. हे हान साधण्यासाठी मागे क्लेशांच्या निवृत्तीसाठी जे उपाय सांगितलेले आहेत तेच ह्या ठिकाणी उक्त आहेत.

२९. प्रसंख्यानेऽप्यकुसीदस्य सर्वथाविवेकख्यातेर्धर्ममेघः समाधिः ।
यथाक्रम व्यवस्थित असलेल्या तत्त्वांहून चेतन आणि द्रष्ट्टरूप असलेला आत्मा म्हणजे आपण अत्यंत विलक्षण आहोत असे नि:संदेह ज्ञान होणे हे प्रसंख्यान होय. ह्या प्रसंख्यानाविषयीही जो योगी अकुसीद म्हणजे सावकारी न करणारा म्हणजे विरक्त होतो अशा योग्याच्या ठिकाणी प्रत्ययांतररहित अशी विवेकख्यातीरूप आत्मसाक्षात्कारवस्था प्रकट होते आणि मग ह्या विवेकख्यातीमुळे धर्मामृतधारांचा वर्षाव करणारा जणू मेघच असलेला समाधी सिद्ध होतो.

३०. ततः क्लेशकर्मनिवृत्तिः ।
धर्ममेघ समाधी सिद्ध झाला असता अविद्यादी पाच क्लेश आणि शुभ, अशुभ व मिश्र अशी त्रिविध कर्मे ह्यांची पूर्णत्त्वाने निवृत्ती होते.

३१. तदा सर्वावरणमलापेतस्य ज्ञानस्याऽनन्त्याज्ज्ञेयम् अल्पम् ।
धर्ममेघ समाधीमुळे चित्तातील ज्ञानाला आवरक असलेले जे क्लेशकर्मरूप मल, त्यांपासून मुक्त झालेल्या ज्ञानाला आनन्त्य प्राप्त होत असते आणि त्याच्या अपेक्षेने ज्ञेय अगदी अल्प उरते.

३२. ततः कृतार्थानां परिणामक्रमपरिसमाप्तिर्गुणानाम् ।
मागील सूत्रात सांगितल्याप्रमाणे योग्याच्या चित्तांतील ज्ञानाच्या ठिकाणी आनन्त्य आणि ज्ञेयाच्या ठिकाणी अल्पता आल्याने प्रकृतीचे घटक असलेले सत्त्व, रज आणि तम हे तिन्ही गुण कृतार्थ होतात आणि म्हणून त्या योग्याच्या चितांतील सूक्ष्म अस्मितेपासून स्थूलदेहापर्यंतचा जो त्रिगुणांचा परिणामक्रम, तो समाप्त होतो.

३३. क्षणप्रतियोगी परिणामापरान्तनिग्रार्ह्यः क्रमः ।
हा परिणामक्रम क्षणप्रतियोगी असतो, म्हणजे एका क्षणाहून तो विलक्षण आणि अनेक क्षणांच्या प्रचयाच्या आश्रयाने राहणारा असा असतो. हेच त्याचे क्षणप्रतियोगित्व होय. त्याचप्रमाणे तो विशिष्ट-परिणाम-प्रवाहाच्या अपरान्तापर्यंत म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत नि:शेषत्वाने ग्रहण केला जातो.

३४. पुरुषार्थशून्यानां गुणानां प्रतिप्रसवः कैवल्यं, स्वरूपप्रतिष्ठा वा चितिशक्तिरेति ।
जीवाला भोग आणि अपवर्ग ही प्राप्त करून दिल्यामुळे त्रिगुणांना आता साधावयाचा असा कोणताच अर्थ राहिलेला नसतो, ही त्यांची पुरूषार्थशून्यता होय. अशा रीतीने पुरूषार्थशून्य झालेले गुण प्रयोजनाभावी आपापल्या उपादान करणात विलीन होतात. हा त्यांचा प्रतिप्रसव होय. हीच कैवल्यावस्था होय, किंवा चितिशक्ती म्हणजे चेतनपुरूष अविद्येच्या नाशामुळे वृत्तीशी सारुप्य पावत नाही आणि अशा प्रकारे तो आपल्या नित्यसिद्ध स्वरूपाने प्रतिष्ठित असतो हीच कैवल्यावस्था होय.

॥ इति पतञ्जलि विरचिते योगसूत्रे चतुर्थः कैवल्यपादः ॥

'इति' हे पद शास्त्र समाप्त झाल्याचे निदर्शक म्हणून योजले आहे.

अशाप्रकारे हा प्रकल्प यथानियोजित संपूर्ण होत आहे.


.

पातंजल योगसूत्रे व भाष्ये: ३

अनंतशक्तिरैश्वर्यं निष्यन्दाश्चाणिमादय: ।
स्वस्येश्वरत्वे संसिद्धे सिध्यन्ति स्वयमेव हि ॥
पुष्पमानया गन्धो विनेच्छामनुभूतये ।
पूर्णाहम्भावयुक्तेन परिच्छिन्ना विभूतय ॥ - मानसोल्लास:

पुष्प आणत असतांना त्यातील गंध यदृच्छया अनुभूतीला येतो तद्वत्, ज्याचा अहंभाव पूर्णत: नष्ट झालेला आहे अशा, स्वत:मधील ईश्वरत्वाने मोक्ष प्राप्त झालेल्या योग्याला अनंत शक्ती आणि ऐश्वर्य यांचा परिणाम असणार्‍या अणिमा इत्यादी सिद्धी स्वत:हूनच प्राप्त होतात.

॥ तृतीयो विभूतिपादः ॥

तिसरा चतकोर. विभूतीपाद. विभूती म्हणजे सिद्धी.

संप्रज्ञात समाधीच्या पाच बहिरंग साधनांचा म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार ह्या पाच अंगांचा विचार दुसर्‍या समाधीपादात झाला. आता ह्या तिसर्‍या पादात, धारणा, ध्यान आणि समाधी ह्या तीन अंतरंग साधनांचा विचार केला आहे. ह्या पादाला विभूतीपाद असे नाव आहे. ह्याचे कारण असे, की ह्या पादात योगाभ्यासापासून प्राप्त होणार्‍या अनेक विभूती म्हणजे सिद्धी संयमापासून प्राप्त होत असल्याने प्रथम संयम म्हणजे काय हे सांगण्यासाठी संयमाचे घटक जी धारणा, ध्यान आणि समाधी ही तीन अंगे आहेत, त्यांची लक्षणे पहिल्या तीन सूत्रांत सांगितलेली आहेत.

१. देशबन्धश्चित्तस्य धारणा ।
चित्ताला कोणत्यातरी देशावर म्हणजे स्थानावर जणू बांधून ठेवल्यासारखे स्थिर करणे ही धारणा होय.
 
२. तत्र प्रत्ययैकतानता ध्यानम् ।
एका क्षणाला जी भावना चित्तात असेल तीच पुढील अनेक क्षणांत टिकणे ही त्या भावनेची म्हणजे प्रत्ययाची एकतानता होय. धारणा ज्या देशावर केली असेल त्या देशावर ही प्रत्ययैकतानता करणे म्हणजे ध्यान होय.

३. तद् एवार्थमात्रनिर्भासं स्वरूपशून्यम् इव समाधिः ।
भाव्य वस्तूव्यतिरिक्त दुसरा कोणताही अर्थ भासमान न होता केवळ ती वस्तूच भासमान होणे ही त्या वस्तूची अर्थमात्रनिर्भासता होय. चित्ताची भाव्य वस्तूशी इतकी तन्मयता होणे, की अमुक भाव्य वस्तूचे ध्यान मी करत आहे असे स्फुरण न होणे ही त्याची स्वरूपशून्यता होय. ध्येय अशा रीतीने केवळ अर्थरूपानेच तेवढे भासमान होणे आणि त्याच्या स्वरूपाचेही अनुसंधान न होणे हाच समाधी होय.
 
४. त्रयम् एकत्र संयमः ।
धारणा, ध्यान आणि समाधी हे तिन्ही एकत्र प्रवृत्त झाले म्हणजे तो संयम होय.

५. तज्जयात् प्रज्ञाऽऽलोकः ।
प्रकर्षाने म्हणजे विशेष प्रकारे ज्ञान जिला होते ती प्रज्ञा होय. संयमाचा जय झाला म्हणजे अशा प्रकारच्या प्रज्ञेचा आलोक म्हणजे उदय होतो.

६. तस्य भूमिषु विनियोगः ।
त्या प्रज्ञेच्या उदयाचा विनियोग पुढील भूमीच्या ठिकाणी करावा.

७. त्रयम् अन्तरङ्गं पूर्वेभ्यः ।
यम, नियम, आसन, प्राणायाम व प्रत्याहार ह्या पाच पूर्वीच्या योगांगांच्या अपेक्षेने धारणा, ध्यान आणि समाधी ही तिन्ही सबीज संप्रज्ञात समाधीची अंतरंग साधने होत. 

८. तद् अपि बहिरङ्गं निर्बीजस्य ।
मात्र निर्बीज असंप्रज्ञात समाधीसाठी तीही बहिरंग साधनेच होत.

९. व्युत्थाननिरोधसंस्कारयोरभिभवप्रादुर्भावौ निरोधक्षणचित्तान्वयो निरोधपरिणामः ।
चित्त विषयाकार होणे हे व्युत्थान (purturbation, disturbance, deviation) आणि चित्तात विषयाभिमुख होण्याची जी ओढ असते तो व्युत्थान संस्कार. त्याच्या उलट सर्व वृत्तींचा उपशम करणे हा निरोध आणि ह्या निर्वृत्तिक अवस्थेत होणार्‍या सत्त्वसंपन्नतेची ओढ हा निरोधसंस्कार. व्युत्थान संस्कारांचा अभिभव होणे म्हणजे ते दुर्बळ होत जाणे आणि निरोध संस्कार प्रकट होत जाणे व निरोधक्षणांत चित्ताचा अन्वय असणे म्हणजे चित्त निरोधावस्थेत काही क्षण टिकणे ह्या अवस्थेला चित्ताचा निरोधपरिणाम म्हणतात.

१०. तस्य प्रशान्तवाहिता संस्कारात् ।
कसलाही विक्षेप न येता चित्त परिणामावस्थेत टिकून राहणे ही त्या परिणामाची प्रशांतवाहिता होय. मागील सूत्रात सांगितलेल्या निरोधपरिणामाची प्रशांतवाहिता निरोधाच्या संस्कारामुळे होऊ लागते.

जाणकारांना प्रतिसादास उद्युक्त करणे, अजाणत्यांची जिज्ञासा जागवणे, किमान आपल्या संस्कृतीने परंपरागत मौखिक पठणाद्वारे संचित केलेल्या आपल्या सांस्कृतिक ज्ञानाची ओळख करून घेण्यास सर्वसामान्यांना प्रोत्साहित करणे ह्या उद्देशाने मी ही मालिका लिहीत आहे. अपुरी, त्रोटक वाटणे स्वाभाविकच आहे. शिवाय मी 'तज्ञ' म्हणून नव्हे तर 'विद्यार्थी' म्हणूनच हे लिहीत आहे. आपण आपल्या सांस्कृतिक ठेव्याचा उपयोग करू शकलो पाहिजे, तसेच कमीत कमी पुढल्या पिढ्यांकडे यथाशक्य सुपूर्त करू शकलो पाहिजे असे मला वाटते.

३. "पातंजल योगप्रदीप", डॉ.पु.पां. जाखलेकर, अनमोल प्रकाशन, पुणे, प्रथमावृत्ती: २००१, किंमत: रू.१००/- फक्त, पृष्ठे १४५.

११. सर्वार्थतैकाग्रतयोः क्षयोदयौ चित्तस्य समाधिपरिणामः ।
चित्त सर्व अर्थाकडे म्हणजे विषयांकडे धावत असणे ही सर्वार्थता आणि ते एकाच आधारावर स्थिर राहणे ही एकाग्रता होय. सर्वार्थतेचा क्षय आणि एकाग्रतेचा उदय म्हणजे समाधी परिणाम होय.

१२.ततः पुनः शान्तोदितौ तुल्यप्रत्ययौ चित्तस्यैकाग्रतापरिणामः ।
पूर्व क्षणांतील प्रत्यय शांत होताच पुन्हा तत्सदृश प्रत्यय पुढील क्षणांत उदित झाला तर हे दोन्हीही तुल्यप्रत्यय झाले. अशाप्रकारे पूर्वोत्तर क्षणांत एकसारखाच प्रत्यय राहणे म्हणजे एकाग्रता होय.

१३. एतेन भूतेन्द्रियेषु धर्मलक्षणावस्थापरिणामा व्याख्याताः ।
अशाप्रकारे, भूते आणि त्यांची इंद्रिये ह्यांच्या ठिकाणी निर्माण होणारे धर्म, लक्षण आणि अवस्था ह्या तीन परिणामांची व्याख्या झाली.

१४. शान्तोदिताव्यपदेश्यधर्मानुपाती धर्मी ।
ज्यांचा व्यापार संपला आहे ते शांत धर्म होत. ज्यांचा व्यापार सुरू झाला आहे ते उदित धर्म आणि भावी काळात उत्पन्न होणारे, मात्र तोपर्यंत केवळ शक्तीरूपाने असलेले व म्हणूनच ज्यांचे ज्ञान होऊ शकत नाही ते अव्यपदेश्य धर्म होत. ह्या तिन्ही विशेष धर्मात अन्वयित्वाने राहतो तो धर्मी होय.

१५.  क्रमान्यत्वं परिणामान्यत्वे हेतुः ।
धर्म, लक्षण आणि अवस्था ह्या तीन परिणामांतून परिणाम शांत होऊन दुसरा परिणाम उदित होतो हे परिणामान्यत्व होय. प्रतिक्षणी होणाऱ्या परिणाम क्रमात अन्यत्व निर्माण होते म्हणून परिणामान्यत्व घडून येते.

१६. परिणामत्रयसंयमाद् अतीतानागतज्ञानम् ।
धर्म, लक्षण आणि अवस्था तीन मागील सूत्रात सांगितलेले परिणामत्रय त्यावर संयम केल्याने अतीत म्हणजे मागे होऊन गेलेल्या आणि अनागत म्हणजे आज अव्यपदेश्य असलेल्या पण पुढे घडून येणाऱ्या अशा गोष्टींचे ज्ञान होते.

१७. शब्दार्थप्रत्ययानाम् इतरेतराध्यासात् संकरः । तत्प्रविभागसंयमात् सर्वभूतरुतज्ञानम् ।
कोणत्याही पदार्थाला उद्देशून उच्चारला जाणारा शब्द, ज्याला उद्देशून तो शब्द उच्चारला जातो तो त्या शब्दाचा अर्थ आणि त्या शब्दावरून त्या अर्थाचा जो बोध होतो तो प्रत्यय,  ह्या तिन्ही गोष्टी परस्परांहून देशत:, कालत: व वस्तुत: अत्यंत भिन्न असूनही त्यांचा एकमेकांवर अध्यास होतो व त्यामुळे तिन्हींचा संकर झालेला असतो. ह्या संकराचे शब्द, अर्थ व प्रत्यय हे जे प्रविभाग त्यांवर संयम केला असता सर्व भूतांचे रुत म्हणजे बोलणे त्याचे ज्ञान होते.

१८. संस्कारसाक्षत्करणात् पूर्वजातिज्ञानम् ।
चितामधे अनंत जन्मार्जित वासनांचे संस्कार असतात. ह्या संस्कारांवर संयम केल्याने त्यांचा साक्षात्कार होतो. असा साक्षात्कार झाल्यावर त्यामुळे त्या योग्याला कोणत्याही पूर्वजन्माचे ज्ञान होते.
 
१९. प्रत्ययस्य परचित्तज्ञानम् ।
पर म्हणजे दुसरा मनुष्य. त्याच्या चित्ताचे ज्ञान, त्याच्या चित्तातील प्रत्ययाच्या साक्षात्काराने होते. 

२०. न च तत् सालम्बनं,तस्याविषयीभूतत्वात् ।
हे ज्ञान त्या प्रत्ययाला जो आधार असतो त्यासह होत नाही. कारण तो आधार साक्षात्करणाचा विषय झालेला नसतो.

यापुढील सूत्रांत अदृश्य होण्याची सिद्धी, देहाचा मृत्यू कोठे व कसा होतो हे अगोदरच कळते ती सिद्धी आणि मैत्री, करुणा, आनंद व उपेक्षा करण्याच्या सामर्थ्यांच्या सिद्धी कशा प्राप्त होतात ते सांगितले आहे. त्यामुळे हा अतिशय रोचक भाग आहे. मात्र मुळात कोल्हटकरांनी दिलेली स्पष्टीकरणे व भाष्ये खूपच विस्तृत असल्याने इथे देणे सोपे नाही. ती मुळातच वाचावित. इथे केवळ त्या त्या सूत्रांचा शब्दश अभिप्रेत असणारा अर्थच काय तो देण्याचा प्रत्यत्न करत आहे.

२१. कायरूपसंयमात् तद्ग्राह्यशक्तिस्तम्भे चक्षुःप्रकाशासंप्रयोगेऽन्तर्धानम् ।
आपल्या शरीराचे जे रूप, त्यावर संयम केल्याने ते शरीर इतरांस डोळ्यांनी ग्रहणक्षम व्हावे अशा प्रकारची त्याच्या ठायी जी शक्ती असते तिचे स्तंभन होते व त्यामुळे पाहणाऱ्याच्या डोळ्यांचा जो प्रकाश त्याचेशी योग्याच्या शरीराच्या स्वरूपाचा संयोग होत नाही म्हणून योगी अंतर्धान पावतो. म्हणजे त्याच्या शरीराचे रूप पाहणाराला दिसत नाही.

२२. एतेन शब्दाद्यन्तर्धानमुक्तम् सोपक्रमं निरुपक्रमं च कर्म । तत्संयमाद् अपरान्तज्ञानम्, अरिष्टेभ्यो वा ।
सोपक्रम आणि निरूपक्रम असे कर्मांत दोन प्रकार आहेत. ज्या कर्माची फलप्राप्ती अगदी लवकर होते ते सोपक्रम कर्म होय. ज्याची फलप्राप्ती दीर्घकालाने होते ते निरुपक्रम कर्म होय. कर्मातील हे प्रकार जाणून घेऊन त्यांच्यावर संयम केला म्हणजे आयुष्याच्या अपरांताचे म्हणजे मृत्यूचे ज्ञान होते किंवा मृत्यूसूचक अरिष्टे शास्त्रांत सांगितली आहेत त्यावरूनही मृत्यू जवळ आल्याचे समजते.

२३. मैत्र्यादिषु बलानि ।
पाद एक, सूत्र तेहत्तीसमध्ये सांगितलेल्या मैत्री करुणा, आनंद आणि उपेक्षा ह्या भावनांवर संयम केल्याने त्या त्या भावनांची सामर्थ्ये प्राप्त होतात.

२४. बलेषु हस्तिबलादीनि ।
हत्ती इत्यादींच्या ठिकाणीचे जे बळ त्यावर संयम केला असता त्यांचे बल आपल्यास प्राप्त होते.
 
२५. प्रवृत्त्यालोकन्यासात् सूक्ष्मव्यवहितविप्रकृष्टज्ञानम् ।
पाद एक, सूत्र छत्तीसमध्ये सांगितलेल्या ज्योतिष्मती प्रवृत्तीचा उदय म्हणजे सात्त्विक प्रकाशाचा जो प्रसर त्याचा न्यास, सूक्ष्म म्हणजे अत्यंत बारीक, व्यवहित म्हणजे अन्य पदार्थांच्या अडथळ्यामुळे न दिसणार्‍या आणि विप्रकृष्ट म्हणजे अत्यंत दूर असलेल्या, अशा विषयावर केला म्हणजे तशा स्थितीतल्या त्या विषयांचेही ज्ञान होऊ शकते.

२६. भुवनज्ञानं सूर्ये संयमात् ।
सूर्यावर संयम केला असता चतुर्दश भुवनांचे ज्ञान होते.

२७. चन्द्रे ताराव्यूहज्ञानम् ।
चंद्रावर संयम केला असता आकाशातील तारांगणांच्या व्यूहाचे ज्ञान होते.

२८. ध्रुवे तद्गतिज्ञानम् ।
धृव नक्षत्रावर संयम केला असता त्याच्या व ताऱ्यांच्या गतीचे ज्ञान होते.

२९. नाभिचक्रे कायव्यूहज्ञानम् ।
नाभिचक्रावर संयम केला असता शरीरातील व्यूहाचे ज्ञान होते.

३०. कण्ठकूपे क्षुत्पिपासानिवृत्तिः । 
कण्ठातील कूपासारख्या भागावर संयम केला असता भूक, तहान ह्यांची पीडा दूर होते.

३१. कूर्मनाड्यां स्थैर्यम् । 
कूर्मनाडीवर संयम केला असता चित्ताला स्थैर्य प्राप्त होते.

३२. मूर्धज्योतिषि सिद्धदर्शनम् ।
मूर्धज्योतिच्या ठिकाणी संयम केला असता सिद्ध पुरूषांचे दर्शन होते.

३३. प्रातिभाद् वा सर्वम् ।
प्रतिभेवर संयम केला असता सर्व विषयांचे ज्ञान होते.

३४. हृदये चित्तसंवित् ।
हृदयावर संयम केला असता चित्ताचे ज्ञान होते.

योगसूत्रे आणि त्यांचे इंग्रजीत अर्थ हे विकीवर सापडतात. त्यांचा कर्ता कोण ते माहीत नाही. मात्र ढोबळ मानाने अर्थ-अन्वय लावण्याकरता कदाचित उपयोगी पडू शकेल. योगसूत्रे ही मुळात संस्कृतमधे लिहीली गेली असल्याने, "प्रसिद्ध दहा-बारा संस्कृत भाष्यकार, प्रा.सुरेंद्रनाथ दासगुप्ता, डॉ.बेहनन, प्रा.वूडस् इत्यादी विद्वानांचे पातंजल योगावरील पाच सहा ग्रंथ आणि योगशास्त्रावर आजपर्यंत मराठीत झालेले सर्व वाङ्मय ह्या सर्वांचे यथामती आलोडन करून हा ग्रंथ लिहिला आहे" असे कोल्हटकर म्हणतात. योगसूत्रांच्या प्रात्यक्षिक प्रयोगांच्या यशस्वीतेसाठी मूळ संस्कृत भाष्ये स्वत: समजून घेण्यास सोपे पर्याय मला दिसत नाहीत. परंतु ज्यांचे तैल बुद्धीस उपलब्ध साधनांवरून मूळ मार्गदर्शनाचे रहस्य जाणून घेण्याची क्षमता असेल त्यांना हे कदाचित साधूही शकेल. तरीही सर्व भाषांतील जाणकारांच्या सर्व भाष्यांचे संदर्भ, साधने म्हणून गोळा करण्याच्या कामाचे मूल्य अबाधित राहतेच. त्याच दृष्टीने ह्या प्रयत्नास अर्थ आहे.

३५. सत्त्वपुरुषयोरत्यन्तासंकीर्णयोः प्रत्ययाविशेषो भोगः।  परार्थत्वात् स्वार्थसंयमात् पुरुषज्ञानम् ।
सत्त्व म्हणजे अंत:करण आणि पुरूष म्हणजे द्रष्टा आत्मा हे परस्परांहून अत्यंत असंकीर्ण म्हणजे भिन्न आहेत. तथापिही त्यांच्या भिन्नतेचा विशेष प्रत्यय न येणे हाच भोग होय. चित्ताच्या ठिकाणी हा भोग त्याच्या स्वत:करता नसून चित्ताहून पर जो द्रष्टा त्याच्याकरता असल्यामुळे  स्वार्थ जो द्रष्टा पुरूष -आत्मा- त्याच्या ठिकाणी संयम केल्याने त्या चित्ताचा द्रष्टा असलेला साक्षी 'मी' असे पुरूषज्ञान होते.

नामी_विलास यांनी घातलेली थोडी भर. योगाभ्यासी साधकाची जसजशी प्रगती होत जाते तसतसे अंतःकरण अधिक शुद्ध होत जाते. त्यावरील रजस्तमोगुणांचा प्रभाव कमी होतो आणि वृत्ती उत्पन्न होत नाहीत. अंतःकरण शुद्ध होण्याचा परिणाम सत्त्व गुण वाढत जातो. अंतःकरणाचे सत्त्व, रज आणि तम हे घटक असले तरी सत्त्वगुण वाढीस लागल्यामुळे रज, तम हे सत्त्वगुणात विलिनभावाने राहतात. म्हणून येथे सत्त्व म्हणजे अंतःकरण असे म्हटले आहे.
 
३६. ततः प्रातिभश्रावणवेदनादर्शास्वादवार्ता जायन्ते ।  तत्संयमाद् अपरान्तज्ञानम्, अरिष्टेभ्यो वा । 
पुरूषज्ञानार्थ केल्या जाणाऱ्या वरील संयमापासून प्रतिभासामर्थ्यामुळे सूक्ष्म, व्यवहित किंवा अति दूर वस्तूंचे ज्ञान होणे आणि दिव्य असलेले शब्द ऐकू येणे (श्रावण), दिव्य स्पर्श कळणे (वेदन), दिव्य रूप दृष्टीस पाणे (आदर्श), दिव्य रसाची गोडी चाखता येणे (आस्वाद) आणि दिव्य गंध समजणे (वार्ता) ह्या सिद्धी उत्पन्न होतात.

३७. ते समाधाव् उपसर्गा व्युत्थाने सिद्धयः ।
मागील सूत्रांत प्रातिभ, श्रावण, वेदन, आदर्श, आस्वाद आणि वार्ता हे जे सिद्धीविशेष सांगितलेले आहेत ते निर्बीज असंप्रज्ञात समाधीच्या मार्गात उपसर्ग म्हणजे अडथळेच होत. त्या श्रावणादिक अद्भूत शक्ती व्युत्थानकालांत सिद्धी होत.

३८. बन्धकारणशैथिल्यात् प्रचारसंवेदनाच् च चित्तस्य परशरीरावेशः ।
चित्ताला एकाच शरीरात जणू बांधून ठेवण्यास कारण असलेले जे धर्माधर्मसंस्कार ते शिथील झाल्यामुळे आणि चित्ताचा प्रचार म्हणजे चित्तवहा नाडींच्या द्वारा होणारा चिताचा देहांतील संचार ह्यांचे संवेदन म्हणजे यथार्थ ज्ञान झाल्यामुळे त्या चित्ताला परशरीरात प्रवेश करता येतो.

३९. उदानजयाज्जलपङ्ककण्टकादिष्वसङ्ग उत्क्रान्तिश्च ।
पाच प्राणांपैकी उदानाचा जय केला असता पाणी, चिखल किंवा काटेकुटे ह्यांच्याशी संग न होता त्यावरून चालता येते आणि स्वेच्छेने उत्क्रांती म्हणजे मरण प्राप्त होते.

४०. समानजयात् प्रज्वलनम् ।
समानाचा जय झाला असता कायाग्नी प्रज्वलित होतो.

४१. श्रोत्राकाशयोः संबन्धसंयमाद् दिव्यं श्रोत्रम् ।
श्रोत्रेंद्रिये आणि आकाश ह्यांचा जो संबंध त्यावर संयम केला असता योग्याला दिव्य श्रोत्रेंद्रियाचा लाभ होतो.
 
४२. कायाकाशयोः संबन्धसंयमाल् लघुतूलसमापत्तेश्चाकाशगमनम् ।
शरीर आणि आकाश ह्यांचा जो संबंध त्यावर संयम केला असता आणि कापसासारख्या हलक्या असणार्‍या पदार्थावर समापत्तिरूप तन्मयता प्राप्त करून घेतल्याने योग्याला 'आकाशगमन' हि सिद्धी प्राप्त होते.

४३. बहिरकल्पिता वृत्तिर्महाविदेहा ततः प्रकाशावरणक्षयः ।
अकल्पिता, म्हणजे शरीर निरपेक्ष असलेली, जी चित्ताची बहिर्वृत्ती ती महाविदेहा होय. ती प्राप्त झाली असता तिच्या योगाने चित्तातील जो सात्त्विक प्रकाश त्यावर असलेले जे रजस्तमोगुणांचे म्हणजे तत्कार्यभूत क्लेशादिकांचे आवरण त्याचा क्षय होत जाऊन शेवटी पूर्णत्त्वाने नाहीसे होते.

४४. स्थूलस्वरूपसूक्ष्मान्वयार्थवत्त्वसंयमाद्भूतजयः ।
जागृतावस्थेत घ्राणादी इंद्रियांनी ज्यांचे गंधादी गुण ग्रहण केले जात असतात ती भूतांची स्थूलावस्था. कठीणपणा इत्यादी धर्मांनी ज्ञात होणारी त्या भूतांची निर्व्यापारावस्था ही त्यांची स्वरूपावस्था. त्या त्या भूतांच्या तन्मात्रा ही त्यांची सूक्ष्मावस्था. सत्त्व, रज व तम हे तीन गुण तन्मात्रांत असतात, म्हणजे त्यांचा अन्वय तन्मात्रांत असतो. ही अन्वयावस्था आणि महत्तत्त्वापासून स्थूल भूतांपर्यंतचे सर्व गुण-परिणाम दृश्याच्या ठिकाणी असलेल्या भोगापवर्गार्थतारूप शक्तीमुळे घडून येत असल्याने ही शक्ती हीच अर्थवत्त्वावस्था. अशा स्थूल, स्वरूप, सूक्ष्म, अन्वय व अर्थवत्त्व ह्या पाच अवस्था भूतांच्या ठिकाणी आहेत. त्यांच्यावर क्रमाने संयम करून त्यांचा जय झाला असता भूतजय होतो.

सत्यवादिनमक्रोधं निवृतं मद्यमैथुनात् ।
अहिंसकं, प्रशांतं,जपशौचपरं, धीरं तपस्विनं ।
देव-गोब्राह्मणाचार्य-गुरूवृद्धार्चनरतं, आनृशंस्यपरं ।
अनहंकृतं, शास्त्राचारं, अध्यात्मप्रवणेंद्रियं ।
धर्मशास्त्रवरं, विद्यान्नरं नित्यरसायनम् ॥

नेहमी खरे बोलणारा, न रागावणारा, मद्यनिवृत्त, ब्रह्मचारी, अहिंसक, शांतवृत्त, जपशौचादीकांत तत्पर, धैर्यवान्, तपस्वी, देव-गायी-ब्राह्मण-आचार्य, गुरूजन आणि वृद्ध ह्यांना मान देणारा, कोणाचा घात-पात न करणारा, निरभिमानी, सदाचरणी, अध्यात्माकडे इंद्रियांची ओढ असलेला, धर्मपरायण असा जो मनुष्य तो मूर्तिमंत नित्यरसायन होय. – चरकसंहिता

जे रसायन नियमितरीत्या घेतले असता चिरतारूण्य प्राप्त होते अशास्वरूपाच्या रसायनास नित्यरसायन म्हणत असावेत. वरीलप्रमाणे व्रतस्थ वर्तणूकच नित्यरसायन असते असे सांगण्याचा हा प्रयास वाटतो.

४५. ततोऽणिमादिप्रादुर्भावः कायसंपत् तद्धर्मानभिघातश्च ।
अष्टमहासिद्धींचा लाभ - ह्या भूतजयापासून योग्याच्या ठिकाणी अणिमा आदी अष्टमहासिद्धी प्रकट होऊ लागतात. पुढील सूत्रांत सांगितल्याप्रमाणे त्या गुणांनी युक्त असलेली शरीरसंपत्ती त्यास प्राप्त होते आणि शरीराच्या ठिकाणी असलेल्या धर्मांचा अग्नी, वायू, जल इत्यादींकडून नाश न होण्याचे सामर्थ्य त्या शरीरात उत्पन्न होते.

४६. रूपलावण्यबलवज्रसंहननत्वानि कायसंपत् ।
सुंदर रूप, उत्तम लावण्य, श्रेष्ठ सामर्थ्य आणि वज्रासारखे सहननत्व म्हणजे अवयवसमूह ही कायसंपत् होय.
 
४७. ग्रहणस्वरूपास्मितान्वयार्थवत्त्वसंयमाद् इन्द्रियजयः ।
इंद्रिये आपापल्या विषयाशी संयुक्त होणे ही त्यांची ग्रहणावस्था, विषयाशी संयोग नसतांना ती आपापल्या गोलकांत निर्व्यापार स्थितीत केवळ प्रकाशरूप असतात. ही त्यांची स्वरूपावस्था, चित्तात 'मी आहे' असे जे अखंड स्फुरण होत असते ती अस्मितावस्था, अस्मितेत त्रिगुणांचे अस्तित्त्व असते ही अन्वयावस्था आणि त्रिगुणांतील भोगापवर्गार्थतारूप शक्ती ही अर्थवत्त्वावस्था. ह्या पाच अवस्थांवर संयम केल्याने इंद्रियजय ही सिद्धी प्राप्त होते.

४८. ततो मनोजवित्वं विकरणभावः प्रधानजयश्च ।
मनाच्या वेगासारखा गतीलाभ शरीरास होणे हे मनोजवित्व आणि कोणत्याही देशांतील आणि काळांतील विषयांचे सेवन इंद्रिय-निरपेक्ष घडू शकणे हा विकरणभाव. मागील सूत्रांत सांगितलेला इंद्रियजय प्राप्त झाला असता मनोजवित्व आणि विकरणभाव ही व्यष्टिनिष्ठ संयमाची फले आणि प्रधानजय हे समष्टिनिष्ट संयमाचे फल अशी तीन प्रकारची फले योग्यास प्राप्त होतात.

४९. सत्त्वपुरुषान्यताख्यातिमात्रस्य सर्वभावाधिष्ठातृत्वं सर्वज्ञातृत्वं च ।
सत्त्व म्हणजे अंत:करण त्याचा द्रष्टा जो पुरूष ह्या उभयतांत असलेली जी अन्यता म्हणजे वेगळेपणा त्याची ख्याती म्हणजे प्रतीती ही सत्त्वपुरूषान्यताख्याति होय (हीच विवेकख्याति होय). ही ज्याच्या ठिकाणी स्थिरभावाला पोचली असेल त्या योग्याच्या ठिकाणी 'सर्व भावांचा अधिष्ठाता मीच आहे व म्हणून मी सर्वज्ञही आहे' अशी प्रतीती येऊ लागते.

५०. तद्वैराग्यादपि दोषबीजक्षये कैवल्यम् ।
वरील दोन्ही फलांविषयीही वैराग्य उत्पन्न झाले असता अविद्या-काम-कर्म ह्या दोषत्रयांचे बीज असलेला जो द्रष्ट्ट-दृश्य संयोग त्याचा नाश होऊन पुरूषास कैवल्याचा लाभ होतो.

५१. स्थान्युपनिमन्त्रणे सङ्गस्मयाकरणं पुनः अनिष्टप्रसङ्गात् ।
स्थानिन् म्हणजे देव. योग्याच्या तपामुळे प्रसन्न झालेले देव त्या योग्याला अनेक दिव्य भोग भोगण्यासाठी उपनिमंत्रण करतात, म्हणजे त्याने त्या भोगांचा स्वीकार करावा अशी त्यास प्रार्थना करतात. तेव्हा योग्याने मनात त्या भोगांविषयी आसक्ती निर्माण होऊ देऊ नये किंवा "देवही मला भोग भोगण्यासाठी निमंत्रण देत आहेत तेव्हा माझ्या ठिकाणी केवढे तप:सामर्थ्य प्रकट झाले आहे" अशा रीतीची स्वत:विषयी एक प्रकारची धन्यता वाटणे हा स्मयही त्याने करू नये. कारण तसे केल्यास पुन्हा संसाररूपी अनिष्टाचा प्रसंग प्राप्त होतो.

५२. क्षणतत्क्रमयोः संयमादविवेकजं ज्ञानम् ।
कालाचा अतिसूक्ष्म भाग म्हणजे क्षण, आणि पूर्वक्षण, उत्तरक्षण असा अखंडपणे चाललेला क्षणांचा प्रवाह हा त्यांचा क्रम होय.वस्तूंतील सूक्ष्म भेदांचे ज्ञान होण्याला कारण असलेली जी शक्ती ती विवेक होय. क्षण आणि त्याचा क्रम ह्यावर संयम केला असता ह्या विवेकापासून उत्पन्न होणारी वस्तूची भिन्नता जाणणारे ज्ञान होते.

५३. जातिलक्षणदेशैरन्यताऽनवच्छेदात् तुल्ययोस्ततः प्रतिपत्तिः ।
अन्यता म्हणजे दोन वस्तूंतील वेगळेपणा. गाय, म्हैस अशा जाती; काळी गाय, पांढरी गाय इत्यादी लक्षणे; आणि ह्या ठिकाणची गाय, त्या ठिकाणची गाय, हा देश; ह्या तिन्हींच्यामुळे दोन वस्तूंतील अन्यतेचा अवच्छेद म्हणजे वेगळेपणाचा निश्चय होऊ शकतो. परंतु तिन्ही मार्गांनी दोन वस्तूंतील अन्यतेचा अवच्छेद न झाल्यामुळे जेव्हा दोन पदार्थ अगदी तुल्य दिसतात तेव्हाही योग्याला त्या तुल्य पदार्थांची प्रतिपत्ती म्हणजे ते परस्परांहून भिन्न असल्याची प्रतीती मागील सूत्रांत सांगितलेल्या विवेकज ज्ञानामुळे होऊ शकते.

५४. तारकं सर्वविषयं सर्वथाविषयम् अक्रमं चेति विवेकजं ज्ञानम् ।
हे विवेकज ज्ञान योग्याला तारणारे असते म्हणून ते 'तारक' होय. त्या ज्ञानाला अविषय अशी कोणतीच वस्तू नसते म्हणून ते 'सर्वविषय' होय. त्या ज्ञानामुळे कोणत्याही विषयाचे नुसते सामान्य ज्ञान तेवढे होते असे नसून, त्या विषयांतील सर्व गुणधर्म आणि अवस्थाविशेष ह्यांचेही ज्ञान होत असल्यामुळे ते 'सर्वथा-विषय' होय आणि वस्तुगत गुणधर्मादिकांचे ज्ञान विशिष्ट क्रमाने न होता योग्यास इच्छा होताच वाटेल त्या वेळी वाटेल त्या गुणधर्मादिकांचे ज्ञान होऊ शकते म्हणून ते 'अक्रम' होय. अशा लक्षणांनी युक्त असे ते विवेकज ज्ञान असते.

५५. सत्त्वपुरुषयोः शुद्धिसाम्ये कैवल्यम् इति ।
चित्ताचे उपादानभूत जे सत्त्व त्यातून रजस्तमोमल नाहीसे होत होत ते पूर्ण शुद्ध झाले आणि त्यामुळे त्याच्यात व पुरूषांत शुद्धिसाम्य झाले म्हणजे चित्ताच्या ठिकाणी कैवल्य सिद्ध होते.

॥ इति पतञ्जलि विरचिते योगसूत्रे तृतीयो विभूतिपादः ॥

याप्रमाणे पातंजल योगदर्शनाचा तिसरा विभूतीपाद संपूर्ण झाला.

.

२००९-११-२६

पातंजल योगसूत्रे व भाष्ये: २

मायबोली डॉट कॉम च्या २००६ च्या दिवाळीअंकात आशिष महाबळ ह्यांनी लिहीलेल्या खालील लेखात योगाभ्यासाच्या पार्श्वभूमी विषयी चर्चा केलेली आहे. लेख वाचण्यासारखा आहे. भारतीय तत्वचिंतनाचा वेध : http://www.maayboli.com/hitguj/messages/118369/118185.html?1161387673 वेद ते वेड?पतंजलींच्या महाभाष्याची प्रस्तावना मराठीत आणण्याचा प्रयत्न मिस्टर उपक्रम डॉट ऑर्ग वर धनंजय यांनी केलेला आहे. ती मालिकाही वाचनीय आहे. http://mr.upakram.org/node/747 तिचे शीर्षक आहे: व्याकरण महाभाष्याची प्रस्तावना - एक मराठीकरण. आता योगसूत्रांकडे वळू या.

॥ द्वितीयः साधनपादः ॥

दुसरा चतकोर. साधनपाद.

१. तपःस्वाध्यायेश्वरप्रणिधानानि क्रियायोगः ।
तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान यांद्वारे योग साधतो. चित्तशुद्धी व्हावी एवढ्या एकाच हेतूने काया, वाचा आणि मन ह्यांवर ठेवलेले नियंत्रण म्हणजे तप, ॐ चा जप आणि चित्तशुद्धीकर शास्त्रादिकांचे अध्ययन करणे हा स्वाध्याय आणि आपली कायिक, वाचिक व मानसिक कर्मे ईश्वरार्पण बुद्धीने करणे हे ईश्वरप्रणिधान. ह्या तिन्हींचे अनुसरण (अनुष्ठान) करणे म्हणजे क्रियायोग होय. एकाग्र असतांना(समाधितावस्थेत) ईश्वरप्रणिधान कसे करायचे ते समाधीपादातील २८ व्या सूत्रात सांगितलेलेच आहे.

२. समाधिभावनार्थः क्लेशतनूकरणार्थश्च ।
समाधी साधण्याकरता आणि क्लेशतनुकरणासाठी असा योग साधावा लागतो. ज्या वस्तूचे ध्यान करून चित्तास तदाकार प्राप्त करून घ्यायचा, त्या वस्तूवर होणारी चित्ताची एकाग्रता ही समाधीभावना होय. पुढील सूत्रांत जे अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश हे क्लेश वर्णन करायचे आहेत त्यांची शिथिलता घडवून आणणे हे क्लेशतनूकरण होय.

३. अविद्यास्मितारागद्वेषाभिनिवेशाः क्लेशाः ।
अविद्या, अस्मिता, राग (प्रेम), द्वेष आणि अभिनिवेश हे ते पाच क्लेश आहेत.

४. अविद्या क्षेत्रम् उत्तरेषां प्रसुप्ततनुविच्छिन्नोदाराणाम् ।
अविद्या ही पुढील चारही क्लेशांची प्रसवभूमी असते. हे चार क्लेश, सूप्त (प्रसूप्त), समूर्त (तनु), विच्छिन्न किंवा उदार अशा चार अवस्थांत असतात. मात्र त्यांची प्राथमिक अवस्था अविद्येतच उद्भवते. सूप्त अवस्थेत वासना अभिव्यक्त होत नसतात. समूर्त रूपात वासना राहतात मात्र त्यांचेसाठी कार्यप्रवण होण्याची भावना राहत नाही. विच्छिन्न अवस्थेत वासना दबून राहतात. उदार अवस्थेत मात्र आपल्याला त्या त्या वासना कृतीप्रवृत्त करतात.

५. अनित्याशुचिदुःखानात्मसु नित्यशुचिसुखात्मख्यातिरविद्या ।
जगातील यच्चयावत वस्तू अनित्य असून नित्य आहे असा समज (ख्याति) होणे. अपवित्र (अशुचि) असून पवित्र (शुचि) आहेत असा समज होणे. दुःखरूप असून सुखरूप भासणे. अनात्म असून आत्ममय वाटणे. म्हणजे अविद्या.

६. दृग्दर्शनशक्त्योरेकात्मतेवास्मिता ।
दृक्शक्ती म्हणजे द्रष्टा. दर्शनशक्ती म्हणजे जगाचे दर्शन ज्याचे माध्यमातून होते ते मन (चित्त). ही दोन्हीही वस्तुतः भिन्न असूनही ती एकरूपच आहेत असे वाटून 'अस्मि' म्हणजे मी आहे असे जे स्फुरण होते तोच अस्मिता नावाचा क्लेश होय.

७. सुखानुशयी रागः ।
सुखांच्या अनुभवापाठोपाठ सुखाची साधने मला सतत प्राप्त असावित अशी जी लालसा चित्तात उत्पन्न होते तोच 'राग' (लोभ).

८. दुःखानुशयी द्वेषः ।
दुखांच्या अनुभवापाठोपाठ दु:ख आणि त्याची कारणे ह्यांची माझ्याशी कधीही गाठ पडू नये अशी जी लालसा चित्तात उत्पन्न होते तोच 'द्वेष'.

९. स्वरसवाही विदुषोऽपि तथारूढो भिनिवेशः ।
अविद्वानाप्रमाणे विद्वानाच्या ठायीही एखाद्या प्रवाहाप्रमाणे स्वभावतःच नेहमी अनुवृत्त असलेला, शरीररूप जो 'मी', त्या 'मी' कधीही मरू नये, निरंतर असावे, अशा स्वरूपाचा जो दृढ संस्कार होतो तो 'अभिनिवेश' होय.

पाचही क्लेश चित्तात संस्काररूपाने नित्य विद्यमान असतात. ही त्यांची सूक्ष्म अवस्था होय. पण व्यवहारकाली ते व विशेषतः राग, द्वेष आणि अभिनिवेश हे उद्बोधक निमित्ताने वृत्तीरूपाने परिणाम पावलेल्या अवस्थेत येतात. अशा प्रकारच्या क्लेशांच्या सूक्ष्म आणि स्थूल अशा दोन अवस्था असतात. ह्या दोन्हीही अवस्थांतील क्लेश कोणत्या उपायांनी जिंकावेत हे पुढील सूत्रांत सांगितले आहे.

साधनपादाच्या सुरूवातीस विवेकचूडामणी मधल्या ३६० व्या श्लोकाचा संदर्भ कोल्हटकरांनी दिला आहे.

क्रियान्तरासक्तिमपास्य कीटकोध्यायन्यथालिं ह्यालिभावमृच्छति ।
तथैव योगी परमात्मतत्त्वं ध्यात्वा समायाति तदेकनिष्ठया ॥

म्हणजे ज्याप्रमाणे कीटक इतर सर्व क्रिया टाकून देऊन भ्रमराचेच ध्यान करत राहिल्यामुळे स्वत:च भ्रमर होतो, त्याप्रमाणे योगी एकनिष्ठ राहून परमात्मतत्त्वाचे ध्यान करत असता स्वत: परमात्माच बनतो.
आता योगसूत्रांकडे वळू या.

१०. ते प्रतिप्रसवहेयाः सूक्ष्माः ।
कार्याचा कारणात विलय होणे हा प्रतिप्रसव होय. प्रतिप्रसवाने सूक्ष्म क्लेश जिकता येण्यासारखे असतात.

११. ध्यानहेयास्तद्वृत्तयः ।
तेच क्लेश जेव्हा वृत्तीरूपात परिणत झालेले असतात तेव्हा ते ध्यानाभ्यासाने नाहीसे करण्यायोग्य (हेय) असतात.

१२. क्लेशमूलः कर्माशयो दृष्टादृष्टजन्मवेदनीयः ।
कर्माचा चित्तावर होणारा धर्माधर्मरूप संस्कार हा कर्माशय होय. ह्या कर्माशयाला मूळ कारण क्लेश असल्यामुळे तो क्लेशमूल असतो. वर्तमानातील जन्म हा दृष्ट जन्म होय. भविष्यात प्राप्त होणारे जन्म अदृष्ट होत. ह्या दृष्टादृष्ट जन्मांच्या रूपाने वरील कर्माशय वेदनीय म्हणजे अनुभवण्यायोग्य होत असतो.

१३. सति मूले तद्विपाको जात्यायुर्भोगाः ।
क्लेश जोपर्यंत चित्तात नांदत असतील तोपर्यंत कर्माशयाचे फल (विपाक) विशिष्ट जन्म, विशिष्ट आयुष्य आणि सुखदु:खात्मक भोग ह्या रूपाने त्या त्या क्लेशानुरूप अवश्यमेव घडून येतो.

१४. ते ह्लादपरितापफलाः पुण्यापुण्यहेतुत्वात् ।
ह्या जात्यायुर्भोगरूपी फलप्राप्तीचे कारण पूर्वसुकृत वा पूर्वदुष्कृत असते म्हणून त्यानुरूप आल्हाद वा परिताप देणार्‍या भोगात त्यांचे पर्यवसान होते.

१५. परिणामतापसंस्कारदुःखैर्गुणवृत्तिविरोधाच् च दुःखम् एव सर्वं विवेकिनः ।
विषयोपभोगामुळे चित्तावर होणारे विपरित परिणाम, विषयोपभोगादरम्यान सोसावे लागणारे ताप आणि विषयोपभोगामुळे चित्तावर होणारे संस्कार ह्या तिन्हींमुळे होणारे दु:ख आणि सत्त्व रज व तम ह्या गुणांच्या अंतर्विरोधामुळे होणारे दु:ख ह्यांच्यामुळे विवेकी पुरूषांस सुखकारक जन्म, आयुष्य आणि भोगही दु:खरूपच भासतात.

१६. हेयं दुःखम् अनागतम् ।
भविष्यात भोगावे लागू शकणारे दु:ख निवारण करण्यायोग्य असते.

१७. द्रष्टृदृश्ययोः संयोगो हेयहेतुः ।
चित्ताला जाणणारा हा द्रष्टा. त्याचेकडून जाणले जाणारे चित्त आणि चित्ताच्या पाचही वृत्ती दृश्य. म्हणजे जाणून घेण्याचा विषय असतात. ह्या दोहोंचा संगमच भविष्यातील दु:खाचे कारण असते.

१८. प्रकाशक्रियास्थितिशीलं भूतेन्द्रियात्मकं भोगापवर्गार्थं दृश्यम् ।
दृश्याच्या ठिकाणी सत्त्वगुणामुळे प्रकाश, रजोगुणामुळे क्रिया आणि तमोगुणामुळे स्थिती हे धर्म त्रिगुणांच्या तारतम्यानुसार प्रकट होत असतात म्हणून दृश्य हे प्रकाशक्रियास्थितीशील असते. स्थूल-सूक्ष्म भूते, कर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये आणि अंत:करण हे दृश्याचे व्यवहार्य स्वरूप असल्यामुळे त्याला भूतेंद्रियात्मक म्हटलेले आहे. जीवाला सुखदु:खांचे भोग घडवून अंती त्याला अपवर्गाची म्हणजे मुक्तीची प्राप्ती करून देणारे हे दृश्य असल्यामुळे ते भोगापवर्गार्थ होय. हे दृश्याचे प्रयोजन होय.

१९. विशेषाविशेषलिङ्गमात्रालिङ्गानि गुणपर्वाणि ।
सत्त्व, रज आणि तम ह्या त्रिगुणांच्या चार अवस्था असतात. विशेष, अविषेश, लिंगमात्र आणि अलिंग. पाच महाभूते, पाच कर्मेंद्रिये, पाच ज्ञानेंद्रिये आणि अंत:करण ही सोळा तत्त्वे त्रिगुणांची विशेष अवस्था होय. ह्या सोळांची प्रकृती असलेल्या पाच तन्मात्रा आणि त्यांची प्रकृती असलेली अस्मिता ही सहा तत्त्वे ही त्रिगुणांची दुसरी अवस्था -अविशेष. ह्या सहा तत्त्वांची प्रकृती असलेले महत्तत्त्व ही त्रिगुणांची लिंगमात्र अवस्था होय. आणि ज्याचा लय दुसर्‍या कशातही होत नाही असे जे मूलप्रकृतीभूत अव्यक्त ती त्रिगुणांची अलिंगावस्था होय.

२०. द्रष्टा दृशिमात्रः शुद्धोऽपि प्रत्ययानुपश्यः ।
द्रष्टा म्हणजे पुरूष हा दृशिमात्र म्हणजे चेतनामात्र असा आहे. तो शुद्ध म्हणजे बुद्धीप्रमाणे परिणाम न पावणारा असा आहे. तरीही सुद्धा अविद्येमुळे, बुद्धीशी जणू तादात्म्य पावून बुद्धीचे जे प्रत्यय म्हणजे अनुभव, ते जणू स्वत:च घेणारा असा स्वत:स समजू लागतो.

२१. तदर्थ एव दृश्यस्यात्मा ।
दृश्याचा आत्मा म्हणजे त्याचे स्वरूप हे तदर्थच, म्हणजे मागील सूत्रात सांगितलेल्या द्रष्ट्याकरताच आहे. 

ह्या भागात अष्टांग योगातील अंगे, यमनियमादी प्रत्यक्ष आचरणात आणावयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा पातंजल योगसूत्रांत केलेला उहापोह आपण बघणार आहोत. कोल्हटकरांनी स्कंदपुराणातील एक श्लोक सत्याचरणाच्या महतीखातर दिलेला आहे. तो असा:

सत्यं ब्रूयात्प्रियं ब्रूयात् न ब्रूयात्सत्यमप्रियम्
प्रियं च नानृतं ब्रुयात् एष धर्म: सनातन: (स्कन्द पुराण ब्रा.ध.मा. ६.८८)

म्हणजे 'सत्य बोलावे, (समोरच्याला) आवडेल असे बोलावे, मात्र नावडते सत्यही बोलू नये आणि आवडते असत्यही बोलू नये हाच खरा सनातन धर्म होय.' सनातन धर्माची ही समर्पक, योग्य आणि स्पष्ट शिकवण मनाला भिडते.

२२. कृतार्थं प्रति नष्टम् अप्यनष्टं तदन्यसाधारणत्वात् ।
कैवल्य साक्षात्कार झालेल्या योग्यापुरते जरी दृश्य नष्ट झालेले असले तरी तदन्य म्हणजे इतर अकृतार्थ जीवांना ते साधारणत्वाने प्रतीत होत असतेच, म्हणून त्यांच्यापुरते ते अनष्टच होय.

२३. स्वस्वामिशक्त्योः स्वरूपोपलब्धिहेतुः संयोगः ।
द्रष्ट्याकरता दृश्य असल्यामुळे द्रष्टा हा स्वामी आणि दृश्य हे त्याचे 'स्व' झाले. ह्या दोहोंच्या उपलब्धीला म्हणजे यथार्थ ज्ञानाला कारण होणारा असा संयोग आहे.

२४. तस्य हेतुरविद्या ।
त्या संयोगाचे कारण अविद्या होय.

२५. तदभावात्संयोगाभावो हानं तद्दृशेः कैवल्यम् ।
संयोगास कारण असलेल्या अविद्येचा अभाव झाला असता संयोगाचा अभाव होतो. ह्यालाच हान ही संज्ञा आहे. हे हान म्हणजे दृशिस्वरूप जीवाची कैवल्यावस्था होय.

२६. विवेकख्यातिरविप्लवा हानोपायः ।
द्रष्टा मी, दृश्य असलेले चित्त आणि त्याच्या वृत्ती, ह्यांच्याहून वेगळा आहे असा विवेक उदित होणे म्हणजे विवेकोद्भव (विवेकख्याति) होय. संशय, विपर्यय, भ्रम इत्यादी दोष हे विप्लव होत. ह्या दोषांनी युक्त नसलेला तो अविप्लवा विवेकोद्भव (विवेकख्याति) होय. असा अविप्लवा विवेकोद्भव वर सांगितलेल्या हानाचा उपाय होय.

२७. तस्य सप्तधा प्रान्तभूमिः प्रज्ञा ।
मुक्तावस्थेत (हानावस्थेत) चित्तातील प्रज्ञा, सात प्रकारच्या सहजप्रवृत्ती जिच्यामधे प्रकर्षाने अंताला पोहोचलेल्या आहेत अशी (सप्तधा) असते. म्हणजे त्या अवस्थेत, त्या योग्याच्या प्रज्ञेत सात प्रकारच्या सहजप्रवृत्ती विद्यमान असत नाहीत.

२८. योगाङ्गानुष्ठानाद् अशुद्धिक्षये ज्ञानदीप्तिरा विवेकख्यातेः ।
योगाची जी यमनियमादी आठ अंगे आहेत त्यांचे अनुष्ठान केल्याने चित्तातील अशुद्धीचा क्षय होत जाऊन ज्ञानशक्ती प्रदीप्त होत जाते आणि तिचे पर्यवसान चित्तात विवेकोद्भव होण्यात होते.
 
२९. यमनियमासनप्राणायामप्रत्याहारधारणाध्यानसमाधयोऽष्टाव अङ्गानि ।
यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही योगाची आठ अंगे होत.
 
३०. अहिंसासत्यास्तेयब्रह्मचर्यापरिग्रहा यमाः ।
अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे पाच यम आहेत.
३१. जातिदेशकालसमयानवच्छिन्नाः सार्वभौमा महाव्रतम् ।
ब्राह्मणादीजाती, तीर्थक्षेत्रादी देश, पवित्र तिथी इत्यादी काल, यज्ञयागादिक समय ह्यांपैकी कोणत्याही कारणामुळे अवच्छेद न घडता जर अहिंसादी व्रतांचे पालन घडेल तर यमांचे पालन महाव्रत ठरेल.
 
३२. शौचसंतोषतपःस्वाध्यायेश्वरप्रणिधानानि नियमाः ।
शरीर स्वच्छ ठेवणे आणि मन पवित्र  राखणे हे शौच; प्राप्त परिस्थितीत मनाचे समाधान राखणे हा संतोष; रसनेंद्रियावर नियमन ठेवणे, शीतोष्णादी द्वंद्वे सहन करणे आणि इंद्रिये स्वाधीन ठेवणे हे तप; उपास्यदेवतेच्या मंत्रांचा जप करणे, वेदाध्ययन करणे, बुद्धीला सूक्ष्मता आणि शुद्धी प्राप्त करून देणाऱ्या न्याय, योग, वेदान्त इत्यादी शास्त्रांचे अध्ययन करणे हा स्वाध्याय आणि सर्व कर्मे ईश्वरार्पण बुद्धीने करणे, हे ईश्वरप्रणिधान असे हे पाच नियम होत.

शौच आणि संतोष वगळता, तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान ह्या तीन नियमांना मिळून क्रियायोग म्हटले जाते. ह्या क्रियायोगाचे स्वरूप कोणते, त्याचे आचरण कसे करावे आणि ते का, ह्या सर्व प्रश्नांचा विचार ह्याच पादाच्या पहिल्या आणि दुसर्‍या सूत्रांत केलेलाच आहे.

वरील यमनियमांचे पालन करू लागल्यावर पूर्ववासनांच्या संस्कारांमुळे चित्तात जेव्हा त्यांना विरोधी असलेल्या वासना उत्पन्न होतील तेव्हा त्यांचा निरास कसा करावा ह्याचा उपाय यापुढील सूत्रात सांगितलेला आहे.

३३. वितर्कबाधने प्रतिपक्षभावनम् ।
यमनियमांचे अनुसरण (अनुष्ठान) करत असता त्यांना विरोधी असणार्‍या व हिंसादी दुष्कृत्ये हातून घडवणार्‍या अशा ज्या विषयवासना चित्तात उत्पन्न होतात त्या म्हणजे वितर्क होय. ह्या वितर्काची बाधा होईल तसतसे त्याचे निवारण करू शकतील अशा सद्वासनांची भावना चित्तांत करावी. हे प्रतिपक्षभावन होय.

३४. वितर्का हिंसादयः कृतकारितानुमोदिता लोभक्रोधमोहपूर्वका मृदुमध्याधिमात्रा दुःखाज्ञानानन्तफला इति प्रतिपक्षभावनम् ।
हिंसादी दुष्कृत्ये हातून घडवणार्‍या अशा ज्या विषयवासना चित्तात उत्पन्न होतात आणि त्यानुरूप आपले आचरण घडते त्या म्हणजे वितर्क होत. ह्या वितर्कात कृत, कारित आणि अनुमोदित असे तीन मुख्य भेद असतात. ह्या वितर्कांना लोभ, क्रोध किंवा मोह ही आधी उत्पन्न होणारी कारणे असतात म्हणून हे वितर्क लोभक्रोधमोहपूर्वक होत. ह्या कारणरूप मनोविकारांचा किंवा कार्यरूप वितर्कांचा संवेग म्हणजे प्राबल्य असेल तदनुसार त्यांचे मृदू, मध्य आणि अधिमात्र तीव्र असे आणखी तीन पोटभेद आहेत. अशा सत्तावीस प्रकारचे हे वितर्क अनेक प्रकारची दु:खे देणारे, अज्ञान वाढवणारे आणि जन्ममरणरूप संसारातील अनंत फले भोगायला लावणारे असे आहेत; त्यामुळे त्यांचेविरोधी भावना चितात उत्पन्न करून वितर्कांचे निर्मूलन करणे म्हणजे प्रतिपक्षभावन होय.

३५. अहिंसाप्रतिष्ठायां तत्सन्निधौ वैरत्यागः ।
हिंसावृत्ती चित्तात केंव्हाही उत्पन्न न होणे ही अहिंसेची प्रतिष्ठा होय. ही ज्या योग्याच्या चित्तात उत्पन्न झालेली असेल त्या योग्याच्या सान्निध्यात जे जे येतील त्यांच्याही चित्तातील वैराचा निरास (त्याग) घडून येतो.

३६. सत्यप्रतिष्ठायां क्रियाफलाश्रयत्वम् ।
योग्याच्या ठिकाणी सत्य स्थिर भावास प्राप्त झाले म्हणजे एखादी क्रिया केल्यावरच जे फल प्राप्त व्हावयाचे ते फल, ती क्रिया कोणी केली नसताही  त्या योग्याच्या इच्छेचा आश्रय करते. म्हणजे योग्याच्या केवळ इच्छामात्रेच ते फल निष्पन्न होते.

३७. अस्तेयप्रतिष्ठायां सर्वरत्नोपस्थानम् ।
योगाभ्यासी साधकाच्या चित्तात अस्तेयवृत्ती (चोरी न करण्याची वृत्ती) सुप्रतिष्ठित झाली म्हणजे पृथ्वीवरील रत्नांनी उपलक्षित असलेली सर्व साधनसंपत्ती (त्याने स्वत:साठी तिची अभिलाषा केलेली नसूनही) त्याने लोककल्याणार्थ इच्छा करताच त्याच्यापुढे उपस्थित होते.

३८. ब्रह्मचर्यप्रतिष्ठायां वीर्यलाभः ।
ब्रह्मचर्य सुप्रतिष्ठित झाले असता  त्या योग्याला कोणत्याही कार्याविषयी वीर्य म्हणजे सामर्थ्य आणि उत्साह प्राप्त होतात.

३९. अपरिग्रहस्थैर्ये जन्मकथंतासंबोधः ।
अपरिग्रह (सुखसाधनांचा साठा न करण्याची वृत्ती) स्थिर झाला असता पूर्वीचे जन्म कसकसे होते आणि त्यापुढील जन्म कसकसे होतील ह्याविषयीचे ज्ञान होते.

४०. शौचात् स्वाङ्गजुगुप्सा परैरसंसर्गः ।
शौच म्हणजे स्वच्छता. स्व-अंग म्हणजे स्वत:चे शरीर. जुगुप्सा म्हणजे निंदा, निर्भत्सना, घृणा, किळस. शारीरिक स्वच्छता पाळल्याने, आपले शरीर वस्तुत: किती अस्वच्छ असते त्याची जाण निर्माण होऊन त्याविषयी एक प्रकारची किळस निर्माण होते. तसेच स्वच्छता न पाळणाऱ्या लोकांचा संसर्गही नकोसा वाटू लागतो. जुगुप्सेच्या संस्कारामुळे 'हा मलीन देह मी नसून, त्याचा साक्षी जो आत्मा तो मी आहे' असे अनुसंधान आपण राखू शकतो. अशा रीतीने अनात्मभूत देहाविषयी वाटणाऱ्या आत्मियतेला शैथिल्य प्राप्त करून देणारी जुगुप्सा चित्तात उत्पन्न होणे, हे शारीरिक स्वच्छताव्रताचे फळ होय.

४१. सत्त्वशुद्धिसौमनस्यैकाग्र्येन्द्रियजयात्मदर्शनयोग्यत्वानि च ।
सौनमस्य म्हणजे प्रसन्नता. मनातील सत्त्वगुणात असलेले रज, तमादी मळ दूर होऊन मन शुद्ध झाल्यास प्रसन्न होते. त्यामुळे एकाग्रता साधते. इंद्रिये स्वाधीन राहू लागतात. ह्यामुळे आत्मतत्त्वाच्या साक्षात्काराची पात्रता साधकाच्या अंगी बाणते. मानसिक स्वच्छताव्रताचे प्रसन्नता हे फळ असते.
 
४२. संतोषाद् अनुत्तमः सुखलाभः ।
अनुत्तम म्हणजे सर्वश्रेष्ठ. संतोषाने सर्वश्रेष्ठ सुख लाभते.

४३. कायेन्द्रियसिद्धिरशुद्धिक्षयात् तपसः ।
तपाच्या योगाने शरीर आणि इंद्रिये ह्यांच्यातील अशुद्धी नष्ट होते आणि त्यामुळे काही शरीरसिद्धी आणि काही इंद्रियसिद्धी योग्याच्या ठिकाणी सहजपणे प्रकट होऊ लागतात.

४४. स्वाध्यायाद् इष्टदेवतासंप्रयोगः ।
इष्ट देवतेचे स्वप्नात, जागेपणी अथवा समाध्यवस्थेत दर्शन होणे, तिच्याशी संभाषण होणे, तिचा अंगात संचार होणे  किंवा तिचा साक्षात्कार होणे हा त्या देवतेचा संप्रयोग होय. ऊपास्य देवतेच्या मंत्राचा जप करणे इत्यादी प्रकारच्या स्वाध्यायामुळे इष्टदेवतासंप्रयोग घडून येतो.

४५. समाधिसिद्धिरीश्वरप्रणिधानात् ।
ईश्वरप्रणिधानाने आत्मसाक्षात्कार करून देणारा निर्विकल्प समाधी सिद्ध होतो.

स्वर्गारोहण डॉट कॉम ह्या संकेतस्थळावर मला पहिल्याप्रथम योगसूत्रे पाहायला मिळाली होती. अर्थात मराठी विकीवरही ती उपलब्ध आहेत. पण स्वर्गारोहण डॉट कॉम स्वतःला गुजराती भाषेतील अध्यात्मविषयक सुपरसाईट म्हणवते. मला गुजराती येत नाही. पण ते संकेतस्थळ विपुल आध्यात्मिक साहित्यांनी भरलेले दिसून येते. गुजराती जाणणारे कदाचित यथोचित मूल्यमापन करू शकतील.
आता योगसूत्रांकडे वळू या.

४६. स्थिरसुखम् आसनम् ।
शरीर ज्या स्थितीत राहीले असता मन आणि शरीर ह्या दोहोंस सुख वाटेल आणि स्थिरता प्राप्त होईल ते आसन होय.

४७. प्रयत्नशैथिल्यानन्तसमापत्तिभ्याम् ।
शारीरिक हालचाली करण्याविषयीच्या सहजप्रवृत्तीस 'प्रयत्न' म्हणतात. ह्या प्रयत्नांत सहजता (शैथिल्य) संपादन करणे आणि अनंताच्या ठिकाणी समापत्ती म्हणते तन्मयता साधणे ह्या दोन उपायांनी आसन स्थिर आणि सुखावह होते.

४८. ततो द्वन्द्वानभिघातः ।
आसन स्थिर झाले असता राग-द्वेष इत्यादी द्वंद्वांचा अनभिघात म्हणजे उपद्रव न होण्याची सिद्धी प्राप्त होते.

४९. तस्मिन् सति श्वासप्रश्वासयोर्गतिविच्छेदः प्राणायामः ।
आसन साध्य झाल्यावर श्वास आणि प्रश्वास ह्यांच्या स्वाभाविक गतीचे नियंत्रण (विच्छेद) करणे म्हणजे प्राणायाम होय.

५०. बाह्याभ्यन्तरस्तम्भवृत्तिः देशकालसंख्याभिः परिदृष्टो दीर्घसूक्ष्मः ।
प्राणायाम तीन प्रकारचा असतो. बाहेर सोडला जाणारा प्रश्वासरूप रेचक, आत घेतला जाणारा श्वासरूप पूरक आणि दरम्यान काही काळची स्तब्धता म्हणजे कुंभक. तो, देश (आत किंवा बाहेर), काल (प्रलंबन काल) आणि संख्या (आवृत्ती) ह्यांच्या योगाने दीर्घ आणि सूक्ष्म असा उपलक्षित होतो.

५१. बाह्याभ्यन्तरविषयाक्षेपी चतुर्थः ।
आत किंवा बाहेर अशा कोणत्याही देशाची अपेक्षा न ठेवता केवळ स्तंभवृत्तीने केला जाणारा चौथा केवल कुंभक होय.

५२. ततः क्षीयते प्रकाशावरणम् ।
प्राणायामामुळे चित्तातील प्रकाशस्वरूप सत्त्वगुणावर आवरण घालणाऱ्या रजस्तमोदोषांचा क्षय होतो.
 
५३. धारणासु च योग्यता मनसः ।
पुढील योगांग जी धारणा, तिचा अभ्यास करण्याची योग्यता त्यामुळे मनास प्राप्त होते.

५४. स्वस्वविषयासंप्रयोगे चित्तस्य स्वरूपानुकार इवेन्द्रियाणां प्रत्याहारः ।
नेत्र, कर्ण, रसना, नाक आणि त्वचा इत्यादी ज्ञानेंद्रियांद्वारे होणाऱ्या रूप, शब्द, रस, गंध आणि स्पर्श ह्या संवेदनांचा परस्परांशी संबंध येणे म्हणजे त्यांचा संप्रयोग. असा संप्रयोग होऊ दिला नाही म्हणजे ती इंद्रिये चित्ताच्या स्वरूपाचे जणू अनुकरण करणारी होतात. ह्या त्यांच्या स्थितीला प्रत्याहार म्हणतात.

५५. ततः परमा वश्यतेन्द्रियाणाम् ।
ह्या प्रत्याहाराच्या अभ्यासाने इंद्रियांची स्वाधीनता पूर्णत्वाने होते.

॥ इति पतञ्जलि विरचिते योगसूत्रे द्वितीयः साधनपादः ॥

अशाप्रकारे पतंजली विरचित योगसूत्रांचा दुसरा चतकोर, साधनपाद संपूर्ण होत आहे.
.

पातंजल योगसूत्रे व भाष्ये: १

पतंजली ऋषींनी मनोकायिक मनुष्यव्यवहारांचा सखोल अभ्यास करून, सर्वप्राणीमात्रांच्या हितास पोषक मानवी व्यवहार कोणता (मनुष्याने कसे वागावे) हे सूत्रबद्ध रीतीने वर्णन केलेले आहे. तीच १९५ सूत्रे पातंजल योगसूत्रे म्हणून ओळखली जातात. ती चार भागांत विभागलेली आहेत. (पाद: म्हणजे पाव हिस्सा. प्राण्यास चार पाय अथवा पाद असतात. त्यापैकी एक पाद म्हणजे पाव हिस्सा. अशाचप्रकारे शफ म्हणजे आठवा हिस्सा असतो.) समाधीपाद(५१), साधनपाद(५५), विभुतीपाद(५५) आणि कैवल्यपाद(३४). ज्या काळात हे घडून आले, तेव्हा ज्ञानसंकलन आणि प्रसाराचे काम पारंपारिक मौखिक पाठांतराद्वारेच होत असे. ह्याकरता कमीत कमी शब्दात, पण व्याकरणदृष्ट्या परिपूर्ण आणि निस्संदिग्ध ज्ञानाच्या अभिव्यक्तीस सूत्र म्हटले जाई. मात्र, सूत्राच्या मनुष्यजीवनातील वापराप्रसंगी त्याचा अर्थ समजून घेण्याकरता, त्यामुळेच स्पष्टीकरणांची गरज पडे. व्यासादिकांसकट पतंजलींनंतरच्या कित्येक विद्याव्यासंगी व्यक्तींनी तत्कालीन सामान्य लोकांना सूत्रांचे आकलन आणि वापर वैयक्तिक जीवनात सहजपणे करता यावा ह्याकरता त्यावर सुरस भाष्ये लिहीली. ज्याप्रकारे ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका) गीतेचा अर्थ सामान्यांस सुलभ करते, त्याच प्रकारे योगसूत्रे सर्वसामान्यांच्यासाठी ही भाष्ये उपलब्ध करून देतात. भाष्ये आकाराने, प्रकाराने आणि वैविध्याने भरलेली असली तरी ती मूळ योगसूत्रेच निसांदिग्धपणे सांगत असतात. पतंजली ऋषींच्या पूर्वी योग नव्हता काय? ह्याचे उत्तर आहे की होता. भारतीय संस्कृतीत जीवनसिद्धांतांचे परिशीलन हजारो सालांपासून सातत्याने होतच आलेले आहे. त्यांचेपूर्वीच्या सर्व अभ्यासाचे सार पतंजलींनी अत्यंत समर्पक आणि निस्संदिग्ध शब्दांत सूत्रबद्ध केले. भारतीय मानसाची बैठक गीता व योगसूत्रे यांचे आधारेच परिपूर्ण होते. असे असले तरीही योगसूत्रे गीतेच्या तुलनेत कमी प्रसिद्ध आहेत. काळाच्या ओघात मला योगसूत्रे जाणून घेण्याची निकड जाणवली. तेव्हा ती सहज उपलब्ध झाली नाहीत. सुरूवातीला ती भाष्यांविना समजूनही घेता येत नाहीत. भाष्येही सहजी उपलब्ध नाहीत. मला वाटली तशी योगसूत्रे जाणून घ्यायची निकड सुहृदांतही उदयमान व्हावी. त्या जिज्ञासेची परिपूर्तता व्हावी. आणि आपल्या सांस्कृतिक संपत्तीचा वारसा आपण उमजून घ्यावा ह्याकरता हा खटाटोप. हे एक प्रकट चिंतनच आहे. इथे चर्चाही करता येईल. माझ्या, तुमच्या समजा, गैरसमजांना अभिव्यक्तही करता येईल. आपल्या पूर्वापार सांस्कृतिक संपत्तीस आत्मसात करता येईल. इथे मी लिहीत आहे ते योगसूत्रे जाणून घेण्यासाठी, इतरांची उत्सुकता जागवण्यासाठी आणि योगसूत्रांचा प्रसार व्हावा असे मला वाटते म्हणून. ह्याकरता केलेले ते माझे आकलन आहे. मी इतर जाणकार भाष्यकारांनी केलेल्या भाष्यांबद्दलही केवळ संदर्भ देणार आहे.

००१. अथ योगानुशासनम् ।
योगव्यवहार असा आहे.

००२. योगः चित्तवृत्तिनिरोधः ।
योग म्हणजे चित्तवृतींचा निरोध.

००३. तदा द्रष्टुः स्वरूपेऽवस्थानम् ।
(एकाग्रता साधेल) तेव्हा आत्मा स्वरूपात नांदतो.

००४. वृत्तिसारूप्यम् इतरत्र ।
(एरव्ही) आत्मा इतरत्र गुंततो.

००५. वृत्तयः पञ्चतय्यः क्लिष्टा अक्लिष्टाः ।
मनुष्यवृत्ती पाच प्रकारच्या असतात. क्लेशकारक आणि क्लेशविहीन.

००६. प्रमाणविपर्ययविकल्पनिद्रास्मृतयः ।
आसमंताची यथातथ्य प्रतिमा जेव्हा आपण मनात साकारतो तेव्हा आपली वृत्ती "प्रमाण" असते. समोरची वस्तू यथातथ्य न समजून घेता ती वेगळीच कुठली असल्याचा समज आपण करून घेतो तेव्हा आपण "विपर्यय" करत असतो. सत्याला पर्याय शोधत असतो. कधीकधी अस्तित्वात नसलेल्या गोष्टी आपण सभोवताल पाहतो (भूतासारखे आभास) तेव्हा तो "विकल्प" असतो. जेव्हा आपण आसमंताचे आकलनच करत नसतो तेव्हा आपण "निद्रावृत्तीत" असतो. तर आठवणीत रमतो तेव्हा आपण "स्मृती"वृत्तीत असतो.

"तपस्वी, ज्ञानी आणि कर्मी यांहूनही माझ्या मते योगी श्रेष्ठ असतो. म्हणून हे अर्जुना तू योगी हो." असे भगवान कृष्णानेच गीतेत सांगून ठेवलेले असल्याने योगशिक्षण किती महत्वाचे आहे हे वेगळ्याने सांगण्याची आवश्यकता नाही.

तपस्विभ्यो अधिको योगी, ज्ञानिभ्यो अपि मतो अधिक |
कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्माद्योगी भवार्जुन || गीता ६.४१

मात्र ह्याबाबतीत माझी भावना अशी आहे की:

समर्थ गुरू योगसूत्रे, मार्गदर्शक ती खरी ।
सूत्रेच प्रश्न देतील, तीच देतील उत्तरे ॥

तरीही खालील दोन भाष्यांच्या आधारे मी माझे आकलन मांडण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे ते सशक्त होईल. दुवा क्र. १: http://www.flickr.com/photos/36356386@N00/2201323744/in/photostream/

१. भारतीय मानसशास्त्र अथवा सार्थ आणि सविवरण पातंजल योगदर्शन, योगाचार्य कृष्णाजी केशव कोल्हटकर,आदित्य प्रतिष्ठान प्रकाशन, दूरध्वनी: २५४४५१७१, विरोप पत्ता: aparna.shankar@gmail.com, संकेतस्थळः दुवा क्र. २: http://www.adityapratishthan.org/, प्रथमावृत्तीः १८-०२-२००४, प्रस्तुत तृतियावृत्ती: १४-०१-२००७, देणगी मूल्य केवळ रु.५००/-.
२. पातंजल योगदर्शन, डॉ. शरद्चंद्र कोपर्डेकर, एम्.कॉम्.बी.ए.पी.एच. डी., इंद्रायणी साहित्य प्रकाशन, प्रथमावृत्ती: १९९४, मूल्य रु.१६०/- फक्त.

आता पुन्हा वळूया सूत्रांकडे.

००७. प्रत्यक्षानुमानागमाः प्रमाणानि ।
जे आपण आपल्या ज्ञानेंद्रियांच्या साहाय्याने संवेदू शकतो ते "प्रत्यक्ष" प्रमाण. जे अनुमानाने ओळखतो (जसे की रेडिओ ऐकून लता गाते आहे) ते "अनुमान" प्रमाण. आणि जे आपल्या पूर्वसुरींनी आपल्या मनात रुजवले आहे (जसे की कधीही साप न पाहिलेल्याचे सापाला घाबरणे) त्या पुराव्याने सिद्ध होणारे असे जे ते "आगम" प्रमाणित.

००८. विपर्ययो मिथ्याज्ञानम् अतद्रूपप्रतिष्ठम् ।
अंधारात झाडाच्या बुंध्यालाच पुरूष समजणे, अशा प्रकारच्या मिथ्या ज्ञानास "विपर्यय" म्हणतात.

००९. शब्दज्ञानानुपाती वस्तुशून्यो विकल्पः ।
अस्तित्वातच नसलेल्या वस्तूचे भान येणे म्हणजे "विकल्प".

०१०. अभावप्रत्ययालम्बना वृत्तिर्निद्रा ।
संवेदन होतच नसले तर ती "निद्रा".

०११. अनुभूतविषयासंप्रमोषः स्मृतिः ।
भूतकाळात रममाण होत असणे म्हणजे "स्मृती".

०१२. अभ्यासवैराग्याभ्यां तन्निरोधः ।
ह्या साऱ्या वृत्तींचा निरोध "अभ्यास" आणि "वैराग्य" ह्यांचे आधारे साध्य होतो. मनात केवळ वरील पाच वृत्तीच राहू शकतात. एका वेळी फक्त एक. एक वृत्ती अस्तमान झाल्यावरच दुसरी उदय पावते. एक वृत्ती संपून दुसरी प्रकट होण्यापूर्वीचा काळ वाढवत नेणे म्हणजेच वृत्तींचा निरोध. ह्यालाच "अभ्यास" म्हणतात. तर वरील पाच वृत्तींप्रतीची आसक्ती कमी करत नेणे म्हणजे "वैराग्य". अभ्यास व वैराग्याने योग (चित्तवृत्तीनिरोध) साधतो. योगाने काय साधते? तर मनाला एक प्रकारचा आनंद मिळतो. मन त्याला आनंद वाटेल तेथेच रमत असते. म्हणून तर वृत्तींची आसक्ती असते. मग निवृत्तीतील आनंदाची ओळख आपण मनास करून दिली तर मन तेथेच रमू लागते.

पतंजलि महामुनी हे व्याकरणभाष्याचे कर्ते, योगदर्शनाचे प्रणेते व आयुर्वेदातल्या चरक परंपरेचे जनक होत. भारतात होऊन गेलेल्या अग्रगण्य विद्वानांत पतंजलींची गणना होते. म्हणूनच त्यांना नमन करतांना भर्तृहरीने आपल्या वाक्यपदीय ग्रंथाच्या प्रारंभी पुढील श्लोक लिहिला आहे.

योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्यच वैद्यकेन ।
योऽपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतंजलीं प्रांजलिरानतोस्मि ॥

योगाने चित्ताचा, पदाने (व्याकरणाने) वाणीचा व वैद्यकाने शरीराचा मल ज्याने दूर केला, त्या मुनिश्रेष्ठ पतंजलीला मी अंजलिबंध करून नमस्कार करतो.

पतंजलि हे गोनर्द गावाचे रहिवासी होते. यांच्या मातेचे नाव गोणिका असे होते. पित्याचे नाव मात्र उपलब्ध नाही. पतंजलींना शेषाचा अवतार समजण्यात येते. पतंजलि बाल्यावस्थेतच अध्ययन करू लागले. मग ते तपाला बसले. त्यांनी शिवाला प्रसन्न करून घेतले. शिवाने त्यांना चिदंबरक्षेत्री आपले तांडव नृत्य दाखवले. मग शिवाने त्यांना आदेश दिला, की 'तू पदशास्त्रावर भाष्य लिही.' त्यानुसार चिदंबरम येथेच राहून पतंजलींनी पाणिनीची सूत्रे व कात्यायनाची वार्तिके यांच्यावर विस्तृत भाष्य लिहिले. ते महाभाष्य या नावाने प्रसिद्ध झाले.

पातंजलमहाभाष्यचरकप्रतिसंस्कृतै: ।
मनोवाक्कायदोषाणां हन्त्रेऽहिपतये नम: ॥

योगसूत्रे, महाभाष्य आणि चरकसंहितेचे प्रतिसंस्करण या तीन कृतींनी अनुक्रमे मन, वाणी आणि देह यांच्या दोषांचा निरास करणार्‍या पतंजलीला माझा नमस्कार असो. पतंजलींनी व्याकरणमहाभाष्य लिहून तर संस्कृत भाषेला गौरवाच्या शिखरावर नेऊन बसवले. त्यामुळे पाली-अर्धमागधीसारख्या बौद्ध-जैनांच्या धर्मभाषाही मागे पडल्या. संस्कृत आणि अपभ्रंश शब्दांनी सारखाच अर्थ व्यक्त होत असला, तरी धार्मिक दृष्ट्या संस्कृत शब्दांचाच उपयोग करावा; कारण तसे केल्याने अभ्युदय होतो, असे पतंजलींनी म्हटले आहे. याचा इत्यर्थ हा, की अपभ्रंश शब्द अनंत असल्याने ते वापरल्यामुळे देशातील भिन्न गटागटांतून विभक्तपणाची भावना बळावत जाते. उलटपक्षी संस्कृताला चिकटून राहिल्याने परंपरेला स्थैर्य लाभून एकराष्ट्रियत्वाची भावना दृढमूल होते. त्या काळी पतंजलि व पुष्यमित्र यांनी केलेल्या संस्कृत भाषेच्या पुनरुद्धारामुळेच रामायण-महाभारतादी महान ग्रंथांचा अखिल भारतात सामान्यत: एकाच स्वरूपात प्रचार होऊन भारताचे एकराष्ट्रियत्व आतापर्यंत टिकून राहिले. पतंजलींना मोक्षाइतकेच ऐहिक अभ्युदयाचे महत्त्व वाटत होते. बौद्ध धर्माने अभ्युदय या धर्मांगाकडे नुसते दुर्लक्षच केले होते असे नव्हे; तर प्रत्यक्षपणे अभ्युदयविरोधी धोरण स्वीकारले होते. अभ्युदयाचा संबंध इहलोकाशी म्हणजेच पर्यायाने वर्तमानकाळाशी येतो. बौद्धांनी शब्दच्छल करून वर्तमानकालाचे अस्तित्वच अमान्य केले होते आणि जनसमुदायाचा बुद्धिभेद चालवला होता. पतंजलींनी बौद्धांच्या अशा अनेक वर्तमानकालविरोधी वचनांचे खंडन करून वर्तमानकालाचे अस्तित्व सिद्ध केले आहे. महाभाष्य ही पतंजलींची अजरामर रचना आहे. भारतात अनेक भाष्ये निर्माण झाली. शबर, शंकराचार्य, रामानुज, सायण इत्यादी महान आचार्यांनी ती निर्माण केली. पण या सर्व भाष्यांत पतंजलींचे हे एकच भाष्य महाभाष्य ठरले. पतंजलींनी योगसूत्रे लिहून योगदर्शन हे अद्वैत दर्शनाचे प्रत्यक्ष प्रयोगाने सिद्ध होणारे प्रायोगिक अंग आहे हे प्रतिपादले आहे. त्यामुळे चित्ताचा, मनाचा इतका शुद्ध, सूक्ष्म व शास्त्रीय विचार मांडून संस्कृतमधून महाभाष्ये लिहून भारतीय तत्त्वज्ञानाचा जणू पुनरुद्धारच केला. हे पतंजलींचे कार्य केवळ अद्वितीय आहे.

०१३. तत्र स्थितौ यत्नोऽभ्यासः ।
एकाग्रता साधण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना "अभ्यास" म्हणतात. क्षणभर घडलेल्या निरोधाचाही चित्तावर संस्कार घडत राहतो. संस्कारित चित्ताला निरोधातील आनंद आवडू लागतो. आणि निरोधाचा अभ्यास सुकर होतो.

०१४. स तु दीर्घकालनैरन्तर्यसत्कारासेवितो दृढभूमिः ।
दीर्घकाल, निरंतर व आदरपूर्वक केल्यास अभ्यास दृढमूल होतो.

०१५. दृष्टानुश्रविकविषयवितृष्णस्य वशीकारसंज्ञा वैराग्यम् ।
शब्द, रूप, रस, गंध आणि स्पर्श ह्या संवेदनांनी समजणारे विषय 'दृष्ट'. आणि शास्त्र, परंपरा वा विश्वासार्ह व्यक्तींकडून समजणारे विषय 'श्रुत'. दृष्ट आणि श्रुत अशा दोन्ही प्रकारच्या विषयोपभोगांतून मिळणारा आनंद, योगसाधनेतून मिळणार्‍या आनंदाच्या तुलनेत निकृष्ट वाटू लागून जेव्हा ह्या विषयांप्रती साधक अनासक्त होतो, तेव्हाची त्याची अनासक्ती योगशास्त्रात ‘वशीकार वैराग्य’ म्हणून ओळखले जाते. प्राप्त केलेल्या वैराग्याचा आणखी वैराग्यप्राप्तीसाठी उपयोग होतो. वैराग्याच्या चार अवस्था वर्णिलेल्या आहेत. यतमान, व्यतिरेक, एकेंद्रिय आणि वशीकार. वैराग्यप्राप्तीच्या प्रयत्नांत पायरी-पायरीने ह्या चारही अवस्थातून जाऊन मनुष्य वशीकार वैराग्य मिळवू शकतो.

वैराग्य प्राप्तीसाठी प्रयत्नशील असतांनाचे 'यतमान' (प्रयत्नमान) वैराग्य. चित्तातून वासना नाहीशा होतात, म्हणजेच त्यांचा व्यतिरेक होतो व साधकास कोणत्या वासनांचा व्यतिरेक झाला आहे आणि कोणत्या वासना चित्तात अजूनही शिल्लक आहेत हे कळू लागते त्या अवस्थेतील 'व्यतिरेक' वैराग्य. इंद्रिये आणि मन स्वाधीन झाल्यावरही बुद्धी ह्या अधिष्ठानात विषयवासना बीज रूपाने उरलेली असल्याने तिची जागृती न होण्यासाठी साधना चालू ठेवण्याची आवश्यकता संपत नाही. ह्या अवस्थेस योगशास्त्रातील वैराग्याची तिसरी पायरी म्हणजेच 'एकेंद्रिय' (हे एक इंद्रिय बुद्धी म्हणता येईल का?) वैराग्य असे म्हणतात. ह्यानंतर बुद्धितील आसक्तीही निरांकुर झाली, तिला कोंब फुटण्याची शक्यता मावळली, की जी अनासक्ती प्राप्त होते तिलाच योगशास्त्रात 'वशीकार' वैराग्य म्हणतात. निर्विचार समाधीत वैशारद्य प्राप्त झाल्यावर, विषयोपभोगांत व्यस्त राहूनही, साधकाची अनासक्ती अबाधित राहते. विषयोपभोगांनाही वश करून घेणारी अनासक्ती या अर्थानी ती अनासक्ती 'वशीकार' वैराग्य म्हणवल्या जात असावी.

०१६. तत्परं पुरुषख्यातेर्गुणवैतृष्ण्यम् ।
तृष्णा म्हणजे तहान. वैतृष्णा म्हणजे अनासक्ती. गुण म्हणजेच विषय. चित्ताहून पुरूष वेगळा आहे असा विवेक उत्पन्न होणे ही पुरूषख्याति होय. अशा पुरूषख्यातीमुळे सत्त्व, रज आणि तम ह्या तीन्ही गुणांप्रती जी अनासक्ती निर्माण होते ते परमवैराग्य.

०१७. वितर्कविचारानन्दास्मितारूपानुगमात् संप्रज्ञातः ।
समाधीच्या अभ्यासबलाने ईप्सित पूर्णत्वाने आणि प्रकर्षाने समजते म्हणून अशा प्रकारच्या समाधीला संप्रज्ञात समाधी म्हणतात. हा संप्रज्ञात समाधी (समाधी हा शब्द पुल्लिंगी असल्याची मी खात्री केली आहे.) वितर्कादीकांच्या रूपाशी चित्ताचा अनुगम म्हणजे चित्ताची तदाकारता झाल्यामुळे सवितर्क, सविचार, सानंद आणि सास्मित (स+अस्मित) आदी चार प्रकारचा समाधी साध्य होत असतो.

०१८. विरामप्रत्ययाभ्यासपूर्वः संस्कारशेषोऽन्यः ।
एक चित्तवृत्ती नाहिशी होऊन दुसरी निर्माण होण्याच्या दरम्यानचा विराम वारंवार अनुभवल्यावर जो समाधी साधतो, तो असंप्रज्ञात समाधी होय. ह्यात चित्त केवळ नाममात्र राहते म्हणून संप्रज्ञाताहून निराळा असा तो असंप्रज्ञात समाधी.

०१९. भवप्रत्ययो विदेहप्रकृतिलयानाम् ।
देहविषयक अहंकार नाहीसा झाल्यामुळे देवत्व पावलेले योगी आणि ज्यांचे चित्त प्रकृतीत लय पावलेले आहे असे योगी, ह्या उभय योग्यांचा समाधी असंप्रज्ञात समाधी असतो, म्हणजे त्यात (भवप्रत्यय) संसाराचा अनुभव पुन्हा यावयाचा असतो. (चित्ताला आत्म्यावरील असंप्रज्ञात समाधीतच आत्मसाक्षात्कार होत असतो. विदेह व प्रकृतीलय योग्यांच्या असंप्रज्ञात समाधीत अनुक्रमे त्यांच्या चित्ताला महत्तत्त्व हा आधार असतो किंवा त्यांच्या चित्ताचा लय प्रकृतीत झालेला असतो. त्यांचे चित्त आत्मसाक्षात्कारयुक्त झालेले नसते. म्हणून ते व्युत्थित -disturb- होईल तेव्हा त्याला भवप्रत्यय म्हणजे संसाराचा अनुभव घडणारच.)

०२०. श्रद्धावीर्यस्मृतिसमाधिप्रज्ञापूर्वक इतरेषाम् ।
विदेह आणि प्रकृतीलय हे जे दोन प्रकारचे वरील सूत्रांत उल्लेखलेले योगी त्यांच्याहून इतर योग्यांचा असंप्रज्ञात समाधिद्वारा आपल्याला कैवल्यसाक्षात्कार होणार असा विश्वास (श्रद्धा), समाधिद्वारा आपण कैवल्यसाक्षात्कार अवश्य संपादन करणार असा उत्साह वाटणे हे वीर्य, पूर्वी अनुष्ठिलेल्या योगाभ्यासाचे स्मरण आणि त्यावरून पुन्हा आचरलेला समाधि (स्मृती) आणि समाध्यनुष्ठानामुळे प्राप्त झालेली प्रज्ञा म्हणजे वस्तूंचे यथार्थत्वाने ग्रहण करणारी बुद्धी, एतत्पूर्वक असतो. म्हणजे हे उपाय आधी अवलंबले जातात आणि मग त्यांचे फल म्हणून पुढील असंप्रज्ञात समाधि साध्य होत असतो.

०२१. तीव्रसंवेगानाम् आसन्नः ।
संवेग म्हणजे कैवल्य प्राप्तीच्या इच्छेची उत्कटता. ही तीव्र असेल तर तो तीव्रसंवेग होय. असा तीव्रसंवेग ज्यांच्या ठिकाणी आहे ते तीव्रसंवेगयोगी. अशा तीव्रसंवेगयोग्यांना समाधी आसन्न म्हणजे अगदी जवळ असतो. म्हणजे तो त्यांस फार शीघ्रतेने प्राप्त होतो.

०२२. मृदुमध्याधिमात्रत्वात् ततोऽपि विशेषः ।
ह्या तीव्रसंवेगाच्या मृदुत्वामुळे, मध्यमत्वामुळे आणि अधिमात्रत्वामुळे समाधिलाभ त्याहूनही विशेष आसन्न असा होतो. म्हणजे मृदु तीव्रसंवेग असल्यास समाधिलाभ लवकर होतो, मध्य तीव्र संवेग असल्यास अधिक लवकर होतो आणि अधिमात्र तीव्र संवेग असल्यास तो फारच लवकर होतो.

०२३. ईश्वरप्रणिधानाद् वा ।
अथवा ईश्वर प्रणिधानानेसुद्धा वरील असंप्रज्ञात समाधी साध्य होतो. आपल्याजवळील सर्वोत्कृष्ट श्रेय व संचितास ईश्वराजवळ ठेव म्हणून ठेवणे म्हणजे "ईश्वरप्रणिधान".

०२४. क्लेशकर्मविपाकाशयैरपरामृष्टः पुरुषविशेष ईश्वरः ।
ज्याचे प्रणिधान करावयाचे त्या ईश्वराचे स्वरूप ह्या सूत्रात सांगितले आहे. थोडक्यात म्हणजे ईश्वराची व्याख्याच इथे दिलेली आहे. अविद्या, अस्मितादी पाच क्लेश; चांगले, वाईट आणि मिश्र अशी तीन्ही कर्मे; जाती, आयुष्य आणि भोग हे त्या कर्माचे फल (विपाक) आणि त्या फलास कारण असणार्‍या चित्तातील सूप्त वासना हा आशय अशा चारही गोष्टींनी जो कालत्रयी लिप्त होत नाही तो ईश्वर.

भारत सरकारच्या ह्या http://tempweb34.nic.in/xkkv/html/dhanvantari.php संकेतस्थळावर "काशीकी विभूतीयाँ" म्हणून पंधरा थोर व्यक्तित्वांची हिंदीत ओळख करून दिलेली आहे. पतंजलींची इथली ओळख विश्वसनीय वाटते. ती मुळातच अवश्य वाचावी. ती थोर व्यक्तीत्वे खालीलप्रमाणे आहेत.

१. महर्षि अगस्त्य
२. श्री धन्वंतरि
३. महात्मा गौतम बुद्ध
४. संत कबीर
५. अघोराचार्य बाबा कानीराम
६. वीरांगना लक्ष्मीबाई
७. श्री पाणिनी
८. श्री पार्श्वनाथ
९. श्री पतञ्जलि
१०. संत रैदास
११. स्वामी श्रीरामानन्दाचार्य
१२. श्री शंकराचार्य
१३. गोस्वामी तुलसीदास
१४. महर्षि वेदव्यास
१५. श्री वल्लभाचार्य

०२५. तत्र निरतिशयं सार्वज्ञबीजम् ।
त्या ईश्वराचे ठायी पराकोटीच्या सर्वज्ञतेचे बीज सामावलेले असते.

०२६. स पूर्वेषाम् अपि गुरुः कालेनानवच्छेदात् ।
तो, सर्गारंभी जे उत्पन्न झाले (पूर्वेष) त्यांचाही गुरू आहे. त्याला काल मर्यादा नाहीत.

०२७. तस्य वाचकः प्रणवः ।
त्याचा द्योतक प्रणव -ॐ- आहे.

०२८. तज्जपस्तदर्थभावनम् ।
त्या अर्थाची भावना अभिव्यक्त करण्यासाठी ॐ चाच उच्चार करावा.

०२९. ततः प्रत्यक्चेतनाधिगमोऽप्यन्तरायाभावश्च ।
(ईश्वरप्रणिधानामुळे) प्रत्यक् चेतनेस जे आकलन होते त्याद्वारे योगमार्गातील अडथळ्यांचे निवारण होते.

०३०. व्याधि स्त्यान संशय प्रमादालस्याविरति भ्रान्तिदर्शनालब्धभूमिकत्वानवस्थितत्वानि
चित्तविक्षेपास्तेऽन्तरायाः ।
ते अडथळे असतात व्याधी, निष्क्रियता (स्त्यान), संशय, चूक, आळस, अतृप्ती (अविरति), भ्रम (आपल्या क्षमतेविषयी चुकीचे निदान), आपल्या क्षमतेबाबत अवास्तव समज करून घेणे (अलब्धभूमिकत्व) आणि अस्थिरता (अनवस्थित्व).

०३१. दुःखदौर्मनस्याङ्गमेजयत्वश्वासप्रश्वासा विक्षेपसहभुवः ।
दुःखे, मनो-अस्वास्थ्य (दौर्मनस्य), कंप सुटणे (अंगमेजयत्व), श्वास आणि प्रश्वास हे पाच उपद्रवही ह्या अडथळ्यांसोबत असतात.

०३२. तत्प्रतिषेधार्थम् एकतत्त्वाभ्यासः ।
हे अडथळे आणि उपद्रव यांच्या निरसनार्थ कोणत्याही एका तत्त्वावार अभ्यास (संयम) करावा. चित्त स्थिर करण्याचा प्रयत्न करावा.

०३३. मैत्रीकरुणामुदितोपेक्षणां सुखदुःखपुण्यापुण्यविषयाणां भावनातश्चित्तप्रसादनम् ।
सुख, दुःख, पुण्य आणि पाप ह्या विषयांबाबत मनात (चित्तात) अनुक्रमे मैत्री, करूणा, आनंद आणि उदसिनता ह्या भावनाचा प्रतिसाद द्यावा. असे केल्यास चित्त प्रसन्न राहते.

०३४. प्रच्छर्दनविधारणाभ्यां वा प्राणस्य ।
योगाभ्यासात अस्थिरत्व येऊ नये म्हणून प्रश्वास संपूर्णतः बाहेर सोडून (रेचक) मग त्यास बाहेरच रोखून धरल्यास (बाह्य कुंभक) चित्त प्रसन्न (स्थिर) होते. ह्या सूत्रातील विधारण म्हणजे विशेष प्रकाराने सावकाश धारण केला जाणारा श्वास असाही अर्थ संभवतो. तसा अर्थ घेतल्यास कुंभकरहित केले जाणारे दीर्घ श्वसन म्हणजे पुरक (श्वास आत घेणे) व रेचक असा अर्थ निघतो.

०३५. विषयवती वा प्रवृत्तिरुत्पन्ना मनसः स्थितिनिबन्धिनी ।
३५ ते ३८ ह्या सूत्रांमध्ये चित्त स्थिर होण्यासाठी उपाय सांगितले आहेत. ह्या सूत्रातला उपाय म्हणजे शब्द, रूप, रस, गंध आणि स्पर्श ह्या संवेदनांपैकी एखाद्या संवेदनेवर वृत्ती स्थिर झाल्यास तिला चित्ताची विषयवती प्रवृत्ती म्हणतात. ती चित्त स्थिर होण्यास कारणीभूत ठरते.

०३६. विशोका वा ज्योतिष्मती ।
ग्राह्याचे ज्ञान जिच्यायोगे होते ती चित्तातील ज्योती म्हणजे चित्ताचा सात्त्विक प्रकाश होय. ज्या प्रवृत्तीस ही ज्योती हाच विषय आहे, ती ज्योतिष्मती प्रवृत्ती होय. ह्या प्रवृत्तीत शोकाचा लेशही नसतो म्हणून ती विशोका. अशा प्रकारची विशोका ज्योतिष्मती प्रवृत्ती उत्पन्न केली असता ती मनःsथैर्यास कारण होते.

०३७. वीतरागविषयं वा चित्तम् ।
वीत म्हणजे पूर्णत्वाने नाहीसा झालेला. राग म्हणजे विषयाची अभिलाषा, लोभ. लोभ पूर्णत्वाने नाहीसा झालेला आहे अशा पुरूषाचे चित्त स्थिर होते.

०३८. स्वप्ननिद्राज्ञानालम्बनं वा ।
स्वप्नात वा निद्रिस्त असतांना लाभलेले ज्ञान ज्याचे चित्तास आधार (आलंबन) आहे ते चित्त स्थिर होते.

०३९. यथाभिमतध्यानाद् वा ।
आपल्याला जो आवडत असेल किंवा इष्ट वाटत असेल त्या आधारावर ध्यान केले असता चित्त स्थिर होते.


वेदव्यासांनी गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी "इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे सांख्ययोगो नाम द्वितियो अध्याय:" अशाप्रकारचा शेवट केला आहे. गीतेतील अध्यायांची नावेही अनुक्रमे अर्जुनविषादयोग, सांख्ययोग, कर्मयोग, ज्ञानकर्मसंन्यासयोग, संन्यासयोग, ध्यानयोग, ज्ञानविज्ञानयोग, अक्षरब्रह्मयोग, राजविद्याराजगुह्ययोग, विभूतियोग, विश्वरूपदर्शनयोग, सगुणभक्तीयोग, क्षेत्रक्षेत्रज्ञयोग, गुणत्रयविभागयोग, पुरूषोत्तमयोग, दैवासुरसंपाद्विभागयोग, श्रद्धात्रयविभागयोग आणि मोक्षसंन्यासयोग अशी आहेत. गीतेचा शेवटला श्लोकही

यत्र योगेश्वर: कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर: |
तत्र श्रीर्विजयो भूतिर्धृत्वा नीतिर्मतिर्मम ||

हा आहे. ह्यात संजय श्रीकृष्णास "योगेश्वर" म्हणत आहे.

ह्या सगळ्यांवरून काही गोष्टी निस्संदिग्धपणे स्पष्ट होतात.
१. योग किमान गीतेइतकातरी प्राचीन आहे. म्हणजे पाच हजार वर्षांपूर्वीपासून योगशास्त्र आहे.
२. योगशास्त्र ब्रम्हविद्येचा भाग आहे.
३. कृष्ण उत्तम प्रकारे योग जाणत असावा. त्याला योगेश्वरच म्हटले आहे.

०४०. परमाणु परममहत्त्वान्तोऽस्य वशीकारः ।
कुठल्याहि विषयावर चित्त विनासायास आणि अविरोध स्थिर (एकाग्र) होऊन चित्ताचे त्या विषयावर वर्चस्व राहण्यास "वशीकार" म्हणतात. पूर्वी सांगितलेले वशीकार नामक वैराग्य हे ह्या अवस्थेचे पूर्वरूप आहे.

०४१. क्षीणवृत्तेरभिजातस्येव मणेर्ग्रहीतृग्रहणग्राह्येषु तत्स्थतदञ्जनतासमापत्तिः ।
ज्या चित्तातील वृत्ती क्षीण झालेल्या असतील ते चित्त स्फटिक मणी ज्याप्रमाणे ज्या रंगाच्या वस्तूवर ठेवाल त्या रंगात तन्मय होतो त्याप्रमाणे त्या विषयात (ग्राह्य), त्या ज्ञानेंद्रियांत (ग्रहण) आणि त्या पुरूषात (ग्रहिता) तन्मय होते.

०४२. तत्र शब्दार्थज्ञानविकल्पैः संकीर्णा सवितर्का समापत्तिः ।
गाय हा शब्द (गाय वाचक शब्द संकेत), प्रत्यक्ष गाय (वस्तू) आणि गायीचे आपल्याला मनात (चित्तात) निर्माण होणारे चित्र (ज्ञान) ह्या तिन्ही गोष्टी भिन्न असतात. मात्र "गाय" शब्दाच्या उच्चाराने आपल्या चित्तात, ह्या तिन्ही गोष्टी एकच असल्याचा भ्रम निर्माण होतो. हा भ्रमच "शब्द", "अर्थ" आणि "ज्ञान" ह्यांचे संकुचित अर्थ स्पष्ट करतो. गाय ह्या शब्दाचा गाय ह्या अर्थाशी संबंध नसूनही तो असल्यासारखा भासतो, असे वाटणे म्हणजे विकल्प. उदाहरणार्थ गाय ह्या शब्दाने इंग्रजी भाषकास व्यक्ती असा अर्थ ध्वनित होऊ शकतो. अशाच प्रकारे "शब्द", "अर्थ" आणि "ज्ञान" ह्यांचे परस्परांसाठी विकल्प म्हणून वापरले जाणे शक्य असते. अशावेळी ह्यांपैकी कशावरही चित्त एकाग्र झाल्यास, त्या ईप्सित संकल्पनेवरच ते स्थिर झालेले असेल असे नव्हे. अशा एकाग्रतेस सवितर्क एकाग्रता (समापत्ति, समाधी) म्हणतात. अशी एकाग्रता तिन्ही विकल्पांमुळे संकुचित असते.

०४३. स्मृतिपरिशुद्धौ स्वरूपशून्येवार्थमात्रनिर्भासा निर्वितर्का ।
संकेतशब्दामुळे तद्वाच्य जो अर्थ त्याचे ज्ञान चित्तात स्फुरते ते स्मृतीमुळे. सवितर्क समाधीत ही स्मृती वारंवार होत गेल्याने, ते ज्ञान अनायासे आणि ठळकपणे स्फुरू लागते आणि मग तो संकेत, त्याचा अर्थ आणि ज्ञान यांची सांगड दरवेळी नव्याने घालण्याची गरज राहत नाही. ह्यास स्मृतीपरिशुद्धी झाली असे म्हणतात. ह्या अवस्थेत चित्तवृत्ती केवळ अर्थाकार भासते. स्वरूपशून्य आणि केवळ अर्थाकार. ही निर्वितर्क समाधी होय.

०४४. एतयैव सविचारा निर्विचारा च सूक्ष्मविषया व्याख्याता ।
एकाग्रतेकरता स्थूल विषयांऐवजी सूक्ष्म विषय आधार म्हणून निवडल्यास ती एकाग्रता सूक्ष्मविषया असते. एकाग्रता, समापत्ती आणि मग समाधी अशा अवस्था उत्तरोत्तर गाठल्या जातात. ह्या एकाग्रतेचेही सविचार आणि निर्विचार असे दोन प्रकार असतात.

०४५. सूक्ष्मविषयत्वं चालिङ्गपर्यवसानम् ।
चित्ताला एकाग्रता साधण्यासाठी उत्तरोत्तर अधिकाधिक सूक्ष्म विषय दिले जातात. ह्या सूक्ष्म विषयत्वाचे परिणती अलिंग म्हणजे प्रधान तत्त्वात होते. आनंद-अस्मिता-महत्तत्त्व आणि प्रकृती म्हणजे अलिंग असे उत्तरोत्तर सूक्ष्म विषय असतात.

०४६. ता एव सबीजः समाधिः ।
ज्या समाधीत संसाराचे वासनारूपी बीज नष्ट झालेले नसते आणि म्हणून पुन्हा संसार प्राप्त होऊ शकतो त्याला सबीज समाधी म्हणायचे. मागील सूत्रात प्रकृतीपर्यंत जे सूक्ष्म विषय सांगितले त्या आधारे होणार्या सर्व समापत्ती सबीज होत.

०४७. निर्विचारवैशारद्येऽध्यात्मप्रसादः ।
वैशारद्य म्हणजे पक्वावस्था. निर्विचार समाधीत वैशारद्य प्राप्त झाले असता अनात्म वासनांना कारण असलेले रज, तमादी मल ह्यांचा नाश झाल्याने चित्त आत्मसाक्षात्कारास सिद्ध होते.

०४८. ऋतंभरा तत्र प्रज्ञा ।
निर्विचार समाधीतील विशारद अवस्थेत योग्याची प्रज्ञा ऋतंभरा होते. म्हणजे कसल्याही विपर्यययाचा संपर्क न लागता वस्तूमात्राचे ज्ञान पूर्णत्त्वाने आणि यथार्थपणे ग्रहण करणारी अशी होते.

०४९. श्रुतानुमानप्रज्ञाभ्याम् अन्यविषया विशेषार्थत्वात् ।
श्रुत म्हणजे आगम, वेद. वेदांच्या शब्दापासून जे ज्ञान होते ती श्रुतप्रज्ञा. अनुमानप्रमाणाने जे ज्ञान होते ती अनुमानप्रज्ञा. दोन्ही प्रज्ञांमुळे होणार्‍या सामान्य ज्ञानापेक्षा ऋतंभरा प्रज्ञेचा विषय खास असतो. तिच्यामुळे वस्तूमात्रासंबंधीच्या विशेषार्थाचे ग्रहण होते.

०५०. तज्जः संस्कारो न्यसंस्कारप्रतिबन्धी ।
ह्या ऋतंभरा प्रज्ञेचा संस्कार इतर संस्कारांना प्रतिबंध करणारा असतो.

०५१. तस्यापि निरोधे सर्वनिरोधान् निर्बीजः समाधिः ।
ऋतंभरा प्रज्ञेचा संस्कारांचासुद्धा निरोध झाला म्हणजे सर्व वृत्तींचा निरोध झाल्याने निर्बीज समाधी सिद्ध होतो.

॥ इति पतञ्जलि विरचिते योगसूत्रे प्रथमः समाधिपादः ॥

अशाप्रकारे पतंजलींनी रचलेल्या योगसूत्रांचा पहिला समाधीपाद नामक चतकोर संपूर्ण होत आहे.

.