कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२०१३-०९-१२

चला वळून वज्रमूठ, दुष्टवृत्ति दंडु या

अतृप्त ना उरो कुणी, असेच ध्येय साधु या ।
चला वळून वज्रमूठ, दुष्टवृत्ति दंडु या ॥ धृ ॥

कसा, कुठे, कधी, किती, खुला विकार जाहला
मुळी न आब राहिला, मुळी न धाक राहिला
न नीतिधर्म मोडु द्या, न दुष्ट कोणी सोडु द्या ।
चला वळून वज्रमूठ, दुष्टवृत्ति दंडु या ॥ १ ॥

मनांस फूस लावुनी, जनांत पेरिती विषे ।
कळ्यांस पाकळ्या करून, नासवित दुष्ट जे ॥
न पात्र ते दयेसही, तयां न दाखवू दया ।
चला वळून वज्रमूठ, दुष्टवृत्ति दंडु या ॥ २ ॥

प्रसंग पावता तसा, जरूर भासता तया ।
धरून कायदा करी, खला शिकस्त देया ॥  
नवीन कायदा करू, बळेच शिस्त लावु या ।
चला वळून वज्रमूठ, दुष्टवृत्ति दंडु या ॥ ३ ॥

तरूण आजचा कसा, न सत्प्रवृत्त राहिला ।
विकास जाहला कसा, बकाल देश जाहला ॥
तरूण राबता करू, जनांस लावु शिस्त ह्या ॥
चला वळून वज्रमूठ, दुष्टवृत्ति दंडु या ॥ ४ ॥

नरेंद्र गोळे २०१३०९१२
.

२०१२-०३-०७

रंग-अभिसार


२०१०-११-३०

दंतकथा

एक जमाना होता. जेव्हा दात दुखायला लागला की उपटून टाकत. माझे बहुतांशी दात त्याच जमान्यात शहीद झाले. जे उरले, त्यांचे दुखणे नव्या जमान्यातले होते. त्याचे उपचारही नव्या जमान्याच्या इतमामाने झाले. मात्र त्यापूर्वी दात दुखायला लागल्यापासून तर उपटून टाकेपर्यंत अक्षरशः जीवनच दुःखमय होत असे. त्या दिवसातले दुःखनिवारण एक दंतवैद्यच काय तो करू शके. (खरे तर ते काम आजही दंतवैद्यच करत असतो.) मात्र तोही वेळीच मिळेल तर मग दुःख ते कशाला उरेल? तर ही आहे त्याच काळातली कथा. एक सर्वसामान्य दंतकथा!

दंतकथा

दातांचे अवघे दुःख, संपूनी होईल सुख, का कधी? ।
ते घडून, दुःख संपून, आठवण नुसती राहिली ॥ १ ॥

ती सारी दंत कहाणी, शब्दरूप करून पुराणी, राखिली ।
कधी कुणास ऐशी प्रचिती, न येवो म्हणुनी मी ती, सांगतो ॥ २ ॥

दातवर्ण मोतीय झाला, कवळीही मौक्तिकमाला, तरी का नको ।
मऊ सरस सेवने करता, कसूर निगेतही घडता, व्हावे कसे ॥ ३ ॥

रसपूर्ण जेवणे करता, कुचकामी ठरती दाढा, शेवटल्या ।
अन् तसेच काही दांत, वरचेही ठरती बाद, आपोआप ॥ ४ ॥

त्यांवरती चढुनी लेप, रसाचे थेट, कवच पोखरती ।
चहा, फळांचे रस, सार अन् सुपे, दातांच्या भिंती क्षरिती ॥ ५ ॥

माझेही असेच झाले, किडल्या दाढा, अन् दांतही वरचे काही, भंगले ।
प्रतिदिनी चहाची पुटे, चिकट बिस्किटे, चघळून सर्वही दांत, खंगले ॥ ६ ॥

मग दुखता त्यातील एक, कळ उरांत नुरली मूक, करी अस्वस्थ ।
दंतवैद्य बघता सगळे, एकजात मजला कळले, होते व्यस्त ॥ ७ ॥

वेदना घरी मी नेता, निस्तेज म्लान प्रतिबिंब, दाखवी आरसा ।
व्यस्तताच त्यांची ठरते, आरोग्यस्थितीचा, प्रत्ययी आरसा ॥ ८॥

पण ठरली पुढली वेळ, कंठवे न मधला काळ, धरिता धीर ।
मग लवंग, कापूर, मंजन लावून विको, कंठले दिवस ॥ ९ ॥

शेवटास तो दिन आला, दंतवैद्य करता झाला, शल्यचिकित्सा।
अलगद देऊन भूल, घेऊनी शस्त्रे, दाताशी झुंजू निघाला ॥ १० ॥

मजबूत एवढा दांत, कीडीने दैववशात, खुडावा लागे ।
ह्या रंजीस येऊनी माझे, सर्वथैव व्याकुळ झाले, अंतर ॥ ११ ॥

उपटता शर्थीने दांत, कवळीचे सोडुनी नातं, तो ढळला ।
तो निघता तेथून दांत, सर्वही विषाक्त रक्त, ओघळले ॥ १२ ॥

ते साठ उत्तरी दुःख, पाच उत्तरी सरले, शल्यक्रियेने ।
मम कृतज्ञतेची साक्ष, वैद्या मी तुजला देत, स्मरत कौशल्या ॥ १३ ॥

नरेंद्र गोळे २००३
.

२०१०-०६-०३

लिहिली कशाला अनुदिनी?

आजूस नाही मित्र दिसला,
बाजूस ना मैत्रीण दिसे
सर्वकाळी जाल-संजीवित,
हे जीवन असे

माणूस नाही दूरवरही,
ही नोकरी वैरीण असे
रम्य काही आठवावे,
सांगू परी कोणा कसे

आश्चर्य वाटे खूप कधी
लागे कशाचे तरी पिसे
गूज ज्याला ऐकवावे
ऐसा कुणीही ना दिसे

कधी दाटले नैराश्य सारे,
वाट अश्रूस ना मिळे
काढू भडास, होऊ रिते
पण ऐकण्या कुणी ना दिसे

कधी जीवनाने शिकवला
कुठला धडा मज कौतुके
सांगू असे वाटे कुणाला
सांगण्या कुणी ना मिळे

मग उघडली मी अनुदिनी
लिहिण्यास जणू दैनंदिनी
जे वाटले, लिहीले इथे
त्या आज वाचक लाभले
.

२०१०-०१-०१

संकल्पः नव्या युगाचा

झाल्या चुकाही आणि उरल्या जरी उणीवा ।
त्यांचे स्मरून शल्य, निर्दोष कार्य व्हाया ॥
किती मार्ग उन्नतीचे, शिकवून वर्ष मिटले ।
त्यांनी सुपंथ क्रमू या, नवनीत या युगाचा ॥

२०१० हे नवे वर्ष सर्वांस आयुरारोग्यपूर्ण शांती-समाधानाचे,
भरभराटीचे आणि सुखसमृद्धीचे ठरो हीच हार्दिक शुभेच्छा!

२००९-१२-०४

उपसर्ग

उपसर्गानी शब्दाचा अर्थ तो बदलतो पुरा ।
प्रहाराहारविहार संहारापरी तो स्मरा ॥ धृ ॥

'प्रहार' करतो वार, 'आहार' भूक भागवी ।
'विहार' घडवी संचार, 'संहार' नाहीसे करी ॥ १ ॥

कार, कार्य, काज, काम उपसर्गे त्रस्त सर्वही ।
एकेकाची गती पाहू, अर्थ ते बदलती कसे ॥ २ ॥

'सत्कार' करी सन्मान, 'बेकारा' तो न लाभतो ।
'आकार' घडवितो दर्शन, 'प्रकार' वेगवेगळे ॥ ३ ॥

'सत्कार्य' चांगले म्हणती, 'दुष्कार्या' म्हणती वाईट ।
'कार्य' कार्यालयी होते, 'मत्कार्य' माझे असे ॥ ४ ॥

'कामकाज' होत सर्वत्र, 'काजं' गुंडीसवे रत ।
'कृषीकाज' पिकविते अन्न, 'वैश्यकाज' देतघेत ते ॥ ५ ॥

'काम' मोहास कारण हो, 'निष्काम' म्हणुनी असा ।
'नाकाम' स्फोटही होती, 'घरकाम' भासते कठीण ॥ ६ ॥

नरेंद्र गोळे २००६११२३.

२००९-०९-२७

शनिवार दिनांक ३ ऑक्टोंबर २००९ रोजी "कोजागिरी" पौर्णिमा आहे!
.
त्यानिमित्त सर्व दर्शकांना हार्दिक शुभेच्छा!
.

.

२००९-०९-२०

२००९-०८-२९

ते माझे घर

घर कसे असावे याबाबत निरनिराळ्या संकल्पना प्रचलित आहेत.
"पोस्टातील मुलगी" सिनेमात गदिमांनी केलेले वर्णन लक्षात राहण्यायोग्य आहे.
ते आहे असेः

ते माझे घर, ते माझे घर
जगावेगळे असेल सुंदर
असेल सुंदर !

नक्षिदार अति दार तयाचे
शिल्प तयावर बुद्धकलेचे
चक्रे, वेली, मूर्ती मनोहर !

अंगणी कमलाकृति कारंजे
वरी अप्सरा एक विराजे
झरतिल धारा ओलेतीवर !

आकार मोठा, तरिही बैठा
आतुन वेरुळ आणि अजिंठा
वरी लालसर असेल छप्पर !

पागोड्यांची शिखरे वळती
तशी छप्परे छपरावरती
कृष्णकमळिच्या वेली त्यावर !

गीत: ग. दि. माडगूळकर
संगीत: सुधीर फडके
स्वर: आशा भोसले
चित्रपट: पोस्टातली मुलगी (१९५४)
राग: ललत (नादवेध)

ते माझे घर - पोस्टातली मुलगी

त्यावरून मला असा विचार करावासा वाटला की आदर्शवत घर असावे तर ते कसे?
त्यावर सुचलेले विचार खालीलप्रमाणे आहेत.

उरास लाभे ऊर्जा सत्वर, ते माझे घर, ते माझे घर

उरास लाभे ऊर्जा सत्वर, ते माझे घर, ते माझे घर || धृ ||

नगर वसवले औरस-चौरस, उभे-आडवे मार्ग समांतर |
आजूबाजूला जागा सोडून, वस्ती घरांची ओळीत सुंदर |
कृष्णकमलकुंजातून चाले, वाट घराची जिथे मनोहर |
ते माझे घर, ते माझे घर || १ ||

पडवी, ओसरी, पुढेच बैठक, शयनकक्ष हे दोन्ही बाजूस |
मधल्या चौकातून पुढे मग, विहीर असावी, रहाट त्यावर |
पाठीस कोठी, स्वयंपाका घर, जिथे नेतसे जिना छतावर |
ते माझे घर, ते माझे घर || २ ||

भव्य पटांगण घरासमोरी, शस्य चहुकडे, परसदारीही |
दृष्टिसुखास्तव फुले बहरती, रुची राखण्या फळेही पिकती |
जीवनसत्त्वे भरून ज्या घरी, हरित शाक उपजते निरंतर |
ते माझे घर, ते माझे घर || ३ ||

बारा महिने सदा प्रकाशित, वारा वाहे मंद सदोदित |
दिवा न दिवसा, पंखा नसता, मनही प्रफ़ुल्लित राहे, ते घर |
पाऊसकाळी भरत जलाशय, गरजा सार्‍या पुरवी निरंतर |
ते माझे घर, ते माझे घर || ४ ||

घरात एका, एक कुटुंबच, कुटुंब छोटे, परिजन तोषक |
गजबज नसली नसो, तरीपण असोत अतिथी, विद्यार्थीजन |
सदस्य उद्यमी, सदा प्रफ़ुल्लित, करिती जेथे वास निरंतर |
ते माझे घर, ते माझे घर || ५ ||

घरास देती सदस्य घरपण, समाजाशीही घेती जुळवून |
कला-उद्यमे होती विकसित, सोबत उजळती स्नेह्याचे घर |
सारी साकारण्यास स्वप्ने, सारे कष्टती जिथे पुरेपूर |
ते माझे घर, ते माझे घर || ६ ||

गीत: नरेंद्र गोळे २००७१०२२

मात्र, आजकालच्या फ्लॅटसंस्कृतीत असे घर कुठले मिळायला!
म्हणून मग नेहमी आढळणार्‍या घराचाच विचार करता येतो. तो असाः

घर संसार

एक भागता दोन, दोन भागता चार | छोट्या छोट्या गोष्टींतून, विभागला संसार || धृ ||

देश भागता प्रांत, प्रांत भागता शहरे | वस्त्या घडवती शहरे, सुंदर, सुबक, विहार ||
वस्तीचे भाग निवारे, त्यांचे किती प्रकार | निवारे सजवती वस्ती, नीटस टूमदार || १ ||
वस्तीत असती चाळी, बंगले, इमारती अन् | घरे, छप्परे, टपर्‍या, ह्यांचे असंख्य प्रकार ||
घरातही मग खोल्या, न्हाणीघरे, संडास | ह्यांचेविना कुठेही, होई न घर साकार || २ ||
खोलीला प्रवेश एक, दुसरीला त्यातून वाट | खिडकीचा शोभे थाट, थाटांच्या तर्‍हा अपार ||
पल्ले, झडपा, दारे, कुठे सरकत्या काचा | कमान नसो नसली तर, असो चौकट खुबीदार || ३ ||
दारातच दिवाणखाना, छन्नमार्ग हमखास | मार्गी सुविधा सगळ्या, कपडे सुकण्याला तार ||
तेथून दिसे ती गृहिणी, जी राणी घरची खास | साम्राज्य तियेचे सारे, स्वयंपाकघर व्यवहार || ४ ||
ती दाखवी मार्बली ओटा, फिरत्या तोटीसह तस्त | ना भांडे सोडू शिस्त, ह्याची करीत शिकस्त ||
भांड्यांची बंद कपाटे, कप्पेही सरकते त्यास | देवांचे मुख पूर्वेला, त्यांचा मांडणीत विहार || ५ ||
पाण्याचा साठा करण्या, माळ्यावरती टाकी | कलंकहीन पोलादी गाळणीत पिण्याचे पाणी ||
न मावो न्याहरीमेज, न असोत रंगीत पाट | फरश्यांस सुसंगत रंगाचे हवेच शीतकपाट || ६ ||
शेजारीच शयनी कक्ष, त्यालाही सुरेख गवाक्ष | त्या, विशेष वायुवीजन, व्हावे ह्यावरती लक्ष ||
दूरदर्शन इथे प्रतिष्ठित, असे दूरध्वनीही इथेच | रंगसंगतीस इथल्या, पडद्यांनी येई बहार || ७ ||
ह्यापरी जरी हे तुकडे, संसारी दिसत सर्वत्र | एकसंध घर ते घडण्या, ह्यांचीच शक्ती अपार ||
घर, घरा जोडूनी वस्ती, वस्त्यांनी वसते नगर | नगरांचे उद्यम मिळता, समृद्ध होतसे प्रांत || ८ ||
प्रांतांतही जे सूत्र, विविधतेत विणते ऐक्य | ते श्रद्धा, सबूरी आणि सृजनशीलता ह्यात ||
असे हीच संस्कृती अमुची, ह्यांनीच घडतसे देश | हे तुकडे, तुकडे सारे जणू भारतास आधार || ९ ||
एक भागता दोन, दोन भागता चार | छोट्या छोट्या गोष्टींतून, विभागला संसार ||
वस्ती, नगरे, प्रांत हे घडती देशा थोर | छोट्या छोट्या गोष्टींतूनच, सजतो घर संसार || १० ||

गीत: नरेंद्र गोळे २००७१०२०

२००९-०८-२८

जीवित महिमा

असार जीवित, केवळ माया! रडगाणे हे गाऊ नका । घेई झोपा तो नर 'मेला' संशय त्याचा धरू नका ॥ धृ ॥

वस्तुस्थिती ही असार भासे, परि अंतरि बहु सार असे । जाणुनिया हे निज कर्तव्ये मन लावुनिया करा कसे ॥
सुखांत मेलो म्हणजे झाले सार्थक न धरा मनी असे । माती अससी मातीत मिळसी आत्म्याला हे लागु नसे ॥
सुख दुःखाचे भोग भोगणे हा मुळि जीवित हेतु नसे । उद्या आजच्यापेक्षा काही पुढेचि जाऊ करा असे ॥
अपार विद्या काळ अल्प हा झरझर कैसा धावतसे । शूर छातिचे किती असाना हळुहळु मृत्यू गाठितसे ॥
अफाट ऐशा विश्व रणांगणि जीवित युद्धचि चालतसे । त्यात लढोनी बहु धीराने नाव गाजवा शूर असे ॥
मुकी बिचारी कुणी हाका! अशी मेंढरे बनू नका । गेल्या गोष्टी स्मरू नका, गत काळाचा शोक फुका ॥

पुढचा भासो किती सुखाचा काळ भरवसा धरू नका । घेई झोपा तो नर 'मेला' संशय त्याचा धरू नका ॥ १ ॥

जाते घडि ही अपुली साधा, करा काय ते आता करा । चित्तामध्ये धैर्य धरा रे, हरिवरि ठेवा भाव पुरा ॥
थोर महात्मे होऊनी गेले, चरित्र त्यांचे पहा जरा । आपण त्यांच्या समान व्हावे, हाच सापडे बोध खरा ॥
जग हे त्यजिता भव-सागरिच्या वाळवंटिवर तरि जरा । चार पाऊले उमटवु अपुली, ठेवु खुणेचा मार्ग बरा ॥
जीवित-सागर दुस्तर मोठा, त्यातुनि जाण्या पैले तिरा । खटपट करितो, गोते खातो, निराश होऊनि जाय पुरा ॥
अशा नराच्या दृष्टिस पडता, तीच पाऊले जरा जरा । कोणि म्हणावे नाही म्हणुनी? येइल त्याला धीर बरा ॥
उठा उठा तर, निजू नका, होइल कैसे म्हणू नका । कशाहि विघ्ना भिऊ नका, दीर्घोद्योगा सोडु नका ॥

असार जीवित केवळ माया, रडगाणे हे गाउ नका । घेई झोपा तो नर 'मेला' संशय त्याचा धरू नका ॥ २ ॥

मराठी अनुवादः हरी नारायण आपटे

मूळ इंग्रजी कविताः 'साम ऑफ लाईफ' - हेन्री वर्डस्वर्थ लाँगफेलो, मृत्यूः २४ मार्च १८८२

ज्या अनुवादातले चरण, भाषेत वाक्प्रचार बनून राहतात त्या अनुवादाचा दर्जा यात स्पष्टपणे दिसून येतो.
मूळ सुंदर, अर्थपूर्ण कवितेचे हे सुरेख अर्थपूर्ण भाषांतर झालेले आहे.

२००९-०८-०२

चित्रकविता-५

उदकांजली मधुनी |
पानेच अर्घ्य देती ||
पानेच दान घेती |
त्या सरस जीवनाचे ||

ओजस्वी बिंदू बिंदू |
हातात राहती ना ||
अर्घ्यातुनी सुटूनी |
ते मिळवती प्रवाहा ||

ही देवघेव सारी |
दीप्ती सदैव पाहे ||
तो आसमंत सारा |
मग दीप्तीमान राहे ||

प्रकाशचित्रः दीपा लोलयेकर
चित्रकविताः नरेंद्र गोळे २००४०३१९
चित्रकविता-४



लिंबाच्या काट्यांवर अलगद,
विहरत होती जाळी ।
सांखळुनी दवबिंदू,
झाले तोरण रम्य सकाळी ॥

प्रकाशचित्रः उमेश
चित्रकविताः नरेंद्र गोळे २००४०११२
चित्रकविता-३



वर ऊन-पावसाची संधी ।
सप्तरंगी बहर धुंडी ॥
रम्यशा त्या इंद्रधनुला ।
पार्श्वभू नभ-आक्रमांची ॥

प्रकाशचित्रः अनिरुद्ध
चित्रकविताः नरेंद्र गोळे २००४०६०२
चित्रकविता-२



दीपास धुसर, फलक करुनी,
झळकती पाने जरी ।
स्पष्ट काही स्फटिकापरी,
अस्पष्ट काही धुक्यांतरी ॥

प्रकाशचित्रः दीपा लोलयेकर
चित्रकविताः नरेंद्र गोळे २००४०११२
चित्रकविता-१



.दाटू दे नैराश्य काळे,
.मेघ सूर्या झाकू दे |
.काजळी मेघास ही त्या,
.सूर्यकिरणांचे कडे ||

.प्रकाशचित्र: दीपा लोलयेकर
.चित्रकविताः नरेंद्र गोळे २००४०३०६

२००९-०७-२७

गंध वार्‍यावर

गंध वार्‍यावर बूच फुलांचा किती |
पाय होती स्थिर, देती ना मुळी गती ||
चित्त चालतसे वळणांची वाट ती |
स्वैर धावतसे धुंद आठवांत जी ||

२००९-०७-०९

विडंबने-६ 'स्वयंवर झाले सीतेचे' आणि 'विडंबन झाले कवितेचे'

विख्यात कविता आणि त्यांची तेवढीच विख्यात विडंबने यांच्या या मालिकेत,
आता विडंबन कशाला म्हणू नये याचे एक उत्तम उदाहरण पेश करतो आहे.
मूळ कविता गदिमांच्या गीतरामायणामधली आहे.

स्वयंवर झालें सीतेचे

आकाशाशीं जडलें नातें धरणीमातेचें
स्वयंवर झालें सीतेचे ॥ धृ ॥

श्रीरामांनी सहज उचलिले धनू शंकराचें
पूर्ण जाहले जनकनृपाच्या हेतू अंतरींचे
उभे ठाकले भाग्य सांवळे समोर दुहितेचें ॥ १ ॥

मुग्ध जानकी दुरून न्याहळी राम धनुर्धारी
नयनांमाजीं एकवटुनिया निजशक्ती सारी
फुलूं लागलें फूल हळू हळू गालीं लज्जेचें ॥ २ ॥

उंचावुनिया जरा पापण्या पाहत ती राही
तडिताघातापरी भयंकर नाद तोंच होई
श्रीरामांनीं केले तुकडे दोन धनुष्याचे ॥ ३ ॥

अंधारुनिया आले डोळे, बावरले राजे
मुक्त हासतां भूमीकन्या मनोमनीं लाजे
तृप्त जाहले सचिंत लोचन क्षणांत जनकाचे ॥ ४ ॥

हात जोडुनी म्हणे नृपती तो विश्वामित्रासी
"आज जानकी अर्पियली मी दशरथापुत्रासी"
आनंदाने मिटले डोळे तृप्त मैथिलीचे ॥ ५ ॥

पित्राज्ञेने हळू उठे ती, मंत्रमुग्ध बाला
अधिर चाल ती, अधीर तीहुनी हातींची माला
गौरवर्ण ते चरण गांठती मंदिर सौख्याचे ॥ ६ ॥

नीलाकाशी जशी भरावी उषःप्रभा लाल
तसेच भरले रामांगी मधू नूपुरस्वरताल
सभामंडपी मीलन झाले माया-ब्रह्माचे ॥ ७ ॥

झुकले थोडे राम, जानकी घाली वरमाला
गगनामाजी देव करांनी करिती करताला
त्यांच्या कानी गजर पोचले मंगल वाद्यांचे ॥ ८ ॥

अंश विष्णुचा राम, धरेची दुहिता ती सीता
गंधर्वाचे सूर लागले जयगीता गातां
आकाशाशी जडले नाते ऐसे धरणीचे ॥ ९ ॥


गजानन दिगंबर माडगूळकर (गदिमा) अद्वितीय प्रतिभा व शब्दप्रभुत्वाच्या साहाय्याने ‘गीतरामायणा’सारखा दर्जेदार नजराणा महाराष्ट्राला पेश करणारे व आजही मराठी रसिकांच्या मनांत अढळ स्थान असलेले श्रेष्ठ कवी! त्यांच्या गीतरामायणातले हे एक सुप्रसिद्ध गीत आहे.

कवी, गीतकार, पटकथालेखक, कादंबरीकार, गीतरामायणकार अशा विविध स्वरूपात ग. दि. माडगूळकर यांची ओळख मराठी साहित्य क्षेत्रात आहे. घरातील परिस्थिती चांगली नसल्यामुळे त्यांनी सुरुवातीच्या काळात चरितार्थासाठी चित्रपटांच्या कथा - संवाद - गीतलेखनाचे काम केले. त्यातही त्यांची प्रतिभा, सहज सोपे शब्द, भावसंपन्न आणि मराठी मनाला सदैव मोहिनी घालणारी रचना यामुळे ते श्रेष्ठ ठरले. मराठी गीतनिर्मितीच्या क्षेत्रात गदिमांचे स्थान केवळ अजोड आहे. प्राचीन मराठी काव्यातील गीतभांडाराला अर्वाचीन काळात माडगूळकरांनी अधिक समृद्ध केले.

संताच्या काव्यातील आंतरिक गेयगुण, पंडितांच्या काव्यातील नादानुप्रास, शाहिरांच्या काव्यातील स्वाभाविक ठसका, लोकगीतांतील प्राथमिक पण सरळ भिडणारा लयताल, शब्दांवरील असामान्य प्रभुत्व आणि त्याचबरोबर समृद्ध आशयघनता यांच्या विलक्षण संमिश्रणातून माडगूळकरांची गीते निर्माण झाली. अध्यात्म, देशभक्ती, बालकविता, शृंगार हे सर्व विषय त्यांनी अतिशय सहजतेने हाताळले.

आरंभी ते वि. स. खांडेकर यांचे लेखनिक म्हणून काम करत होते. त्यांचे हस्ताक्षर खूप छान होते. तिथेच असताना त्यांना वाचनाची, लेखनाची गोडी लागली. पुढे त्यांची स्वत:ची सुगंधी-वीणा (१९४९), जोगिया (१९५९), चार संगीतिका (१९५६), गीतरामायण (१९५७), काव्यकथा (१९६२), चैत्रबन (चित्रपटगीते) (१९६२), गीतगोपाल (१९६७), गीतसौभद्र (१९६ ८)-अशी काव्यनिर्मिती झाली. ‘वैशाखी’ या नावाचा त्यांनी लिहिलेल्या चित्रपटगीतांचा संग्रह प्रसिद्ध आहे. याशिवाय कथा, कादंबरी, आत्मचरित्र या वाङ्मय प्रकारांतही त्यांनी लेखन केले. त्यांनी सुमारे १५ लघुकथा लिहिल्या; आकाशाची फळे, उभे आडवे धागे या कादंबऱ्या व युद्धाच्या सावल्या हे नाटक - इत्यादी स्वरूपाचे लेखनही त्यांनी केले. गदिमांनी सुमारे १४५ मराठी चित्रपटांची गीते लिहिली, ८० पटकथा, ४४ मराठी चित्रपटांच्या कथा व ७६ चित्रपटांचे संवादलेखन त्यांनी केले. तसेच २३ हिंदी पटकथा, १० हिंदी चित्रपट कथा, ५ हिंदी चित्रपटांचे संवाद - यांचेही लेखन त्यांनी केले. त्यांनी सुमारे २५ (२४ मराठी व १ हिंदी) चित्रपटांत अभिनयही केला.

चित्रपटातील पात्रांच्या भावनांनुसार, कथाविषयाला खुलावट आणणारी चित्रपटगीते लिहिण्यात ते सिद्धहस्त होते. गेयता, नादमाधुर्य, लयकारी आणि मराठी भाषेतील गोडवा ही त्यांच्या गीतांची वैशिष्ट्ये. उद्धवा अजब तुझे सरकार, विठ्ठला तू वेडा कुंभार, एक धागा सुखाचा शंभर धागे दु:खाचे, बाई मी विकत घेतला शाम यांसारख्या अनेक गीतांमधून साध्या सोप्या भाषेत ते मोठे तत्त्वज्ञान सांगून जातात. स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांच्या लेखणीने लोकांमध्ये प्रेरणा निर्माण केली होती. १९४२ च्या आंदोलनात, सातारा-सांगली भागात प्रतिसरकारचा प्रचार करण्यासाठी त्यांनी पोवड्यांची निर्मिती केली होती.

गीतरामायण ही गदिमांनी संपूर्ण महाराष्ट्राला दिलेली एक साहित्यिक देणगीच म्हणावी लागेल. त्यांच्या गीतरामायणाने व त्याला दिलेल्या बाबूजींच्या (ज्येष्ठ गायक व संगीतकार सुधीर फडके) संगीताने उभ्या महाराष्ट्राला वेड लावले होते. गीतरामायणाचे शेकडो प्रयोग झाले. मराठी रसिकांनी गदिमांना प्रेमादरपूर्वक महाराष्ट्राचे 'आधुनिक वाल्मिकी' अशी पदवी बहाल केली. यातूनच त्यांच्या सिकप्रियतेची खात्री पटते. गीतरामायणाचे पुढील काळात हिंदी, बंगाली, तेलगू व कानडी या भाषांत भाषांतरही झाले.

गदिमांना भारत सरकारने पद्मश्री (१९६९) हा किताब बहाल केला. ते संगीत नाटक अकादमी व विष्णुदास भावे गौरवपदक या पुरस्कारांचे मानकरी ठरले.

१९६२ ते १९७४ अशी सुमारे १२ वर्षे ते महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्यही होते. १९७३ साली यवतमाळ येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. हे आणि असे अनेक पुरस्कार त्यांना लाभले तरी जनमानसहृदयात ते गीतकार व गीतरामायणकार म्हणूनच जास्त प्रसिद्ध झाले.

श्रेयअव्हेर: वरील गदिमांची ओळख मनसेच्या संकेतस्थळावरून साभार घेतलेली आहे.

विडंबन झाले कवितेचे हे त्याचे विडंबन खोडसाळ यांनी खालीलप्रमाणे सादर केले. मनोगतावर स्वतंत्र कविता म्हणून, तर त्यांच्या 'तेंडूची पाने' या अनुदिनीवर कविता आणि विडंबन या दोन्हीही सदरांत.
ते काव्य असे आहे.

विडंबन झाले कवितेचे
प्रेषक खोडसाळ (मंगळ., १२/०८/२००८ - १६:५१)


साहित्याशी जडले नाते बोरूघाशाचे
विडंबन झाले कवितेचे ॥धृ॥

कविराजांनी धनू उचलिले गझल-रुबायांचे
पूर्ण जाहले विडंबकाच्या हेतू अंतरीचे
उडू लागले शब्दकावळे छचोर काव्याचे ॥१॥

वक्र टाळकी कसून वाचती काव्य अर्थवाही
नयनांमाजी एकवटुनिया काकदृष्टी पाही
फुलू लागले फूल हळू हळू निजल्या मज्जेचे ॥२॥

सोकावुनिया जरी विडंबन पाडत तो राही
तडिताघातापरी भयंकर वाद तोंच होई
कविराजांच्या तक्रारीचे, बोल कोपल्याचे ॥३॥

अंगारुनिया आले डोळे, चरफडले राजे
मुक्त हासऱ्या प्रतिसादांचे बघून सडे ताजे
पडू लागले तृतीय लोचन अमुच्यावर त्यांचे ॥४॥

हात जोडुनी म्हणे विडंबक तो कविराजासी
"आज विडंबन अर्पियले मी अपुल्या चरणासी"
संतापाने मिटले डोळे क्रुद्ध का कवीचे? ॥५॥

देवाज्ञेने स्फुरे अम्हाला रोज शब्दक्रीडा
अधिर लेखणी, अधिर तीहुनी डोक्यातिल कीडा
अर्थहीन हे चरण लावती लेबल पद्याचे ॥६॥

काव्याकाशी कशी भरावी उषःप्रभा लाल
उगी राहिलो वामांगी शब्देविण कंगाल
कवन रचुनिया धनी जाहलो शरसंधानाचे ॥७॥

नाही उरला राम, चालले ते वनवासाला
कविराजांच्या हात घालसी का कासोट्याला
त्यांच्या वर्मी घाव बैसले खो खो हास्याचे ॥८॥

खोडसाळ सांगाल अम्हाला का कविता लिहिता?
कविराजांचे सूर हरवले विडंबने बघता
साहित्याशी कसले नाते तुमचे डोंबलाचे? ॥९॥

खोडसाळांनी त्यांच्या ’तेंडूची पाने’ या अनुदिनीस लिहीलेली प्रस्तावना हाच त्यांचा सर्वद्न्यात खराखुरा परिचय आहे. "मनोगत ह्या मराठी भाषेला वाहिलेल्या (बहुधा) सर्वोत्कृष्ट संकेतस्थळावर अनेक प्रतिभावान हौशी कवी आपल्या रचना सादर करतात. त्या वाचून आपल्याला असे काही लिहिता येत नाही याचा मला खूप राग यायचा. सांगू नका कोणाला, पण माझी अवस्था ते काय असूयाग्रस्त की मत्सरग्रस्त म्हणतात ना तशी व्हायची. मग ठरवलं - नाही ना आपल्याला असे काही छान छान, नवनवीन कल्पनांनी नटलेले, साहित्यिक मूल्यांनी ओतप्रोत, इ. इ. लिहायला जमत, मग ठीक आहे. जे लिहितात त्यांची विडंबनात्मक टर उडवायची. कोल्ह्याला द्राक्षं आंबट, दुसरं काय. परत विडंबन करणे तुलनेने बरेच सोपे, खासकरून छंदबद्ध कविता वा गजलांचे. तयार जमीन, तयार यमकें, रेडीमेड कवाफी. आपण फक्त ओळी जराशा उलटसुलट केल्या की झाले विडंबन तयार. वाचणाऱ्यांनाही गंभीर रचनांचे अर्थ लावत बसण्यापेक्षा 'हसा आणि विसरून जा' छाप विडंबने वाचणे सोयीस्कर वाटते. त्यामुळे आमच्यासारख्यांची चलती असते. कोणी नाक मुरडलेच तर कानाच्या पाळ्या धरून आचार्य अत्र्यांच्या ' झेंडुची फुले' चा वारसा सांगावा. वर अत्यंत आदराने (नाटकं करायला आपलं काय जातय) ' क्व सूर्यप्रभवो वंश: क्व चाल्प विषयामती: ' वगैरे वाक्यं टाकावी. एकाच वेळी आपला विनम्रपणा आणि सु'संस्कृत'पणा दाखवण्याची संधी का सोडा? (संस्कृतातील ओ की ठो काही येत नसले तरी गाठीशी अशी दोन-चार वाक्य पाठ करून ठेवली आहेत मी. भाव मारण्याच्या कामी येतात. ) अशी काही विडंबने इथे देण्याचा मानस आहे. खरे तर 'टाकणार आहे' लिहिणार होतो पण 'देण्याचा मानस आहे' कसे भारदस्त वाटते, नाही? मूळ रचनांचा दुवाही देईन. विडंबन आवडो न आवडो, वाचकहो, त्या मूळ रचना जरूर वाचा ही मात्र खोडसाळाची कळकळीची विनंती आहे. त्या प्रतिभावंतांची थट्टा करण्याच्या माझ्या पापाचे यामुळे थोडे तरी परिमार्जन होईल."

खोडसाळ हे मनोगतावरील एक अत्यंत प्रथितयश प्रतिभावान आहेत. त्यांच्या विडंबनांची मोहिनी पडलेले असंख्य लोकच त्यांच्या प्रतिभेची खरीखुरी कल्पना देऊ शकतील.

मात्र या विडंबनात त्यांनी मूळ काव्यविषयाचे विडंबन केलेलेच नाही. तर केवळ प्रसिद्ध चालीचा, आकृतीबंधाचा, नवविडंबकांच्या आवडत्या वस्तूवर हल्ला बोलण्याच्या वृत्तीचे विडंबन करण्यासाठी, उत्तम उपयोग करून घेतलेला दिसून येतो. वरील दुव्यावरही त्यांनी हे काव्य स्वतंत्र कविता म्हणूनच दिलेली होती. प्रतिसादकांनी मात्र त्याचे विडंबन म्हणूनच कौतुक केलेले दिसून येते.

दोन्हीही काव्ये सुंदर आहेत. 'विडंबन झाले कवितेचे' हे मूळ 'स्वयंवर झाले सीतेचे' या गीताचे कुठल्याच निकषाने विडंबन ठरत नाही. तथाकथित विडंबनात मूळ गीताच्या चालीव्यतिरिक्त कोणतेही साम्य वा संबंध दिसून येत नाही. मात्र हे "नवविडंबकांच्या आवडत्या वस्तूवर हल्ला बोलण्याच्या वृत्तीचे विडंबन" आहे यात कसलाही संशय नाही.

म्हणून विडंबन कशाला म्हणू नये याचे मात्र हे एक चांगले उदाहरण ठरले आहे.
विडंबनातील 'विरामचिन्हे'

मानावा समरा जनास समरा, ताराप ताराप गा

सोडीला जव हा विडंबन लिहायाचाच संकल्प मी
वाटे मी 'इथले', विडंबन लिहाया का न घेऊ नये?
'टीकाराम' व 'खोडसाळ' प्रभृती, 'माफी'परी ते कवी
देऊ 'स्वल्पविराम' काय, मग मी माझे लिहू नाव की

कैसे ते करती विडंबन, मलाही साध्य का ते नसे?
सारेची कवि कारकून अन् चक्रपाणिंपरी होत ना!
त्यांच्या छान विडंबनांसम न का, ते काव्य माझे असे?
ऐसी ओघळती 'प्रश्नचिन्ह'परी शल्येच माझे मनी!

छापावे 'उपनाव' ठेउन पुढे, की काव्यभारे तसे
'तो', 'मी', 'ना' म्हणुनी जगास, झटकू का मी नये हातही?
वाव्वा! छान!! प्रशंसना महिवरी घेऊन ये स्वर्गही
येतो 'अर्धविराम' खास, गमते की 'नाव' हो मोकळे

भासे काव्यसृष्टी मनास जव सैलावलेली पुरी !
वाटे काव्य घडून, घट्ट करू का, त्या सृष्टीला मी तरी !
ज्ञाते सर्व मनोगती, खरच का, स्वीकारती ते तदा !
त्यांना ही रुचतील का कधितरी 'उद्गारचिन्हांकिते' ?

भाषेचे सगळेच ग्रंथ बरवे, पोथ्या तशा वाचुनी
ना ती साधतसे सुरेख रचना, ट ला ट ही ना जुळे
काव्याचा तळ गाठला गहन मी रांधून सारे असे
देवा 'पूर्णविराम' त्या विडंबनास, देशी न का सत्वरे

मनोगतावर ही विख्यात विडंबनांवर आधारित मालिका जेव्हा मी लिहीत होतो. तेव्हा एक प्रश्नावली प्रत्येक विडंबनासोबत देत असे. त्याच्या उत्तरात विश्वमोहिनी यांनी एक सुरेख कविता लिहीली होती. मात्र ती वृत्तात बसत नव्हती. मी तिला वृत्तात बसवण्याचा प्रयास केला आणि मग ती वरीलमाणे दिसू लागली.

मूळ विडंबन रचना: विश्वमोहिनी
वृत्तबंधनप्रयास: नरेंद्र गोळे
विडंबने-५ 'माझे जीवन गाणे' आणि 'माझे जीवन खाणे'
माझे जीवन गाणे
- मंगेश पाडगावकर


माझे जीवन गाणे, गाणे || धृ ||
व्यथा असो, आनंद असू दे |
प्रकाश किंवा तिमिर असू दे ||
वाट दिसो, अथवा ना दिसू दे |
गात पुढे मज जाणे || १ ||

कधी ऐकतो गीत झर्‍यांतुन |
वंशवनाच्या कधी मनांतुन ||
कधि वार्‍यांतुन, कधि तार्‍यांतुन |
झुळझुळताती तराणे || २ ||

तो लीलाघन स्तय चिरंतन |
फुलापरी उमले गीतांतुन ||
स्वरास्वरांतुन आनंदाचे |
नित्य नवे नजराणे || ३ ||

गा विहगांनो माझ्यासंगे |
स्वरांवरि हा जीव तरंगे ||
तुमच्यापरि माझ्याहि स्वरांतुन |
उसळे प्रेम दिवाणे || ४ ||

मंगेश पाडगावकर यांचा परिचय विडंबने-२ मध्ये दिलेलाच आहे. त्यांचे हे गीत वसंतराव देशपांडे ह्यांनी गायलेले आहे. आणि खूपच विख्यात आहे. तुम्हीही नक्कीच ऐकलेले असेल.

माझे जीवन खाणे (माझे जीवन गाणे चे विडंबन)
- प्रभाकर बोकील, मुंबई


माझे जीवन खाणे, खाणे || धृ ||

पथ्य असो, उपवास असू दे |
प्रकार इतुके, फिकिर नसू दे ||
वाट असो, वा ताठ 'उभ्याने' |
खात निरंतर रहाणे || १ ||

कधी झोडतो, पंचपक्वान्ने |
दंश जिभेला, कधी ठेच्यातून ||
कधी भज्यांतून, कधी वड्यांतून |
विरघळतात 'बहाणे'! || २ ||

खा, जन खा हो, माझ्यासंगे |
जिव्हेवरी हा, जीव तरंगे ||
तुमच्या मुखी, रसस्वादसुखाचे |
उसळो खाद्य-तराणे || ३ ||

लोकसत्ता हास्यरंग पुरवणी-नोव्हेंबर २००३ च्या अंकात, विडंबन काव्य स्पर्धेच्या अंतर्गत हे विडंबन प्रसिद्ध झाले होते. लेखकांविषयी चार शब्द लिहावेत एवढी मला त्यांचेविषयी माहिती नाही. मात्र त्यांच्या विडंबनाचा आनंद मी मनसोक्त आस्वादिला आहे. धन्यवाद प्रभाकरजी!
विडंबने-४ 'रांगोळी घालतांना पाहून' आणि 'रांगोळी घातलेली पाहून'
रांगोळी घालतांना पाहून
- कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसुत


होते अंगण गोमये सकलही संमार्जिले सुंदर,
बालार्के अपुली प्रभा वितरली नेत्रोत्सवा त्यावर;
तीची जी भगिनी अशी शुभमुखी दारी अहा पातली;
रांगोळी मग त्या स्थळी निजकरे घालावया लागली.

आधी ते लिहिले तिने रविशशी, नक्षत्रमाला तदा,
मध्ये स्वस्तिक रेखिले मग तिने आरेखिले गोष्पदा;
पद्मे, बिल्वदले, फुले, तुळसही, चक्रादिके आयुधे,
देवांची लिहिली न ते वगळिले जे चिन्ह लोकी सुधे.

होती मंजुळ गीत गात वदनी अस्पष्ट काही तरी,
गेला दाटुनी शांत तो रस अहा तेणे मदभ्यंतरी;
तीर्थे, देव, सती, मुनी, नरपती, देवी तशा पावना,
अंतर्दृष्टिपुढूनिया सरकल्या, संतोष झाला मना!

चित्रे मी अवलोकिली रुचिर जी, काव्ये तशी चांगली,
त्यांही देखिल न स्मरेच इतुकी मद्वृत्ति आनंदली;
लीलेने स्वकरे परंतु चतुरे! तू काढिल्या आकृती,
त्या या पाहुनि रंगली अतिशये आहे मदीया मति.

रांगोळीत तुझ्या विशेष गुण जो आर्ये! मला वाटतो,
स्पष्टत्वे इतुक्या अशक्य मिळणे काव्यात, चित्रात तो;
स्वर्भूसंग असा तयात इतुक्या अल्पावकाशी नसे
कोणी दाखविला अजून सुभगे! जो साधिला तू असे.

आदित्यादिक आकृती सुचविती दिव्यत्व ते उज्ज्वल,
तैसे स्वस्तिक सूचवी सफलता धर्मार्थकामांतिल;
पावित्र्याप्रत गोष्पदे, तुळसही, शोभेस ही सारसे,
पुष्पे प्रीतिस, चक्र हे सुचविते द्वारी हरी या असे!

तत्त्वे मंगल सर्वही विहरती स्वर्गी तुझ्या या अये!
आर्ये! तू उपचारिकाच गमसी देवी तयांची स्वये.
नाते, स्नेह, निदान ओळख जरी येथे मला आणिती,
होतो मी तर पाद सेवुनी तुझे रम्य स्थळी या कृती!

चित्ती किल्मिष ज्याचिया वसतसे ऐशा जनालागुनी
या चिन्हांतुनि हा निषेध निघतो आहे गमे मन्मनी-
"जा मागे अपुल्या, न दृष्टि कर या द्वाराकडे वाकडी,
पापेच्छूवरि हे सुदर्शन पहा आणिल की साकडी!"

"आहे निर्मल काय अन्तर तुझे? मांगल्य की जाणसी?
लोभक्षोभजये उदात्त हृदयी व्हायास का इच्छिसी?
ये येथे तर, या शुभाकृति मनी घे साच अभ्यासुनी."
आर्ये स्वागत हे निघे सरळ या त्वल्लेखनापासुनी.

साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे,
नित्याच्या अवलोकने जन परी होती पहा आंधळे!
रांगोळी बघुनी इत:पर तरी होणे तयी शाहणे,
कोठे स्वर्गसमक्षता प्रकटते ते नेहमी पाहणे!

१८ डिसेंबर, १८९६
करमणूक, २६-१२-९६
का. रत्नावली, फे., १९०१

कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसुत यांचा परिचय विडंबने-१ मध्ये दिलेलाच आहे. ही कविता त्यांच्या 'हरपले श्रेय' ह्या कवितासंग्रहातून घेतलेली आहे.

रांगोळी घातलेली पाहून ('रांगोळी घालतांना पाहून'चे विडंबन)
- राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रज


"साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे;
नित्याच्या अवलोकने परि किती होती जगी आंधळे!
रांगोळी बघुनी इत:पर तरी होणे तयी शाहणे,"
रांगोळी बघुनीच केशवसुता हे आठवे बोलणे.

रांगोळीत तुझ्या विशेष गुण जो आर्या! मला वाटतो,
स्पष्टत्वे इतुक्या अशक्य कथणे वाटे तुला काय तो?
जो तूते वदवे न अर्थ मनिचा तोंडात आला तरी,
तो मी बोलुनि दाखवीन अगदी साध्याच शब्दी परी.

चैत्री आंगण गोमये सकलही संमार्जिले सुंदर,
रांगोळीहि कुणी तिथे निजकरी ती घातली त्यावर.
ज्यां आमंत्रण त्या घरी मुळि नसे ऐशा स्त्रियांलागुनी
त्या चिन्हांतुनि हा विशेष निघतो आहे गमे मन्मनी-

या या! आज असे सुरेख हळदीकुंकू पहा या स्थली
बत्तासे बहु खोबरे हरभरे खैरात ही चालली!
ठावे कोण न जात येत- दिधले कोणास आमंत्रण;
नाही दाद घरात ही मुळि कुणा; दे धीर हे लक्षण.

संधी टाकुनि छान फौज तुमची कोठे पुढे चालली?
बायांनो! अगदी खुबी विसरता तैलंगवृत्तीतली !
नाते, स्नेह, निदान ओळख तुम्हा येथे न आणी तरी,
या; आमंत्रण राहुं द्या; परि शिरा सार्‍याजणी या घरी!

लाभे ते फुकटातलेच हळदीकुंकू तुम्हाला जरी,
होई काय नफा अचानक तयामाजी न कित्तीतरी?
ही आगंतुकवृत्ति आपण जरी धिक्कारिली यापरी,
प्राप्ती चार घरे उगीच फिरुनी होईल का हो तरी?

चाले काय असे उगीच भिऊनी? तुम्हीच सांगा खरे!
या डोळा चुकवून नीट; डरतां आता कशाला बरे?
कोणाच्या नजरेत येइल तरी होणे असे काहि का?
केला का खटला कुणावर कुणी ऐसा अजुनी फुका!

बायांनो! तर या, नकाच दवडू संधी अशी हातची,
जा जे काही मिळेल तेच भरल्या रस्त्यातुनी खातची!
कामे ही असली हितावह कधी होतील का लाजुनी?
या-या-या तर धावुनी; त्यजु नका रीती पुराणी जुनी!

कोणाच्या घरचे असेल हळदीकुंकू कधी नेमके
ज्या बायांस नसेल हे चुकुनिया केव्हा तरी ठाउके,
रांगोळी बघुनी इत:पर तरी होणे तयी शाहणे,
कोठे चालत काय काय अगदी हे नेहमी पाहणे!

राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रज ह्यांचा परिचय विडंबने-३ मध्ये करून दिलेलाच आहे. हे विडंबन त्यांच्या 'संपूर्ण वाग्वैजयंती' ह्या काव्यसंग्रहातून घेतलेले आहे.