२००९-०७-०९

विडंबनातील 'विरामचिन्हे'

मानावा समरा जनास समरा, ताराप ताराप गा

सोडीला जव हा विडंबन लिहायाचाच संकल्प मी
वाटे मी 'इथले', विडंबन लिहाया का न घेऊ नये?
'टीकाराम' व 'खोडसाळ' प्रभृती, 'माफी'परी ते कवी
देऊ 'स्वल्पविराम' काय, मग मी माझे लिहू नाव की

कैसे ते करती विडंबन, मलाही साध्य का ते नसे?
सारेची कवि कारकून अन् चक्रपाणिंपरी होत ना!
त्यांच्या छान विडंबनांसम न का, ते काव्य माझे असे?
ऐसी ओघळती 'प्रश्नचिन्ह'परी शल्येच माझे मनी!

छापावे 'उपनाव' ठेउन पुढे, की काव्यभारे तसे
'तो', 'मी', 'ना' म्हणुनी जगास, झटकू का मी नये हातही?
वाव्वा! छान!! प्रशंसना महिवरी घेऊन ये स्वर्गही
येतो 'अर्धविराम' खास, गमते की 'नाव' हो मोकळे

भासे काव्यसृष्टी मनास जव सैलावलेली पुरी !
वाटे काव्य घडून, घट्ट करू का, त्या सृष्टीला मी तरी !
ज्ञाते सर्व मनोगती, खरच का, स्वीकारती ते तदा !
त्यांना ही रुचतील का कधितरी 'उद्गारचिन्हांकिते' ?

भाषेचे सगळेच ग्रंथ बरवे, पोथ्या तशा वाचुनी
ना ती साधतसे सुरेख रचना, ट ला ट ही ना जुळे
काव्याचा तळ गाठला गहन मी रांधून सारे असे
देवा 'पूर्णविराम' त्या विडंबनास, देशी न का सत्वरे

मनोगतावर ही विख्यात विडंबनांवर आधारित मालिका जेव्हा मी लिहीत होतो. तेव्हा एक प्रश्नावली प्रत्येक विडंबनासोबत देत असे. त्याच्या उत्तरात विश्वमोहिनी यांनी एक सुरेख कविता लिहीली होती. मात्र ती वृत्तात बसत नव्हती. मी तिला वृत्तात बसवण्याचा प्रयास केला आणि मग ती वरीलमाणे दिसू लागली.

मूळ विडंबन रचना: विश्वमोहिनी
वृत्तबंधनप्रयास: नरेंद्र गोळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: