२००९-०७-०९

विडंबने-६ 'स्वयंवर झाले सीतेचे' आणि 'विडंबन झाले कवितेचे'

विख्यात कविता आणि त्यांची तेवढीच विख्यात विडंबने यांच्या या मालिकेत,
आता विडंबन कशाला म्हणू नये याचे एक उत्तम उदाहरण पेश करतो आहे.
मूळ कविता गदिमांच्या गीतरामायणामधली आहे.

स्वयंवर झालें सीतेचे

आकाशाशीं जडलें नातें धरणीमातेचें
स्वयंवर झालें सीतेचे ॥ धृ ॥

श्रीरामांनी सहज उचलिले धनू शंकराचें
पूर्ण जाहले जनकनृपाच्या हेतू अंतरींचे
उभे ठाकले भाग्य सांवळे समोर दुहितेचें ॥ १ ॥

मुग्ध जानकी दुरून न्याहळी राम धनुर्धारी
नयनांमाजीं एकवटुनिया निजशक्ती सारी
फुलूं लागलें फूल हळू हळू गालीं लज्जेचें ॥ २ ॥

उंचावुनिया जरा पापण्या पाहत ती राही
तडिताघातापरी भयंकर नाद तोंच होई
श्रीरामांनीं केले तुकडे दोन धनुष्याचे ॥ ३ ॥

अंधारुनिया आले डोळे, बावरले राजे
मुक्त हासतां भूमीकन्या मनोमनीं लाजे
तृप्त जाहले सचिंत लोचन क्षणांत जनकाचे ॥ ४ ॥

हात जोडुनी म्हणे नृपती तो विश्वामित्रासी
"आज जानकी अर्पियली मी दशरथापुत्रासी"
आनंदाने मिटले डोळे तृप्त मैथिलीचे ॥ ५ ॥

पित्राज्ञेने हळू उठे ती, मंत्रमुग्ध बाला
अधिर चाल ती, अधीर तीहुनी हातींची माला
गौरवर्ण ते चरण गांठती मंदिर सौख्याचे ॥ ६ ॥

नीलाकाशी जशी भरावी उषःप्रभा लाल
तसेच भरले रामांगी मधू नूपुरस्वरताल
सभामंडपी मीलन झाले माया-ब्रह्माचे ॥ ७ ॥

झुकले थोडे राम, जानकी घाली वरमाला
गगनामाजी देव करांनी करिती करताला
त्यांच्या कानी गजर पोचले मंगल वाद्यांचे ॥ ८ ॥

अंश विष्णुचा राम, धरेची दुहिता ती सीता
गंधर्वाचे सूर लागले जयगीता गातां
आकाशाशी जडले नाते ऐसे धरणीचे ॥ ९ ॥


गजानन दिगंबर माडगूळकर (गदिमा) अद्वितीय प्रतिभा व शब्दप्रभुत्वाच्या साहाय्याने ‘गीतरामायणा’सारखा दर्जेदार नजराणा महाराष्ट्राला पेश करणारे व आजही मराठी रसिकांच्या मनांत अढळ स्थान असलेले श्रेष्ठ कवी! त्यांच्या गीतरामायणातले हे एक सुप्रसिद्ध गीत आहे.

कवी, गीतकार, पटकथालेखक, कादंबरीकार, गीतरामायणकार अशा विविध स्वरूपात ग. दि. माडगूळकर यांची ओळख मराठी साहित्य क्षेत्रात आहे. घरातील परिस्थिती चांगली नसल्यामुळे त्यांनी सुरुवातीच्या काळात चरितार्थासाठी चित्रपटांच्या कथा - संवाद - गीतलेखनाचे काम केले. त्यातही त्यांची प्रतिभा, सहज सोपे शब्द, भावसंपन्न आणि मराठी मनाला सदैव मोहिनी घालणारी रचना यामुळे ते श्रेष्ठ ठरले. मराठी गीतनिर्मितीच्या क्षेत्रात गदिमांचे स्थान केवळ अजोड आहे. प्राचीन मराठी काव्यातील गीतभांडाराला अर्वाचीन काळात माडगूळकरांनी अधिक समृद्ध केले.

संताच्या काव्यातील आंतरिक गेयगुण, पंडितांच्या काव्यातील नादानुप्रास, शाहिरांच्या काव्यातील स्वाभाविक ठसका, लोकगीतांतील प्राथमिक पण सरळ भिडणारा लयताल, शब्दांवरील असामान्य प्रभुत्व आणि त्याचबरोबर समृद्ध आशयघनता यांच्या विलक्षण संमिश्रणातून माडगूळकरांची गीते निर्माण झाली. अध्यात्म, देशभक्ती, बालकविता, शृंगार हे सर्व विषय त्यांनी अतिशय सहजतेने हाताळले.

आरंभी ते वि. स. खांडेकर यांचे लेखनिक म्हणून काम करत होते. त्यांचे हस्ताक्षर खूप छान होते. तिथेच असताना त्यांना वाचनाची, लेखनाची गोडी लागली. पुढे त्यांची स्वत:ची सुगंधी-वीणा (१९४९), जोगिया (१९५९), चार संगीतिका (१९५६), गीतरामायण (१९५७), काव्यकथा (१९६२), चैत्रबन (चित्रपटगीते) (१९६२), गीतगोपाल (१९६७), गीतसौभद्र (१९६ ८)-अशी काव्यनिर्मिती झाली. ‘वैशाखी’ या नावाचा त्यांनी लिहिलेल्या चित्रपटगीतांचा संग्रह प्रसिद्ध आहे. याशिवाय कथा, कादंबरी, आत्मचरित्र या वाङ्मय प्रकारांतही त्यांनी लेखन केले. त्यांनी सुमारे १५ लघुकथा लिहिल्या; आकाशाची फळे, उभे आडवे धागे या कादंबऱ्या व युद्धाच्या सावल्या हे नाटक - इत्यादी स्वरूपाचे लेखनही त्यांनी केले. गदिमांनी सुमारे १४५ मराठी चित्रपटांची गीते लिहिली, ८० पटकथा, ४४ मराठी चित्रपटांच्या कथा व ७६ चित्रपटांचे संवादलेखन त्यांनी केले. तसेच २३ हिंदी पटकथा, १० हिंदी चित्रपट कथा, ५ हिंदी चित्रपटांचे संवाद - यांचेही लेखन त्यांनी केले. त्यांनी सुमारे २५ (२४ मराठी व १ हिंदी) चित्रपटांत अभिनयही केला.

चित्रपटातील पात्रांच्या भावनांनुसार, कथाविषयाला खुलावट आणणारी चित्रपटगीते लिहिण्यात ते सिद्धहस्त होते. गेयता, नादमाधुर्य, लयकारी आणि मराठी भाषेतील गोडवा ही त्यांच्या गीतांची वैशिष्ट्ये. उद्धवा अजब तुझे सरकार, विठ्ठला तू वेडा कुंभार, एक धागा सुखाचा शंभर धागे दु:खाचे, बाई मी विकत घेतला शाम यांसारख्या अनेक गीतांमधून साध्या सोप्या भाषेत ते मोठे तत्त्वज्ञान सांगून जातात. स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांच्या लेखणीने लोकांमध्ये प्रेरणा निर्माण केली होती. १९४२ च्या आंदोलनात, सातारा-सांगली भागात प्रतिसरकारचा प्रचार करण्यासाठी त्यांनी पोवड्यांची निर्मिती केली होती.

गीतरामायण ही गदिमांनी संपूर्ण महाराष्ट्राला दिलेली एक साहित्यिक देणगीच म्हणावी लागेल. त्यांच्या गीतरामायणाने व त्याला दिलेल्या बाबूजींच्या (ज्येष्ठ गायक व संगीतकार सुधीर फडके) संगीताने उभ्या महाराष्ट्राला वेड लावले होते. गीतरामायणाचे शेकडो प्रयोग झाले. मराठी रसिकांनी गदिमांना प्रेमादरपूर्वक महाराष्ट्राचे 'आधुनिक वाल्मिकी' अशी पदवी बहाल केली. यातूनच त्यांच्या सिकप्रियतेची खात्री पटते. गीतरामायणाचे पुढील काळात हिंदी, बंगाली, तेलगू व कानडी या भाषांत भाषांतरही झाले.

गदिमांना भारत सरकारने पद्मश्री (१९६९) हा किताब बहाल केला. ते संगीत नाटक अकादमी व विष्णुदास भावे गौरवपदक या पुरस्कारांचे मानकरी ठरले.

१९६२ ते १९७४ अशी सुमारे १२ वर्षे ते महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्यही होते. १९७३ साली यवतमाळ येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. हे आणि असे अनेक पुरस्कार त्यांना लाभले तरी जनमानसहृदयात ते गीतकार व गीतरामायणकार म्हणूनच जास्त प्रसिद्ध झाले.

श्रेयअव्हेर: वरील गदिमांची ओळख मनसेच्या संकेतस्थळावरून साभार घेतलेली आहे.

विडंबन झाले कवितेचे हे त्याचे विडंबन खोडसाळ यांनी खालीलप्रमाणे सादर केले. मनोगतावर स्वतंत्र कविता म्हणून, तर त्यांच्या 'तेंडूची पाने' या अनुदिनीवर कविता आणि विडंबन या दोन्हीही सदरांत.
ते काव्य असे आहे.

विडंबन झाले कवितेचे
प्रेषक खोडसाळ (मंगळ., १२/०८/२००८ - १६:५१)


साहित्याशी जडले नाते बोरूघाशाचे
विडंबन झाले कवितेचे ॥धृ॥

कविराजांनी धनू उचलिले गझल-रुबायांचे
पूर्ण जाहले विडंबकाच्या हेतू अंतरीचे
उडू लागले शब्दकावळे छचोर काव्याचे ॥१॥

वक्र टाळकी कसून वाचती काव्य अर्थवाही
नयनांमाजी एकवटुनिया काकदृष्टी पाही
फुलू लागले फूल हळू हळू निजल्या मज्जेचे ॥२॥

सोकावुनिया जरी विडंबन पाडत तो राही
तडिताघातापरी भयंकर वाद तोंच होई
कविराजांच्या तक्रारीचे, बोल कोपल्याचे ॥३॥

अंगारुनिया आले डोळे, चरफडले राजे
मुक्त हासऱ्या प्रतिसादांचे बघून सडे ताजे
पडू लागले तृतीय लोचन अमुच्यावर त्यांचे ॥४॥

हात जोडुनी म्हणे विडंबक तो कविराजासी
"आज विडंबन अर्पियले मी अपुल्या चरणासी"
संतापाने मिटले डोळे क्रुद्ध का कवीचे? ॥५॥

देवाज्ञेने स्फुरे अम्हाला रोज शब्दक्रीडा
अधिर लेखणी, अधिर तीहुनी डोक्यातिल कीडा
अर्थहीन हे चरण लावती लेबल पद्याचे ॥६॥

काव्याकाशी कशी भरावी उषःप्रभा लाल
उगी राहिलो वामांगी शब्देविण कंगाल
कवन रचुनिया धनी जाहलो शरसंधानाचे ॥७॥

नाही उरला राम, चालले ते वनवासाला
कविराजांच्या हात घालसी का कासोट्याला
त्यांच्या वर्मी घाव बैसले खो खो हास्याचे ॥८॥

खोडसाळ सांगाल अम्हाला का कविता लिहिता?
कविराजांचे सूर हरवले विडंबने बघता
साहित्याशी कसले नाते तुमचे डोंबलाचे? ॥९॥

खोडसाळांनी त्यांच्या ’तेंडूची पाने’ या अनुदिनीस लिहीलेली प्रस्तावना हाच त्यांचा सर्वद्न्यात खराखुरा परिचय आहे. "मनोगत ह्या मराठी भाषेला वाहिलेल्या (बहुधा) सर्वोत्कृष्ट संकेतस्थळावर अनेक प्रतिभावान हौशी कवी आपल्या रचना सादर करतात. त्या वाचून आपल्याला असे काही लिहिता येत नाही याचा मला खूप राग यायचा. सांगू नका कोणाला, पण माझी अवस्था ते काय असूयाग्रस्त की मत्सरग्रस्त म्हणतात ना तशी व्हायची. मग ठरवलं - नाही ना आपल्याला असे काही छान छान, नवनवीन कल्पनांनी नटलेले, साहित्यिक मूल्यांनी ओतप्रोत, इ. इ. लिहायला जमत, मग ठीक आहे. जे लिहितात त्यांची विडंबनात्मक टर उडवायची. कोल्ह्याला द्राक्षं आंबट, दुसरं काय. परत विडंबन करणे तुलनेने बरेच सोपे, खासकरून छंदबद्ध कविता वा गजलांचे. तयार जमीन, तयार यमकें, रेडीमेड कवाफी. आपण फक्त ओळी जराशा उलटसुलट केल्या की झाले विडंबन तयार. वाचणाऱ्यांनाही गंभीर रचनांचे अर्थ लावत बसण्यापेक्षा 'हसा आणि विसरून जा' छाप विडंबने वाचणे सोयीस्कर वाटते. त्यामुळे आमच्यासारख्यांची चलती असते. कोणी नाक मुरडलेच तर कानाच्या पाळ्या धरून आचार्य अत्र्यांच्या ' झेंडुची फुले' चा वारसा सांगावा. वर अत्यंत आदराने (नाटकं करायला आपलं काय जातय) ' क्व सूर्यप्रभवो वंश: क्व चाल्प विषयामती: ' वगैरे वाक्यं टाकावी. एकाच वेळी आपला विनम्रपणा आणि सु'संस्कृत'पणा दाखवण्याची संधी का सोडा? (संस्कृतातील ओ की ठो काही येत नसले तरी गाठीशी अशी दोन-चार वाक्य पाठ करून ठेवली आहेत मी. भाव मारण्याच्या कामी येतात. ) अशी काही विडंबने इथे देण्याचा मानस आहे. खरे तर 'टाकणार आहे' लिहिणार होतो पण 'देण्याचा मानस आहे' कसे भारदस्त वाटते, नाही? मूळ रचनांचा दुवाही देईन. विडंबन आवडो न आवडो, वाचकहो, त्या मूळ रचना जरूर वाचा ही मात्र खोडसाळाची कळकळीची विनंती आहे. त्या प्रतिभावंतांची थट्टा करण्याच्या माझ्या पापाचे यामुळे थोडे तरी परिमार्जन होईल."

खोडसाळ हे मनोगतावरील एक अत्यंत प्रथितयश प्रतिभावान आहेत. त्यांच्या विडंबनांची मोहिनी पडलेले असंख्य लोकच त्यांच्या प्रतिभेची खरीखुरी कल्पना देऊ शकतील.

मात्र या विडंबनात त्यांनी मूळ काव्यविषयाचे विडंबन केलेलेच नाही. तर केवळ प्रसिद्ध चालीचा, आकृतीबंधाचा, नवविडंबकांच्या आवडत्या वस्तूवर हल्ला बोलण्याच्या वृत्तीचे विडंबन करण्यासाठी, उत्तम उपयोग करून घेतलेला दिसून येतो. वरील दुव्यावरही त्यांनी हे काव्य स्वतंत्र कविता म्हणूनच दिलेली होती. प्रतिसादकांनी मात्र त्याचे विडंबन म्हणूनच कौतुक केलेले दिसून येते.

दोन्हीही काव्ये सुंदर आहेत. 'विडंबन झाले कवितेचे' हे मूळ 'स्वयंवर झाले सीतेचे' या गीताचे कुठल्याच निकषाने विडंबन ठरत नाही. तथाकथित विडंबनात मूळ गीताच्या चालीव्यतिरिक्त कोणतेही साम्य वा संबंध दिसून येत नाही. मात्र हे "नवविडंबकांच्या आवडत्या वस्तूवर हल्ला बोलण्याच्या वृत्तीचे विडंबन" आहे यात कसलाही संशय नाही.

म्हणून विडंबन कशाला म्हणू नये याचे मात्र हे एक चांगले उदाहरण ठरले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: