सिक्कीम सहल-६: गान्तोक शहरदर्शन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सिक्कीम सहल-६: गान्तोक शहरदर्शन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२०१०-०४-२६

सिक्कीम सहल-७: गान्तोक-२-बनझांकरी धबधबा


रांका बुद्धमठ अतिशय भव्य आहे. सोबत विस्तृत ओवर्‍यांचे निवासी संकुलही आहे. मठाच्या मुख्य दालनात शेकडो विद्यार्थ्यांच्या उभ्या-आडव्या ओळींतून बसण्याची सुरेख आसनव्यवस्था आहे. दोन्ही बाजूस पुरूषभर उंचीचे आडवे ढोल ठेवलेले आहेत. बुद्धमूर्ती तसेच गुरू पद्मसंभव (गौतम बुद्धाचे परम शिष्य, ज्यांनी तिबेटमधे बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला.) म्हणजेच रिंपोचे यांची मूर्तीही, सुवर्णवर्णी असून समोर दिवे उजळलेले असतात. अतिशय स्वच्छ, टापटीपीचे आणि पवित्र वातावरण इथे निर्माण केलेले आहे. मठाच्या आवारात अनेक फिरते दंडगोल भिंतीलगत लावलेले आहेत. पुण्यसंचयाकरता, गुरू पद्मसंभव यांचे नामस्मरण करून ते फिरवावेत अशी प्रथा आहे. गुरू पद्मसंभव यांची एक गोष्टही दरम्यान माहीत झाली. ती अशी.


गुरू पद्मसंभव, ल्हासा (तत्कालीन तिबेटची राजधानी) इथे जात असता उत्तर सिक्कीम जिल्यातील तिस्ता नदीच्या मुळाशी एक सरोवर होते, तिथवर पोहोचले. ते सरोवर त्या काळी वर्षाचे बाराही महिने कायमच गोठलेले असे. स्थानिक लोकांनी पद्मसंभव यांना आपली ही व्यथा सांगितली, की जवळच पाण्याचा इतका प्रचंड साठा असूनही पिण्याला पाणी मिळत नाही. त्यावर पद्मसंभव यांनी सरोवरास चरणस्पर्श केला. आणि काय आश्चर्य, त्या सरोवराचे वितळून, पाण्यात रुपांतर झाले. त्यानंतर ते सरोवर कधीही, अगदी हिवाळ्यातही, गोठेनासे झाले. त्या सरोवरास गुरू पद्मसंभव यांचे नावावरूनच हल्ली ’गुरूडोंगमार’ म्हणतात. नामची ही दक्षिण सिक्कीमची राजधानी आहे. भुतिया भाषेत “नाम” म्हणजे “आकाश’ आणि “ची” म्हणजे ”उंच”. म्हणून नामची म्हणजे “उंच आकाश”. नामची येथे सिक्कीमचे तारणहार रिंपोचे, यांची ३६ मीटर (१२० फूट) उंचीची जगातील सर्वात भव्य मूर्ती आहे. गुरूडोंगमार अथवा नामची या दोन्हीही ठिकाणी आम्ही गेलेलो नाही. मात्र, गुरू पद्मसंभव यांच्या उचित उल्लेखाविना सिक्कीम सहलीचे वर्णन संपन्न होणार नाही म्हणून हे लिहीत आहे. गुरू पद्मसंभव यांचे हे चित्रही महाजालावरूनच साभार घेतले आहे.

सिक्कीम सरकारने निर्माण केलेला बनझांकरी (म्हणजे शुद्ध मराठीत वनाची झलक दाखवणारा) कृत्रिम धबधबा आणि सोबतचे सर्वच उद्यान सौर ऊर्जेवर संचालित आहे. इथे ऊर्जेच्या सर्वच स्वरूपांची, त्यांच्यातील परस्पर विनिमयांची आणि तत्संबंधी अनेक विषयांची माहिती, शालेय मुलांना नीट समजून घेता येईल अशा प्रात्यक्षिकांद्वारे व्यवस्थित उलगडून दाखवलेली आहे. मनोरंजक प्रयोगांद्वारे, खेळण्यांद्वारे विविध प्रकारच्या ऊर्जांतरणांची माहिती उद्बोधक रीतीने उघडपणे मांडून दाखवलेली आहे.


उदाहरणार्थ वरील चित्रातील घसरगुंडी पाहा. तिच्या घसरत्या भागावर एक फिरता पट्टा बसवलेला असून, तो पुढल्या भागाच्या तळाकडून पाठीमागे शिडीच्या सर्वोच्च भागाखालून पुन्हा वर पोहोचतो. आपण घसरू लागलो की पट्टा फिरू लागतो. पट्टा बारकेसे ऊर्जानिर्मिती संयंत्र चालवतो. त्यात निर्माण होणारी विद्युत-ऊर्जा एक ध्वनीफीत चालवते, ज्यामुळे आपल्याला संगीत ऐकू येऊ लागते. दुसर्‍या चित्राततील आडव्या डब्यात पिवळ्या खांबांकडे तोंड करून त्या दोन खांबांच्यामधे डब्यात उभे राहायचे. मग पुढे चालत जाण्याचा प्रयत्न केला की सगळा डबाच घड्याळाच्या दिशेने गतीमान होतो. त्या चक्राकार गतीचाच उपयोग विद्युत-ऊर्जा निर्मितीकरता करून घेतलेला आहे. त्या ऊर्जेवर मग संगीत ऐकू येऊ लागते. माणसाच्या ऊरातून निर्माण होणारे चैतन्य (ऊर+जा=ऊर्जा) प्रथम यांत्रिकी हालचालीत, मग विद्युत-ऊर्जेत आणि तत्पश्चात ध्वनीरूपात आपल्याला संगीत ऐकवू लागते तेव्हा आपल्या (पक्षी, मुलांच्या) ऊर्जाविषयक जाणीवा किती झपाट्याने समृद्ध होत जातात ते तिथे प्रत्यक्षच अनुभवायला मिळाले म्हणून एरव्ही अविश्वसनीयच वाटले असते. इनक्रेडिबल इंडिया!
नंतर आम्ही गान्तोक रज्जूमार्गावरून शहराचे विहंगम दृश्य पाहण्याचा अनुभव घेतला. सोबतचे चित्र शहरातील रस्त्यांची रचना स्पष्टपणे दाखवत आहे.


एव्हाना दुपारच्या जेवणाची वेळ झालेली होती. जेवण झाल्यावर नामग्याल इंस्टिट्यूट ऑफ तिबेटोलॉजी आणि तिथला बुद्धमठ पाहण्यासाठी गेलो. चीनने तिबेटवर कब्जा केल्यानंतर ल्हासामधून अगणित निर्वासित सिक्कीममधे आले. त्यांचे पुनर्वसन आणि तिबेटमधील कला व परंपरांच्या जोपासनेकरता या संस्थेची स्थापना झालेली आहे. इथे एक तिबेटी हस्तलिखितांचे भव्य ग्रंथालयही बघता आले.

तिथून मग आम्ही सिक्कीमच्या हस्तकला संग्रहालयात गेलो. इथे चित्रणास मनाई असल्याने चित्रे नाहीत. मात्र तिथला बाहेरचा परिसरही खूपच रम्य असल्याने त्या परिसराचे अनेक फोटो काढलेले आहेत. हातमागावर लोकरी वस्त्रे विणण्याचे तसेच लाकडावर कोरीव काम करण्याचे प्रशिक्षणही तिथे दिले जात होते. तेही पाहता आले. त्यानंतर आम्ही गणेशटोक या टेकडीवरील गणपतीस गेलो. तिथे गणपतीची आरती भरपूर उत्साहाने म्हटली. सर्वात शेवटी गान्तोक पुष्पप्रदर्शनास गेलो. ऑर्किडच्या फुलांचे एवढे रम्य प्रदर्शन मी आजवर पाहिलेले नव्हते. मन प्रसन्न झाले.


पुष्पप्रदर्शनादरम्यान आणखी एक आठवण जागी झाली ती म्हणजे हिरव्या निवडुंगी पर्णकमळांची. दार्जिलिंग ते कॉलिम्पाँग प्रवास झाल्यावर आम्ही एका निवडुंगाच्या बागेत गेलो. उत्तम-उत्तम निवडुंगांनी आणि त्यांच्या इवल्या-इवल्या नयनमनोहर फुलांनी मन प्रसन्न झाले. ही निवडुंगी पर्णकमले ऊन-सावलीच्या खेळात किती रम्य दिसत होती ते सांगून समजणे अवघडच आहे. समजले तर कदाचित शेजारच्या चित्रावरून समजून घेता येईल.

.

सिक्कीम सहल-६: गान्तोक शहरदर्शन

गान्तोक-१: शहरदर्शन

उंच पर्वतावर वसलेले असल्याने गान्तोक शहर उंचसखल जमिनीवर बांधलेल्या घरांतून नांदते आहे. शेजारच्या घरी जायचे असेल तरी कित्येकदा शे-पन्नास पायर्‍या चढाव्या-उतराव्या लागतात.

मुख्य रस्ते अरुंद आणि वर्दळीचे होते. मारूती व्हॅन, अल्टो अशा प्रकारच्या चार चाकी वाहनांनाच केवळ “टॅक्सी” म्हणून वाहतूक करण्यास परवानगी होती. टॅक्सीत केवळ चारच प्रवासी बसू शकत. उतारचढावाचे रस्ते असल्याने एखादी टॅक्सी जरी उभी राहिली, तर रस्त्यातील वाहतूक तुंबून राही. याकरता रस्त्यांवर कुठेही टॅक्सी उभी करण्यास मनाई होती. टॅक्सी विवक्षित जागीच उभी करावी लागत असे. आमच्या हॉटेलला एक गॅरेजसदृश गाळा प्रवेशद्वारानजीकच मोकळा सोडलेला होता. टॅक्सी बोलावली असता तिथेच उभी करत. रस्त्यावर नाही. पुढे असे लक्षात आले की बहुतेक घरांना तशा प्रकारची वाहने थांबवण्याची जागा असे. अशा प्रकारच्या नियमांमुळे थांब्याच्या जागा माहीत नसल्यास लांब लांब अंतरे पायीच चालावी लागतात. असेच एकदा आम्ही महात्मा गांधी रोडपासून आंबेडकर रोडपर्यंत पायी आलेलो होतो. टॅक्सीच्या शोधात. मग आमचे हॉटेल अगदीच जवळ आल्याने टॅक्सीचा नादच सोडावा लागला होता.

त्यामुळे, डाव्या बाजूच्या चित्रात दिसतात तशा प्रकारच्या जागा टॅक्स्या उभ्या राहण्याकरता निर्माण केलेल्या असत. तिथेच टॅक्सी मिळू शके. त्यांची ठिकाणे स्थानिकांकडून आधीच माहीत करून घेणे चांगले. उजव्या बाजूस घूम बुद्धमठ दिसत आहे. दार्जिलिंगमधे स्थलदर्शन करत असतांना अनेकदा आम्ही घूम बुद्धमठासमोरून, स्थानकासमोरून जात असू. घुमून-फिरून पुन्हा त्याच त्याच जागेवर पोहोचत असल्यामुळेच त्या भागाचे नाव घूम पडले असावे असा माझा संशय त्यामुळे पक्का झाला. प्रत्यक्ष घूम मठाचे दर्शन मात्र २२ तारखेस दार्जिलिंगहून गान्तोक प्रवासास निघालो तेव्हा सकाळी सकाळीच घेतले. या मठाजवळ आम्हाला स्थानिक विणीच्या विविधरंगी आकर्षक लोकरी शाली मिळाल्या. भावही माफकच होते. इथे केलेली सर्वच खरेदी उत्तम ठरली.

आम्ही ज्या हॉटेलात उतरलो होतो त्या सिक्कीम रिट्रीट हॉटेलचे प्रवेशद्वार डॉ.आंबेडकर रस्त्यावर तळ मजल्यावर आहे. प्रवेशाशी उभे राहून हॉटेलकडे पाहिले असता ते दोन मजली भासते. आम्ही ज्या खोलीत राहिलो होतो त्या खोलीत जाण्याकरता स्वागत-कक्षापासून एक मजला खाली जावे लागे. खोलीतील खिडकीतून एक रस्ता दिसे. तो हॉटेलच्या पाठीमागचाच रस्ता होता. मात्र मी त्या रस्त्यावर जाऊन पाहिले तेव्हा आमची खोली दुसर्‍या मजल्यावर दिसत होती. इथे सर्वसाधारणपणे सर्वच घरांचे बांधकाम असेच असे.

अशा परिस्थितीत वाहतूक सुरळीत चालावी म्हणून जे अनेक उपाय सिक्कीम सरकारने योजलेले आहेत त्यात पुढील इशार्‍याचाही समावेश आहे. “इशाराः जो कुणी झरे आणि नाल्यांमधे केरकचरा आणि बांधकामातील मलबा इत्यादी टाकेल, त्यास रु.५,०००/- दंड किंवा सहा महिनेपर्यंतची कैद अथवा दोन्हीही होऊ शकेल. – हुकुमावरून. शहरी विकास आणि गृहनिर्माण खाते, सिक्कीम सरकार.” असा सज्जड दम भरल्यावरही असले अपराध करणारे अजिबात नव्हतेच असे नाही. तरीही त्यांचे प्रमाण लक्षणीय प्रमाणात आटोक्यात होते असे गान्तोक शहरात पायी फिरत असता, जागोजागी जाणवत होते.

तसेच गान्तोकमधे कुठल्याही दुकानाला “दोकान” म्हणत असत. आम्ही आपले दोन कान असलेला हा कुठला प्राणी बुवा? म्हणून दुकानाला दोकान म्हणण्याच्या प्रथेची जाता-येता टिंगल करत होतो. तरीही आमच्या नागपुरी संस्कृतीत अगदी चपखल बसणारा पानाचा ठेला, गान्तोकमधेही आपला रुतबा राखून असल्याचे पाहून उगाचच काहीतरी ओळख लागल्याचा आनंद झाला. एरव्ही मुंबईत राहायला लागल्यापासून (त्यालाही आता सुमारे तीस वर्षांचा काल लोटला आहे) परंपरागत प्रकारचा पानाचा ठेला क्वचितच आढळत असे. गुटखा, खर्रा, चिंगमवालेच जास्त. नागपूरला मात्र काळाचा मुलाहिजा राखणारे नाव असणारे ठेले, कालानुरूप अवश्य पाहायला मिळतात. ज्यावेळी बोफोर्स तोफांतील गैरव्यवहार उघडकीस आलेले होते त्या काळात मला नागपुरात माझ्या घराकडेच “बोफोर्स” नामक पानाचा ठेला असल्याचा शोध लागला होता.

अशा डोंगर-उतारांवर वसलेल्या गान्तोक शहरात, मोठी सपाट अशी जाग मिळणे प्रायः दुरापास्त होते. तरीही ज्या काही मोजक्या जागी अशी प्रशस्त ठिकाणे सापडतात, त्या आहेत महात्मा गांधी मार्ग, पाल्जोर स्टेडियम आणि बुद्ध मठ. सुदैवाने या तिन्ही जागा व्यवस्थित पाहण्याची संधी आम्हाला मिळाली. आमच्या हॉटेलपासून पंधरा-वीस मिनिटांच्या पायी चालण्याच्या अंतरावर महात्मा गांधी मार्ग असल्याने तो वारंवार जाऊन नीट पाहता आला. पेव्हर ब्लॉकच्या साहाय्याने नीट बांधलेल्या महात्मा गांधी रस्त्यावर वाहनांना मनाई आहे. वर्षांतले केवळ काही दिवसच स्वच्छ सूर्यप्रकाशात नाहणार्‍या गान्तोक शहरात, कोवळे पिवळे ऊन पडलेले असल्याने लोक उत्सवी वातावरण असल्यासारखे बाहेर पडलेले असतील, ही आमची अपेक्षा अनपेक्षितरीत्या फोल ठरली. वर डावीकडच्या महात्मा गांधी रोडच्या चित्रात सकाळी ११०० वाजता एकही माणूस प्रकाशचित्रात प्रकटलेला दिसत नाही आहे. मात्र त्या रस्त्याच्या दुभाजकानजीक ठायीठायी ठेवलेल्या बाकड्यांवर फुरसतचंद लोक मजेत बसून विहार करत असल्याचे (पक्षी, उन्हे खात असल्याचे) दिसून येत होते. दुकाने मुख्यतः गरम कपड्यांची, प्रकाशचित्रण साहित्याची, पर्यटनविषयक आणि तत्समच दिसत होती.

पाल्जोर स्टेडियम जवळच आमचे हॉटेल सिक्कीम रिट्रिट असल्याने प्रभातफेरी-सायंफेरीत ते चहुबाजूंनी पाहता आले. महात्मा गांधी मार्गाकडून पाल्जोर स्टेडियमकडे येणारा रस्ता पीएस रोड म्हणून ओळखला जातो. याच रस्त्यावर सिक्कीम सरकारची अनेक महत्वाची कार्यालये आहेत. अनेक हॉटेल्स आहेत. याच रस्त्यावरून पाल्जोर स्टेडियमचे अतिशय देखणे विहंगम दृश्य पाहता येते.

रांका बुद्धमठाची जागाही अशीच प्रशस्त सपाट असल्याचे आढळून आले. इथेच आम्हाला लोण्याच्या दिव्यांची पुढील जाहिरात दिसून आली. “लोण्याचे दिवे बुद्धाला, धर्माला आणि संघाला पारंपरिकरीत्या अर्पण करण्यात येतात. जेव्हा आपण लोण्याचे दीप उजळतो तेव्हा आपण आपल्या कृतीचे श्रेय सगळ्याच संवेदनाक्षम जीवांच्या प्रबोधन आणि सौख्याकरता समर्पित करत असतो. प्रत्येक दिव्याची किंमत, लहान=रु.५/-, मध्यम=रु.१०/-, मोठा=रु.१००/-. या सर्व लोण्याच्या दिव्यांच्या विक्रितून मिळणारा पैसा मठाच्या इंधन आणि अन्नविषयक गरजांच्या पूर्ततेकरता वापरला जातो.”