२०२५-०५-२२

अणुचाचणीच्या स्थलनिवडीची कहाणी


पोखरण-२ करता स्थानाची निवड केली त्याचा, निवडप्रक्रियेकरता नियुक्त केलेल्या चमूतील आघाडीच्या सदस्याने लिहिलेला, प्रथम पुरुषी एकवचनी अहवाल.
भारताची प्रथम अणुचाचणी १८ मे १९७४ रोजी पोखरण येथे करण्यात आली. सरकारने तिला ’शांततापूर्ण अणुचाचणी स्फोट’ म्हटले. पुढे सामान्यतः ती पोखरण-१ अणुचाचणी म्हणूनच ओळखली जाऊ लागली. मधे ७-८ वर्षांचा काळ गेल्यावर १९८१-८२ मध्ये पोखरण-२ अणुचाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पोखरण-१ पश्चात, चाचणीकरता खड्डा खोदण्याचे काम जोधपूरच्या लष्करी शिबिरातील इंजिनिअरिंग रेजिमेंटला सुपूर्त करण्यात आले. ११३-इंजिनिअरिंग रेजिमेंट नावाची ही रेजिमेंट १९६७ साली निर्माण करण्यात आलेली होती. या रेजिमेंटचा, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि शौर्य यांचा हेवा वाटावा असा इतिहास होता. १९७९ च्या उत्तरार्धात ती जोधपुरात आलेली होती. दिवंगत लेफ्टनंट कर्नल के.सी.धिंग्रा (पुढे जाऊन हे मेजर जनरल पदापर्यंत पोहोचले होते) तिचे नेतृत्व करत होते. जानेवारी १९८१ मध्ये त्यांना निकडीच्या चर्चेसाठी दिल्लीत बोलावून घेण्यात आले. ते जोधपूरला परतल्यावर, सीमाभागातील कार्यकारी टेहळणीकरता मला त्यांच्या सोबत येण्यास सांगितले. आम्ही दोन जोंगा वाहनांतून निघालो. पहिले वाहन ते स्वतःच चालवत होते. बाजूला मी बसलेलो. सोबतचे लोक दुसऱ्या वाहनात होते. वाटेत ते म्हणाले की, रेजिमेंटला १२ फूट व्यासाची आणि ५०० फूटहून अधिक खोलीची विहीर खणायला सांगितले गेले आहे.
आम्हा दोघांनाही तिचा उद्देश चांगल्या प्रकारे कळलेला होता, मात्र आण्विक वा अणुचाचणी हे शब्द मात्र कधीही उच्चारले गेले नाहीत. वस्तुतः या संपूर्ण कामा दरम्यान तसे वर्गीकरण कुणीही केले नाही.
आम्हाला अंतरातून माहीत होते की हे काम अवघडच आहे. मात्र त्या आव्हानाचा आवाका आणि आकार आकळला नव्हता. आम्ही नागरी अभियंते होतो आणि खनिकर्म अभियांत्रिकीबाबत आम्हाला फारच थोडी कल्पना होती. वस्तुतः आम्ही कधीही खाणीस भेट दिलेली नव्हती किंवा तसली विहीर बघितलेलीही नव्हती.
इथे अशी विहीर खोदण्याबाबत काही माहिती देणे सयुक्तिक ठरेल. भूमिगत खनिजस्तरापर्यंत पोहोचण्याकरता एक उभी विहीर जमिनीच्या पृष्ठभागापासून तर खनिजक्षेत्रापावेतो खणलेली असते. तिच्यातूनच माणसांची, सामानाची आणि उपस्करांची ने-आण केली जात असते. निष्कर्षित खनिजही तिच्यावाटेच जमिनीच्या पृष्ठभागाबाहेर काढले जात असते. खनिकर्माबाबतच्या सर्व साहित्यांत अशी विहीर खोदणे सर्वाधिक धोकादायक आणि हानीकारक कर्तव्य मानले जात असते. त्यास विशेष तज्ञता आणि विशेष उपस्करांची आवश्यकता असते.
आमच्या कामाबाबत सांगायचे तर, स्थाननिवडीचे काम रेजिमेंटवर सोपवलेले होते. पोखरण भागाचे नकाशे आमच्या हातात होते. पुढील दोन दिवसांत, जागेच्या विस्ताराची कल्पना यावी म्हणून, त्या पल्ल्यांत आम्ही अनेकदा फिरलेलो होतो. आम्ही नऊ वर्ग किलोमीटर क्षेत्रफळ निश्चित केले, जे महामार्गांपासून आणि गावांपासूनही दूर होते. सुरक्षा आणि गोपनीयतेबाबतच्या आमच्या गरजा त्यामुळे भागत होत्या.
जोधपूरला परतल्यावर कर्नल धिंग्रांनी नवी दिल्लीतील अधिकाऱ्यांना आमच्या स्थाननिवडीची कल्पना दिली. तिकडून मंजुरी मिळताच, मला पोखरणला जाऊन प्रत्यक्ष जागेची निवड करण्यास सांगण्यात आले. कॅप्टन एन.पी.एस. चौहान आणि कॅप्टन डी.के.राजपूत आणि वीस जवानांची फौज माझ्यासोबत होती. सूर्यास्ताला आम्ही त्या ठिकाणी जाऊन पोहोचलो. निवडलेल्या नेमक्या ठिकाणी पोहोचू न शकल्याने आम्ही रात्री तेथेच मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. खेतोलाई-लोहार्की दरम्यानच्या बैलगाडीच्या वाटेवरील ती एक सपाट जागा होती. एक १८० पौंडाचा तंबू तीन अधिकार्यांठकरता लगेचच उभारला गेला. जवान मात्र ३-टन वाहनातच झोपले.
डोळे मिटण्यापूर्वी दुसऱ्या दिवशीच्या कृतीबाबत आम्ही मिणमिणत्या कंदिलाच्या प्रकाशात चर्चा करत होतो. तेवढ्यात कॅप्टन राजपूत ओरडले ’साप’. आम्ही खाली पाहिले. त्या जागी अनेक साप आणि विंचू सरपटतांना पाहून आमची भीतीने गाळणच उडाली. फुरसं होती ती. हे उघडच होते की आम्ही त्यांच्या घरात शिरलेलो होतो. शूरवीराच्या काळजातही धडकी भरवणारे दृश्य होते ते. रात्रभर आम्ही आपापल्या कॅम्पकॉटांवरून उतरण्याचे धाडस केले नाही. लघुशंकेचा दाब वाढला तरीही नाही.
दुसऱ्या दिवशी पहिले काम आम्ही कुठले केले असेल तर ते पर्यायी शिबीर थाटण्याचे. मात्र संपूर्ण कामादरम्यानच आम्हाला या फुरशांचाच सामना करावा लागणार आहे, याची मात्र आम्हाला तेव्हा कल्पना आलेली नव्हती.
फुरसं हा एक सर्वात धोकादायक साप असतो. अन्य सर्व सापांमुळे होणाऱ्या जीवहानीहूनही फुरशांमुळे होणारी जीवहानी जास्त असते. ते सूप्तपणे वावरत असल्याने, स्थानिक लोक त्यांना कुजबुजत्या आवाजात ’चोर’ म्हणतात. आमच्याकडेही सर्पदंशाची अनेक प्रकरणे झाली. मात्र सर्व बाधितांना आमच्या कॅप्टन व्ही.के.शुक्ला या रेजिमेंटल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वेळीच सर्पविषविरोधी इंजेक्शन देऊन वाचवलेले होते.
स्थाननिवडीकरता संपूर्ण नऊ वर्ग किलोमीटरचा भाग आम्ही अनेकदा पालथा घातला. पण उपयोग झाला नाही. आम्हाला माहीत होते की, स्थान हे वाळूच्या टेकड्यांमधील सपाट जागीच हवे आहे, फारसे वाळूचे ढिगारे नको आहेत, शिबिराकरता पुरेशी सपाटी हवी आहे. पोखरण-१ च्या वेळी भूजलस्रोतांमुळे अनेकदा आम्हाला माघार घ्यावी लागलेली होती. भूजलस्रोतांचा आढळ कमीतकमी असेल असे ठिकाण हवे होते. मात्र असे ठिकाण कसे शोधायचे याची मात्र आम्हाला काहीच कल्पना नव्हती.
आम्ही खेतोली आणि लोहार्की गावातील स्थानिकांना भेटायचे ठरवले. भूजलस्रोतांच्या आढळाबाबतचे त्यांचे ज्ञान आम्हाला हवे होते. आम्ही त्यांना सांगितले की, आम्हाला तिथे एक कायमस्वरूपी शिबीर उभारायचे आहे. भूजलस्रोतांचा आढळ असेल असे ठिकाण हवे आहे. ते मदतीस तत्पर होते. त्यांनी पाण्याकरता प्रयत्न करून सोडून दिलेल्या अनेक जागा आम्हाला दाखवल्या. आम्हाला ती ठिकाणे टाळायला सांगितली. बोराची झाडे पाहा, मुंग्यांची वारुळे पाहा, तशा ठिकाणी सामान्यतः जमिनीतील पाणी मिळू शकेल, ते म्हणाले.
दुसऱ्या दिवस अखेर, आमची काहीच प्रगती झालेली नव्हती. मात्र आज सरपटणारे सोबती नसल्याने रात्र शांततेत गेली. तिसरे दिवशी सकाळी, आम्ही सेंट्रल ग्राऊंड वॉटर बोर्ड आणि राजस्थान ग्राऊंड वॉटर खात्यातील तज्ञांचा सल्ला घेण्याकरता जैसलमेर आणि पोखरण शहरांना भेटी दिल्या. भूजलप्रवाहनकाशांचे आधारे त्यांनी पोखरण क्षेत्राचे स्पष्टीकरण दिले. पोखरण निम्न जुराझिक लाठी संरचनेचा भाग असल्याचे सांगितले. तळाशी वर येणार्याी ग्रॅनाईटच्या खडकांनी ते व्याप्त होते. त्यात मध्यम ते ठळक दाण्यांचे वालुकाश्म होते, पातळ खडक होते आणि मिश्र राशीही होत्या.
मुख्य पाणीधारक खडकसंरचना अनिर्बंधित अथवा बंदिस्त असू शकतात. हवामानाने झिजलेल्या खडकांच्या फटींत असू शकतात. अभेद्य ग्रॅनाईटच्या १२०० फूट खोलातील स्तरांतही असू शकतात. प्रादेशिक भूजलस्तराच्या वरील भागांतही असू शकतात. मात्र आम्हाला ५०० फुटांपर्यंतच जायचे असल्याने आम्हाला या माहितीचा फारसा उपयोग नव्हता.
मग आम्ही सेंट्रल ऍरीड झोन रिसर्च इन्स्टिट्यूट जोधपूर येथेही जाण्याचा निर्णय घेतला. मात्र भूजलस्तराच्या वरील भागांचे आणि भूजलप्रवाहांचे भाकीत करणे अशक्यप्राय असल्याचे त्यांनी सांगितल्याने आमची निराशाच झाली. त्यांनी भूगर्भशास्त्रीय आणि क्षेत्रीय माहिती पुरवली. आम्ही त्यांची माहिती तपशीलाने अभ्यासली पण, निर्णयकारक निष्कर्षांप्रत पोहोचता आले नाही. खननकार्य सुरु करण्यासाठी स्थलनिश्चिती करणे कठीणच भासत होते. नवी दिल्लीकडूनचा दबाव वाढतच होता. कर्नल धिंग्रांनी स्थलनिश्चिती सत्वर व्हावी म्हणून, आम्हाला पुन्हा पोखरणला भेट देण्यास सांगितले.
निरनिराळ्या मार्गांनी मिळालेल्या माहितीसहित आम्ही पुन्हा तपशीलवार शोध घेतला आणि (अ, ब, क आणि ड) अशी चार ठिकाणे निवडून काढली. त्यांचे आपापसांतील अंतर ९०० ते १४०० मीटर होते. वालुका टेकड्यांच्या मधला कडक पृष्ठभागाचा तो सपाट भाग होता. उपस्कर आणि अन्य पायाभूत सुविधा उभारण्याकरता पुरेशी जागा होती. वाळूच्या टेकड्या जवळच असणे गरजेचे होते कारण उकरलेली माती दडपायला त्या उपयोगी ठरणार होत्या. एरवी निरीक्षक उपग्रहांच्या नजरेतून आमची हालचाल सुटली नसती.
आम्ही मग गावकऱ्यांना निश्चित केलेल्या ठिकाणांवर पाणी आढळण्याबाबत पुन्हा एकदा विचारले. हितचिंतक ज्येष्ठ गावकऱ्यांनी स्थानिक पानाड्यांची मदत घेण्याचा सल्ला दिला.
भूजलाचा जमिनीवरून शोध घेणाऱ्यांचा उपयोग, सिनाईच्या वाळवंटात ख्रिस्तपूर्व १२५० वर्षे इतक्या आधी मोझेसने केलेला होता. पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रातील विचलने भूजल अस्तित्व प्रदर्शित करतात या समजुतीवर हे आधारलेले होते. पानाड्याचे शरीर विद्युत वाहक ठरते. पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रातून चालतांना ते छोटी विभवांतरे निर्माण करते.
काही पानाडे गुल्लेरच्या आकाराच्या काड्याच वापरत. इतर काही एल आकाराच्या लोखंडी सळया वापरत. हातातील त्यांच्या हालचालींवरून ते भाकीत करत असत. ही पद्धत पूर्णतः संवेदनावरच आधारलेली आहे. पानाडे पाण्याची खोली, साठ्याचे प्रमाण यांबाबत किंवा ते असण्याबाबत वा नसण्याबाबतही कोणतीच शाश्वती देऊ शकत नाहीत. आम्हाला ही कल्पना सुरस वाटली मात्र अवैज्ञानिक म्हणून आम्ही ती सोडून दिली.
नंतरच्या दिवशी संध्याकाळी आम्हाला न सांगताच खेतोलाई गावातील प्रमुख, पोखरण शहरातून एका पानाड्याला घेऊन आला आणि त्याला त्याने निवडलेल्या ठिकाणांवर शोध घेण्यास सांगितले. ती पौर्णिमेची रात्र होती. नुकतीच तोडून आणलेली गुल्लेराकृती बोराच्या झाडाची काडी आपल्या पिशवीतून काढून, पाण्याने धुवून मंत्र पुटपुटले. आम्हा सगळ्यांकरता तो अनुभव भारून टाकणाराच होता. तरीही ही चारही ठिकाणे पाण्याकरता उपयोगाची नाहीत असे त्याने सांगताच आम्ही सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. कोणत्याही वैज्ञानिक आधाराविना अपेक्षित उत्तर मिळाल्याने समाधान वाटून आम्ही सुखावलो. अणुचाचणीकरता पानाड्याचे प्रमाणही कामी आले हे सांगणे असंबद्ध वाटते! खरोखरीच एक अप्रशस्त प्रमाण होते ते.
पोखरण-१ च्या वेळेला खोदकाम सुरू झाल्यानंतर तीन महिन्यांतच त्यात पाणी शिरल्याने ती विहीर सोडून द्यावी लागलेली होती आणि कोरडी म्हणून सोडून दिलेली एक विहीरच चाचणीकरता तयार करावी लागलेली होती. पोखरण-२ करता प्रस्तावित विहीर किमान ५०० फूट खोल असणे अपेक्षित होते. कोणतीही सोडून दिलेली विहीर इतकी खोल असणार नव्हती कारण त्या १२० फूटांहून जास्त खोल क्वचितच असत. अनपेक्षित अडचणी गृहित धरून, अधिकाऱ्यांनी एकाच वेळी दोन ठिकाणी विहीरी खोदायचा निर्णय घेतला. त्यामुळे निवडलेल्या चार ठिकाणांपैकी दोन जागा आम्ही निवडल्या. त्याकरता खूप विचार केला तरीही शंका येतच राहिल्या.
गोपनीयता राहील का ही भीती असूनही कर्नल धिंग्रा यांनी, स्थानिक भूजलप्रवाह अडतींचा विहीरीस पाणी लागण्याबाबतच्या अनुभवाविषयी सल्ला घेण्याचे ठरवले. अडतीलाही तीच कहाणी ऐकवली गेली की, लष्कराला भूजलस्रोतासहितची जागा कायमस्वरूपी शिबिराकरता हवी आहे. नमुन्यांकरता अडतीने भुगर्भविंधन केले. १५० फुटांपर्यंतचे नमुने ते काढू शकले. त्या चारही ठिकाणी विहीर खोदणे व्यर्थ आहे असाच अहवाल त्यांनी दिला. म्हणजे वापरण्यालायक परिमाणात पाणी असणार नव्हते. आमच्या निष्कर्षांची पुष्टी करणाराच अहवाल होता. मात्र निर्णायक नव्हता. कारण संवेदित खोली केवळ १५० फूटच होती.
अखेरचा उपाय म्हणून आम्ही भूमिगत जलसाठ्यांच्या शोधाकरता सरकारी अडतींची मदत घेण्याचा निर्णय घेतला. त्यांची पद्धत भूभौतिक होती. वीजवहनाचे आधारे जमिनीची वाहकता मोजून ते निर्णय करत असत. ठिकठिकाणी विद्युताग्रे लावून थेट प्रवाह त्यात प्रवाहित करून ते मापने घेत असत. खोली, आकार आणि साठा यांवर अवलंबून निदाने करत. उपस्कराची कार्यक्षमता लक्षात घेता त्या पद्धतीने २०० फुटांहून खोल ठिकाणी अनुमान करता येणारच नव्हते. त्यामुळे हे निष्कर्षही निर्णायक ठरले नाहीत.
सर्व माहितीच्या विश्लेषणाकरता कर्नल धिंग्रांनी अनेक बैठका घेतल्या. कष्टपूर्वक स्थलतुलना केली गेली. अ आणि क ही ठिकाणे पसंतीची म्हणून निवडली गेली. हे कबूल केलेच पाहिजे की, अंतीम निवडीत म्हणतात तसा सहाव्या इंद्रियाचा उपयोगही झालाच. मग कर्नल धिंग्रा आणि मी या निवडीवर शिकामोर्तब करण्यासाठी पोखरणला निघालो. अंतीमतः निवडलेली ठिकाणे, नवी दिल्लीला, नकाशावर खूण करून पाठविली गेली.
आम्ही ’अ’ ठिकाणी पोहोचेपर्यंत सूर्य अस्ताला जात होता. प्रस्तावित विहिरीचे केंद्र स्थानावर निश्चित करायचे होते. मी कर्नल धिंग्रांना विनंती केली की, त्यांनीच त्या ठिकाणी खुंटी ठोकावी. एका शिपायाने त्या जागी खुंटी धरून उभी केली. धिंग्रांपाशी हातोडा दिला. ते पुढे झाले. आम्ही सारेच त्यांच्याभोवती वर्तुळात उभे होतो.
तो क्षणच ऐतिहासिक होता. सूर्यकिरणे वाळूच्या टेकड्यांना सोनेरी रंगाच्या निरनिराळ्या छटांत चमकवत होती. मोठा रम्य प्रसंग होता तो. एकाकी वाळवंटातील शांतता वातावरणास आणखी भारावून टाकत होती. कर्नल धिंग्रा सूर्याकडे तोंड करून उभे होते. एक मिनिटभर त्यांनी डोळे मिटले. बहुधा जगन्नियंत्याचे आशीर्वादच घेतले. प्रसंगाच्या गांभीर्याने आम्हा साऱ्यांवरच गारूड केलेले होते. आम्ही सारेच निस्तब्ध झालेलो होतो. हातोडीच्या ठोक्यानेच ती स्तब्धता लोप पावली.
अंधार पडत होता. आम्ही घाईनेच ’क’ स्थळाप्रत निघालो. ते ९०० मीटर दूर होते. तीच प्रक्रिया अवलंबिली गेली. मात्र कर्नल धिंग्रांनी खुंटी ठोकायला मला बोलावले. हा त्यांचा उदार दृष्टिकोन होता. परतीच्या लांबलचक जोधपूर रस्त्यात आम्ही क्वचितच काही बोललो असू. फासा पडलेला होता. भारताच्या आण्विक आशेचे भवितव्य आमच्या निवडीवर अवलंबून होते. या विचाराने आम्हाला भारून टाकलेले होते.
मंजुरी मिळताच काम धडाक्यात सुरू झाले. वाळूचे ढिगारे दूर सारून आम्हाला मिश्र खडक लागला. वालुकाश्म आणि गाळाचा. ६० फुटावरच पाणी झिरपू लागले. खोली गाठणे अवघड होऊ लागले. मात्र आमचे इरादे बुलंद होते. ९०-१०० फुटांवर तर पाणी एवढे झिरपू लागले की, विंधन अशक्य झाले. थांबलेच.
मात्र ११३-इंजिनिअरिंग रेजिमेंटच्या दुर्दम्य इच्छाशक्ती आणि नवोन्मेषशाली पद्धतीने साऱ्या अडचणींवर मात केली. म्हणतात ना ’इतिहास तेच रचतात जे प्रभावी ठरतात’.
आम्ही पाण्याच्या झिरप्यावर कशी मात केली, ते पुन्हा कधीतरी सांगण्याकरता राखून ठेवू.
लेखक कारगील-सियाचेन क्षेत्रात रेजिमेंटचे नेतृत्व करत असत. अणुचाचण्यांकरता विहीर खोदण्याचे काम त्यांना सुपूर्त करण्यात आलेले होते. ते विपुल लेखन करणारे लेखक आहेत. भारताच्या संरक्षण उद्योगातील ते आघाडीचे तज्ञ मानले जातात.


मूळ इंग्रजी लेखकः मेजर जनरल मृणाल सुमन ०५-०७-२०२०
प्रथम प्रसिद्धीः https://swarajyamag.com/.../a-phenomenal-pokhran-mission...
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २२-०५-२०२५
श्रेय-अव्हेरः या लेखाचे स्वामित्व संपूर्णतः लेखकांचे आहे. अनुवादकाचे श्रेय हे अनुवादापुरतेच सीमित आहे.
खालील फोटो प्रातिनिधिक आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: