२०२५-०८-०९

तूच तू आठविशी

गर्भावासातुनी मी, सहज उतरता, राहिलो पूर्ण रूपे
रात्री झोपेतही मी, निपचित पडता, भान ते पूर्ण राहे ।
वर्णोच्चारांतही मी, उमटत असतो, घेउनी जे तुझे ते 
माझे, माझे न काही, नकळत मनिही, तूच तू आठविशी ॥ १ ॥ 

एका मातीतुनीही, अलग अलगशी, येत पीके, फळेही
झाडाच्या उंच टोका, नकळत भरते, नारळी गोड पाणी ।
भूमी थोडी असूनी, न कधि अतिक्रमे, सागरी लाट तीही
कैसे होते कळेना, नकळत मनिही, तूच तू आठविशी ॥ २ ॥ 

जन्माआधीच येते, स्तनि दुध बरवे, बालकाच्या भुकेला
लाभे पुष्पांस सार्‍या, परिमळ बरवा, फूल ते पूर्ण होता ।
चौर्‍यांशी लक्ष योनी, असत न तरिही, सारखे जीव कोणी
कैसे वैविध्य साधे, नकळत मनिही, तूच तू आठविशी ॥ ३ ॥ 


नरेंद्र गोळे
०९-०८-२०२५
नारळी पौर्णिमा

 

स्रग्धरा
म्रभ्नैर्याना त्रयेण, त्रिमुनियतियुता, स्रग्धरा कीर्तितेयं

मानावा राधिका भा, स्कर नमन यमा, चा यमाचा यमाचा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: