’ नीरा आर्य ’ हे पुस्तक प्रकाशित झाले!
नीरा आर्य (जन्मः ५ मार्च १९०२, खेकडा; मृत्यूः २६ जुलै १९९८, हैदराबाद)
नीरा आर्य, आझाद हिंद फौजेच्या राणी झांशी रेजिमेंटमध्ये कॅप्टन होत्या. त्या महान देशभक्त तसेच अर्वाचीन भारतातील पहिल्या साहसी गुप्तहेर होत्या. आयुष्याच्या अखेरीसचे त्यांचे जीवन हैदराबादेत गेले. तिथे त्या ’पेदम्मा’ म्हणून ओळखल्या जात असत. हे पुस्तक म्हणजे १ जानेवारी १९६६ रोजी प्रथम प्रकाशित झालेली त्यांची आत्मकथाच आहे. स्वतंत्रता आंदोलनाचा ती एक जिताजागता अध्यायच आहे. ”आझादी का अमृतमहोत्सव’ सुरू होताच २०२२ साली तिचे नवे संस्करण हिंदीत प्रकाशित झाले. त्याचाच हा मराठी अनुवाद आहे. तो दिवाळी पाडव्याच्या दिवशी २२-१०-२०२५ रोजी, मिहाना प्रकाशनातर्फे, पुणे येथे प्रकाशित झाला.
साथीच्या रोगात मातृपितृछत्र हरपलेली आठ नऊ वर्षांची नीरा, धर्मपिता छज्जूराम यांनी दत्तक घेतली. सोबत तिचा छोटा भाऊ वसंतही होता. संयुक्त प्रांतातल्या (हल्लीचा उत्तरप्रदेश) खेकडा गावातून ते तिला कोलकात्यास घेऊन गेले. एकदा नदीत बुडत होती तेव्हा तिला स्वतः सुभाषचंद्र बोस यांनी वाचवले होते. पुढे आझाद हिंद सेनेची गुप्तहेर असतांना, ब्रिटिशांच्या हुकुमाने सुभाषचंद्रांना ठार मारण्याकरता आलेल्या, आपल्या स्वतःच्याच नवर्याचा त्यांनी वध केला. तेव्हा सुभाषचंद्रांनीच त्यांना ’नागीण’ हे नाव दिलेले होते.
स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या या चित्तथरारक आत्मकथेचे निवेदन व संपादन महान स्वातंत्र्यसेनानी तसेच थोर लेखक मन्मथनाथ गुप्त यांनी केले आहे. हे कांकेर कांडातील क्रांतिकारक होते. कांकेर कांडात ब्रिटिशांची रेल्वे रोखून केलेली लूट, स्वातंत्र्यसैनिकांनी स्वातंत्र्ययुद्धाकरता शस्त्रास्त्रे जमवण्याकरता वापरली होती.
देशाकरता प्राण वाहून टाकणाऱ्यांची चरित्रे, आपल्याला आपल्या स्वातंत्र्याचे मोल
सांगतात. अशा सर्व अज्ञात देशभक्तांना सादर समर्पित!




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा