२०२५-०२-२५

शतायु संघ संस्कार

रविवार दिनांक २७ सप्टेंबर १९२५, विजयादशमी, या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विधिवत स्थापना झाली. १९२५ च्या विजयादशमीस त्याला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त माझ्या पाहण्यातील संघाची श्रेयसंचिते आणि ’शतायु संघ संस्कारां’चे भविष्यातील स्वरूप यावरचे माझे विचार इथे मांडत आहे. माझ्या अपेक्षाही इथे नमूद करत आहे.

माझे बालपण नागपुरातच गेलेले असल्याने, संघाशी माझा लहानपणापासूनच संबंध आला. माझ्या घरासमोरच संघाची शाखा भरत असे आणि ध्वजही माझ्या घरीच ठेवलेला असे. शिशू, बाल, तरूण म्हणून मी त्याच शाखेचा स्वयंसेवक होतो. खापरीला होणारी संघाची अनेक शिबिरे मला आठवतात. २५ जून १९७५ रोजी आणीबाणी लागल्यावर, संघावर बंदी घातली गेली. ती उठवावी म्हणून सत्याग्रह करायचा निश्चित झाले. त्याकरता कोण कोण सत्याग्रह करणार ते ठरवायला माझ्या घरीही सभा झाल्याचे मला स्पष्ट आठवते. संघाचे ’ऑफिसर्स ट्रेनिंग कँप - ओ.टी.सी.’ रेशीमबागेत भरत असत. कुतुहलाने आम्हीही ते बघायला नेहमीच जात असू. प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष, तृतीय वर्ष शिक्षित स्वयंसेवकच आमच्या शाखेत मुख्यशिक्षक होत असत. मी इंजिनिअरिंग कॉलेजात जाऊ लागलो. तेथीलही दोन प्राध्यापक संघाचे अधिकारी होते. आमच्या शाखेतही ते अनेकदा येत असत.

मनुष्यापाशी सात प्रकारच्या जन्मजात प्रज्ञा असतात. त्यांचा वापर करून निरनिराळ्या सात प्रकारची कौशल्ये विकसित करणे शक्य असते.

भाषा कौशल्य: आपल्या भाव-भावना, संवेदना, विचार, संकल्पना, आशा-आकांक्षा, अपेक्षा, संदेश, संकेत; इतर मनुष्यप्राण्यांस समजावून देण्याचे म्हणजेच बोलून संवाद साधता येण्याचे कौशल्य.

गणितीय कौशल्य: आसपासच्या वस्तू, त्यांचे परिमाण, आकार-प्रकार, संगती-विसंगती, तुलनात्मक निदान, तुलनात्मक प्रमाण; या सार्‍यांचे सापेक्ष गणन व मापन करता येण्याचे कौशल्य. तर्ककौशल्य.

शारीरिक कौशल्य: शारीरिक हालचाली करण्याचे कौशल्य. यात आसन, प्राणायाम, व्यायाम, खेळ, वाद्यवादन, नृत्य, निरनिराळ्या कसरती करण्याचे कौशल्य यांचा समावेश होतो.

सांगितीक कौशल्य: शब्द, स्वर, नाद, ताल, ठेका, गत, लय, गीत, संगीत यांचे ज्ञान, त्यांची निर्मिती, आस्वाद, वर्णन, विश्लेषण, चिकित्सा, अभ्यास, आराधना आणि परस्परांत विनिमय करण्याचे कौशल्य.

कला कौशल्य: चित्रकला, हस्तकला, शिल्पकला, कुंभारकला, चांभारकला, कासारकला, विणकाम, शिवणकला, पणन-विपणन कला, इत्यादी अनेकानेक कौशल्यांचा समावेश होत असतो.

व्यक्ती विषयक कौशल्य: इतर व्यक्तींशी सुसंवाद साधण्याचे कौशल्य. यात प्रेम, मैत्री, नातेसंबंध, कौटुंबिक संबंध तसेच परस्परपूरक संबंध यांचा समावेश होतो.

समष्टी विषयक कौशल्य: व्यक्तीव्यक्तींत संघटन घडवून आणण्याचे कौशल्य. यात व्यवस्थापन, प्रशासन, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, लोककारण, देशकारण, विश्वकारण इत्यादींचा समावेश होतो.

यांपैकी अखेरची दोन कौशल्ये विकसित करण्याचे अत्यंत नेमके प्रयत्न संघशाखांत करण्यात येतात. ’ओ.टी.सी. म्हणजे खरे तर, ऑर्गनायझेशनल ट्रेनिंग कँप’. ’संघटनकौशल्य प्रशिक्षण शिबिर’. याहून समष्टीविषयक कौशल्याचे वर्ग निराळे काही असूच शकत नाहीत. असा माझा समज आहे. गेल्या शंभर वर्षांत व्यक्ती आणि समष्टी विषयक कौशल्यांच्या विकासाचे जे मार्ग संघाने शोधून काढलेले आहेत, ते अपूर्वच नव्हेत तर जगात इतरत्र कुठेही आढळून येत नाहीत असे आहेत. त्यामुळेच तर देशास सशक्त, समर्थ नेतृत्व देण्यात संघ यशस्वी झाला आहे. मात्र भाषा, गणित, शारीर, सांगितीक आणि कला कौशल्यांबाबत असे म्हणता येत नाही. हीही कौशल्ये उपजत बाळगणारे लोक बालवयातच हेरून त्यांचा बहुविध विकास घडवण्याचे कामही संघाला सहजच साधता येईल असे आहे. ’शतायु’ झालेले संघसंस्कार आता ते कामही हाती घेवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भविष्यात संघातून जसे प्रचारक घडतात तसे भाषाभ्यासी, गणिती, शारीरकर्तबकुशल, संगीतज्ञ आणि कलाकुशल लोक निर्माण होऊ लागतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: