विरक्तक म्हणजे अणू अंतर्गत विरक्त कण ज्याला इंग्रजीत न्यूट्रॉन म्हणतात. तसेच मराठीत विदलन म्हणजे इंग्रजीत फिजन. सर्वात अवजड अणूंवर विरक्तक धडकवल्यास घडून येणारी आण्विक प्रक्रिया म्हणजेच विदलन. मात्र विरक्तक धडक प्रक्रियांत, विरक्तकाच्या ऊर्जेवर तसेच लक्ष्य अणुच्या स्थिती व अवस्थेवर अवलंबून पुढील सहा निरनिराळ्या प्रक्रिया घडून येत असतात. अर्वाचीन साहित्यात वैज्ञानिक व्याख्या काव्यबद्ध करण्याचा हा प्रयास अनोखा तर आहेच, शिवाय अपार परितोषजनकही आहे. आपल्या वर्तमानात खंडित झालेल्या, पूर्वापारच्या सनातन सृजन परंपरेचा पाईक ठरणारा आहे.
१.
परस्पर स्वभावांतरण
(ट्रान्सम्युटेशन),
२.
अनावरण आणि उचल (स्ट्रिपिंग
अँड पिक-अप),
३.
विदलन (फिजन),
४.
विखंडन (स्पॅलेशन),
५.
विदारण (फ्रॅगमेंटेशन) आणि
६.
विखुरण (स्कॅटरिंग)
या सहाही प्रक्रियांची वर्णने इथे काव्यात बांधण्याचा प्रयत्न केला आहे. काव्यात का? तर कमीत कमी शब्दांत सुबोध विवरण करण्याचा तोच एकमेव मार्ग आपल्या सांस्कृतिक परंपरेने आपल्याला दिलेला आहे. ’विदलन’ प्रक्रियेचे वर्णन ’मालिनी’ वृत्तात (अक्षरे-१५, यती-८, ७, लक्षणगीतः नमन नमन माना, वा यमाचा यमाचा) केलेले आहे. ते वगळता, इतर सर्व वर्णने ’शार्दूलविक्रीडित’ वृतात (अक्षरे-१९, यती-१२, ७, लक्षणगीतः मानावा समरा जनास समरा ताराप ताराप गा) केलेली आहेत.
जेव्हा घात विरक्तका धडकुनी केंद्रा अणूच्या घडे
तो र्हासा मग सोसतो निरनिराळ्या प्रक्रियांनी सहा ।
सार्या त्या धडका इथेच बघु या होती कधी कोणत्या
नावे ठेवत लोक ती ’विदलना’, व्याख्या न या जाणता ॥ १ ॥ - ६-विरक्तक-धडक-प्रक्रिया
आपातीच विरक्तकास गिळुनी, मोठा अणू होतसे
होई अस्थिर तो मिळून सगळी, दोन्हींचि ऊर्जा तिथे ।
गाठाया स्थिरता त्यजून किरणे, होती ’स्वभावांतरे’
होई नष्ट मुळातला अणु, अणू ना पाहिलेला घडे ॥ २ ॥ -
स्वभावांतरण
जेव्हा कोन असा असे, न धडका होती, परी स्पर्शुनी
आपाती कण जाय, ओझरतची लक्ष्यास तो चाटुनी ।
तेव्हा तो विजकांस बाह्य ’उचली’, लक्ष्याचिया वेचुनी
या ऐशा घटना ’अनावरण’ या नावेच संबोधती ॥ ३ ॥ - अनावरण आणि
उचल
’विदलन’ घडवीते सारखे दोन खंड
विरजित कण दो वा तीन होतात मुक्त ।
सुटत बहुत ऊर्जा तीव्र या प्रक्रियेत
हर
विदलनि ऊर्जा वीस कोटी विवोत ॥ ४ ॥ - विदलन
विवो – विजक वोल्ट, हे ऊर्जेचे एकक आहे. ही ऊर्जा ४.४५ x १०-२६ किलोवॉट-अवर म्हणजे विज एककांच्या समकक्ष असते.
विरजित कण- विरक्तक, न्यूट्रॉन
जेव्हा कोन सुसंगती, धडकही हो थेट दोघांतली
होते पूर्ण ’विखंडना’ घडत ती ऊर्जांत स्थित्यंतरे ।
तेव्हा होत असे ’विदारण’, घडे दोन्ही कणांचा भुगा
आहे ही सगळ्यांत तीव्र घटना ऊर्जाहि सर्वाधिका ॥ ५ ॥ - विखंडन
आणि विदारण
सोसे घात विरक्तकास भिडता, जो तुल्यभारी अणू
तो तेव्हा सहसा स्वतःच ’विखुरे’, ऊर्जा तया देउनी ।
होते ही घटना असेल तुळती ऊर्जा अणूची यदा
आहे हे समजा ’विखूरण’, बसे धक्का अणूला तदा ॥ ६ ॥ - विखुरण
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा