20210213

अर्वाचीन दंतकथा

१९८०-९० दरम्यानचा काळ होता. मी मुंबईत नोकरी लागल्याने लोकलने मुंबईस जाऊ लागलेलो होतो. संध्याकाळी लोकलमधून परततांना एक सरदारजी मोठ्या मोठ्याने बोलत जाहिरात करत असे, “आपने सुना होगा। एक सरदारजी लोकल में आता है। दुखता दांत तुरंत निकाल देता है।अशा प्रकारे तो स्वतःची जाहिरात स्वतःच करत असे. कमालीच्या दांतदुखीने त्रस्त असे लोक रोजच लोकलने प्रवास करत असतात. असा त्याचा अनुभव होता. अत्यंत किरकोळ मोबदल्यात तो दुखरा दात, सहज काढून हातात देत असे. अशा घटना नजरेसमोर घडल्याचे अनेकांनी पाहिलेलेही होते. थोडक्यात काय की, लोकलने प्रवास करणार्‍यांचे दातांचे दुःख निवारण्याचे अत्यंत लोकोपयोगी कार्य तो किरकोळ रकमेत सहजच करून देत असे. मात्र दातांचे दुःख नाहीसे झाल्याची खबर कानोकान लागत नसे. इतर सर्व प्रवासी जणू काही, काही घडलेच नाही असे, आपापल्या घराकडे वाट चालत असत. निराळे काही घडले आहे अशी खुटखुट कुणालाही, कधीही लागतच नसे.

आता एकविसाव्या शतकातील एकविसावे वर्ष सुरू झाले आहे. काळ करोनाचा आहे. खरे तर गेल्या जानेवारीपासूनच माझे काही दात दुखत असत. सुरूवातीस दातांचे सर्वच दवाखाने बंद होते म्हणून माझा अगदीच निरुपाय झाला. मग कुठे विको वज्रदंतीने दात घास, कुठे वेदनाशामक गोळ्या खा, कुठे निर्जंतुकीकारक औषधे वापर, कुठे आवळ्याची सुपारी दातांत धरून ठेव असल्या घरगुती उपायांनी दुःख सोसले. जरा कुठे दातांचे दवाखाने उघडल्याची कुणकुण लागली तेव्हा ताबडतोब कौटुंबिक दंतवैद्याकडे, ’केवळ वेळ ठरवूनच (ओन्ली बाय अपॉन्टमेंट)’ आधारावर अनेक खेपा करून दुःख आटोक्यात आणले. इतर अनेक दातांना पडलेली मोठाली भगदाडे बुजवून झाली. अनेकांवर दंतमूळोपचार (रूट कॅनॉल ट्रिटमेंट) करून झाले. मात्र खालच्या अखेरच्या (अक्कल) दाढेला वाचवण्याचे कोणतेही उपाय उपलब्ध नाहीत, अशी गुप्त वार्ता अखेर बाहेर पडलीच. बरे बाबा. मग करा एकदाची तिची माझी फारकत! अनेकदा माझे अहितचिंतक माझी ’अक्कल’ काढतच असतात! आता तुम्ही अक्कलदाढच काढून टाका म्हणजे या दुःखातून सुटका होईल एकदाची. असे साकडे मी माझ्या कौटुंबिक दंतवैद्यास घातले. त्यावर मला नव्यानेच कळले असे की, ते त्यातले तज्ञ नाहीत. दातांची शल्यक्रिया (सर्जरी) करणारे निराळेच असतात. त्यांनी तशा विशेषज्ञांचे नाव पत्ता देऊन मला बोळवले.

मग विशेषज्ञांची वेळ घेणे आलेच. आता प्रत्येक ठिकाणी मुस्की बांधून जाणे. तिथे हस्तधावन करवून घेणे. शरीरातीलप्राणाची (ऑक्सिमीटरने मोजतात त्या हो) त्यांना खात्री करवून देणे. या गोष्टी तर कराव्याच लागतात. तेव्हा त्याबद्दल निराळे काय सांगायचे. मग केवळ परिस्थितीचे अवलोकन करायलाच ’विशेष’ मानधन खर्ची घालून, त्यांचे मत जाणून घ्यावे लागले. त्यांनी घोषित केले की, मी योग्य तज्ञाकडेच आलेलो आहे. मात्र उपचारांची वेळ काही द्यायला तयार नाही. मी विचारले का? तर म्हणे, ’अखेर ही शल्यक्रिया आहे! तुमच्या शारीरिक परिस्थितीला मानवेल की नाही, याबाबत एका ’शरीररोग विशेषज्ञा’ची शिफारस आणा. सोबतच काही रक्ततपासही करवून घ्या. ही घ्या यादी. हे सारे अहवाल मग मला ’कायप्पा (मराठीत वॉटसॅप)’ वर पाठवा. लगेचच आपण वेळ ठरवून टाकू. अशा प्रकारे मला अत्यंत सोपे वाटणारे प्रकरण, हळूहळू पण निश्चितपणे क्लिष्ट होत चालले होते.

आता शोध करावा लागला एका ’शरीररोग विशेषज्ञा’चा. तोही तपास लागला. प्रयत्न केल्यास काय साध्य होत नाही. मग त्यांचीही वेळ ठरवून भेट घ्यावी लागली. पुन्हा हस्तधावन. पुन्हा ’प्राण’निश्चिती. पुन्हा मुस्की बांधून रांगेत प्रतीक्षा. सारे यथावकाश पार पडल्यावर ’विशेषज्ञां’समोर पेशी झाली. त्यांनी स्वतः ’सर्वांगाच्छादक व्यक्तिगत सुरक्षा कवचात्मक पोशाख (यालाच शुद्ध मराठीत ’पी.पी.ई.किट’ असा सुटसुटित शब्दही आहे खरे तर!) घातलेला होता. चेहर्‍यावर ’उत्सर्ग प्रतिबंधक सुरक्षा ढाल (म्हणजे ’फेस शिल्ड’ हो) चढवलेले होते. टेबलाच्या मागे ते बसलेले. समोर आम्ही. मध्ये ’अप्रत्यास्थाचा (प्लॅस्टिकचाच खरे तर)’ पारदर्शक पडदा उभारलेला. त्यांनी ’शल्यक्रियेपूर्व स्वस्थता (प्री-सर्जिकल फिटनेस)’ असण्याबाबतची आमची गरज, पूर्ण अनुकंपेने जाणून घेतली. काळ ’कोरोना’चा असल्याची समज दृढ करून दिली. रोज कोणती औषधे घेता, कधीपासून सुरू झाली इत्यादींची झाडाझडती घेतली. मग शारीरिक तपास हाती घेतला.

तपासटेबलावर आडवे व्हा. दीर्घ श्वास घ्या. सोडा. रक्तदाब मोजा. रक्तदाबाचा इतिहास जाणून घ्या. छातीत दुखते का विचारा. स्पंदसंवेदक (स्टेथोस्कोप) पाठीवर ठेवून श्वासोच्छ्वासाचा वेध घ्या. दम लागतो का विचारा. चेहर्‍यावर सूज दिसते का पाहा. पायावर सूज आहे का तपासा. मधुमेह आहे का माहीत करून घ्या. हे सारे बैजवार नोंदवा. हृदयालेख (ई.सी.जी.) काढा. क्ष-किरणचित्र काढा. म्हटलं दंतवैद्यांनी काढले आहे. नाही! छातीचे. मी म्हटलं, दात काढायचा आहे हो! तरीही छातीचे क्ष-किरणचित्र काढावेच लागेल. मूत्रतपासही करावाच लागेल. एवढेच नाही तर ’कोविड’ नसल्याची खात्रीही करवून घ्यावीच लागेल. असा अमूल्य सल्ला हाती आला.

मग रीतसर रक्ततपास, क्ष-किरण तपास सगळ्यांच्या वेळा घेतल्या. सगळ्या ठिकाणी मुस्की बांधून जाणे. तिथे हस्तधावन करवून घेणे. शरीरातीलप्राणाची त्यांना खात्री करवून देणे ओघानेच आले. अहवाल मिळण्याच्या वेळा सांगितल्या गेल्या. मोबदला आधीच रोख वसूल करण्यात आला. यथावकाश अहवालही हाती आले.

इतर चाचण्यांचे ठीक आहे. मात्रकोविडचीआर.टी.पी.सी.आर’ नावाची चाचणी केल्यापासून जिवाला घोरच लागला. काळच असा होता. ’कोविड’ची चाचणी करवून घेतली आणि जर तिचा निष्कर्ष ’होकारात्मक’ असेल तर घरी फोनच येत असे महापालिकेचा. माझी चाचणी शनिवारी झालेली. अहवाल सोमवारी सकाळी ११ वाजता मिळणार होता. मात्र महापालिकेचा फोन कधीही येऊ शकत होता. लोक तर असेही सांगत होते की, ’कोविड’ नसलेल्यालाही हेतुतः आहे असे सांगतात. भरती करवून घेतात. खासगी रुग्णालयात भरती होण्याचे सल्ले देतात. खासगी रुग्णालयांतून ’४० लाख रुपयांचे बिल आले!’ असे दाखलेही देत असत. त्या न आलेल्या संकटाच्या धाकाने जीव उतू आला होता. मात्र रविवार संध्याकाळपर्यंत तरी फोन आला नाही. नंतर त्यांचे कार्यालय बंद होत असेल, असा मी समज करून घेतला. तर ’असं काही नाही, काही जणांना अपरात्रीही फोन आलेले आहेत’ असे सांगून सख्ख्या निकटवर्तियांनी माझी झोप उडवून लावली.

सोमवारी यथावकाश अहवाल हाती आले. डॉक्टरांच्या बोलावण्याची प्रतीक्षा होती. अधाशीपणेकोविडचा अहवाल आधी उघडला. ’निगेटिव्हपाहून हायसे झाले. निरपराधित्वाचे प्रमाणपत्रच मिळाले जणू. त्या आनंदात क्षणभर का होईना, दुखर्या दाताचाही विसरच पडला होता.

मग सारे आरोग्यचाचण्यांचे अहवाल हाती घेऊन ’विशेषज्ञां’समोर पेशी झाली. सारे अहवाल उत्तमच होते. असे वाटले की, आता दात काढायची अनुमती मिळणार! मग प्रत्यक्ष शारीरिक तपासाला सुरूवात झाली. रक्तदाब मोजला गेला. तो तर एवढ्या पातळीला पोहोचलेला होता की, शुश्रुषालयात भरती होण्यास पात्र व्हावे.

गेल्या जानेवारीपासून सुमारे वर्षभरात माझी दिनचर्याच बदललेली होती. गेल्या जानेवारीत मी नागपूरला माझ्या शाळेत व्याख्यान देण्याकरता गेलेलो होतो. ४६ वर्षांनी माझ्या शाळेला भेट दिली होती. मग लागोपाठ वेळणेश्वरलाही यशस्वीरीत्या भेट दिली होती अभियांत्रिकीच्या मुलांना उपकरणन शिकवायला. सलग आठवड्याभराचा दीर्घ प्रवासांनी भरलेला कार्यसंपृक्त कार्यक्रम मी, थंडी, दगदग, बदलते विविधरंगी कार्यक्रम भरलेले असूनही, लीलया पार पाडलेला होता. सांगायचे एवढेच की, मी तेव्हा कमालीचा स्वस्थ (फिट्ट) होतो. औषधाने का होईना रक्तदाब १००/७० राहत असे. रोज सुमारे १० किलोमीटर चालत असे. खूप अनुवाद करत असे आणि अनुसरलेली जीवनशैली कसोशीने पाळत असे.

नंतर करोनाचे पदार्पण झाले. कसे कोण जाणे पण दररोजचे चालणे अचानकच बंद झाले. फावला वेळ उरू लागला. वामकुक्षीत भर करू लागला. जेव्हा करायला काहीच नसते तेव्हा खाण्यापिण्याचे लाड बहरास येतात. मग तेही झाले. कशी कोण जाणे, पण हळूहळू आणि निश्चितपणे माझी स्वस्थता खचत खचतच गेली. दातदुःखीने उच्छाद मांडला.

दर्द मिन्नतकश--दवा न हुआ।
मै न अच्छा हुआ, बुरा न हुआ॥ [१]

म्हणजे 

दुःख औषधास मिंधे झाले नाही।
मी बरा झालो नाही, वाईट झाले नाही॥ 

अर्थ असा की, दातदुखी उपायांना दादच देत नव्हती. मी बरा होत नव्हतो, तेही एका अर्थाने वाईट झालेच नाही. चांगलेच झाले. कारण त्यामुळे माझ्या स्वस्थतेची अस्वस्थ अवस्था उघड झाली. रक्तदाबाची औषधे खूप वाढवली गेली. आठवड्याभराने रक्तदाब नियंत्रणात आला. दात काढायची रीतसर अनुमती मिळाली. अर्थात जी स्वस्थता दीर्घकालीन जीवनशैली-परिवर्तनांनी [२] कष्टपूर्वक अर्जिली होती ती, पुन्हा औषधांच्या भडिमारात अडकलेली पाहून खूप दुःख झाले. त्यातून बाहेर येण्याचे उपाय ठाऊक होतेच. आता ते तातडीने अंमलात आणायचा निर्धार झाला. कालांतराने त्याचे परिणामही दिसू लागतील. त्याकरता निदान महिनाभर तरी सातत्य टिकवण्याचे आव्हान समोर होतेच. सध्या मात्र वाढत्या औषधांशी मैत्री करून दंतकथेचा अंत करण्याची वेळ येऊन ठेपली होती.

अक्कलदाढ असते एकदम खोलात. जबड्यात खोलवर, अखेरची जागा मिळालेली. ती काढायची तर अवजारे चालवायलाही खूप अपुरी जागा. शिवाय तोंडाच्या आत खोल जावे तसतसा वाढता अंधार, नेमकी जागाच अंधारी करून टाकत असतो. मात्र आधुनिक दंतशास्त्राच्या अद्वितीय आविष्कारांनी हे काम खूप सोपे झाले आहे. खोलवर पोहोचणारे प्रखर उजेड, अत्यंत सूक्ष्म पण कणखर प्रकाराची टणक शस्त्रास्त्रे, रुग्णाला वैद्यासमोर हव्या त्या अवस्थेत आडवा करण्याची अद्भूत सोय असलेली त्रिमिती-अवस्था-परिवर्तनशील खुर्ची, दातावर प्रखर दाब देऊन आणि त्यास तीव्र वारंवारितेची स्पंदने पुरवून हिरडीच्या मांसल कोंदणातून विलग करण्याकरताचे स्वयंचलित स्पंदक, हे सारे अत्याचार त्या नाजूक हिरडीवर करतांना त्यात सर्वत्र विखुरलेल्या मज्जातंतूंनी मेंदूस या वाढत्या दुःखाचा सुगावाही लागू देऊ नये याकरता स्थानिक भूल देण्याकरताच्या विविध औषधी सूक्ष्म टोचणीने इष्ट स्थानी पावती करण्याची आयुधे हे सारे वैद्यकीय तंत्रज्ञानाने पुरवले आहे. अत्यंत खर्चिक तरीही आता उपलब्ध झालेल्या या सोयींचे आभार मानावेत तेवढे थोडेच. आता हे सारे असूनही प्रत्यक्षात दाढ तर दंतवैद्यालाच काढायची असते. वरील सामुग्री वापरण्याचे त्याचे कौशल्यच दुःख नियंत्रण करणार असते. दात काढायला लागणारा वेळ कमी जास्त करणार असते. दात काढल्यावर रक्तस्त्राव होणारच असतो. त्याला आवर घालावा लागणारच असतो. त्यावरही ती कौशल्येच ताबा मिळवणार असतात.

तेवढ्या खोलातील अंधारी जखम, रक्तलांछित हिरड्यांचा शोध घेत, अत्यंत सूक्ष्म सुई आणि कमालीचा सडपातळ, पण सशक्त दोरा वापरून शिवावी लागते. याबाबतीत मी अत्यंत सुदैवी होतो. माझ्या दंतवैद्यांनी अपवादात्मक कौशल्ये प्राप्त केलेली होती. गरजेचा वेध घेत नेमक्या जागी नेमक्या प्रमाणात भूल देण्याची; शस्त्रास्त्रे आणि स्वयंचलित स्पंदक वापरण्याची; जरूर पडताच अत्यंत कोमल हालचालींतून, प्रबळ दाब देता येण्याची; आधार सुटलेला दात अलगद उकरून काढण्याची; मागे राहिलेली जखम रक्तमुक्त करण्याची आणि सगळ्यात कहर म्हणजे घटनास्थळीच ती जखम शिवून टाकण्याची सर्वच कौशल्ये त्यांनी खूप वापरली. तासाभराचे जणू काय युद्धच, सहजपणे खेळून, त्यांनी रुग्ण हातावेगळा केला होता. पुढचा रुग्ण हाती घेण्यास त्या सिद्ध होत्या. सावधचित्त, स्वस्थचित्त आणि दत्तचित्तही.

त्यांच्या स्वाध्यायाने सिद्ध केलेल्या अपवादात्मक कौशल्यांमुळे मी स्तिमित झालो आहे. आपला समाज ज्या अत्यंत अवघड प्रश्नांची उत्तरे शोधत असतो, त्यातील एका खूपच अवघड प्रश्नाचे त्या उत्तर आहेत! माझ्या साठा उत्तरांच्या दुःखास, पाचा उत्तरांत आवर घातल्याखातर मी त्यांचा ऋणी आहे!!

१९८५ साली दीड रुपयात चालत्या लोकलमध्ये दुखरा दात क्षणार्धात उपटून हातात देणारा सरदारजी कुठे आणि २०२१ साली दाताचे दुःख परवडेल अशी प्रतीक्षेची दुःखे गाठी बांधून, हजारो रुपयांनी खिसा खालसा करणारी अत्याधुनिक वैद्यकीय व्यवस्था कुठे! मात्र आधुनिकतेच्या शोधात हाती केवळ दुःखच आले की काय? असा जो समज, वरील लेखाने निर्माण होण्याची दाट शक्यता आहे, त्याला दुसरीही सुखकारक सोनेरी कडा आहे.

याच आधुनिकतेच्या शोधात मला वेदनारहित, रक्तपातविहीन दुःखमोचनाच्या अनमोल उपायांचा शोध लागला होता. जबड्याच्या खोल अंतरात अक्कलदाढ काढल्यावर उरलेल्या भळभळत्या जखमेस अपवादात्मक कौशल्याने सत्वर शिवता येते हे ज्ञान झालेले होते. माझ्या ’अर्वाचीन दंतकथे’ला अपेक्षित असलेला सुखान्त शेवट लाभला होता. शरीरात वर्धमान असलेल्या हृदयविकारादी प्रबळ शत्रुंच्या कटकारस्थानांचा सुगावाच काय, पण पक्का पुरावा हाती आलेला होता. ती लढाईही आता हाती घेता येणार होती. हे सारेच लाभ मला झाले आहेत. मात्र ते सारे लाभ हाती पाडून घेतांना दुर्दैवाने गमावलेल्या ’अक्कलदाढेने’ दिलेली ही ’अक्कल’ आपणा सुहृदांस सादर करत असतांना मला कृतकृत्यतेचे समाधान वाटत आहे![१] मिर्झा गालिब (जन्मः २७ डिसेंबर १७९७, आग्रा; मृत्यूः १५ फेब्रुवारी १८६९, दिल्ली) http://kavitakosh.org/kk/%E0%A4%97%E0%A4%BC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AC

[२]  माझे जीवनशैली परिवर्तन https://drive.google.com/file/d/0B3nBnL96VGVgSURMdV9kanhpRWs/edit?usp=sharing

 

No comments: