२०२३-०४-१४

डॉ. वासुदेव नारायण बेडेकर

 डॉ. वासुदेव नारायण बेडेकर 
(जन्मः २०-०२-१९१७, मृत्यूः १४-०४-२००४) 


ठाण्याच्या विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक असलेले डॉक्टर बेडेकर हे ठाणे शहराचे एक भूषण आहेत. त्यांच्याच प्रेरणेने ठाणे भारत सहकारी बॅंकेचीही स्थापना झाली. ठाण्यातील विद्याप्रसारक मंडळ, म्हणजे डॉक्टरांनी लावलेला एक ज्ञानदीपच होय.

विद्याप्रसारक मंडळाचे बोधवाक्यही
प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः
असेच आहे. ब्रम्हपुराणात व्यासांना वंदन करतांना आलेल्या पुढील श्लोकातून ते घेतले आहे. 


मूळ संस्कृत श्लोकः

नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र ।
येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः ॥ - उपजाति, ब्रम्हपुराण-२४६.११ 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२००४०८

उत्फुल्ल पद्मासम नेत्रवंता प्रदिप्तबुद्धा नमस्कार व्यासा ।
स्वये जये चेतविला दिवाची तुला पुरा भारत ज्ञात व्हाया ॥ - उपेंद्रवज्रा, ब्रम्हपुराण-२४६.११ 

डॉक्टर साहेबांच्या स्मृतीदिनी त्यांच्या स्मरणार्थ रचलेले हे शब्दचित्र.

विद्याप्रसारक मंडळः एक ज्ञानदीप (भुजंगप्रयात)

कसे स्वास्थ्य आरोग्य येथे असावे । कळण्यास तू वैद्य झालास कष्टे ॥
मिळावे कसे ज्ञान जो प्रार्थि त्याला । प्रशाला तुवा स्थापिली हे कराया ॥ १ ॥

असो स्वास्थ्य वा शिक्षणाची व्यवस्था ।
स्वतः कष्ट घेऊन केली उभी ती ॥
अवस्था सुधारार्थ जी सिद्ध केली । खरे स्वास्थ्य दे, ज्ञान दे, पुष्टि दे ती ॥ २ ॥

व्यवस्थापनाची पुढे जाण आली ।
समाजास दे ज्ञान ती सोय केली ॥
समाजात संस्थापुनी त्या व्यवस्था । समाजास जे लागले ते दिलेही ॥ ३ ॥

महाभारताच्या जयाच्या कथेला । रचोनी जसा लावला दीप व्यासे ॥
प्रसारार्थ विद्येचिये, मंडळासी । तुवा स्थापुनी रे दिवा लावलासी ॥ ४ ॥

समाजा जसे लागले जे तसे त्या ।
मिळो सर्व काळी, असे साधले त्वा ॥
तुझे कार्य नेती पुढे शिष्य तेही । नमू वासुदेवा, नमू मंडळाही ॥ ५ ॥ 

२०१७ हे वर्ष त्यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. १९३५ साली डॉ. वासुदेव नारायण बेडेकर यांनी ठाणे येथे विद्या प्रसारक मंडळाची स्थापना केली. प्रज्वलितः ज्ञानमयः प्रदीपः हे बोधवाक्य घेऊन त्यांनी आयुष्यभर विद्याप्रसाराचे कार्य केले.

अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या मनुष्याच्या तीन प्राथमिक आणि जीवनावश्यक गरजा. अर्थशास्त्रीय नियमाप्रमाणे कोणत्याही गरजा भागवण्यासाठी प्रयत्नांची गरज असते. प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने प्रयत्न करीत आपल्या कुटुंबाच्या गरजांचे समाधान करण्याचे प्रयत्न करते. पण हे सर्व प्रयत्न कौटुंबिक पातळीपुरते मर्यादित असतात. ठाणेकरंच्या नशिबाने ह्या सर्व गरजा सामाजिक पातळीवर भागवण्यासाठी सहा सात दशके स्वतःस समर्पित करणारे डॉ. वा. ना. बेडेकर, त्यांना लाभले.

कोणत्याही गरजांची पुर्ती करण्यासाठी शारीरीक आरोग्य आणि मानसिक सुदृढता असावी लागते आणि ह्या दोन गोष्टी प्राप्त झाल्यावर नोकरी किंवा व्यवसाय ह्याद्वारे अर्थाजन करावे लागते. डॉक्टरांना ह्या गोष्टीची अचूक जाण असल्याने त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य, समाजाचे आरोग्यरक्षण, शिक्षण आणि नोकरी-व्यवसाय ह्यासाठी खर्च केले.

वैद्यकीय पेशा स्वीकारल्याने निरोगी समाज निर्माण करणेही अंगभूत जबाबदारी त्यांनी स्वीकारली तथापि वैद्यकीय व्यवसाय डॉक्टरांनी धंदा म्हणून नव्हे तर धर्म म्हणून जोपासला. सध्याच्या काळात लोप पावलेली फॅमिली डॉक्टर ही संकल्पना त्यांनी आयुष्यभर राबवली, याची साक्ष अनेक ठाणेकर देतील.

वैद्यकीय क्षेत्राबरोबर डॉक्टरांनी ठाण्याच्या शैक्षणिक विकासासाठी अविरत प्रयत्न केले. अर्धशतकाहून अधिक काळ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्षपद संभाळताना डॉक्टरांनी, गोठ्यातील शाळेचे पूर्व प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण, मराठी तसेच इंग्रजी माध्यमातुन शिक्षण उपलब्ध असणार्‍या जनमान्य संस्थेत रुपांतर केले. चिखलातून कमळ उमल्याप्रमाणे ठाणा खाडीच्या दलदलीतून ज्ञानद्वीप निर्माण होण्यामागची खरी प्रेरणा डॉक्टरांचीच होती. पाचशे विद्यार्थी संख्येने सुरू झालेले स्थान, आज पंधरा हजारांवर विद्यार्थ्यांना कला, वाणिज्य, विज्ञान, विधी, तंत्रज्ञान, व्यवस्थापन, ग्रंथालय विज्ञान इत्यादी विविध विद्याशाखांचे पदवी व पदव्यूत्तर पातळीवरचे ज्ञानदान करत आहे. केवळ ठाण्यातीलच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातील हे एक आघाडीचे ज्ञानसंकूल बनले आहे. ही किमया डॉक्टरांच्या दूरदृष्टीची आणि अविरत कष्टांची आहे.

सहकारक्षेत्र आणि विषेषतः सहकारी बँकांबद्दल एकूण जनसामान्यात अविश्वासाचे वातावरण असणार्‍या काळात ठाण्यात आणखी एक सहकारी बँक स्थापन करणे म्हणजे काहींच्या मते वेडेपणाच होता, पण विशिष्ठ उद्दीष्टांनी प्रेरीत झालेली वेडी माणसे असल्याशिवाय समाजाची प्रगती होत नसते. अत्यल्प भांडवल आणि ठेवी ह्यांच्या पायावर सुरू झालेली ठाणे भारत सहकारी बँक उण्यापुर्‍या पंचवीसवर्षात एक आघाडीची बँक झाली आहे. ह्या बँकेने अनेकांना रोजगारप्राप्त करून देताना त्यांच्यातील उद्यमशीलतेला अर्थाची जोड दिली आहे.

डॉ वा. ना. बेडेकर हे नाव शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असून त्यांचे या क्षेत्रातील झालेले कार्य पाहता त्यांना शिक्षणमहर्षी असे म्हटले तर वावगे ठरू नये. त्यांनी विद्याप्रसारक मंडळाची अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळत व अनेक निष्ठावंतांच्या सहकार्यामुळे हिमालयाएवढे उत्तुंग कार्य केले. त्यांचा पेशा हा डॉक्टरी असल्यामुळे जसे त्यांनी अनेक अपत्यांना जन्माला आणले. त्याप्रमाणे मराठी व इंग्लिश माध्मय शाळा, कला, वाणिज्यविज्ञान महाविद्यालये, तंत्रनिकेतन, व्यवस्थापन विभाग ही सगळी त्यांची अपत्ये आहेत.

१९७४ साली व्यवस्थापन विभाग स्थापन झाला. १९९९-२००० या शैक्षणिक वर्षात पदव्युत्तर कोर्स (पीजी डी बी एम) सुरू केला. तेव्हापासून व्यवस्थापन विभागाने कात टाकली. आज ही संस्था अखिल भारतीय तंत्रशिक्षण मंडळ या संस्थेकडून मान्यता मिळालेली संस्था म्हणून दिमाखदारपणे उभी आहे. या सगळ्यांमागे डॉक्टरांची प्रबळ इच्छाशक्ती कारणीभूत आहे. ते स्वतः गमतीने म्हणायचे, मीसुध्दा व्यवस्थापन कोर्स करण्याचा विचार करीत आहे. पुढे विद्या प्रसारक मंडळाच्या कार्यकारिणीने व्यवस्थापन विभागाला त्यांचे नाव देण्याचे ठरविले व त्याचे नामकरण डॉ. वा. ना. बेडेकर संशोधन व व्यवस्थापन अभ्यास संस्था असे ठेवले.

डॉक्टर त्यांच्या वयाचा विचार न करता कष्ट करत असत. तरुण मंडळींना लाज वाटावी एवढे अथक परिश्रम त्यांनी व्यवस्थापन विभागाच्या जडण-घडणीत घेतले. इमारतीसाठी निधी उभा व्हावा म्हणून त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, सोव्हिनीअरसाठी जाहिराती मिळविणे यासाठी त्यांनी वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन केले. प्रसंगी त्यांनी त्यांचा ओळखीच्या व्यक्तीकडे जाऊन निधी संकलनासाठी मदत केली. एवढेच नव्हे तर त्यांनी स्वतः एक्याऐंशीव्या (८१) वाढदिवसासाठी मिळालेली ८१,०००/- रुपयांची थैलीसुध्दा व्यवस्थापनाच्या इमारतनिधीसाठी दान केली. यावरून त्यांचा मनाचा मोठेपणा व संस्थेशी त्यांची असलेली आपुलकी लक्षात येते.

विद्या प्रसारक मंडळाचे वर्तमान संचालक डॉ. विजय बेडेकर हे विद्या प्रसारक मंडळाच्या सगळ्या संस्थांना आपल्या बरोबर घेऊन मोठी झेप घेत आहेत. विद्या प्रसारक मंडळाच्या महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यंदाच्या सर्वच उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला आहे. विद्या प्रसारक मंडळाच्या या महाविद्यालयाबाबतच्या सर्वच उद्दिष्टांना भविष्यात देदिप्यमान सुयश लाभो हीच ह्यानिमित्ताने हार्दिक शुभकामना!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: