२०२३-०९-२८

भारतीय हरितक्रांतीचे जनक आणि वनस्पतीवंशतज्ञ एम.एस.स्वामिनाथन यांचे निधन!

भारतीय हरितक्रांतीचे जनक आणि वनस्पतीवंशतज्ञ एम.एस.स्वामिनाथन  
(जन्मः ०७-०८-१९२५, कुंभकोणम;
मृत्यूः २८-०९-२०२३, चेन्नई)

यांचे आज वयाच्या ९८ व्या वर्षी, चेन्नई येथे निधन झाले! त्यानिमित्ताने हरितक्रांतीबाबत लिहिलेल्या या लेखाचे पुनःप्रसारण!!

 हरितक्रांती

भारतातील शेतीत, सुधारित शेतकी तंत्रज्ञान आल्यामुळे खूप अधिक उत्पन्न मिळू लागले. भारतासारख्या विकसनशील राष्ट्रास त्यामुळे बद्धमूल अन्न तुटवड्यावर मात करणे शक्य झाले होते. उच्च-उत्पन्न-वाणांच्या लागवडीद्वारे आणि आधुनिक शेतीतंत्रांमुळे १९६० च्या सुमारास ह्या क्रांतीची सुरूवात झाली. भारतात विशेषतः पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात ह्या काळात, उच्च-उत्पन्न-वाणांच्या गव्हाचे विकसन झाले. त्या कार्यात अमेरिकन शेतीतज्ञ डॉ.नॉर्मन बोरलॉग आणि भारतीय वनस्पतीवंशतज्ञ एम.एस.स्वामिनाथन ह्यांचे योगदान महत्त्वाचे ठरले. भारतीय कृषी संशोधन संस्थेने गव्हाच्या जाती विकसित करून ह्या कामात मोलाची भर घातली. उच्च-उत्पन्न-बियाण्याच्या -संकरित बियाण्यांच्या- वापराने, रासायनिक खतांमुळे आणि सुधारित सिंचनपद्धतींमुळे अन्नधान्य उत्पादनाच्या क्षेत्रात देश स्वावलंबी झाला. ह्या घटनेस ’हरित क्रांती’ संबोधले जाऊ लागले. देशातील ओलिताखालील तसेच कोरडवाहू क्षेत्रांत, अधिक उत्पन्न देणार्‍या, संकरित आणि बुटक्या पिकांच्या बियांण्यांचा उपयोग करून उत्पादनात वाढ घडवून आणणे हेच ह्या क्रांतीचे उद्दिष्ट होते. आजही ह्या दृष्टीने सतत संशोधन होत असते.








१९६० नंतर पारंपारिक शेतीचे आधुनिकीकरण करण्यासाठी जे विकासकार्यक्रम हाती घेण्यात आले, त्यांच्या फलस्वरूप ही क्रांती घडून आली. हिचे सकारात्मक परिणाम एवढे सत्वर, झपाट्याने आणि आश्चर्यकारकरीत्या घडून आले होते की; नियोजनकार, कृषीतज्ञ व राजकारणी लोकही ह्या बदलास ’हरित क्रांती’ असेच संबोधू लागले. ह्या क्रांतीमुळे भारतीय शेती, अन्नधान्याच्या तुटवड्यापासून, तर पुरून उरणार्‍या, शिलकी उत्पादन-स्तरावर जाऊन पोहोचली होती.

हरित क्रांतीचा पहिला टप्पा (१९६६-६७ ते १९८०-८१) आणि दुसरा टप्पा (१९८०-८१ ते १९९६-९७) संपून, आता तर तिसरा टप्पाही संपत आला आहे. केंद्र सरकारचे ’नवे राष्ट्रीय कृषी धोरण’ २८ जुलै २००० रोजी घोषित केले गेले आहे. ह्या धोरणात २०२० पर्यंत, दरसाल ४% वाढीचे लक्ष्य समोर ठेवण्यात आलेले आहे. नव्या धोरणाचे वर्णन ’इंद्रधनुषी क्रांती’ च्या रूपात केले गेले आहे. ह्यात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या ’हरित क्रांती (खाद्यान्न उत्पादन)’, ’धवल क्रांती (दुग्धोत्पादन)’, ’पीत क्रांती (तीळ उत्पादन)’, ’नील क्रांती (मत्स्योत्पादन)’, ’रक्त क्रांती (मांस उत्पादन), ’सुवर्ण क्रांती (सफरचंद उत्पादन), ’शामल क्रांती (उर्वरक उत्पादन), ’करडी क्रांती (अपारंपारिक ऊर्जा उत्पादन), ’रजत क्रांती (अंडी/ कुक्कुट उत्पादन)’ इत्यादींच्या समावेशाने एकसाथ ’इंद्रधनुषी क्रांती (सर्वंकष)’ घडवून आणण्याचे निश्चित केले गेले आहे. 

आजवर हरित क्रांतीने मुख्यतः १. पंजाब, २. हरियाणा, ३. उत्तर प्रदेश, ४. मध्य प्रदेश, ५. बिहार, ६. हिमाचल प्रदेश, ७. आंध्र प्रदेश आणि ८. तामिलनाडू ही राज्ये प्रभावित झालेली आहेत. सर्व देशभर ह्या क्रांतीची बीजे रुजावीत म्हणून; हरित क्रांतीची पुढील वैशिष्ट्ये जपावी लागणार आहेत. १. अधिक उत्पादक जाती, सुधारित बियाणे, २. रासायनिक खते, ३. सूक्ष्मसिंचन, ४. कृषिशिक्षण, ५. पीकसंरक्षण, ६. पीकचक्रात्मक बदल, ७. भूसंरक्षण आणि ८. शेतकर्‍यांना लागणारा पतपुरवठा. त्याकरताच देशाच्या नियोजनात, समन्वित कृषी धोरण आखण्यात आलेले आहे. हरित क्रांती यशस्वी होण्यासाठी; शेतीतंत्र व आय-साधनांच्या उचित मूल्यांबाबत; उन्नत बियाणे, खते, कीटनाशके, यंत्रे व उपकरणे ह्यांच्या उचित मूल्यांबाबत; तसेच हे सर्व इष्ट वेळेस उपलब्ध होण्याबाबत; योग्य धोरण घडवावे लागणार आहे. उचित मूल्यावर शेतमालाच्या विक्रीची तसेच तशा हमीची व्यवस्था करावी लागणार आहे.

खते आणि ऊर्वरकेः मूळचा नैसर्गिक अथवा कृत्रिम असा कुठलाही पदार्थ जो माती अथवा वनस्पतीस, तिच्या वाढीस आवश्यक असलेली एक वा अधिक पोषक द्रव्ये पुरवण्यासाठी दिला जातो; त्यास खत म्हणतात. खते वनस्पतींची वाढ गतीमान करतात. मातीची जलसंधारणक्षमता (वॉटर रिटेन्शन, पाणी धारण करण्याची पात्रता) आणि वायूवीजन (एईरेशन, हवा खेळण्यासाठी जमिनीतील रंध्रे मोकळी असणे) वाढवल्यानेही वनस्पतींची वाढ जोमाने होते. स्थूलमानाने नत्र (नायट्रोजन; पर्णवृद्धीसाठी), स्फुरद (फॉस्फरस; मूलवृद्धी; फुले, फळे व बिया यांची वाढ ह्यांकरता) आणि पलाश (पोटॅशियम; खोडाच्या वाढीसाठी आणि वनस्पतीअंतर्गत जल प्रवाह व फुले व फळे ह्यांच्या वाढीसाठी); ही तीन पोषक द्रव्ये वनस्पतीच्या वाढीस आवश्यक असतात. चुना (कॅल्शिअम), मग्न (मॅग्नेशिअम) आणि गंधक (सल्फर) ही दुय्यम पोषक द्रव्येही वनस्पतींच्या वाढीस आवश्यक असतात. तसेच तांबे, लोह, मँगनीज, मॉलिब्डेनम, जस्त (झिंक), बोरॉन आणि क्वचित वालुका (सिलिकॉन), कोबाल्ट व व्हॅनॅडिअम ही सूक्ष्म पोषकद्रव्ये आणि उत्प्रेरके म्हणून विरल खनिजेही आवश्यक असतात.

वनस्पती मुख्यत्वे करून कर्ब, उद्‍जन, प्राण आणि नत्र वायूंपासून तयार होत असतात. पाणी आणि कर्ब-द्वि-प्राणिल वायूंच्या स्वरूपात कर्ब, उद्‍जन आणि प्राण हे घटक सामान्यतः उपलब्ध असतातच. मात्र, नत्र जरी वातावरणात सर्वत्र भरून राहिलेला असला तरीही, त्या स्वरूपात तो वनस्पतींना उपलब्ध असत नाही. त्यामुळे नत्र हा खत म्हणून सर्वात महत्त्वाचा घटक असतो. वनस्पतींना उपलब्ध अशा स्वरूपात तो आणावा लागतो. केवळ काही जीवाणू आणि त्यांना धारण करणार्‍या वनस्पतीच हे काम करू शकतात. वातावरणीय नत्राचे अमोनियात परिवर्तन करून ते हे घडवून आणतात. ऍडेनोसाईन ट्राय फॉस्फेट म्हणजे वनस्पतीच्या पेशीद्रव्यांकरताचे ऊर्जाघर असते. ते असायलाच हवे. त्याकरता स्फुरद लागते. म्हणून स्फुरद हे पोषकद्रव्य आवश्यक ठरते. सूक्ष्म पोषकद्रव्ये, सुक्या अवस्थेतील दशलक्षांश एकक परिमाणांत लागत असतात. मात्र त्यांचे परिणाम त्यांच्या वजनातील प्रमाणाच्या मानाने कितीतरी अधिक असतात.

ऊर्वरके म्हणजे खत म्हणून शेतीत वापरले जाणारे, सेंद्रिय पदार्थ. ते सेंद्रिय पदार्थांची भर घालून, तसेच मातीतील जीवाणूंद्वारे (बॅक्टेरियां द्वारे) साठवल्या जाणार्‍या नत्रासारख्या पोषक द्रव्यांची भर घालून जमिनीचा कस वाढवतात. उच्च स्तरीय सजीव, मग जैवचक्रात त्या बुरशी (फंगी) आणि जीवाणूंवर पोसले जातात.

मृद (माती)-व्यवस्थापनात ऊर्वरकांचे दोन प्रकार असतात. हिरवी (वनस्पतीजन्य) ऊर्वरके आणि प्राणीज ऊर्वरके. हिरवी ऊर्वरके म्हणजे केवळ मातीत मिसळून टाकण्याकरताच पिकवली गेलेली पिके होत. असे करण्याने मातीत पोषक द्रव्ये व सेंद्रिय पदार्थ मिसळले गेल्यामुळे तिचा कस वाढत असतो. विघटित पालापाचोळ्यापासून उद्भवणारे सेंद्रिय पदार्थ (कंपोस्ट) म्हणजे ऊर्वरके नव्हेत (मात्र त्यात ऊर्वरकेही असू शकतात). बव्हंशी प्राणीज ऊर्वरके, ही तृणभक्षी (शाकाहारी), सस्तन प्राण्यांच्या उत्सर्गांच्या किंवा प्राण्यांच्या वावरासाठी पसरलेल्या वनस्पतीज पदार्थांच्या (बहुधा गवताच्या) स्वरूपात असतात; जे त्या प्राण्यांच्या मलमूत्रादींनी अतिलिप्त झालेले असतात (आणि ज्यांना शेण, शेण्या, लीद, पो, पोयटा इत्यादी शब्दांनी संबोधले जात असते).

ऊर्वरके, शतकानुशतके शेतीकरता खते म्हणून वापरली जात आहेत. कारण ती नत्र व इतर पोषक द्रव्यांनी समृद्ध असतात, ज्यामुळे वनस्पतींची वाढ सुलभ होते. वराह (डुक्कर) पालनातील मूत्र जमिनींत थेट खोलवर शिरवले जाते ज्यामुळे दुर्गंध कमी होऊ शकतो. वराह आणि इतर पशुपालनादरम्यानची ऊर्वरके प्रसारकाच्या साहाय्याने जमिनीवर विखुरली जातात. तृणभक्षी प्राणी खात असलेल्या गवतांतील तुलनेत कमी असलेल्या प्रथिनांच्या पातळीमुळे, मांसभक्षी प्राण्यांच्या ऊर्वरकांपेक्षा; त्यांच्या ऊर्वरकांना तुलनेत कमी दुर्गंध येत असतो. उदाहरणार्थ हत्तीची लीद तर जवळपास गंधहीनच असते. मात्र शेतात विखुरलेल्या विपूल प्रमाणातील ऊर्वरकांमुळे काही शेतांत दुर्गंधाची समस्या उद्भवू शकते. ताजी कुक्कुट (कोंबड्यांची) विष्ठा वनस्पतींना हानीकारक असते. मात्र काही काळ पद्धतशीर कुजविल्यास तिचे मूल्यवान खत होऊ शकते.

सुकवलेली प्राणीज ऊर्वरके, संपूर्ण इतिहासकालात इंधन म्हणूनही वापरली गेली आहेत. गायीच्या शेण्या भारतासारख्या देशात आजही महत्त्वाचा इंधनस्त्रोत ठरतो. तर, उंटाच्या शेण्या वाळवंटासारख्या वृक्षहीन प्रदेशांत वापरल्या जाऊ शकतात. त्यांचा वापर अनेकविध उद्देशांनी होत असतो. स्वयंपाकास इंधन म्हणून आणि वाळवंटातील थंड रात्रींत ऊब निर्माण करणारे इंधन म्हणूनही. ऊर्वरकांचा आणखी एक उपयोग म्हणजे त्यांपासून कागद तयार केला जाऊ शकतो. हत्तीच्या लीदीपासून हे केले जाते. आफ्रिका आणि आशियात हे लघु-उद्योगाच्या स्वरूपात केले जाते. घोडे, लामा आणि कांगारूंच्या लीदीपासूनही कागद तयार केला जात असतो. ह्यातील लामा वगळता इतर प्राणी रवंथ करणारे प्राणी नाहीत. त्यामुळे त्यांच्या लीदीत, न पचलेल्या वनस्पतीज तंतूंचे प्रमाण बरेच राहते.

सिंचनः शेतीकरता नियमितपणे वनस्पतींना पाणी पुरवणे म्हणजे सिंचन. शेतीतील पिकांच्या वाढीकरता ते उपयुक्त ठरते. भूमीच्या अलंकरणास आणि अपुर्‍या पावसाने विस्कळित व शुष्क झालेल्या प्रदेशांना पुन्हा शस्य-शामल करण्यासाठीही ते गरजेचे असते. दवापासून, तणापासून आणि जमीन घट्ट होण्यापासून वाचविण्यासाठी सिंचनाची आवश्यकता असते. ह्यामुळेच मानवी इतिहासातील सर्व संस्कृतींचा उदय आणि विकास झरे, निर्झर, नाले, ओढे, नद्या, तलाव, पाणवठे, सरोवरे इत्यादी जलाशयांच्या काठीच झालेला दिसून येतो.






















अशाप्रकारे संचित पाण्यातून सिंचित शेतीस ओलिताखालील शेती म्हणतात. मात्र ज्यावेळी शेती केवळ पावसाच्या पाण्यावर विसंबून केली जात असते, तेव्हा तिला कोरडवाहू शेती म्हणतात. ऊस, द्राक्षे आदी नकदी पिकांना इतर पिकांच्या मानाने, सिंचनाद्वारे खूप जास्त पाणी द्यावे लागत असते. एवढे की, सततच्या ह्या पिकांमुळे भूजलपातळीही लक्षणीयरीत्या खाली जाते. म्हणूनच उपलब्ध पाण्याच्या अवस्थेवर भूमीवरील पिकांचे नियोजन करणे क्रमप्राप्त ठरते. दुष्काळी कोरड्या भूमीवर साखरकारखाने उभारणे, ह्या कारणानेच योग्य ठरत नाही.  

क्रिकेटच्या सामन्यांकरता मैदाने तयार करतांना धूळ बसावी म्हणून सिंचन करावे लागते. शहरभागातून घाण पाणी, सांडपाणी, तसेच निरनिराळे नागरी उत्सर्ग समुद्राप्रत गतीमान व्हावेत म्हणूनही पाण्याची आवश्यकता असते. वेगवेगळ्या खनिकर्मांसाठीही पाणी आवश्यक असते.

जेव्हा वरीलप्रमाणे शेतीबाह्य किंवा अगदी शेतकीतीलही ऊस, द्राक्षांसारख्या अतिजलव्ययी गरजा निर्माण झाल्या; तेव्हा पाण्याची कमतरता जाणवू लागली. जागोजाग बांधलेल्या धरणांमुळे नैसर्गिक जलप्रवाहवाहिन्यांतून पाणी नाहीसे होऊ लागले. त्याच्या आसपास वसलेल्या लोकांना त्यामुळे धरणातून सोडल्या जाणार्‍या पाण्यावर एक प्रकारचे कृत्रिम अवलंबित्व निर्माण झाले. भंडारदरा धरणातून पाच टी.एम.सी.[१] पाणी सोडावे तेव्हा जायकवाडीस केवळ तीनच टी.एम.सी. पाणी पोहोचते. उर्वरित पाणी दरम्यानच्या जमिनीस ओले करण्यातच खर्ची पडते. हीच गोष्ट जर जानेवारीत न करता मे महिन्यात केली तर खालावलेल्या भूजलपातळीमुळे, ह्याच उलाढालीत जायकवाडीस पोहोचणारे पाणी एक टी.एम.सी.ही राहत नाही. धरणालगतच्या लोकांना सारे पाणी आपलेच आहे असे वाटू लागते आणि त्यांचा कल सढळतेने जलवापर करण्याचा होत जातो. दूरवरच्या लोकांना पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागते. ह्यामुळे शासकीय हस्तक्षेपाची गरज पडते. जलनियोजन, भूजलपातळीचे नियोजन, वर्षाकाळात जलपुनर्भरणाचे नियोजन करणे इत्यादी गोष्टींची निकड निर्माण होते.

पूर्वी शेतीस मोटेने पाणी दिले जाई. नदीच्या पाटाने पाणी पुरवले जाई. भाताच्या शेत्यांतून नैसर्गिक उतारांवाटे जल-उत्सर्ग करून पाणी दिले जात असे. ह्यात दरम्यानच्या जमिनीस ओले करण्यात, तेथील भूजलपातळी वाढविण्यात आणि दरम्यानच्या भूपृष्ठावरून वाफ होऊन उडून जाण्यामुळे खूपशा पाण्याचा र्‍हास होत असे. मर्यादित जलस्त्रोतांचा नेमकेपणाने, मोजकाच वापर करायचा म्हणून मग सिंचनाच्या नवनवीन पद्धती विकसित करण्यात आल्या. ठिबकसिंचन, तुषारसिंचन इत्यादी पद्धती ह्याकरताच विकसित झाल्या. वनस्पतीच्या मुळाशी ठराविक कालावधीने ठिबकत सिंचन केल्यास तेवढ्यास ओलितासाठी कमी पाणी लागते. तुषारसिंचन पद्धतीतही हाच लाभ अपेक्षित असतो.

पिके कापणीला येतात तसतशी पाखरे, प्राणी त्याकडे आकर्षून गोळा होऊ लागतात. त्यांच्यापासून पिकांचे संरक्षण करावे लागते. नाना प्रकारचे कीटक, अळ्या, कीड ह्यांपासून संरक्षण करावे लागते. त्यामुळे पीक संरक्षण ह्या विषय महत्त्वाचा ठरतो. कापणी झाल्यावर खळ्यात असेपर्यंत पिकाची खळ्यातच राखण करावी लागते. नंतर साठवण करणे, साठवणात असतांना जपणे आणि मग ईप्सित स्थळी वितरण करणे ह्या सर्व अवस्थांदरम्यान पिकाचे संरक्षण अत्यावश्यक ठरत असते. पाखरे, प्राणी जागे होतात त्यापूर्वीपासूनच सकाळी उठून गोफण, बुजगावणी इत्यादी पारंपारिक उपायांनी; तर विजेची कुंपणे, तरतर्‍हेचे आवाज इत्यादी आधुनिक उपायांनी पीकसंरक्षण केले जाते. उसाच्या पिकाला कोल्ह्यांची भीती तर रात्रीही असते. त्यांना उसाची मुळे गोड लागतात. त्यामुळे कोल्हे आले की ते उसाची मुळे उकरून खातात.

जमिनीत एकच एक पीक सालोसाल घेतले तर जमिनीचा कस उतरत जातो. म्हणून आळीपाळीने निरनिराळी परस्परपूरक पिके घेऊन; तसेच भौगोलिकदृष्ट्या सरमिसळ लागवडीने पिके घेऊनही जमिनीचा कस कायम ठेवला जाऊ शकतो. पिकांच्या गरजेनुरूप रासायनिक खतांची, कुजवलेल्या सेंद्रिय खतांची भर घालून जमिनी सकस ठेवता येऊ शकतात. वंशपरंपरेने शेताच्या वाटण्या होऊन छोटे छोटे तुकडे झाले तर जमीन कसण्यालायक राहत नाही. सहकारी शेतीच्या माध्यमातून तिचे मोठाल्या तुकड्यांत रूपांतर केल्यास शेती अधिक लाभकारक होऊ शकते.

ह्या सर्व माहितीचा वापर केवळ शेतकर्‍यांच्याच नव्हे तर सामान्यजनांच्या प्रबोधनासाठी केल्यास शेती अधिक उत्पादक होऊ शकेल. ह्यासाठी सार्वजनिक कृषी शिक्षणाचीही आवश्यकता आहे. सहकारी साखर उद्योग हे सहकारी शेतीकरता एक आदर्श उदारहण ठरावे. सहकारी तत्त्वावर शेती केल्यास शेतीकरता आवश्यक असणारा पतपुरवठाही सहजच साधता येऊ शकेल. शेतीसोबतच शेतीवर अवलंबून असलेले पशुपालन, दुग्धोत्पादन इत्यादी व्यवसायही मग ह्या क्रांतीत मोलाची भर घालू शकतात. गुजरातेतील आणंद येथील दुग्धोत्पादन प्रकल्पाचे उदाहरण ह्याबाबतीत आदर्श ठरावे.

अशाप्रकारे १९६० च्या सुमारास ज्या हरितक्रांतीने जग गाजवले, त्या क्रांतीची कहाणी आजही नवे आयाम साकारत असतांना दिसत आहे. आपणही खरे तर तिच्यात सहभागी व्हायला हवे आणि ते व्हायचे असेल तर प्रथमतः तिची समग्र माहिती आपणा सगळ्यांनाच व्हायला हवी आहे. त्याकरताचेच पहिले पाऊल म्हणजे हा लेख आहे.

संदर्भः ऊर्वरके ह्या विषयावरील विकीपृष्ठे https://simple.wikipedia.org/wiki/Manure



[१] टी.एम.सी.-थाऊजन्ड मिलिअन क्युबिक फीट- किंवा एक-अब्ज-घन-फूट आकारमान.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: