२०१४-११-१७

ओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी ३-मांडू ओंकारेश्वर


रूपमती महालातील जलाशयातील वरच्या कमानींचे प्रतिबिंब. बाजबहाद्दुर महालातील पुष्करणी.

आजचा मुख्य स्थलदर्शनाचा कार्यक्रम मांडवगड उपाख्य मांडूचा होता. त्यामुळे आता नाश्ता करून आम्हाला निकडीने प्रवासास सुरूवात करायला हवी होती. तासा दीड तासातच आम्ही मांडूस पोहोचलो. किल्ल्याचे सर्वसारणतः तीन भाग पडतात. रेवाकुंड ह्या तिसर्‍या खंडापासून आम्ही सुरूवात केली.

प्रतिध्वनीस्थळावर उच्चारलेले शब्द त्यापासून सुयोग्य अंतरावर बांधलेल्या एका इमारतीद्वारे परिवर्तित होऊन प्रतिध्वनी ऐकू येतो. मी मोठ्याने हरहर म्हणालो. काही सेकंदातच आम्हाला तेच शब्द पुन्हा ऐकू आले. मी मोठ्याने महादेव म्हणालो. काही सेकंदातच आम्हाला तेच शब्द पुन्हा ऐकू आले. शेजारीच स्थानिक रानमेवे विकणारी एक मुलगी बसलेली होती. तिच्याकडे होत्या गोरखचिंचा. कच्च्या गोरखचिंचांचा गर सांधेदुखीवर उत्तम इलाज असल्याने आम्ही तो घेतला. मग आम्ही शाही परिसर उर्फ पहिल्या खंडात आलो. होशंगशहाचा मकबरा, जामी मशीद असलेला दुसरा खंड आम्ही वेळे-अभावी स्थलदर्शनातून वगळला.


प्रतिध्वनीस्थळ. आवळे, चिंचा, गोरख चिंचा आणि कवठे. शाही परिसर


जहाज महाल सुबक पुष्करणीचा कलात्मक फोटो

चारही बाजूंना विशाल जलाशय असल्याने महाल खरोखरीच तरंगत्या जहाजासारखा दिसतो. म्हणूनच ह्याचे नाव जहाज महाल पडले आहे. ह्या आणि बाजूच्या हिंडोला महालातील बांधकाम कमानींच्या वास्तुरचनेतून केलेले आहे. भिंतींतले जिने, पुष्करण्या, चबुतरे, छत्र्या आणि सज्जे ह्यांनी सुशोभित असलेल्या ह्या इमारती पाहता पाहता खूप लांबलचक अंतरे चालावी लागतात आणि पायही भरून येतात. मात्र पाहण्यासारखी ठिकाणे संपतच नाहीत. हौसेने हिंडून पाहावा असाच हा सर्व परिसर आहे. पुरातत्त्वखात्याने आपल्या नेहमीच्या शिरस्त्याने स्वच्छ, व्यवस्थित आणि शिस्तीत सांभाळला आहे.


जहाजमहालावरूनचा देखावा आणि डौलदार गोरखचिंचेचे झाड हीच तर मांडूची खरी वैशिष्ट्ये आहेत.

आता मात्र दुपारचा एक वाजून गेलेला होता. सूर्य आग ओकत होता आणि पोटात कावळेही कोकलू लागलेले होते. मांडुतून असंतुष्ट अंतःकरणाने नाईलाजानेच पाय बाहेर काढावा लागला. बर्‍यापैकी खानावळीत १२० रुपयांना थाळी मिळेल असे कळले. घेतली खरी पण तिखटजाळ भाजीचा घासही घशाखाली उतरेना. मग नेहमीचाच उपाय केला. दही मागितले. साखर मागितली. दही-साखरेच्या उतार्‍याने जेवण सुखरूप पार पडले. दही मात्र चांगले होते. ह्या संपूर्ण प्रवासातच सुरेख दही आणि हो, छाछही आवडेल असेच मिळाले. जेवण झाल्यावर ओंकारेश्वरापर्यंतचा सलग सुमारे तीन तासांचा प्रवास आता करायचा होता. पुढील आकर्षणही तसेच जबरी होते. ओंकारेश्वराचे.


आकर्षणही तसेच जबरी होते. ओंकारेश्वराचे.

ओंकारेश्वर धरणानंतर प्रवाहाच्या खालच्या बाजूला नर्मदा नदी एका कठीण खडकावर जाऊन दुभंगते. तिचे दोन प्रवाह होतात. पूर्वेला अमरकंटकच्या डोंगरात उगम पावून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाट चालणार्या नदीचा उत्तरेकडचा प्रवाह मग कावेरिका म्हणून ओळखला जाऊ लागतो, तर दक्षिणेकडील प्रवाहाचे नाव नर्मदाच राहते. हे प्रवाहही काही किलोमीटरचा स्वतंत्र प्रवास करून मग पुन्हा परस्परांस मिळतात. त्या ठिकाणाला कावेरिका आणि नर्मदेचा संगम म्हणून ओळखले जाते. दोन्ही प्रवाहांमधील जागेचे एका बेटात रूपांतर झाले आहे. ह्या बेटावर असलेल्या पर्वतास, ह्या जागेचा प्राचीन शासक मान्धाता ह्याचेच नाव मिळालेले आहे. हा पर्वत आकाशातून पाहिल्यास दक्षिणाभिमुख ओंकार आकारासारखा आहे. म्हणूनच ह्या ठिकाणाला, बेटाला आणि ज्योतिर्लिंगालाही ओंकार नावानेच संबोधले जाते.

आदी शंकराचार्यांनी सर्व भारताचे पदभ्रमण केले होते. एवढेच नव्हे तर प्रत्येक जागेची वैशिष्ट्ये उत्तम रीतीने नोंदवूनही ठेवलेली होती. ओंकारेश्वराबद्दल बारा ज्योतिर्लिंगांच्या स्तोत्रात ते लिहीतातः

कावेरिकानर्मदयोः पवित्रे समागमे सज्जनतारणाय ।
सदैव मांधातृपुरे वसंतं ओंकारमीशं शिवमेकमीडे ॥

म्हणजे कावेरिका आणि नर्मदा ह्यांच्या संगमावर, मांधाता पर्वतनगरीत, सज्जनांच्या परिरक्षणार्थ, सदा वास्तव्य करत असलेल्या शिवाने माझे रक्षण करावे.

मांधाता पर्वतावर चित्रात दिसणारा ओंकाराचा आकार म्हणजे प्रत्यक्षात बांधीव पायर्‍या पायर्‍यांच्या "गीता परिक्रमा मार्ग"च आहे. ह्या मार्गावर उजव्या बाजूस ६९७ गीतेचे श्लोक वालुकाश्माच्या फलकांत कोरून जागोजाग क्रमवार बसवलेले आहेत. नितांत सुंदर, अखंड वैविध्याने नटलेल्या, पर्वतीय चढ-उताराच्या, निसर्गाच्या सान्निध्यातून वाट चालणार्‍या ह्या परिक्रमामार्गावरून चालत जाणे खरोखरीच सुखावह वाटले. सात किलोमीटर लांबीचा हा मार्ग जणू मुक्तीचा मार्गच आहे. नैसर्गिक वैविध्यांची आणि वैशिष्ट्यांची कमाल पखरण असलेले भारतीय भूप्रदेश जर कुणी सूचीबद्ध करेल, तर त्यात ओंकारेश्वराचे स्थान निस्संशय वरचेच असेल. लोक ओंकारेश्वरास का जातात मला माहीत नाही. मला मात्र ह्या परिक्रमेचे फारच आकर्षण वाटले आणि आता कायमच ते माझी सोबत करत राहणार ह्यात मुळीच शंका नाही.

ओंकारेश्वरातील पहिली रात्र चांगली झोप झाल्यानंतर पहाटेसच जाग आली. झपाट्याने आन्हिके उरकून ज्योतिर्लिंग दर्शनाचा कार्यक्रम निश्चित केलेला होता. त्यानुसार इंडिकात बसून प्रस्थान केले. नर्मदेच्या दक्षिण तीरावर असलेल्या आमच्या अतिथीगृहातील कक्षातून मांधाता पर्वत सहजच पाहता येत होता. दोन्ही तीरांना जोडणारा पूल आणि त्यापाठचे ओंकारेश्वर धरणही स्पष्ट दिसत होते. मात्र ओंकारेश्वर गाव छोट्या छोट्या गल्लीबोळांतून वसलेले असल्याने, प्रत्यक्षात समोरच दिसलेल्या त्या पुलापर्यंत पोहोचण्यास गाडीने सुमारे दहा मिनिटे लागली. मांधाता पर्वतावर स्वयंचलित वाहने जाऊ शकत नसल्याचे कळून आले. मग पुलाच्या अलीकडील टोकाशी असलेल्या वाहनतळावर गाडी उभी करून, विनोबा एक्सप्रेसने पुलापलीकडे पोहोचलो. पूल उंचावर आहे. त्यामुळे पूल संपताच खाली उतरावे लागते. मग त्याच पुलाच्या खालच्या बाजूने उजवीकडे जाणारा सरळ रस्ता ओंकारेश्वर मंदिराकडे घेऊन जातो. तिथून आणखी सुमारे पाच-दहा मिनिटांतच आम्ही तिथे पोहोचलो.


मध्यप्रदेश पर्यटनविकासमंडळाचे अतिथीगृह व तिथून मांधाता पर्वतावर दिसणारी शिवमूर्ती.


अतिथीगृहातून दिसणारा मांधाता पर्वत रात्रीच्या प्रकाशात उजळलेले ओंकारेश्वर मंदिर

वरील पहिल्या प्रकाशचित्रात मांधाता पर्वत, त्यावर वरपर्यंत जाणारी पायर्‍या पायर्‍यांची वाट आणि शिखरावर आधीच सांगितल्याप्रमाणे दिसत असलेली पाठमोरी शिवमूर्ती दिसत आहेत. दुसर्‍या प्रकाशचित्रात पहिल्या प्रकाशचित्राच्या साधारणपणे उजवीकडचा भाग आहे, तोही रात्रीच्या प्रकाशांत उजळलेला. सर्वाधिक उजळलेला मंदिरकळस ओंकारेश्वर मंदिराचा आहे. डावीकडचा पूल आम्हाला जवळचा आहे. उजवीकडच्या पुलाच्या आमच्या बाजूस म्हणजे, दक्षिण तीरावर अमलेश्वराचे मंदिर आहे. मात्र हे मंदिर जुने आहे. खोलात आहे. फारसे उंचही नाही. त्यामुळे ओंकारेश्वर गावातून फारसे दिसतच नाही. ओंकार आणि अमलेश्वर मिळूनच हे ज्योतिर्लिंग पूर्ण होत असते. दुसर्‍या प्रकाशचित्रात अमलेश्वर पुलाच्या पाठीमागे, उजवीकडे ओंकारेश्वर धरण आहे. धरणानजीकच पण उत्तर तीरावर, ऊर्जाघर आहे.

ओंकारेश्वर मंदिरात काय नेऊ देतात, काय नाही हे नक्की माहीत नव्हते. म्हणून आम्ही कॅमेरा आणला नव्हता. केवळ मोबाईलच घेऊन आलेलो होतो. मंदिराबाहेर एका ठिकाणी टोकन घेऊन चपला उतरवल्या आणि रांगेत लागलो. पंडे पाठलाग करतच होते. त्यांना दाद न देता आम्ही मार्गस्थ राहिलो. पाचच मिनिटांत गाभार्‍यात पोहोचलो. तिथल्या एका पुजार्‍याने “वाका खाली, करा नमस्कार, ही घ्या बादली, करा अभिषेक” अशी दमदाटी करत आमच्या कडून अभिषेक करवून घेतला. शिवलिंगासमोर, काचेचे, कमरेइतक्या उंचीचे कुंपण घातलेले असल्याने शिवलिंगास कुणीही शिवू शकत नाही. कुंपणासच एक काचेचे नसराळे बसवलेले असून त्यातून यजमानांना जलाभिषेक करायला सांगितले जाते. काचेतून ते पाणी शिवलिंगावरच पडते आहे अशी खात्री करवून द्यायलाही ते विसरत नाहीत. बाहेर पडल्यावर मग आमच्या मागे लागले. आमच्या करवी अभिषेक केलात, आता एक हजार एक रुपये द्या. बधत नाही म्हटल्यावर: पाचशे एक द्या! निदान एक्कावन तरी!! पण मी कसलेला योद्धा होतो. आम्ही तसेच बाहेर पडलो. चपलांकरता मोजून दोन रुपये चपलाजोडीस घेऊन त्याने चपला परत केल्या. मला हे आवडले.


वाटेतली मकरारूढ नर्मदामैय्या दक्षिण तीरावरली जहाजागत दिसणारी इमारत


वाटेतली दुर्गेची मूर्ती; शिखरावरचे शिवालय, लेटे हनुमान मंदिर आणि ९० फुटी शिवप्रतिमा

मग पायी परिक्रमा करण्याबाबत माहिती काढली. कुणी म्हणत परिक्रमा दोन तासात होते. कुणी तीन तास सांगत तर कुणी साडेतीन सांगत होते. काल मांधाता पर्वताकडे पाहतांना आम्हाला पर्वतावर एक पायर्‍या पायर्‍यांची माळ वरपर्यंत जातांना दिसली होती. मग आम्ही विचार केला की तिनेच गेलो तर कदाचित तासाभरात परतही येऊ. काही जणांनी मग त्याचीही पुष्टी केली. आम्ही वरची वाट चालू लागलो.

हैदराबादच्या राजराजेश्वरी (पार्वती) प्रतिष्ठानातर्फे ही ९० फुटी शिवप्रतिमा उभारण्यात आलेली आहे. राजराजेश्वरीचे मंदिरही समोरच आहे. शिवप्रतिमेच्या उजव्या हाताला एक नर्मदेचे सुरेख मंदिर आहे. मांधाता पर्वताच्या शिखरावर पोहोचल्यावर दगडात गीतेचा श्लोक कोरलेला एक फलक दिसला. पुढे मग असे समजले की गीता परिक्रमा मार्गाचाच तो एक भाग आहे. इथे आम्हाला राजराजेश्वरी प्रतिष्ठानतर्फे वाटला जाणारा गरमा-गरम खिचडीचा प्रसादही मिळाला. तो प्रसाद वाटणार्‍याने थोडासा जमिनीवरही टाकला आणि काय आश्चर्य! पाहता पाहता अक्षरशः पाच, दहा, पंधरा, ... असंख्य छोटे छोटे पक्षी तिथे कुठूनसे उडत आले. खारी आल्या. चिमण्या आल्या. लालबुडे बुलबुल आले. दयाल आले. कितीतरी अनोळखी पक्षी आले आणि काही क्षणांतच तोही प्रसाद फन्ना झाला. आम्ही प्रसादच सेवन करत होतो. हात मोकळे करून कॅमेरे सज्ज करायच्या आतच, जागा जणू मोकळी झालेली होती. दोनचार पक्षी काय ते चित्रात गवसले.


राजराजेश्वरी मंदिर, प्रसाद खाणारे पक्षी, शेजारचे नर्मदा मंदिर आणि त्यातील मूर्ती

अशा रीतीने आम्ही मांधाता पर्वतशिखर तर गाठलेच होते. आता अमलेश्वर दर्शनही करणे आवश्यक होते. पण आम्ही तर नाश्ताही केलेला नव्हता. आम्ही अतिथीगृहात परतलो. नाश्तानुमा जेवण केले. थोडीशीच विश्रांतीही घेतली आणि अमलेश्वर दर्शनार्थ तिथे जाऊन पोहोचलो. तिथे दर्शनाला गर्दी दिसली. बारा वाजेपर्यंत भोग चढविले जात असल्याची सूचनाही लागलेली दिसली. आता काय करावे. तेवढ्यात हजार रुपयात नर्मदा-कावेरिका-नर्मदा अशी परिक्रमा नावेतून करवून आणतो असे सांगत एक माणूस आला. मी नदीच्या तीराकडे निघालो. तसा आणखी एक माणूस १०० माणशी दराने दहा माणसांच्या नावेतून तशीच परिक्रमा करवतो म्हणू लागला. परिक्रमेस साधारणपणे किती वेळ लागेल असे विचारल्यावर सुमारे एक तास म्हणाला. आम्ही कबूल झालो. नावेपाशी पोहोचलो तर आमच्याआधीच तिघे जण तिच्याशेजारी उभे असलेले दिसले. जितेंद्र, त्याची मामी आणि तिची मुलगी असे ते नातेवाईकच होते. जितेंद्रला नर्मदा-कावेरिका संगमात स्नान करायचे होते. आता आम्ही पाचजण झालेलो होतो. पण बराच वेळ झाला तरी परिक्रमेकरता कोणीच नवे माणूस येत नव्हते. शेवटी नाववाला असे म्हणू लागला की तुम्ही पाचजण मिळून आठशे रुपये देत असाल तर मी नाव न्यायला तयार आहे. आम्ही तयार झालो. नाव निघाली.


नावेतून दिसणारे ओंकारेश्वर मंदिर सकाळीच आम्ही ज्या मार्गाने गेलो होतो ती वाट


परिक्रमा करणार्‍यांना लाईफ जॅकेट घालावे लागे. रिकाम्या बंद बिसलरी बाटल्या पोत्यात भरून ..


संगम. डावीकडची नर्मदा. उजवीकडची कावेरिका. कावेरीकेचा प्रवाह जबरी होता. खळखळाटही खूप.


कावेरिकेत दूरवर उभारलेली आमची नाव, संगमातील स्नानानंतर आम्ही तिच्यात जाऊन बसलो.

संगमात जितेंद्रने आणि मी स्नान केले. ती मुले बसली आहेत त्या खडकाच्या आश्रयाने डुबकीही घेतली. पंधरा वीस मिनिटांतच आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. एकतर कावेरीकेचा जबरी प्रवाह आणि दुसरे म्हणजे आता आम्ही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात होतो.


नाव थांबवली, किनार्‍याला नेऊन बांधली आम्ही पाय-उतार होऊन किनार्‍यावरून पुढे गेलो

आता नावाड्याव्यतिरिक्त दोन सशक्त साहाय्यक आमच्या सोबत होते. उंच बांबूच्या रेट्याने ते नाव किनार्‍यापासून दूर राखण्याचे काम, आलटून पालटून करत होते. एके ठिकाणी मग कावेरिका खूपच अरुंद पन्हळीतून वाहू लागते. तिथे मध्य धारेचा वेग अफाट दिसत होता. त्यापूर्वीच काही अंतरावर नावाड्याने नाव थांबवली, किनार्‍याला नेऊन बांधली.


नाविकांची प्रवाहाविरुद्धची लढाई आणि पायी अडथळा पार करणारे आम्ही

आम्हा पाचही प्रवाशांना उतरायला सांगितले. वर असेही सांगितले की बर्‍याच अंतरावर दूर, जिथे कावेरिकेचा अरुंद पन्हळीतला प्रवास सुरू होत होता, त्याच्या पारपर्यंत चालत या. तिथे आम्ही नाव घेऊन जात आहोत. मग त्या तिघांनी नाव गतीमान असलेल्या अरुंद प्रवाहाच्या मध्यधारेत घातली. धारेच्या गतीने नाव हेंदकळतांना दिसत होती. वारंवार त्वरेने दिशा बदलतांना दिसत होती. तिघेही जण शर्थीने ती पुन्हा धारेत लावत होते. आम्ही किनार्‍यावर चालत चालत पुढे निघालो होतो.


वाटेतले मुळातील माती वाहून गेलेले वृक्ष आणि पुन्हा नावेत बसलेले आम्ही


कावेरिकेच्या उत्तर तीरावरील जैन सिद्धकूट मंदिराचे प्रवेशद्वार आणि दक्षिण तीरावरला गाय-बगळा


मग दिसू लागले ओंकारेश्वर ऊर्जाघर आणि ओंकारेश्वर धरण


डाव्या कोपर्‍यात अमलेश्वरनजीकचा पूल दिसू लागला, थोड्याच वेळात तो नजरेच्या टप्प्यात आला


उजवीकडच्या दगडी भिंतींची उंची घटत जाऊन मग ओंकारेश्वर दिसू लागले


अमलेश्वर मंदिर

जितेंद्र आणि कंपनी ओंकारेश्वराच्या तीरावर उतरली. आम्ही, ते मंदिर सकाळीच पाहून झालेले असल्याने आता परिक्रमा पूर्ण करून अमलेश्वरच्या तीरावर नावेतून उतरलो. धक्क्यापासूनही अमलेश्वरचे मंदिर दिसत नाही. किनार्‍यावरून वर चढत आम्ही मंदिरात पोहोचलो तेव्हा दुपारचे दोन वाजून गेलेले होते आणि गर्दीही ओसरलेली होती. निवांत दर्शन घेऊन आम्ही अतिथीगृहात परतलो. आम्ही ओंकारेश्वरला जाणीवपूर्वक दोन दिवसांचा मुक्काम ठेवलेला होता. एक दिवस अजून हाताशी होता. आम्ही सकाळीच उठून जमल्यास पायी “गीता-परिक्रमा” करण्याचा निश्चय केला. चालकास सकाळी सहा वाजताच तयार राहण्यास सांगून समाधानाने झोपी गेलो.

सकाळी उठलो. तयार झालो. मात्र पाहतो तर चालक अजून झोपेतच होता. त्याला आन्हिके आटपायला थोडासा अवधी दिला आणि मग पुलाकडे निघालो. आज काहीतरी विशेषच उत्सव असावा अशी गर्दी रस्त्यावर लागून राहिलेली दिसली. डोक्यावर मोठमोठाले ओझी घेऊन असंख्य स्त्री-पुरूष दर्शनाला निघालेले दिसत होते. काल ज्या पुलाजवळच्या वाहनतळापर्यंत आमचे वाहन गेले होते त्या ठिकाणाच्या सुमारे एक किलोमीटरभर आधीच पोलिसांनी गाडी रोखली. आमच्या परिक्रमामार्गावरील चालण्यात जातायेता मिळून दोन किलोमीटर भर तर पडलीच शिवाय वेळेचे गणितही चुकेल असे वाटू लागले.


ओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी १-उज्जयिनी 
ओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी २-इंदौर, महेश्वर 
ओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी ३-मांडू, ओंकारेश्वर 
ओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी ४-ओंकारेश्वर 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: