जन्मः १४ नोव्हेंबर १८९१,भेरा, पाकिस्तान;
ज्यांनी आवडेल तेच काम केले आणि जे काम केले ते त्यांना आवडले होते.
बिरबल साहनी यांनी १९११ साली गव्हर्नमेंट कॉलेज, लाहोर येथून पदवी प्राप्त केली. १९१४ साली इम्यान्युएल कॉलेज केंब्रिज येथून ते ट्रायपॉस पास झाले. १९१९ साली त्यांनालंडन विद्यापीठातून डी.एस.सी. पदवी मिळाली. १९२१साली लखनौ विद्यापीठात ते वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक झाले. १९३३ साली ते विज्ञान विभागाचे अधिष्ठाता (डीन) झाले. १९४३ साली त्यांनी लखनौ विद्यापीठात भूगर्भशास्त्र विभागाची स्थापना केली.३ एप्रिल १९४९ रोजी लखनौ येथे ’पुरावनस्पतीशास्त्र संस्थे’ची स्थापना झाली आणि १० एप्रिल १९४९ रोजी बिरबल निवर्तले.
बिरबल साहनी अत्युत्कृष्ट वैज्ञानिक होते. कुशल संघटक होते. उत्तम माणूस होते. अंतरातून देशभक्त होते. भारतातही, शासनातील अति-उच्च पदे सोडून, त्यांनी आपले संशोधन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांना भारतीय मूल्ये आणि परंपरा आवडत असत. विद्यार्थी आणि उदयमान वैज्ञानिकांकरता तर ते एक आदर्शच आहेत.
बिरबल यांच्या वडिलांचे नाव रुचिराम होते आणि आईचे नाव ईश्वरीदेवी हे होते. रुचिराम यांना असे वाटे की, मुलांनाच नव्हे तर मुलींनाही सर्वोत्तम शिक्षण मिळावे. त्यांची मुलगी लीला, पंजाबातील पहिली पदवीधारक होती. त्यांनी आपल्या मुलांना शिक्षणाचे स्वातंत्र्य दिले होते. त्यांच्या दोन मुलींसह बिक्रमजीत, बिरबल, बोधराज, मनोहरलाल, मुल्कराज, लक्षवंती, लीला या सात मुलांनी ब्रिटनमध्ये शिक्षण घेतले होते.
रुचिराम यांना किरणोत्साराबाबत विशेष रुची असे. नोबेलविजेते लॉर्ड अर्नेस्ट रुदरफर्ड यांच्या प्रयोगशाळेतही त्यांनी संशोधनाकरता काही काळ घालवलेला होता. डेन्मार्कचे नोबेलविजेते भौतिकशास्त्रज्ञ निल्स बोहर यांचेशीही त्यांचा संबंध आलेला होता. रुचिराम यांच्या घरचे वातावरण शैक्षणिक होते. ते स्वतः रसायनतज्ञ होते. लाहोर येथे ते रसायनशास्त्र शिकवत असत. ते थोर विज्ञान संवादक होते. त्या काळात ते सायकलवरून जागोजागी जाऊन विज्ञानावर व्याख्याने देत असत. १९१८ साली गव्हर्नमेंट कॉलेज, लाहोर येथून ते निवृत्त झाले. ते शास्त्रज्ञ होते आणि तल्लख निरीक्षकही होते. पंजाबातील ब्राह्मो समाजाचे ते एक नेते होते. सरकारी सेवेतून निवृत्त झाल्यावरही ते सक्रिय होते. त्यांचा दृष्टीकोन उदार होता. मुळात ते देशभक्त होते. स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी भाग घेतलेला होता. त्यांच्या सर्वच मुलांवर त्यांच्या या सगळ्या कर्तृत्वाचा ठसा उमटलेला होता.
बिरबल यांचेवर विशेषत्वाने घरातील राष्ट्रीयत्वाचा खूप प्रभाव पडला. लाहोर, त्याकाळच्या भारतातील राजकीय चळवळींच्या केंद्रांपैकीचे एक केंद्र होते. जालियनवाला बाग हत्याकांडानंतर असहकारिता चळवळ सुरू झाल्यावर, राष्ट्रीयत्व खोलवर रुजले गेले. प्रा. रुचिराम यांनी ब्रिटीश सरकारने त्यांना दिलेली पदवी परत केली आणि सरकारने दबाव आणूनही आपल्या भूमिकेत कोणताही बदल केला नाही. अशा घटनांनी युवा मनांवर अमिट असा ठसा उमटवला होता. बिरबल यांच्या स्वभावातील निर्भयतेचा संबंध या घटनेशी लावता येईल. त्यांच्या घरी अनेक स्वातंत्र्यसैनिक येत असत. ते भारतात परतल्यावर त्यांनी पाश्चात्य वेषभूषेचा त्याग केला. ते नेहमी भारतीय खादीचाच पोशाख नेसत असत.
भारत ही पुरातन काळापासूनच विज्ञान आणि तंत्रज्ञानांची भूमी राहिलेली आहे. सत्याचा शोध आणि विज्ञानोपासना यांना आपल्या आयुष्यांत अद्वितीय स्थान आहे. दुर्दैवाने आक्रमकांच्या आणि ब्रिटिशांच्या शासनकाळात, विज्ञानविकास जवळपास स्थगितच राहिलेला होता. १९-व्या शतकाच्या उत्तरार्धात राष्ट्रीयतेच्या भावनेस जाग आली. त्यासोबतच भारतीय उपखंडात वैज्ञानिक कार्यांचे पुनरुत्थान झाले. आधुनिक काळातील अनेक भारतीय वैज्ञानिकांनी समाजात आधुनिक विज्ञान रुजवण्याचा आणि त्याच्या प्रगतीचा प्रयास केला. बिरबल साहनी हे त्यांपैकीच एक आहेत. त्यांनी भारतास जगाच्या वैज्ञानिक नकाशावर स्थान मिळवून दिले. भारतातील अनेक संस्था आणि संघटनांच्या स्थापनेत त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे.
जीवाश्मप्रेम हा बिरबल यांचा छंद होता. त्यांनी भारतात पुरावनस्पतीशास्त्रासारखे महत्त्वाचे अभ्यासक्षेत्र प्रस्थापित केले. त्यांना निर्विवादपणे भारतातील “पुरावनस्पतीशास्त्राचे जनक” मानता येईल. त्यांनी शास्त्रीय सत्ये उजागर केली. विज्ञानाच्या अभ्यासास त्यांनी वलय आणि चमकही प्राप्त करून दिली. ते संवेदनशील, न्यायनिष्ठ आणि सहृदय व्यक्ती होते. त्यांना पित्यापासून प्रखर देशभक्ती आणि विज्ञानप्रीती लाभली; तर औदार्य आणि सखोल श्रद्धा हे गुण त्यांना आईकडून लाभले.
गव्हर्नमेंट कॉलेज लाहोर येथे बी.एस.सी. करत असतांना बिरबल यांनी वनस्पतीशास्त्राचा पर्याय निवडला होता. इथे त्यांची गाठ एका विस्मयकारक शिक्षकांशी पडली. ते प्रा. शिवराम कश्यप होते. विख्यात भारतीय शैवालशास्त्रज्ञ होते ते. त्यांचा बिरबल यांचेवर खूपच प्रभाव पडलेला होता. त्यांनी बिरबल यांना चंबा, लेह, बालताल, उरी, पूंछ आणि गुलमर्ग इत्यादी हिमाचलप्रदेश आणि जम्मू व काश्मीर राज्यांतील ठिकाणांवर अनुभवाकरता नेलेले होते. बिरबल सुदैवी होते. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांत, जोझिला खिंडीसारख्या अवघड प्रदेशातही भेट देण्याची संधी त्यांना लाभलेली होती. यामुळे बिरबल यांचे वनस्पतीशास्त्रातील स्वारस्य वाढीस लागले. त्यांच्या आयुष्यातील हा एक मोलाचा टप्पाच होता. घरी लावण्याकरता ठिकठिकाणी हिंडून वनस्पती गोळा करणे हाही त्यांचा एक छंदच होता. या वेळेपर्यंत त्यांनी वनस्पतीशास्त्रातच उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय घेतलेला होता.
बिरबल यांचा स्वभाव हरहुन्नरी होता. युवा विद्यार्थी म्हणून त्यांनी आपल्या शाळेचे तसेच महाविद्यालयाचेही हॉकी खेळात प्रतिनिधित्व केलेले होते. ते टेनिसही खेळत असत. केंब्रिजमध्ये असतांना ’इंडियन मजलिस’मध्ये ते टेनिस खेळत असत. त्यांना संगीतही आवडत असे. ते सितार आणि व्हायोलिनही वाजवू शकत असत. त्यांची चित्रकला चांगलीच होती. या सार्यांमुळे त्यांचे आयुष्य अत्यंत संतुलित झालेले होते.
त्यांचे वडील बंधू बिक्रमजीत मँचेस्टर येथे शिकत होते. एके दिवशी त्यांचे घरी, केंब्रिजमधून बिरबल आलेला पाहून ते चकितच झाले. घरची आठवण असह्य होऊन, डोळ्यांतून पाणी येत असलेल्या अवस्थेतच ते आले होते. ते म्हणाले की, आता त्यांना केंब्रिजमध्ये राहायचे नाही. त्या काळात यू.के.मधील उच्चशिक्षण, भारतापासून ते ठिकाण अमेरिकेहून खूपच जवळचे असल्याने, कुणालाही स्वप्नवतच वाटत असे. बिरबल यांनी केंब्रिज न सोडता तिथेच शिक्षण चालू ठेवावे याकरता बिरबल यांची समजूत काढणे बिक्रमजीत यांना अतिशय हुशारीने आणि प्रयासपूर्वकच करावे लागले होते.
हळूहळू गोष्टी बदलत गेल्या आणि बिरबल यांनी ट्रायपॉस (केंब्रिजमधील पदवीकरताची अंतिम ऑनर्स) परीक्षा पार केली. मग ते पी.एच.डी.करता काम करू लागले. आघाडीचे वनस्पतीशास्त्रज्ञ प्रा. अल्बर्ट चार्लस सिवर्ड हे त्यांचे मार्गदर्शक होते. भारतातील पुरावनस्पतीशास्त्रात प्रा. सिवर्ड यांचे नाव प्रसिद्धच होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बिरबल यांनी पी.एच.डी. करण्याच्या घटनेमुळे भारतातील पुरावनस्पतीशास्त्रास नवेच वळण लाभले होते.
त्यांच्या वडिलांना असे वाटे की, त्यांनी प्रशासकीय सेवांत जावे. मात्र बिरबल यांना वनस्पतीशास्त्रात संशोधन करायचे होते. रुचिराम यांनी अंतिमतः तरूण बिरबल यांच्या इच्छेस मान दिला. १९१५ साली, प्रा. सिवर्ड यांचेसोबत केंब्रिज येथे काम करत असतांना बिरबल यांनी, ’नवीन वनस्पतीशास्त्रज्ञ (न्यू फायटोलॉजिस्ट)’ नावाच्या नियतकालिकात दोन शोधनिबंध प्रकाशित केले. त्यातच त्यांची क्रांतिक विचार करण्याची विश्लेषण क्षमता व्यक्त झाली होती. त्यांनी माऊंट पेल्लीअरवरून गोळा केलेल्या जीवाश्मांचा अभ्यास केला. पहिल्या शोधनिबंधात त्यांनी, जिंक्गो वनस्पतीच्या स्त्रिबिजांडातच परागकणांचे अस्तित्व असल्याचा अहवाल दिलेला होता. दुसरा शोधनिबंध एका सुरस नेच्याच्या (फर्नच्या) अभ्यासावर आधारित होता. क्वालालंपूर येथून संकलित केलेल्या या वनस्पतीचे शरीरशास्त्र अत्यंत विस्मयकारक असते. या वनस्पतीची धावती खोडे (स्टोलोन्स) खूप लांब असतात. जमिनीला समांतर जाणार्या फांद्या असतात, ज्यांच्या टोकाशी नव्या वनस्पतींची वाढ होऊ शकणारे फुटवे असतात. याचे आणखी एक उदाहरण म्हणजे स्ट्रॉबेरीची वनस्पती. या प्रकरणात धावती खोडे १६ मीटर इतकी लांबवर जाऊ शकतात.
१९१६ साली, त्याच नियतकालिकातील आणखी एका शोधनिबंधात त्यांनी एन.कार्डिओफोलिया वनस्पतीच्या कंदांच्या संवहनी शरीररचनेचा (व्हॅस्कुलर अनाटॉमी ऑफ ट्युबर्सचा) अहवाल दिला आहे. यावरून, जीवित वनस्पतींच्या अभ्यासातील त्यांच्या सखोल स्वारस्याची आणि योगदानाची कल्पना येऊ शकते. पुढे मात्र त्यांचे जीवाश्मांवरील प्रेम वाढतच गेले. लवकरच त्यांना जणू तो छंदच जडला. त्यामुळेच ते भारतात महत्त्वाच्या पुरावनस्पतीशास्त्राची स्थापना करू शकले. त्यांना निर्विवादपणे भारतातील ’पुरावनस्पतीशास्त्राचे जनक’ म्हटले जाऊ शकेल. १९१९ साली ते भारतात परत आले आणि त्यांनी शिकवण्याचा निर्णय घेतला.
पुरावनस्पतीशास्त्र हा शब्द पुरा आणि वनस्पतीशास्त्र अशा दोन शब्दांनी घडलेला आहे. खडकांतील जीवाश्मांत जपून ठेवल्या गेलेल्या वनस्पतींचा अभ्यास करून त्यांची ओळख पटवणे, या शास्त्राला पुरावनस्पतीशास्त्र म्हणतात. जीवाश्म पुरातन काळातील वनस्पतीचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे त्या काळातील हवामानाची माहिती मिळवण्याकरता पुरातन वनस्पतींच्या ज्ञानाचा उपयोग होतो. वनस्पती हवामानातील बदलासोबत उत्क्रांत होतात. हवामान बदलल्यास वनस्पतीही बदलतात. उंच ठिकाणी आपल्याला शंक्वाकृती पाने आढळून येतात. वाळवंटात काटेरी वनस्पती उगवतात. उष्णकटिबंधीय भागांत रुंदपर्णी वनस्पती आढळून येतात.
वनस्पतींबाबत अनुमान करून, त्यावरून हवामानाचे अनुमानही करता येऊ शकते. जीवाश्माच्या अभ्यासास आणखीही एक उपयुक्तता आहे. एखादी वनस्पती केवळ छोट्याशा कालपट्ट्यातच अस्तित्वात असतील आणि अवसादी खडकात जर त्या वनस्पतीचे जीवाश्म सापडले तर आपल्याला त्या अवसादी खडकाचा काळ समजू शकतो. अवसादी खडकाच्या थरा थरांतून ते जमा होत गेलेले असतात. पुढे नव्या साठ्यांचे वजन आणि पर्यवसायी तापमान खडकाला अधिकाधिक घट्ट करत जातात. खडक तयार होतात. ’वनस्पतींच्या शिजण्यातून’ कोळसा तयार होतो. खडकात गाडलेल्या अवस्थेत उच्च तापमान आणि उच्च दाबाखाली वनस्पतींचा कोळसा उत्क्रांत होत असतो.
मात्र खडकांच्या अभ्यासातून अंतर्भूत वनस्पती सूचित होऊ शकतात. जीवाश्मांच्या अभ्यासाने विसरलेला भूतकाळ उलगडत जातो. जीवाश्म भूतकाळात डोकावून पाहण्याची संधी देतात. उदाहरणार्थ वनस्पतींचे जीवाश्म, आपल्याला त्या काळातील वनस्पती कशा दिसत असतील याची कल्पना देऊ शकतात. त्यांच्या साहाय्याने आज अस्तित्वातच नाहीत, त्या वनस्पती त्या काळात कशा दिसत असतील ते आपण पाहू शकतो.
जीवाश्म निरनिराळ्या प्रकारचे असतात. काही वेळेला दीर्घकाळ खडकांत खोल गाडले गेलेले असतात. त्यामुळे वनस्पती तापमान आणि दाबापायी कोळपून जातात. भूतकाळातील अन्नधान्यांचे कोळपलेले अवशेष पुरातात्त्विक स्थळांतून आढळून आलेले आहेत. काही वेळेस गाडल्या जातांना वनस्पती चपट्या होतात, मात्र उत्खननात तरीही, त्या त्यांच्या सेंद्रिय अवशेषांच्या आकारांवरून आणि रूपरेषांवरून ओळखल्या जाऊ शकतात. मग त्या आकारांत आणि रूपरेषांत काहीसे विचलन झालेले असले तरी त्याचा अडथळा होत नाही. अशांना दाबजनित जीवाश्म म्हणतात. काही वेळेस खडकात पाने गाडली जातात. त्यातून मूळ सेंद्रिय पदार्थ वाहून जातात. तसे असले तरी, खडकांत त्यांचा ठसा उमटलेला दिसू शकतो. त्यांना आपण ठशांचे जीवाश्म म्हणतो.
काही वेळेला गाडलेल्या वनस्पतींतील सेंद्रिय पदार्थ किंवा त्यांचे अंश, बव्हंशी कीटक आणि जीवाणूंनी खाऊन टाकलेले असतात. मात्र कधीकधी तसे ते खाल्ले जाण्यापूर्वीच त्यावर पुढील थर चढत जातात. अनेकदा त्या वस्तूच्या पृष्ठभागाची वैशिष्ट्ये तिथे तयार झालेल्या क्षार अथवा खनिजांच्या साच्यांत साठवली गेलेली असतात. मूल वनस्पती वा त्यांचे अंश जरी तिथून निघून गेलेले असले तरी, ते ठसे अभ्यासास उपलब्ध असतात. बिया वा फळे यांबाबत असे होऊ शकते. त्या साच्यांतून मऊ पदार्थ भरून मूळ जीवाश्मांच्या ठशांच्या प्रती काढल्या जाऊ शकतात.
काही प्रकरणांत वनस्पतीच्या आतील मऊ पदार्थ परिसरात हरवून जातात वा वरीलप्रमाणे जीवाणूंकडून खाल्ले जातात, मात्र त्यांची रिकामी झालेली जागा आजूबाजूच्या क्षार वा खनिजांनी भरून जाते. नंतर त्याचा बाह्य थरही (मऊ, पण मूळ आतील पदार्थांहून टणक) नाहीसा होतो. मूळ पदार्थांचा एक ठसा मात्र उमटून राहतो. त्यालाच ’साचा (कास्ट)’ म्हणतात.
वनस्पतींत परागकण आणि बीजांडे (स्पोअर्स) असतात. वनस्पतीचे हे प्रजनन अवयव असतात. लहान लहान वस्तू असतात या. छोटे अंश. कधी कधी १/१०० मिमी इतके लहान. प्रगत वनस्पतींना परागकण असतात तर तुलनेत प्राथमिक वनस्पतींना बीजांडे असतात. सामान्यतः (मात्र नेहमीच नाही) बीजांडे परागकणांहून लहान असतात. परागकणांचे बाह्य स्तर टणक असतात. बीजकवच (स्पोरोपोल्लेनिन) म्हटली जाणारी बहुवारिके असतात ती. अत्यंत कठीण परिस्थितीतही ती टिकून राहतात. वस्तुतः रासायनिकदृष्ट्या ती खूपच सशक्त असतात. एवढी की, खडकापासून परागकण मिळवण्याकरता, खडकाचा नमुना आम्ल वा विम्लात उकळवावा लागत असतो. कर्बप्राणिले (कार्बोनेटस) वा वालुका (सिलिका) विरघळतात तरीही परागकण टिकून राहत असतात. हे ’पुरातन परागकण’ प्रत्येक वनस्पतीच्या पृष्ठभागांच्या वैशिष्ट्यांसहच्या एकमेवाद्वितीय आकाराने ओळख पटलेले असतात. चित्रवेचक विजक सूक्ष्मदर्शकाने (स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपने) ही ओळख पटवली जात असते.
परिणामी पुरा-परागकण आणि बीजांडे सूक्ष्मदर्शकाखाली तपासून, निराळी करून, ओळख पटवून ठेवता येतात. ज्या वनस्पतींचा ती अंश होती त्यांच्याबद्दलच्या माहितीचा त्यावरून बोध होतो. असा अभ्यास करणार्या विद्याशाखेस बीजाणूशास्त्र किंवा पुराबीजाणूशास्त्र (पालिनोलॉजी किंवा पलिओ पालिनोलॉजी) असे म्हणतात.
काही वेळेस वनस्पती पाणवठ्याच्या तळाशी गाडल्या जातात. जर पाणी किंचित आम्ल असेल तर, त्याच्यात विरघळलेल्या स्वरूपात वालुका (सिलिका) असू शकते. तिथे जर त्यातील सेंद्रिय पदार्थ त्वरित खाऊन टाकण्याकरता खूपसे जीवाणू नसतील तर, विरघळलेल्या पदार्थांतील कर्बप्राणिले आणि क्वचित आजूबाजूच्या पाणथळ जागेत अस्तित्वात असलेली लोहासारखी मूलद्रव्ये वनस्पतीच्या अंतर्भागात शिरकाव करतात. उदाहरणार्थ वनस्पतीच्या बुंध्यात वालुका भरलेल्या पेशी असतात. ही प्रक्रिया अत्यंत मंद असते. अनेक लक्ष वर्षे ती सुरू राहते. विचलनविहीन पद्धतीने ती दीर्घकाळ सुरू राहिल्यास, यथावकाश आतील सर्व पेशींतील सेंद्रिय पदार्थांची जागा वालुकेने भरली जाते. अश्मिभूत झाड (पेट्रिफाईड ट्री) उभे राहते. अशा जीवाश्मांना अश्मिभूतवनस्पतीजीवाश्म म्हटले जाते. दर्शनावरून तुम्हाला ती प्रत्यक्षातील वनस्पतीची फांदीच भासेल. मात्र स्पर्श करताच वा तिला उचलण्याचा प्रयत्न करताच ती अश्मिभूत असल्याचे तुमच्या लक्षात येईल. त्या फांदीचा पातळ काप घेतल्यास सूक्ष्मदर्शकाखाली पेशी संरचनाही पाहता येईल. इथे याची नोंद केली पाहिजे की, पानांसारख्या सर्वात मऊ अवयवांचे अश्मिकरण होण्यापूर्वीच ते सडून जातात.
दिंडोरी, मंडाळा आणि शिवनी
(मध्यप्रदेश), बोलपूर (पश्चिम बंगाल),
राजमहल
(झारखंड) आणि जैसलमेर (राजस्थान) यांसारख्या काही ठिकाणी आजही आपण अश्मिभूत लाकडे
पाहू शकतो. कोट्यावधी वर्षांपूर्वी ही निर्माण झालेली आहेत. वस्तुतः यांपैकी
घुघ्वा (दिंडोरी, मध्यप्रदेश) सारख्या अनेक
ठिकाणी त्यांभोवती असे नमुने, जीवाश्म उद्याने स्थापन
करण्यात आलेली आहेत. तिथे आपल्याला भव्य वृक्ष ज्या जागी अश्मिभूत झालेले असतात
तिथेच ते पाहता येतात. ते अतिप्रचंड आहेत (अनेक मीटर लांब आणि सुमारे अर्धा मीटर
जाड). पाण्याच्या प्रवाहांनी सहजपणे जागचे हलू शकणारे नाहीत. सर्वाधिक शक्यता अशी
आहे की, जिथे ते आज आपण पाहत आहोत तिथेच त्यांची निर्मितीही
झालेली असावी.
घुघ्वा जीवाश्म उद्यान, दिंडोरी,
मध्यप्रदेश
अश्मिभूत लाकडास मूळ वृक्षाच्या खोडाचा आकार आणि त्याची वैशिष्ट्ये लाभलेली असतात. जीवाश्मात क्वचितच कुठे काष्ठतंतू वा तत्सम सेंद्रिय पदार्थ शिल्लक राहिलेले असतात. प्रामुख्याने त्यात वालुका आणि इतर खनिज पदार्थ भरलेले असतात. वर्तमानातले आकारमान मूळ आकारमानाहून (उंची आणि व्यास) खूपच लहान असते. अश्मिकरण मंद आणि अविचलितपणे झाल्यास खोडाच्या पेशी संरचनेचे बारकावे तरीही सुरक्षित राहू शकतात. अशांना अश्मिभूत जीवाश्मे म्हणतात. प्रयोगशाळेत अशांचे पातळ काप नमुने घेऊन सूक्ष्मदर्शकाखाली त्यांचा अभ्यास केला जाऊ शकतो. जीवाश्म झालेल्या वनस्पतींची ओळख पटवण्याकरता तो उपयुक्त ठरतो.
आणखी एका प्रकारचे जीवाश्मही असते ज्याला माग जीवाश्म किंवा जीवाश्म अवशेष म्हणतात. खडकात सापडलेले हे माग असतात. सेंद्रिय रचनेच्या हालचालींचे ते सूचक असते. त्या निघून गेल्यानंतरही माग मात्र शाबूत राहतात. प्राणीज विष्ठाही सुरक्षित टिकून राहू शकते. तांत्रिक भाषेत विष्टाश्म (कोप्रोलाईट) म्हटले जाणारे डायनासोर मल (पूप) हे एक उदाहरण आहे. यामुळे पुरावनस्पतीशास्त्रज्ञांना हे सिद्ध करणे शक्य झाले होते की, साडेसहा कोटी वर्षांपूर्वी जेव्हा पृथ्वीवर डायनासोर फिरत होते तेव्हा गवत अस्तित्वात होते. त्यामुळे आपल्या हे लक्षात येईल की, ओ’कीफे म्हणतात त्यानुसार द्रव विसरून जातात, मात्र खडक विसरत नाहीत. जीवाश्म भूतकाळातील मूल्यवान माहितीची स्मृती साठवून ठेवत असतात. निसर्गाचे हे लिखाणच असते.
बिरबल साहनी खडकावरले ते लिखाण वाचू शकणारे व्यक्ती होते. त्यांच्या संशोधनक्षेत्राच्या निवडीच्या रहस्याचा माग, त्यांनी युवावस्थेत केलेल्या प्रयोगांशी आणि त्यांच्या परिवाराच्या पार्श्वभूमीशी जोडता येतो.
अनेक लोकांची अशी समजूत असते की, पुरावनस्पतीशास्त्र हा विषय शुद्ध शैक्षणिक स्वरूपाचा असतो, त्याचा समाजास कोणताही उपयोग होत नाही. मात्र हे खरे नाही. ते शास्त्र आपल्याला हे सांगते की, पृथ्वीवर शस्य कसे निर्माण झाले, कसे उत्क्रांत झाले आणि प्रत्यक्षात वाटते त्याहून हे शास्त्र खूपच जास्त सुरस कसे आहे. वनस्पतींच्या जीवाश्मांच्या अभ्यासातून हाती आलेली काही सुरस माहिती पुढीलप्रमाणे आहे.
मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथे एक फणसाचे झाड सुमारे साडेसहा कोटी वर्षांपूर्वी वाढलेले होते. लखनौ येथील बिरबल साहनी पुरावनस्पतीशास्त्र संस्थेत त्याचे जीवाश्म आपण पाहू शकतो.
सामान्यतः असे मानले जाते की सिताफळाचे झाड भारतात पोर्तुगालमधून आले. मात्र सांची आणि मथुरेतील भारतीय मंदिरांतील भिंतींवरील शिल्पांत कोरलेले असल्याने लोकांच्या मनात त्याबद्दल शंका येत असे. पुढे सिताफळाच्या बिया/ साल यांचे अवशेष संघोल (पंजाब) आणि मिर्झापूर व सोनभद्र (उत्तरप्रदेश) येथे आढळून आल्याने तो गैरसमज दूर झाला होता. कोळशाचे तसेच बियांचेही रेडिओकार्बनडेटिंगवरून हे सिद्ध झाले की, सिताफळ सुमारे ३,००० वर्षांपासून भारतात आहे.
आणखी एक उदाहरण निलगिरी वृक्षाचे आहे. सामान्यतः अशी समजूत होती की, तो वृक्ष आपल्याकडे ऑस्ट्रेलियातून आला. मात्र भारतातील साडेसहा कोटी वर्षांपूर्वीच्या जीवाश्मांत तो आढळून आल्याने ती समजूत खोटी ठरते.
आणखीही एक मार्ग आहे. परागकण वनस्पतीचे गुणदर्शक असल्याने अवसादी खडकातील त्यांचे अस्तित्व आपल्याला त्या काळात प्रचलित असलेल्या वनस्पतींची कल्पना देते. पुढील पायरीवर, शस्य हवामानावर अवलंबून असल्याने, परागकण व बीजांड्यांचे अस्तित्व वनस्पतींचा प्रकारही सूचित करते. त्यामुळे हेही समजून घेता येते की, त्या वनस्पती जिथे वाढल्या होत्या तिथले हवामान कसे असेल.
हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, आज दोन तृतियांश वाळवंटी असलेला राजस्थान पूर्वी तसा नव्हता. सुमारे २५ लाख वर्षांपूर्वी राजस्थानात हिरवीगार जंगले होती. सुमारे १८ लाख वर्षांपूर्वीपर्यंत ती शाबूत होती. मधील अनेक टप्प्यांवर सशक्त वारे वाहत असत आणि वाळूच्या टेकड्या उभ्या राहिल्या होत्या. त्यामुळे शस्याच्या अस्तित्वाचे फारच थोडे पुरावे शिल्ल्क राहिले. मात्र ५ ते १० हजार वर्षांपूर्वी राजस्थानात खुली गवताळ मैदाने होती. परागकण आणि बीजांडे अशा प्रकारे आपल्याला, भूतकाळातील हवामानाची माहिती मिळवण्याची संधी देतात.
वनस्पतींचे जीवाश्म इतरही मोलाची माहिती देतात. भारतातील शेतकी परंपरांबाबत फार लोकांना माहिती नसते. भारतात ख्रिस्तपूर्व २३०० ते १५०० वर्षांपूर्वीपासून आपल्याकडे द्राक्षे पिकविली जात असतात. हा निष्कर्ष अवसादी खडकांत द्राक्षवेलींचे लाकूड आणि बिया यांचे जीवाश्म आढळून आल्यावरून काढण्यात आलेला आहे. पूर्वी लोक असे समजत असत की, द्राक्षलागवड मोघल काळापासून सुरू झाली.
मेंदी, चमेली, प्राजक्त आणि लिंबू हे हरप्पा काळापासून येथेच असल्याचे आढळून आले आहे. दक्षिण भारतात २,५०० वर्षांहूनही पूर्वीपासून, रीठ्याचा आणि आवळ्याचा वापर केला जात असे. इतरही अनेक उदाहरणे अस्तित्वात आहेत.
याशिवाय आर्थिक महत्त्वाची काही उपायोजने आहेत. आपल्याला हे माहीत असते की, जमिनीत छिद्रे करून तेल मिळू शकते. तेल अश्मकूपांतून (ट्रॅप्स) आढळून येते. सामान्यतः ’तेलाची खोरी’ अभेद्य अशा खडकांनी वेढलेली असतात, वर अवसादी टणक खडकांचे आवरण असते. त्यामुळे त्यातून तेल निसटून बाहेर जाऊ शकत नसते. तेलाचे गवेषण करतांना छिद्र करतच राहता येत नाही. हे अत्यंत खर्चिक ठरू शकते. त्यामुळे हे महत्त्वाचे असते की, छिद्र योग्य ठिकाणीच घेतले जावे. काही कालावधींदरम्यानच तेलनिर्मिती झालेली आहे, म्हणून त्या कालावधीतील अवसादी खडकांतून परागकण इत्यादी आढळून येत असतात. त्या कालावधीची ते सूचना देतात. त्यामुळे असे परागकण आढळून आल्यासच, छिद्र पुढे खोल नेत राहता येते.
वनस्पतींपासूनच घडलेल्या कोळशाबाबतही असेच धोरण अवलंबिले जाते. सुमारे २५ कोटी वर्षांपूर्वी, प्रामुख्याने गोंडवाना युगात, भारतात प्रचंड जंगले अवसादी खडकांत दडपली गेली. नंतरच्या कोट्यावधी वर्षांत त्यांचे रूपांतरण कोळशात झाले. भारतातील बहुतांश कोळसा त्याच कालावधीत निर्माण झालेला आहे. तो झारखंड, पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश आणि पूर्व उत्तर प्रदेश इत्यादींत विखुरलेला आहे. सुमारे ५ कोटी ते १५ कोटी वर्षांपूर्वीच्या, तृतियक कालावधीतील कोळसा फार थोडा आहे, तो बव्हंशी ईशान्य भारतात सीमित आहे. त्यातही जिथे परागकण, बीजाणू वा इतर पुरातन जीवाश्मांचा शोध लागलेला असेल तिथे, कोळसा आढळू शकेल असा योग्य स्तर शोधला जातो. उदककर्ब (पेट्रोलियम, डिझेल, उदककर्ब वायू) आणि कोळशाचे आपल्या आयुष्यांतील मोल लक्षात घेता, पुरावनस्पतीशास्त्र समाजाकरता किती मोलाचे आहे हे आपण समजू शकतो.
बिरबल यांच्यापाशी विषयाचे ज्ञान, संवादकौशल्य, संवेदनशीलता, यथातथ्यता आणि सहृदयता या सर्वच गोष्टी वैपुल्याने होत्या. १९१९ साली ते इंग्लंडमधून भारतात परतले. बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक पंडित मदनमोहन मालवीय यांना असे वाटत होते की त्यांनी तिथे विद्यापीठात रुजू व्हावे. वस्तुतः प्रा. बिरबल साहनी तिथे प्राध्यापक म्हणून रुजूही झाले होते. मात्र त्यांना असे वाटू लागले की, तिथे राहून ते त्यांचा छंदच असलेले पुरावनस्पतीशास्त्रातील संशोधन, हवे तसे साध्य करू शकणार नाहीत.
१९२० साली त्यांचा विवाह त्यांच्या वडिलांचे निकटचे मित्र असलेल्या श्री. सुंदर दास सुरी यांच्या मुलीशी –सावित्री यांचेशी- झाला. त्या नेहमीच त्यांच्या सर्व कठीण काळात त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. लग्नानंतर वर्षभराच्या आतच ते लाहोर येथे पंजाब विद्यापीठात रुजू झाले. पुढे १९२१ साली ते लखनौ विद्यापीठात गेले. लखनौमधील त्यांचा रहिवास सर्वाधिक राहिला.
प्रा. साहनी लखनौला प्राध्यापक म्हणून आले. त्यांच्यावर वनस्पतीशास्त्र प्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. ते आपल्या कर्तव्यांबाबत नेहमीच दक्ष असत. पदवीकरताच्या अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्याचे कार्य त्यांनी हाती घेतले. पद्धतशीरपणे त्यांनी बी.एस.सी. ऑनर्स आणि पदव्यूत्तर वर्ग, या अभ्यासक्रमांचीही व्यवस्था केली. ज्येष्ठ शिक्षकांनी नव्या विद्यार्थ्यांना विषयाची सुरूवात करून द्यावी यावर त्यांचा विश्वास होता. सामान्यतः ज्येष्ठ शिक्षक केवळ पदव्युत्तर वर्गच घेत असत. त्याच्या हे नेमके उलट होते. त्यांना असे वाटे की, ज्येष्ठ शिक्षकांचे उच्चतर अनुभव आणि त्यांची परिपक्वता यांमुळे ते विद्यार्थ्यांना विषयाचे बारकावे नीट शिकवू शकतील. त्यांच्यात विषयाप्रतीचे प्रेम निर्माण करू शकतील. त्यांना विषयाबाबतच्या संकल्पना सुस्पष्ट करून देऊ शकतील.
साहनी लोकप्रिय शिक्षक होते. त्यांच्या अभ्यासक्रमाचे नसलेले विद्यार्थीही काही वेळेस त्यांच्या वर्गांना येऊन बसत असत! जीवाश्मांचे, परिस्थितीचे वा संकल्पनेचे वर्णन करतांना योग्य शब्द आणि शैली सुचणे ही त्यांना लाभलेली देवदत्त देणगी होती. फळ्यावर ते दोन्हीही हातांनी चित्र काढत असत आणि सुबोधरीत्या ते समजावूनही देत असत. त्यांचे संशोधन निबंध त्यांच्या दर्जाचा ठसाच घेऊन येत असत. त्यांचे सादरीकरण थोडक्यात आणि अत्यंत सुस्पष्ट असे. ते स्वभावाने परिपूर्णतेस बांधलेले होते. पुरावनस्पतीशास्त्रात ते असे विषय हाताळत असत जे वास्तव जगात मूळ स्वरूपात अस्तित्वातच नव्हते, म्हणून त्यांचे वर्णन करतांना असामान्य सामर्थ्य लागत असे. शिकवतांना ते पाठ्यपुस्तकाशी बांधलेले राहत नसत. त्यांच्या वर्गात ते त्यांच्या क्षेत्रातील अगदी अलीकडील शोधही घेऊन येत असत. त्यामुळे त्यांची व्याख्याने परिपूर्ण होत असत, सर्वाधिक उत्तेजक ठरत असत आणि विद्यार्थ्यांना विषय आकलनात त्याचा लाभही होत असे. त्यांनी १६ विद्यार्थ्यांना डॉक्टरल पदवीकरता मार्गदर्शन केले होते. त्या सगळ्यांनी आपापल्या कर्तृत्वाने नाव केलेले आहे.
प्रा. बिरबल साहनी यांनी एम.एस.सी.च्या विद्यार्थ्यांकरता परीक्षेचा विशेष विषय म्हणून पुरावनस्पतीशास्त्र हा विषय पहिल्यांदा सुरू केला. यामुळे देशात पुरावनस्पतीशास्त्रास उत्तेजना मिळाली. कल्पना अशी होती की, संभवतः कुशल प्राध्यापकांत आणि सुरूवातीसच विषयाची ओळख झाल्यामुळे कुणा विद्यार्थ्यात त्याबाबतचे स्वारस्य जागृत होईल आणि तो या क्षेत्रात संशोधन करेल. नंतर कोलकाता, अलाहाबाद आणि इतरही काही विद्यापीठांत तसेच करण्यातही आले.
प्रा. साहनी यांनी शिकवण्यासोबतच संशोधनही सुरूच ठेवलेले होते. प्रशासकीय कामही ते करत होतेच. यू.के. मधील केंब्रिज विद्यापीठाने त्यांना १९२९ साली सन्माननीय डी.एस.सी. पदवी प्रदान करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांच्या कार्यास मोठीच मान्यता लाभली. त्यांचे संशोधन, शिक्षणकौशल्य यांमुळे लखनौ विद्यापीठातील वनस्पतीशास्त्रविभाग देशातील पुरावनस्पतीशास्त्र प्रशिक्षण आणि संशोधनाचे प्रमुख केंद्र झाला.
प्रा. साहनी यांनी शिकवण्यासोबतच संशोधनही सुरूच ठेवलेले होते. प्रशासकीय कामही ते करत होतेच. यू.के. मधील केंब्रिज विद्यापीठाने त्यांना १९२९ साली सन्माननीय डी.एस.सी. पदवी प्रदान करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांच्या कार्यास मोठीच मान्यता लाभली. त्यांचे संशोधन, शिक्षणकौशल्य यांमुळे लखनौ विद्यापीठातील वनस्पतीशास्त्रविभाग देशातील पुरावनस्पतीशास्त्र प्रशिक्षण आणि संशोधनाचे प्रमुख केंद्र झाला.
असे स्पष्ट होऊ लागले होते की, पुरावनस्पतीशास्त्र भूगर्भशास्त्रापासून निराळे करता येत नाही. साहनींच्या प्रयासांना १९४३ साली फळ लाभले. लखनौ विद्यापीठात भूगर्भशास्त्रविभाग स्थापन झाला. प्रा. साहनींनाच तहहयात त्याचे प्रमुख करण्यात आलेले होते.
प्रा. साहनी यांनी नाणी आणि इतर पुरातात्त्विक वस्तूंचा अभ्यास करण्यातही रुची दाखवली. हरयाणामध्ये जीवाश्मांच्या शोधात असतांना त्यांना नाण्यांच्या साच्यांचा एक संग्रहच आढळून आला. “ए क्ले सिल अँड सिलिंग ऑफ शुंग पिरियड फ्रॉम खोक्रा कोट माऊंड” या शीर्षकाने त्यांनी १९३६ साली त्याचा अहवाल दिला. ते काम त्यांनी सुरूच ठेवले. आणखी उत्खननही केले. मग पुरातन भारतातील नाणी पाडण्याच्या तंत्रांवरील एक शोधप्रबंधही त्यांनी सादर केला. सहा वर्षांनंतर १९४१ मध्ये त्यांनी “यौद्धेय कॉईन मोल्डस फ्रॉम सनेट निअर लुधियाना इन सतलज व्हॅली” हा आणखी एक शोधनिबंधही प्रकाशित केला. नाणेशास्त्रावरील त्यांचे कामाकरता न्युमिस्मॅटिक्स सोसायटी ऑफ इंडियाने मेडल देऊन त्यांचा सन्मानही केला.
करेवा म्हणजे सुमारे ८०० ते १,८०० मीटर उंचीवर आढळून येणारी पायर्यांची भूसंरचना. ही संरचना एका तलावात जमा झालेली दिसून आली. अशा उंचीवर, पाणथळात निर्माण होणार्यावनस्पतींची अपेक्षा नसते. मात्र तेथे पाणथळातील वनस्पती आढळून आल्याने, तो पैलू सुरस ठरला. तळे मुळात कमी उंचीवर होते. भूगर्भीय उलथापालथीत ते वर उचलले गेले असावे.उलथापालथ म्हणजे पृथ्वीच्या कवचावरील भूपट्टांच्या हालचाली. परस्परांवर धडकण्यामुळे हलका पट्टा वर उचलला गेला असावा. त्यामुळे सुरूवातीस निम्न स्तरावर असलेले हे साठे नंतर किमान २,००० मीटर वर उचलले गेले असावेत. त्या काळात असे स्पष्टीकरण देण्याकरता अंगी तशीच धमक असायला हवी होती. ती बिरबल यांच्यापाशी होती. त्या काळी अपरिचित समजली गेलेली ती संकल्पना आज जागतिक पातळीवर मान्यताप्राप्त झालेली आहे.
प्रा. साहनी एकूणात संपूर्ण दृश्य पाहण्यावर विश्वास ठेवत असत. त्यांना नेहमीच असे वाटे की, जेवढे अधिक जीवाश्म तुम्ही अभ्यासाल तेवढे चित्र अधिक स्पष्ट होत जाईल. त्यांनी स्वतः केवळ भारतातीलच नव्हे तर इतर अनेक देशांतल्या नमुन्यांचाही अभ्यास केलेला होता. जेव्हा जेव्हा प्रा. साहनी युरोपला भेट देत असत, तेव्हा ते शक्य तितके अधिक नमुने गोळा करत असत. वस्तुतः ते निवर्तले तेव्हाही, अनेक नमुने स्टॉकहोम येथे त्यांच्या भेटीच्या अपेक्षेने वेगळे काढलेले होते.
प्रा. सिवर्ड यांच्यासोबत डॉक्टरेटसाठीचे काम करत असतांना बिरबल साहनी, मुळात लॉसन यांनी लिहिलेल्या पाठ्ययपुस्तकाच्या पुनर्रचनेचे कामही करत होते. सुरस हे आहे की, त्या कामाच्या अटींत एक अट अशी होती की, पुनर्रचना करणार्या लेखकाने वनस्पतीशास्त्रावर दुसरे पुस्तक लिहू नये. हे सर्व केवळ २० स्टर्लिंग पौंडाची क्षुल्लक रक्कम मिळण्याकरता ते करत होते! विचारांची सुस्पष्टता आणि अपवादात्मक अभिव्यक्तीचे सामर्थ्य त्यांच्यापाशी होते. हे लक्षात घेता मात्र, त्या अटीपायी त्यांच्या पाठ्यपुस्तक न लिहिण्याने वनस्पतीशास्त्राच्या विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसानच झालेले आहे हे लक्षात येते.
त्यांनी भारताच्या अनेक भागांत क्षेत्रसहली काढल्या होत्या.
हल्लीच्या झारखंडातील राजमहाल येथे ते वारंवार जात असत आणि आपला संग्रह समृद्ध करत
असत. जम्मू-काश्मीरातील करेवा अवसादी खडकांवरही ते क्षेत्रसहली काढत असत. त्यांनी
हिमाचल आणि उत्तरांचलातील ठिकाणांचेही गवेषण केले होते. सुरस हे आहे की, त्यांनी
मोठ्या संख्येने अभ्यासलेले जीवाश्म, क्षेत्रभेटींतून
न मिळता संग्रहालयांतून लाभलेले होते. त्यामुळे त्यांचे काही मित्र त्यांना
खरोखरीचे ’जीवाश्म शिकारी’
असे
संबोधत असत! यामुळे त्यांना जगभरातील वनस्पतींबाबत एक सम्यक दृष्टिकोन लाभला, वनस्पतींतील
उत्क्रांतीकडे ते अधिक उदार दृष्टीने पाहू लागले.
त्या काळातील सुविधा अत्यंत किरकोळ असत. १९३२ च्या सुमारास, म्हणजे लखनौ विद्यापीठात ते रुजू झाल्यानंतर दशकभराने त्यांना जीवाश्म कापण्याच्या यंत्राकरता रु.४,०००/- निधी प्राप्त झाला होता. मात्र प्रा. साहनींची इच्छाशक्ती, अडचणींवर मात करण्यास पुरेशी होती. त्यांनी अडचणींनिरपेक्षपणे आपले कार्य अविरत सुरूच ठेवले.
जीवाश्मांकरताची ठिकाणे सामान्यतः दूरस्थ असतात (आजही ती बहुतेक तशीच आहेत) आणि अभ्यासकर्त्यास बैलगाडीतून, सांदीफटींतून आणि चालतही खूप प्रवास करावा लागत असतो. हे काम काही सोपे नाही.
प्रा. साहनी अशा मताचे होते की, संशोधनाकरता मोलाची असलेली कोणतीच गोष्ट कमी महत्त्वाची नसते, त्यामुळे स्वतःच एखादे काम करण्यात संशोधकाने कमीपणा वाटून घेऊ नये. हाच नियम ते स्वतःही लावत असत. जीवाश्मांच्या अभ्यासाकरता हवे ते ते, ते स्वतःच करत असत. मग त्या क्षेत्रसहली असोत, जीवाश्मांचे उत्खनन असो, पाठीवरून केलेली त्यांची वाहतूक असो, जीवाश्मांना फोडणे, कापणे, कुटणे, गुळगुळित करणे वा त्यांची प्रकाशचित्रे काढणे असो. प्रा. साहनी तार-धनुष्याच्या (वायर-बो च्या) साहाय्याने कष्टपूर्वक खडक कापत असत आणि त्याचे काप तयार करत असत. हे काही सोपे काम नाही.
जीवाश्म अवसादी खडकांत आढळून येतात. असे खडक, अवसादी पदार्थांच्या दाबाखाली येण्यामुळे, तसेच उच्च तापमानाच्या प्रभावामुळे, सामान्य खोलीवरही तयार होत असतात. सामान्यतः असे खडक अग्निजन्य खडकांहून ठिसूळ असतात. जीवाश्म मात्र अत्यंत टणक असू शकतात. उदाहरणार्थ जीवाश्म अश्मिभूत लाकडाच्या स्वरूपात असू शकतात किंवा शुद्ध वालुकामय (चर्ट) स्वरूपात असू शकतात.
१९३० नंतरच्या दशकाच्या काळात राष्ट्रीयत्व आणि स्वातंत्र्यभावना अत्युच्च जोरावर असे. ब्रिटिश राज्याविरुद्धचा निषेध व्यक्त करण्याचे प्रमाण वाढते होते. मात्र, भारतीय विज्ञानाकरता, हाच काळ सुवर्णकाळ ठरत होता. रामानुजन यांना रॉयल सोसायटीची फेलोशिप मिळालेली होती. एक बिनीचे गणितज्ञ म्हणून ते आदर्श ठरत होते. जगदीशचंद्र बोस, सत्येंद्रनाथ बोस आणि मेघनाद साहा, आपल्या मौलिक योगदानांनी जगास प्रभावित करत होते. रमण यांचा नुकताच १९३० साली नोबेल पुरस्काराने गौरव करण्यात आलेला होता.
सुमारे दोन शतकांच्या वसाहतवादाच्या परिणामी आणि शिक्षणप्रणालीतील पक्षपाती अभ्यासक्रमांमुळे आलेल्या दीर्घकाळच्या न्यूनगंडास या गोष्टी कमी करत होत्या. तर दुसर्याबाजूस भारतीयांना आपल्या बुद्धिमत्तेच्या श्रेष्ठत्वाची चमक जगास सिद्ध करून दाखवण्याची इच्छाही होतीच. तरीही बहुतेक भारतीय शास्त्रज्ञांना पक्षपाताशी लढा देणे अवघड ठरत होते. वाजवी कालावधीत त्यांचे संशोधनकार्य प्रकाशित करण्यात अडचणी येत होत्या. परकीय नियतकालिकांतच ते प्रकाशितही करावे लागत असे. रमण, साहा, साहनी आणि इतरांच्या आपापसांत चर्चा झाल्यानंतर ’करंट सायन्स’ नावाचे एक नवीन नियतकालिक १९३२ साली बंगळुरूमध्ये स्थापन करण्यात आले. त्याचे मानांकन उच्च आहे आणि आजही ते नियमितपणे प्रकाशित होत असते.
प्रा. साहनी यांना असे वाटले की, भारतातील वनस्पतीशास्त्रज्ञांकरता विज्ञानाची चर्चा करण्याकरता एक व्यासपीठ हवे आहे. त्यामुळे त्यांनी पुढाकार घेतला आणि प्रमुख भूमिका पार पाडून, १९२० साली ’इंडियन बॉटनिकल सोसायटी’ची स्थापना केली. १९२४ साली मागणी वाढू लागली म्हणून, ’नेचर’ पत्रिकेच्या संपादकांनी भारतास भेट दिली आणि ते ’इंडियन बॉटनिकल सोसायटी’चे अध्यक्षही झाले.
भारतातले विज्ञान अनेक विद्याशाखांतून प्रगतीपथावर होते. हे लक्षात घेता, ’रॉयल सोसायटी ऑफ लंडन’च्या धर्तीवर,’इंडियन सायन्स अकॅडेमी’ची आवश्यकताही प्राकर्षाने जाणवत होती. चंद्रशेखर व्यंकट रमण आणि मेघनाद साहा यांच्याप्रमाणेच बिरबल साहनींनीही यात प्रमुख भूमिका बजावलेली होती. पुढे ते या संस्थेचे अध्यक्षही राहिले.
१९३० साली प्रयागराज येथे ’नॅशनल अकॅडेमी ऑफ सायन्सेस’ची स्थापना झाली. तिच्या १५ संस्थापक सदस्यांपैकी बिरबल एक होते. १९३७ ते १९३९ या आणि १९४३ ते १९४४ या कालावधींत ते या संस्थेचे अध्यक्षही राहिले.
नंतर जेव्हा चंद्रशेखर व्यंकट रमण बंगळुरू येथे अकॅडेमी स्थापन करण्याच्या प्रयत्नात होते त्यावेळीही प्रा. साहनींनी पुन्हा एकदा महत्त्वाची भूमिका बजावली होती. २४ एप्रिल १९३४ रोजी ’इंडियन अकॅडेमी ऑफ सायन्सेस’ बंगळुरू ची स्थापना झाली. त्याही संस्थेचे ते संस्थापक सदस्य होते. १९३४ ते १९४९ दरम्यान ते या संस्थेचे उपाध्यक्षही राहिले.
जानेवारी १९३५ मध्ये कोलकाता येथे स्थापना झालेल्या ’नॅशनल अकॅडेमी ऑफ सायन्सेस’च्या १२५ संस्थापक सदस्यांपैकीही ते एक होते. हल्ली ती संस्था,’इंडियन नॅशनल सायन्स अकॅडेमी’, नवी दिल्ली म्हणून ओळखली जाते.
प्रा. साहनींना नेहमीच असे वाटे की, अधिकाधिक शास्त्रज्ञांनी पुरावनस्पतीशास्त्रात संशोधन करावे. अधिकाधिक याकरता, पुरावनस्पतीशास्त्रज्ञांचे समाजासोबत नियमित संवाद आणि विषयाचे वाढते प्रकटीकरण होणे आवश्यक होते. त्याकरता वैज्ञानिक समाजास एका सामायिक व्यासपीठाची आवश्यकता होती. त्यामुळे त्यांनी १९३९ साली भारतीय पुरावनस्पतीशास्त्रज्ञांची एक समिती स्थापन केली. पुरावनस्पतीशास्त्र संशोधनाचे समन्वयन, प्रगतीचे नियमित दस्तैवजीकरण हा उद्देश होता. विषयाच्या संस्थात्मक संरचनेकरता हे फारच मोलाचे ठरले.
पुरावनस्पतीशास्त्र एक शुद्ध आणि उपायोजित आशादायक विषय म्हणून प्रकट करण्यास पुरेशी पार्श्वभूमी तयार झालेली होती. सर्व दिशांनी तिचा विकास होत होता. प्रा. साहनींनी एकसारखेच विचार असणार्या लोकांना एकत्र केले आणि १९ मे १९४६ रोजी ’पालेओबॉटनीकल सोसायटी’ची लखनौ येथे स्थापना केली. त्याच वर्षी १० सप्टेंबर रोजी, सोसायटीच्या प्रशासकीय मंडळाने असा निर्णय घेतला की, ’पुरावनस्पतीशास्त्र संस्था’ स्थापन केली जावी. तिचा तळ लखनौ विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागातच असणार होता. एक दीर्घकाळ जपलेले स्वप्न आता साकार होणार होते.
प्रा. साहनी यांचा नेहमीच असा विश्वास होता की, एखाद्या विषयाच्या वायुगच्च भिंती उभ्या करून संशोधन संभवत नाही. आधीच उल्लेख केल्यानुसार, भूगर्भशास्त्राची पुरावनस्पतीशास्त्रातील भूमिका समजून घेण्याकरता आणि लखनौ विद्यापीठात भूगर्भशास्त्राचा नवा विभाग सुरू करण्यासाठी त्यांनी अधिकारी व्यक्तींना आग्रह केला. लखनौ विद्यापीठात वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुखपद सांभाळत असतांनाच त्यांनी, भूगर्भशास्त्राचा नवा विभागही सुरू केला. त्या विभागाचे ते तहहयात प्रमुखही राहिले.
उद्घाटनाच्या प्रसंगी प्रा. साहनी म्हणाले होते की, कोनशिला म्हणून, पत्थर हे काहीसे असामान्य स्मारक आहे. हेतुतःच तो या प्रयोगशाळेत घडवला गेलेला आहे. अनेक देशांतून आणलेल्या अनेकविध भूगर्भशास्त्रीय स्वरूपांतील अत्यंत पुरातनकाळापासून (६० कोटी वर्षांपूर्वीपासून) सर्वात अर्वाचीन (ख्रिस्तोत्तर) काळापर्यंत विखुरलेल्या काळांतील निवडक खडक आणि जीवाश्मांपासून तो घडवलेला आहे.
प्रा. साहनी एका वेगळ्याच पद्धतीने जगाकडे पाहत असत. त्यांना विज्ञानाच्या मर्यादांची पूर्ण कल्पना होती. निसर्ग रहस्यांचे कवडसे जरूर दाखवतो. मात्र जे दाखवतो त्याहून अधिक तो लपवत असतो. विस्कळित दृश्यांचे पुरावे एकत्रित करणे आणि चित्र पूर्ण करणे आपल्यावरच अवलंबून असते.प्रा. साहनींनी वनस्पतींचा आणि जीवाश्मांचा अभ्यास केलेला होता. सजीव वनस्पतींच्या शास्त्राचाही त्यांनी अभ्यास केलेला होता. नाण्यांच्या विज्ञानातील त्यांचे संशोधनही चांगलेच मान्यताप्राप्त आहे. जेव्हा टेक्टॉनिक सिद्धांतास फारशी लोकमान्यता नव्हती, तेव्हा ते जीवाश्म पुराव्यांच्या आधारे टेक्टॉनिक सिद्धांताचे समर्थक झालेले होते.
त्यांना लहान मुलांसोबत राहणे आवडत असे, हसतखेळत त्यांचे मनोरंजन करणे आवडत असे. कुठेही, अगदी परदेशातही, प्रवास करतांना माकडासारखा दिसणारा एक मोजा सदैव त्यांचेसोबत असे. ’गिप्पी’ नावाच्या त्या माकडाच्या मनोरंजक कथा आणि किस्से सांगून ते मुलांना रिझवत असत. त्यांच्या पुतणीने तिच्या पुस्तकात हे सांगितलेले आहे की, त्यांनी आपल्या नवविवाहित पत्नीला त्याचे साहाय्याने कसे रिझवले होते. मात्र ’गिप्पी’ हा खराखुरा प्राणी नसून केवळ एक खेळणेच आहे, हे त्यांच्या पत्नीच्याही, त्याच्या करामती पाहिल्यानंतरच लक्षात आले होते.
ते महान संस्था संघटक होते. भारतातील सर्व तिन्ही प्रमुख शैक्षणिक विज्ञानसंस्थांच्या स्थापनेत त्यांचा सहभाग होता. पुरावनस्पतीशास्त्राच्या अभ्यासास त्यांनी संस्थाबद्ध केले. लखनौमध्ये असलेली ’बिरबल साहनी इन्स्टिट्यूट ऑफ पालेओसायन्सेस’ ही संस्था त्यांच्या अथक उत्साहाचे प्रमाणपत्रच आहे. त्यांचे ते एक जिवंत स्मारकच आहे. प्रा. साहनी सामर्थ्य वा पदाकरता झटले नाहीत. असे मानले जाते की, स्वातंत्र्यानंतर लगेचच, त्यांना शिक्षणमंत्र्यांकडूनच केंद्रिय मंत्रालयातील शिक्षणसचिवाचे पद देऊ करण्यात आलेले होते. मात्र विज्ञानास आणि त्याच्या विकासास स्वतःला वाहून घेतलेले असल्याने त्यांनी त्यास विनम्रपणे नकार दिला होता. अशा या महान भारतीय शास्त्रज्ञास सादर प्रणाम!
संदर्भः पुरावनस्पतीशास्त्राचे जनक प्रा.
बिरबल
साहनी, मूळ इंग्रजी लेखकः डॉ. चंद्र मोहन नौटियाल, मराठी अनुवादः नरेंद्र गोळे,
प्रकाशकः विज्ञान भारती, पृष्ठे-३९, ऑक्टोंबर २०२३.