२०२४-०९-०४

वक्तृत्व स्पर्धा


नुकताच एका वक्तृत्व स्पर्धेस उपस्थित राहण्याचा प्रसंग आला. स्पर्धा ८ वी, ९ वी आणि १० वी च्या किशोरवयीन मुलांकरता होती. प्रत्येक विद्यार्थ्याला आपले बोलणे ४ मिनिटांत संपवायचे होते. पहिल्या मिनिटात आपली, शाळेची आणि विषयाच्या निवडीची ओळख करून देणे. नंतरच्या दोन मिनिटांत विषयावरील भाष्य आणि अखेरच्या मिनिटात निष्कर्ष काढायचा होता. मग स्पर्धेदरम्यान, दोन मिनिटात मलाच जर या प्रत्येक विषयावर बोलायला दिले तर मी काय बोलेन, बोलू शकेन? हा विचार मला स्वस्थ बसू देई ना. त्यावर, खरोखरीच मी या विषयांवर काय बोलेन, बोलू शकेन त्याचे नमुने मी लिहून काढले आहेत. अर्थात मला वैचारिकदृष्ट्या एवढे गुंतवू शकले, यावरून आयोजकांची विषयांची निवड केवळ समयोचित आणि सुयोग्य होती एवढेच नव्हे तर, सर्जनशील मनांना विचारप्रवृत्त करणारीही होती, असेच म्हणावे लागेल.

इथे हे याकरता प्रस्तुत केले आहे की, वाचकांनीही या कळीच्या विषयांवर मनन, चिंतन करून अभिव्यक्त व्हावे. आपापली मते अवश्य मांडावीत.

विषय पुढीलप्रमाणे होते.

१. तंत्रज्ञान आणि मानसिक आरोग्य
२. कृत्रिम बुद्धिमत्तेचा शिक्षणावरील परिणाम
३. किशोरवयीन मुलांतील मानसिक आरोग्याबाबतची जागरूकता
४. उच्च बुध्यांक आणि भावनांक असण्याचे महत्त्व

शतेशु जायते शूरः सहस्रेषु च पण्डितः ।
वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वा न वा ॥

असे सुभाषित आहे. म्हणजे दर शंभरांत एक शूर होतो. हजारांत एक पंडित होतो. दहा हजारांत एक वक्ता होतो. दाता मात्र होतो वा होतही नाही!

तर दहा हजारात आपणही एक आहोत असे कल्पून, वाचकांनी या विषयांवर दोन मिनिटांत अभिव्यक्त व्हावे. मी जे बोलू/ लिहू शकलो आहे ते तर सोबत दिलेच आहे.

-------------------

तंत्रज्ञान आणि मानसिक आरोग्य

विज्ञानाचा उपयोग करून घेऊन मानवी कष्टांत बचत करण्याचे उपाय म्हणजे तंत्रज्ञान. दैनंदिन मानवी गरजांचा यथोचित सामना करण्याची मानवी उमेद म्हणजे मानसिक आरोग्य. तंत्रज्ञान उपलब्ध झाल्याने मानसिक आरोग्यात सुधार व्हावा अशी खरे तर अपेक्षा असते. मात्र तंत्रज्ञानाच्या अतिवापराने दैनंदिन मानवी गरजांचा यथोचित सामना करण्याची मानवी उमेदच जर खचत गेली, तर तंत्रज्ञानाचा यथोचित उपयोगच झाला नाही असे म्हणता येईल. मानवी उमेद वाढती राहील, इतक्या इष्टतम कमाल मर्यादेतच तंत्रज्ञानाचा उपयोग केला जावा. मात्र अलीकडे तंत्रज्ञानाच्या अपार आकर्षणापायी, या मर्यादेचे भान राहत नाही. माणसाकरता तंत्रज्ञान की, तंत्रज्ञानाकरता माणूस असा मूलभूत संघर्ष उभा राहतो.

कायप्पा (व्हॉटस ऍप), चर्यापुस्तक (फेसबुक) आणि सत्वरनोंद (इन्स्टाग्रॅम) अशांसारख्या समाजमाध्यमांतून अभिव्यक्त होण्याद्वारे होणारे लाभ खूपच वाढले आहेत. माणसाला ते अद्यतन (अपडेट) ठेवतात. जगभरात आत्ता कुठे, काय आणि कसे घडत आहे ते अवगत करून देतात. आपल्याला सुचलेले उपाय, आकलन, सूचना, आस्वाद ताबडतोब आपल्या सुहृदांप्रत पोहोचवता येतात. आपल्या क्षणोक्षणींच्या अवस्थांची ध्वनिचित्रे, प्रकाशचित्रे आणि चलत्चित्रे यांचा सुहृदांशी विनिमय करता येतो आणि त्यायोगे आपले जीवन अधिकाधिक समृद्ध करता येते. ही समृद्धी सामाजिक, आर्थिक, वैचारिक वा शारीरिक अशी सर्व प्रकारांची असू शकते. तिची मग चटक (क्रेझ) लागते. माणसाच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर प्रत्येकाने दररोज जो वेळ खर्च करावा लागतो, तोही वेळ समाजमाध्यमांवरच खर्ची पडू लागतो. संघर्षाचे कारण होतो.

या संघर्षात नेमके इष्टतमीकरण (ऑप्टिमायझेशन) साधणे प्रत्येकासच शक्य राहत नाही. जे बहुश्रुत असतात, कुशाग्रबुद्धी असतात, ज्यांचे समाजभान त्यांच्या आरोग्यभानाचा घास घेत नाही, असे लोक योग्य तो निर्णय घेऊ शकतात. कोणत्याही दिशेने जाऊन, इतर लोकांच्या पदरी मात्र काहीशी निराशाच पडते. याकरता या संघर्षाच्या स्वरूपाची चर्चा झाली पाहिजे. हाच तर या व्याख्यानाचा आजचा विषय आहे.

आता या संघर्षाचे स्वरूप लक्षात आल्यावर नेमके काय करायला हवे आहे, वेळेचे प्राधान्य कसे सांभाळायला हवे आहे, किती प्रमाणात तंत्रज्ञानाच्या आहारी जाणे क्षम्य आहे आणि नेमका किती वेळ मानसिक आरोग्याच्या रक्षणार्थ वेचावा याचे भान निर्माण होऊ शकेल. तसे ते व्हावे. व्यक्तिव्यक्तिगणिक ते निरनिराळे असले तरी, त्या त्या व्यक्तीच्या गरजा ते भागवू शकेल. असे व्हावे आणि तंत्रज्ञान मानसिक आरोग्याचे रक्षणकर्ते ठरावे हीच यानिमित्त सदिच्छा!

---------------------------

कृत्रिम बुद्धिमत्तेचा शिक्षणावरील परिणाम

मनुष्याला जगात वागावे कसे, हे ज्या कारणाने आपोआपच समजत असते, तिला ’नैसर्गिक बुद्धिमत्ता’ म्हणतात. प्रसंगी, स्वतःला सुचत नाही तेव्हा आपण ते जाणून घेण्याकरता इतरांच्या बुद्धीचीही मदत घेत असतो. आप्त-सुहृद-वरिष्ट-ज्येष्ठ-श्रेष्ठ अशा लोकांची मते जाणून घेऊन आपण त्यानुसार वागत असतो. हे असते आगमाचे ज्ञान. हल्ली गुगल शोधातून असे ज्ञान सहजी प्राप्त होऊ शकते. त्याचा उपयोग करून घेऊन जगात वागावे कसे हे ठरवणे म्हणजे एक प्रकारे कृत्रिम बुद्धीचा वापर करणे होय. नैसर्गिक बुद्धीसारखी मानवाने निर्माण केलेली बुद्धी म्हणून आपण तिला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणत असतो.

शिक्षण म्हणजे काय, तर गुरूजनांच्या मदतीने, जगात वागावे कसे याची जाण प्राप्त करणे होय. शाळेत आपण हेच तर करत असतो. अनेक वर्षांची साधना असते ती. मात्र आपल्या गुरूजनांची संचारक्षेत्रे सीमित असतात. जगभरात उपलब्ध असलेल्या ज्ञानाचा केवळ बिंदुमात्रच त्यांच्यापाशी उपलब्ध असतो. मग विजकीय माध्यमांचा (इलेक्ट्रॉनिक मेडिया) उपयोग करून आगमाचे ज्ञान का उपलब्ध करून घेऊ नये? हा प्रश्न उपस्थित झाला. तसा करण्याच्या अनेकानेक संधी शालेय विद्यार्थ्यांनाही उपलब्ध झाल्या. तेव्हा असा उपयोग होऊही लागला. मुले त्यांच्या प्रकल्पांकरता महाजालावर उपलब्ध असलेल्या मुक्त साहित्याचा प्रच्छन्न वापर करू लागली आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा शिक्षणावर परिणामही होऊ लागला.

मानवी जीवनात सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्ती उपजतच असतात. यथावकाश त्यांची वाढच होत जाते. दुष्ट प्रवृत्तींचे निरसन करून सुष्ट प्रवृत्तींना उत्तेजना देण्याकरताच मग संस्कारांचा जन्म झाला. संस्कृतीचा जन्म झाला. अगदी त्याचनुसार महाजालावरील उपलब्ध कृत्रिम बुद्धिमत्तेतही सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्ती उपजतच असतात. यथावकाश त्यांची वाढच होत जाते. दुष्ट प्रवृत्तींचे निरसन करून सुष्ट प्रवृत्तींना उत्तेजना देण्याकरताच मग नियमनांची गरज भासू लागते. नियमनाच्या अभावामुळेच आज हे काम व्यवस्थित होतांना दिसत नाही. ते व्हावे याकरता आता नव्या मूलगामी व्यवस्थेची आवश्यकता निकडीने निर्माण झालेली आहे.

या व्याख्यानातून हा विषय तर समजला, काय करायला हवे आहे तेही समजले, कोण करणार याचा मात्र उलगडा होत नाही. अशा परिस्थितीत, कृत्रिम बुद्धीचा उपयोग करणार्‍यानेच आपल्या तारतम्य बुद्धीचा म्हणजे नैसर्गिक बुद्धिमत्तेचा उपयोग करून कृत्रिम बुद्धिमत्तेचा यथोचित उपयोग करावा हेच उचित ठरेल. कोणती बुद्धिमत्ता सर्वोच्च असते? कृत्रिम की, नैसर्गिक? याचे उत्तर यावरूनच स्पष्ट होते. नैसर्गिक बुद्धिमत्ता हीच सर्वोच्च असते. तिचे अधिपत्य कुणीही, कधीही, कोणत्याही परिस्थितीत कमी होऊ देऊ नये. हे भान जरी यानिमित्ताने आपणा सर्वांना आले तरी, हे आयोजन यशस्वी झाले असे मानता येईल.

-----------------

किशोरवयीन मुलांतील मानसिक आरोग्याबाबतची जागरूकता

दैनंदिन मानवी गरजांचा यथोचित सामना करण्याची मानवी उमेद म्हणजे मानसिक आरोग्य. हे सशक्त असायला हवे. सामर्थ्यवान असायला हवे. उमेद शाबुत ठेवणे, समर्थ करणे आणि सत्प्रवृत्त करणे हे संस्कारांचे कर्तव्य असते. शालेय जीवनात अगदी सुरूवातीपासूनच मुलांना याची शिकवण दिली जात असते. मानसिक आरोग्याचे महत्त्व त्यांच्या मनावर सततच ठसवले जात असते. इयत्ता ८ वी, ९ वी आणि १० वी या कक्षांतील मुलांना सर्वसाधारणपणे किशोरवयीन समजले जाते. या मुलांत मानसिक आरोग्याबाबतची जागरूकता निर्माण व्हावी याचे प्रयास प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतून नियमितपणे केले जात असतात. परिणामी बहुतांश किशोरवयीन मुले याबाबत बर्‍यापैकी जागरूक असतात.

मात्र जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढतो आहे. शहरी जीवनास हल्ली प्रचंड गती प्राप्त झालेली आहे. कायप्पा (व्हॉटस ऍप), चर्यापुस्तक (फेसबुक) आणि सत्वरनोंद (इन्स्टाग्रॅम) अशांसारख्या समाजमाध्यमांतून अभिव्यक्त होण्याद्वारे होणारे लाभ खूपच वाढले आहेत. माणसाला ते अद्यतन (अपडेट) ठेवतात. जगभरात आत्ता कुठे, काय आणि कसे घडत आहे ते अवगत करून देतात. आपल्याला सुचलेले उपाय, आकलन, सूचना, आस्वाद ताबडतोब आपल्या सुहृदांप्रत पोहोचवता येतात. आपल्या क्षणोक्षणींच्या अवस्थांची ध्वनिचित्रे, प्रकाशचित्रे आणि चलत्चित्रे यांचा सुहृदांशी विनिमय करता येतो आणि त्यायोगे आपले जीवन अधिकाधिक समृद्ध करता येते. ही समृद्धी सामाजिक, आर्थिक, वैचारिक वा शारीरिक अशी सर्व प्रकारांची असू शकते. तिची मग चटक (क्रेझ) लागते. माणसाच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर प्रत्येकाने दररोज जो वेळ खर्च करावा लागतो, तोही वेळ समाजमाध्यमांवरच खर्ची पडू लागतो. संघर्षाचे कारण होतो. असे होत आहे.

अशा परिस्थितीत मानसिक आरोग्य सांभाळतांना, माणसाकरता तंत्रज्ञान की, तंत्रज्ञानाकरता माणूस असा मूलभूत संघर्ष उभा राहतो. या संघर्षात समतोल ढळू न देता, जीवनाची वेगवान गती सांभाळत असतांना, मानसिक आरोग्य सांभाळण्याकरता, स्वतःस उचित वेळ देता यायला हवा. तसा विवेक निर्माण व्हायला हवा. तो व्हावा म्हणून खरे तर चर्चासत्रांची गरज आहे. या वक्तृत्व स्पर्धेचा विषय ते साध्य करणाराच आहे. ही चर्चा होते तेव्हा, मानसिक आरोग्य रक्षणाकरताच्या नव्या पर्यायांचा विचार होतो. ते अंमलात आणले जातात आणि किशोरवयीन मुलांचे प्रबोधन होऊ शकते.

मी व्यक्तिगत समस्यांचे समाधान करेन, मी कौटुंबिक समस्यांचे निराकरण करेन, मी सामाजिक समस्यांची उत्तरे शोधेन, मी देशापुढील समस्यांचे निरसन करेन, याकरता मी पुढाकार घेईन, नेतृत्व करेन अशी समज प्रत्येक किशोरात निर्माण होईल तो सुदिन.

---------------

उच्च बुध्यांक आणि भावनांक असण्याचे महत्त्व

जगात वागावे कसे हे माणसाला सामान्यतः ज्या अंतर्प्रेरणेने समजते तिला बुद्धिमत्ता म्हणतात. कोणत्या वयात ती किती असावी, सरासरीने ती किती असते. याचे निकष मानवी इतिहासात यथावकाश प्रस्थापित झालेले आहेत. मग सरासरीच्या आधारे ज्या वयात जितकी कमाल समज असायला हवी, प्रत्यक्षात त्या त्या व्यक्तीस त्यापैकी किती समज आलेली आहे, त्याची टक्केवारी म्हणजे बुद्ध्यांक. हा जर १००% असेल तर सरासरीने असू शकणारी सर्व समज त्याला प्राप्त झालेली आहे असे आपल्याला म्हणता येते.

मनुष्य काही यंत्र नसतो. तो भावभावनांनी व्यापलेला असतो. आपल्याला जशा भावना असतात तशा त्या इतरांनाही असतात, हे भानही माणसाला वयासोबत वाढत्या प्रमाणात प्राप्त होतच असते. मग आपल्या भावनांची आपण जशी कदर करतो, जसा आदर करतो तशा इतरांच्या भावनांचीही उचित कदर करता यावी, उचित आदर करता यावा याकरताची जाण मनुष्यांत खरे तर सर्वोच्च असायला हवी. मात्र ती किमान सरासरीइतकी तरी असायला हवी. सर्वसाधारण माणसासारखे तरी तो वागू शकावा अशी समाजाची अपेक्षा असते. मात्र जी कमाल जाण, ज्या वयात अपेक्षित असते, त्याच्या किती प्रमाणात ती प्रत्यक्षात प्राप्त झालेली आहे याचा गुणकांक म्हणजे भावनांक. तो १००% असणे सगळ्यात चांगले. तो कसा शोधून काढावा याचेही निकष मानवी इतिहासात यथावकाश प्रस्थापित झाले आहेत.

त्यामुळे सर्व शालेय मुलांचे बुद्ध्यांक आणि भावनांकही समृद्ध व्हावेत, उच्चतर व्हावेत. उच्चतम व्हावेत याकरता शिक्षणविभाग सदासर्वदा कार्यरत असतो. मुलांनी, पालकांनी आणि गुरूजनांनीही या विषयाचे पुरेसे भान राखणे गरजेचे आहे. बुद्ध्यांक आणि भावनांकही समृद्ध करण्याकरताच्या उपायांची त्यांनी चर्चा करावी, नवनवे पर्याय शोधावेत, संशोधन करावे आणि त्यांतील निष्कर्षांनुरूप वागून आपापल्या जीवनात ते पर्याय अंमलात आणावेत. या वक्तृत्व स्पर्धेचे यशस्वी आयोजन करून, आणि अत्यावश्यक अर्वाचीन विषयांवर विचारमंथन घडवून आणून आयोजकांनी आपल्या दूरदृष्टीचा परिचय घडवलेला आहे.

मानवी जीवनात बुद्ध्यांक आणि भावनांक हे नक्कीच खूप महत्त्वाचे आहेत. हे या चर्चेतून स्पष्ट झालेले आहे. या विचारमंथनातून यथोचित उपायांचे नवनीत प्राप्त होऊन, सर्व शालेय मुलांचे, विशेषतः या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे बुद्ध्यांक आणि भावनांकही शक्य तितके अधिकाधिक समृद्ध व्हावेत हीच सदिच्छा!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: