२०१२ सालचा ऑगस्ट महिना होता तो. ध्यानीमनी नसतांना अचानकच एक दिवशी, २७ ऑगस्टला लोकसत्ताच्या ’वाचावे नेट-के’ सदरात माझ्या ब्लॉगचा मोठाच म्हणता येईल असा परिचयात्मक लेख प्रसिद्ध झाला. सदरलेखक ’अभिनवगुप्त’ यांनी, त्यात माझी आणि माझ्या ब्लॉगची भरपूरच स्तुती केलेली होती. त्यामुळे पुढे माझ्या ब्लॉगांची वाचकसंख्या झपाट्याने वाढत गेली. त्या घटनेला आज एक ’तप’ लोटले आहे. बारा वर्षे झाली आहेत. म्हणून त्या घटनेचे हे पुनर्स्मरण!
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मराठी ब्लॉग समीक्षक म्हणून नरेंद्र गोळे यांचा आदराने उल्लेख करावा लागेल. ब्लॉग या प्रकाराबद्दल मराठीत अनेकांनी आपापल्या ब्लॉगवर लिहिले आहे. परंतु ब्लॉग वाचन प्रचंड असणारे गोळे, एकेका ब्लॉगबद्दलची मते व्यक्त करतात तेव्हा, समीक्षकाला शोभणारा साक्षेप आणि अभ्यासूपणा त्यांच्या लिखाणात असतो.
मार्च २०११ पासून गोळे यांनी अनुदिनी परिचय ही सहा भागांची मालिका लिहीली होती तिचे भाग क्रमांक दोन- ’आनंदघन’ आणि भाग क्रमांक चार- ’अक्षर धूळ’ हे या दृष्टीने वाचनीय आहेत. गोळे यांना आद्य मराठी ब्लॉग समीक्षक ठरविता येईल की नाही याबद्दल दुमत असू शकते. वृत्तपत्रांनी आधी ब्लॉगकरांची ओळख करून देण्यास सुरुवात केली. २०१० मध्ये अशा सदराच्या सादरकर्त्याचे नाव ठळकपणे असायचे व बाकी मजकूर ब्लॉग लेखकाने स्वतःच सांगितलेला असे. मग एका वृत्तपत्राने एकाच विषयावर विविध ब्लॉग लेखक आपापल्या ब्लॉगवर काय लिहित आहेत याची ओळख करून देण्यास सुरुवात केली. जानेवारी २०११ पासून कालानुक्रमे या प्रयत्नांच्यानंतर गोळे यांची मालिका येते. मात्र वृत्तपत्रीय ब्लॉग समीक्षेच्या प्रयत्नांपेक्षा, गोळे यांची मते, विशेषत: अनुदिनी परिचयाच्या या दोन भागातील मते अभ्यासूपणामुळे सरस आहेत आणि सर्वमान्य होण्यासारखी आहेत.
ब्लॉग लेखक आणि मराठी ब्लॉग लेखनाच्या क्षेत्रातील एक ज्ञानविज्ञानप्रेमी कार्यकर्ते म्हणून गोळे यांचे श्रेय यापेक्षा मोठे आहे. २००९ मध्ये त्यांनी मनोगत डॉट कॉमवर महाजालावरील मराठीचा इतिहास, सहा भागात लिहिला होता. त्यातही ब्लॉग आणि चर्चा, संवादस्थळे याबद्दल त्यांनी काही मते ओघाने व्यक्त केली होती. त्या मालिकेत देवनागरी लेखन सार्वत्रिक करणाऱ्या युनिकोड पद्धतीमुळे संगणकावरील मराठीचा प्रसार कसा सुलभ झाला आणि मराठीचे महाजाल युनिकोडमुळेच कसे विस्तारले याचा मागोवा आहे. मनोगतवर शोध घेतल्यास ही मालिका आजही वाचता येते. ब्लॉग लेखन विपुल आणि वैविध्यपूर्ण म्हणजे किती, याचे गोळे हे उत्तम उदाहरण आहेत. एकंदर सात ब्लॉग गोळे यांनी चालवले आहेत. त्यापैकी ’सृजनशोध’ हा ब्लॉग म्हणजे अन्य ब्लॉगांवरील/ अनुदिन्यांतील लिखाण आणि छायाचित्रे अशा मजकुराचा आस्वाद आहे. ’शब्दपर्याय’ या आणखी एका ब्लॉगवर सुमारे अडीच ते तीन हजार प्रतिशब्द आहेत.
१४४ रोग आणि औषधोपचारांचे परिणाम किंवा रुग्णावस्थेबद्दल वापरले जाणारे ७२ शब्द, यांकरताचे मराठी प्रतिशब्द वाचनीय आहेत. रोग व परिणाम नेमका काय असतो, हे यापैकी अनेक मराठी शब्दांबद्दल विचार केल्यास नीट करू शकते. रेफ्रिजरेंट्सला ’शीतकारक’ असा सरधोपट शब्द न वापरता औषध परिमाणांच्या संदर्भात ’दाहशमन’ हा शब्द देणे किंवा डायफॉरेटिक्सला ’स्वेदन’ हा कळू शकणारा शब्दच योजणे यामुळे ही सूची उपयुक्त ठरते. अर्थात परिणामांनुसार औषधांचे वर्णन करण्यासाठी असलेले अनेक इंग्रजी शब्द, हे औषधाला कर्ता मानणारे आहेत तर गोळे यांच्या प्रतिशब्दांचा भर क्रियेचे कर्त्याविनाच वर्णन करण्यावर आहे. हा व असा तांत्रिक तपशील, खरे तर काथ्याकुट सोडल्यास, ’शब्दपर्याय’ ब्लॉगद्वारे पर्याय उपलब्ध करून देण्याचे गोळे यांचे काम वादातीत ठरेल. ’अनुवादरंजन’ हा गोळे यांचा आणखी एक ब्लॉग.
अनुवादाच्या छंदाची जोपासना इथे चालते आहे आणि मुद्दा म्हणून शिफारस करण्याजोगे यात काही नाही हे अधिक खरे आहे. याचे कारण म्हणजे अनुवादासाठी गोळे यांनी शोधलेले मूळ मजकूर, त्यांच्या वैयक्तिक आवडीनिवडीच्या परिघातले आहेत आणि अनुवाद का केला पाहिजे याचे समकालीन सामाजिक व साहित्यिक कारण शोधण्यापेक्षा आवडले आणि केले असा या अनुवादांचा कल आहे. तरीही लक्षात राहण्याजोगे काही येथेही आहे. कुसुमाग्रजांच्या कवितांचे हिंदी अनुवाद गोळे यांनी केले आहेत आणि प्रवासी या टोपण नावाने लिहिणाऱ्या प्रणव काळे यांनी केलेले संस्कृत अनुवादही सोबतच आहेत. तशा नोंदी लक्षात राहतील त्या संस्कृत अनुवादांसाठी.
ज्याचे श्रेय त्याला देणे. ’श्रेयमहात्म्य’ हाही शब्द गोळे यांचाच आहे. ज्याचे श्रेय त्याला देणारे ब्लॉगलेखनच गोळे करतात. त्यांचा हा साधनशुचितेचा आग्रह, वाचकाला अन्य कितीतरी संकेतस्थळांकडे व ब्लॉगकडे घेऊन जाऊ शकतो. पण इथे जी माहिती मिळते ती संपृप्त आहे. त्यामुळे फार इकडे तिकडे न जाता, हेच वाचावे असा उपयुक्ततावादी विचार, गोळे यांचा ब्लॉग वाचणारे वाचक अनेकदा करतील. गोळे यांचा ’ऊर्जस्वल’ हा ब्लॉग त्या दृष्टीने पाहण्यासारखा आहे. पुस्तकाऐवजी या ब्लॉगवरचे ऊर्जेचे अंतरंग भाग एक ते २१ वाचणे केव्हाही सोपे. या मालिकेत केवळ विजेबद्दलची माहिती नसून, शरीराला असलेली ऊर्जेची दैनंदिन गरज, यासारखा विषय देखील गोळे यांनी हाताळला आहे. ऊर्जा विषयक शास्त्रीय संशोधनाचे भांडार मराठीत, पर्यायी शब्दांसह खुले करण्याचा हा प्रयत्न यशस्वीच झालेला आहे. गोळे माहिती देतात ती अगदी चतुरस्त्र आणि चौकस असते. पण गोळे स्वतः काही चिंतन करतात की नाही? असा प्रश्न वाचकाला पडलाच, तर त्याचे उत्तर नेहमीपेक्षा फार निराळ्या पद्धतीने, गोळे यांच्या कार्यरततेचूनच शोधणे इष्ट ठरेल. सातत्याने काही ना काही लिहीत असणारे गोळे, जेव्हा एका विषयातून दुसऱ्या विषयाकडे जातात तेव्हा त्यामागे त्यांच्या वैयक्तिक चिंतनाचा भाग असला पाहिजे. हे सिद्ध करता येणार नाही, पण त्यांचे पुष्कळ ब्लॉग, काही महिने व वर्ष सातत्याने वाचणार्यांना, गोळे यांच्या नवनव्या विषयामागील संगती नक्कीच भेटते. गोळे कोणत्या मार्गाने इथून तिथे गेले, हे अशा वाचकांना लक्षात येते. ऊर्जेबद्दल लिहिण्याआधी गोळे यांनी स्वयंपूर्ण भूखंड या विषयावर वाहिलेला स्वयंभू हा ब्लॉग चालविला होता. त्यातील कल्पना अशक्य अजिबात नाहीत, पण व्यवहारात त्या दिसत नसल्यामुळे हे सारे विज्ञानरंजनासारखे वाटत राहते. तिथून ऊर्जेबद्दलच्या सखोल चौकसपणाकडे गोळे वळले असावेत. ’आरोग्य आणि स्वस्थता’ या ब्लॉग वरील विषय देखील स्वतःच्या हृदयविकारानंतर त्यांना आरोग्य व आजच्या जीवनशैलीबद्दल जे प्रश्न पडले त्याची उत्तरे शोधणारे आहेत.
ललित लिखाणासाठी नरेंद्र गोळे या नावाचा ब्लॉग गोळे वापरतात. पण ललित लिखाणापेक्षा संकीर्ण, म्हणजे अनेकविध विषयांवरचे, सहलीनंतरची वर्णने, थोरा मोठ्यांचा जीवनकार्य परिचय, शेतीची आजची अवस्था किंवा शहरी झाडांची निगा याबद्दल बोलू पाहणारे लेख, ही काही उदाहरणे आहेत. असे हे लिखाण आहे. काही अगदी आसपासच घडलेल्या फार साध्या पण तात्कालीक तरंग उमटवणाऱ्या घटनांबद्दलचे जे थोडे लेख इथे आहेत, ते वाचताना असे लक्षात येते की, गोळे यांची उत्तम ग्रहणशक्ती ही लेखक म्हणून त्यांचा पिंड घडवणारी आहे. त्यांच्या लिखाणातून जी वैशिष्ट्ये सहसा कुठेही दिसतात त्यांची यादी देखील याच पिंडाशी सुसंगत अशी होईल. गुणग्राहकता, आकलन, समजलेले सांगण्याची हौस आणि क्षमता ही वैशिष्ट्ये अर्थातच कुणालाही प्रामुख्याने लक्षात येतील. कविता हा फारच व्यक्तीसापेक्षा प्रकार. ब्लॉगवर तर कुणीही कशालाही कविता म्हणू शकते. मात्र अशा कवितांपेक्षा बऱ्या कविता गोळे करतात. मात्र त्यांचा एकही ब्लॉग मुद्दाम कवितांकरता लक्षात राहावा असा नाही. स्वतःबद्दल फार कमी सांगूनही पुष्कळ लिखाण करणारे, ज्ञानलक्षी मराठी लिखाणाचा ध्यास घेतलेले गोळे, मराठी ब्लॉग लेखनात साहित्यिक भर भले न घालोत, परंतु एकंदर मराठी ब्लॉग क्षेत्राला सशक्त करण्यात त्यांचा वाटा नक्कीच आहे.
- अभिनव गुप्त
उल्लेख झालेल्या ब्लॉगचा पत्ताः http://nvgole.blogspot.com
(या ब्लॉगवरूनच पुढे, गोळे यांच्या अन्य सहा ब्लॉगांच्या लिंक्स मिळतील.)
तुम्हाला वाचनीय वाटणार्या ब्लॉगची सकारण
शिफारस किंवा प्रतिक्रिया, सूचना पाठवण्यासाठी: wachawe.netake@expressindia.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा