निवृत्त प्राचार्य आणि राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. देविदास मुळे, कल्याण, यांनी लिहीलेल्या, तसेच विद्यावैभव प्रकाशन, पुणे यांनी, १५ डिसेंबर २०२२ रोजी प्रकाशित केलेल्या “गोधडी: एका प्राचार्याची कर्मकहाणी” या पुस्तकाचा हा पुस्तक परिचय आहे. पुस्तक एकूण २१२ पानांचे असून मुद्रित मूल्य रु.१५०/- आहे.
“मराठी भाषा गौरव दिनानिमित्त” मी डॉ. देविदास मुळे यांच्या मातोश्री
वेलबाई देवजी हरिया महाविद्यालय, शहाड येथे, २७-०२-२०२४ रोजी, प्रमुख पाहुणा म्हणून
गेलो असतांना योगायोगानेच डॉ. मुळे यांची माझी भेट झाली. त्यांना भेटून मी खूप
प्रभावित झालो. त्यांच्या जीवनाचे सारसर्वस्व असलेल्या त्यांच्या कर्मकहाणीचे
पुस्तक त्यांनी मला अभिप्रायार्थ भेट दिले. मीही घरी येऊन ते वाचायला घेतले. मी ते
पूर्ण वाचू शकलो, एवढे ते पकड घेणारे पुस्तक आहे. मी हे पुस्तक अथपासून इतिपर्यंत
अक्षर आणि अक्षर वाचले.
लेखक म्हणतात तशी ही गोधडीच आहे. त्यामुळे कुठे कुठे रेशमाचे तुकडे, इथे मांजरपाटालाही जोडलेले आढळतात. वयाच्या ७१-व्या वर्षीही, लेखक महाविद्यालयाचे नेतृत्व करून त्यास मान्यता (अक्रेडिटेशन) मिळवून देण्याची उमेद बाळगतात, त्याकरता असाधारण उपाय योजतात याचे मला अपरूप वाटले. सारे सामाजिक दोष लक्षात येऊनही, आपल्या सामाजिक सामर्थ्यावरील त्यांची श्रद्धा अढळ आहे, याचे मला कौतूक वाटले.
प्रा. डॉ. देविदास मुळे म्हणून मनोगत लिहिल्यानंतर, प्रस्तावनेत व पुढे लेखक स्वतःस प्रभाकर जोशी म्हणवून घेतात. वस्तुतः तसे करण्याची आवश्यकता नाही. तसेही, हे सर्व लिखाण पूर्णपणे व्यक्तिसापेक्षही नाही आणि व्यक्तिचित्रणात्मकही नाही. वास्तव परिस्थितीचे सत्यचित्रण आहे. तत्कालीन व्यक्तींच्या सामाजिक परंपराशरणेतेचे सच्चे दर्शक आहे. आजही असंख्य प्रकारच्या अनावश्यक पारंपारिक वृत्तींच्या निर्बंधांतून बांधल्या गेलेल्या आपल्या समाजाचे हे चित्रण आहे. क्वचित, त्यातून मुक्तीचे मार्ग दाखवणारे हे लिखाण आहे.
वर्तमान भारतातील स्पृश्यास्पृश्यभेद, मध्यमवर्गीय कौटुंबिक ओढगस्त, अध्ययन-अध्यापन पद्धती, शिक्षणक्षेत्र, विद्यापीठे, त्यांची स्वायत्तता इत्यादींबाबतचे, खूप विश्वासार्ह, तपशीलवार विवेचन यात लेखकाने उपलब्ध करून दिलेले आहे. मी ते अद्यतन भारतातील मुक्त समाजाचा सुजाण नागरिक या नात्याने समजून घेतले. यापुढे मी जे सामाजिक निर्णय करेन ते करतांना याचा मला अवश्य उपयोग होईल.
लेखकाची आई बालपणीच निवर्तली. त्यामुळे त्याच्यावर झालेल्या ईश्वरी अन्यायाची आपण कल्पना करू शकतो. तरीही त्याकरता कुणासही दोषी धरू नये, एवढे ते सुसंस्कारित होऊ शकले, हे आपल्या भारतीय सुसंस्कृत कुटुंबव्यवस्थेचे मोलाचे श्रेयसंचित आहे.
मराठवाड्यातल्या दूरस्थ
खेड्यातल्या भिक्षुक घराण्यात १९५३ साली लेखकाचा जन्म झाला. उत्तम अभिरुची
जोपासणे, चांगली माणसे जोडणे, नातेसंबंध सांभाळणे, वाचन व वैचारिक समृद्धता
इत्यादी चांगल्या गोष्टींना आपल्या आयुष्यात महत्त्व असावे, याकरता झटणार्या संस्कृतीत ते वाढले.
त्यांनी मोठ्या कष्टाने शिक्षण घेतले. त्या प्रयासांचे, त्यावेळच्या शिक्षण
संस्थांचे, सामाजिक मूल्यांचे, सामाजिक परिस्थितीचे विवेचन त्यांनी या पुस्तकात,
प्रसंगी पाल्हाळिक वाटावे एवढ्या तपशीलने केलेले आहे. त्यामुळे ते मुळातच
वाचण्यासारखे आहे.
पुढे त्यांचे भिक्षूक
घराणे आणि भिक्षुकी संस्कृतीवर तर एक संपूर्ण प्रकरण वेचलेले आहे. आपले गाव,
त्यातील व्यक्ती, कुटुंबातील व्यक्ती, त्यांचे परिचय, परस्परसंबंध यांचे वर्णन
करतांना १९५३ ते २०२३ दरम्यानच्या मोठ्या विस्तृत कालपटावरील सामाजिक बदल खूप
तपशीलाने नोंदवून ठेवलेले आहेत. मग तत्कालीन तालुक्याचे गाव हिंगोली, जिल्ह्याचे
गाव औरंगाबाद इत्यादी ठिकाणी घेतलेल्या शिक्षणाचे इत्थंभूत विवरण आहे. आयुष्यातील
संबंधित व्यक्तींचे फोटो आहेत. मुली, नातवंडांच्या हकिकती आहेत.
त्यानंतर अखेरच्या
व्यावसायिक कार्यकर्तृत्वाच्या विवरणांत मात्र, सद्य परिस्थितीचे खूप बारकाईने
केलेले वर्णन आणि शिक्षणक्षेत्रातल्या उणीवांची सर्वंकष चर्चा आहे. ती मात्र
निरनिराळ्या लोकांना निरनिराळ्या कारणास्तव उपयुक्त ठरू शकेल अशी आहे.
एकूण पुस्तक, एका
प्रातिनिधिक अर्वाचीन प्राचार्यांच्या जीवनाचे संपूर्ण दर्शन आपल्यापुढे उभे करते.
त्याकरताच खरे तर ते वाचनीय आहे. त्यांच्या महाविद्यालयास मान्यता मिळवून
देण्याकरता चालू असलेल्या लेखकाच्या अपराजित प्रयासांचे महत्त्व त्यातून अभिव्यक्त
होते. त्या प्रयासांना अपूर्व यश लाभो हीच सदिच्छा!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा