२०२४-०२-०७

स्वामी दयानंद सरस्वती


स्वामी दयानंद सरस्वती; आर्य समाजाचे संस्थापक, स्त्री-उद्धारक, दलितोद्धारक, वेदोद्धारक, राष्ट्रवादी, बुद्धिप्रामाण्यवादी आणि महान तत्त्वज्ञ होते.

त्यांच्या जन्मास या वर्षी २०० वर्षे होत आहेत. त्यानिमित्ताने त्यांचा हा अल्प परिचय.

त्यांचा जन्म २० सप्टेंबर १८२४ रोजी, काठेवाडमधील मोरवी राज्यातील, टंकारा या गावी झाला. मुलाचे नाव मूलशंकर उर्फ दयाराम असे ठेवण्यात आले. त्यांच्या वडिलांचे नाव करसनलालजी तिवारी होते, तर आईचे नाव होते अमृतबाई. वडील शिवभक्त होते. पिढीजात जमीनदार आणि सावकार होते. तहसीलदार होते. समाजात त्यांना बराच मान होता.

दयानंदांनी वयाच्या पाचव्या वर्षी संस्कृतच्या अभ्यासा सुरुवात केली. आठव्या वर्षी, मुंज झाल्यावर, त्यांनी वेदाध्ययनाचा प्रारंभ केला. वयाच्या १४-व्या वर्षी त्यांनी वेदाध्ययन पूर्ण केले. मुंजीनंतर त्यांनी शै पंथाची दीक्षा घेतली होती. शिवरात्रीच्या दिवशी रात्री शिवमंदिरात जागरण करीत असताना, शिवाच्या पिंडीवर उंदीर फिरताना त्यांनी पाहिला आणि देव म्हणजे मूर्ती नाही, हे त्यांना मजले. त्यांनी हा प्रश्न आपल्या वडिलांनाही विचारला, पण समाधानकारक उत्तर मिळाले नाही. धर्म आणि देव यांच्यासंबंधी विचारांना चालना मात्र मिळाली. वयाच्या अठराव्या वर्षी, त्यांची लहान बहीण व प्रेमळ चुलते यांचा मृत्यू त्यांनी पाहिला. मृत्यूच्या भीतीतून मुक्ती शी मिळेल याचाच सतत विचार करू लागले. अनेकांना त्यांनी यासंबंधी प्रश्न विचारले. मात्र योगाभ्यास केल्याशिवाय याचे उत्तर मिळणार नाही, हे स्वामी दयानंद सरस्वती यांच्या लक्षात आले. मुलाच्या मनात वेगळेच विचार चालले आहेत, हे लक्षात येताच त्यांच्या वडिलांनी त्यांचा विवाह करण्याचा निर्णय घेतला. परंतु स्वामी दयानंद सरस्वती यांना हे समजताच, १८४५ मध्ये त्यांनी सत्याच्या शोधार्थ गृहत्याग केला.

स्वामी दयानंद सरस्वती यांनी मग सायला गावी ब्रह्मचर्याची शपथ घेऊन शुद्ध चैतन्यहे नाव धारण केले. यानंतर त्यांनी सुमारे पंधरा वर्षे हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत पर्यटन केले. अनेक संन्याशांची, ज्ञानी पुरुषांची त्यांनी भेट घेतली, तसेच अनेक शास्त्रांचे सखोल ज्ञान संपादन केले आणि ते त्यांनी तपासूनही पाहिले. तांत्रिक आचार, कर्मकांड, मुर्तिपूजा, अज्ञानमूलक धर्माचरण, अंधश्रद्धा इत्यादी अनेक गोष्टींचे त्यांनी बारकाईने अवलोकन केले. धार्मिक क्षेत्रातील गैरव्यवहार आणि भोंदुगिरी पाहून त्यांचे मन उद्विग्न झाले. १८४८ साली, वयाच्या २४-व्या वर्षी, स्वामी दयानंद सरस्वती यांनी, पूर्णांनंद नावाच्या स्वामींकडून संन्यास घेतला आणि दयानंद सरस्वती हे नाव धारण केले. १८५५ साली भारतभ्रमण करत असतांना उखीमठाचे महंत होण्याबाबत विचारणा झाली होती. त्याकरता ते पात्र समजले गेले होते. मात्र त्यांनी त्यास नकार दिला.

१८६० साली मथुरेस अत्यंत चिकित्सक आणि ज्ञानी असलेल्या स्वामी विरजानंद या प्रज्ञाचक्षू (अंध असलेल्या) गुरुकडे ते पोहोचले होते. विरजानंदांजवळ स्वामी दयानंद सरस्वती हे तीन वर्षे राहिले. याच काळात विरजानंदांशी विचारविनिमय होऊन, त्यांच्या धार्मिक आणि सामाजिक सुधारणेच्या विचारांचा पाया घातला गेला. पुढील अनेकविध सुधारकार्यांची मुहूर्तमेढही रोवली गेली. दयानंदानी मग पुन्हा भारतभर परिभ्रमण केले. त्यावेळी त्यांनी मूर्तिपूजा, रुढीप्रियता, जन्मसिद्ध जातीभेद, हिंसात्मक यज्ञ इत्यादी गोष्टीवर टीका करणारी अनेक व्याख्याने दिली. दयानंद हे केवळ संहिता ग्रंथानाच वेद मानत असत, कारण त्यामध्ये जन्मसिद्ध जातिभेदास आधार नव्हता. वेदांचा आधार घेऊन त्यांनी ते विचार मांडण्यास सुरुवात केली.

त्यांनी १८६७ साली कर्णवास येथे स्त्रियांना गायत्री मंत्र उपासनेची दीक्षा देऊन सन्मान दिला. याला सनातन्यांनी विरोध केला होता. त्यांनी १८६९ साली फर्रुखाबाद, उत्तरप्रदेश येथे पहिली संस्कृत पाठशाळा स्थापन केली. काशीला राजा ईश्वरीप्रसाद नारायणसिंह यांच्या अध्यक्षतेखाली, २७ शास्त्री पंडितांबरोबर, अस्खलित संस्कृत भाषे, शास्त्रार्थ वादविवाद केला. यानंतर दयानंदानी प्रयाग, कलकत्ता, मुंबई, पुणे, इत्यादी ठिकाणी व्याख्याने देऊन, आपले नवे धर्मसुधारणेचे विचार प्रभावीपणे मांडले. त्यामुळे केशव चंद्र सेन, लोकहितवादी, न्या. रानडे यासारख्यांनी त्यांची स्तुती केली होती. १८७३ साली केशव चंद्र सेन यांनीच, त्यांना हिंदी भाषेतून आर्यसमाजाचा प्रचार करावा असे सुचवले होते. १८७५ साली मुंबई येथे आपल्या विचारांना मूर्त स्वरूप देण्यासाठी, त्यांनी १० एप्रिल रोजी आर्य समाजाची विधिवत स्थापना केली. आपल्या वैदिक धर्मविचारांचा प्रचार करण्यासाठी त्यांनी पुणे येथे (महात्मा फुलेंनी जिथे शाळा सुरू केली होती त्या) भिडे वाड्यात १५ व्याख्याने दिली. पुण्यात ते सुमारे अडीच महिने राहिले. अखेरीस स्वामींचा भव्य सत्कार करण्यात आला. मिरवणूक काढण्यात आलेली होती. त्यास महात्मा फुलेही उपस्थित होते. मग उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, बिहार, मध्यप्रदेश इत्यादी प्रांतात दौरे केले आणि हिंदी भाषेत व्याख्याने देऊन धर्मजागृती केली.

आर्य समाजाच्या प्रचारासाठी त्यांनी ग्रंथ लेखनास प्रारंभ केला. दयानंदांनी यजुर्वेद आणि ऋग्वेद यावर संस्कृतात भाष्ये लिहिलेली आहेत. पण त्यांचा सर्वात महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे सत्यार्थप्रकाश हा आहे. यात त्यांनी वेदातील ज्ञान भांडार हिंदी भाषेतून लोकांसमोर मांडले आहे. पुढे सत्यार्थप्रकाश हा आर्य समाजाचा प्रमाण ग्रंथ समजला जाऊ लागला. याशिवाय दयानंदांनी संस्कारविधि, पंचमहायज्ञविधि, गोकरुणानिधी इत्यादी ग्रंथ लिहून आपले विचार जनतेसमोर मांडले. त्यात त्यांनी शुद्ध वैदिक धर्माचे स्वरूप स्पष्ट केले, पाखंडी मतांचे खंडन केले. मूर्ती पूजेचा धिक्कार केला, स्त्रियांना आणि शूद्रांना वेद अध्ययनाचा अधिकार आहे हे सिद्ध केले, स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन दिले, जातीभेदावर टीका केली आणि ख्रिस्ती, इस्लाम, यहुदी इत्यादी धर्मातील दोष उघड करून दाखविले.

१८७७ साली स्वामीजींनी डॉ. रहीमखान यांच्या हवेलीत लाहोर येथे आर्य समाजाची स्थापना केली. तेथेच डॉ. रहीमखान यांनी आर्यसमाजात प्रवेश केला. ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, यातीलही कार्यकर्ते दयानंदाकडे आकृष्ट झाले. दयानंद यांनी आर्य समाजाचे संघटन अत्यंत चिकाटीने आणि प्रभावीपणे केले. आर्य समाजातर्फे त्यांनी वैदिक पाठशाळाही काढल्या होत्या. १८८० साली काशीमध्ये त्यांनी वैदिक साहित्य छापण्याकरता ’वैदिक मुद्रणालया’ची स्थापना केली. १८८२ साली उदयपूर येथे त्यांनी ’परोपकारिणी सभे’ची स्थापना केली आणि आपले ’अंतिम इच्छापत्र’ अंमलात आणण्याची जबाबदारी तिचेवर सुपूर्त केली. मुंबईत आर्यसमाजाचे भव्य अधिवेशन झाले.

जातीपंथभाषा इत्यादी कोणतेही भेद लक्षात न घेता कोणालाही आर्य समाजाचे सदस्य होता येत होते. आर्य समाजाच्या सदस्यांसाठी नियम तयार केले गेले होते. प्रत्येक रविवारी सर्व सदस्यांनी एकत्र येऊन वेदाध्ययन करायचे. प्रत्येकाने रोज संध्या, होम, गायत्री जप व वेदपाठ या गोष्टी अवश्य करायच्या. या गोष्टी करण्यास पुरोहिताची आवश्यकता लागत नसे. ब्रह्मचर्य, सत्य, भक्ती इत्यादी गुण प्रत्येकाने आत्मसात केले पाहिजे. सर्व सत्याचे मूळ परमेश्वर आहे. वेद हा सत्यमूलक ग्रंथ आहे. याचा विचार करूनच धर्माचरण केले पाहिजे. सर्वांच्या उन्नतीसाठी झटले पाहिजे. हे विचार लक्षात घेऊन प्रत्येक आर्यसमाज सदस्यांनी वागले पाहिजे असे दयानंदांनी म्हटले होते.

दयानंद हे स्वतः शरीराने, मनाने दणकट असे होते. अत्यंत विरुद्ध वातावरणातही आपली मते मांडण्यात ते कधीही माघार घेत नसत. काशीत जाऊन मूर्तीपूजा सिद्ध करा, नाहीतर विश्वेश्वर यांची मूर्ती फोडून टाका असे म्हणून, ते वादास उभे राहिले होते. अनेक संकटे आली तरी त्यांनी ती तेजस्वीपणे स्वीकारली आणि त्यावर मात केली होती. ख्रिस्ती, इस्लामी धर्माच्या पंडितांशी वाद घालून त्यांनी, त्यांना परास्त केले होते. परधर्मात जाऊ पाहणाऱ्या हिंदूंना, वैदिक धर्म पटवून दिला होता. परधर्मात गेलेल्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेतले होते. वैदिक धर्माला त्यांनी पुन्हा तेजस्वी बनविले होते. सहस्त्रावधी लोकांना आर्यसमाजाच्या कार्याकडे प्रवृत्त केले होते.

१८८३ साली दयानंद जोधपूरला आले. तेथील महाराज जसवंतसिंह यांची त्यांच्यावर श्रद्धा बसली आणि ते त्यांचे अनुयायी बनले होते. मात्र जसवंतसिंह अत्यंत विलासी, वेश्यागामी, मदिरासक्त आणि कर्तव्याबाबत बेफिकीर होते. स्वामी दयानंद आपल्या व्याख्यानांतून क्षत्रीय नरेशांच्या बदफैलीपणाबाबत प्रखर टीका करत असत. ती टीका न आवडून जसवंतसिंहांची रखेल नन्ही भगतन हिने कट करून, त्यांच्यावर विषप्रयोग करवला. विष प्रयोगामुळे दयानंद यांची प्रकृती बिघडली. अजमेर येथे ३० ऑक्टोबर १८८३ रोजी त्यांचे निधन झाले.

स्वामी दयानंदांचे कार्य

अलिगडचे डेप्युटी कलेक्टर राजा जय कृष्णदास हे स्वामीजींचे परमभक्त होते. ते आधुनिक विद्या विभूषित असल्यामुळे ग्रंथ लेखनाचे सामर्थ्य ते उत्तम प्रकारे जाणत होते म्हणून त्यांनी स्वामीजींना अशी विनंती केली की महाराज आपले विचार असे वाऱ्यावर उडून जाता कामा नयेत. त्यांना ग्रंथनिविष्ट करून आपण ते सर्वांपर्यंत सुलभतेने पोहोचवावेत अशी माझी विनंती आहे. त्यांची ही विनंती मान्य करून स्वामीजींनी जो ग्रंथ लिहिला तो त्यांच्या ग्रंथसंपदेतील मुकुटमणी ठरला. त्यांनी स्थापन केलेल्या आर्य समाजाचा तो मार्गदर्शक ठरून साऱ्या जगभर जाऊन पोहोचला. त्या ग्रंथाचे नाव सत्यार्थ प्रकाश. सुमारे ४०० पानांचा हा ग्रंथ आहे. याचे लेखन १२ जून १८७४ रोजी सुरू झाले. अडीच महिन्यांत तो लिहून पूर्ण झाला. याची पहिली आवृत्ती राजा जयकृष्णदास यांनी स्वखर्चाने १८७५ साली प्रकाशित करविली.

वेदांचे अपौरुषेयत्व; वैदिक धर्माचे श्रेष्ठत्व; स्त्री, पुरुष व मुले यांची कर्तव्ये; अवैदिक साहित्य व धर्मपंथ यांचे दोष व उणीवा; समताधारीत समाजाच्या निर्मितीची आवश्यकता; बालविवाह, हुंडा, जादूटोणा, बुवाबाजी वगैरे अंधविश्वास, यावरील जोरदार हल्ले; स्त्री-शिक्षण, विधवा विवाह, ज्ञानविज्ञानाचा प्रसार, देशप्रेम, राष्ट्रभक्ती, वगैरे पुरोगामी विचारांचे संयुक्तिक समर्थन; वगैरे गोष्टींचा समावेश या ग्रंथात करण्यात आलेला आहे. त्याच्या वाचनाने भारतीयांमध्ये स्वाभिमान व आत्मविश्वास जागृत व्हावा अशी दृष्टी स्वामीजींनी ठेवली आहे. त्यांनी स्थापन केलेल्या आर्य समाजाचा जगभर जो प्रसार झाला त्यावरून ’सत्यार्थप्रकाशा’चे यश सहजच लक्षात येते.

स्वामीजींनी कोणतेही विधान आधाराशिवाय केलेले नाही. सत्यार्थप्रकाशमधील विवेचनात त्यांनी शास्त्रशुद्ध व तर्कशुद्ध पद्धत वापरलेली आहे. आपल्या प्रत्येक विधानासाठी त्यांनी भरपूर व भक्कम आधार दिलेले आहेत. त्यामुळे त्यांचे म्हणणे मान्य करणे भाग पडते. त्यांच्या टीकेतून स्वकीय व स्वधर्मीय लोकही सुटलेले नाहीत, यावरून त्यांनी किती तटस्थपणे व बुद्धीप्रामाण्याच्या कसोटीवर कसून हे विवेचन केले आहे, याची कल्पना येते.

सत्यार्थप्रकाश या ग्रंथाची विभागणी १४ प्रकरणात करण्यात आलेली आहे. प्रकरण या शब्दाऐवजी समुल्लास हा शब्द त्यांनी वापरलेला आहे. प्रथम समुल्लासात परमेश्वराची नावे, ओम या शब्दाची व्याख्या, मंगलाचरण वगैरे गोष्टींचा समावेश आहे. दुसऱ्या समुल्लासात बालकांच्या शिक्षणासंबंधी आमुलाग्र विचार केलेला आहे. तिसऱ्या समुल्लासात अध्ययन व अध्यापन यांचा विस्तारपूर्वक विचार केलेला आहे. त्यामध्ये स्त्री-पुरुषांना विद्या का हवी, निघण्टू, निरुक्त, छंद, मनुस्मृती, रामायण, महाभारत, षटदर्शने, दशोपनिषद, चार वेद व चार ब्राह्मण ग्रंथ, ग्रंथप्रामाण्य, आदरणीय व त्याज्य ग्रंथ, इतिहास, पुराणे, सर्व वर्णांतील स्त्री-पुरुषांना वेदाध्ययनाचा अधिकार असणे, विद्याध्यनाचे महत्त्व वगैरे विषयांचा समावेश आहे.

चौथा समुल्लास, समावर्तन (अध्ययन पूर्ण झाल्यावर ब्रह्मचार्‍याने घरी परत येणे व त्याप्रसंगी केला जाणारा संस्कार), विवाह व गृहस्थाश्रम यांच्या विवेचनासाठी समर्पित केलेला आहे. पाचव्या समुल्लासात वानप्रस्थविधी संन्यासविधी, धर्माची दहा लक्षणे, विद्वत्व व नृपत्व यांचा उहापोह आहे. सहाव्या समुल्लासात राजधर्माचे विवेचन करण्यात आलेले आहे. त्यामध्ये अनियंत्रित राजा प्रजेला कसा घातक असतो, राष्ट्राची उन्नती व राजाचे कर्तव्य वगैरे विषयांचा समावेश आहे. सातव्या समुल्लासात वेद व ईश्वर यांची चर्चा असून, त्यामध्ये ईश्वराचे अस्तित्व, व्यापकत्व, स्तुती, सगुण व निर्गुण परमेश्वर, अवतार, जीवाची स्वतंत्रता, द्वैत-अद्वैतवाद, वेदांची उत्पत्ती व त्यांचे नित्यत्व इत्यादी विषयांचा समावेश आहे.

आठव्या समुल्लासात जगाची उत्पत्ती, स्थिती व लय यांची चर्चा आहे. नवव्या समुल्लासात विद्या-अविद्या, बंध-मोक्ष यांच्या व्याख्या चर्चिलेल्या आहेत. दहाव्या समुल्लासात आचार- अनाचार, भक्ष्य-अभक्ष्य यांची चर्चा आहे. अकराव्या समुल्लासात आर्यावर्तातील मतांचे खंडन-मंडन करण्यात आलेले आहे. बाराव्या समुल्लासात चार्वाक, बौद्ध व जैन मतांचे परीक्षण करण्यात आलेले आहे. तेराव्या समुल्लासात ख्रिस्ती पंथाचे विश्लेषण आहे. चौदाव्या समुल्लासात इस्लाम पंथाच्या गुणदोषांची चर्चा करण्यात आलेली आहे.

महर्षी दयानंदांनी स्थापन केलेल्या आर्य समाजाचे दहा सुवर्णसिद्धांत

१.           सर्व सत्यविद्या आणि जे पदार्थ विद्येने जाणले जातात त्या सर्वांचे आधी मूळ परमेश्वर आहे.

२.           ईश्वर सच्चिदानंदस्वरूप, निराकार, सर्वशक्तिमान, न्यायकारी, दयाळू, अजन्मा, अनंत, निर्विकार, अनादी, अनुपम, सर्वाधार, सर्वेश्वर, सर्वव्यापक, सर्वांतरयामी, अजर, अमर, अभय, नित्य, पवित्र आणि सृष्टीकर्ता आहे. त्याचीच उपासना करणे योग्य आहे.

३.           वेद सर्व सत्यविद्यांचे पुस्तक आहे. वेद शिकणे शिकवणे आणि ऐकणे ऐकवणे, हा सर्व आर्यांचा परमधर्म आहे.

४.           सत्याचा स्वीकार करण्यास आणि असत्याचा त्याग करण्यास सदैव तयार असले पाहिजे.

५.           सर्व कामे धर्मानुसार, अर्थात सत्य आणि असत्याचा विचार करून केली पाहिजेत.

६.           सर्वांची शारीरिक आत्मिक आणि सामाजिक उन्नती करून, अखिल विश्वावर उपकार करणे हा या समाजाचा मुख्य उद्देश आहे.

७.           सर्वांशी प्रेमपूर्वक धर्मानुसार यथायोग्य वर्तन केले पाहिजे.

८.           अविद्येचा नाश आणि विद्येची वृद्धी केली पाहिजे.

९.           प्रत्येकाने आपल्याच उन्नतीत संतुष्ट न राहता, सर्वांच्या उन्नती मध्ये आपली उन्नती समजली पाहिजे.

१०.        सर्व मानवांनी, सामाजिक सर्वहितकारी नियम पाळण्यामध्ये परतंत्र असले पाहिजे व व्यक्तिगत हिताचे नियम पाळण्यात सर्वांनी स्वतंत्र असावे.

आर्यसमाजाचे हे सिद्धांत अकस्मात वा आयत्या वेळी तयार केलेले नव्हते. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांच्या समितीने मुंबईत ते तयार केलेले होते. मुंबईतील आर्यसमाज स्थापनेच्या वेळी त्यांची संख्या २८ होती. मग लाहोर येथील आर्यसमाजाच्या स्थापनेप्रसंगी त्यांचे परिशीलन करून हे निवडक दहा सिद्धांत सुस्पष्टपणे लोकांसमोर मांडण्यात आले होते.

१८५७ च्या स्वातंत्र्य युद्धानंतर, पदोपदी आपल्या संस्कृतीस हीन लेखणार्‍या ब्रिटिश राज्यकर्त्यांना ’वैदिक धर्मा’चे श्रेष्ठत्व पटवून देणार्‍या महान नेत्यांत स्वामी दयानंदांचे नाव  अग्रभागी आहे. परवशतेने त्रस्त झालेल्या आर्यावर्तात ’वैदिक धर्मा’चे श्रेष्ठत्व त्यांनी पुनर्प्रस्थापित केले. ’आर्य समाजा’ची स्थापना केली. जनसामान्यांचा आत्मविश्वास वाढवला. भारताचे स्वातंत्र्ययुद्ध, गोवा आणि हैदराबाद मुक्तीसंग्राम यांतील आर्यसमाजाचा सहभाग हा तर एक देदिप्यमान अध्यायच आहे. पंडित गुरुदत्त विद्यार्थी, लाला लाजपत राय, स्वामी श्रद्धानंद अशा महर्षी दयानंदांच्या उत्तमोत्तम शिष्यांनी भारतीय जनजीवनास समृद्ध केलेले आहे. अशा समग्र क्रांतीचे अग्रदूत ठरलेल्या महर्षी दयानंद यांना, त्यांच्या जन्माच्या द्विशताब्दीनिमित्त सादर प्रणाम. त्यांच्या जीवित आणि कार्यांतून प्रेरणा घेऊन, नवयुवकांनी आर्यावर्तास पुन्हा पूर्ववैभव प्राप्त करवून द्यावे हीच सदिच्छा!

संदर्भः

१. समग्र क्रांतीचे अग्रदूत- महर्षी दयानंद सरस्वती, लेखक श्रीपाद जोशी, प्रकाशक हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठान, पिंपरी, मार्च २०२१, मूल्य रु.१२०/-

२.     स्वामी दयानंद सरस्वती https://inmarathi.net/swami-dayanand-saraswati-information-in-marathi/

३.      सत्यार्थप्रकाश, स्वामी दयानंद सरस्वती, मराठी अनुवाद- श्री. पं. दास विद्यार्थी, प्रकाशक दिव्ययोग मंदिर ट्रस्ट, १३ एप्रिल २०१६, मूल्य रु.१५०/-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: