लोकसभा-२०२४ निवडणुका नुकत्याच पार पडल्या. भारताची एकूण अनुमानित लोकसंख्या बुधवार २६-०६-२०२४ रोजी १,४४,१५,१७,५६५ एवढी आहे. यांकरता ५४३ लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यामुळे दर लोकसभा मतदारसंघात अनुमानित २६,५४,७२८ लोक राहत असतात. त्यामुळे लोकसभा मतदारसंघातून निवडून येणारा प्रतिनिधी सुमारे २५ लाख लोकांचे प्रतिनिधित्व करत असतो. अक्षरशः लाखांत एक असतो तो. त्या २५ लाख लोकांचे तो प्रतिनिधित्व करत असतो. नेतृत्व करत असतो. त्यांतील बहुसंख्यांनी त्याचा नेता म्हणून स्वीकार केलेला असतो. तो कसा आहे यावर आपल्या भारताचा भविष्यकाळ अवलंबून असतो म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. अशा प्रतिनिधींतही जुने जाणते लोक बरेच असतात. ते काही यापुढे फार काळ नेतृत्व देऊ शकतील अशी स्थिती नसते. जितके अधिक तरूण असतील तितकेच ते अधिक काळ देशास नेतृत्व देऊ शकतात. मात्र लोकसभेच्या प्रतिनिधित्वाकरता पात्रतेचे वयच, किमान २५ वर्षे असे आहे. त्यामुळे २५ वर्षे वयाचा जर एखादा प्रतिनिधी असेल तर त्याचेकडून आपण अधिक काळ नेतृत्वाची अपेक्षा करू शकतो.
लोकसभा-२०२४ निवडणुकांत आपण १८-व्या लोकसभेची निवड केली. आज आपल्याला त्या सर्व ५४३ लोकप्रतिनिधींची सूची[१] उपलब्ध आहे. बिहारमधील समस्तीपूर मतदार संघातून लोक जनशक्ती पक्षातर्फे १८-व्या लोकसभेत निवडून आलेल्या श्रीमती शांभवी चौधरी या, या लोकसभेतील सर्वात तरूण संसदपटू ठरल्या आहेत. त्यांचे वय केवळ २५ वर्षे आहे. काल २५-०६-२०२४ मंगळवार रोजी त्यांनी खासदारपदाची शपथ घेतली[२]. हिंदीतील संपूर्ण शपथ त्यांना मुखोद्गद होती. तोंडपाठ, अस्खलितपणे, स्पष्ट शब्दोच्चारांसह त्यांनी ती घेतली. तो प्रसंग सोबतच्या दूरचित्रणात प्रत्यक्षच पाहण्यासारखा आहे. दोन दिवस चाललेला शपथविधी समारंभ मी जवळपास संपूर्ण पाहिला. त्यांच्यासारखी तोंडपाठ शपथ इतर कुणीही घेतली नाही.
त्यामुळे २५ वर्षे वयाच्या श्रीमती शांभवी चौधरी देशातल्या सर्वात तरूण महिला खासदार झालेल्या आहेत. लोक जनशक्ती पक्षाकडून २०२४ च्या लोकसभा निवडणुकांत बिहारमधील समस्तीपूर येथून त्या निवडून आलेल्या आहेत. १ लाख ८७ हजाराहून अधिक मतांनी आपले प्रतिस्पर्धी काँग्रेसचे सन्नी हजारी यांचा पराभव केलेला आहे. निवडून आल्यावर ’संसद टीव्ही’ चॅनेलने शांभवी यांची एक मुलाखत[३] घेतली. त्यात त्यांनी आपल्या मतदारसंघाच्या भावी विकासाच्या संकल्पना चर्चिलेल्या आहेत. मुलाखत मुळातच पाहिली तर त्यातून भारतातील एका भावी समर्थ नेतृत्वाचे दर्शन घडते.
शांभवी या, बिहारचे मंत्री अशोक चौधरी यांच्या कन्या असून, पूर्व आय.पी.एस. अधिकारी आणि समाजसुधारक आचार्य किशोर कुणाल यांच्या स्नुषा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरभंगा येथील प्रचारसभेत “भारत की सबसे छोटी बेटी, यहाँ से चुनाव लड रही है, जरूर जिताना”अशा शब्दांत त्यांची शिफारस केली होती.
त्यांनी ’दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’या प्रतिष्ठित संस्थेतून सोशलॉजी विषयात एम.ए. पदवी प्राप्त केलेली आहे.
“युवा नेत्यांपाशी एक विचार असतो. नवीन विचारसरणी असते. ते नव्या पद्धतीने काम करतात. त्याशिवाय आमच्यापाशी मोदी होते. मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत अशी बहुसंख्य लोकांची इच्छा होती. आमच्यासोबत आमचे मुख्यमंत्री नितीशकुमारही होते. त्यांच्या प्रशासनावर समस्तीपूरच्या लोकांचा विश्वास आहे. समस्तीपूरमध्ये पुरेशी दळणवळणाची साधने नाहीत. ती उपलब्ध व्हावीत. इथल्या लोकांच्या आकांक्षांची पूर्तता करू शकेल एवढ्या सोयी उपलब्ध व्हायला हव्यात. इथे पावसाळ्यात पूर येतात. लोक इकडून तिकडे जाऊही शकत नाहीत. त्या अडचणी दूर व्हाव्यात. इथे मका आणि ऊस यांची शेती खूप आहे. कृषीवर आधारित उद्योग इथे निर्माण व्हायला हवे आहेत. इथल्या समाजाचा आर्थिक विकासही व्हायला हवा आहे. स्त्रियांकरता नव्या शैक्षणिक सुविधा निर्माण व्हायला हव्या आहेत. माझ्या मनात आहे की, इथे स्त्रियांकरता पॉलिटेक्निक निर्माण व्हावे. पदवी कॉलेज निर्माण व्हावे. असे सर्व विकास इथे घडवून आणण्याकरता मी कार्य करेन.”
निवडणुकीच्या राजकारणात सामाजिक माध्यमांची भूमिका किती शक्तिशाली आहे असे विचारले तेव्हा त्या म्हणाल्या की, “निवडणुकीच्या राजकारणात सामाजिक माध्यमांना फारसे महत्त्व नसते. बहुसंख्य लोक सामाजिक संगणकीय माध्यमांशी संबंधितच नसतात. थेट संपर्कच त्याकरता कामी येतो. मात्र देशभरातील लोकांना तुमची व्यक्तिरेखा समजावी, हवी त्याला हवी तेव्हा ती उपलब्ध व्हावी, याकरता सामाजिक संगणकीय माध्यमे उपयुक्त ठरतात.”
महिला म्हणून युवा म्हणून काम करतांना तुम्हाला निवडणुकीच्या प्रचारात कोणता फरक जाणवला? असा प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या की, “माझ्या मतदारसंघातली मी पहिली संसदपटू आहे. यापूर्वीच्या सांसदांनी प्रचार कसा केला असेल याचा विचार करता असे लक्षात आले की, ते घरोघर जात असत, पुरूषांना भेटत असत आणि निघून जात असत. घरातील स्त्रियांपर्यंत ते पोहोचूच शकत नसत. पोहोचत नसत. मी जेव्हा प्रचाराकरता जाई, तेव्हा लोक मला आपल्या घरातील स्त्रियांशी, मुलींशी ओळख करून देत. मला त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळे. त्यांच्या अडीअडचणी समजून घेता येत. त्यांच्या आशाआकांक्षा माहीत करून घेता येत. या माहितीचा मला भविष्यात खूप उपयोग होईल. त्यांच्या आशाआकांक्षा पूर्ण व्हाव्यात याकरता मी प्रयत्न करू शकेन.”
देशासमोरच्या मुख्य समस्यांवर बोलण्याची संधी मिळेल तेव्हा कदाचित त्या, त्यावरील त्यांची मतेही सांगतील. मात्र ज्यांचे आपण प्रतिनिधित्व करतो, त्यांच्या आशाआकांक्षांचे प्रतिबिंब आपल्या प्रयासांत पडायला हवे, ही त्यांची भूमिका मला कौतुकास्पद वाटली. यथार्थ वाटली. या निवडणुकीतील त्यांच्या यशासारखेच, त्यांचे संसदेतील कार्यही देदिप्यमान होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
मात्र जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या,
सर्वात बहुचर्चित निवडणुकांच्या जगडव्याळ शोधातून, जी रत्ने आपल्या हाती आलेली
आहेत, त्यांची किमान जुजबी ओळख आपण करून घ्यायला हवी, असे यावेळी मला प्राकर्षाने
वाटले. शिवाय महाजालावर सत्वर माहितीचा साठाही हल्ली उपलब्ध असतोच. त्याचा उपयोग
करून, भारतातील सर्वात तरूण नवनिर्वाचित संसदपटूची ओळख प्रस्थापित करण्याचा, मी हा
प्रयास केलेला आहे. मला आशा आहे की, हा अल्पपरिचय तुम्हालाही सुरस वाटेल.
[१] १८-व्या
लोकसभेतील नवनिर्वाचित
खासदारांची सूची https://sansad.in/ls/members
[२] १८-व्या लोकसभेत शपथ
घेतांना शांभवी https://www.youtube.com/shorts/23nI_OfLQwE
[३] ’संसद
टीव्ही’ चॅनेलने घेतलेली शांभवी यांची मुलाखत https://sansadtv.nic.in/episode/newly-elected-mp-of-18th-lok-sabha-shambhavi-chowdhry-talks-to-sansad-tv-13-june-2024
1 टिप्पणी:
शांभवी या, बिहारचे मंत्री अशोक चौधरी यांच्या कन्या---only reason to be youngest politician.
टिप्पणी पोस्ट करा