व्रतात शक्ती असते! ती अपार असते. ती दुर्बळ, असहाय्य लोकांनाही,
कमालीची उपयुक्त ठरते. ह्या गोष्टी, मला पुराणातील वानगी वाटत असत. कसलं व्रत आणि काय
ती त्याची शक्ती! अशा पूर्णतः नास्तिक भावनेने मी संपूर्णतः पछाडलेलो होतो. मग आज
असा अचानकच काय फरक पडला? आज मला साक्षात्कार झाला. ती शक्ती प्रत्यक्षात दिसून आली. प्रत्येक माणसास,
ती प्रत्यही उजागर करता येते, हे उमजून आले. कालांतरापासूनचा माझा भ्रम निरस्त झाला.
ह्यापूर्वी, मनुष्य अन्नावाचून अमूक एक काळपर्यंत जिवंत राहू शकतो, पाण्यावाचून तमूक काळपर्यंत जिवंत राहू शकतो, हवेवाचूनही काही काळ गुदमरत राहू शकतो, आणि मुंडीविहीन धडाने दोन्हीही हातात पट्टे घेऊन शत्रुचे शिरकाणही करू शकतो (आठवा बाजीप्रभू देशपांडेंची अमर सत्यकथा!) एवढीच काय ती माहिती, मनावर कोरली गेलेली होती. प्रत्यक्षात कुणी असा जगतांना पाहण्याचे भाग्य मला लाभलेले नव्हते. अलीकडेच अण्णा हजारेंनी उपोषण[१] केले तेव्हा, अन्नाविना अण्णा तेरा दिवस खुशाल जगले होते. एवढेच नव्हे तर, तेराव्या दिवशी त्यांनी उपोषण सोडले, तेव्हा आता ते आडव्या हाताने जेवण हापसतील, असे वाटलेला मी, त्यांनी उद्या जेवणार असल्याचे जाहीर केल्यावर विस्मयचकीत झालो होतो. त्यावर ताण म्हणजे, तेरा दिवसांचे उपोषण केलेला माणूस उभा राहून, इतरांनाच धन्यवाद देणारे मोठे प्रोत्साहनपर भाषण, ताठ मानेने करता झाला तेव्हा, मला मानवी शक्तीच्या जागराचा अनोखा आविष्कार अनुभवायला मिळालेला होता.
मात्र, मी सर्वांना सांगून माझे आश्चर्य जाहीर करायचाच अवकाश होता, मला लोक अशा अशा अद्भूत कहाण्या सांगू लागले की, मी त्यांच्या कथानायकांप्रतीच्या आदराने अधिकाधिक विनम्र होत गेलो. इंटरनेटवर मला संत फतेहसिंग ह्यांच्या[२] २१ दिवसांच्या आमरण उपोषणाची माहितीही मिळाली. म्हणजे अन्नाविना मनुष्य निदान २१ दिवस जिवंत राहत असल्याचा पुरावाच मिळालेला होता. एकाने तर मला, आश्चर्यकारक अशा एका व्रताची गोष्ट सांगितली. छठ पूजेच्या वेळेस बिहारी स्त्रिया म्हणे, अनेक दिवसपर्यंत कठोर उपोषण अंमलात आणूनही, घरातील सर्वांना, पै-पाहुण्यांना पंच-पक्वांन्नांचे जेवण करून वाढतात. रमझान महिन्यांत उपवास करणारे अनेक मुसलमान मलाही माहीत होते, मात्र ते सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत, इफ्तार पार्ट्यांत खाद्यपदार्थांची रेलचेल उडवून देत असल्याने त्यांचे विशेष अपरूप मला वाटे ना.
गणेश चतुर्थी, ऋषीपंचमी, महालक्ष्म्यांच्या दिवसांत अनेक स्त्रिया परंपरेने उपास करत आलेल्या आहेत. माझ्या लहानपणापासूनच, आमच्या घरी मात्र अशा व्रतांकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नव्हते. म्हणून मला त्यातल्या “व्रत” संकल्पनेची फारशी सखोल माहिती नव्हती. व्रताबाबत मला फारसे कौतुकही नव्हते. लहानपणी कहाणीसंग्रहातील व्रतांच्या कथा मात्र मी पूर्ण तपशीलाने आणि अत्यंत उत्सुकतेने वाचलेल्या मला आठवतात. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही अशी शपथ घेऊन लोक जे व्रत पत्करत असत, ते ईप्सित आराध्य दैवत प्रसन्न होऊन समोर प्रकट होईपर्यंत अत्यंत कर्मठपणे पाळत असत. असेच त्यात ठसवलेले असे. माझ्या पुर्या बालवयात, मी मात्र कुणा दैवतास साक्षात प्रकटतांना पाहिलेले नसल्याने, कहाणीसंग्रहातील कथा मला भाकड वाटू लागल्या ह्यात नवल ते काय?
पुढे मी कामाला लागलो. नियमितपणे चहा, नास्ता, जेवण, पुन्हा चहा, पुन्हा नास्ता, रात्रीचे जेवण असा भरगच्च खानपान कार्यक्रमच माझी दिनचर्या झाला. माझीच काय माझ्या आजूबाजूच्या सगळ्यांची, थोड्या-अधिक प्रमाणात हीच कहाणी असे. एकदा आम्ही सगळे असेच चहा-नास्त्याला गेलो, तेव्हा सोबतचे एक सहकारी नास्ता घेतांना दिसले नाहीत. मी त्यांना विचारले का हो? आज उपवास का? ते हो म्हणाले. त्यांनी केवळ चहाच घेतला. मग समजले की ते दरच गुरूवारी उपवास करत असत. त्या दिवसांत आम्ही जवळजवळ दिवसभरच प्रचलित प्रकल्पाच्या संदर्भात एकत्र काम करत असायचो. मात्र, कुठल्याही गुरूवारी त्यांचा चेहरा दुर्मुखलेला, थकलेला, किमान कोमेजलेलाही दिसत नसे. मला आश्चर्य वाटायचे. त्या काळात क्वचित एखादा नास्ता चुकला, अगदी जेवायला उशीर झाला तरीही, मला मरगळ जाणवत असायची. मग हे उपवास करूनही कसे काय राहू शकतात. म्हणून एक-दोनदा मीही एखादे जेवण वगळून टाकायचे प्रयत्न केले. पण मला हे कबूल करावेच लागेल की, त्या वेळी मला कमालीचा थकवा जाणवत असे. त्यामुळे मग मी ते प्रयत्न सोडून दिले.
गेल्या वर्षी नवरात्र सुरू झाले. तेव्हा आमच्या घरी मोलकरणीचे काम करणार्या बाई, चपला न घालताच कामाला आलेल्या मी बघितल्या. थोडी आणखी चौकशी केली तेव्हा समजले की, त्या नवरात्रीचे नऊही दिवस उपवास करतात. गेली जवळपास दहा वर्षे त्या आमच्याकडे काम करत आहेत. मात्र, त्या सर्व काळात मला हे कधी समजलेही नव्हते. म्हणजे त्या उपवास करतच होत्या. सणासुदीला सगळ्यांकडे जास्तीची कामेही त्यांच्याकडून करवून घेत असतच. तरीही ह्या बाई, बापाविना पोरक्या असलेल्या आपल्या चारही मुलांचे स्वयंपाकपाणी करून, इतर दहा घरची नेहमीची कामे, तसेच सणासुदीला वाढलेली कामे करून, उपवासही करत होत्या. चपलाही घालत नव्हत्या. व्रताच्या नियमांनुसार आणखी न जाणे काय काय करत होत्या! मनातल्या मनात मी व्रतस्थ शक्तीपुढे नतमस्तक झालो.
यंदाच्या नवरात्रींच्या दिवसांत तर, रस्त्यांवर फिरतांना मी काळजीपूर्वक पाहत असे. मला अनेक लोक अनवाणी चालतांना दिसून येत होते. डोंबिवलीत तसेही अनेक जैन लोक मंदिरात जातांना अनवाणी चालत असलेले मी रोजच पाहतो. मात्र हे आताचे अनवाणी चालणे निराळे होते. एवढी वर्षे हे सगळे लोक नवरात्रींच्या दिवसांत असेच अनवाणी चालत असणार. पण मलाच तेव्हा जगाकडे पाहण्याची सुयोग्य दृष्टी नव्हती. असे आता जाणवत आहे. अशाच व्रतस्थ लोकांच्या निर्धारांवर, सामाजिक शक्तीचे स्त्रोत विसंबून असतात. ऋषीमुनींना सुटेना असा भुकेचा उखाणा त्यांनी यशस्वीरीत्या सोडविलेला आहे. आपणही अशाप्रकारच्या निर्धाराचे, निश्चयाचे असे बळ अंगी बाणवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशी प्रेरणा आज माझ्यात निर्माण झालेली आहे.
अमेरिकेत गेलेले भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र
मोदी, मॅडिसन-स्क्वेअर-गार्डन प्रेक्षागृहात, अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीयांना
संबोधित करत होते. भाषण जोशपूर्ण झाले. तिथल्या लोकांच्या प्रश्नांना उत्तरे
देणारे काही निर्णयही, त्यांनी तिथे जाहीर केले. सगळे प्रेक्षक खूश होते. अखेरीस
भाषण संपता संपता त्यांनी सगळ्या प्रेक्षकांकडून “भारत माता की जय” अशी घोषणा करवून
घेतली. त्यावर ते म्हणाले की, आणखी जरा जोरात म्हणा, “भारत माता की जय”. कारण माझे जरी
उपवास सुरू असले, तरी तुमचे नाहीत. मग पुन्हा त्रिवार घोषणा झाल्या, “भारत माता की जय”. अतिशय जोशात. मला
मग समजले की, आपले पंतप्रधान गेल्या पस्तीस वर्षांपासून, दरच वर्षी नवरात्रांत
उपवास करत आहेत. मी आश्चर्यात बुडून गेलो.
उपवासाच्या आदल्या दिवशी भरपेट खाऊन घेणारे लोक मी पाहिले आहेत. उपवासाच्या दिवसांत घरच्यांकरवी आपली जास्तीची बडदास्त ठेवून घेणारे लोक मी पाहिले आहेत. उपवासाच्या दिवसांत उपवासाचे पदार्थ, ह्या नावाखाली उत्तमोत्तम पदार्थांची चंगळ करून घेणारे लोकही, मी पाहिलेले आहेत. ’उपाशी आणि दुप्पट खाशी’, ही म्हणही अशा लोकांच्या चिरंतन अस्तित्वाचे ऐतिहासिक पुरावेच सादर करत नाही काय?
मात्र उपाशी असतांना आपला नियमित कार्यक्रम कुठल्याही तक्रारीविना पार पाडणारे, देशाकरता स्वतःहून अंगावर घेतलेल्या लक्षावधी अपेक्षांच्या जबाबदार्या विना-तक्रार सांभाळणारे, आणि उपवास काळात लिंबू सरबतही नाकारणारे, आपले पंतप्रधान अभूतपूर्व आहेत. एकमेवाद्वितीय आहेत. दृढनिश्चयी आहेत. देशभक्तीची ज्योत अंतरात तेवती राखून, तिच्या प्रकाशात, देशाच्या उजळलेल्या भवितव्याप्रती असणारी आस्था, त्यांनी जपून ठेवली आहे. हे बंधन त्यांनी स्वतःच स्वतःस घालून घेतलेले बंधन आहे. स्वयं स्वीकृतं नः सुगं कारयेत् । क्रांतिकारक कवी विनायक दामोदर सावरकर “माझे मृत्यूपत्र” ह्या आपल्या अजरामर काव्याचा समारोप करत असतांना असे म्हणतात कीः
की घेतले व्रत न हे, अम्हि अंधतेने । लब्धप्रकाश
इतिहास निसर्गमाने ॥
जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे । बुद्ध्याच
वाण धरिले करि हे सतीचे ॥
म्हणजे, आम्ही (राष्ट्रसेवेचे) हे व्रत काही आंधळेपणाने पत्करलेले नाही. प्रसिद्धीच्या लोभाने, किंवा सहजच स्वीकारलेले नाही. आम्हाला ते दिव्य आहे, अद्भूत आहे हे माहीत आहे. तरीही आम्ही हे अवघड कर्तव्य (सतीचे वाण) जाणीवपूर्वक हाती घेतले आहे.
त्याप्रमाणेच, नरेंद्र मोदींनी घेतलेले राष्ट्रसेवेचे व्रत हे डोळसपणे, समजून, उमजून, जाणीवपूर्वक पत्करलेले व्रत आहे. त्यांचे नवरात्रींच्या उपवासाचे व्रत ते ज्या कर्मठपणे पाळत आहेत, तसेच कर्मठपणे ते राष्ट्रसेवेचे व्रतही पाळत आहेत.
अशी व्रते, अशी बंधने, हे रेशमाचे बंध असतात. मानले तर आहेत. न मानले तर नाहीत. विख्यात कवियित्री शांता शेळके म्हणतातः
हे बंध रेशमाचे, ठेवी जपून जीवा ।
धागा अतूट हाच, प्राणांत गुंतवावा ॥
बळ हेच दुर्बळांना, देती पराक्रमांचे । तुटतील ना कधीही, हे बंध रेशमाचे ॥
गरीब, दुबळ्या, वंचितांना, जेव्हा उपजीविकेची साधने उपलब्ध नसतील; तेव्हाही त्यांना आपल्या पंतप्रधानांच्या व्रताची हकिकत समजल्यावर, आणि त्यांच्या कर्मठतेने केलेल्या व्रताचरणाची माहिती समजल्यावर; प्राप्त परिस्थितीशी झुंजण्याकरता त्यांच्यात हजार हत्तींचे बळ निर्माण होईल. नरेंद्र मोदींच्याच म्हणण्याप्रमाणे, जर सव्वाशे कोटी भारतीयांनी, राष्ट्रसेवेच्या अशाच शक्तीशाली व्रताचा स्वीकार केला तर, अशक्यप्राय उद्दिष्टेही आपण सहजच गाठू शकू. निदान मला तरी आता अशा व्रतस्थ शक्तीची ओळख पटली आहे. स्वतःमध्ये ती उजागर करण्याचा मी भरकस प्रयत्न करेन. मान्यवर, आपण काय म्हणता?
पूर्वप्रसिद्धीः व्रतस्थ शक्ती, ठाण्यातील विद्याप्रसारक
मंडळाच्या ’दिशा’ मासिकाचा २०१४ सालच्या डिसेंबरचा अंक.
[१] १५ ऑगस्ट २०११ ते २८ ऑगस्ट २०११ असे सलग १३ दिवस
अण्णा हजारे ह्यांनी लोकपाल विधेयक संसदेत मंजूर व्हावे म्हणून उपोषण केलेले होते. http://www.annahazare.org/
[२] १८ डिसेंबर १९६० ते ९ जानेवारी १९६१ असे सलग २१
दिवस संत फतेहसिंग ह्यांनी पंजाबी भाषक राज्याच्या निर्मितीकरता उपोषण केले होते. http://en.wikipedia.org/wiki/Fateh_Singh_(Sikh_leader)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा