२०२२-१२-११

रैवतक पर्वताची पदयात्रा

गिरिनारायण किंवा गिरनार पर्वतास रैवतक पर्वत असेही म्हणतात. पर्वतावर पाच निरनिराळ्या शिखरांवर, पाच महत्त्वाची तीर्थस्थाने वसलेली आहेत. पर्वताच्या पायथ्यास ’गिरनार तलेटी’ म्हणतात. इथे ’दामोदर कुंड’ आहे. हे ’अस्थी-विलयकारी’ कुंड मानले जाते. इथून सर्वात वरच्या दत्तात्रेय शिखरापर्यंत १०,००० चिरेबंद पायर्‍यांचा सुघटित सोपान आहे. येथील एकूण यात्रेकरूंपैकी केवळ १५% यात्रेकरूच वरपर्यंत जात असतात [१].पाच शिखरांच्या (टुंक, महत्त्वाचे तीर्थक्षेत्र) आसपासच्या परिसरात विखुरलेल्या ८६६ हिंदू व जैन मंदिरांमुळे रैवतक (गिरनार) पर्वत हा शतकानुशतके पश्चिम भारतातील यात्रेकरूंचे महत्त्वाचे तीर्थस्थान राहिलेला आहे. गुजराथमधील तो सर्वोच्च उंचीचा पर्वत आहे. पर्वताचा गिरनार तलेटीहा तळ, जुनागढ शहराच्या केंद्रभागापासून सुमारे ४ किलोमीटर पूर्वेस आहे. यात्रेच्या उद्देशाने पर्वतारोहणास पहाटेसच सुरूवात करणे चांगले समजतात. यात्रेचे प्रत्येक पाऊल संपूर्ण तीर्थाटनाचा उद्देश कायम ठेवूनच उचलले जाते. 

सोनरेखा नदीकिनारी वसलेल्या राधा-दामोदर आणि बलदेव-रेवती कुंडांपासून दगडी सोपानाची सुरूवात होते. इसवीसनाच्या १५ व्या शतकात इथेच संत नरसी मेहता स्नान करत असत. त्यांनी त्यांच्या प्रभातीयरचना इथेच तयार केल्या होत्या. पाच शिखरांपासून जाणारा हा सोपान मग तुम्हाला हिंदू धर्माच्या अनेक पंथांच्या मंदिरांप्रत घेऊन जातो. सुरूवातीच्या भवनाथ मंदिरातशिवरात्र साजरी करण्यासाठी नागा साधूयेत असतात. ४,००० पायर्‍यांवरील विस्तीर्ण पठारावर जैन मंदिरांचे पहिले शिखर आहे. ही मंदिरे इसवीसनाच्या १२ ते १६ शतकांदरम्यान निर्मिली गेली होती. ७०० वर्षे तपश्चर्या केल्यानंतर, जैनांचे २२ वे तीर्थंकर नेमिनाथइथेच निवर्तले होते. पुढे आणखी ८०० पायर्‍यांनंतर असलेल्या अंबाजी मंदिरात हिंदू, जैन आणि नवपरिणत वधू-वर सुखी जीवनाचा आशीर्वाद घेण्याकरता येत असतात. नंतरच्या पायर्‍या दमछाक करणार्‍या आहेत. मात्र शिखरांवरून दिसणार्‍या विहंगम प्रेक्षणीय दृश्यांकरता त्याही सुसह्य भासतात. शिखरांच्या उंचीवरील जोराचे थंडगार वारे परिश्रमही हलके करत असतात. गोरक्षनाथ शिखरापासून दगडी सोपान १,००० पायर्‍या उतरत जुळ्या कमानीपर्यंत जातो. त्यानंतर उतार चढावाच्या ३,००० पायर्‍या आपल्याला दत्तपादुकाशिखराप्रत घेऊन जातात. सोबतच खाली उतरणारा एक जिना २१० पायर्‍या उतरून कमंडलकुंडाप्रत घेऊन जातो. रेणुकाशिखर, अनसूया शिखर आणि कालिकाशिखरापर्यंतही वाटा आहेत. कालिकाशिखरावर अघोरपंथी चिताभस्माचे लेपन करून घेत असतात.

सोबत पुरेसे पाणी घेऊन पहाटेसच पदयात्रा सुरू करणे हा पर्याय तर आहेच. शिवाय पुरा मेहनताना घेऊन या शिखरांवर घेऊन जाणारे डोलीवालेही उपलब्ध आहेत. आपापल्या देवांचा आशीर्वाद घेऊ पाहणारे वृद्ध, अपंग लोक त्यांचीच मदत घेतात.

डोलीवाल्यांचे दरपत्रक
एकीकडे, भारतभरच्या पदभ्रमरांना आणि गिर्यारोहकांनाही हे स्थान त्यामुळेच सदोदित आकर्षित करत राहिले. तर दुसरीकडे, धड चालताही येत नाही, अशा वृद्धांना आणि अपंगांनाही तेथवर जाण्याचे कायमच अपार आकर्षण राहिले. आयुष्यभर स्वकष्टाने अर्जिलेले धन त्यावर खर्च करण्यास ते तयार असतात. त्यामुळे ’डोली’च्या संकल्पनेचाही सर्वाधिक विकास येथेच झाला. १०,००० पायर्‍यांच्या सोपानावर डोलीने वरपर्यंत नेऊन सुखरूप परत आणू शकतील अशा सशक्त, समर्थ भोई लोकांची परंपराच येथे निर्माण झाली. हा व्यवसाय इथल्याएवढा विकसित झालेला क्वचितच आढळून येईल. त्यांची साधने म्हणजे डोलीचा नवारीने विणलेला २ x २ फुटांचा पाट, दोर्‍या व त्यांच्या गाठी, आधाराचा वरचा बांबू/ वासा/ खांब, हाती धरावयाच्या आणि विश्रामांदरम्यान मूळ डोलखांबास आधार म्हणून जमिनीवर रोवल्या जाणार्‍या काठ्या यांच्या रंगरूपाचाही अपरिमित विकास झाला. ती सारीच साधने सुटसुटित, सशक्त आणि वापरास सोपी झाली. सशक्त आणि डोलीवाहनकुशल युवकांना या व्यवसायात कायमच सहज उपजीविका लाभत आली. त्यामुळे समर्थ, कुशल डोलीवाहकांची फौज येथे कायमच तैनात राहिली. उपलब्ध राहिली. पूर्वघोषित, सुनिश्चित आणि वाजवी दरांमुळे डोलीने जाणारे आश्वस्त झाले. सशक्त आणि समर्थ भोई सतत उपलब्ध राहत असल्याने डोलीचा प्रवास, कल्पनाही करता येणार नाही एवढा स्वस्त, सुरक्षित आणि शाश्वत झाला. तलेटीशी डोलीवाल्यांच्या वाहून नेण्याच्या वजनावारी दिलेल्या दरपत्रकाचा फलकही आहे. डोली कुठून कुठवर घेतली यानेही दर बदलतात. मात्र यातील पारदर्शिता वाखाणण्यासारखीच आहे.

अंतरा अंतरांवर भोई लोक विश्रांतीकरता थांबतात. त्यावेळी डोलीचा भार काठ्यांवर लादून काठ्यांना सरळ राखण्यापुरताच आधार ते देत असतात. त्यामुळे विश्रांतीकाळात त्यांना डोलीचा भार सोसावा लागत नाही. तो काठ्याद्वारे जमिनीवर टाकला जातो. विश्रांती झाल्यावर भोई डोलखांब उचलून खांद्यांवर घेतात, काठी हाती धरतात आणि मार्ग आक्रमू लागतात. मात्र आता रज्जूमार्ग झाल्याने परिस्थिती आमूलाग्र बदललेली आहे.

रज्जूमार्ग

रज्जूमार्गाचे खालचे स्थानक ’उडनखटोला’, सुदर्शन तलावापाशी, भवनाथ तलेटी, जुनागढ येथे आहे. या रज्जूमार्गाची लांबी भारतात सर्वात जास्त म्हणजे २,१२६.४ मीटर इतकी आहे. तो तळापासून ९०० मीटर उंचीवरील अंबामाता मंदिरापर्यंत पोहोचवत असतो. मार्गावर अद्ययावत असे ८ माणसे क्षमतेचे एकूण २५ रज्जूकक्ष वर-खाली अशी प्रवाशांची ने-आण करत असतात. दररोज ते एकूण ८,००० माणसांची ने-आण करतात. रज्जूमार्ग वर्षभर सतत सकाळी ७:०० वाजल्यापासून तर संध्याकाळी ६:०० वाजेपर्यंत सुरू असतो. जुलैमध्ये त्यास वार्षिक दुरुस्तीकरता काही दिवस कार्यविराम दिला जात असतो. तळापासून वरपर्यंत जायला ७.४३ मिनिटे लागतात. तळापासूनच्या एकूण १०,००० पायर्‍यांपैकी ५,००० पायर्‍यांपर्यंत म्हणजे अंबामाता मंदिरापर्यंत तो आपल्याला घेऊन जात असतो. तिकीट रु.७००/- आहे. सवलतीच्या तिकिटाचा दर रु.४००/- आहे. १९८३ साली प्रस्तावित झालेल्या या रज्जूमार्गाचे, २४ ऑक्टोंबर २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते उद्घाटन झाले.

सोपानाची निर्मिती

जुनागढ राज्याचे दिवाण राय बहादूर हरिदास विहारीदास देसाई (१८४०-१८९५) यांच्या नेतृत्वाखालील समितीने ’गिरनार लॉटरी’ काढली आणि त्यातून मिळालेल्या उत्पन्नातून गिरनार तलेटीपासून दत्तपादुकाशिखरापर्यंत १०,००० पायर्‍यांचा सोपान तयार केलेला आहे. १८८३ साली ते दिवाण झाले होते. सोपानाच्या सुरूवातीस चढावाव हनुमानाचे मंदिर लागते. इथूनच त्यास वंदन करून चढाईस सुरूवात केली जाते. इथून पुढील उल्लेखनीय स्थाने, त्यांची मीटरमधील उंची आणि तेथवर चढाव्या / उतराव्या लागणार्‍या अनुमानित पायर्‍या पुढील कोष्टकात दिलेल्या आहेत [२].

 

अक्र

टुंक

तीर्थस्थान

उंची मीटर

उंची फूट

पायर्‍या

 

भवनाथ तलेटी

-

-

 

रज्जूमार्ग पायथा

१६८

५५१

-

 

सेसावन

-

-

३,१००

नेमिनाथ मंदिर

९४५

३,१००

३,८००

जटाशंकर मंदिर

-

-

४,१००

 

रज्जूमार्ग माथा

१,०६६

३,४९८

-

अंबा माता मंदिर

१,०८०

३,५३०

४,८४०

गोरक्षनाथ मंदिर

१,११७

३,६६६

५,२८०

 

जुळी कमान

-

-

६,१३०

दत्तपादुका मंदिर

१,००४

३,२९५

९,९९९

१०

 

कमंडल कुंड

९५४

३,१३१

६,३४०

गिरनार सोपानाची महती त्यावरील एका संकेतस्थळावर पुढीलप्रमाणे वर्णिली आहे [३]. एवढा प्रचंड आणि लांबलचक दगडी सोपान जगात दुसरा नाही. सबंध गुजराथ राज्यातील सर्वोच्च शिखर असलेल्या, समुद्रसपाटीपासुन १,११७ मीटर (३,६६६ फूट) उंच असलेल्या, गोरक्षनाथ शिखराप्रत नेणार्‍या या सोपानावर पाच शिखरे (टुंक, महत्त्वाची तीर्थक्षेत्रे) वसलेली आहेत असे मानले जाते. नेमिनाथ मंदिर, जटाशंकर मंदिर, अंबाजी मंदिर, गोरक्षनाथ मंदिर आणि दत्तपादुका मंदिर ही ती तीर्थस्थाने आहेत. इसवीसनाच्या तेराव्या शतकापासुन जैन मंदिरांची निर्मिती आणि त्यांच्याप्रतचे आवागमन इथे सुरू आहे. यथावकाश तीर्थांची संख्या, पसारा आणि सोपानाची सर्वव्यापकता वाढतच गेली. दत्तात्रेयांनी दत्तपादुकाशिखरावर १२,००० वर्षे तपश्चर्या केली, अजूनही ते तेथे तप करत असतात, योगशास्त्राचा विकास आणि अभ्यास यातून घडत गेला, नवनाथांपैकी गोरक्षनाथांचा येथे निवास राहिला, इत्यादी धारणांमुळे योगाभ्यासाची परंपराच येथे निर्माण झाली. नितांत सुंदर, भव्य, दिव्य जैन मंदिरांची निर्मिती येथे सर्वकाळ होतच राहिली. त्यांना भेट देणार्‍यांची संख्याही वर्धमान राहिली. त्यामुळे कलाकारी, पर्यटन, अनुषंगिक व्यवसाय आणि राजाश्रय यांचेही हे जणुकाही माहेरघरच झाले. या सार्‍यांचे पर्यवसान होऊन परिसरातील सर्वोच्च शिखराप्रत सर्वसामान्य माणसालाही सहज चालत जाता यावे, उंचच उंच सुळक्यांच्या निसर्गवैभवाचा आस्वाद घेता यावा, याकरता जगातील एकमेवाद्वितीय, सर्वात प्रदीर्घ अशा या पत्थरी सोपानाची निर्मिती झाली. सोपानावरील पुढील प्रकारच्या फलकांतून त्याची माहितीही दिली गेलेली आहे.


 

हा फोटो श्री. अमोघ डोंगरे यांनी भवनाथ तलेटीपासून चढाई सुरू केल्यावर, ४ डिसेंबर २०२२ रोजी पहाटे ०१:०७ वाजताचे सुमारास कुठेतरी काढलेला आहे. हे स्थान नेमिनाथ मंदिराच्या ९०० पायर्‍या खालच्या बाजूला आहे अशी माहितीही यावरूनच कळते. यावरून हे स्थान जैनांचे ’सेसावन’ तीर्थक्षेत्र असावे असे अनुमान करता येते.

धार्मिक, पर्यटनाचे दृष्टीने, पदभ्रमणाचे दृष्टीने आणि विविध कला, उद्यमांचे माहेरघर म्हणून लोक रैवतकाची वाट धरत असतांना, मी मात्र जगभरातील महदाश्चर्य असलेल्या पत्थरी सोपानाच्या अनिवार आकर्षणाने तिथे जाण्याचे ईप्सित धरून होतो. चरन्‌ वै मधु विन्दन्ति या फुलपाखरी वृत्तीने मला पुन्हा एकदा पर्वत कड्यांच्या निसर्गवैभवाकडे ओढून आणले होते. या वेळेला ईप्सित रैवतक पर्वतशिखराचे होते. यावर्षी संधी मिळताच मी, पहिल्या ५,००० पायर्‍यांसाठी रज्जूमार्गाचा वापर करून, या सोपानाच्या वरच्या ५,००० पायर्‍या चढण्याचे आणि उतरण्याचे उद्दिष्ट माझ्याकरता ठेवले होते. ३ डिसेंबर २०२२ रोजी ते साध्य झाले. २७ जणांच्या मोठ्या गटाचा मी हिस्सा होतो. सारेच्या सारे जण यशस्विरीत्या आपापल्या मार्गांनी गिरनारचे गुरूशिखर सर करून आले! ज्या १३ जणांनी रज्जूमार्गाने जाऊन येऊन ५,००० पायर्‍या चढल्या-उतरल्या त्यांत मी एक होतो. अंबाजीपासून सुमारे ०९३० वाजता चढाईस सुरूवात केल्यावर, दत्तपादुकाशिखर आम्ही सुमारे दीड तासांतच गाठले होते. मग जुळ्या कमानीपासून खाली उतरून कमंडलकुंडावर प्रसाद घेऊन १२३० चे सुमारास रज्जुमार्गाच्या पायथ्याशीही पोहोचलो होतो. शिखरांवरील शीतल प्रसन्न वारे, दूरवरचा प्रदेश नजरेत आणणारी उंची आणि आकर्षक सोपानाची सोबत अनुभवत माझी रैवतकाची पदयात्रा सफल संपूर्ण झाली.  


उडनखटोल्यातून भवनाथ तलेटीचे दर्शन असे घडते. नेमिनाथ मंदिरसमूहाचे नयनमनोहर दृश्य दिसते.मग गोरखशिखर, दत्तशिखर आणि रेणुकाशिखराचे विहंगम दृश्य पुढे येते. दुसरा फोटो, पुढे दत्तशिखराच्या दिशेने गोरखशिखर उतरतांना पूर्वेला तोंड करून काढलेला आहे. यात, दत्तशिखर सुळक्याच्या तीव्र उताराच्या सोंडाही नजरेत भरत आहेत. गोरखशिखर पार करून आपण खाली उतरू लागतो तेव्हा मग एक जुळी कमान समोर येते! डावीकडची कमान दत्तपादुकाशिखराप्रत नेते तर उजवीकडची कमान कमंडलकुंडाकडे.

पुढील क्षणचित्रे तेथील परिस्थितीची पुरेशी कल्पना देतील.दत्तपादुका मंदिरात ’फोटो पाडवायला’ सख्त मनाई आहे. त्यामुळे तेथील फोटो काढता आले नाहीत.

परततांना गोरखशिखराजवळून अंबामाता मंदिर सुरेख दिसते. थोडेसे उतरून मग आपण रज्जूमार्गाच्या वरच्या स्थानकापाशी पोहोचतो. इथून गोरखशिखर, त्याच्यामागे दत्तपादुकाशिखर आणि सर्वात मागे रेणुकाशिखर अशी शिखरे ओळीने दिसू लागतात.

उडनखटोल्यातून परततांना दिसणारे भवनाथ तलेटीचे दृश्य मग सारीच चढाई पुन्हा आठवण्यास कारण ठरते. रैवतकाची पदयात्रा तर सफल संपूर्ण झालेली असते. निरोपाची लगबग सुरू असते. मात्र का कोणास ठाऊक, असे वाटत राहते की हे सारे ’केवळ पुनरागमनाय’च आहे. आपण पुन्हा इथे नक्की येणार! तथास्तु!!

रैवतकाची पदयात्रा

आहे रैवतकात थोर इथला सोपान तो पत्थरी
नेई दत्तगुरूपदास क्रमता वाटा इथे पायिही ।
नाही झेपत ज्या प्रवास, करते डोली तयाचे भले
भोई नेत तयास दूर अवघा लंघून सोपानही ॥ 

यात्रा देत सुखे, प्रवास करता दावी स्थळे कौतुके
वारे वाहत गारगार करते सार्‍यांस आनंदित ।
होते दर्शन, भाव येत जुळुनी, वाटे खरे सार्थक
आलो येथवरी, कृपाच सगळी, दत्ताचि ही केवळ ॥   

संदर्भ

१. गिरनार उडनखटोला https://udankhatola.com/news-detail/all-about-the-girnar-hill
२. गिरनार महात्म्य, चंपकलाल ए. दोशी, बजरंग प्रेस, १४-०६-२०१४, रु.३०/-
३. गिरनार सोपान https://junagadhgirnar.com/stairs-at-girnar/

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: