डॉ. सुधाकर आगरकर
यांचा जन्म १ जुलै १९५१ रोजी झाला. त्यांचे शिक्षण; एम.एस.सी. (रसायनशास्त्र),
नागपूर विद्यापीठ, १९७५ आणि पी.एच.डी. (विज्ञानशिक्षण), पुणे विद्यापीठ, १९८८; असे
झाले आहे. त्यांच्या शोधनिबंधाचे शीर्षक, “डेव्हलपिंग इन्स्ट्रक्शनल स्ट्रॅटेजीज
टू ओव्हरकम डिफिकल्टीज इन लर्निंग सायन्स अँड मॅथेमॅटिक्स (विथ स्पेशल रेफरन्स टू
सोशिओ-इकॉनॉमिकली डिप्राईव्हड स्टुडंटस)” असे होते. १९७६ ते २०१३ दरम्यान टाटा
मूलभूत विज्ञान संस्थेच्या ’होमी भाभा विज्ञानशिक्षणकेंद्रात’ प्राध्यापक म्हणून ते
कार्यरत होते. धारावीतील आणि पश्चिम घाटातील आदिवासी मुलांसोबत कार्य करत त्यांनी
’उपचारात्मक विज्ञानशिक्षण व्यूहरचना (रेमेडिअल इन्स्ट्रक्शनल स्ट्रॅटेजी)’ विकसित
केली. सामाजिकदृष्ट्या वंचित विद्यार्थ्यांना विज्ञानशिक्षण देण्यात तिचा खूप उपयोग
होत असतो. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्याकरता ’मुक्तस्रोत शिक्षणसंसाधने’ही
त्यांनी पहिल्या पिढीच्या विद्यार्थ्यांकरता विकसित केली. गेल्या तीन दशकांत
विज्ञान आणि गणित शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांनी नाव कमावले आहे.
२०११ साली अवकाशप्राप्त झाल्यावर, मी नव्याने निवडलेल्या माझ्या अनुवादक्षेत्रात काम करण्याच्या हौसेपायी, संधींचा शोध घेत ठाण्याच्या विद्याप्रसारक मंडळात पोहोचलो. ते त्यावेळी त्यांच्या वेळणेश्वर येथील ’महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालया’करता प्राचार्यांचा शोध घेत होते. तिथेच डॉ. सुधाकर आगरकर यांचा माझा परिचय झाला. ते त्यावेळी टाटा मूलभूत विज्ञान संस्थेच्या ’होमी भाभा विज्ञानशिक्षणकेंद्रात’ प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर विद्याप्रसारक मंडळाने त्यांची प्राध्यापक आणि अधिष्ठाता, ऍकॅडमी ऑफ इंटरनॅशनल एज्युकेशन अँड रिसर्च’ म्हणून नियुक्ती केली. पुढे विद्याप्रसारक मंडळाने ’महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालया’ करता ’ज्येष्ठ शास्त्रज्ञ परिषदे’ची स्थापना केली. त्या परिषदेचा मी सुरूवातीपासूनच सदस्य राहिलो. त्यामुळे डॉ. सुधाकर आगरकर यांच्यासोबत राहण्याची, त्यांच्याशी बोलण्याची, त्यांची व्याख्याने ऐकण्याची संधी मला अनेकदा प्राप्त झाली. ’महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालया’ने घेतलेल्या ’समृद्ध कोकण’ निबंधस्पर्धेकरता आम्ही दोघेच परिक्षकही होतो. त्यादरम्यान त्यांच्या प्रसन्न व्यक्तित्वाची माझ्यावर अमिट छाप पडली. त्यांची व्याख्याने ऐकतांना विद्यार्थी जसे मंत्रमुग्ध होत असत तसाच मीही मंत्रमुग्ध होत असे.
डॉ. सुधाकर आगरकर यांना शैक्षणिक प्रकल्पांचे नियोजन, अंमलबजावणी आणि मूल्यांकन यांबाबत खूप विविध स्वरूपाचा व्यावसायिक अनुभव आहे. ’टॅलंटसर्च अँड नर्चर अमंग द अन्प्रिव्हिलेज्ड (१९८०-८६)’, ’रेमेडिअल प्रोग्राम फॉर सेकंडरी स्कूल्स इन ट्राईबल रिजन्स (१९८७-९०), ’इंप्रुव्हिंग टीचिंग ऑफ सायन्स अँड मॅथेमॅटिक्स थ्रू व्हॉलेंटरी ऑर्गनायझेशन्स (१९९०-९३)’, ’क्वालिटीइंप्रुव्हमेंट प्रोग्राम फॉर आश्रम स्कूल्स (१९९३-२०००)’, ’इन-सर्व्हिस ट्रेनिंग ऑफ टीचर्स अँड टीचर एज्युकेटर्स (२०००-२००६)’, आणि ’ओपन एज्युकेशनल रिसोर्सेस फॉर स्कूल्स (२००७-२०१३)’. इत्यादी शैक्षणिक प्रकल्पांचे त्यांनी यशस्वी व्यवस्थापन केलेले आहे. हल्ली ते तुलनात्मक शिक्षणाचा अभ्यास आणि आंतरसंस्कृती संबंध विकसित करण्यात व्यग्र आहेत.
डॉ. सुधाकर आगरकर यांनी विज्ञान आणि गणित शिक्षणाच्या क्षेत्रांत पथदर्शी संशोधन केलेले आहे. त्यांच्या संशोधनाची काही क्षेत्रे पुढीलप्रमाणे आहेत. ’इन्स्ट्रक्शनल स्ट्रॅटेजीज’, ’यूज ऑफ डिजिटल रिसोर्सेस इन एज्युकेशन’, ’टीचर्स प्रोफेशनल डेव्हलपमेंट’. सामाजिकदृष्ट्या वंचित विद्यार्थ्यांत त्यांना विशेष स्वारस्य आहे. मुंबई आणि आदिवासी भागांतील वंचित विद्यार्थ्यांकरता त्यांनी ’उपचारात्मक शिक्षण व्यूहरचना’ विकसित केलेली आहे. या कामास आंतरराष्ट्रीय क्षेत्रात विस्तृत मान्यता मिळालेली आहे. प्रबोधनार्थ त्यांचे संशोधन मांडण्याकरता त्यांना विकसित आणि अविकसित दोन्हीही देशांतून आमंत्रणे येत असतात.
शिक्षकांचे आणि शिक्षक प्रशिक्षकांच्या सेवेदरम्यानचे प्रशिक्षण या क्षेत्रातही डॉ. सुधाकर आगरकर यांना स्वारस्य आहे. विज्ञान आणि गणित शिक्षकांचे आणि शिक्षक प्रशिक्षकांच्या सेवेदरम्यानच्या प्रशिक्षणाकरता त्यांनी भारतात आणि विदेशांतही, अनेक अभ्यासवर्गही आयोजित केलेले आहेत. या अभ्यासक्रमांत आलेल्या अनुभवांतून सेवेतील शिक्षक आणि शिक्षक प्रशिक्षकांच्या प्रशिक्षणाकरता त्यांनी एक अभ्यासक्रम (मॉड्यूल) तयार केलेला आहे. दैनंदिन शालेय विज्ञान आणि गणिताच्या शिक्षणाकरताही त्यांनी उपयुक्त शिक्षणसामुग्री तयार केलेली आहे.
विज्ञान आणि गणित लोकप्रिय करण्याच्या क्षेत्रात डॉ. सुधाकर आगरकर यांना स्वारस्य आहे. मुलांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यात, व्याख्याने व प्रात्यक्षिके करण्यात, तसेच रेडिओ-टेलिव्हिजनवर तसेच वृत्तपत्रे व नियतकालिकांतून प्रबोधनपर लेख लिहूनही त्यांना आनंद मिळत असतो. गुंतागुंतीच्या वैज्ञानिक संकल्पना, स्वविकसित कथाकथनात्मक शैलीने ते सामान्य माणसांना सहजच समजावून देऊ शकतात. मराठी विज्ञान परिषदेचे ते तहहयात सदस्य आहेत. ही संस्था मराठीतून विज्ञानप्रसार करणारी स्वयंसेवी संस्था आहे. संस्थेतर्फे ते विज्ञान आणि गणितास लोकप्रियता मिळवून देण्याकरता अनेक कार्यक्रम आयोजित करत असतात. संस्थेची ’विज्ञानपत्रिका’, स्थानिक वृत्तपत्रे, ’विज्ञानवार्ता’ आणि ’दिशा’ या नियतकालिकांतून त्यांनी विज्ञान लोकप्रिय करण्यासाठी असंख्य लेख लिहिलेले आहेत.
डॉ. सुधाकर आगरकर यांना अनेक पारितोषिके आणि उत्कृष्टताप्रमाणपत्रे लाभलेली आहेत. १९७० ते १९७५ दरम्यान शिकत असतांना, त्यांना भारत सरकारची राष्ट्रीय गुणवत्ता शिष्यवृत्ती लाभलेली होती. विज्ञानशिक्षणातील त्यांच्या अलौकिक कार्याखातर ’मराठी विज्ञान परिषदेने’ १९९२ साली त्यांचा सत्कार केला होता. १९९८-९९ मध्ये मिल्टन केनेस, यु.के. येथील मुक्त विद्यापीठात दूरशिक्षण घेण्याकरता रोटरी फाऊंडेशनची ’अँबॅस्डोरिअल स्कॉलरशिप’ लाभलेली होती. उत्कृष्ट नेतृत्वाखातर २००४ साली त्यांना ’अमेरिकन बायोग्राफिकल इन्स्टिट्यूटने’ सन्मानित केले होते. देशातील प्राथमिक शिक्षणात अलौकिक सेवा दिल्याखातर २००४ साली मॅरी मॅक्कर्डी इंटरनॅशनल अवार्डही त्यांना लाभलेले होते. इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाईड केमिस्ट्रीचे फेलो म्हणून त्यांची २००५ सालीच निवड झाली. उपचारात्मक गणितातील त्यांच्या योगदानाकरता त्यांना २०११ साली संजीवराय सर्मा पारितोषिकही लाभले. विज्ञानशिक्षणातील होमी भाभा अवार्ड त्यांना २०१२ साली प्राप्त झाले.
स्वतःचे संशोधन आणि
प्रत्यक्ष अनुभवाचे आधारे डॉ. सुधाकर आगरकर यांनी अनेक पुस्तके लिहिलेली आहेत. चार
आंतरराष्ट्रीय प्रकाशनांचे ते सहयोगी लेखक आहेत.
२. नव्या शतकातील विषयशिक्षण आणि शिक्षक प्रशिक्षण (सब्जेक्ट टीचिंग अँड टीचर्स एज्युकेशन
इन द न्यू सेंच्युरी, क्लुवर ऍकॅडमिक पब्लिशर्स, २०००).
३. सायन्स एज्युकेशन इन आशिया (सेन्स पब्लिशर्स, २०१०).
४. सायन्स एज्युकेशनः ए ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह (नेक्स्ट जनरेशन पब्लिकेशन्स, २०१३).
उपचारात्मक बीजगणितावर त्यांनी चार पुस्तकांची एक मालिकाच लिहिलेली आहे. गणितात कच्चे असलेल्या विद्यार्थ्यांकरताचा अभ्यासस्रोत म्हणून त्यांनी उपचारात्मक भूमितीवरही चार पुस्तकांची एक मालिका लिहिलेली आहे. शिक्षकांकरताच्या विज्ञानशिक्षणासाठी त्यांनी कृतीवर आधारित तीन पुस्तकांची एक मालिका लिहिली आहे. लोकप्रिय विज्ञानातील अनेक पुस्तकांचे ते सहलेखक राहिलेले आहेत. ’ए बुक ऑन सायन्स क्विझ’, ’हाऊ अँड व्हाय इन स्कूल सायन्स’, ’यूज ऑफ व्हेकेशन्स फॉर स्टुडंटस’, ’पर्सनऍलिटी डेव्हलपमेंट अँड क्लोज लुक ऍट चायना’. डॉ. सुधाकर आगरकर यांनी तज्ञपुनरीक्षित (पिअर रिव्ह्यूड) राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकांत ५० हून अधिक लेख लिहिलेले आहेत.
शिक्षकांच्या अनेक व्यावसायिक संघटनांच्या साहाय्याने निरनिराळ्या देशांतील शिक्षक-प्रशिक्षकांत निरंतर संबंध प्रस्थापित करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. डॉ. सुधाकर आगरकर खर्या अर्थाने विश्वपर्यटक आहेत. निरनिराळ्या विद्यापीठातील निरनिराळ्या संस्थांकडून त्यांना व्याख्यानांची निमंत्रणे येत असतात. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय परिषदांतून बीजभाषणे (की-नोट अऍड्रेस) आणि सारांशभाषणे देण्याकरता त्यांना व्याख्यानांची निमंत्रणे येत असतात. त्याशिवाय शिक्षक आणि विद्यार्थ्यांकरता ते देश-विदेशांत अभ्यास-पर्यटनेही घडवून आणत असतात. या कारणांखातर, निरनिराळ्या खंडांतील ३२ हून अधिक देशांना त्यांनी भेटी दिलेल्या आहेत. डेन्मार्क (१९८८), जर्मनी (१९८८), ऑस्ट्रेलिया (१९९५), सिंगापूर (१९९५, २००५, २०१०, २०११, २०१२, २०१३), रशिया (१९९६), अमेरिका (१९९८, २००१, २००२, २०१०, २०१२), इंग्लंड (१९८८-९९, २००३, २००४, २००५, २००६, २००७, २००८, २००९, २०१०, २०११, २०१३), जपान (२०००, २०१२), हाँगकाँग (२०००, २०१२, २०१३), फ्रान्स (२००१), माल्टा (२००२), नायजेरिया (२००२), केनया (२००२), सायप्रस (२००४), इजिप्त (२००४), जॉर्डन (२००४), चीन (२००४, २००७, २००८, २००९, २०१०, २०११, २०१२, २०१३), थायलँड (२००५, २०११), मलेशिया (२००५), कुवैत (२००६), युनायटेड अरब अमिराती (२००६, २०१४), कातार (२००६), सेशेल्स (२००६), दक्षिण आफ्रिका (२००६), ग्रीस (२००९), स्वित्झर्लँड (२००९), ओमान (२०१०), ग्वाम (२०१०), दक्षिण कोरिया (२०१०), जमैका (२०१२), इस्राएल (२०१३) आणि ब्राझिल (२०१३) इत्यादी देश हे त्यातीलच एक आहेत.
संवर्धित वास्तवातून शिक्षण (लर्निंग थ्रू ऑग्मेंटेड रिऍलिटी)
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून आपली आयुष्ये, माहिती आणि संवाद तंत्रज्ञानाने (इन्फॉर्मेशन अँड कॉम्युनिकेशन टेक्नॉलॉजीने) प्रभावित झालेली आहेत. त्यातील विकासाने आपणास परस्परांशी सत्वर संवाद साधण्यास समर्थ केलेले आहे. ज्यामुळे एक ’संलग्नित समाज (कनेक्टेड सोसायटी)’ उदयास आलेला आहे. माहिती आणि संवाद तंत्रज्ञानातील विकासामुळे ’कुणालाही, कुठेही आणि केंव्हाही’ माहिती उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे अशा समाजास ’ज्ञान समाज (नॉलेज सोसायटी)’ म्हटले जाते. माहिती आणि संवाद तंत्रज्ञानातील विकासामुळे शालेय शिक्षणही प्रभावित झालेले आहे. विजकीय शिक्षणात (ई-लर्निंगमध्ये) प्रचंड प्रमाणात अदोहित सामर्थ्ये दडलेली आहेत. अनेक विकसित देशांत फळ्याची जागा ’कुशाग्र फलकां’नी घेतलेली आहे. त्यातून शिक्षक-विद्यार्थी परस्परसंवाद सुलभ होतो. या देशांत, प्रत्येक वर्गखोलीत अनिवार्यतेने एक संगणक आणि एक ’द्रवस्फटिकदर्शक (लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले, एल.सी.डी.)’ प्रक्षेपक असतोच असतो. विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांनाही संकेतस्थळे माहितीचे स्रोत ठरतात. शिक्षणावरील माहिती आणि संवाद तंत्रज्ञानाच्या प्रभावाची दखल घेऊन ’नासा’ने ’भविष्यातील वर्गखोली (क्लासरूम ऑफ द फ्युचर, सी.ओ.टी.एफ.)’ची संकल्पना प्रसृत केलेली आहे. अमेरिकेच्या निरनिराळ्या भागांत प्रस्थापित झालेल्या ’भविष्यातील वर्गखोल्या’; उपलब्ध असलेल्या माहिती आणि संवाद तंत्रज्ञानाच्या सुविधांचा उपयोग करून ’ज्ञानगवेषणा (नॉलेज एक्सप्लोरेशन)’च्या नव्या पद्धती विकसित करत आहेत. इंग्लंडमधील जगातील पहिल्या खुल्या विद्यापीठात, दूरशिक्षणाकरता तंत्रज्ञानाचा मुक्तहस्त वापर केला जात आहे. तेथील ’ज्ञानमाध्यममाहिती (नॉलेज मेडिया इन्फॉर्मेशन)’ शाळांतील शिकण्या-शिकवण्याच्या पद्धती सुधारत आहेत. (www.kmi.open.ac.uk ).
अशा अत्याधुनिक नवनवीन सुविधांच्या सर्व सामर्थ्यांचा वापर करणे, स्वतः शिकून घेउन, इतरांनाही अवगत करून देण्यात सुधाकरराव तत्पर असतात. चंद्रपुरातील स्वतःच्या वावरानजीकच्या लहान मुलांना देशविदेशातील आधुनिक तंत्रांचा आणि सुविधांचा ते परिचय करून देत असतात. त्यांच्यात वाचनाची आवड उत्पन्न व्हावी म्हणून ते वाचनालये स्थापन करतात. त्यांना उन्नतीचा वेध घेणारी पुस्तके उपलब्ध करून देतात. त्याकरता आवर्जून तिथे जातात. डोंबिवलीतील आपल्या घरापासून तर चंद्रपुरनजीकच्या आपल्या वावरापर्यंत जातायेता स्वतःची मोटार स्वतः चालवत, वर्तमान महाराष्ट्राचे दर्शन घेतात. आसपासच्या शिक्षक प्राध्यापकांशी संपर्क साधतात. संधी मिळाल्यास जागोजाग मुलांशी बोलून घेतात. त्यांच्यात विज्ञानवृत्ती जागवतात. खरे तर असा विज्ञानशिक्षक मिळणे दुर्मीळच आहे. अलीकडेच ठाण्याच्या विद्याप्रसारक मंडळाच्या विश्वस्तसमितीवर त्यांची निवड करून, या मोठ्या संस्थेस त्यांचे मार्गदर्शन अविरत मिळत राहील अशी ठोस व्यवस्थाच मंडळाने केलेली आहे. आपल्या देशातील वंचित मुलांना आधुनिक शिक्षणाचा लाभ करवून देण्याच्या त्यांच्या प्रयासांना यामुळे मोठेच सामर्थ्य लाभलेले आहे. यानिमित्ताने डॉक्टर साहेबांचा हा अल्पपरिचय, त्यांच्याशी अपरिचित असलेल्यांना त्यांची नवी ओळख करून देईल, तर त्यांना ओळखत असलेल्यांना त्यांच्या अज्ञात पैलूंची माहितीही देईल असा विश्वास वाटतो.
डॉक्टर साहेबांना त्यांच्या सर्व अंगीकृत कार्यांकरता उत्तम आयुरारोग्य लाभो आणि विद्यार्थ्यांना आपापली सामर्थ्ये समृद्ध करण्याचे सर्व सोपान लाभोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
संदर्भः
१. डॉक्टर सुधाकर आगरकर
Dr. Sudhakar Agarkar
https://www.hbcse.tifr.res.in/people/former-members/sudhakar-c-agarkar
https://vpmthane.org/web2/Dr%20Sudhakar%20Agarkar.html
३. डॉक्टर सुधाकर आगरकर
https://www.safehandsakola.org/noticeboard/8%20Nov%202019%20KUTUHAL.pdf
४. सिंगापोर अभ्यास सहल - संजय टिकरिया
http://sanjaytikariya.blogspot.in/2010/12/gsgoogleaddadsenseserviceca-pub.html
पूर्वप्रसिद्धीः ठाणे
येथील विद्याप्रसारक मंडळाच्या ’दिशा’ मासिकाचा नोव्हेंबर २०२२ चा अंक.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा