२०२२-१०-१५

डेप्युटीचे चॉकलेट

मी १९७९ साली, नागपूरच्या विश्वेश्वरय्या रिजनल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून, इंजिनिअर झालो. त्याकाळी त्या कॉलेजात एच.एन.देशपांडे नावाचे गृहस्थ डेप्युटी रजिस्ट्रार होते. त्यांचा सर्व कॉलेज प्रशासनावर दरारा असे आणि राष्ट्रीय गुणवत्ता शिष्यवृत्तीबाबतचे सर्व प्रश्न तेच हाताळत असत. मला राष्ट्रीय गुणवत्ता शिष्यवृत्ती मिळत होती. त्या संदर्भात मला त्यांचेशी नेहमीच काम पडत असे. त्यामुळे डेप्युटी रजिस्ट्रार, ह्या पदाबाबत मला भयंकरच आदर वाटत असे. इंजिनिअर झाल्यावर, मुंबईत नोकरी लागेल ह्या आशेने मग मी मुंबईत आलो. डोंबिवलीला मावशीकडेच राहत असे. माय मरो आणि मावशी जगो म्हणतात. त्याकाळात, निदान माझ्याकरता तरी माझी मावशीच माझी आई होती.
१९८२ साली मावशीचा मुलगा धनंजय ह्याचे लग्न झाले. त्याला पहिला मुलगा झाला. घरातला नव्या पिढीतला पहिला मुलगा म्हणून त्याचे खूप लाड होत असत. कुलदीपक ह्या नात्याने, त्याचे नाव दिपंकर ठेवले गेले. दिपंकर अत्यंत भडक माथ्याचा मुलगा होता. हल्ली कुणीही कबूल करणार नाही! ते असो. पण त्यामुळे अण्णा (मावशीचे धाकटे दीर) त्याला खोमेनी म्हणत असत. आयातुल्ला खोमेनींचा त्या काळात इराणमध्ये बोलबाला होता. म्हणून तेव्हा भडक माथ्याच्या लोकांना इतरत्रही खोमेनी म्हणत असत.
त्याला संताप आला की तो हातातली कुठलीही वस्तू सरळ गॅलरीतून घराबाहेर भिरकावून देत असे. ही सवय मोडावी म्हणून, अनेकदा मी त्याला दोन्ही हातांत घट्ट धरून, गॅलरीच्या बाहेर लोंबता धरत असे आणि विचारे, “फेकू का आता खाली?” मग नको नको म्हणायचा, पण एकदा का त्याची सटकली की, हातातली वस्तू जरूर खाली भिरकावून द्यायचा. त्याची ती सवय काही सहजी सुटली नाही. पुढे मोठा झाल्यावर, खालच्यांना लागू शकेल, ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन, त्यानेच मग आवरते घेतले.
मी त्याला ओ मिनी, ओ खोमेनी, ओ स्टार, ओ रजिस्ट्रार, ओ डेप्युटी रजिस्ट्रार असे म्हणत असे. ह्यातील चढती भाजणी लक्षात घ्या! मिनी म्हणजे छोटा ह्या अर्थानी. खोमेनी तर तो होताच. स्टार म्हणजे सर्वांचे लक्ष वेधून घेणारा. रजिस्ट्रार म्हणजे मोठा प्रशासकीय अधिकारी. मात्र वरील कारणामुळे, मी त्या काळात डेप्युटी रजिस्ट्रारला, रजिस्ट्रारहूनही थोर मानत असे. तर अशा रीतीने दिपंकर डेप्युटी रजिस्ट्रार पदाला पोहोचलेला होता. बारीकसाच होता. मला त्याचा फार लळा होता. रात्री निजत नसेल तर मी खूप वेळ गीतेचे अध्याय म्हणत म्हणत, त्याला कडेवर घेऊन फेर्या मारत असे. मग त्याला झोपही लागायची.
बघ तुझ्या खिशात चॉकलेट ठेवलंय म्हटले की चटकन खिशात हात घालून विचारायचा “कुठेय?”
डोक्यावर आहे म्हटले की लगेच डोक्यावर हात लावून बघायचा, आहे का, आहे का, असे!
आज दिपंकर मोठा झाला आहे. एम.टेक. (इन्स्ट्रुमेंटेशन) झाला आहे. मातब्बर कंपनीत अधिकारावर कार्यरत आहे. त्याचे लग्नही झाले आहे आणि सुंदर, सुस्वरूप, सुविद्य पत्नीसोबत तो पुण्यनगरीत गृहस्थाश्रमी स्थिरावला आहे. ऑफीसच्या कामाने नुकताच दिपंकर अमेरिकेत गेला होता. येतांना आमच्याकरता चॉकलेटसही घेऊन आला. त्यामुळे मला मग लहानपणचा चॉकलेट शोधणारा छोटासा दिपंकर आठवला. मात्र आज चॉकलेट देणारा मी नव्हतो. तो होता.
दिपंकर!
ओ मिनी, ओ खोमेनी, ओ स्टार, ओ रजिस्ट्रार, ओ डेप्युटी रजिस्ट्रार !! ऊर्फ डेप्युटी.
… आणि हे त्याचे चॉकलेट. अमेरिकन.
Sanjivani Gole, Chandrakant Ghaisas and 7 others
3 comments
Like
Comment

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: