२०२२-०९-२०

पूर्वजप्रणाम

जयांच्या कृपेने कुळी जन्म झाला
पुढे वारसा हा सदा चाललेला ।
अशा आठवावे वडीलांस सार्‍या
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना ॥१॥ 

इथे मान सन्मान सारा मिळाला
पुढे मार्ग सारा सदा दाखवीला ।
कृपा ही जयांनी सदा केलि त्यांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना ॥२॥ 

मिळो सद्गती माझिया पूर्वजांना
विनंती अशी तीनही देवतांना ।
कृतीनेच माझ्या मिळो मोक्ष त्यांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना ॥३॥ 

वरूणास वायूस अग्नीस सार्‍यां
विनंती अशी जोडुनी हात जाणा ।
सदा प्रार्थु उद्धार, वंदू तयांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना ॥४॥ 

वसू रूद्र आदीत्य रूपे तयांना
कुळे एकशे एक गोत्रांहि साता ।
करा मुक्त, उद्धार लाभो तयांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना ॥५॥ 

करूनी पुरी सिध्दता भोजनाची
स्वये पंचपक्वान्न रांधून सारी
तया वाढुनी तृप्ति त्यांची कराना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना ॥६॥ 

मनोभावनेने पुजूनी तयांना
पुरे दान देऊन विप्रांस नाना ।
करू प्राप्त त्यांच्या स्वये आशिषांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना ॥७॥ 

सदा आपली याद राहो जनांना
असे न्यून काही तरी पूर्ण माना ।
मनी गोड माना नि सेवा व्रतांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना ॥८॥ 

नरेंद्र गोळे २०२२०९२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: