नित्यनियमाने दररोज प्रत्येकासच
अनुवादांची गरज भासत असणार्या वर्तमान युगात, देशभरात अनुवाद प्रशिक्षणाकरता
शाळा-महाविद्यालये नसावित ही चकित करून टाकणारी वस्तुस्थिती आहे. ही त्रुटी त्वरित
दूर करून जनसामान्यांना अनुवाद प्रशिक्षणाची सोय लवकरात लवकर उपलब्ध व्हावी अशी
इच्छा ठाण्यातील विद्याप्रसारक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांनी
व्यक्त केली. विद्याप्रसारक मंडळाच्या, बांदोडकर (स्वायत्त- ऑटोनॉमस) महाविद्यालयात
पदवी आणि पदव्यूत्तर अभ्यासक्रमांकरता, श्रेयगुण अभ्यासक्रम (क्रेडिट कोर्स) या
स्वरूपात अनुवाद प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या विचारात, विद्याप्रसारक
मंडळ आहे. त्या दृष्टीने श्रेयगुण अभ्यासक्रम निर्माण करण्याच्या दिशेने पहिले
पाऊल म्हणून ’अनुवाद प्रशिक्षणा’च्या विविध आयामांच्या रूपरेषेची चर्चा करणारे एक
व्याख्यान काल शुक्रवार दिनांक ०८-०७०२०२२ रोजी, ज्ञानद्विपातील पाणिनी सभागृहात
आयोजित करण्यात आलेले होते. त्या व्याख्यानाचा हा संक्षिप्त आहवाल आहे.
’प्रामाणिकही आणि सुंदरही’ या पुस्तकाच्या लेखिका करुणा गोखले म्हणतात,
“अनुवाद म्हणजे भरतकाम केलेल्या
कापडाची उलटी बाजू”
“अनुवाद म्हणजे दुधाची तहान ताकावर
भागवणे”
“अनुवाद म्हणजे मूळ लेखनकृती वाचता येत
नाही, याबद्दल मिळालेला दिलासा”
“अनुवाद हा तरूण स्त्रीसारखा असतो,
सुंदर असेल तर प्रामाणिक नसतो, आणि प्रामाणिक असेल तर सुंदर नसतो.”
म्हणून तर त्यांनी आपल्या पुस्तकाचे शीर्षक “प्रामाणिकही, सुंदरही” असे ठेवलेले आहे आणि हेच आहे ’अनुवाद कसा असावा?’ या प्रश्नाचे खरे उत्तर. मात्र तो तसा कशाप्रकारे करता येईल, होतकरू अनुवादकास त्याकरता कसे तयार करता येईल, कसे प्रशिक्षित करता येईल, हे सांगणारे हे व्याख्यान होते.
बांदोडकर महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापक असे सुमारे शंभर प्रेक्षक या कार्यक्रमास उपस्थित होते. तसेच माध्यमविद्या शाखेतील विद्यार्थीही या कार्यक्रमास उपस्थित होते. प्रेक्षकांचा प्रतिसाद उत्स्फूर्त आणि आश्वासक होता. अनुवाद आपल्या जीवनाचा कसा अविभाज्य भाग झालेला आहे आणि त्याकरता औपचारिक प्रशिक्षणाची कशी आवश्यकता आहे याची चर्चा या निमित्ताने या व्याख्यानात केली गेली.
व्याख्यानाचा सारांश आराखडा पुढील तपशीलाने व्यक्त होऊ शकेल.
१. रूपरेषा
२. अनुवादाची
स्रोतभाषा
३. अनुवादाची
लक्ष्यभाषा
४. अनुवादक
५. अनुवाद
प्रशिक्षणाच्या कोणत्या सोयी उपलब्ध असाव्यात?
६. अनुवाद
करावयाच्या साहित्याचे वर्गीकरण
७. अनुवाद प्रक्रिया
८. अनुवादाच्या गरजेची उदाहरणे
९. संदर्भवाचन
अनुवाद अनुक्रमातील सर्व
मुद्द्यांचा तपशीलाने विचार होण्याची आवश्यकताही व्याख्यानात व्यक्त करण्यात आली.
रूपरेषा
१. प्रत्यक्षातील
अनुवादांच्या उदाहरणांनी अनुवादविषयक गरजा स्पष्ट करणे.
२. अनुवादकार आणि त्याने केलेली अनुवाद-उद्दिष्टांची तसेच अनुवादाची स्रोतभाषा आणि लक्ष्यभाषा
यांची केलेली निवड.
३. अनुवाद करण्यास लागणारी साधने. संगणक, शब्दकोश, अनुवादाची मूलतत्त्वे सांगणारे
ग्रंथ. पर्यायी शब्दांचे शब्दसंग्रह आणि सामान्य वापरातील शब्दांचे सहजसोपे पर्याय
यांचेबाबतची चर्चा.
४. अनुवादकास आवश्यक असलेली अनुवादातील स्रोतभाषेच्या ज्ञानाची, त्यातील आकलनाची
आवश्यक
पात्रता.
५. अनुवादकास आवश्यक असलेली अनुवादातील लक्ष्य भाषेच्या ज्ञानाची, त्यातील अभिव्यक्तीची
आवश्यक
पात्रता.
६. लक्ष्य
साहित्याचे वर्गीकरण आणि आनुषंगिक तपशील.
७. अनुवाद करायच्या नमुन्यांचे अनुवाद करण्याचे प्रात्यक्षिक.
८. अनुवाद प्रक्रिया.
अनुवादाची स्रोतभाषा
मुळात अनुवाद का हवा असतो? तर एखाद्या भाषेतला मूळ मजकूर कुणातरी भिन्नभाषिकाला, कशासाठीतरी हवा असतो. त्यामुळे हे उघडच असते की, गरजवंतास स्रोतभाषेचे ज्ञान तर असते, मात्र अर्थ समजून घेण्यास पुरेसे असत नाही. त्यामुळे स्वभाषेत तो अर्थ समजावून सांगणारा असा कुणीतरी हवा असतो किंवा त्याने सांगितलेला स्वभाषेतील अर्थ म्हणजेच ’अनुवाद’ उपलब्ध असावा लागतो. अनुवादकाला स्रोतभाषेचे सम्यक ज्ञान नसले तरीही चालते. त्याला हव्या त्या मजकूराचा संपूर्ण अर्थ कळला म्हणजे झाले. अनुवाद तर त्याला लक्ष्यभाषेतच करायचा असतो, जी बहुधा त्याची मातृभाषाच असते. किंबहुना अनुवादकाची ’लक्ष्यभाषा’ त्याची मातृभाषाच असणे खूप सोयीचे ठरत असते, कारण अनुवादकाची लक्ष्यभाषेतील अभिव्यक्ती सशक्त असावीच लागते.
अनुवादाची लक्ष्यभाषा
अनुवादकाची ’लक्ष्यभाषा’ त्याची मातृभाषा असणे चांगले. मूळ भाषेतील अर्थ, विवरण, रचनासौंदर्य, भाव आणि माहितीही पूर्ण समजून घेऊन ती लक्ष्यभाषेत यथासांग अभिव्यक्त करणे म्हणजे अनुवाद. अनुवाद करणे शास्त्रही आहे आणि कलाही. जो अनुवाद गरजवंताच्या गरजा पूर्ण करू शकतो तो शास्त्रार्थाने परिपूर्ण मानावा लागेल. मात्र ज्या अनुवादात मूळ भाषेतील रसरंजनाची माधुरी लक्ष्यभाषेत अवतरली आहे, तो अनुवाद कलेच्या दृष्टीनेही परिपूर्ण मानावा लागतो. त्या अर्थाने गरजवंतांची गरज भागवतो तो शास्त्रयुक्त अनुवाद ठरतो आणि रसिकांना रुचतो तोच खरा कलापूर्ण अनुवाद होय.
अनुवादक
अनुवादकास अनुवाद करावयाच्या मजकुराबाबतचे मूळ भाषेतील संपूर्ण आकलन होणे गरजेचे असते. त्याला स्रोतभाषेचे निदान तितपत ज्ञान असणे, ही किमान अर्हता ठरते. मात्र लक्ष्यभाषेत त्याला जर सशक्त अभिव्यक्ती नसेल तरीही तो उपयुक्त अनुवाद करण्यास अपात्रच ठरतो. त्यामुळे मूळ भाषेतील संपूर्ण आकलन आणि लक्ष्यभाषेत सशक्त अभिव्यक्ती करू शकणाराच अनुवादक होऊ शकतो. मात्र पर्यटनासारख्या तात्पुरत्या गरजांकरता आवश्यक असलेले अनुवाद त्या क्षेत्रातले लोक मूळ भाषेतील संपूर्ण आकलन आणि लक्ष्यभाषेत सशक्त अभिव्यक्ती नसूनही लीलया पूर्ण करतांना दिसून येतात. असे अनुवादक क्षेत्रज्ञ असतात. त्या त्या विशिष्ट क्षेत्रातील अनुवादच ते करू शकतात. बांधकाम, न्यायव्यवस्था, अर्थव्यवस्था ही क्षेत्रेही अशीच आहेत. त्याउलट पुस्तकांचे अनुवाद करणार्यास टिकावू साहित्याची पुनर्निर्मिती करावयाची असते. त्याला अधिकची पात्रता, अनुभव आणि व्यासंगही आवश्यक असतो.
अनुवाद प्रशिक्षणाच्या कोणत्या सोयी उपलब्ध असाव्यात?
१. प्राथमिक अनुवाद प्रशिक्षण, अनुषंगिक
अध्यापकवर्ग आणि शिक्षणव्यवस्था.
२. स्रोतभाषा-लक्ष्यभाषा जोडीगणिक स्वीकृत पर्यायी शब्दांचा जालसंजीवित
शब्दसंग्रह.
३. स्वीकृत पर्यायी शब्दांचा शब्दसंग्रह वाढवत, पुनरीक्षण करून स्वीकारणारी
व्यवस्था.
४. स्रोतभाषा-लक्ष्यभाषा जोडीगणिक, अनुवाद
पुनरीक्षक, संपादक, प्रकाशक इत्यादी.
५. अनुवादशास्त्रविकासास वाहिलेले नियतकालिक, सहभागी अनुवादकांचा कायप्पा गट.
अनुवाद करावयाच्या साहित्याचे वर्गीकरण
१. कथा, कादंबर्या, कविता, चरित्रे, प्रवासवर्णने, अनुभवकथने, नाटके, चित्रपट इत्यादी भाषाविषयक
साहित्य;
२. अहवाल,
जमाखर्च, निवेदने, नोंदी,
लेखा परीक्षणे इत्यादी हिशेबात्मक साहित्य;
३. उपकरणाची वर्णने, यंत्रांची परिचयपत्रे, संयंत्रांच्या संचालन संहिता, वस्तूची जाहिरात पत्रके
इत्यादी तांत्रिक साहित्य;
४. बांधकामातील वस्तूंच्या याद्या, अवजारांच्या याद्या, नोंदणी संदर्भातील कागदपत्रे, कामगारांची
उपस्थिती
पत्रके, वेतन वह्या इत्यादी प्रत्यक्ष घडामोडींच्या लिखित
नोंदी;
५. न्यायव्यवहार, संविधान, कायदे, नियम, दंडसंहिता, खटल्यांची इतिवृत्ते आदी साहित्य;
६. महसुली व्यवहार, शासकीय नोंदी, जमीनजुमल्याचे व्यवहार, कर आकारणी, कर वसुली,
अंदाजपत्रके, पणन-विपणन व्यवहार आणि एकूणच शासनव्यवहार साहित्य;
७. पर्यटन स्थळे, त्यांची वर्णने, तिकिटे, यात्रासंस्था, सहल नियोजने, कार्यक्रमांच्या सूची, प्रवासी
वेळापत्रके, पर्यटन, स्थलदर्शन इत्यादींदरम्यान आवश्यक असलेल्या व्यवहारांची पत्रके, पुस्तके,
कार्यक्रमपत्रिका,
नियमपुस्तिका, दरपत्रिका इत्यादी साहित्य;
८. विज्ञान, तंत्रज्ञान, त्यांतील प्रगती, संशोधन, त्याचे अहवाल, विकास, भावी वाटचालींचे नियोजन,
वृत्तांकने, वैज्ञानिकांची चरित्रे, असे सर्वच विज्ञानविषयक
साहित्य;
९. नैतिक वर्तन, धर्म, प्रार्थनास्थळे, धर्मसभा, मेळे, मंदिरे, स्तोत्रे, आचारसंहिता इत्यादीबाबतचे
धर्मविषयक साहित्य;
१०. आरोग्य, सार्वजनिक आरोग्य, आरोग्य व्यवस्था, आयुर्वेद, औषधनिर्मिती, शुश्रुषालये, उपचार
संहिता, जीवनरक्षक प्रणाली, अपघातधक्क्यातून सावरणार्या प्रणाली, प्रतिबंधक तसेच
आपत्कालीन उपचार व्यवस्था इत्यादींबाबतचे साहित्य.
अनुवाद प्रक्रिया
१. गरजवंत, हौशी अनुवादक, शासनयंत्रणा, व्यापारी आस्थापना इत्यादींच्या अनुवादाबाबतच्या
अपेक्षा, आवश्यकता आणि गरजा जाणून घेणे.
२. आवश्यक अनुवाद कोण करू शकतील याचा अंदाज घेऊन पात्र व्यक्तीस अनुवादाकरता प्रोत्साहित
करणे.
३. पात्र व्यक्तीने स्रोत भाषेतील मजकूर नीट
समजून घेऊन, आपल्या द्वैभाषिक कौशल्यांचा पुरेपूर वापर करून लक्ष्य भाषेत अनुवाद
करणे.
४. तज्ञ व्यक्तीने तो तपासून योग्य करणे, संपादन
करणे.
५. केलेला अनुवाद गरजवंतापर्यंत, वेळेत
पोहोचवणे.
६. चालू असलेल्या भाषण वा संभाषणाचा वाक्यावाक्यागणिक तत्काळ अनुवाद हवा असल्यास
अनुवादकास सोबतच राहावे लागते. त्याला
अनुवादाची विशेष योग्यता असणे गरजेचे असते.
७. कुशल अनुवादकास अनुवाद करतांना अनुभवणे. प्रात्यक्षिक.
८. संगणक पडद्यावर डाव्या-उजव्या खिडक्यांत स्रोत आणि लक्ष्य मजकूर ठेवून, जालसंजीवित
अनुवाद करण्याची गतीमान पद्धत.
अनुवादाच्या गरजेची उदाहरणे
१. शासनसंबंधी यंत्रणांतील अर्ज निराळ्या भाषेत असल्याने गरजवंतास रकाने समजून घ्यायचे
आहेत, अशा प्रकारची गरज. उदाहरणार्थ रेशनकार्डाकरताचा अर्ज, रेल्वे आरक्षणाकरताचा अर्ज,
पोलिसात हरवल्या, चोरल्याची तक्रार देण्याकरताचा
अर्ज.
२. पर्यटनासंबंधातील साहित्याचे ग्राहकानुकूल अनुवाद करण्याची गरज. उदाहरणार्थ महाराष्ट्रात
गुजरातमधील पर्यटक यावेत म्हणून महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या मराठी पत्रकाचा
गुजराती अनुवाद आवश्यक
ठरतो.
३. मुलीला ’राष्ट्रीय आपत्ती’ विषयावर निबंध लिहायचा आहे. मजकूर विकिपेडियावर इंग्रजीत
उपलब्ध आहे. त्याचा मराठीत अनुवाद
करण्याची गरज.
४. महाराष्ट्र शासनाने इंजिनिअरिंगचे शिक्षण मराठीतूनही उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याने
इंग्रजी पाठ्यपुस्तकांचा मराठीत
अनुवाद करण्याची गरज.
५. कोल्हापूरचा गूळ व्यापारी ऑस्ट्रेलियात गूळ निर्यात करू चाहतो. त्याच्या गुळाची इंग्रजीत
जाहिरात करण्याची गरज.
६. कारखान्यात लागणार्या जपानी उपकरणाची माहिती जपानी भाषेतून मराठीत आणण्याची गरज.
संदर्भः
१. भाषांतर आणि भाषा, विलास
सारंग, मौज प्रकाशन गृह, पहिली आवृत्ती १ फेब्रुवारी २०११,
मूल्यः १५०/-, एकूण
पृष्ठेः १३४.
२. प्रामाणिकही सुंदरही,
करुणा गोखले, राजहंस प्रकाशन, पहिली आवृत्ती ऑगस्ट २०१९,
मूल्यः २००/-, एकूण
पृष्ठेः १४१.
३. अनुवाद कसा
असावा - अरुंधती दीक्षित https://anuvad-ranjan.blogspot.com/2021/02/blog-post_22.html
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा