२०२२-०६-२६

पुस्तक परिचयः मोठी तिची सावली


माझ्या मते, लता मंगेशकर यांचे चरित्र लिहू शकेल अशी एकमेव व्यक्ती आहे मीना खडीकर, कारण दीदींसोबत सर्वाधिक काळ घालवलेल्या त्या सर्वात जवळच्या व्यक्ती आहेत. त्यांनीच ते लिहिलेही आहे. भारतरत्न, गानशारदा लतादीदींचे नितांतसुंदर शब्दचित्र त्यांनी उभे केले आहे. हाती धरल्यापासून खाली ठेववत नाही असे हे पुस्तक आहे. लताचे चरित्र, मीना यांचे निरूपण आणि प्रवीण जोशींसारखा शब्दप्रभू शब्दांकनाला, असा समसमा संयोग लाभल्याने पुस्तक खूपच सुरस झालेले आहे. शिवाय, परचुरे प्रकाशनाच्या इतमामाला शोभेलसे मुद्रण, तसेच पुस्तकाचा कागद, आकार आणि प्रकार सारेच देखणे आहे. हवेहवे असे आहे. लताच्या असंख्य मराठी चाहत्यांनी ते अवश्य वाचावे! लताविषयी प्रत्येकासच जाणून घ्याव्या वाटणार्‍या अपार गोष्टींबाबतचे कुतुहल नक्कीच शमेल अशी खात्री या पुस्तकाबाबत देता येईल.



या पुस्तकाला गुरुदेव शंकर वासुदेव अभ्यंकर यांची सुरेख प्रस्तावना आहे. पुस्तकाची सम्यक ओळख कशी करून द्यावी याचा तो जणू वस्तुपाठच आहे. हे पुस्तक जेवढे सुंदर आहे तेवढीच ही प्रस्तावनाही सुंदर आहे. वाचनीय आहे.

कस्तुरी मृगाला क्वचितच याची जाणीव असते की, आपल्यापाशी कस्तुरी आहे. मात्र काही विरळ व्यक्ती अशी असतात, ज्यांना हे माहीत असते की, आपल्यापाशी काय आहे, ईश्वराने आपल्या पदरात काय बांधले आहे. त्या व्यक्ती असतातही लोकोत्तर आणि त्यांना सर्वकाळ हे माहीतही असते की आपण लोकोत्तर आहोत. त्या सर्वसामान्यांसारख्या वागत नाहीत आणि अलौकिक वागूनच, अलौकिक ख्याती प्राप्त करत असतात. लता मंगेशकरही त्यातीलच एक आहेत. नरेंद्र मोदीही त्यातलेच आहेत. बाबा रामदेवही त्यातलेच आहेत आणि योगी आदित्यनाथही त्यातलेच आहेत.

आसेतुहिमाचल पसरलेल्या आर्यावर्तातच नव्हे तर संपूर्ण अवनीतलावर ज्यांना सारेच ओळखत असतात, किमान त्यांचे गाणे ऐकल्यावर ज्यांची ओळख पटतेच पटते अशा आहेत लतादीदी. त्या सगळ्यांच्या ओळखीच्या गायिकेच्या, माणूस म्हणूनच्या जीवनात, दार किलकिले करून पाहण्याचे कुतुहल तर प्रत्येकातच असते. त्या कुतुहलपूर्तीस अंजाम देण्याकरताच जणू हे पुस्तक मीनाताईंनी लिहिले आहे. सुमारे दोनशे पानांच्या पुस्तकात हे सारे सामावणे खरे तर अवघडच आहे, मात्र ही साठा उत्तरांची कहाणी त्यांनी पाचा उत्तरांत लीलया सुफळ संपूर्ण केलेली आहे. मला आवडली आहे. तुम्हालाही आवडेल असा विश्वास वाटतो.

मीनाताई लिहितात, “आम्ही पाचही भावंडे लहानपणापासून संगीतक्षेत्र इतक्या जवळून पाहत आलो की, त्याबाहेर काही जग असते हे आम्हाला जणू ठाऊकच नव्हते. संगीत हेच आपले कार्यक्षेत्र आहे हे ठरूनच गेल्यासारखे होते. लहान मुले अंगणात खेळतात तसे आम्ही नाटक कंपनीच्या आवारात वाढलो. बाबांच्या जलशांत बागडलो. नंतर दीदीच्या रेकॉर्डिंगला जाऊन तिथलाही आनंद मनसोक्त लुटला. दीदीचा हात धरून आम्हीही सारेजण याच क्षेत्रात आलो, रमलो. घरात येणारी सून कोण असणार यावरही एकमत झाले होते. दामुअण्णा मालवणकरांची मुलगी. दामुअण्णा बाबांच्या बलवंत संगीत मंडळीत होते. बाबांचे मोठेपण त्यांनी जवळून पाहिलेले होते. आमच्या कुटुंबाची त्यांना जवळून माहिती होती. बाबांच्या अखेरच्या काळापर्यंत त्यांच्याशी एकनिष्ठ राहणारी जी मोलाची माणसे होती, त्यातलेच होते दामुअण्णा मालवणकर. स्वतः फार मोठे कलाकार. नाट्य आणि चित्रपट क्षेत्रांत त्यांचा लौकिक होता. स्थळाची माहिती काढायचा काही प्रश्नच नव्हता. वधूपरीक्षा वगैरे नावालाच.”

अशा प्रकारे निवडलेल्या या सुनेची मला मात्र एके दिवशी अवचितच ओळख झाली. मी एका गाण्याचा अनुवाद करत होतो. गाणे होते १९६३ सालच्या गृहस्थी सिनेमातले, ’जीवन ज्योत जले’. भारती मालवणकर आणि निरुपा रॉय यांच्यावर चित्रित झालेले हे गाणे ऐकायला नादमधुर आणि श्रवणीय तर आहेच मात्र पहायलाही नेत्रसुखद आहे. हे माझ्या आवडत्या गाण्यांतले एक आहे. https://anuvad-ranjan.blogspot.com/2021/11/blog-post_30.html. तर सांगायचा मुद्दा हा की, हृदयनाथ मंगेशकरांची जीवनसंगिनी त्या पाचही मंगेशकर भावंडांत कोंदणात हिरा दिसावा एवढी चपखल बसणारीच आहे.

मराठी मुलीने, आपल्या मराठी बहिणीचे अलौकिक चरित्र सांगतांना तिला ’दीदी’ अशी हाक हिंदीत का बरे मारावी! मीनाताई म्हणतात दीदी हा हिंदी शब्द, ’दादा’ या मराठी शब्दाचे स्त्रीरूप असावा. कर्त्या दादाने एकत्र कुटुंबाचा प्रतिपाळ करावा, तसाच दीदींनी मंगेशकर कुटुंबाचा प्रतिपाळ केला. त्यामुळे शुद्ध मराठमोठ्या घरादाराने ’दीदी’ या हिंदी शब्दास मराठी भाषेत सन्मान मिळवून दिला.

मीनाताई म्हणतात, “दीदीने ’आनंदघन’ या नावाने संगीतकार म्हणून बरंच काम केलेले आहे. या आनंदघन नावाचे रहस्य काय असे बरेचजण विचारतात. या नावामागे तिच्या भाचरंडांचे प्रेम आहे. आशाच्या मुलाचे नाव आनंद आहे. त्याच्यावर दीदीचा विशेष जीव. आनंदघन हे नाव त्याच्या नावावरून घेतले आहे. घरात आनंदचे खास लाड व्हायचे. त्याला आवडायचे म्हणून दीदी स्वतः कोथिंबिरीचे मटण करून खायला घालायची. पुढे भालजी पेंढारकरांनी ’योगेश’ हे नाव कवी म्हणून स्वीकारले ते माझ्या मुलाच्या नावावरून”.

संगीतकार म्हणून लतादीदींच्या कर्तबगारीच्या आठवणी सांगतांनाच, मीनाताईंनी पंडित दीनानाथ मंगेशकरांची एक आठवण अशी दिलेली आहे की, “परंपरेने चालत असलेल्या चालींत बाबांनी स्वतःच्या प्रतिभेने बदल केले होते. त्यांनी मानापमानातल्या गाण्यांच्या चाली बदलल्या होत्या तेव्हा किती गहजब उठला होता. पण नंतर त्याच चाली रूढ झाल्या. अधिक अर्थवाही म्हणून मान्यता पावल्या. याला कारण म्हणजे बाबांचा संगीतकार म्हणून असलेला वकूब. शब्दांची आणि सुरांची समज.” लताबद्दल त्या म्हणतात, “ती चित्रपटातला प्रसंग समजून घेते आणि केवळ एकच सूर धरून ठेवून हातात गाण्याचा कागद घेऊन ती संपूर्ण चाल सलग पूर्ण करते. ती चाल करते असे म्हणण्यापेक्षा तिला चाल स्फुरते. स्त्रियांना जात्यावर ओवी स्फुरावी तशी. पण तिच्या चाली सहज सुचलेल्या असल्या तरी सहज गाता मात्र येत नाहीत. त्या लोकप्रिय असल्या तरी उथळ नसतात. शब्दाची मोडतोड नाही, अकारण हेल नाहीत, कृत्रिमता तर नावालाही नाही. त्यांच्यामागे दीदीचे केवळ स्वरच नाही, तर संस्कारही उभे असतात, त्या संस्कारांतला बाळबोधपणा पेलणे फार अवघड. अस्सल मराठमोळी निरागसता जपणेही कठीणच.”

मराठा तितुका मेळवावा चित्रपटाविषयीची एक आठवण त्या अशी सांगतात की, “ अखेरचा हा तुला दंडवत या गाण्यात दीदीला दर्‍याखोर्‍यांमध्ये घुमणार्‍या आवाजाचा परिणाम हवा होता. तिने ’तुला दंडवत’ असे गायिले की पाठोपाठ तिच्याच आवाजाचे प्रतिध्वनी उमटावेत अशी कल्पना होती. पण असा परिणाम साध्य करण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान तेव्हा उपलब्ध नव्हते. मग तिने मला आणि उषाला तिच्या मागे थोड्याथोड्या अंतरावर गायला उभे केले. तिने ’तुला दंडवत’ असे गायिले की आम्हीही ते शब्द तिच्या पाठोपाठ तालात गायचो. आजही ती रेकॉर्ड ऐकतांना तो तिचाच प्रतिध्वनी वाटतो. आम्ही आहोतच दीदीचे प्रतिध्वनी.”

मीनाताई सांगतात, “दीदी नेमक्या शब्दांत योग्य भाव व्यक्त करणारी लेखिका आहे. तिच्या लेखनात काव्यदृष्टी असते तसाच तार्किक परखडपणाही असतो. तिला अतिशय समृद्ध आणि डौलदार मराठी अवगत आहे. तिचे वाचनही साक्षेपी आहे. नव्याजुन्या अनेक लेखकांची पुस्तके तिने रसज्ञपणे वाचलेली आहेत. त्यातले संदर्भ तिच्या जिभेवर असतात. संतकवींपासून आधुनिक कवी आणि वेगवेगळे शायर यांच्या रचनाही तिला मुखोद्गद आहेत. दीदी मराठीबरोबरच इतरही अनेक भाषा मातृभाषेच्या सफाईने बोलू शकते. त्यातल्या सौंदर्यस्थळांची तिला उत्तम जाण आहे. बांगला भाषेचे तिला पहिल्यापासूनच आकर्षण आहे. रविंद्रनाथ टागोर, शरदबाबू, विवेकानंद तिने मुळातून अभ्यासले आहेत. मामा वरेरकरांनी केलेला शरदबाबूंच्या साहित्याचा अनुवादही तिने वाचलेला आहे. बंगालची भाषाच नव्हे तर बांगला जीवनशैलीही तिला आकर्षित करते.”

भालजी पेंढारकर यांनी १९५२ साली निर्मिलेल्या ’छत्रपती शिवाजी’ चित्रपटातील ’आज शिवाजी राजा झाला’ गाणे चित्रित करतांना लतादीदी.

लता दीनानाथ मंगेशकर

जन्मः २८ सप्टेंबर १९२९ इंदौर, मृत्यूः ६ फेब्रुवारी २०२२, मुंबई.

संदर्भः

मोठी तिची सावली, मीना मंगेशकर-खडीकर, शब्दांकनः प्रवीण जोशी, परचुरे प्रकाशन मंदिर, तिसरी आवृत्तीः २८ सप्टेंबर २०२०, रु.२०४/-, एकूण पृष्ठे-२३१.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: