२०२२-०६-१३

हिंदू साम्राज्य दिवस













हिंदू साम्राज्य दिवस [१]
नरेंद्र गोळे २०२२०५१९ 

संघ प्रार्थनेचा मराठी अनुवाद [२]

नमू मायभूमी तुला प्रीय माते, सुखी मी करावे तुला हिंदुभूमे ।
शिवे पुण्यभूमे तुझ्याकारणे गे, पडो देह माझा नमू मायभू हे ॥१॥ 

प्रभो शक्तिशाली, मुले हिन्दुभूची, असू सिद्ध आम्ही तुझ्या अर्चनेसी ।
तुझ्या कार्यि आहोत बांधील आम्ही, कृपा राहु दे कार्य ते साधण्यासी ॥२॥ 

न हारू जगाला अशी शक्ति दे तू, जगा नम्रता ये, असे शील दे तू ।
असे मार्ग काट्याकुट्यांचा कसाही, जरी ऐकलेला, भला, घेतला मी ॥३॥ 

समुत्कर्ष होवो, नको श्रेय त्याचे, अशा जाणिवेने स्फुरो वीरवृत्ती ।
न हो क्षीण, ऐसीच दे ध्येयनिष्ठा, सदा जागती राहु दे अंतरी ती ॥४॥ 

विजेती असो संहता कार्यशक्ती, सदा धर्म राखावया सिद्ध हो जी ।
महा वैभवी राष्ट्र नेण्यास तू हे, असू दे कृपा खूप सामर्थ्यदा ती ॥५॥

ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी, शनिवार [३], ६ जून १६७४ रोजी, शिवाजी राजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. शिवाजी महाराजांनी त्या दिवसापासूनच ’राज्याभिषेक शक’ सुरू केला. राज्याभिषेकाचा दिवस ’राज्याभिषेक शका’चा पहिला दिवस होता. १९७४ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शिवाजी राजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा ३००-वा वर्धापन दिन भारतभर साजरा केला. बहुधा तेव्हापासूनच, संघ हा उत्सव सार्वत्रिकरीत्या साजरा करत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना २७ सप्टेंबर इ. स. १९२५ विजयादशमीचे दिवशी, डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार यांनी, त्यांच्या नागपूर येथील निवासस्थानी केली. अगदी स्थापनादिवसापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय नागपूर येथे आहे. संघटनेचा मूळ उद्देश हिंदूधर्मीयात सशक्त संघटन निर्माण करण्याचा आहे. काय आहे आपला हिंदू धर्म? एका शब्दात सांगायचे तर हिंदू धर्म म्हणजे ’सहिष्णुता’. परधर्म सहिष्णुता, परकर्म सहिष्णुता, परवर्म (वर्म म्हणजे उणीव) सहिष्णुता, परमर्म (मर्म म्हणजे गुपित, रहस्य) सहिष्णुता. त्यामुळे ज्याला अशी सहिष्णुता तत्त्वतः मान्य आहे तो तर हिंदूच ठरतो. ज्या व्यक्ती किंवा जे धर्म सहिष्णुता मानत नाहीत, ते हिंदू नाहीत. अशा ज्या लोकांना किंवा धर्मांना, आपल्याच मायभूमीची इतर लेकरे शत्रू भासतात, वस्तुतः तेच शत्रुत्व नाहीसे करण्याची गरज आहे. सहिष्णुता म्हणजे हिंदुत्व, जेव्हा सर्वव्यापी होईल तेव्हाच ’विश्व स्वधर्म सूर्यास’ पाहू शकेल. 

त्यामुळे, हिंदू समाजाचे एकत्रिकरण हे संघाचे मुख्य उद्दिष्ट आहे. भारतीय म्हणजे हिंदू ही संघाची व्यापक भूमिका आहे. हिंदू समाज हा पुरातन काळापासूनच अनेक वर्ण, जाती, पंथ यांत विभागला गेला आहे. प्रत्येक जात स्वतःला इतरांपेक्षा वेगळी समजते. मात्र कोणत्याही प्रकारचा वर्णद्वेष तसेच जातिभेदाला थारा नसलेल्या आणि सर्वच जातीपंथांमध्ये एकोपा असलेला हिंदू समाज असणे, हे संघाला अपेक्षित आहे. हे साध्य करताना अनिष्ट प्रथांचे उच्चाटन करून, इष्ट हिंदू परंपरांचे संवर्धन व्हावे, असे संघाचे धोरण आहे. भारतीयत्व, राष्ट्रीयत्व, हिंदुत्व या गोष्टींचा सर्वसामान्यांमध्ये अभिमान जागृत करणे आणि भारत देशाला परम वैभवाकडे नेणे हे आपले कर्तव्य आहे, असे संघकार्यकर्ते समजतात. काळाच्या ओघात विभाजित झालेल्या हिंदुस्थानचे एकत्रीकरण होऊन परत अखंड भारताची निर्मिती व्हावी अशीही संघाची मनीषा आहे. ’पृथिव्यां समुद्रपर्यंताया एकराळिति’ म्हणजे समुद्रापर्यंतच्या सर्व भूभागावर सहिष्णू हिंदूंचे एकछत्री साम्राज्य स्थापन व्हावे अशी कामना तर आपण सारे ’मंत्रपुष्पांजली’च्या माध्यमातून रोजच करत असतो.

या राष्ट्राला पुन्हा परम वैभवाप्रत घेऊन जाण्यासाठी संघाच्या विविध क्षेत्रात काम करणार्‍या संघटना आहेत. वनवासी क्षेत्रासाठी वनवासी कल्याण आश्रम, विद्यार्थी हितासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कामगारांकरता भारतीय मजदूर संघ, महिलांकरता राष्ट्र सेविका समिती, राजकारणाकरता पूर्वीचा जनसंघ, आत्ताचा भारतीय जनता पक्ष इत्यादी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दैनंदिन शाखाच संघाचा पाया आहेत. शाखांमध्ये स्वयंसेवक दैनंदिन हजेरी लावतात. सरसंघचालक हे या सर्व शाखांचे अप्रत्यक्षपणे नियमन करतात. साप्ताहिक सांघिके, विद्यार्थ्यांसाठी सांघिके अशा भेटीही आठवड्यातून एकदा होतच असतात. संघाचे प्रथमवर्ष, द्वितीयवर्ष, तृतीयवर्ष शिक्षा वर्ग अनुक्रमे प्रत्येक प्रांतात, प्रत्येक क्षेत्रात आणि सर्व भारताकरता नागपूर येथे होत असतात. संघातर्फे अनेक निवासी शिबिरेही आयोजित केली जातात. सध्या संपूर्ण भारतात लाखो शाखा लागतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात दरसाल सहा उत्सव साजरे केले जातात. वर्षप्रतिपदा, हिंदू साम्राज्य दिन, गुरुपौर्णिमा, रक्षाबंधन, विजयादशमी आणि मकर संक्रमण. हे सर्व उत्सव हिंदू तिथींनुसार साजरे केले जातात. चंद्र आणि सूर्याच्या विशिष्ट अवस्थांशी ते जोडलेले आहेत. यातील हिंदू साम्राज्य दिन वगळता इतर सर्व उत्सव पारंपारिक हिंदू उत्सव आहेत. ’हिंदू साम्राज्य दिन’ या उत्सवाचा अंतर्भाव मात्र काही वेगळा विचार करून करण्यात आलेला आहे.

संघाची स्थापना इंग्रजांच्या राज्यातच १९२५ साली करण्यात आलेली होती. शेकडो वर्षांच्या परदास्यातून हिंदू विजिगिषेला मरगळ आलेली होती. दरम्यान हिंदूंना ताठ मानेने जगता येईल, हिंदू म्हणवून घेण्यात अभिमान वाटेल असे राज्य स्थापन होणे गरजेचे आहे, हे केवळ शिवाजी महाराजांनीच जाणले होते. ते साम्राज्य असावे अशी भावनाही त्यापाठी होती आणि ते सिद्ध करण्याकरता शिवाजी महाराजांनी केलेले प्रयासही अपार यशस्वी ठरलेले होते. केवळ समुद्रपर्यंतच्या साम्राज्याचीच नव्हे, तर त्यांनी समुद्रमार्गे जगावर राज्य करण्याची उमेदही बाळगली होती. त्याकरता सेनासरखेल कान्होजी आंग्रे यांच्या अधिपत्याखाली नौदलाची स्थापना केली होती. अनेक सागरी किल्ले म्हणजे जंजिरे, शिवाजी महाराजांनी आपल्या अल्पशा कारकीर्दीतच निर्माण केले होते.

संघाने ’हिंदू साम्राज्य दिन’ समारोह साजरा करायचे का ठरवले हे सांगतांना, २०१० सालच्या ’हिंदू साम्राज्य दिन’ [४] समारोहाच्या भाषणात माननीय सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी, ’शिवसंभव’ नाटकातील एक प्रसंग सांगितला आहे. शिवाजीच्या वेळी डोहाळे लागलेले असतांना जिजामाता सांगतात, “मला वाटते आहे की, मी वाघावर स्वार व्हावे. मला दोन नाही तर अठरा हात असावेत. एकेका हातात एकेक अशी मी अठरा शस्त्रे धारण करावीत. पृथ्वीतलावर जिथे जिथे राक्षस असतील तिथे तिथे मी त्यांचा निःपात करावा. छत्रचामरादिसहित सिंहासनावर बसून मी स्वनामाचा जयघोष करवावा.” सामान्यतः हे ऐकून किती आनंद झाला असता, की आता होणारे बालक अशा विजिगिषू वृत्तीचेच असणार. मात्र तेव्हा त्यांच्या मैत्रिणी म्हणाल्या, “तू हा काय विचार करते आहेस? तुला माहीत नाही का की, एका राजाने असे केले होते, तेव्हा त्याचे किती हाल झाले? आपण हिंदू आहोत. सिंहासनावर कसे बसायचे? हे तर भिकेचे डोहाळे आहेत!” म्हणजे हिंदूंनी हाती शस्त्र घेऊन पराक्रमाची इच्छा करणे, हे त्यावेळी भिकेचे लक्षण मानले जात होते. हिंदूंना या मनस्थितीतून बाहेर काढण्याकरता, राज्याभिषेकप्रसंगीचा अपार आत्मविश्वास पुन्हा प्राप्त करवून देण्याकरता, संघाने ’हिंदू साम्राज्य दिन’ समारोह साजरा करायचे ठरवले. त्या अवस्थेचे आणि शिवरायांच्या प्रयासाचे सुंदर वर्णन त्यांचे गुरू समर्थ रामदासस्वामींनी केलेले आहे. ते म्हणतातः

तीर्थक्षेत्रे मोडिली।ब्राम्हणस्थाने भ्रष्ट झाली।
सकळ पृथ्वी आंदोळली। धर्म गेला ॥

देव धर्म गोब्राम्हणकरावया संरक्षण ।
हृदयस्थ झाला नारायण । प्रेरणा केली ॥

उदंड पंडित पुराणिक । कवीश्वर याज्ञिक वैदिक
धूर्त तार्किक सभानायक । तुमच्या ठायी ॥

या भू मंडळाचे ठायी। धर्मरक्षी ऐसा नाही।
महाराष्ट्र धर्म राहिला काही। तुम्हा कारणे ॥

आणिकही धर्मकृत्ये चालती । आश्रित होउन कित्येक राहती । 
धन्य धन्य तुमची कीर्ती । विश्वी विस्तारली ॥

कित्येक दुष्ट संहारिले । कित्येकासी धाक सुटले ।
कित्येकासी आश्रय जाहले । शिवकल्याण राजा ॥ 

याप्रमाणे प्रजेस निर्भय करणारा, अभिषिक्त हिंदू सम्राट, अर्वाचीन भारतात दुसरा कुणीही नाही. त्यांना राज्याभिषेक झाला त्याच दिवशी त्यांनी राज्याभिषेक शकही सुरू केला. म्हणून त्यांना ज्या दिवशी राज्याभिषेक झाला, त्या दिवसास हिंदू साम्राज्य स्थापनेचा दिवस मानून तो साजरा करावा असे संघाने ठरवले. त्यानिमित्ताने हिंदूंच्या संस्कृतीची, सहिष्णुतेची, ’वसुधैव कुटुंबकम्‌’ वृत्तीची आणि विजिगिषू परंपरेची चर्चा होते आणि ती करणार्‍यांवर हिंदुत्वाचे उत्तम संस्कारही होत असतात. सुसंस्कृत, सुसंघटित, शिस्तबद्ध, ऊर्जस्वल, वर्चस्वल, प्रगतीपथावर अग्रेसर असलेला पूर्ण विकसित हिंदू समाज निर्माण व्हावा हेच तर संघाचे ईप्सित आहे.

१९२७-च्या नागपुरातील मुसलमानांच्या दंग्यानंतर डॉक्टर हेडगेवार म्हणाले होते की, “आपापसातले सारे कृत्रिम व वरवरचे मतभेद पुसून टाकून, सारा हिंदू समाज एकत्वाच्या व प्रेमाच्या भावनेने, ’हिंदू जातीची गंगा, बिंदू आम्ही तिचे सांगा’ अशा भावनेने उभा राहिला, तर जगातील कोणतीच शक्ती हिंदूंकडे वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही!” [५]

हिंदूंमधे प्रबळ संघटना असावी, हिंदूंतली विघटना अवघी टळावी ।
हिंदूत्ववर्धन घडो म्हणुनी तदर्थ, तू संघ संघ जप मंत्र निजांतरात ॥ - वसंततिलका

संदर्भः

[१] भगवा ध्वज (गुरुपौर्णिमा) https://vskbihar.com/rss-guru-purnima/

[२] संघ प्रार्थनेचा मराठी अनुवाद  https://anuvad-ranjan.blogspot.com/2019/10/blog-post.html

[३] शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची शिवचरित कथनमाला, इंद्रायणी साहित्य, २ ऑक्टोंबर १९९७, रु.१६०/, एकूण पृष्ठे-४६८ पैकी पृ.४६०.

[४] राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संकेतस्थळावरील २०१० सालचे मोहन भागवत यांचे व्याख्यान https://www.rss.org/hindi/encyc/2017/6/7/hindu-samrajya-din-utsav-mohan-bhagwat.html (या ठिकाणी, नाटकाचे लेखक राम गणेश गडकरी आहेत असे म्हटलेले आहे. वस्तुतः हे नाटक वा.वा.खरे यांनी लिहिलेले आहे.)

[५] डॉ. हेडगेवार, ना.ह. (नाना) पालकर, भारतीय विचार साधना, पुणे, आवृत्ती-५, ऑक्टों.-२०००, रु.१२०/-, एकूण पृष्ठे-४४६ पैकी पृष्ठ क्र.१६६.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: