कूर्मजयंती
ज्या दिवशी भगवान विष्णूंनी कासवाचा (कूर्म) अवतार घेतला त्या दिवसाची आठवण करून देणारा हा दिवस आहे. कूर्म वा 'कच्छप अवतार' हा श्रीविष्णूंच्या दशावतारांपैकी दुसरा अवतार मानला जातो. देव आणि दानवांनी अमृतप्राप्तीसाठी क्षीरसागरात मंथन केले होते. मंदार पर्वताची रवी आणि वासुकी नागाची दोरी केली होती. आपापसातले मतभेद विसरून देव-दैत्यांनी मंदार पर्वत जोर लावून उखडला आणि समुद्रात उभा करायचा प्रयत्न केला. परंतु पर्वत पाण्यात बुडायला लागला. शेवटी भगवान विष्णूंनी कासवाचे रूप, म्हणजे कूर्मावतार धारण केला आणि समुद्रात जाऊन मंदार पर्वताला खालून आधार दिला. कूर्माच्या पाठीवर मंदार पर्वताची रवी फिरू लागली आणि समुद्रमंथन शक्य झाले. ही घटना ज्या दिवशी घडली त्या दिवशी म्हणजे वैशाख पौर्णिमेला कूर्म जयंती साजरी होते.
बुद्ध पौर्णिमा
भारतातील बुद्धजयंतीचा इतिहास
डॉ. बाबासाहेब आंबेडकर (जन्मः१४ एप्रिल १८९१ मृत्यूः६ डिसेंबर १९५६) यांच्या अध्यक्षतेखाली २ मे १९५० रोजी भारतात पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती, दिल्ली येथे साजरी झाली. म्हणून ते भारतातील सार्वजनिक बुद्धजयंती महोत्सवाचे प्रणेते ठरतात. आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळे २७ मे १९५३ रोजी केंद्र सरकारने बुद्धजयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली.
बुद्धजयंती किंवा बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मीयांचा सर्वात महत्त्वाचा उत्सव आहे. हा सण जगभरात विशेषतः भारतात वैशाख पोर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. आपल्या मानवतावादी आणि विज्ञानवादी धम्म सिद्धांतांमुळे तथागत बुद्धांना जगातील महापुरुष आणि गुरू मानले जाते. बौद्ध धर्मीयांची मोठ्या प्रमाणावर संख्या असणाऱ्या चीन, जपान, व्हिएतनाम, थायलंड, भारत, म्यानमार, श्रीलंका, सिंगापूर, अमेरिका, कंबोडिया, मलेशिया, नेपाळ, इंडोनेशिया या देशांसह, सुमारे १८० देशांतील बौद्ध लोक हा सण उत्साहात साजरा करतात. यातील अनेक देशात बुद्ध जयंतीची सार्वजनिक सुट्टी असते. भारतात देखील बुद्ध पौर्णिमेनिमित्त सार्वजनिक सुट्टी असते.
चार आर्यसत्ये
प्रथमावस्थेतील बौद्ध धर्म हा अगदी
साधा, समजण्यास सोपा, नैतिक तत्त्वांवर भिस्त ठेवणारा; मानवता, करुणा आणि समानता यांचा पुरस्कार करणारा असा होता. या
काळात बुद्ध हा असामान्य गुणवत्ता असलेला,
पण मानवदेह धारण करणाराच मानला जात होता. या जगात अबाधित
सत्ये कोणती आहेत आणि जगाचे रहाटगाडगे कसे चालते,
यासबंधीचे ज्ञान त्यांना बोधिवृक्षाखाली प्राप्त झाले.
त्यांना प्रथम चार आर्य सत्यांचा साक्षात्कार झाला. त्याआधारे त्यांनी जगास,
दुःखनिवारणाचा जो आचारधर्म सांगितला, त्यालाच ’बौद्ध धर्म’ असे म्हणतात. ती चार
आर्यसत्ये पुढीलप्रमाणे आहेत.
१. दुःख सर्वत्र पसरलेले आहे.
२. हाव हे सर्व दुःखांचे मूळ आहे.
३. हाव नाहीशी केली तर दुःखही नाहीसे होऊ शकते.
४. हाव नाहीशी करण्याचा मार्गही असलाच पाहिजे.
“बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं
गच्छामि, संघं शरणं गच्छामि. हाच सनातन धर्म आहे.” अशा प्रकारची प्रार्थना बौद्ध
धर्मात केली जाते. सामान्यतः ’बुद्धा’चे म्हणजे विद्वानाचे म्हणणे मानावे. बुद्ध कदाचित
भिकार्यास भीक देऊ नका असे म्हणेल, कारण भीक दिल्यास माणसे आळशी होतात. मात्र
’धर्म’ करुणेचा मार्ग सांगेल. त्यास दया दाखवावी म्हणेल. अशा प्रसंगी ’धर्मा’चे
ऐकावे. मात्र करुणेच्या मार्गाने जात असता समूहच आळशी झाला, तर चालणार नाही.
म्हणून संघाचा त्यास विरोधच असेल. अशा प्रसंगी ’संघा’चे ऐकावे. यात जे सर्व
प्राणीमात्रांच्या हितकारक असेल तेच करावे. अनुक्रमे ’बुद्ध’, ’धर्म’ आणि ’संघ’
सांगेल तसेच वागावे असे बौद्ध धर्मात सांगितलेले आहे. त्यामुळे ’हाव’ नियंत्रणात
राहून मानवी जीवनातील दुःख नाहीसे होऊ शकेल.
बुद्ध हसला
डॉ. होमी सेठना
(जन्मः २४ ऑगस्ट १९२३,
मृत्यूः५ सप्टेंबर २०१०)
अण्वस्त्रसुसज्जता
डॉ. राजगोपाल चिदंबरम (जन्मः १२ नोव्हें.१९३६, चेन्नई)
१९७४ साली पोखरण येथे चाचणी करण्यात आलेल्या अणुविस्फोटक साधनाकरता अंतर्स्फोटाची पद्धत डॉ. राजगोपाल चिदंबरम यांनीच विकसित केली होती. याकरता त्यांनी, संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेसोबतच्या घट्ट परस्पर समन्वयातून, भाभा अणुसंशोधन केंद्रात धक्कालहरींचे (शॉकवेव्हजचे) संशोधन सुरू केले. १९९८-च्या अणुचाचण्यांकरता त्यांनी अत्यंत सुटसुटीत अंतर्स्फोटक प्रणाली उपयोगात आणली, जिचे रूपांतरण पुढे अण्वस्त्रांत करता आले.
११ मे १९९८ रोजी, बुद्ध पौर्णिमेलाच भारताने पुन्हा एकदा चाचणी अणुस्फोट केले. तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, अणुऊर्जाआयोगाचे अध्यक्ष डॉ. राजगोपाल चिदंबरम आणि भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक डॉ. अनिल काकोडकर यांच्या नेतृत्वाखाली हे स्फोट करण्यात आले. विलक्षण गोपनीयता पाळून हे स्फोट घडवले गेले. या स्फोटांनंतर भारतात काहीही करण्याचे सामर्थ्य आहे, असा विश्वास भारतीय जनमानसात निर्माण झाला.
अणुस्फोटांचे जादुगारः डॉ. राजगोपाल चिदंबरम
जादूगार जसे जना भुलवतो शोधून युक्ती
नवी
तैसे दंग चिदंबरं करवुनी योजीति सार्या
कृती ।
झाले स्फोट कळे, नियोजन कधी झाले कुणा ना कळे
झाली पूर्व तयारिही कशि, कुणी काही न संवेदले ॥ १ ॥
धक्का जो बसला जगास सगळे गेले
विरोधातही
रोखील्या रसदा युरेनियमच्या तंत्रे न
देती नवी ।
राष्ट्रा लागत ते इथेच घडुनी संशोध
नेला पुढे
केले सज्ज स्वराष्ट्र ठोस दिधला
विश्वास चोहीकडे ॥ २ ॥
आम्हीही अणु अस्त्र धारण करू, होऊन विश्वा गुरू
आम्हीही अणुला विभक्त करुनी, ऊर्जा अणूची वरू ।
आम्ही शांति उगा न सोडु तरीही, धाका न सोसू जनी
हा संदेश चिदंबरं विखुरती, स्फोटा करूनी रणी ॥ ३ ॥
अशा प्रकारे आधुनिक भारतास विश्वगुरू होण्यास उपकारक ठरणार्या वरील घटना वैशाख पौर्णिमेच्या दिवशीच घडून आल्याने, आपल्याकरता या दिवसाचे मोल अनमोल आहे. त्यामुळे बुद्धपौर्णिमा साजरी करत असतांना आपण सगळ्यांनीच, आपल्या सनातन सामर्थ्यांना उजागर करणार्या या घटनांची स्मृती जागवून, भविष्यात त्यांना आणखीही सन्मान देणार्या घटना घडवून आणण्यास प्रवृत्त व्हावे हीच सदिच्छा. येती वैशाख पौर्णिमा सोमवार दिनांक १६ मे २०२२ रोजी आहे. त्या दिवसाकरता आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
पूर्वप्रसिद्धीः ठाणे येथील
विद्याप्रसारक मंडळाच्या ’दिशा’ या मासिकाचा मे-२०२२ चा अंक.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा