२०२२-०५-०३

परशुरामा आठवावे

आज अक्षय्यतृतिया! परशुराम जयंती!
त्यानिमित्ताने ही परशुरामांचे गुणगान करणारी कविता.



मनुज घडत जी, ती, संस्कृती ओळखाया ।
खरच परशुरामा, आठवावे जगी या ॥ धृ ॥

उपजत जमदग्नी-रेणुका पुत्र होता
शिकत पठत विद्या, कर्तबे सिद्ध झाला ।
गणपति परशू दे, तोषुनी ज्या तपाला
खरच परशुरामा, आठवावे तपी त्या ॥ १ ॥ 

शिवसमिपहि गेला, ध्यान, व्यासंग केला
वरद शिवहि त्याला, देत पाशूपतास्त्रा ।
प्रखर तप जयाचे, शक्ति देई जया त्या
खरच परशुरामा, आठवावे तपी त्या ॥ २ ॥ 

सुरभि हरुन नेई, कार्तवीर्याचि सेना
न नृपति कुणि ऐसा, गांजतो जो प्रजेला ।
मद हरण तयाचे, शक्तिने जो करी त्या
खरच परशुरामा, आठवावे जगी या ॥ ३ ॥ 

वधुन खल नृपांना, मुक्ति दे जो प्रजेला
न धरत परि मोहा, भूमि दे तो गुरूला ।
वसत हरुन भूमी, सागरा हारवी त्या
खरच परशुरामा, आठवावे जगी या ॥ ४ ॥ 

अपर जलज भूमी, हेरली डोंगरीची
सतत वसति केली, कोकणी त्या महेंद्री ।
शिकवत गुण राहे, भूमि समृद्ध कर्ता
खरच परशुरामा, आठवावे जगी त्या ॥ ५ ॥ 

नरेंद्र गोळे २०२०१२१३

मालिनी (अक्षरे-१५, यती-८,७)
न न म य य युतेयं मालिनी भोगिलोकैः   
नमन नमन माना, वा यमाचा यमाचा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: