२०२२-०४-१८

’वेदांचे यथार्थ स्वरूप’ पुस्तक प्रकाशित झाले!

’वेदांचे यथार्थ स्वरूप’ पुस्तक प्रकाशित झाले!

मूळ हिंदी ग्रंथकारः पंडित धर्मदेव विद्यामार्तंड
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे

वागावे जगती कसे कथतसे तो 'धर्म' आहे जगी
सांगे 'धर्म' खरा 'श्रुती'मधुन जो तो 'वेद' जाणा जगी ।
आले ज्ञान खरे 'श्रुतीं'त कधि ते कोणीहि ना जाणती
आले ज्ञान 'श्रुतीं'तुनी 'स्मृति'त ते 'पाठांतरे' त्यापुढे ॥ 

'वेदां'चे निजरूप काय असते? कैसा असे 'धर्म' तो?
आदी अंत अनूभवास नसतो ही संपदा आगमी ।
सत्याचे वदते स्वरूप, निरुपे विज्ञान सारे खरे
घ्या हो घ्या समजून 'वेद' सगळे शास्त्रार्थ ते नेमके ॥ - नरेंद्र गोळे २०२११०२५

अनादिनिधना नित्या वागुत्सृष्टा स्वयम्भुवा।
आदौ वेदमयी दिव्या यतः सर्वाः प्रवृत्तयः॥ - महाभारत शांतिपर्व अध्याय-२३२.२४. 

आदीअंतविना नित्या, दिली बोली स्वयंभुवे।
आद्य वेदमयी भाषा, जिने सारेच प्रेरित॥ - अनुष्टुप्‌ 

पक्षांना निरनिराळे वैशिष्ट्यपूर्ण आवाज काढण्याचे कोण शिकवतो? मानवांना जन्मतः रडायला कोण शिकवतो? हे ध्वनी आपोआपच उमटत असतात. त्याची प्रेरणा स्वयंभूवच असते. त्याचप्रमाणे सर्वात आधी प्रकटलेली स्वयंभूव मानवी भाषा संस्कृत आहे. ही संस्कृत भाषा, आपल्या जाणिवा इतिहासात पोहोचतात त्याहीपूर्वीपासून संस्कृतच आहे. तेव्हापासूनच तिच्यात वेद विद्यमान आहेत. ती वेदमयी आहे. तिच्याद्वारेच व्यक्त होण्याकरता या विश्वातील सारेच लोक प्रेरित आहेत. मानवी कंठातून उमटू शकणार्‍या एकूण सर्वच ध्वनींना वर्ण किंवा मूळ अक्षरे म्हटले जाते. वर्ण हे भाषेचे सर्वात लहान एकक असतात. संस्कृत मुळाक्षरे ६४ आहेत [१]. परंपरेनुसार असे मानले जाते की, सनक आदी सिद्धांच्या ईप्सितांच्या पूर्ततेकरता नटराज महेश्वराने आपल्या ’नृत्ता [२]’ च्या समाप्तीप्रसंगी डमरूचे १४ नाद केले. त्यातून १४ ध्वनीसूत्रे [३] पाणिनींना प्राप्त झाली. त्यांच्या विघटनाद्वारे पाणिनींनी वर्णमाला निर्माण केली. त्यातील बावीस स्वर र्‍हस्व, दीर्घ आणि प्लुत कालावधीत उच्चारले जातात [४]. ती सारीच कहाणी ’संस्कृत मुळाक्षरे ६४ आहेत [५]’ या लेखात शब्दबद्ध केलेली आहे.

मूळ संस्कृत श्लोकः
नृत्तावसाने नटराजराजो ननाद ढक्‍कां नवपञ्चवारम् ।
उद्धर्तुकाम: सनकादिसिद्धानेतद् विमर्शे शिवसूत्रजालम् ॥ - उपजाती 

नृत्ताअखेरी नटराजियाने चौदा निनादे डमरू ध्वनीने ।
सिद्धांस ईप्सीत मिळो म्हणोनी निर्माण केले शिवसूत्रजाळे ॥ - इंद्रवज्रा 

वेदविद्याही संस्कृतच्या उगमापासूनच ज्ञात आहे. उगम कधी झाला तो काळ, मानवास ज्ञात इतिहासाच्या पलीकडली गोष्ट आहे. मात्र वेदांत काय आहे? ही गोष्ट जर आज प्रत्येकास आपापल्या मायबोलींतून कळली तर आपल्या सगळ्यांच्याच जीवनात आमूलाग्र क्रांती घडून येईल यात शंकाच नाही. कारण, आपल्या परंपरेत वेदविद्येस अपौरुषेय मानले जाते, अनादिनिधना मानले जाते, अनैतिहासिक मानले जाते, सर्व प्राणिमात्रांना कोणत्याही भेदभावांविना मुक्तस्वरुपाने शिकण्यास योग्य समजले जाते. सर्व प्राणिमात्रांना परस्परांच्या सुखमय सहजीवनाकरता जसे वर्तन योग्य आहे, त्यास ’ऋत’ मानले जाते. ’ऋतं वच्मि’, ’सत्यं वच्मि’ असे संकल्प तर आपण रोजच करत असतो. हे सर्व वेदविद्येच्या आपल्या संस्कृतीत रुजलेले असण्याचेच पर्यवसान आहे.मात्र जी विद्या नाही, ती अविद्या असते. मानवी स्वार्थी बुद्धीला साजेसे वागायला ती शिकवते. हिंसेला उद्युक्त करते. नशापाणी करण्यास उद्युक्त करते. निंदाव्यंजनास उद्युक्त करते. त्यामुळे वेदमय सत्यधर्मात जे कधीच सांगितलेले नव्हते, ते तसे सांगितलेले असल्याचा अपप्रचार आपल्याच मध्यकालीन आचार्यांनी केला. पाश्चात्य विद्वानांचे हाती ते आयतेच कोलीत मिळाले. या सार्‍याचे पर्यवसान होऊन ’वेदिक एज’ नावाचे पुस्तक [६], श्री. कन्हैय्यालाल मुन्शी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय विद्या भवनने १९५१ साली प्रस्तुत केले. यात वेदांची ओळख करून दिलेली असल्याने, अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांतही ते नियुक्त झाले. मात्र उपरोल्लेखित अविद्येचा शिरकाव त्यात झालेला असल्याने, अविद्येचाच अनिर्बंध प्रचार व प्रसार सुरू झाला. त्यामुळे आर्य समाजी विद्वानांना त्याचा प्रतिवाद करणे गरजेचे वाटले. पंडित धर्मदेव विद्यामार्तंड यांनी हे आपल्या उत्तर आयुष्यातील एक प्रमुख कर्तव्य समजून त्या दृष्टीने ’वेदिक एज’ पुस्तकाचाच नव्हे, तर ’वेदांच्या यथार्थ स्वरूपा’चाही सर्वंकष अभ्यास केला. १९५७ साली ’वेदों का यथार्थ स्वरूप’ या शीर्षकाने आर्य प्रतिनिधिसभा, पंजाब यांनी हा सर्व अभ्यास प्रकाशित केला.

सत्यधर्म प्रतिपालक श्री. रणजित चांदवले, पुणे यांना असे वाटले की, या ग्रंथाचा मराठी अनुवाद सिद्ध केला तर खूप मोलाचे ठरेल. करोनाकाळातच माझे चर्यापुस्तकभिंतीवरले लेख वाचून त्यांना असेही वाटले की, कदाचित मी असा मराठी अनुवाद करू शकेन. त्यांनी मला विचारले? मला हा विषयच माझ्या आवडीचा वाटला. मी होकार दिला. खरे तर त्यांनी माझ्यावर हा फारच मोठा विश्वास दाखवलेला होता. मीही माझा सर्व वेळ देऊन, उण्यापुर्‍या पाच महिन्यांच्या प्रयत्नांनी, हा अनुवाद सिद्धही केला.

मात्र मूळ वैदिक ऋचा संस्कृतात. त्यावर भाष्य करणारे १९५१ साली प्रकाशित ’वेदिक एज’ हे पुस्तक इंग्रजीत. त्याचा प्रतिवाद करणारे १९५७ साली प्रकाशित झालेले ’वेदों का यथार्थ स्वरूप’ हिंदीत. आता त्याचा मी करत असलेला अनुवाद माय मराठीत. असे असल्याने या सर्व भाषांतील उद्धृते पदोपदी आलेली आहेत. अनुवाद करतांना सुमारे सत्तर वर्षांपूर्वीच्या हिंदी, इंग्रजी भाषा समजून घेतांना तारांबळ उडालेली. त्याशिवाय कन्नड, तेलुगू, तामिळ आणि मल्याळम भाषांतील देवनागरीत लिहिलेली उद्धृतेही या पुस्तकात आहेतच. त्यामुळे त्या त्या प्रत्येक भाषेतील उद्धृतांची शुद्धता सांभाळणे ही तारेवरची कसरतच होती. मग संगणकीय प्रकाशनार्थ (डी.टी.पी.) मूळ संहितेच्या प्रती काढणे, ईप्सित चौकटींत त्या चिकटवणे, या प्रकारात कित्येक अक्षरांची धुळधाण उडाल्याने, झालेल्या चुका निस्तरण्याचे महत्कार्य  मोठ्या कष्टाने पार पडले.

तर महत्त्वाचे हे आहे की, एवंगुणविशिष्ट वेदांचे यथार्थ स्वरूप हे मराठी पुस्तक सर्व सोपस्कारांनी पूर्ण होऊन प्रकाशनास सिद्ध झाले. ’पंडित नरेंद्र वैदिक अनुसंधान केंद्र”, गुरुकुल आश्रम, परळी यांचेतर्फे ते प्रकाशित होत आहे. त्यांचा, ब्रह्ममुनी वानप्रस्थी गौरवसोहळा हा ३ दिवसीय कार्यक्रम १५ ते १७ एप्रिल २०२२ दरम्यान परळी येथे आयोजित करण्यात आलेला होता. त्याचा एक भाग म्हणून, १७-०४-२०२२ रोजी परळी येथे ’वेदांचे यथार्थ स्वरूप’ ग्रंथ प्रकाशित झाला. या प्रसंगी भाजपा खासदार तसेच गुरुकुल कांगडी विद्यापीठाचे कुलाधिपती सत्यपाल सिंह, काँग्रेसचे माजी खासदार तसेच विख्यात शिक्षणतज्ञ डॅा. जनार्दन वाघमारे, बीडच्या भाजपा खासदार प्रीतमताई मुंडे हे या कार्यक्रमास उपस्थित होते.

एकूण ५६९ पृष्ठांच्या या पुस्तकाची किंमत रु.५००/- फक्त आहे. पुस्तकाच्या विक्री व वितरणाची स्वतंत्र व्यवस्था होत आहे. तरीही उगाचच वाट कशाला पाहायची? असे वाटणार्‍या, पुस्तक हवे असणार्‍या आणि खरेदू इच्छिणार्‍या वाचकांनी narendra.v.gole@gmail.com या माझ्या ई-मेलवर; आपले नाव, पत्ता, संपर्क क्रमांक आणि ई-मेल इत्यादी तपशील कळवावे ही विनंती. मी त्यांना हे पुस्तक नक्कीच मिळवून देऊ शकेन.

वर्तमान काळातही आपल्या प्राचीन वेदविद्येचे रहस्य काय आहे, ते किती मोलाचे आहे हे समजून घेण्यात हा ग्रंथ खूप उपयुक्त ठरणार आहे. आपल्या चौदा विद्या, चौसष्ट कला यांचे इतिहास जर आपल्याला जाणून घ्यायचे असतील तर, वेदवाणी संस्कृतच आपली साहाय्यक ठरणार आहे. तिची मौलिकता, भाषावैभव आणि अनुभवसंपन्नता जगात कोणत्याही मानवी भाषेत प्राप्य नाही. त्या आपल्या संस्कृतमधील अनुभवांनी संपन्न होण्याचे संकल्प करावेत याकरताही हा ग्रंथ खूप उपयुक्त ठरणार आहे.

संदर्भः

[१]  Sanskrit Varnamala, Varnmala, संस्कृत वर्णमाला, swar, vyanjan, alphabets of sanskrit, sanskrit swar https://www.youtube.com/watch?v=_wqcgri_NXs

[२]  दशरूपकानुसार नृत्त आणि नृत्य यांत फरक असतो. नृत्त ताल आणि लय यांवर आश्रित असते, तर नृत्य भावावरच आश्रित असते. National Sanskrit University, Tirupati https://www.youtube.com/watch?v=PlLfQd9JDAc

[३]  Maheshwar Sutras Achyut Karve Phonology – YouTube
https://www.youtube.com/watch?v=yGy7f4WhKjU

[४]  सरासरीने पुरूषाची हृदयस्पंदने मिनिटाला ७२ तर स्त्रियांची हृदयस्पंदने मिनिटाला ८४ या दरांनी होत असतात. त्यानुसार पाहिले तर एका हृदयस्पंदनास (अंगुष्टमुळाशी मोजलेल्या नाडीच्या ठोक्यास) पुरुषास ६०/७२=०.८३ सेकंद तर स्त्रियांना ६०/८४= ०.७१ सेकंद इतका वेळ लागत असतो. त्यामुळे पुरूष आणि स्त्री अनुक्रमे ०.८३ सेकंद आणि ०.७१ सेकंदांत एक सुटा वर्णोच्चार करू शकतात. यालाच र्‍हस्व उच्चारण कालावधी म्हणतात. याच्या दुप्पट कालावधी दीर्घ वर्णोच्चारणास लागत असतो, तर प्लुत वर्णोच्चारणास याच्या तिप्पट कालावधी लागत असतो.

[५]   संस्कृत मुळाक्षरे ६४ आहेत https://nvgole.blogspot.com/2021/05/blog-post_24.html

[६]   वेदिक एज http://ignca.gov.in/Asi_data/73904.pdf


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: