नृत्तावसाने नटराजराजो ननाद ढक्कां नवपञ्चवारम् ।
उद्धर्तुकाम: सनकादिसिद्धानेतद् विमर्शे शिवसूत्रजालम् ॥ - उपजाती
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२१०४१९
नृत्ताअखेरी नटराजियाने चौदा निनादे डमरू
ध्वनीने ।
सिद्धांस ईप्सीत मिळो म्हणोनी निर्माण
केले शिवसूत्रजाळे ॥ - इंद्रवज्रा
भाषेच्या सर्वात लहान एककास वर्ण म्हणतात. पाणिनींनी १४ सूत्रांत वर्णमाला प्रस्तुत केलेली आहे. परंपरेनुसार असे मानले जाते की, सनक आदी सिद्धांच्या ईप्सितांच्या पूर्ततेकरता नटराज महेश्वराने आपल्या ’नृत्ता [२]’च्या समाप्तीप्रसंगी डमरूचे १४ नाद केले. त्यातून १४ ध्वनीसूत्रे [३] पाणिनींना प्राप्त झाली. ही सूत्रे पुढीलप्रमाणे आहेत. त्यांच्या विघटनाद्वारे पाणिनींनी वर्णमाला निर्माण केली.
१. अइउण् (अ, इ, उ)
२. ऋलृक् (ऋ, लृ)
३.
एओङ् (ए, ओ)
४.
ऐऔच् (ऐ, औ)
५.
हयवरट् (ह्, य्,
व्, र्)
६.
लण् (ल्)
७.
ञमङणनम् (ञ्, म्, ङ्, ण्, न्)
८.
झभञ् (झ्, भ्)
९.
घढधष् (घ्, ढ्, ध्)
१०.
जबगडदश् (ज्, ब्, ग्, ड्, द्)
११.
खफछठथचटतव् (ख्, फ्, छ्, ठ्, थ्, च्, ट्, त्)
१२.
कपय् (क्, प्)
१३.
शषसर् (श्, ष्, स्)
१४.
हल् (ह्)
प्रत्येक सूत्राच्या शेवटी हल् वर्णाचा प्रयोग प्रत्याहार तयार करण्यासाठीच केला गेलेला आहे. जसे- अइउण् मध्ये 'ण्' हल् वर्ण आहे. यांना प्रत्याहारांतर्गतच्या वर्णांत सामिल केले जात नाही.
प्रत्याहार म्हणजे अक्षरसंच. माहेश्वर सूत्रांच्या आधारे निरनिराळे प्रत्याहार निर्माण केले जाऊ शकतात. प्रत्याहार दोन वर्णांचा बनतो. जसे— अच्, इक्, यण्, अल्, हल् इत्यादी. या प्रत्याहारांत शिवसूत्रांतील आदी वर्णापासून तर अन्तिम वर्णापर्यंतच्या मधे येणार्या सर्वच वर्णांची गणना केली जाते. प्रत्याहारांतर्गत आदी वर्ण गणला जातो. मात्र अन्तिम वर्ण सोडून दिला जात असतो. उदा. अच् या प्रत्याहारात, पहिल्या शिवसूत्रातील पहिले अक्षर असलेल्या ’अ’ पासून सुरुवात करून तर चौथ्या शिवसूत्रातील अखेरचे अक्षर असलेल्या ’च्’ अक्षरापर्यंतची सर्व अक्षरे समाविष्ट आहेत. अपवाद फक्त हल् अन्त्य अक्षरांचा. अर्थात
अच् = अ, इ, उ, ऋ, लृ, ए, ऐ, ओ, औ.
हे सगळे म्हणजे ९ स्वर शिवसूत्रांत समाविष्ट आहेत. तसेच
हल् = ह्, य्, व्, र्, ल्, ञ्, म्, ङ्, ण्, न्, झ्, भ्, घ्, ढ्, ध्, ज्, ब्, ग्, ड्, द्, ख्, फ्, छ्, ठ्, थ्, च्, ट्, त्, क्, प्, श्, ष्, स्.
अशी एकूण ३३ व्यंजने शिवसूत्रांत समाविष्ट आहेत.
अच् आणि हल् या दोन प्रत्याहारांत मिळून ४२ वर्ण प्रकट होतात. पण संस्कृत भाषेत तर एकूण ६४ मुळाक्षरे आहेत. मग यांचे आधारे पाणिनींनी ६४ अक्षरांची वर्णमाला कशी निर्माण केली?
प्रत्येक मानवी स्वरयंत्रांतून, स्वतंत्रपणे आणि निस्संदिग्धपणे उच्चारता येतील असे ते वर्ण आहेत. या मूळ उच्चारणांच्या संयोगाने जगातील कोणताही शब्दोच्चार करणे शक्य आहे. प्रत्येक मनुष्याने ते नीट जाणून घ्यावेत. उच्चारून पाहावेत. आपल्या स्वरयंत्राच्या संपूर्ण क्षमता उपयोगात आणणे शिकून घ्यावे.
संवादसाधनार्थ, विचारपूर्वक, ’नाद’ करावा अशा निर्णयाप्रत पोहोचल्यानंतर, बेंबीच्या देठापासून फुफ्फुसांतून श्वसनमार्गावाटे वरच्या बाजूस हेतुपूर्वक प्रेरित प्राणवायूला, भवतालच्या कोणकोणत्या स्थानांवर कोणकोणत्या अंगाने स्पर्श करवून ’नाद’ करता येतो, याचा आपल्या सनातन संस्कृतीने अत्यंत सखोल अभ्यास करून लाखो वर्षांच्या तपस्येद्वारा या ६४ अक्षरांच्या वर्णव्यवस्थेचा शोध घेतलेला आहे. या वर्णांच्या संयोगाने अपार शब्दनिर्मितीच्या संभावना आपल्याला खुल्या होतात. त्या सर्व शब्दसंग्रहाच्या सुनियोजित उपयोगाने आपण जगातल्या कोणत्याही मानवी अनुभूतींची परस्परांत देवाण-घेवाण करू शकतो. संवाद साधू शकतो. ’विश्व स्वधर्म सूर्ये पाहो’ या संत ज्ञानेश्वरांच्या स्वप्नास साकार करू शकतो. आपल्या पूर्वजांच्या या अनमोल विचारधनाचा लाभ आपण जाणीवपूर्वक घेतल्यास आपण आनंदी आणि प्रसन्न राहू शकतो!
कोणती आहेत ही मुळाक्षरे?
बेंबीच्या देठापासून फुफ्फुसातून श्वसनमार्गावाटे वरच्या बाजूस हेतुपूर्वक प्रेरित प्राणवायूला (महाप्राणाला) जराही अडथळा न करता मुखाद्वारे बाहेर पार करतांना निर्माण होणारे ’नाद’ हे चार मूळ ’स्वर’ असतात. अनुक्रमे कंठ, मूर्धा, तालू आणि दंतमुळाशी जिभेद्वारे महाप्राण वळविल्याने ते निर्माण होतात. अ, इ, उ, ऋ ही अक्षरचिन्हे त्या चार स्वरांना व्यक्त करतात.
स्वरांचे उच्चारण किती कालावधीपर्यंत करत राहिल्यास निस्संदिग्ध सुटा वर्ण निर्माण होतो याचा अभ्यास करून असा निष्कर्ष नोंदलेला आहे की, हाताच्या अंगठ्याच्या मुळाशी (अंगुष्टमुळाशी) नाडीचा एक ठोका मोजण्यास लागणार्या वेळाइतका [४] उच्चार लांबवत नेल्यास निस्संदिग्ध सुटा वर्ण निर्माण होतो. या कालावधीस ’र्हस्व’ उच्चारण कालावधी म्हणतात. अंगुष्टमुळाशी नाडीचे दोन ठोके मोजण्यास लागणार्या वेळाइतका उच्चार लांबवत नेल्यास जो निस्संदिग्ध सुटा वर्ण निर्माण होतो त्याला ’दीर्घ’ उच्चारण कालावधी म्हणतात. अंगुष्टमुळाशी नाडीचे तीन ठोके मोजण्यास लागणार्या वेळाइतका उच्चार लांबवत नेल्यास जो निस्संदिग्ध सुटा वर्ण निर्माण होतो त्याला ’प्लुत’ उच्चारण कालावधी म्हणतात.
त्यामुळे वरील चार मुळाक्षरांचे प्रत्येकी तीन प्रकार संभवतात. र्हस्व, दीर्घ आणि प्लुत. अ, आ आणि अ३ अशी चिन्हे अ या मूळ वर्णाच्या र्हस्व, दीर्घ आणि प्लुत उच्चारणांना दिलेली आहेत. इ, ई आणि इ३ अशी चिन्हे इ या मूळ वर्णाच्या र्हस्व, दीर्घ आणि प्लुत उच्चारणांना दिलेली आहेत. उ, ऊ आणि उ३ अशी चिन्हे उ या मूळ वर्णाच्या र्हस्व, दीर्घ आणि प्लुत उच्चारणांना दिलेली आहेत. ऋ, ॠ आणि ऋ३ अशी चिन्हे ऋ या मूळ वर्णाच्या र्हस्व, दीर्घ आणि प्लुत उच्चारणांना दिलेली आहेत. हे सर्व मिळून ४x३= १२ स्वरोच्चार संभवतात.
या चार स्वरांपासून अन्य चार संयुक्त स्वरही निर्माण होतात, जे निस्संदिग्धही आहेत आणि सुटेही. त्यांची अक्षरचिन्हे पुढीलप्रमाणे दिली गेलेली आहेत.
अ, आ + इ, ई = ए
अ, आ + ए, ऐ = ऐ
अ, आ + उ, ऊ = ओ
अ, आ + ओ, औ = औ
हे चार संयुक्त स्वरही दीर्घ आणि प्लुत होऊ शकतात हे लक्षात घेता ४x२= ८ स्वरोच्चार संभवतात. यांची प्लुत उच्चारणे अनुक्रमे ए३, ऐ३, ओ३ आणि औ३ या अक्षरचिन्हांनी व्यक्त केली जातात.
लृ अक्षरचिन्हाने व्यक्तवला जाणारा, महाप्राणास केवळ जिभेने वळवून सिद्ध होणारा आणखीही एक निस्संदिग्ध सुटा वर्ण आहे असे लक्षात आलेले आहे. याचे केवळ र्हस्व आणि प्लुत हे दोनच प्रकार संभवतात. प्लुत उच्चारण लृ३ असे व्यक्तवले जाते.
महाप्राणास अनुक्रमे कंठ, मूर्धा, तालू, दात आणि ओठ यांवर निरनिराळ्या प्रकारे जिभेने स्पर्शवल्यास पंचवीस निस्संदिग्ध सुटे वर्ण निर्माण होतात असेही लक्षात आलेले आहे. मात्र हे सर्व उच्चार स्वरोच्चारांच्या साहाय्याने होतात. स्वतंत्रपणे त्यांचे उच्चारण पूर्ण होत नाही. त्यांना व्यंजने म्हणतात. पुढील अक्षरचिन्हांनी ती व्यक्त केली जातात.
क वर्ग- क ख ग घ ङ
च वर्ग- च छ ज झ ञ
ट वर्ग- ट ठ ड ढ ण
त वर्ग- त थ द ध न
प वर्ग- प फ ब भ म
याव्यतिरिक्त आणखीही चार स्वतंत्र निस्संदिग्ध उच्चार महाप्राणास आतल्या आतच जिभेने फिरवून निर्माण होतात. य, र, ल, व या अक्षरचिन्हांनी ते व्यक्त होतात. हे आणखी ४ व्यंजन वर्ण आहेत.
त्याचप्रमाणे महाप्राणास कंठातून पार होतांना घर्षणाने ऊष्मा निर्माण होतो असेही चार स्वतंत्र निस्संदिग्ध उच्चार आढळून आलेले आहेत. श, ष, स, ह या अक्षरचिन्हांनी ते व्यक्त होतात. हे आणखी ४ व्यंजन वर्ण आहेत.
यांव्यतिरिक्त ळ या अक्षरचिन्हाने व्यक्त होणारा एक स्वतंत्र आणि निस्संदिग्ध वर्ण आहे. हा वर्ण दुःस्पृष्ट मानला जातो.
अशा प्रकारे २२ स्वर आणि ३४ व्यंजने संस्कृत भाषेत आहेत. यांशिवाय ’अयोगवाह’ वर्गातले अन्य ८ वर्ण संस्कृत भाषेत आहेत. अशा प्रकारे (२२ स्वर + ३४ व्यंजने + ८ अयोगवाह) = ६४ मुळाक्षरे संस्कृत भाषेत आहेत.
शिवसूत्रांतून स्पष्टपणे व्यक्त होतात त्या वर्णांना शिवसूत्र योगे तयार होणारे वर्ण मानले जाते. तर शिवसूत्रांवरून ज्यांची संकल्पना केलेली नाही अशा आठ वर्णोच्चारांना, अयोगवाह मानले जाते. काही अक्षरचिन्हांना परिवर्तक जोडून इथवर अपरिचित राहिलेले काही उच्चार व्यक्त करण्याची तजवीज संस्कृत भाषेत केलेली आहे. ते परिवर्तक ’:’ (विसर्ग), ’ं’ (अनुस्वार), ‘जिव्हामूलीय‘ आणि ‘उपध्मानीय‘ असे आहेत.
मुळाक्षरांचे उच्चार औपचारिकरीत्या विसर्जित करण्याने नवेच स्वतंत्र आणि निस्संदिग्ध उच्चार सिद्ध होतात. त्यामुळे ’:’ या अक्षरचिन्हाने व्यक्त होणारा विसर्ग हाही अयोगवाह वर्गात गणला जाणारा आणखी एक वर्ण मानलेला आहे. अक्षरचिन्हांवर अनुस्वार देऊन त्या त्या अक्षरचिन्हांचे अनुनासिक उच्चार व्यक्त केले जाऊ शकतात. त्यामुळे ’ॱ’ अनुस्वारास एक स्वतंत्र निस्संदिग्ध अयोगवाह वर्ण मानला आहे. जेव्हा विसर्गानंतर प किंवा फ वर्ण येतात तेव्हा ’उपध्मानीय’ अर्धविसर्गाचे उच्चारण होत असते. उदा. पुनःपुनः, तपःफलम्. जेव्हा विसर्गानंतर क किंवा ख वर्ण येतात तेव्हा ’जिह्वामूलीय’ अर्धविसर्गाचे उच्चारण होत असते. उदा. प्रातःकालः, दुःखम्. पुढील सारणीत अयोगवाह वर्गात व्यक्त केलेल्या चार ओळींतील चार वर्ण आणि पुढे उल्लेखित चार यम वर्ण अशा आठ वर्णांना अयोगवाह म्हटले जाते. ळ हा व्यंजनवर्णही शिवसूत्रांत नसल्याने अयोगवाह मानला जातो.
कोणत्याही वर्गातील पहिल्या, दुसर्या, तिसर्या वा चौथ्या अक्षरानंतर जर पाचपैकी कोणत्याही व्यंजनवर्गातील पाचवे अक्षर (ङ, ञ, न, ण, म) जोडाक्षर म्हणून आले तर, उच्चार करतांना क, ख, ग, घ ही मुळाक्षरे संबंधित दोन अक्षरांच्या मध्ये येऊन बसत असल्याप्रमाणे (यम) त्यांचा काहीसा आगळाच नवा उच्चार तयार होतो. त्यामुळे जोडाक्षरांत जागा घेणार्या या चार हलन्त अक्षरांना ’यम’ वर्ण म्हटले जाते. हे अयोगवाह मानले जातात, कारण त्यांचा समावेश शिवसूत्रांत नाही.
संस्कृत भाषेतील ६४ वर्णोच्चारांची सारणी
अक्र |
स्थान |
स्वर |
व्यञ्जन |
अयोगवाह |
संज्ञा |
||
|
|
|
स्पर्श |
अन्तःस्थ |
ऊष्म |
|
|
१ |
कण्ठ |
अ, आ |
क्,ख्,ग्,घ्,ड़् |
य् |
ह् |
: |
कण्ठ्य |
२ |
तालु |
इ, ई |
च्,छ्,ज्,झ्,ञ् |
र् |
श् |
|
तालव्य |
३ |
मूर्धा |
ऋ, ॠ |
ट्,ठ्,ड्,ढ्,ण् |
ल् |
ष् |
|
मूर्धन्य |
४ |
दन्त |
लृ |
त्,थ्,द्,ध्,न् |
|
स् |
|
दन्त्य |
५ |
ओष्ठ |
उ, ऊ |
प्,फ्,ब्,भ्,म् |
|
|
‡प, ‡फ |
ओष्ठ्य |
६ |
नासिका |
अनुनासिक स्वर |
ड़्,ञ्,ण्,न्,म् |
|
|
ं, ँ |
उपध्मानीय, नासिक्य |
७ |
कण्ठतालु |
ए, ऐ |
|
|
|
|
कण्ठतालव्य |
८ |
कण्ठोष्ठ |
ओ औ |
|
|
|
|
कण्ठोष्ठ्य |
९ |
दन्तोष्ठ |
व |
|
|
|
|
दन्तोष्ठ्य |
१० |
जिह्वामूल |
|
|
|
|
‡क, ‡ख |
जिह्वामूलीय |
संदर्भः
[१] Sanskrit
Varnamala, Varnmala, संस्कृत वर्णमाला, swar, vyanjan, alphabets of
sanskrit, sanskrit swar https://www.youtube.com/watch?v=_wqcgri_NXs
[२] दशरूपकानुसार नृत्त आणि नृत्य यांत फरक असतो. नृत्त ताल आणि लय यांवर
आश्रित असते, तर
नृत्य भावावरच आश्रित असते. National
Sanskrit University, Tirupati https://www.youtube.com/watch?v=PlLfQd9JDAc
[३] Maheshwar Sutras Achyut Karve
Phonology – YouTube
https://www.youtube.com/watch?v=yGy7f4WhKjU
[४] सरासरीने पुरूषाची हृदयस्पंदने मिनिटाला ७२ तर स्त्रियांची
हृदयस्पंदने मिनिटाला ८४ या दरांनी होत असतात. त्यानुसार पाहिले तर एका
हृदयस्पंदनास (अंगुष्टमुळाशी मोजलेल्या नाडीच्या ठोक्यास) पुरुषास ६०/७२=०.८३
सेकंद तर स्त्रियांना ६०/८४= ०.७१ सेकंद इतका वेळ लागत असतो. त्यामुळे पुरूष आणि
स्त्री अनुक्रमे ०.८३ सेकंद आणि ०.७१ सेकंदांत एक सुटा वर्णोच्चार करू शकतात.
यालाच र्हस्व उच्चारण कालावधी म्हणतात. याच्या दुप्पट कालावधी दीर्घ
वर्णोच्चारणास लागत असतो, तर प्लुत वर्णोच्चारणास याच्या तिप्पट कालावधी लागत असतो.
1 टिप्पणी:
खूप सविस्तर आणि उद्बोधक.
कोणे एके ककळी वाचलेले परत वाचून आणि आठवून पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला.
टिप्पणी पोस्ट करा