२०२१-०५-२६

डॉ. श्रीकुमार बॅनर्जी: शोकसंदेश

 डॉ. श्रीकुमार बॅनर्जी
(जन्मः २५-०४-१९४६, मृत्यूः २३-०५-२०२१)

https://dae.gov.in/writereaddata/Obituary_Dr_Srikumar_Banerjee.pdf

रविवार दिनांक २३-०५-२०२१ रोजी पहाटे तीन वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने डॉ. श्रीकुमार बॅनर्जी यांचे देहावसान झाल्यामुळे, अणुऊर्जाविभागाने एक नेता, एक शास्त्रज्ञ आणि एक स्नेहल सुहृद गमावलेला आहे. डॉ. बॅनर्जी हे २००९ ते २०१२ दरम्यान भारत सरकारच्या अणुऊर्जाविभागाचे सचिव आणि अणुऊर्जाआयोगाचे अध्यक्ष होते. ४० वर्षांहून अधिक वर्षे विस्तारलेल्या त्यांच्या देदिप्यमान कार्यकाळात त्यांनी, भारतीय आण्विक कार्यक्रमाबाबत अनेक महत्त्वाच्या पदांवर सेवा केली. २००४ साली भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक होण्यापूर्वी ते केंद्राच्याच पदार्थविज्ञान गटाचे संचालक होते.

डॉ. श्रीकुमार बॅनर्जी हे विख्यात भारतीय धात्विकी संशोधक आणि विद्वान होते. २५ एप्रिल १९४६ रोजी, कोलकाता येथे, श्रीमती शांती आणि श्रीमान नारायण बॅनर्जी यांचे पोटी त्यांचा जन्म झाला. बी.टेक. ही धात्विकी अभियांत्रिकीतील पदवी त्यांनी आय.आय.टी. खरगपूर येथून १९६७ साली प्राप्त केली. भाभा अणुसंशोधन केंद्राच्या प्रशालेच्या ११-व्या तुकडीतून, १९६८ साली, ते भाभा अणुसंशोधन केंद्राच्या धात्विकी प्रभागात रुजू झाले. १९७४ साली त्यांनी आय.आय.टी. खरगपूर येथूनच पी.एच.डी. पदवी प्राप्त केली. इंग्लंडमधील ब्रायटन येथील ससेक्स विद्यापीठाचे ते ज्येष्ठ अतिथी सदस्य होते. मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर मेटल रिसर्च, स्टुटगार्ट, जर्मनीचे १९७९ ते १९८० दरम्यान ते हम्बोल्ट-सन्माननीय सदस्य होते. याशिवाय त्यांनी अमेरिकेतील सिनसिनाटी आणि ओहिओ स्टेट विद्यापीठांतूनही अतिथी प्राध्यापक म्हणून अनेक कार्यकाळांत काम केले होते.

भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक म्हणून डॉ. बॅनर्जी यांनी; अणुइंधनचक्र, नवोन्मेषी अणुभट्टी अभिकल्पने, तसेच प्रारण आणि समस्थानिक तंत्रांचा कृषी, आरोग्य, अन्नप्रक्रियण आणि उद्योग क्षेत्रांतील वापर, यांबाबतचे संशोधन संघटित केले. अणुइंधनचक्राच्या आघाडीच्या आणि पिछाडीच्या अशा दोन्हीही क्षेत्रांतील सामर्थ्य उभारणीची अनेक कार्ये त्यांनी सुरू केली. ३० एप्रिल २०१२ रोजी त्यांना, भारत सरकारच्या अणुऊर्जाविभागाचे सचिव आणि अणुऊर्जाआयोगाचे अध्यक्ष म्हणून अवकाश प्राप्त झाला. भाभा अणुसंशोधन केंद्रात ते ’होमी भाभा अध्यासनाचे प्राध्यापक’ म्हणूनही कार्यरत होते. मुंबईतील अणुऊर्जा विभागाच्या ’होमी भाभा राष्ट्रीय संस्थे’चे कुलगुरू म्हणूनही त्यांनी काम केले. २०१२ ते २०१७ दरम्यान त्यांनी काश्मिरातील श्रीनगर येथील केंद्रिय विद्यापीठाचे कुलगुरू म्हणूनही कार्य केले. डॉ. बॅनर्जी हे अणुऊर्जाविभागाच्या ’अणुविज्ञानातील संशोधन मंडळा’चेही अध्यक्ष होते.

डॉ. बॅनर्जी यांनी मार्टेन्सिटिक परिवर्तने, त्वरित संघनन, ओमेगा परिवर्तने, अर्ध-स्फटिकी घन,  आकारस्मृती मिश्रधातू (शेप-मेमरी अलॉईज), उष्मा-यांत्रिकी प्रक्रियेतून आण्विक संरचनात्मक पदार्थांच्या सूक्ष्मसंरचना आणि पोत साधन, तसेच सुविहित-विस्कळित परिवर्तनांवरील प्रारणप्रभाव इत्यादी क्षेत्रांत पथदर्शी कार्य केले. ४०० हून अधिक शोधनिबंधांचे श्रेय त्यांच्या गाठीस आहे. ’फेज ट्रान्सफॉर्मेशनः एक्झाम्पल्स फ्रॉम टायटॅनियम अँड झिर्कोनियम अलॉईज’ हे पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे. यासोबतच त्यांनी इतर आठ पुस्तकांचे सहसंपादनही केलेले आहे.

पदार्थविज्ञानाच्या क्षेत्रातील त्यांच्या चिरजीवी योगदानाच्या गौरवार्थ डॉ. बॅनर्जी यांना अनेक प्रतिष्ठित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त झाले. त्यांत ’इन्सा यंग सायंटिस्ट अवार्ड’, ऍक्टा मेटॅलर्जिका आऊटस्टॅन्डिंग पेपर अवार्ड, अभियांत्रिकी विज्ञानांतील शांतीस्वरूप भटनागर अवार्ड-१९८९, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेटल्स या संस्थेचे जी.डी.बिर्ला सुवर्णपदक, ’इन्सा प्राईझ फॉर मटेरिअल सायन्स’, अलेक्झांडर व्हॉन हम्बोल्ट रिसर्च अवार्ड, ’इन्सा’चे प्रो. ब्रह्मप्रकाश मेमोरिअल मेडल-२००४, इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनचे ’एक्सलन्स इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी अवार्ड’, राममोहन मिशनचा राममोहन पुरस्कार-२०१०, सी.एन.आर.राव प्राईझ इन ऍडव्हान्स मटेरिअल्स, प्रेसिडेन्शिअल सायटेशन ऑफ अमेरिकन न्युक्लिअर सोसायटी, पोलाद मंत्रालयाचे नॅशनल मेटॅलर्जिस्ट अवार्ड-२०१०, डब्ल्यू.जे.क्रोल झिर्कोनियम मेडल अवार्ड फ्रॉम अमेरिकन सोसायटी फॉर टेस्टिंग मटेरिअल्स (ए.एस.टी.एम.); आणि रॉबर्ट काह्न मेमोरिअल अवार्ड इत्यादींचा समावेश आहे. त्यांना ११ निरनिराळ्या विद्यापीठांनी सन्माननीय ’डॉक्टर ऑफ सायन्स’ पदव्या दिलेल्या आहेत. इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेसचे ते निर्वाचित सदस्य होते. इंडियन नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसचे ते सन्माननीय सदस्य होते. इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीचे ते सन्माननीय सदस्य होते. इंडियन नॅशनल अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगचे ते सन्माननीय सदस्य होते. थर्ड वर्ल्ड अकॅडमी ऑफ सायन्सेसचे ते सन्माननीय सदस्य होते आणि इंटरनॅशनल न्युक्लिअर एनर्जी अकॅडमीचे ते सन्माननीय सदस्य होते.

भारतीय अणुऊर्जा कार्यक्रमातील त्यांच्या सर्वोत्कृष्ट शास्त्रीय सहभागाच्या सन्मानार्थ भारत सरकारने डॉ. बॅनर्जी यांना २००५ साली पद्मश्री पदवी बहाल केली.

अणुऊर्जाविभागाचे कर्मचारी, डॉ. बॅनर्जी यांच्या पत्नी श्रीमती रंजना बॅनर्जी आणि पुत्र श्री. राजर्षी बॅनर्जी यांचे दुःखात सहभागी आहेत. सर्वशक्तिमान सृष्टिकर्ता त्यांचे कुटुंबियांस हे दुःख सोसण्याचे धैर्य देवो. मृतात्म्यास सद्गती लाभो. एक थोर विद्वान, समर्पित शास्त्रज्ञ आणि विनम्र माणूस आज आपण गमावला आहे. डॉ. श्रीकुमार बॅनर्जींच्या संपर्कात जे जे आलेले होते त्यांच्या ते कायमच हृदयात राहतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: