२०२१-०५-३१

’नरेंद्र गोळे’ अनुदिनीची दीड लाख वाचने

'मला जाणून घे, मला जाणून घे' म्हणणार्‍या चराचराला, कलाकलानी जाणून घेत असता, जी संपन्नता लाभली, ती कले कलेने सुहृदास सादर समर्पित करावी म्हणूनच हा प्रयास. वाचकासही सुरस वाटावा, हीच प्रार्थना!

असे ’मंगलाचरण’ लिहून जी अनुदिनी सुरू केली ती आजवर अखंडित सुरू आहे याखातर मी ’ब्लॉगर डॉट कॉम’ या माझ्या सेवादात्याचा अत्यंत आभारी आहे. तेव्हा माझे लेखन मी लोकांसमोर कसे ठेवू, कुठे ठेवू, ते काळाच्या ओघात नाहीसे होऊ नये म्हणून त्याला कसे जपू, अशा अनेक प्रश्नांनी त्रस्त होतो. त्यावेळेला अशी सोय असावी ही माझी आत्यंतिक गरज होती. ही गरज मात्र ’ब्लॉगर डॉट कॉम’ या माझ्या सेवादात्याने केवळ मोफतच नव्हे, तर समर्थपणेही पुरवली, नव्हे आजही ते ती पुरवत आहेत. आज या अनुदिनीच्या वाचकसंख्येने दीड लाखाचा आकडा पार केला आहे. त्यावरून या लेखनाच्या लोकप्रियतेचा अंदाज करता येतो. या यशात त्यामुळेच त्यांचाही सहभाग मला नमूद करावाच लागेल.

खरे तर भवितव्यात वाचक लाभतीलही कदाचित, या विश्वासानेच मी लिहू लागलो. हेच खरे सत्य आहे. त्यास दुसरा पदर असा आहे की, त्यापूर्वीही अनेक वर्षांपासून मी महाजालावर अनेक प्रदीर्घ लेख लिहिले होते. पण ती संकेतस्थळे अभंग राहतील याची शाश्वती नसे. मग त्या संकेतस्थळांवर लिहिलेले सर्व नाहीसेच होईल काय? ही विवंचनाही अस्वस्थ करत असे. आपल्यापाशी स्थळप्रतही प्रत्येकवेळी राखणे शक्य होत नसे. महाजालावरही आपली अशी जागा नव्हती जिथून कुणीही जा म्हणू शकणार नाही. मग मायबोली डॉट कॉम वर ’रंगीबेरंगी’ नावाने खासगी जागा विकली जाऊ लागली. लोक विकतही घेऊ लागले आणि आपापले खासगी लेखनही करू लागले. तशीच व्यवस्था मग वर्डप्रेसनेही सुरू केली आणि थोड्याच काळात ब्लॉगरनेही. ब्लॉगरची सेवा मोफत तर होतीच आणि वापरदारस्नेही असल्याने आकर्षकही होती. तेव्हा नविनच उघडलेल्या ’अनुदिनी’वर इतस्ततः लिहिलेले लेखन गोळा करायलाही सुरूवात केली. किमान त्या त्या ठिकाणचे दुवे तरी चटकन हाताशी रहावेत म्हणून ’अनुदिनी’च्या अनुक्रमणिकेतच त्यांना स्थान दिले.

२००७ सालच्या ऑक्टोंबर मध्ये मी अनुदिनी लिहायला सुरूवात केली. पुढे २०१० सालच्या जूनमध्ये मी का लिहू लागलो त्याचे कारण हुडकू लागलो. तेव्हा लक्षात आलेली कारणे एका कवितेतच लिहून ठेवलेली आहेत.

लिहिली कशाला अनुदिनी?

आजूस नाही मित्र दिसला, बाजूस ना मैत्रीण दिसे ।
सर्वकाळी जाल-संजीवित, हे जीवन असे ॥ धृ ॥ 

माणूस नाही दूरवरही, ही नोकरी वैरीण असे ।
रम्य काही आठवावे, सांगू परी कोणा कसे ॥ १ ॥ 

आश्चर्य वाटे खूप कधी, लागे कशाचे तरी पिसे ।
गूज ज्याला ऐकवावे, ऐसा कुणीही ना दिसे ॥ २ ॥ 

कधी दाटले नैराश्य सारे, वाट अश्रूस ना मिळे ।
काढू भडास, होऊ रिते, पण ऐकण्या कुणी ना दिसे ॥ ३ ॥ 

कधी जीवनाने शिकवला, कुठला धडा मज कौतुके ।
सांगू असे वाटे कुणाला, सांगण्या कुणी ना मिळे ॥ ४ ॥ 

मग उघडली मी अनुदिनी, लिहिण्यास जणू दैनंदिनी ।
जे वाटले, लिहीले इथे, त्या आज वाचक लाभले ॥ ५ ॥ 

या लेखनात एक मोठा हिस्सा माझ्या प्रवासवर्णनांचा आहे. ’उडिशा दर्शन’, ’मेवाड दर्शन’, ’ओंकारेश्वर दर्शन’, ’उत्तराखंडाची सहल’, ’कोकण सहलीच्या निमित्ताने’, ’सिक्कीमची सहल’, ’मी पाहिलेले जयपूर’, ’मेळघाट २०१२-१३’, ’अंदमानी सहल’, ’सरसगडची सुरस सहल’, ’अक्षरधाम मंदिर नवी दिल्ली’, ’दिल्ली दर्शन’ इत्यादी लेखमालांनी तो समृद्ध झालेला आहे. हे लेख ’मायबोली’, ’मनोगत’, ’मिसळपाव’, ’ऐसी अक्षरे’ इत्यादी संकेतस्थळांवरही त्या त्या काळी लिहिले होतेच. तिथेही ते खूप लोकप्रिय झाले होते.

पुस्तक परिचय/ परीक्षण या सदरातही सात आठ पुस्तकांची माहिती मी अनुदिनीवर लिहिलेली आहे. मी वाचलेली आणि मला आवडलेली ही पुस्तके आहेत. पूर्वीच्या काळी पुस्तकांना जे स्थान होते तेच आजच्या काळात ’अनुदिनीं’ना प्राप्त झालेले आहे. त्यामुळे इतरांचे महाजालीय लेखन वाचणे हा छंदही मला जडला. खूप आवडलेले लेखन इतरांपर्यंत पोहोचविण्याकरता मग त्या ’अनुदिनींचा परिचय’ही लिहिला गेला असेही अनेक परिचय इथे आढळून येतील.

’होर्मसजी जहांगीर भाभा’, ’होमी नुसेरवानजी सेठना’, ’सत्येंद्रनाथ बोस’, ’विनोबा भावे यांची १२५-वी जयंती’, ’विक्रम साराभाईंची जन्मशताब्दी’, ’विकसित भारताची संकल्पना (डॉ. अब्दुल कलाम)’, ’राष्ट्रीय डॉक्टर दिवस’, ’राजा भर्तृहरी’, ’मेकॉले जिंकला आहे’, ’महिला वैज्ञानिक अनुपमा कुलकर्णी’, ’मला भावलेले भाभा’, ’पहिल्या अणुस्फोटक-प्रकल्पाचा मुख्याधिकारीः जनरल लेस्ली ग्रुव्हज’, ’पद्मभूषण ई. श्रीधरन यांस मानाचा मुजरा’, ’तात्या अभ्यंकरांना सद्गती’, ’डॉ.शेखर बसू’, ’डॉ.शांतीस्वरूप भटनागर’, ’जलतज्ञ माधव आत्माराम चितळे’, ’जनार्दनस्वामी’, ’जनार्दनस्वामींचे समाजकार्य’, ’कवी माधव ज्युलियन यांचा जन्मदिन’, ’ओजशंकराची कहाणी’, ’अंतराळ शास्त्रज्ञ कल्पना चावला’, ’अणुशास्त्रज्ञ शेखर बसू यांचे निधन’, ’मेरी स्तोत्र’, ’सिमोल्लंघनी ट्रेक’ इत्यादी व्यक्तिचित्रणात्मक अभ्यासपूर्ण लेखही या अनुदिनीचा एक मोठा हिस्सा आहेत.

विख्यात विडंबित कविता, त्यांच्या कविंचे परिचय, त्यांच्या संबंधित मूळ कविता, त्यांच्याही कविंचे परिचय असे सर्व असलेले सहा परिपूर्ण लेख यात आहेत. मनोगत डॉट कॉम वर अनेक हिंदी गीतांचे मी मराठी अनुवाद केलेले आहेत. त्यावर निरनिराळ्या मुद्यांवर टीका होत होती. तिला उत्तर देण्याकरता मी ’मनोगत’च्या एका वाढदिवशी, एक लेख लिहिलेला होता, “पद्यानुवादांचा रसास्वाद”. त्याचाही समावेश या अनुदिनीत केलेला आहे.

माझी शाळा, माझे महाविद्यालय, माझे अणुऊर्जा खाते यांवरीलही अनेक लेख या संग्रहात आहेत. ’काव्यलेखनाची लोकप्रिय वृत्ते’, ’असा धरी छंद’ इत्यादी छंदशास्त्रावरीलही अनेक लेख यात समाविष्ट आहेत.

यांव्यतिरिक्त अनेक प्रासंगिक लेखांनी हा संग्रह समृद्ध झालेला आहे. त्यामुळे एक एक लेख सुट्ट्यानेच का नमूद करू नये, असे वाटल्याने इथे सारी अनुक्रमणिकाच खाली सादर करत आहे. गेल्या चौदा वर्षांत लिहिलेले एकूण २३२ लेख त्यात सामील आहेत. एक एक लेख सरासरीने चार पाच पानांचा असू शकेल. असा हा सुमारे हजार पानी मजकूर आहे.

ही संचिका ’अनुदिनीवर’ पी.डी.एफ. स्वरूपात कायम असेल. तिथून ती अधोभारित (डाऊनलोड) करून तुम्हाला आपापल्या मोबाईलवर साठवता येईल. केव्हाही ती उघडून खालील अनुक्रमणिका न्याहाळता येईल आणि विशेष म्हणजे मोबाईलवरून त्यावर टिचकी मारताच महाजालावर जाऊन तो लेख वाचताही येईल.

तेव्हा माजी, आजी आणि भावी वाचकहो आपण हे वाचलेत याचा मला अपार आनंद आहे. या सारसंचिताचा आपण मनसोक्त लाभ घ्यावा. आस्वाद घ्यावा. माझ्या लेखनावर असाच लोभ करावा हीच प्रार्थना! आज दीड लाख संख्या पार करणारी ही अनुदिनी, भविष्यात दहा लाख वाचनसंख्याही सहज पार करो असा आशीर्वादही द्यावात ही विनंती!! आपला लोभ आहेच निरंतर वाढता राहो हीच सदिच्छा.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: