२०२१-०६-१२

ओशिळांचे निवारे

ओशिळांचे [१] निवारे 

सांधकाचे [२] बंध सारे, ओशिळांचे अन्‌ निवारे ।
सरकत्या काचाच खिडक्या, कणपटांची [३] त्यांस द्वारे ॥ धृ ॥ 

लोह-जाळ्यांची कवाडे, रक्षती खिडक्या नी दारे ।
निरखण्या आगांतुकासी, दृश्यभिंग [४] देती सहारे ॥ १ ॥ 

भिंतींतुनी जडल्या कळांचे [५], छन्नमार्गी नाद[६] सारे ।
रात्रखिट्टी [७] काढता आतून, उघडे दार बा रे ॥ २ ॥ 

उद्‌वाहकाभोवती फिरत, चढती कसे सारे जिने ।
गाळे निवासी वसवले, जणू छन्नमार्गी हारीने ॥ ३ ॥ 

मजल्यागणिक चढत्या दराने, विकत घेऊ आम्ही वारे ।
तुटक सारी संस्कृती अन्‌, सदनिकांची बंद दारे ॥ ४ ॥ 

नरेंद्र गोळे २०१२०७२३

https://www.maayboli.com/node/36598

 

[१] ओतीव-शिळा म्हणजे ओशिळा”. खरे तर काँक्रीट. त्याकरताच हा नवा मराठी पर्यायी शब्द वापरलेला आहे.

[२] दगड विटा परस्परांना सांधणारे सिमेंट. सिमेंटलाच हा नवा प्रस्तावित पर्यायी मराठी शब्द वापरलेला आहे.

[३] हल्ली लाकडी भुशाच्या पटांचीम्हणजेच वूडन पार्टिकल बोर्डांची दारे वेष्टित करून म्हणजेच लॅमिनेट करून वापरण्याची प्रथा आहे. अशा दारांना कणपटांची दारे का म्हणू नये? कारण लाकडाच्या कणांचे पट तयार करून त्यांचीच तर ही दारे घडवली जात आहेत.

[४] म्हणजे डोकावून पाहण्याची छिद्रे अर्थात पीप-होल्स. त्यांचाच हा पर्यायी मराठी शब्द.

[५] म्हणजे डोअरबेलचे बटन. दाब-कळ. अर्थात्‌ पुश-बटन. हे दाराबाहेरच्या भिंतीत जडवलेले असते.

[६] घंटीचा आवाज मात्र छन्नमार्गात म्हणजे घरातील पॅसेजमध्ये होत असतो.

[७] म्हणजे नाईट लॅच. ही बाहेरच्याच दाराला बसवलेली असल्याने दिवसाही उघडावीच लागते!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: