आचार्य प्रल्हाद केशव अत्रे उर्फ केशवकुमार यांचा आज स्मृतीदिन
(१३-०८-१८९८ सासवड, ते १३-०६-१९६९ मुंबई)
त्यानिमित्ताने त्यांच्या स्मृतीस सश्रद्ध आदरांजली !
झेंडूची रसिका फुले जुळवुनी
देतो तुझ्या ही करी
घे प्रेमे अथवा पदी तुडव जा
जे वाटते ते करी ।
रागाने चुरगाळीस जरी ही
पुष्पे कधी त्वां बरे
केव्हाही विसरू नकोस तळीचे
खाण्या परी खोबरे ॥
मराठी शिक्षणक्षेत्र (कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या प्रशालेत प्रिन्सिपॉल, अनेक शिक्षक परिषदांचे अध्यक्ष, बी.टी. चे परीक्षक),
वाङमय (कऱ्हेचे पाणी हे आत्मवृत्त, बडोदा वाङमय परिषदेचे अध्यक्ष), साहित्य (झेंडूची फुले,
बडोद्याच्या कुमारसाहित्य परिषदेचे अध्यक्ष, नाशिक साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष),
नाटक (साष्टांग नमस्कार, ब्रह्मचारी, घराबाहेर, उद्याचा संसार),
चित्रपट (पायची दासी, पहिले राष्ट्रपती सुवर्णपदक विजेता शामची आई, चित्रमंदिर चित्रपटगृहाचे मालक, अत्रे पिक्चर्स चे निर्माता),
पत्रकारिता (जयहिंद सायंदैनिक, दैनिक मराठा, नवयुग साप्ताहिक, समीक्षक मासिक यांचे संपादन, बेळगावच्या पत्रकार संमेलनाचे अध्यक्ष, अत्रे प्रिंटींग प्रेस),
राजकारण (कॉन्ग्रेस, समाजवादी पक्ष, संयुक्त महाराष्ट्र परिषद यांचे कार्यकर्ते, आमदार, लोकसभा निवडणुकीत अपयश),
समाजकारण (संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते) या सर्वांवर अमिट छाप सोडणारे उत्तुंग व्यक्तिमत्त्व आहे हे.
व्यवसायाने शिक्षणतज्ञ (बी.ए., बी.टी., टी.डी. लंडन) असणाऱ्या अत्र्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अत्यंत कळीची भूमिका बजावली.
त्यांच्या कऱ्हेचे पाणी ह्या पाच खंडी आत्मवृत्ताच्या प्रस्तावनेत ते म्हणतात:
"आयुष्यात मी काय वाटेल ते केले असेल, पण ढोंग कधी केले नाही. ढोंगाचा मी पहिल्यापासून शत्रू. माझ्या नाटकांतून, चित्रपटांतून आणि वृत्तपत्रांतून ढोंगाचे मी क्रूरपणे वाभाडे काढलेले आहेत. गेली पन्नास वर्षे समाजाच्या सर्व अंतरंगांमधून मी वावरलो आहे. मजुरापासून तो महाराजापर्यंत, शाळा मास्तरापासून तो गिरणी मालकापर्यंत आणि कंगालापासून तो कुबेरापर्यंत मी अनिरुद्ध संचार केलेला आहे. त्यामुळे समाजाच्या बहिरंगामध्ये आणि त्याच्या अंतरंगामध्ये केवढी फारकत आहे, ह्याची जाणीव माझ्या इतकी दुसऱ्या कुणालाही असणे शक्य नाही. आज जीवनाच्या सर्व क्षेत्रात दंभाचा आणि ढोंगाचा जो बुजबुजाट झालेला आहे त्याचे कारण सत्य काय आहे हे जाणण्याचे आणि सांगण्याचे फार थोड्या लोकांत धैर्य आहे. ते धैर्य दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे."
जगातील सर्वात मोठे आत्मचरीत्र लिहिण्याचा त्यांचा मानस होता.
तो मात्र त्यांच्या अवचित देहावसानाने अपुराच राहिलेला आहे.
http://www.manogat.com/node/6380
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा