२०२१-०५-२३

कालजयी दिनक्रम

कालजयी दिनक्रम 

(वृत्तः वसंततिलका, अक्षरे-१४, यती-८,६)


कोवीड रोज कळवे नववर्तमान
लाभे, न लाभत कुणा, लसही सुखात ।
टाळेहि बंद सगळेच मिळते न वाट
राहून रोज सदनात मन खिन्न होत ॥ १ ॥ 

गाठे कुणास कळते मुकुटी विषाणू
राहे घरात विलगीकरणास कोण ।
कोणा कधी न कळते घडले कसे हे
बाहेर येउ बघती कसही करून ॥ २ ॥ 

वाटे कधी न क्रम हा मुळि का चुके ना
वाटे विराम कधि का मजला मिळे ना ।
काही नवे न अगदी मुळि का स्फुरे ना
सार्‍या क्रमात मज का रस सापडेना ॥ ३ ॥ 

नैराश्य व्यर्थ असते, छळते उगाच
रात्रीस संपवित ये उदयी प्रभात ।
तैसाच काळ छळता सरता लगेच
येतील ’ते’ दिवसही फिरुनी घरात ॥ ४ ॥ 

हा चंद्र रोज उगवे चुकता मुळी न
हा सूर्य रोज क्रमितो क्रम एकलाच ।
वारेहि वाहत तसेच थकता मुळी न
तूही कधी दिनक्रमा चुकवू नको न ॥ ५ ॥

नरेंद्र गोळे २०२१०५२३


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: