२०२१-१२-२८

उमा आज्जीला ऐंशीव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

मुळात २०१४ साली लिहिलेल्या लेखाचे हे पुनःप्रसारण आहे! त्यावेळी आज्जींचे वय ७३ वर्षांचे होते.



आम्ही लहान होतो तेव्हा घरात, आजुबाजूला; काका, मामा, आत्या, मावशा भरपूर दिसत असत. त्यामानाने आज्जी-आजोबांची संख्या मर्यादित असे. हल्ली काका, मामा, आत्या, मावशा असतात खर्‍या; पण त्या कायमच खूप व्यस्त असतात. आज्जी-आजोबांच्या उपलब्धतेचे प्रमाण मात्र भरपूरच वाढलेले आहे. मग आज्जी किंवा आजोबा एकच नसल्याने; पूर्वी काका, मामा, आत्या, मावशा ह्यांचे उल्लेख करतांना ज्याप्रमाणे त्यांचे नाव घ्यावेच लागे; तसे आता आज्जी-आजोबांना हाक मारतांना करावे लागते आहे. पूर्वी आम्ही आज्जीला आक्का-आज्जी आणि आजोबांना बापू-आजोबा इतपतच विशेष उल्लेखाने पुकारत असू. आजचे नात-नातू मात्र आज्जीला उमाआज्जी आणि शुभदाआज्जी असे नेमकेपणाने हाका मारतांना दिसत आहेत. नव्हे आज्जी-आजोबाच भरपूर आढळून येत असल्याने तशी गरजच निर्माण झालेली आहे. आईच्या माहेराला असणारे आजोळहे नाव हल्ली सार्थक भासू लागलेले आहे.



तर सांगायचे हे की आज्ज्यांना नेमकी नामाभिधाने प्राप्त झालेली आहेत. आमच्या लहानपणी आम्हाला आज्जी-आजोबांची नावे नेमकेपणाने माहीत झाली त्यावेळी आम्ही बरेच मोठे झालेलो होतो. आजची नातवंडे मात्र लहान-लहान वयांतच आज्जी-आजोबांची नेमकी नावे तर सोडाच, त्यांचे मोबाईल नंबरही नेमकेपणाने सांगू लागलेले आहेत. उदयमान असलेल्या नव्या युगात आपले परंपरागत सणवारही काहीसे मागे पडलेले आहेत आणि त्यांची जागा वाढदिवसांच्या समारंभांनी घेतली आहे. लग्नाच्या वर्धापनांना अग्रक्रम प्राप्त झालेला आहे. साहाजिकच, त्यांच्या लहानपणी आपला वाढदिवस कधी येतो, हे माहीतही नसणार्‍या आज्जी-आजोबांना, आज नातवंडांबरोबरच आपले वाढदिवस लक्षातही ठेवावे लागत आहेत आणि साजरेही करावे लागत आहेत.

मग वाढदिवस कसा साजरा केला? काय नवीन केले? कुणी कुणाला काय गिफ्टआणले? कुणी कुणाला कुठे ट्रिटदिली ह्याच्या चर्चा होणेही साहजिकच ठरले. सरप्राईझ आयटम्सही प्रसारात आले. मग नातवंड असोत की नसोत आई-बाबा, काका-मामा, आत्या-मावशा इत्यादी लोक जसे ह्यात गुंतू लागले; तसेच हल्लीचे आज्जी-आजोबा आणि पणजी-पणजोबाही ह्यातून सुटले नाहीत.

नातवंडे जसा वाढदिवसाचा खूप आधीपासूनच विचार करू लागतात. त्याकरताचे नियोजन करू लागतात. तसेच मग आज्जी-आजोबाही करू लागले. सरप्राईझ काय नातवंडे आणि त्यांचे आई-बाबाच देऊ शकतात असे नाही. आज्जी-आजोबांनाही ते कुणाला तरी द्यावेसे वाटू लागणे, काल-सुसंगतच म्हणावे लागणार नाही का! उमाआज्जीलाही तसे वाटू लागले. मग उमाआज्जीने काय केले?


तिने आपल्या जवळच्या मैत्रिणींना आपल्या वाढदिवसाची भेट द्यायची योजना केली. कालबाह्य झालेल्या जुन्या रेशमी (सिल्कच्या) साड्या, ठेवणीतल्या कपड्यांची वासलात लावतांना काढून ठेवलेल्या भरजरी किनारपट्ट्या (लेसेस), बाजारात मिळणार्‍या नवनव्या साखळबंद्या (चेन्स हो!), अद्ययावत्‌ शैलीच्या बटव्यांची (म्हणजे पर्सेस) अभिकल्पने (डिझाईन्स) इत्यादी कच्च्या मालाची भरपूर जुळवाजुळव केली.

कित्येक दिवस अहोरात्र कष्ट करून, सर्वच जिवलग मैत्रिणींकरता एकएक, यानुसार; आकर्षक, सुरेख, बहुगुणी, आणि महत्त्वाचे म्हणजे सोयिस्कर कप्पे असलेले देखणे बटवे हाताने शिवून तयार केले. त्यांना मोबाईल ठेवण्याकरता साखळबंद कप्पे केले. मैत्रिणींना आवडतील की नाही अशी एक हुरहुर होती तिला. मात्र मला वाटते की नक्कीच त्या पसंत करतील!



खरे तर संपन्न संसाराच्या वाटेवर आयुष्यभर कर्तबगारीने, असंख्य जबाबदार्‍या पार पाडलेल्या उमाआज्जीने, प्रत्यक्ष जबाबदार्‍या कमी झाल्यावर, भरपूर विश्रांती घ्यायची. मुला-नातवंडांच्या यशांतून समाधान मानायचे. पण स्वकर्तृत्वाचा आलेख जराही ढळू न देण्याची समर्थ शिकवण मिळालेल्या उमाआज्जीने, आपल्या जुन्याच कौशल्यांना नवीन परिमाणे देऊ केली.


उमाआज्जीलाही आम्ही सरप्राईझ आणलेलेच होते. मात्र माझ्या सवयीनुरूप मी ते आधीच फोडल्यामुळे, त्यात फारसे रहस्य उरले नव्हते. तरीही आम्ही तिला ते विधिवत सुपूर्त केले. नजीकच्याच उपाहारगृहात आम्ही मग मेजवानीही, खर्‍याखुर्‍या स्वरुची-भोजन पद्धतीने, थाटात साजरी केली. पूर्वी आई-बाबा आणि तत्सम लोक व्यस्त असत. त्यांना सुट्टी मिळावी लागे. हल्ली नातवंडेच खूप कामात असतात. त्यांना सुट्टीही सहजी मिळत नाही. त्यामुळे वाढदिवस साजरा झाला तेव्हा कुणीही नातवंडे प्रत्यक्षात उपस्थित नव्हती. आता त्यांना कळावे कसे की आम्ही कायकाय मज्जा केली! म्हणून हा लेख लिहिला आहे. उमाआज्जीची इतस्ततः विखुरलेली सर्व नातवंडे यथावकाश ही हकीकत वाचतील तेव्हा त्यांनाही समजेल की, उमाआज्जीचा वाढदिवस प्रत्यक्षात कसा साजरा झाला ते.

इथे तिच्या सर्वच मुला-नातवंडांच्या वतीने मी, उमाआज्जीला ८० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो! तिच्या चिरतारुण्याचे, निरंतर सृजनशील राहण्याचे, अखंडित स्वावलंबनाचे आणि तिच्या कायमस्वरूपी समाधानी, संतुष्ट भूमिकेचे आम्हा सगळ्यांनाच; अगदी साता-समुद्रापारपर्यंतच्या नातवंडांनाही अपार कौतुक आहे. तिच्यासारखेच सद्‌गुण आमच्यात उदयमान राहावेत, असेच आशीर्वाद तिने द्यावेत. तिला उत्तम आयुरारोग्य, सुखशांती आणि समाधान लाभो हीच प्रार्थना.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: