२०२१-११-३०

स्वधर्म

 विनोबांच्या गीता प्रवचनांतील काही उतारे 

स्वधर्म आपल्याला निसर्गत:च प्राप्त होतो. स्वधर्म शोधावा लागत नाही. आपण आकाशातून पडलो व भूमीवर सावरलो असा काही प्रकार नाही. आपला जन्म होण्यापूर्वी हा समाज होता. आपले आईबाप होते. शेजारी होते. अशा ह्या प्रवाहात आपण जन्मतो. ज्या आईबापांच्या पोटी मी जन्म घेतला त्यांची सेवा करण्याचा धर्म मला जन्मत:च मिळाला आहे. ज्या समाजात जन्मलो त्या समाजाची सेवा करण्याचा धर्म मला ओघानेच प्राप्त झाला आहे. आपल्या जन्माबरोबरच स्वधर्मही जन्मतो. किंबहुना आपल्या जन्माआधीच तो आपल्यासाठी तयार असतो असेही म्हणाता येईल. आचरण तो आपल्या जन्माचा हेतू आहे. तो पार पाडण्यासाठी आपण जन्मलो आहो.

मी स्वधर्माला आईची उपमा देतो. माझी आई मला ह्या जन्मात निवडायची उरलेली नाही. ती आगाऊचीच सिद्ध आहे. आपल्याला ह्या जगात स्वधर्माशिवाय दुसरा कोणताही आश्रय नाही. स्वधर्माला टाळू पाहणे म्हणाजे 'स्व'लाच टाळू पाहण्यासारखे आत्मघातकीपणाचे आहे. स्वधर्माच्या आश्रयानेच आपण पुढे जाऊ शकतो. म्हणून तो आश्रय कोणी सोडू नये. हा जीवनाचा एक मूलभूत सिद्धांत ठरतो.

स्वधर्म हा इतका सहजप्राप्त आहे की माणसाच्या हातून सहज त्याचेच आचरण व्हावे. पण अनेक मोहांमुळे ते होत नाही. स्वधर्माच्या मार्गात काटे पसरविणार्‍या मोहाची बाह्य रूपे तर असंख्यच आहेत. त्या सर्वांच्या मुळाशी जी एक गोष्ट दिसून येते ती म्हणजे संकुचित आणि उथळ देहबुद्धी. मी आणि माझ्या शरीरसंबंधाची माणसे. अशा स्थितीत स्वधर्मनिष्ठा एकाकी पुरी पडत नाही. तिच्यासाठी दुसरे दोन सिद्धांत जागृत ठेवावे लागतात. मी मरतुकडा देह नव्हे. देह वरवरचा क्षुद्र पापुद्रा आहे. हा एक सिद्धांत. आणि मी कधीही न मरणारा, अखंड आणि व्यापक आत्मा आहे. हा दुसरा सिद्धांत. हे दोन्ही मिळून एक पूर्ण तत्त्वज्ञान होते.

स्वधर्मात राहूनच विकास होऊ शकतो. स्वधर्म मोठा म्हणून घ्यायचा नसतो. आणि लहान म्हणून टाकायचा नसतो. वस्तुत: तो मोठही नसतो आणि लहानही नसतो. तो माझ्या बेताचा असतो. 'श्रेयान् स्वधर्मो विगुण:' ह्या गीतावचनातील धर्म शब्दाचा अर्थ हिंदू धर्म, मुसलमानी धर्म, ख्रिस्ती धर्म अशासारखा नाही. प्रत्येक व्यक्तीचा धर्म निरनिराळा आहे. माझाही धर्म दहा वर्षांपूर्वी होता तो आज नाही. आजचा दहा वर्षांनी टिकणार नाही. चिंतनाने आणि अनुभवाने वृत्ती पालटत जाते तसतसा पूर्वीचा धर्म गळत जातो. आणि नवीन लाभत असतो. हट्टाने काहीच करायचे नसते.

दुसर्‍याचा धर्म श्रेष्ठ वाटला तरी तो स्वीकारण्यात माझे कल्याण नसते. दुसर्‍याचा धर्म सोपा वाटला म्हणूनही तो स्वीकारायचा नसतो.
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: