प्रत्यक्ष परमेश्वरच स्त्री व पुरूष रूपाने आविर्भूत झालेला आहे. त्यामुळेच सृष्टीची निर्मिती झाली. स्त्री आणि पुरूष दोघेही परमेश्वराचीच रूपे. तरीदेखील समाजात स्त्रियांवर पुरूषांद्वारे विविध अत्याचार केले जातात. अपहरण, बलात्कार, हे तर मानवतेला काळिमा फासणारे अपराध आहेत. प्राचीन काळापासून आजतागायत स्त्रियांची अशा अत्याचारांद्वारे अवहेलना झालेली आहे. कायद्यांमुळे, नियमांद्वारे व दंडाद्वारेही पुरूषांची ही पाशवीवृत्ती काबूत ठेवण्यात अद्याप यश आलेले नाही.
अशा प्रकारच्या अत्याचारांबाबत स्त्रियांचा दोष नसतो, असतो तो पुरूषांचाच. स्त्री ही सदैव पवित्रच असते. महाभारतात म्हटलेले आहे कीः
“नापराधोऽस्ति नारीणां नरः एव अपराध्यति।”
पुराणकाळात बलात्कारासाठी देहदंडाची शिक्षा दिली जात असे. स्त्रीबाबत मोठ्या आदराने महर्षी याज्ञवल्क्य म्हणतातः
“यथा भूमिस्तथा नारी तस्मात् ताः न तु दूषयेत्।”
जशी भूमी सदैव पवित्र असते तशीच नारी देखील सदैव पवित्र असते. म्हणून तिला कधीच दूषित करण्याचा प्रयत्न करू नये.
पुरूषांची मानसिकता केवळ दंडनियमांनी, कायद्याने नव्हे तर नैतिक नियमांनी बदलवता येईल. दंड नियम, कायदे हे अतिशय कठोर व्हावे लागतील आणि नीतिमत्ताही सुधारावी लागेल, त्यानंतरच ’स्त्री ही उपभोग्य वस्तू आहे’ ही दृष्टी नष्ट होऊ शकेल.
वेदकाळातील ’जुहू’ ही एक अपहृत स्त्री होती. ती स्वरूपसुंदरी, बुद्धिमती, युवती आणि बृहस्पतीची पत्नी होती. ती ब्रह्मवादिनी होती. ऋग्वेदात संग्रहित केलेल्या अनेक ऋचांमध्ये तिच्या ऋचांचा समावेश आहे. आपल्या बुद्धिसामर्थ्याने तिने ऋषीलोकांमध्ये स्थान प्राप्त केले होते. अशा प्रकारची श्रेष्ठ बुद्धिमती स्त्री देखील एकदा पाशवी प्रवृत्तीची बळी ठरली हे दुर्दैव!
एकदा सोम नावाच्या अत्याचारी राजाने तिला पळविले. आपली वासना पूर्ण करण्यासाठी त्याने तिला अपमानित केले. तिचा सन्मान त्याने धुळीस मिळवला. या बाबतीत जुहूचा काहीच दोष नव्हता. दोष होता तो वाईट वासनेचा. त्या पुरूषाचा. परंतु अशा प्रसंगामध्ये स्त्रियांचे पतीदेखील उदार अंतःकरणाने विचार करत नाहीत. शरीर अपवित्र झाले म्हणून मन अपवित्र होत नसते. जिचे मन पवित्र ती सदैव पवित्रच असते, असा विचार पती करत नाही. तिचा पती बृहस्पती हा ब्रह्मवेत्ता विद्वान असूनदेखील त्याने उदार विचार केला नाही. अविवेकाने त्याने तिचा त्याग केला. समाजदेखील स्त्रीलाच दूषणे देत होता.
त्यावेळच्या समाजातील नेते मात्र चिंतित झाले होते. इंद्र, अग्नी, मित्र, वरुण, वायु हे तेव्हाचे समाजधुरंधर चिंतित होते. ’सोम’सुद्धा बलाढ्य होता. समाजात अग्रणी म्हणून गणला जायचा. तरी देखील त्याने हे निंद्य काम केले होते. सर्वांनी याबाबत सोमाची निंदा केली. सप्तर्षींनी पण त्याची प्रार्थना केली. जनतेने त्याचा धिक्कार केला. तेव्हा सोमाला लाज वाटली.
सोमाने वरुणाला विचारले, ’हे वरुणा, मी आता काय करू?’ वरुण सोमाला म्हणाला, ’जशी बृहस्पतीची पत्नी तू हिरावलीस, तशीच ती परत कर.’
बृहस्पतीकडे जाण्याचे धैर्य सोमाकडे नव्हते. परंतु सर्वांच्या दबावामुळे तो गेला. त्याच्याबरोबर समाजातील उपरोक्त नेतेमंडळीही होती. सोमाने सर्वप्रथम जुहूची क्षमा मागितली. बृहस्पतीचा अपराधी असल्याने, सोमाने बृहस्पतीसमोर हात जोडले. परंतु जुहूच्या पतीने तिचा स्वीकार केला नाही. ती आता कलंकित आहे, पापी आहे म्हणून मी तिचा स्वीकार करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका बृहस्पतींनी मांडली.
तेव्हा वरुणादी सर्व नेत्यांनी एक स्वराने म्हटले, ’हे बृहस्पती, ती अंतःकरणाने निष्पाप आहे. पवित्र, प्रांजळ आहे. केवळ शरीराने कोणी अपवित्र ठरत नसते. ती स्वतः ब्रह्मवादिनी, ऋषिका आहे. ती कशी काय अपवित्र होईल? ती तुझी पत्नी आहे. विद्वत्तेतही ती तुझ्यापेक्षा तसूभरही कमी नाही. स्त्री आणि पुरूष समान असतात. नीतिनियमही दोघांसाठी समानच असतात. म्हणून तू तिचा स्वीकार कर.’ सप्तर्षींनी पण ती निष्पाप असल्याचे सांगितले. निष्कलंक असल्याबाबत ग्वाही दिली. जिचे मन पवित्र, ती पवित्रच असते, असे म्हटले.
ते पुन्हा म्हणाले, “स्त्री ही बलशालिनी असते. तीच शक्ती आणि दुर्गाही असते. तिच्या क्रोधाने प्रलय होऊ शकतो. ती उग्र झाली तर भयंकर परिणाम भोगावे लागतात”.
त्यानंतर बृहस्पतीचा वृथा अहंकार नष्ट झाला. लोकसामर्थ्य, नेत्यांचे म्हणणे, सप्तर्षींचे मत जाणून त्याने जुहूचा पुन्हा पत्नी म्हणून स्वीकार केला. सोमाने तिला अपमानित केले तरी समाजाने पुन्हा सन्मान मिळवून दिला.
अशी असावी समाजव्यवस्था.
जसा जुहूचा पुन्हा सन्मान झाला, तिला पुन्हा प्रतिष्ठा मिळाली, तशीच प्रतिष्ठा
अपहृत, बलात्कारित स्त्रियांना मिळावी. समाजाची दृष्टी विशाल व्हावी. म्हणूनच
ऋग्वेदातील हे उदाहरण अनुकरणीय आहे. स्त्री ही नेहमी सन्माननीय, नित्य आदरणीयच
असते, हे लक्षात ठेवले पाहिजे.
संदर्भः वेदकालीन स्त्रीरत्ने, डॉ. मंजूषा
कुलकर्णी, नीहारा प्रकाशन, २३ नोव्हेंबर २०१९, मूल्य रु.१५०/-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा