२०२१-११-१२

अणुस्फोटांचे जादुगारः डॉ. राजगोपाल चिदंबरम

आज डॉ.राजगोपाल चिदंबरम यांचा जन्मदिन आहे. 

ते भारतातील सर्वात विख्यात प्रायोगिक भौतिकशास्त्रज्ञ आहेत. भाभा अणू संशोधन केंद्राचे संचालक (१९९० ते १९९३) राहिलेले आहेत. भारतीय अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि भारत सरकारचे सचिवही (१९९३ ते २०००) राहिलेले आहेत. तसेच, भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागारही (नोव्हेंबर २००१ ते मार्च २०१८) राहिलेले आहेत. अणुऊर्जा विभागाच्या होमी भाभा अध्यासनाचे प्राध्यापक म्हणून ते आजही कार्यरत आहेत. डॉ. चिदंबरम यांनी मूलभूत विज्ञान आणि आण्विक तंत्रांच्या अनेकविध पैलूंत मोलाची भर घातलेली आहे [१]. डॉ. होमी भाभांनी निवडलेल्या मोजक्या शास्त्रज्ञांपैकी हे एक आहेत.

अणुस्फोटांचे जादुगारः डॉ.राजगोपाल चिदंबरम

जादूगार जसे जना भुलवतो शोधून युक्ती नवी
तैसे दंग चिदंबरं करवुनी योजीति सार्‍या कृती ।
झाले स्फोट कळे, नियोजन कधी झाले कुणा ना कळे
झाली पूर्व तयारिही कशि, कुणी काही न संवेदले ॥ १ 

धक्का जो बसला जगास सगळे गेले विरोधातही
रोखील्या रसदा युरेनियमच्या तंत्रे न देती नवी ।
राष्ट्रा लागत ते इथेच घडुनी संशोध नेला पुढे
केले सज्ज स्वराष्ट्र ठोस दिधला विश्वास चोहीकडे ॥ २ 

आम्हीही अणु अस्त्र धारण करू, होऊन विश्वा गुरू
आम्हीही अणुला विभक्त करुनी, ऊर्जा अणूची वरू ।
आम्ही शांति उगा न सोडु तरीही, धाका न सोसू जनी
हा संदेश चिदंबरं विखुरती, स्फोटा करूनी रणी ॥ ३ 

नरेंद्र गोळे २०२०१११२

डॉ. चिदंबरम यांचा जन्म १२ नोव्हेंबर १९३६ रोजी चेन्नई येथे झाला. डॉ. चिदंबरम यांनी सुरूवातीचे शिक्षण मीरत आणि चेन्नई येथे घेतले. १९५६ साली ते मद्रास विद्यापीठातून बी.एस.सी. (ऑनर्स) पदवी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. एम.एस.सी. भौतिकशास्त्र विषयात पदव्यूत्तर प्रशिक्षण घेत असतांना ते प्राथमिक भौतिकी प्रयोगशालेय अभ्यासक्रमांना शिकवतही असत. सदृश संगणक (अनालॉग कॉम्प्युटर्स) या विषयावर शोधनिबंध लिहून ते १९५८ साली भौतिकशास्त्रात एम.एस.सी. झाले. भारतीय विज्ञान संस्था, बंगळुरू येथे पी.एच.डी. करता त्यांनी नाव नोंदवले. १९६२ साली, त्यांच्या अणुगर्भी चुंबकीय अनुनाद विकासाच्या संशोधन कार्यास मान्यता लाभून, ते पी.एच.डी. झाले. हा शोधनिबंध, भारतीय विज्ञान संस्था, बंगळुरू यांचेकडे नोंदविण्यात आलेल्या सर्व शोधनिबंधांपैकी सर्वोत्तम आढळून आल्याने मार्टिन फॉस्टर पदक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता. चिदंबरम हे अष्टपैलू प्रज्ञावंत आहेत. पी.एच.डी. झाल्यानंतर स्फटिकालेखन आणि संघनित पदार्थ भौतिकीत त्यांचा रस वाढला. त्या काळात त्यांनी लिहिलेल्या लेखांनी, आधुनिक पदार्थ विज्ञानाच्या (मटेरिअल सायन्स) विकासात कळीची भूमिका बजावली. भारतीय विज्ञान संस्था, बंगळुरू येथे त्यांनी केलेल्या प्रयोगांवर आधारित संघनित पदार्थ भौतिकी आणि पदार्थ विज्ञानातील विकासांची दखल घेऊन त्याकरता त्यांना डी.एस.सी. ही पदवी प्रदान करण्यात आली. त्यांना निरनिराळ्या वीस संस्थांनी भौतिकशास्त्रातील डॉक्टरल पदव्या प्रदान केलेल्या आहेत [२, ४].

बंगळुरू येथील भारतीय विज्ञान संस्थेतून पी.एच.डी. झाल्यावर, १९६२ साली ते भाभा अणुसंशोधन केंद्रात वैज्ञानिक म्हणून रुजू झाले. डॉ. चिदंबरम यांनी १९६२ साली, विरक्तक (विरक्तक म्हणजे न्यूट्रॉन. अण्वंतर्गत तीन कणांपैकी विद्युत प्रभारित नसलेला विरक्त कण) विवर्तन आणि स्फटिकालेखन (न्यूट्रॉन डायफ्रॅक्शन अँड क्रिस्टलॉग्राफी) यावर काम सुरू केले. विरक्तक विवर्तन-मापकाच्या आधारे स्वयंचलित विदा संकलन सुरू करणारे ते पहिलेच शास्त्रज्ञ होते. भारतात स्फटिकालेख संगणन सुरू करण्यात ते पथप्रदर्शक राहिले. आण्विक स्फोटकांच्या अभिकल्पनाचे कार्य त्यांनीच सुरू केले. प्ल्युटोनियमचे प्रावस्था समीकरण शोधून काढणारे ते पहिलेच शास्त्रज्ञ होते [१].

१९७४ साली पोखरण येथे चाचणी करण्यात आलेल्या (अणुविस्फोटक) साधनाकरता अंतर्स्फोटाची पद्धतही त्यांनीच विकसित केली होती. याकरता त्यांनी, संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेसोबतच्या घट्ट परस्परसमन्वयातून, भाभा अणुसंशोधन केंद्रात धक्कालहरींचे (शॉकवेव्हज चे) संशोधन सुरू केले. १९९८ च्या (अणु) चाचण्यांकरता त्यांनी अत्यंत सुटसुटीत अंतर्स्फोटक प्रणाली उपयोगात आणली, जिचे रूपांतरण पुढे अण्वस्त्रांत करता आले. पोखरण चाचणीनंतर डॉ. चिदंबरम यांनी उच्च दाब भौतिकीच्या क्षेत्रात ’खुले संशोधन’ सुरू केले. याकरता संपूर्ण पल्ल्यातील उपकरणे, जसे की हिराऐरणीघट (डी.ए.सी.-डायमंड ऍनव्हिल सेल्स, या घटांचा उपयोग मिलिमीटरहूनही कमी आकाराच्या पदार्थांवर प्रायोगिकरीत्या अब्जावधी वातावरणांच्या दाबाइतका उच्च दाब देण्यासाठी, भूशास्त्रात केला जातो) आणि वायु-बंदूक (गॅस-गन, वस्तुप्रक्षेपण करण्यासाठी ही वापरली जाते). प्रक्षेपित वस्तूंच्या संपूर्ण निदानाकरताच्या सुविधाही त्यांनी संपूर्णपणे स्वदेशी तंत्रांनी उभ्या केल्या. प्रावस्था समीकरणे, पदार्थांची प्रावस्था स्थिरता इत्यादींच्या आकडेमोडीकरता त्यांनी, सैद्धांतिक उच्चदाब संशोधनाचा पाया रचला. भाभा अणुसंशोधन केंद्रात महासंगणकाचा विकास सुरू करण्यासही डॉ. चिदंबरम हेच कारणीभूत ठरले होते [१].

त्यांच्याच अणु आयोगाचे अध्यक्ष असतांनाच्या कार्यकाळात अणुऊर्जा कार्यक्रमाला भरपूर गती मिळाली. अणुऊर्जा संयंत्रांची संख्या खूप वाढली. १९९४-९५ दरम्यान ते आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा अडतीच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष राहिले. २००८ साली आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा अडतीने,  “२०२० आणि नंतरच्या कालातील अडतीची भूमिका” तयार करण्यासाठी नियुक्त केलेल्या विख्यात व्यक्तींच्या आयोगाचे ते सदस्य होते. १९९०-९९ दरम्यान ते आंतरराष्ट्रीय स्फटिकालेखन संघाच्या कार्यकारी समितीचे सदस्य राहिले. पुढे तिचे ते उपाध्यक्षही झाले. मार्च २०१८ पर्यंत ते राष्ट्रीय ज्ञान जालाकरताच्या उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष होते. आंतरराष्ट्रीय पंचसंदर्भित नियतकालिकांतून त्यांचे २०० हून अधिक शोधनिबंधही प्रकाशित झालेले आहेत [३].

भारत सरकारने पद्मश्री (१९७५) आणि पद्मविभूषण (१९९९) पुरस्कार प्रदान करून डॉ. चिदंबरम यांच्या कार्याचा वेळोवेळी गौरव केलेला आहे. त्यांनी इतर अनेक पुरस्कारही प्राप्त केलेले आहेत. १९९१ साली त्यांना भारतीय विज्ञान संस्थेचे विख्यात विद्यार्थी म्हणून गौरवण्यात आले. १९९२ मध्ये त्यांना जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दीनिमित्त, भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीकडून सन्माननीय आंतरराष्ट्रीय पाहुणे सदस्यत्व देण्यात आलेले होते. लोकमान्य टिळक पुरस्कार (१९९८), वीर सावरकर पुरस्कार (१९९९), दादाभाई नौरोजी सहस्रक पुरस्कार (१९९९), भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीकडून मेघनाद साहा पदक (२००२), श्री. चंद्रशेखरेंद्र सरस्वती राष्ट्रीय ख्याती पुरस्कार (२००३), भारतीय अणुकेंद्रकीय समाजाचा होमी भाभा जीवनगौरव पुरस्कार (२००६), भारतीय राष्ट्रीय अभियांत्रिकी अकादमी कडून अभियांत्रिकीतील जीवनगौरव पुरस्कार (२००९) आणि भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीकडून सी.व्ही.रमण पदक (२०१३); तसेच ऊर्जापेढी परिषदेकडून (कौन्सिल ऑफ पॉवर युटिलिटीज कडून) जीवनगौरव (२०१४) हे पुरस्कारही त्यांना प्राप्त झालेले आहेत [३].

२००१ सालची, भारतीय अणुकेंद्रकीय समाजाची (आय.एन.एस.सी.-२००१ इंडियन न्युक्लिअर सोसायटीज ऍन्युअल कॉन्फरन्स-२००१) वार्षिक परिषद इंदौर येथील प्रगत तंत्रज्ञान केंद्रात (हल्लीचे आर.आर.सी.ए.टी.- राजा रामण्णा सेंटर फॉर ऍडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी), १० ते १२ ऑक्टोंबर दरम्यान भरली होती. मीही ’आभासी उपकरणना’वरचा एक शोधनिबंध वाचणार असल्याने परिषदेस आमंत्रित होतो. दिवसभर तांत्रिक निबंधवाचनांचे कार्यक्रम चालत. संध्याकाळी मनोरंजनाचे कार्यक्रम असत. एके दिवशीचा कार्यक्रम चोखी ढाणीला भेट देण्याचा होता. परिषदेकरता जमलेले सारे प्रतिनिधी गोलाकार आसनांवर बसलेले होते. मध्यभागी एक जादुगार जादूचे प्रयोग दाखवित होता. एका क्षणात त्याने एक नाणे सर्वांना दाखवले. पहा ओळखून ठेवा असे सांगितले. मग ते उंच उडवले. वर आकाशात खूप उंचावर गेले ते. अंधारात दिसेनासेही झाले. मात्र ते परत खाली आलेच नाही. मग जादूगार म्हणाला आपल्यापैकीच कुणीतरी ते लपवले आहे. असे म्हणत तो चिदंबरम बसलेले होते तिथे गेला. त्यांच्या खिशाला हात लावला आणि तेच नाणे सगळ्यांना दाखवू लागला. नाण्याची ओळख पटवली गेली. नाणे तेच होते. चिदंबरमही थक्क झाले! मात्र त्याच्याकडे ते पुन्हा आले कसे, हे कुणालाच कळले नाही. धन्य ती जादू आणि धन्य तो जादुगार!

चिदंबरमही असेच जादुगार आहेत. कुणाही परक्याला पत्ता लागू न देता १९७४ आणि १९९८ च्या अणुस्फोटक चाचण्या त्यांच्याच देखरेखीखाली अत्यंत सुरळितपणे आणि कमालीच्या गोपनीयतेसहित पार पडल्या होत्या [५]. गोपनीयता काय असते ते त्यांनीच जगाला दाखवून दिलेले होते. चिदंबरम हे प्रखर बुद्धिमत्ता आणि वेगवेगळ्या विषयांत सखोल आकलन असलेले व्यक्ती आहेत. भारताचे द्रष्टे शास्त्रज्ञ आहेत. चिदंबरम हे फर्डे वक्ते आहेत. अणुऊर्जाविभागात ३१ वर्षे सेवा केल्याने, अतिशय प्रज्ञावंत शास्त्रज्ञांची व्याख्याने ऐकण्याचा मला योग लाभला. त्या सगळ्यांत ज्यांचे व्याख्यान ऐकावेसे वाटे ते चिदंबरम होते. गोष्ट सांगावी तसे ते घटना समजावून सांगतात. १९९८ च्या चाचण्यांनंतर भाभा अणुसंशोधन केंद्रातील मध्यवर्ती संकुलात (सेंट्रल कॉम्प्लेक्समध्ये) त्यांचे व्याख्यान आयोजित केले होते. चाचणीच्या यशाची गोष्ट सांगण्याकरता.


सारे सभागृह गच्च भरलेले. आसनांसमोरच्या मोकळ्या जागेतही शास्त्रज्ञ दाटीवाटीने बसलेले मला आठवतात. जगाला थक्क करणारे प्रयोग त्यांनी प्रत्यक्षात कसे घडवले तेही त्यांनी सांगितले होते आणि मिळालेल्या निष्कर्षांवर समाधानही त्यांनी व्यक्त केलेले होते. एवढेच नव्हे तर आता आपल्याला आणखी चाचण्या करण्याची आवश्यकता भासणार नाही हेही सांगितले होते. केवढा आत्मविश्वास होता त्यांच्या कथनात. या सार्‍या यशोगाथेच्या पाठीशी कुठेतरी आम्हीही सारे होतोच ना, असा अभिमानही तेथे उपस्थित असलेल्या सर्व शास्त्रज्ञांत दिसून येत होता.

विद्यमान भारतात जगाला दिपवून टाकणारे, भारताला भवितव्यातील वैज्ञानिक नवाविष्कारांची पहाट दाखवू शकणारे आणि सिद्धहस्त सामर्थ्यांनी देशाचा गौरव वाढवणारे जे मोजके शास्त्रज्ञ आपल्याला लाभलेले आहेत, डॉ. चिदंबरम त्यातील बिनीचे शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या प्रज्ञेस, कार्यसंचितांस आणि भारतमातेच्या त्यांनी केलेल्या अपार सेवेस सादर प्रणाम!

पूर्वप्रसिद्धीः विद्याप्रसारक मंडळ, ठाणे, यांच्या “दिशा” मासिकाचा नोव्हेंबर-२०२१ चा अंक.

संदर्भः

१.     भाभा अणुसंशोधन केंद्राच्या संकेतस्थळावरील माहिती http://www.barc.gov.in/leaders/rc.html

२.     विकिपेडियावरील डॉ. राजगोपाल चिदंबरम यांची माहिती https://en.wikipedia.org/wiki/Rajagopala_Chidambaram

३.     भारत सरकारच्या प्रमुख वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाच्या संकेतस्थळावरील माहिती http://psa.gov.in/profile/dr-r-chidambaram

४.     भारतीय विज्ञान संस्था, बंगळुरू यांच्या संकेतस्थळावरील माहिती https://www.iisc.ac.in/wp-content/uploads/2016/06/Biodata-Dr-Chidambaram.pdf

५. वॉशिंग्टन टाईम्समध्ये आलेली बातमीः इंडिया ब्लास्टस टेक यू.एस.इंटेलिजन्स बाय सरप्राईज https://www.globalsecurity.org/intell/library/news/1998/05/980512-wt.htm

1 टिप्पणी:

Ash Tam म्हणाले...

फारच छान लेख. मी देखील त्याच काळात भाभा अणु संशोधन केंद्रात होतो, त्यामुळे पुनर्प्रत्ययाचा आनंद आला.